आम्हांस आम्ही पुन्हा पहावे

By // No comments:
“आज सपशेल पराभूत झालो मी. अगदी अथपासून इतिपर्यंत संपलो सगळा. ना कुठला दुवा राहिला सांधायला. ना कोणती दुवा काम करेल मोडलेला कणा बांधायला आता. अवघे आशीर्वाद पणाला लावले अन् सगळ्या प्रार्थनाचे सूर सजवून वरदान मागितलं, तरी हे वठलेलं झाड काही पुन्हा मोहर धरणार नाही. इथपर्यंत वाढायला त्रेपन्न वर्षे लागली अन् उखडायला केवळ कोरभर काळ! का व्हावं असं...? साला, किती माज होता मलाच माझ्यावर. केवढ्या आत्मविश्वासाने सांगत होतो की, माझ्यासारखा सुखी जीव अन्य कोणी नसावा आसपास. पण हे सांगताना एक गोष्ट विसरलो की, सुख म्हणजे समाधान नसतं. तुम्ही कितीही अट्टाहास केला तरी समाधानाच्या व्याख्या काही सुखांच्या चौकटीत नाही बसवता येत. सोबती, सवंगडी किती कौतुक करत होते माझ्या असण्याचे. उदाहरणे देत होते. पण त्यांना आणि मलाही काय माहीत की, काळ मुकाट्याने खेळतो आहे त्याच्या चाली. मी मात्र माझ्याच चालीत चालत राहिलो. हे सगळं बेगडी आहे, आज देखणी वगैरे दिसणारी चमक एक दिवस निघून जाणार आहे. याकडे लक्षच दिलं नाही अन् गेलं तेव्हा काळाने कूस बदलून नव्या वळणाचा शोध घेतला होता.”

“हो, पण असं काय झालं की, तुला हा साक्षात्कार आताच होतो आहे? काही तत्त्वज्ञानाची पुस्तकं वगैरे वाचून झोपला होतास का रात्री? स्वप्नात वगैरे नाहीयेस ना? असं नसेल तर मग काहीतरी सांगण्यासाठी एवढी दीर्घ प्रस्तावना कशासाठी? सरळ सरळ हेतुकथन करून पाठ पुढे नेऊन संपव ना...!” या महोदयाला जमिनीवर आणण्यासाठी थोडं तिरकस बोललो. 

माझ्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून तो आपल्याच तंद्रीत पुढे बोलत राहिला, “आज कोणी माझ्याशी बोलतो, तेव्हा वाटतं विषय वेगळ्या वाटेने वळता करावा. 'अगतिक' म्हणून एक शब्द आहे आपल्या भाषेत, त्याचा अर्थ आज कळला. सत्य हेच आहे की, माणसाने माज करू नये आणि एखाद्यावर नाजही करु नये. किती स्वप्ने पाहिली होती मी...! अर्थात, ती काही अगम्य, अशक्य, अतार्किक वगैरे नव्हती. सामान्यांच्या आवाक्याइतकीच तर होती. मोजली तर ओंजळभर भरली असती. त्याकरिता केवढा पसारा उभा केला. पण हे एक सत्य तुम्ही विसरतात की, काही केलं तरी पुढ्यात पसरलेलं वास्तव काही सहजी बदलू शकत नाही. काही आणि कितीही करा, तुमची औकाद कुणीतरी त्याच्या मापात मोजत असतंच असतं.”

