बेटा,
माहीत नाही, तुझ्यासाठी असं काही पुन्हा लिहू शकेल की नाही? याचा अर्थ मी निराशावादी वगैरे आहे असा नाही. वास्तव म्हणून काही असतं आयुष्यात. इच्छा असो नसो त्याचा निमूटपणे स्वीकार करण्याव्यतिरिक्त अन्य विकल्प निसर्ग देत नाही. आज ज्या वळण वाटेकडून माझी पावले पुढे पडतायेत, तो काळ बेरजा करण्याचा कमी अन् वजाबाकी समजून घेण्याचा अधिक आहे. समजा, या पथावरून प्रवास करणारं माझ्याऐवजी आणखी कुणी असलं, तरी हा आणि असाच प्रश्न अन् भाव त्याच्या अंतरी असेल याबाबत संदेह नाही. कारण अगदी स्पष्ट आहे अन् ते काही फार गहन गुपित नाही. अशा पडावावर आहे मी, जो आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्याच प्रिय-अप्रिय घडामोडींचा प्रामाणिक साक्षीदार असतो. आयुष्याची किमान समज आणि माणूस म्हणून असलेल्या मर्यादांचं भान असलेलं कोणीही हे सांगेल. त्याकरिता शोधाशोध करायची आवश्यकता नाही.
मला माझ्यातून वजा करणारं अन् माझ्या वर्तुळापासून विलग करणारं कुणी नसावं, किमान एवढ्या लवकर तरी. अशी काहीशी सगळ्यांची कामना असते. राव असो अथवा रंक याला कुणीही अपवाद नसतो. मग मी तरी यापासून निराळा कसा असेल? हे अप्रिय असलं, तरी वास्तव याहून सहसा वेगळं नसतं. सारेच या प्रवासाचे पथिक असतात. समोर आहे ते स्वीकारणं एवढंच माणसाच्या हाती असतं. त्याला वळसा टाकून पुढे पळायचा प्रयास म्हणजे आसक्तीच. आसक्तीला काडीइतकेही अर्थ नसतात. असतो केवळ स्वतःच तयार केलेला सोस. आसक्ती मलाही असली तरी तिच्या पूर्तीसाठी निसर्गाला, नियतीला मी काही सक्ती करू नाही शकत, नाही का? काळ काही कोणाचा सोयरा नसतो. तो आपल्या लयीत सरकत असतो. सगळ्यात मोठा सूत्रधार असतो तो. खेळत असतो सगळ्यांसोबत. त्याचा महिमा अगाध असतो. त्याच्या चाली खूप कमी लोकांना कळतात. आयुष्याच्या पटावर मांडलेल्या सोंगट्या आपल्या मर्जीने तो इकडेतिकडे सरकवत असतो.
तुझ्यासाठी लिहलेलं हे कोणी वाचेल की नाही, माहीत नाही. कुणी वाचावं म्हणून लिहलंही नाही. समजा, कुणी ठरवून अथवा अपघाताने वाचलं अन् त्यातून त्यांच्या उपयोगासाठी अंशमात्र असं काही गवसलं तर आनंदच आहे. पण ही शक्यताही नसण्याइतकीच आहे. हेही खरंय की, अवास्तव कांक्षांचे हात पकडून आलेल्या कामनेपेक्षा पुढ्यात पडलेलं वास्तव अधिक प्रखर असतं. अपेक्षाभंगाचं दुःख सोबत घेऊन चालण्यापेक्षा इच्छांना तिलांजली देणं त्याहून अधिक सुलभ असतं. तसंही एवढं दीर्घ लिहलेलं वाचायला हाती मुबलक वेळ अन् मनात अधिवास करून असणाऱ्या कोलाहलास नियंत्रित करण्यास पुरेसा संयम असायला लागतो. इतरांचं जाऊ द्या किमान गोतावळ्यातील माणसे हे वाचतील की नाही, याची तरी खात्री देणं मला शक्य आहे का? याचा अर्थ अथपासून इतिपर्यंत सरसकट सगळ्यांनाच मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय असा नाही.
