Varsh | वर्ष

By
आपल्या स्मृतींच्या पाऊलखुणा मागे ठेवीत वर्ष संपलं. खरंतर संपलं असं प्रघातनीतीच्या परिघात वर्तताना म्हणायचे असते. काळ आपला पुढेपुढे चालतच असतो. त्याच्या स्मृती आपला एक गाभारा शोधून भूतकाळाची वसने परिधान करीत इतिहासाच्या पानात विसावतात एवढेच. बाकी सगळं निसर्गनियमानुसार चालणारे ते चालतेच. दिवस, महिने, वर्ष संपली असे म्हणणे काळाचा छोटासा तुकडा करून मोजण्यासाठी एक परिमाण असते, बाकी काही नाही. दिवस, सप्ताह, महिने, वर्षाच्या गतीने कॅलेंडरच्या चौकटींना ओलांडीत काळ पुढे सरकत राहतो. घडणाऱ्या या प्रवासात काही प्रिय, काही अप्रिय स्मृती तो अंकित करून जातो. जाणारे वर्ष आणि येणारे वर्ष यांना सांधणारा तीनशे पासष्ट दिवसांच्या काळाचा तुकडा एक ‘वर्ष’ बनून आपला मिरवत राहतो. माणसे असे तुकडे सांधत, बांधत, आवरत आणि सावरत राहतात. यातील काही तुकड्यांना एकत्र करून आयुष्याला मढवितात. वाट्याला आलेल्या तुकड्यांची नक्षी कोरून जगण्याला सजवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मनाजोगते रंग त्यात भरतात. त्यातल्या रंगांनी काहींचे आयुष्य सजते; पण साऱ्यांनाच हे रंगकाम जमेल असे नाही. साऱ्यांच्याच आयुष्यांचे कॅनव्हास सुखद रंगांनी सजतात असेही नाही. माणूस मात्र आपले इंद्रधनुष्य शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.

जगणं संपन्न व्हावं, असं साऱ्यांनाच मनापासून वाटत असते. मनात उदित होणारे ते सुखस्वप्न असते; पण मनात उमलणाऱ्या साऱ्याच इच्छा-आकांक्षाना पूर्तीचे सौभाग्य लाभते असेही नाही. तरीही आज नसेल, पण उद्या पूर्वेकडील क्षितिजाला उजळीत येणारा सूर्य आपल्या प्रकाशाने माझ्यासाठी भाग्योदयाचे नवे साचे भरेल, ही अपेक्षा मनातून असतेच असते. कोणत्यातरी अपेक्षांना सोबत करीत माणूस जगत असतो. त्यांच्या पूर्तीच्या क्षणांची अनवरत प्रतीक्षा करीत असतो. प्रतीक्षेच्या लांबलेल्या क्षणांना सांभाळीत आस्थापूर्वक जीवनयापन करीत असतो. आल्यागेल्या क्षणांचा सोहळा करून नवी उमेद मनात बांधून घेत असतो. जाणाऱ्या काळाचे आणि येणाऱ्या काळाचे क्षण साजिवंत करीत असतो. माणूस मुळात उत्सवप्रिय असल्याने आनंद साजरा करण्यासाठी काहीना काही निमित्ते शोधीत असतो. जी काही निमित्ते त्याने निर्माण केली आहेत, त्यातील नववर्षाचं आगमन त्याच्या अपेक्षांकित मनाचा पळभर विसावा आहे. आनंद साजरा करणं ही स्वाभाविक वृत्ती सार्वत्रिक असली तरी, आनंद साजरा करण्याचे आविष्कार भिन्न असू शकतात. त्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. देशकालपरिस्थितीपरत्वे त्यात काही बदल घडतात; पण ते प्रासंगिक प्रकटीकरण असते.

