Kintu | किंतु

By
आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात, की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. अध्यात्माच्या परगण्यात द्वैत-अद्वैत, जीव-शिव वगैरे असं काही असतं, तसं आयुष्याबाबतही काही असू शकतं? अर्थात याबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद प्रतिवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असे नाही. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असे नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच. संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, संभ्रमाची पाखरे ज्यांच्या मनात सतत भिरभिरत असतात त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो किंवा अपार कुतूहलाचा. विषय काही असला, म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच.

खरंतर आपल्या आसपास द्वैत अनाहत नांदते आहे. ऐकत्वाचा, अद्वैताचा कितीही उद्घोष केला, तरी त्याच्या दुसऱ्या बाजूला कसे टाळता येईल? अनुकूल-प्रतिकूल बाजू प्रत्येक विचारामागे असतात, आहेत, हेही कसे नाकारता येईल? त्यांच्यात फरक काही असलाच, तर आहे आणि नाही या दोन बिंदूंच्या मध्ये घडणाऱ्या प्रवासातील रेषेवर असतो. तसेही काळाच्या अफाट पटलावर उभ्या असणाऱ्या साऱ्याच कहाण्या काही समान नसतात. प्रत्येक जण आपआपल्या परिघांना घेऊन आपणच आखून घेतलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतो. काळाने पदरी घातलेल्या मार्गाचे परीघ प्रत्येकाला पूर्णतः आकळतातच असे नाही. शेकडो स्वप्ने मनात वसतीला असतात. ती असू नयेत असे नाही, पण साऱ्या आकांक्षा पूर्ण होतीलच याची शाश्वती देता येते का? तरीही माणूस भटकत राहतोच ना, सुखाच्या लहानमोठ्या तुकड्यांना जमा करत. अंतर्यामी एक ओली आस बांधून असतोच, उद्याची प्रतीक्षा करीत. ती आहे म्हणूनच आयुष्याचे नव्याने अर्थ शोधत राहातो.

जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. पण दगडाला त्यांनी काय फरक पडतो. त्याचं असणं तेच असतं. फक्त त्याला कोरून घ्यावं लागतं. कुठल्या तरी आकाराला साकार करून माणूस त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? आपल्यातील अनावश्यक भाग काढून घ्यायला लागतो. अर्थात शेंदूर काही सगळ्यांना सहज लागत नाही. काहीच असे असतात. काहींनी स्वतःच तो लावून घेतलेला असतो. काही शेंदूरशिवाय देवत्व मिळवणारे असतात. असलेच एखादा अपवाद तर ते सगळीकडे असतात. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतेचं असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा.

आनंदाचा वसंत अनुभवण्याआधी शिशिरातली पानगळ ज्यांना समजून घेता आली, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात. अनवरत सुखांचा वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? उनसावलीसारखा त्याचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. आयुष्यात शुष्क उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे’ लिहिणं जमून आलं असेल का? रामदासांनी ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का? सुखांची काही सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली? ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण करणाऱ्यांचे सुख भाकरीच्या तुकड्यात असते. आयुष्याची इतिकर्तव्यता वाटते ती त्यांना. भाकरीचे प्रश्न संपले की, सुखाची परिभाषा बदलते. सुख, समाधानाची व्याख्या सतत विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात जातात. साद देत राहतात. साद घालणारे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. ‘पण... हा ‘पणच’ आयुष्यातल्या बऱ्याच गुंत्यांचे कारण असते, नाही का?

2 comments: