अपग्रेड तर राहावंच लागतं, नसेल तर व्हावं लागतं. मग तो माणूस असो, त्याने निर्माण केलेली व्यवस्था अथवा अन्य काही. सगळ्यांनाच बदलाच्या वाटेने वळतं व्हावं लागतं. नुसता बदलच पुरेसा नसतो, तर प्रगतही व्हावं लागतं. एवढं कशाला काळालाही अपग्रेड नाही करता आलं तर तोही सोकावतो. आठवणीतून कोमेजतो अन् विस्मरणाच्या वाटेने वळतो. अपग्रेड होणं म्हणजे नेमकं काय? फार अवघड नाही याचं उत्तर. पण कृतीत आणणं बऱ्यापैकी मुश्किल असतं. माझ्यातील न्यून कणाकणाने वेचत राहणे अन् वैगुण्ये क्षणाक्षणाने कमी करत जाणे म्हणजे अपग्रेड होणे. हे कण अन् क्षण कळले की, अन्य परिभाषा पहाव्या नाही लागत. आपण आपल्याला पडताळून पाहता आलं तरी पुरेसं असतं.
परिस्थितीचे किनारे पकडून सरकणारा जीवनप्रवाह जगणं समृद्ध करणारा असावा. आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलांचा प्रवास वर्धिष्णू असावा. अपेक्षा तर हीच असते सगळ्यांची. अन् सार्वकालिकही. पण परिस्थिती प्रत्येकवेळी अनुकूल असेलच असं नाही. पावलांना पुढच्या वाटा दिसाव्या. नजरेला क्षितिजांनी खुणावत राहावं. प्रतिसादाच्या पथावर पडलेलं धुक्याचं पटल पार करण्यासाठी चालता चालता आपणच आपल्याला गवसणं म्हणजे अपग्रेड होणं. काल आणि आज यात असणारं अंतर अन् या अंतराला पार करताना करावे लागणारे सायासप्रयास म्हणजे अपग्रेड होणं. उद्याच्या कुशीत असलेली सुखे वेचण्यासाठी कूस बदलणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नाही का?
जगण्याचे सोहळे असतात, तसे आयुष्याचे ऋतूही. त्यांना प्रांजळ प्रतिसाद देता येणं असतं अपग्रेड होणं. ऋतूंच्या सोबत बहरता यावं म्हणून सृष्टीने कोरलेल्या रंगांना समजून घेणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पाण्यासोबत वाहताना लाटांशी सख्य साधत किनाऱ्यांशी गुज करता येणं म्हणजे अपग्रेड होणं. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पाखरांच्या गळ्यातून येणाऱ्या गाण्यांना प्रतिसाद देणं म्हणजे अपग्रेड होणं. वाऱ्यासोबत वेडीवाकडी वळणे घेत वाहता येणं असतं अपग्रेड होणं. पावसासोबत रिमझिम बरसणं, ढगांसोबत कोसळणं, विजांसोबत लख्ख चमकणं असतं अपग्रेड होणं. फुलांसोबत गंध बनून विहरत राहणं म्हणजे अपग्रेड होणं. झाडावरून पिकलेल्या पानासारखं कोणतेही आसक्ती मागे न ठेवता देठ सोडून निखळपणे निखळणं अन् कोवळ्या कोंबातून नव्याने उगवून येऊन डहाळ्यांवर हसत राहणं असतं अपग्रेड होणं. न निरोपाचं दुःख, ना आगमनाचा आनंद. आहे केवळ बदलणं. बदलासाठी नव्या वळणाकडे वळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नितळपणाचे साज लेवून विहरणाऱ्या लेकराच्या निर्व्याज जिज्ञासेत सामावलेलं असतं ते. कुतूहलाने ओथंबलेल्या त्याच्या डोळ्यात एकवटलेलं असतं. निसर्ग सहजपणाचे साज घेऊन सजलेला असतो. त्यात कोणतेही अभिनिवेश नसतात. एक वळण पार केलं की, दुसऱ्यालाही तेवढ्याच आस्थेने साद देता येणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. सहजपण जगण्यात सहजपणे सामावलं की, अपग्रेड होण्याचे ज्ञातअज्ञात अर्थ आपसूक समजतात. त्यांचे एकेक कंगोरे कळू लागतात. हे कळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं.
मी अपग्रेड होतो म्हणजे काय. तर भौतिक सुविधांनी सजलेलं वितभर जग पाहून हरकतो. ते आपलसं करण्यासाठी यातायात करत राहतो. आवाक्यात असलेली, नसलेली सुखं अंगणी आणण्यासाठी धडपडत राहतो. या धडपडण्याला अपग्रेड असं म्हणतो. भौतिक सुखांना अपग्रेड करण्याच्या ओघात आंतरिक समाधानाला सोयीस्कर दुर्लक्षित करतो. नको असणाऱ्या किंवा आवश्यक असल्याच तर नगण्य गोष्टीना अपग्रेड करत राहतो अन् त्यातून हाती लागलेल्या चारदोन चुकार क्षणांना सुखाच्या व्याख्या समजतो. वास्तविक समाधानाचा जेथून उगम आहे, तो प्रवाह अपग्रेड करायचं राहूनच जातं.
मी घर अपग्रेड करून बंगला करतो. दुचाकी वरून प्रवास प्रतिष्ठाप्राप्त नाही वाटत, म्हणून चारचाकी आणून दारात उभी करतो. साधसंच पण आपलेपणाने सजलेलं घर समाधान नाही देत, म्हणून ते जमीनदोस्त करून बंगला बांधतो. नानाविध सुविधांनी मंडित करतो. एकाची आवश्यकता असेल तर गरज नसतानाही त्यात आणखी चार गोष्टी आणून पेरतो अन् समाधानाची रोपटी उगवण्याची प्रतीक्षा करत राहतो. गाडीचं नवं मॉडेल दाराशी असावं, मोबाईल अपग्रेड असेल तोच हाती दिसावा म्हणून कासावीस होतो. हवं ते आणि तेच हाती लागावं म्हणून नाना कवायती करतो. का करतो आहोत आपण एवढी कसरत याचा काडीमात्र विचार न करता जुळवत राहतो एकेक चौकटी. चौकटीची सूत्रे सापडणे म्हणजे अपग्रेड होणं नसतं, तर संदर्भांच्या साखळीतून सुटलेल्या सूत्रांचा शोध घेता घेता समष्टीला आपल्यात सामावून घेणाऱ्या चौकटींचा अन्वयार्थ कळणे म्हणजे अपग्रेड होणं असतं.
- चंद्रकांत चव्हाण
▪