२०१४ला निरोप देऊन २०१५चं आपल्यापैकी अनेकांनी आनंदित अंतःकरणाने स्वागत केले असेल. काहींनी आणखी काही केले असेल-नसेल माहीत नाही; पण येणारे वर्ष बऱ्याचदा काहीतरी प्रासंगिक वाद, प्रवाद आणि वादविवाद सोबतीला घेऊन अवतीर्ण होत असते. परंपरांना प्राधान्य देणारे काही आवाज ही आपली परंपरा नाही म्हणून पारंपरिक विरोध दर्शवितात. तर काही ग्लोबल आवाज आपण विश्वाचे नागरिक असल्याने संकुचितपणाच्या परिघात कशाला बंदिस्त व्हावे, म्हणून आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा उद्घोष करताना दिसतात. दोन्ही प्रवाहांचे माणूस म्हणून जगणे एकच; पण विचारांमध्ये प्रवाद वेगळे. असे असले तरी या विचारधारांमध्ये एक घटक कायम असतो, तो म्हणजे आनंद साजरा करण्याच्या पद्धतीला आपापल्या विचारांतून होणारा प्रासंगिक विरोध. यातून कधी प्रतिगामी, तर कधी पुरोगामी अशी नावे धारण करणारा विचारांचा संघर्ष सुरु होतो. जो तो आपापल्या विचारांचे अभिनिवेश धारण करून वर्ततो. या विरोधामागे असा कोणता निश्चित विचार असतो, हे सांगणे जरा अवघडच असते. अशी कोणती रीत असते ज्यामुळे उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत परिवर्तन वगैरे घडेल? मतभिन्नतेतून अमुक एक सण हा ‘क्ष’चा असतो आणि अमुक एक ‘ज्ञ’चा असतो, असे विभाजन का घडत राहते? याचे उत्तर सापडणे एक अवघड काम ठरते.

सण कोणत्या सांस्कृतिक पात्रातून प्रवाहित होत आला यांस महत्त्व देण्यापेक्षा, उत्सवांमुळे माणसांच्या जगण्याचे, विचारांचे परगणे समृद्ध होत असतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर ते परगणे समृद्ध होत असतील, जगण्याचे सहिष्णू तत्वज्ञान त्यातून निर्माण होत असेल, तर तो सण-उत्सव पाश्चात्य असला काय किंवा पौर्वात्य असला काय, त्यानी असा काय फरक पडणार आहे? खरंतर पूर्वरंग आणि पश्चिमरंग एकत्र येऊन सहिष्णुतेचा एक नवा सांस्कृतिक रंग आपापल्या सांस्कृतिक प्रवाहांना येण्यात काय हरकत असावी? पण अशाकाही क्षणांच्यावेळीच माणसांचे अभिनिवेश साचेबद्धरित्या अनपेक्षितपणे जागे का होतात, हे कळत नाही. या अभिनिवेशांच्याऐवजी आमच्यातलं माणूसपण संवेदनशीलता धारण करून प्रकट का होऊ नये? कोणताही सण, उत्सव मुळात वाईट नसतोच. तो तसा आपण समजतो किंवा तसे ठरवून मोकळे होतो. ठरावीक सणांना ठरावीक गोष्टींची लेबले चिटकवली जाणार असतील, तर त्या उत्सवांमधील आनंद हरवणार हे नक्की. माणसाने उत्सव साजरे करण्याचा असंमत पद्धतीविषयी नकारात्मक राहिले तर समजू शकतो; पण एखाद्या सण, उत्सवांविषयी सरसकट नकारात्मक विचारातून वर्तने ही वर्तनप्रवाहांची सुयोग्य रीत असते का?