कुणी वाचो अथवा न वाचो, तू अवश्य वाचशील याची खात्री आहे. कारण तुझ्यासाठी हे लिहलं आहे म्हणून नाही. तर तू लेक आहेस, हे एक अन् वाचनाचा अंकुर तुझ्यात मी रुजवला आहे, हे आणखी एक. वाचन तुझ्याकरिता केवळ वेळ ढकलायचं साधन नाही. रोजच्या धावपळीतून मनाला क्षणभर विराम मिळावा म्हणून केलेली कवायत नाही की, मनावरील मरगळ दूर करण्यासाठी शोधलेला विरंगुळा नाही. वाचन श्वास आहे तुझा, हे मी आत्मविश्वासाने सांगतोय. यासाठी कुठलं परिपत्रक काढण्याची अथवा प्रमाण देण्याची आवश्यकता आहे, असं किमान मला तरी वाटत नाही.
हे असं काही लिहितोय याचा अर्थ मी माझ्या असण्यातून सुटत चाललोय, असा अजिबात नाही. मी कोणी महात्मा नाही की, कोणी साधू, संत अथवा विरक्त. मलाही कितीतरी पाश जखडून आहेत. त्यात मी बांधला गेलोय. त्यातून मुक्त होता नाही येत. तीव्र मोह आहेत मलाही. पदरी पडलेल्या फाटक्या परिस्थितीसोबत आयुष्यभर झगडत आलो. धावाधाव करत राहिलो. पाठशिवणीच्या या खेळात बरंच काही हातून निसटलं. अर्थात, काही मिळालंच नाही असं नाही. मिळालं ते पर्याप्त मानून हाती न लागलेलं, वणवण करूनही न सापडलेलं अन् ओंजळीतून सुटलेलं असं काही आणता येईल का, म्हणून धडपड करीत राहिलो. मिळालेत काही तुकडे यानिमित्ताने पुन्हा नव्याने तर जमा करता येतील, हा किंचित स्वार्थ यात अनुस्यूत आहेच. शरीराला वयाचे बांध बंदिस्त करून असतात, पण मनाचं तसं काही नसतं! मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचा अंकुर सुप्तपणे पहुडलेला असतो, त्याची लालसा काही केल्या सुटत नाही.
अभाव आमच्या जगण्याला धरून होता. खरंतर जगण्याचं अविभाज्य अंग होतं ते. याचा अर्थ कोणावर दोषारोपण करतोय असाही नाही. नियतीने कपाळी केवळ अन् केवळ कमतरता आणि कष्ट कोरलं असेल तर सगळं सहज कसं मिळावं? पण आहे ते अन् मिळालं ते काही कमी नाही, याबाबत संदेहच नाही. एवढंच का, म्हणून देव, दैवाकडे कोणती तक्रारही नाही. कशी असेल तक्रार, माणूस अज्ञेयवादी असेल तर. या वळणावर विसावून पाहताना अन् आयुष्याची बेरीज-वजाबाकी करून पाहताना वाटतंय, कितीतरी कामे करायची राहिली आहेत अजून. यादी खूप मोठीच मोठी आहे अन् उरलेला कालावधी कमी. पण निसर्गाला अशा गोष्टींशी काही देणंघेणं नसतं. तो त्याच्या मार्गाने चालतो. माणसांनी परिस्थितीला प्रसन्न करण्यासाठी मिळवलेले मंत्र तेथे कुचकामी असतात.
का होत असेल असं? आसक्तीतून का विलग होता येत नसेल माणसाला? अगदी थेट सांगायचं तर... मलासुद्धा? कारण स्पष्ट आहे, मीही एक माणूस आहे. अनेक विकार, प्रलोभनांसह वाढलेला. कुठल्यातरी पाशात बद्ध झालेला. खरंतर सामान्य माणूस असणं हीच माझी मर्यादा आहे. ती अमान्य करण्याचे कारणच नाही. असामान्य असतो तर असा विचार मनात येण्याचा प्रश्नच नसता. कुण्या माणसाने कितीही कामना केल्या, तरी नियतीच्या हातचं तोही एक बाहुलं आहे. तिने सूत्र ओढलं तिकडे सरकणारा अन् ताणलं त्याकडे कलणारा. असो, हे जरा अधिकच भावनिक वगैरे वगैरे झालंय, नाही का? कुणावाचून कोणाचं काही म्हणता काहीच अडून राहत नाही, हेच खरंय. खरंतर राहूही नये, या मताचा मीही आहे.
