Bhet | भेट

By

'ऋणानुबंधाच्या जेथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी' गीताच्या या ओळी स्मृतीच्या कोशातून सहजच जाग्या झाल्या. निमित्त ठरलं एका स्नेह्याने भेट विषयावर काही तरी लिहून पाठवा म्हणून केलेली विनंती. शब्द कधीतरी कोणीतरी लिहितो. लिहिणारा सोबतीला असतो नसतो, पण त्याचे शब्द नांदत राहतात कोणाच्या तरी स्मृतीचा अधिवास करून. हे खरंही आहे. शब्दांना सांभाळता आलं तर चिरंजीव असण्याचं वरदान असतं. खरंतर भेट शब्द आकाराने, विस्ताराने केवढा. डोक्यावरील एक मात्रा आणि दोन अक्षरे घेऊन त्याचा प्रवास संपतो. पण त्यात असणाऱ्या आस्थेची डूब केवढी आहे. ती कशी मोजता येईल? त्याच्यात सामावलेलं आपलेपण कोणत्या मोजपट्ट्यांनी मापायचं? अंतर्यामी अधिवास करणारी भावनांची संचिते कशी मोजायची? कोणत्याही संपत्तीपेक्षा ती अधिक मोलाची असतात. भेट कुणाची असो, कोणत्या कारणांनी असो; तिच्यात आत्मीयता असेल, तर ती अंतरीचा ओलावा घेऊन येते. वाहत राहते स्नेहाचे किनारे धरून, आपलेपणाचे प्रदेश समृद्ध करीत.

भेटीतील हुरहूर अनुभूती असते आपणच आपल्याला समजून घेण्याची. तेथे केवळ सहानुभूती असून भागात नाही. ती आतड्यातूनच उमलून यायला लागते. गोठ्यात असणाऱ्या वासराच्या ओढीने हंबरत घराकडे धावणाऱ्या गायीच्या पावलांमधून ती पळत असते. पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी दूरदेशी गेलेल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईच्या डोळ्यात साकळलेली असते. कोण्या मानीनीच्या स्वप्नांतील प्रदेशात ती अधिवास करून असते. अभिसारिका बनून त्याच्या भेटीच्या ओढीने नजरा चुकवत, कोणी पाहत नाही याची काळजी घेत चालणाऱ्या पावलात ती लपलेली असते. 

भेटी केवळ औपचारिक सोहळे नसतात. त्यांच्यामागे अधिष्ठान असते निश्चित विचारांचे. त्या आत्मीय असतात. शुष्कही असू शकतात. भेटी आपल्यांच्या असतात. परक्यांच्या असतात. ओळखीच्यांच्या असतात, तशा अनोळखीपण असतात. निर्धारित असतात, तशा आकस्मिकही असतात. भेटी सहज असतात, तशा सहेतूकही असतात. काही ठरलेल्या, काही ठरवलेल्या असतात. काही जीवदान देणाऱ्या असतात. काही जिवावर उठणाऱ्याही असू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज अन् अफजलखानाच्या भेटीत अर्थाचे अनेक पदर होते. महाराजांच्या आग्रा भेटीस अनेक आयाम होते. कृष्ण सुदामाची भेट मित्रप्रेमाची परिभाषा होती. हनुमानाने लंकेच्या दिशेने घेतलेली झेप केवळ सीतेचा शोध घेण्यासाठी नव्हती. नळ राजाने हंसाला दमयंतीकडे पाठवण्यात भेटीचे तरल अर्थ सामावले होते. कालिदासाच्या मेघदूतातला यक्ष प्रियेच्या भेटीसाठी व्याकूळ होऊन निरोप देण्यासाठी ढगांची सोबत करतो.

भेटी माणसांना काही नव्या नाहीत. पण प्रत्येक भेटीत नवेपण असतं. फक्त त्याची कारणे नव्याने समजून घेता यायला हवीत. ती वैयक्तिक असतील. सामाजिक, राजकीय असतील किंवा आणखी काही. प्रत्येक कारणामागे काही अर्थ असतात. राष्ट्रप्रमुख, नेत्यांच्या भेटींना वलय असतं. त्या प्रतिनिधित्व करतात देशाचं. अशा भेटीत सहयोग, सहकार्याचे, स्नेहाचे अर्थ एकवटलेले असतात. काही भेटी किंतु-परंतुची उत्तरे शोधतात. काही किंतु निर्माण करतात.   
 
भेटी सगळ्याच सार्थ असतात असं नाही. काही आत्मीय ओढ घेऊन येतात. काही टाळाव्याशा वाटतात. सासरी नांदणारी लेक भेटीला येते म्हणून परिवार तिच्या पायरवांकडे डोळे लावून असतो. तिच्या भेटीत अंतरीचा कल्लोळ आपलेपण घेऊन वाहत राहतो. तिच्या संसारातील नांदत्या सुखाच्या वार्ता मनात समाधान बनून साठत राहतातं. पैलतीरावर लागलेले डोळे कुणाच्यातरी भेटीसाठी आठवणींनी वृद्धाश्रमात झरत राहतात. भेटीची आस घेऊन आयुष्याचे शुष्क ऋतू कूस बदलण्याची वाट पाहत राहतात. भेटी कशाही असूदेत, त्यात वियोग असेल, संयोग असेल. साठत जातात त्या स्मृतीच्या कोशात. हे संचितही कधी कधी अनपेक्षित भेटीला येतं आठवणींचं आभाळ घेऊन. नाही का?
**

3 comments:

  1. भेटीचे अनेक कंगोरे अतिशय समर्पकपणे प्रकट झाले परंतु व्यक्त व्हायचे राहिले अशी हुरहूर का कोण जाणे मनात निर्माण झाली. कदाचित ही हूरहूर पुढच्या "भेटी"साठी असावी.

    ReplyDelete