नववर्षाच्या स्वागत समारोहाला प्रत्येकाने आपापल्यापरीने रंग भरण्याचा प्रयत्न केला असेल. काहींनी त्यातून थोडं सैलावलेलेपण शोधले असेल, तर काहींनी स्त्रैण स्वातंत्र्य पाहिले असेल. काहींनी त्याला संयमाचे बांध घालून साजरे केले असेल. काहींनी स्वैराचारालाच स्वातंत्र्य समजण्याचा प्रमाद केला असेल. अर्थात सगळीकडे हे आणि असेच घडते, असेही नाही. गेल्या काही काळापासून आपल्या देशप्रदेशात पाश्चात्य संस्कृतीचं अनावश्यक आक्रमण होत असल्याची तक्रार आपल्या आसपास अधून-मधून ऐकण्यात येत असते. अशावेळी घाईघाईने पाश्चात्यिकरणाचा सोयीस्करपणे अर्थ लाऊन आम्ही मोकळे होत असतो. वर्तनातला स्त्रैणपणा, बेफिकीरवृत्ती आपल्या सांकृतिक परिघात कदाचित प्रबल होतही असेल. संयमित वागण्याविषयी आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या सीमारेषांचे काही ठिकाणी उल्लंघन घडत आहे. हे म्हणणं एका मर्यादित अर्थाने वास्तवही आहे. आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने अनाहूतपणे येणाऱ्या अंमलाखाली संस्कृतीने दिलेल्या संस्कारांचा कोणताही अंमल न मानणारी तरुणाई रस्त्यावर झिंगताना दिसत असेल अन् हे पाहून या मुलांचे आणि सोबतच देशाचं भविष्य काही उज्ज्वल नाही, असे कोणास वाटत असेल तर त्यात काही अतिशयोक्तीही नाही; पण हा काही सार्वत्रिक नियम होऊ शकत नाही, कारण नीतिसंमत मार्गाने आणि सुसंगत मार्गाने वर्तनारीही याच देशाची तरुणाई आहे.

नेहमीप्रमाणे याहीवर्षी ठरलेल्या साच्यातल्या बातम्या वर्तमानपत्रातून आलेल्या कदाचित आपण वाचल्या असतील. मद्यपींचा धिंगाणा, त्यांच्या बेताल वर्तनाचा परिसरात होणारा त्रास, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडलेले अपघात, पार्टीतील बेधुंद वर्तनाने कोणातरी मानिनीची झालेली मानखंडना- बातम्या जवळजवळ त्याच, फक्त नावे नवीन. प्रतीवर्षी अशा घटना घडूनही कोणी विचारच करीत नसावेत, असे वाटण्याइतपत स्वैर वागणे घडते. स्वतःचीही काळजी न घेणारी ही पिढी दुसऱ्याच्या जीवाची काय पर्वा करणार आहे, असे वाटण्यापर्यंत वर्तन सैलावते. अशी पिढी व्यवस्थापरिवर्तनाचे कोणते नवे आयाम उभे करणार आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत असल्यास त्यात नवल नाही. देशाचं मोठेपण लोकांच्या वर्तनातून प्रतिबिंबित होत असते, असे म्हणतात. हे म्हणणं काही विसंगत नाही. अर्थात देशातील सारीच तरुणाई या मोजपट्टीने मोजता येत नाही. उडदामाजी काळे गोरे, हा न्याय येथे लावावा लागतोच.

सांप्रत पार्टीकल्चर झपाट्याने वाढत चालले आहे, हे सत्य नाकारणे अवघड होत चालले आहे. पार्टीसाठी कोणतेही क्षुल्लक निमित्त हल्ली पुरेसे ठरते. रेव्हपार्टीसारख्या गोष्टीतून तरुणाईचा धिंगाणा ओसंडून वाहत असतो. अशा उत्साहात सगळ्याच नाहीत, पण आपलं व्यक्तिगत स्वातंत्र्य जपणाऱ्या मानिनीही आनंदाने सहभागी होतात. मुलांपेक्षा आपण काकणभरही कमी नाहीत, हे दाखविण्याच्या स्पर्धेत काही तरुणी सहभागी होत आनंदाच्या सीमारेषा पार करणारा उत्सव साजरा करीत असतील, तर नैतिकतेचे नियम करताना हा पुरुष आणि ही स्त्री हा भाग शिल्लक उरतोच किती आणि कुठे? अशा स्वैर आचरणाला आपण काय म्हणाल? या वर्तनाला नैतिक अधःपतन म्हणण्याशिवाय आणखी कोणत्या नावांनी संबोधित करता येईल?