तेहतीस वर्ष झालीत आज बरोब्बर. त्यावेळी घेतलेल्या तुझ्या पहिल्या श्वासाने आपल्या लहानशा कोटरात चैतन्याचे किती किती सूर सजले. आनंदाची किती नक्षत्रे अवतरली. सगळ्या बाजूने अभावाचाच प्रभाव असणाऱ्या आमच्या ओंजळभर जगात लौकिक अर्थाने लेक बनून तू प्रवेशली. आनंदालाही विस्ताराच्या सीमा असणाऱ्या जगण्याला नवे परिमाण देत सगळ्यांच्या श्वासात सामावली. तुझ्या आगमनाने नात्यांना अर्थाचे नवे आयाम लाभले.
नात्यांची ओळख सोबत घेऊन दिसामासाने मोठी होणारी तुझी पाऊले घरभर मुक्त संचार करीत राहिली. तुझ्या आगमनाने भावनांना आस्थेचे कोंदण लाभले. तुझ्या प्रत्येक कृतीतून निरामय, निरागस, निर्व्याज, नितळ आनंद ओसंडून वाहत राहिला. तुझे बोबडे बोल सुरांचा साज लेऊन आसपासच्या आसमंतात निनादत राहायचे. आपल्या माणसांच्या कुशीत विसावण्यासाठी अडखळत धावत येणारी तुझी लहानगी पावले हातांचे पंख पसरून गळ्यात विसावयाची, तेव्हा तुला तुझं आकाश लाभल्याचा आनंद व्हायचा. विस्तारलेल्या हातांच्या पंखात कदाचित उद्याच्या गगनभरारीची स्वप्ने तुला तेव्हा दिसली असतील का? त्यांच्या आकृत्या नकळत मनाच्या गाभाऱ्यात गोंदवल्या गेल्या असतील का? माहीत नाही, पण दिसामासाने मोठी होताना अन् आयुष्याच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करताना आपणच आपल्याला उसवत राहिलीस प्रत्येकक्षण अन् एकेक टाका टाकून तुकडे जोडताना नव्याने समजून घेत राहिलीस स्वतःला. जगण्याच्या विस्तीर्ण पटावर पसरलेल्या स्वप्नांचे एकेक ठिपके सांधत गोंदणनक्षी तू कोरीत राहिली.
नियतीने ललाटी लेखांकित केलेला प्रत्येक क्षण साजरा करता येतो, त्याला जीवनयोग शिकवण्याची आवश्यकता नसतेच. जगायची कारणे सापडतात, त्याला जगावे कसे, हे प्रश्न सहसा सतावत नसतात. नियतीने तुझ्या प्राक्तनात अंकित केलेले प्रत्येक पल तू तुझे केलेत. त्यांच्या पदरी स्नेहाचे, सौहार्दाचे दान टाकले. नाही लागलेत काही चुकार क्षण हाती म्हणून खंत करत बसली नाहीस. सुख, समाधान, संतुष्टी या संकल्पना केवळ मनोव्यापार आहेत, हे मी सांगत असलो, तरी ते तू खऱ्या अर्थाने जगत आलीस. अंतर्यामी समाधानाचा अंश अधिवास करून असेल, तर सुख त्याच्या पावलांनी अंगणी चालत येते, मग वणवण कशाला? हा तुझा नेहमीचा युक्तिवाद. याचं उत्तर माझ्या हाती कधी लागलं नाही. ही माझी मर्यादा असेल? की फाटकं जगणं वाटेला आल्यामुळे असं घडलं असेल? सांगणं अवघड आहे. माझ्या जगण्याला बिलगून असलेल्या अन् मी झेललेल्या उन्हाळ्या-पावसाळ्यांना एवढ्या वर्षांत शोधूनही ते गवसले नाही, ते तुझ्या जगण्यातील मूठभर उन्हाळ्या-पावसाळ्यांनी शिकवलं. अर्थात, अशी उत्तरे शोधण्यासाठी केवळ दृष्टी नाही, तर दृष्टिकोन असावा लागतो. कदाचित त्या कोनाकडे बघण्यासाठी असायला लागणारा अचूक 'कोन' मला साधता आला नाही अन् त्यामुळे मला मी सांधता आलो नसेल.