माझ्याच वयाच्या माझ्या मित्राचा हा त्रागा. उच्च विद्याविभूषित. साहित्यात पदव्युत्तर पदवी घेऊन अध्यापनातून इतरांच्या पदरी ज्ञान, संस्कार, मूल्ये वगैरे पेरतो आहे. तो कोण, हे फारसं महत्त्वाचं नाही. म्हटला तर अगम्य अन् समजून घेतलं तर अगदी ओंजळभर. समजा या जागी कोणी अन्य असता, तर असाच व्यक्त झाला असता का? सांगणं अवघड आहे. खरंतर यासाठी कोणी आपला स्नेही, परिचितच असावा असं नाही काही. तुम्ही, मी किंवा आणखी कोणीही असू शकतो. घटनांचा क्रम, स्थळ, काळ, वेळ, परिस्थितीचे कंगोरे बदलले तरी असणारा अर्थ जवळपास एकूण एकच असेल. असलाच फरक तर किंचित इकडचा अथवा थोडा तिकडचा. फार मोठ्ठं अंतराय असेल असं नाही. घटना घडत असतात. त्या टोकदार असाव्यातच असं नसतं. अगदी बोथट अन् क्षुल्लक वाटणारी बाबसुद्धा प्रसंगी आपला विस्तार दाखवू शकते. 

सतत संयमाचे तीर धरून वाहणारा हा मर्यादांचे किनारे कसे काय पार करतो आहे, याचं आकलन काही होत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरील बदलत्या रेषांकडे पाहत नेमकं काय घडलंय याचा अदमास घेत राहिलो. तर्काचे किनारे धरून मुद्द्याकडे सरकू लागलो. पण तर्कही तोकडे पडायला लागले. त्याचा राग आळवणे काही कमी होत नव्हते. त्याचेच त्याने सूर पकडले होते. वरची पट्टी धरली असल्याने इतर आवाज सामावून घेणं अवघडच होतं. मी काय सांगतो आहे, याकडे लक्ष न देता बोलत राहिला. बरंच काही काही.

“माणूस म्हणून मी अधिक चांगला कसा बनेन, याचंच चिंतन करीत आलो सतत. आसपास असणाऱ्या अनेक ज्ञात-अज्ञात चौकटींचा विस्तार पाहून स्वतःला त्या मापात ठाकूनठोकून का असेना बसवत राहिलो. मला ठावूक आहे, जगाच्या जगण्याच्या तऱ्हा मला नाही बदलता येणार. बदलायला मी काही महात्मा नाही. की जगाच्या संसाराची चिंता करणारा संत अथवा मोहाच्या मृगजळामागे ओढणाऱ्या सगळ्या सुखांना लाथ घालून मोक्ष मार्गाने मार्गस्थ होऊ पाहणारा मुमुक्षू महंतही नाही. यापैकी आपल्याला नाहीच काही करता येत, हे मान्य करून माणूस म्हणून आपणच आपल्याला शोधत राहिलो आयुष्यभर. मोहाच्या मायाजालात विहार करूनही शक्य तितकं स्वतःला निर्व्याज करत राहिलो. वाहता वाहता नितळ होत राहिलो. निखळ असणं काय असतं समजून घेत राहिलो. पण हाती काय तर तोच अपेक्षाभंगाचा भोपळा. जगाचं जावूद्या, निदान घरातल्यांनी माझं जग अन् जगणं समजून घ्यावं की नाही?” 

“अरे, काय झालं नेमकं सांगशील का? काही कळेल असं तरी बोल. तुला असं नाही का वाटत की, तू तुझंच घोडं पुढे दामटतो आहेस?” त्याला मूळ मार्गावर आणण्यासाठी थोडा तिरकस रस्ता पकडून बोललो. 

“कसलं घोडं अन् कसलं गाढव? हे मुके प्राणी बरे यांच्यापेक्षा. निदान धन्याशी प्रामाणिक तरी असतात. पण माणूस...? त्याच्या एवढा कृतघ्न जीव अन्य कोणी नाही. कुठल्याशा नात्याची लेबले लावून आलेली नसतील अथवा रक्ताचा धागा पकडून धमन्यातून वाहत नसतील अशी माणसे, तर ते एकवेळ समजून घेता येईलही. सगळ्याच नात्यांना मनाजोगते रंग नाही देता येत हेही मान्य. पण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, त्यानेच आपल्याला फोडावं? देहावर पडलेले घाव विसरता येतात. पण मनावर झालेल्या वाराचं काय? कशा झेलाव्या या जखमा? मी नशीब, दैव वगैरे काहीही मानत नाही. ते असण्याची शक्यताही नाही. असतं तसं तर काहींच्या झोळ्या सतत भरलेल्या अन् काहींच्या कितीही केलं तरी कोरड्या त्या कोरड्याच, असं घडलंच नसतं. काळ माणसासोबत खेळत असावा बहुतेक. कारण, तसं नसतं तर कुणी एवढं अविचाराने वागलं नसतं. वाटलं होतं की, आयुष्याचा उत्तरार्ध कृतार्थभाव पदरी पेरून जाईल. पण कसलं काय, परिस्थितीच्या एका आघाताने आलो जमिनीवर. लागलो सरपटायला.”