जागतिकीकरणाने ज्याकाही बऱ्यावाईट गोष्टी केल्या असतील त्या असोत, मात्र श्रीमंत, नवश्रीमंतवर्गाच्या सांपत्तिक कोशात घसघशीत वाढ केली आहे. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून भौतिक सुखांची लालसा निर्माण करणारे अनेक मृगजळी आभास समोर उभे केले आहेत. क्षणिक सुखांच्या संमोहनात अडकत आहेत. मोहपाशाला माणसे स्वर्गसुख समजायला लागली आहेत. अशावेळी सांकृतिक संदर्भांचे, मूल्यांचे अवनतीकरण झपाट्याने होत असल्याचे रडगाणे गाऊन काय घडणार आहे? सर्वत्र अविचारांचा अंधार दाटून आलेला असेल, तर पावलापुरत्या प्रकाशाची अपेक्षातरी करावी कशी आणि कोठून? ययातीचं जगणं कदाचित एक पौराणिक संदर्भ असेल; पण ज्यांच्याकडे सहज प्राप्त होणारे पैसा नावाचे सामर्थ्य आहे, ज्यांचे खिसे भरलेले आहेत ते ययातीच्या देहसोहळ्यांना लाजवतील, असे उत्तान सोहळे साजरे करताना विद्यमानकाळी लहानमोठ्या गावखेड्याशहरातून सहज दृष्टीस पडत आहेत.

मद्य, मदिराक्षी यांच्या विभ्रमांपासून स्वतःला जाणीवपूर्वक सुरक्षित ठेवण्याचा विचार इतिहास बनला आहे. देशात कदाचित मंदिरांपेक्षा मदिरालयांची संख्या नजीकच्या काळात अधिक झाली तर नवल वाटायला नको, असा काळ समीप येत चालला आहे. पावसाळ्यात जागोजागी उगवणाऱ्या भूछत्रांप्रमाणे रस्त्यारस्त्यांवर ढाबे, बार नामक एक संस्कृती वेगवेगळी नावे धारण करून अवतीर्ण होत आहे. येथे येऊन रमणाऱ्या रसिक भक्तांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढतच चालली आहे. सामाजिकपातळीवर मद्यप्राशन त्याज्य मानले जाण्याचे दिवस भूतकाळ झाला आहे. मद्याने भरलेले चषक ‘सोशलड्रिंक’ नाव धारण करून सोसलं जाणार नाही इतके तुडुंब भरत चालले आहेत. स्वातंत्र्याची व्याख्या जो तो आपापल्यापरीने सवडीने आणि आवडीने करतोय. अशा वर्तनातून स्वैराचार वाढत जाऊन नैतिकतेचे अधःपतन घडणार आहे, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही.

जुन्यावर्षाला निरोप देताना आणि नवीनवर्षाचे स्वागत करताना काही अपेक्षा असतात. हाती असलेल्या वर्तमानात काही कारणवश मनातील अपेक्षांची पूर्तता झाली नसेल, तर निदान त्या पुढे पूर्ण व्हाव्यात, हा विचार त्यामागे असतो. गेल्यावर्षाच्या दिवसांच्या चौकटींमध्ये जगताना माझ्या हातून कोणते क्षण पाऱ्यासारखे निसटले. काय घडले आणि काय घडायचे, करायचे राहिले याचे सिंहावलोकन घडणं यानिमित्ताने अपेक्षित आहे. नवीनवर्षाचे नवे संकल्प सोबतीला घेऊन वाट चालायची आहे. मागच्या वर्षात राहिलेले काही यावर्षातील हाती येणाऱ्या दिवसांत पूर्ण करायचे आहे, याची जाणीव आपणाला असायला नको का? काहीतरी करायचे राहिलेले आहे, ते शोधताना विद्यमान वर्षातला क्षणनक्षण सत्कारणी लागावा, असं किती जणांना मनापासून वाटत असते, माहीत नाही; पण आपल्यातील अपूर्ण जे ते पर्याप्त मात्रेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहण्यात शहाणपण सामावले असताना माणसं उत्सवातील क्षणिक आनंद शोधतात; पण तेथूनच उदित होणाऱ्या शाश्वत आनंदाकडे कळत-नकळत दुर्लक्ष घडते, याला काय म्हणावं?

