बोन्साय

By // No comments:

प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे आत्मसन्मानार्थ उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो. अशी माणसे मानवकुलाचं वैभव असतात. त्यांच्या असण्याने माणूस असण्याचे संदर्भ सापडतात अन् संवेदनांचे अर्थ उलगडत जातात. पण असं कितीदा प्रत्ययास येतं? सहज नाही सापडत अशा प्रश्नांची उत्तरं. याचा अर्थ कणा असलेली माणसे आसपास नसतात असं नाही. ती असतात. पण त्यांचं असणं अभावाच्या आसपास रेंगाळत असतं. म्हणूनच कणा सलामत असणारी माणसे अनेकांच्या आस्थेचा विषय असतात. एकांगी विचारांनी विहरणारी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? माणसे मोठी असली, अगदी हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी असली, पण त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागलं असेल, तर आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या वितभर माणसांसमोर टीचभर वाटू लागतात. 

बोन्साय कुंड्यातच शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, म्हणून वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नियतीने कोरलेलं नसतं. त्याच्या विस्ताराचं विश्व कुणीतरी कोरून दिलेल्या परिघाएवढं असतं. मातीशी असलेलं सख्य मुळं विसरले की, विस्ताराचे परीघ हरवतात. प्रवास सीमांकित झाला की उंची हरवते. मूल्यांमधून माणूस सुटला, की विचारांचं विश्व आक्रसत जातं. सीमा संकुचित होत जातात. एकवेळ माणूस हरवला तर शोधून आणता येईलही, पण जगण्यातून संवेदनांनी काढता पाय घेतला की मुक्कामाची ठिकाणे हरवतात. नीतिसंस्कारांनी निरोप घेतला अन् मूल्यांनी पाठ फिरवली की, माणूसपणाच्या कक्षा विस्ताराचे अर्थ विसरतात. 

मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ एक शून्य ज्याला आकार तर असतो, पण विस्तार नसतो. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसं आसपास असणं अस्वस्थ करणारं असतं. अविचारांशी लढावं लागलं की, विचारांचं महत्त्व अधोरेखित होतं. वेदना प्रखर होतात, तेव्हा सहनशीलता शब्दाचे अर्थ कळतात. वैयक्तिक स्वार्थापायी समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. स्वतःला सजवायच्या सगळ्या संधी सहजपणे हाती असतानाही केवळ इतरांच्या सुखांचा विचार करून, स्वार्थाच्या सीमा पार करता येतात त्यांचं जगणं अधिक देखणं असतं. 

समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. प्रत्येक वेळी, प्रत्येकाला समंजसपणे वागता येईलच असं नाही. पण संवेदना जाग्या ठेवता येणं काही अवघड नसतं. संवेदनांचे किनारे पकडून प्रवास करता आला की, स्नेहाचे संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. असतो केवळ आपलेपणाच्या ओलाव्याचा शोध. स्वार्थ हाच जगण्याचा मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी पुस्तकांपुरत्या उरतात. आपलेपणा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात. आपणच आपल्या विश्वात विहार करू लागलो की, आस्थेचा परिमल घेऊन वाहणारे वारे दिशा पालटतात. झुळूझुळू वाहणारे स्नेहाचे झरे आटतात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो. 

आस्था दोनही किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने प्रवास करत नसते. किनारे प्रवाहाशी कधीही प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात आपल्या कुशीत. नात्यांतील अंतर कलहनिर्मितीचे कारण असू शकतं. प्रत्येकवेळी सयुक्तिकच असेल, पर्याप्त असेल असं नाही. माणसे दुरावतात. कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो. त्यांची पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते. वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही राहत. वेगळं विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प अबाधित असतात. असणे आणि नसणे दरम्यान एक संदेह असतो. तो कळला की, आयुष्याचे एकेक अर्थ उलगडत जातात. स्वार्थाभोवती प्रदक्षिणा घडू लागल्या की, पर्यायांचा प्रवास संपतो अन् पर्याप्त शब्दाचे आयुष्यातले अर्थही आपसूक हरवतात. 

चंद्रकान्त चव्हाण
••