“कारणे कोणती असतील ती असोत. कदाचित काही कसर राहून गेली असेल किंवा आणखी काही. कदाचित तुझाही अहं समजुतीच्या मार्गावर आडवा आला असेल. अहंकाराच्या वाती पेटवून पाडलेल्या प्रकाशाच्या प्राक्तनात परिवर्तनाचा प्रेषित होणं पेरलेले नसतं. अंधाराला संपवणं नियतीने त्याच्या ललाटी गोंदलेलं नसतं. असलंच काही तर केवळ एकटेपण असतं त्याच्या नशिबात. हे सत्य असेल अन् शाश्वत असेल, तर कशाला हवा जगण्यात ‘मी’पणा अन् असण्यात अस्तित्वाचे परीघ संकुचित करणारे असले अहं?” त्याच्या त्राग्याचा बऱ्यापैकी अदमास घेत म्हणालो.  

“माहीत नाही. पण 'पूर्णत्त्वाच्या पलीकडे उभे नश्वरतेचे कडे' असं काहीसं म्हणतात, ते खरं असेल का? एक काळ होता मोठ्यांनी म्हणावं आणि लहान्यांनी मानावं. पण... हा पणच अगणित प्रश्न निर्माण करणारा आहे. या 'पण'मध्ये का अडकावं? भोग असतात प्राक्तनाचे, असं म्हणणारा आणि मानणारा मी नाही. पण माणसांच्या मनाला अन् त्या मनात वसती करून असणाऱ्या संस्कारांना समजणारा आहे. तुमच्याकडे सगळं असलं, पण मूल्यांच्या व्याख्या अन् नीतिसंकेतांच्या परिभाषा अवगत नसतील तर तुमच्या असण्याला अर्थ नाही.” 

त्याच्या तत्त्वज्ञानाचे पेटलेले पलिते काही केल्या विझत नव्हते. आपल्या विचारांचा प्रकाश अट्टाहासाने तो आसपास पेरू पाहत होता. त्याला थांबवत म्हणालो, “तुला नाही का वाटत तू समोरच्याला महात्मा समजून त्याच्याकडून उन्नत, उदात्त वगैरे विचारांची अन् परिणत जगण्याची कांक्षा करतो आहेस? समोरचा माणूस आहे अन् त्याच्या काही मर्यादा आहेत, हे मान्य करायला तुला काही समस्या आहे का? समोरच्यात उगीच संत शोधतो आहेस? महात्म्याचे दिवस कधीच मागे पडलेत. आता महत्त्व वाढवून घ्यायचे दिवस आहेत. कोण कोणत्या मार्गाने कोणाला मागे टाकेल सांगता नाही येत. स्वार्थ जिवांची सहजवृत्ती आहे अन् हे सार्वकालिक सत्य आहे. माणूस वगळून अन्य जिवांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात. जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायासांपलीकडे त्यांना काही अवगत नसतं अन् तशी आवश्यकताही नसते. माणूस यापलीकडे असलेलं आणखी काही शोधतो. हेही सत्यच आहे अन् अपरिवर्तनीय आहे. किमान एवढी तरी जाणीव आपल्या अंतरी असायला नको का?” 