दोन पिढ्यांच्या विचारांत अंतर असते हे मान्य; पण त्यांच्यात विसंगती असेल तर संवाद घडूच शकत नाही. जुनी पिढी त्यांच्याकाळी वाट्यास आलेल्या अभावग्रस्त जीवनाला, तेव्हा केलेल्या कष्टाला सतत अधोरेखित करीत असते. विपरीत परिस्थितीतून आपण आपल्या अभ्युदयाचा पथ कसा शोधला, याचे वस्तुपाठ नव्यापिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असते. पण जुन्या पिढीची ही परायणे अशीच सुरु असतात, असे नव्यापिढीचे जुन्यापिढीविषयी मत जवळजवळ सार्वत्रिक पातळीवर आढळते. नव्यापिढीला या स्थिती परिस्थितीविषयी काही देणे घेणे नाही. तुमच्या वेळेस तशी परिस्थिती असल्याने तुम्ही तसे वागलात. घडलात. आमच्याकाळी असे काही नाही, मग आम्ही मिळणाऱ्या सुखसुविधांपासून वंचित का राहावे? असा त्यांचा सरळसरळ प्रश्न असतो. अभावात जगणे हा काही अपराध नाही; पण परिस्थिती सर्व बाजूंनी अनुकूल असताना स्त्रैण जगणे हा अपराध असू शकत नाही का? आनंदाची प्राप्ती गुन्हा नाही. तो जेथून मिळत असेल तेथून जरूर मिळवावा. मग तो तुकड्यातुकड्यांनी का मिळेना; पण तो नीतिसंमत मार्गाने संपादित करता येत नसेल, तर तो अपराध असतो.

एकाचएक ठिकाणी वसती करून सुख चिरकाल राहत नसते, याची जाणीव सार्वजनिक आणि वैयक्तिकरित्या वर्तताना व्यक्तिगत स्वातंत्र्य अपेक्षिणाऱ्याना नसावी का? जाणारे कोणतेही वर्ष काही सगळीकडेच आनंदाची पखरण करीत निरोप घेत नाही. आपल्या उदरात अनेक बऱ्यावाईट घटना-घटिते सामावून घेत ते निरोप घेते. त्यातील चांगल्याचे स्मरण जरूर असावे; पण वाईटाचे चिंतन करायला नको का? समाजात सुखं सार्वकालिक नसतात. बऱ्याचदा संकटांचेच अधिक्य असल्याचे दिसत असते. त्यांना धीरोदात्तपणे सामोरे जात माणसांचे जगण्याचे व्यवहार सुरु असतात. आयुष्यात उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसांसाठी माणसे आज ऊर्जा शोधत असतात. आशेच्या आणि आस्थेच्या क्षणांना सोबत घेऊन नियतीने निर्माण केलेले पथ; जे आपल्या वाट्याला आलेले आहेत ते आक्रमित असतात. कधीतरी अनपेक्षितपणे त्यांच्या जीवनाच्या शांत डोहात काही लाटा निर्माण होतात. त्या कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटे घेऊन येतात. तरीही संकटांशी संघर्ष करीत पुढेच चालत राहावे लागते, कारण जो थांबतो तो संपतो.

यावर्षाचा आनंद आपापल्यापरीने साजरा केला गेला. तसे करण्यात गैर काहीही नाही. आनंदाची कारंजी मनात थुईथुई नाचत असताना आपल्या समाजात अनेक अभावग्रस्त आहेत आणि ते संघर्ष करीत जगत आहेत, याचे भान आपल्या मनात अंशमात्र असेल का? ओसंडून उतू जाणाऱ्या आनंदात तेही वाहून गेले असेल, की दुर्लक्षिले गेले असेल. तसे असले तर अभावग्रस्तांच्या जीवनातील अंधारे कोपरे उजळण्यासाठी आपण काय केले, हा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला का? खरंतर जाणाऱ्या वर्षाने अनेक आघात आपल्या सार्वजनिक, वैयक्तिक जीवनावर, जगण्यावर केलेले असतात. अनपेक्षितपणे आलेल्या नैसर्गिक आपत्तीनी माणसांचे जगणे उध्वस्त केलेले असेल. तर्कविसंगत विचारांना नैतिकतेचे अधिष्ठान समजून तो विचार रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमुळे अनेक निरपराध्याना असह्य यातनांना सामोरे जावे लागले असेल किंवा असेच काहीतरी घडले असेल. याचा विचार आपल्याच सुखात रममाण असणाऱ्यांनी केला असेल का? आपत्ती, संकटे आपल्यापासून दूरवर दिसत असलीतरी, ती कधीही आपल्या जगण्यातही प्रवेशित होऊ शकतील, याची जाणीव आनंदोत्सव साजरा करताना माणसांच्या अंतर्यामी असायला काय हरकत असावी?

आनंद जरूर साजरा व्हावा; पण तो साजरा होताना सामाजिक दूरितांचेही भान समाजाचा एक घटक म्हणून आपणास असायला हवे. सारेच प्रश्न काही केवळ देशासमोरील समस्यांचे नसतात. कधीतरी ते वैयक्तिकही असू शकतात. अर्थाचे-अनर्थाचे आणखी काही पदर त्यांना असू शकतात. कदाचित त्या समस्या आपल्याही असू शकतात. समाजात दैन्य, दास्य, दारिद्र्य, वंचना, उपेक्षा, अन्याय आहे. त्याने सामन्यांचे जगणे दुष्कर केले आहे. माणसं विकल होत आहेत. विज्ञाननिर्मित विचारांच्या जगात अज्ञान साठत चालले आहे. अंधश्रद्धांचे जाळे विणलेच जात आहे. गरिबी, बेरोजगारीचं जिणे समोर असताना नवे काही घडण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. गुन्हेगारांना नवनवे मार्ग सापडत आहेत. गुन्हेगारीला बरकत येणं सामाजिक स्वास्थ्य संतुलित नसल्याचं द्योतक ठरते आहे.

अर्थात, माणसासमोरील सगळेच प्रश्न जटील असतील किंवा असले पाहिजेत असे नाही. आपल्या समोरील काही प्रश्न कधीकधी अगदी साधेसेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी फार वणवणही करायला लागत नाही. फक्त आपले लक्ष त्या बाजूने जाणीवपूर्वक वळते करायला लागते. प्रश्न कोणतेही असोत, त्याविषयी मनात आस्था असावी लागते. आस्थेतून निर्मित सकारात्मक विचार विपरीत परिस्थितीतही परिवर्तन घडवू शकतात. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बदलणाऱ्या वाटा निवडाव्या लागतात. प्रश्नांनी निर्माण केलेल्या परिस्थितीला भिडावे लागते. तेव्हाच बदलांचा प्रकाश परिसरात पडून पसरतो. ज्याला बदलांचे भान आहे, त्याच्यासाठी खरा आनंदोत्सव परिवर्तनात साठलेला असतो. तो जितका नववर्षाच्या स्वागत समारंभात असतो, त्यापेक्षा काकणभर अधिक परिवर्तनासाठी पुढे येणाऱ्या पावलांच्या आवाजात असतो. नाही का?

3 comments:

  1. सर आज जगण्याची पद्धत बदलली.सुख समाधान यांच्या व्याख्या बदलल्या. वैयक्तिक सुखाला जास्त महत्व प्राप्त झाले .चांगले वाइट यातील फरक सुद्धा आम्ही विसरलो किवा सोइस्कर दुर्लक्ष केले जाते आणि म्हणून हा धिगाना वाढतो.

    ReplyDelete
  2. सर आज जगण्याची पद्धत बदलली.सुख समाधान यांच्या व्याख्या बदलल्या. वैयक्तिक सुखाला जास्त महत्व प्राप्त झाले .चांगले वाइट यातील फरक सुद्धा आम्ही विसरलो किवा सोइस्कर दुर्लक्ष केले जाते आणि म्हणून हा धिगाना वाढतो.

    ReplyDelete