“सत्य काही असो. सत्य एकच, तुम्ही एकटे असतात, एकटेच जगतात अन् जातातही एकटेच. ही नाती वगैरे सगळ्या गोष्टी फालतू अन् भावनिक मुद्दे आहेत. आपणच आपला मांडून घेतलेला पसारा असतो. भावना समजून घ्यायला आपल्याकडे संवेदनशील मन असायला लागतं. जीव पाखडणारी माणसं, असा काहीसा शब्द वापरला जातो. पण तो काळाच्या प्रवाहात एवढा बदलेल, हे काळाला तरी कुठे ठाऊक होतं?” काळीज कोरणारी सल कायम ठेऊन तो बोलत राहिला. 

त्याला त्याच्या विचारांच्या वर्तुळातून ओढून दूर नेत म्हणालो, “प्रत्येक प्रयत्न सफल व्हावेत असं नसतं. कधी प्रमाद, कधी परिस्थिती प्रयत्नांच्या परिभाषा लेखांकित करीत असते. प्रमादांची पावले घेऊन चालत आलेल्या दुःखाबाबत समजून घेता येतं. एक मानसिक तयारी असते त्यासाठी करून घेतलेली. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर? अशावेळी पुढ्यात पेरलेल्या गोष्टींना सामोरे जाण्याशिवाय अन्य कोणता पर्याय असतो का? दोष कुणाचा शोधता येतो. यश कुणाचं, हे अवश्य पाहता येतं. पण प्रत्येकवेळी पराक्रमाची अन् पराभवाची कारणमीमांसा करता येतेच असंही नाही.” 

“अवमान विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् कर्तव्यांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही. असलेच कुणी तर अपवाद असतील. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका अगदीच रास्त नसतील, पण अगदी टाकावू अन् अवास्तवही नसतात. प्राक्तनाने प्रतिकूलतेची पानं पुढ्यात मांडून ठेवलेली असताना प्रयत्नांनी आयुष्याचे अनुकूल अन्वय लावण्यात गैर ते काय? पण ज्यांच्यासाठी तिळतिळ तुटावं, तेच सगळे अनुबंध तोडायला निघाले असतील तर... दोरी रेशमाची असली काय किंवा आणखी कसली, त्यानी कोणता फरक पडणार आहे? तुटणं कातळावर रेष बनून रेखांकित होणार असेल, तर नियतीही त्यांच्या दिशा नाही बदलू शकत. संधी त्यांनाच असते, जे तिच्या नूपुरांचा नाद ऐकून प्रतिसादाचे प्रतिध्वनी बनून साद घालतात. आसपासच्या आसमंतात विहरणाऱ्या सूक्ष्म संकेतानाही ओळखून घेतात.” आपलं म्हणणं माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करीत तो बोलला.

“आयुष्य वगैरेवर लोक आयुष्यभर बोलत असतात. आयुष्यभर बोलूनही आयुष्याचे अर्थ नीटपणे कळत नाहीत. ते कळत नाहीत, म्हणून कळत-नकळत त्याचे आणखी काही कंगोरे काढले जातात. कळत नसेल काही तर का म्हणून त्याचे पापुद्रे काढत राहावे? का कोरत राहावे त्याचे कोपरे? नसतील उत्तरे सहजी हाती लागत तर द्यावं परिस्थितीवर सोडून. नाहीतरी काळच अनेक अज्ञात प्रश्नाचं उत्तर असतो. तो ते त्याच्या परीने शोधतो. परिस्थिती परिवर्तन करण्याएवढा वकूब नसेल माझ्यात, तर पदरी पडलेल्या प्राक्तनाला प्रसाद मानून प्रयत्नांनी परिवर्तनाच्या परिभाषा लिहिण्यासाठी आपला भक्तिभाव जपावा. सकारात्मक असं काही करत राहावं, नाही का?” माझं मत मांडून त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.  

“अर्थात, कोणी असं म्हणत असेल तर ते नाकारण्याचे कारण नाही, धांडोळा घेऊनही अपेक्षित आकार अवगत झाले नाहीत म्हणून अंतरी एक रुखरुख कायम राहून जाते. मग असं काय असतं आयुष्य नावाच्या गोष्टीत की, उभी उमर खर्च करूनही मनाजोगते आकार देता येत नसतील? कारणे लाख सापडतील शोधली तर. नसतील सापडत तर हजार उभे करता येतील नव्याने. पण तरीही एक प्रश्न कायम राहूनच जातो, त्याचे अन्वय लावायचे कसे?” आपल्या भूमिकेशी प्रामणिक राहत तो बोलला. 

“संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या यशाची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने; तुमच्या पदरी पेरलेले क्षणच खरे, बाकी सगळी बकवास असते. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे तुमच्या आयुष्याच्या प्रवासाच्या कहाण्या सांगत असतात. ऋतू येतात अन् जातात. त्यांना कोणी थांबवू नाही शकत. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. ते त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. आयुष्याच्या वाटेने चालताना वंचना, अपमान, अभाव सहन करीत खुणावणाऱ्या क्षितिजाकडे पाहत पुढे चालावं. मनात वस्तीला असणाऱ्या परगण्यांचा शोध घेत राहावा. कोणत्या कुबड्या अन् शिड्या न वापरता स्वतःची पात्रता सिद्ध करून आयुष्याचे अर्थ अवगत करून घ्यावेत. स्वतःच्या प्रज्ञेला प्रमाण मानून पाहावं आपणच आपल्याला परत परत. पराभव पचवण्याची कुवत असावी, तसं यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही असावा आपल्याकडे, नाही का?”- मी

त्याला माझं बोलणं कदाचित कळलं असेल अथवा नसेल किंवा अन्य काही कारण असेल, माहीत नाही. कदाचित त्याला असंही वाटलं असावं की, या दगडावर डोकं आदळून काही उपयोग नाही. किंवा असंही असेल की, माझ्या म्हणण्याचा मथितार्थ त्याला कळला असेल. कदाचित त्याच्या मनाने माझं म्हणणं मान्य केलं असेल. काय ते त्यालाच ठावूक. मला माहीत नाही अन् नीट सांगताही नाही येणार. समजा यापैकी कोणतीही शक्यता असली, तरी ती काही अवास्तव अन् अगम्य नक्कीच नाही. नाहीतरी आयुष्याला वेढून असणाऱ्या साऱ्या शक्यता आपल्या विचारांभोवतीच तर प्रदक्षिणा करीत असतात. पण जर का प्रदक्षिणेच्या पथावर अहं अधिवास करून असतील तर....? मी काय सांगावं? याचं उत्तर काय असावं? ते तुम्हीच शोधा....!

असं नेमकं काय कारण असावं या भावड्याच्या त्राग्याचं? हे सगळं पुराण वाचून संपवलं अन् शोधूनही झालं, तरी या एका प्रश्नाचं उत्तर काही हाती लागत नाही, नाही का? अंदाज, तर्क, संबंध, सहसंबंध वगैरे सगळे प्रयोग करूनही नाही ते नाहीच. नाही अंदाज लागत ना काहीच! सांगतो... तेच नेहमीचं कारण. तोच शतकानुशतके सुरु असलेला खेळ.... वयात आलेले दोन जीव एकमेकांना जीव लावतात, एकमेकांसाठी जीव पाखडतात अन् आसपासच्यांना वाटतं की, हे आता जीवच घ्यायचं काम करताहेत. थोडक्यात काय, फार थोड्यांना साधलेला अन् बऱ्याचदा सांध्यातून निखळणारा हा खेळ. येथे यशापेक्षा अपयशाचीच खात्री अधिक, पण तरीही हा खेळ काही थांबत नाही अन् खेळणारेही अनेकदा हरूनसुद्धा हार मानायला तयार नाहीत. काही खेळ थांबण्यासाठी नसतातच मुळी. थांबणारही नाहीत. फक्त त्यातील पात्रांची नावे प्रत्येकवेळी वेगळी असतात. ठिकाणे, देशप्रदेश निराळे असतात. काळवेळ बदलते, पण हा खेळ काहीकेल्या थांबत नाही. आणि खरं हेही आहे की, या खेळाला विरोध करणंही संपणार नाही. समजा तसं झालं तर...
चंद्रकांत चव्हाण,
••