कोणीतरी कोरून दिलेल्या चौकटी प्रमाण मानून त्यानुसार जगणं किमान मला तरी अवघड. पुढ्यात पडलेल्या पटावर आपली वर्तुळे आपणच कोरायची अन् विस्तारही आपणच आपला करायचा असतो, हे माझं नेहमीचं म्हणणं अन् वागणंही. तूही हे असं काही ऐकत, शिकत, समजत घडत राहिलीस. कदाचित माझ्या अशा असण्यामुळे असेल किंवा आणखी काही, पण पुढ्यात प्रश्न पेरणाऱ्यांचा तू प्रत्येकवेळी प्रतिवाद करत आलीस. बिनतोड युक्तिवाद करून निःशब्द करीत आलीस. आपल्या सहवासात आलेल्या नात्यांना कोणतीतरी लेबले लावून ओळख करून देण्याची गरजच काय? नितळ नजर घेऊन त्याकडे का पाहता येऊ नये? वगैरे वगैरे. हे तुझे पेचात पकडणारे प्रश्न प्रतिवाद करणाऱ्यांना निरुत्तर करीत राहिले. नियतीने निर्मिलेल्या नात्यांना चौकटींच्यापलीकडे शोधण्याचा तुझा प्रयास प्रतिवाद करणाऱ्यांना प्रत्येकवेळी स्वतःला शोधायला कारण ठरला.
वडील नात्याने नुसते वडील असतील, तर प्रश्नांची उत्तरे टाळता येतातही. पण वडीलच शिक्षक म्हणून शिकवायला समोर असतो, तेव्हा उत्तरे टाळणे अवघड असते. कारण वर्गात तो आधी अध्यापक असतो, मग वडील. तुझ्या प्रश्नांना कधी विराम नव्हता. तसा तो आजही नाहीये. तुझे निर्व्याज प्रश्न कधीकधी माझा अर्जून करीत आहेत, कधी अभिमन्यूसारखं चक्रव्यूहात पकडत आहेत, असे वाटायचे. गुणांकन केलेली उत्तरपत्रिका हाती आल्यानंतर कमी केलेल्या फक्त एका गुणासाठी वर्गात माझ्याशी केलेला प्रतिवाद आजही आठवत असेल का तुला? अन् त्यावेळी मी दिलेलं उत्तर अन् माझं त्यावेळचं वागणंही? खरंतर तो एक गुण तुझ्या झोळीत टाकून मोकळं होणं काही अश्यक्य नव्हतं. तो तेव्हा वाढवून दिला असता, तर आपल्या लक्षपूर्तीसाठी पेटून उभी राहिलेली कन्या मी कायमची गमावली असती, नाही का? त्या कमी केलेल्या एका गुणाने तुझ्यातले अनेक गुण सामोरे आले, हे कसं विसरता येईल? दिवसरात्र एक करून स्वप्नांना आपल्या मुठीत बंद करणारी पोरगी तो एक गुण वाढवून दिला असता तर सापडली असती का?
असो, तू मनातला राग तेव्हा दाखवला नसेल, पण तो दिसलाच नाही मला, हे कसं संभव आहे? एकवेळ अध्यापकाच्या नजरेतून तो निसटेलही. पण बापाच्या डोळ्यातून कसा सुटेल? ते काहीही असो, तू भांडताना आणि त्या एका गुणाची सल सोबत घेऊन सगळे गुण घेण्यासाठी धडपड करताना, पाहताना बापाला काय वाटलं असेल, हे तुला कदाचित आई झाल्यावर कळलं असेल. पण एक सांगू, तेव्हा हे सगळं पाहताना माझ्या अंतरी आनंदाची किती झाडे बहरून यायची! माझी लेक घडतेय हे पाहून कोण्याही बापाला होणाऱ्या आनंदापेक्षा माझा आनंद कणभर अधिक होता, कारण मी केवळ बापच नव्हतो तुझा, तर अध्यापकही होतो. तुझ्या परिपक्व होत जाणाऱ्या विचारांनी अन् प्रश्नांनी अंतर्यामी विलसणारा आनंद कधी शब्दांत कोंडून तुला सांगता आला नाही. पण चेहऱ्यावर धूसरशा स्मितरेषा बनून तो प्रकटायचाच. पण तो कळण्याएवढं वय तरी तेव्हा कुठे होतं तुझं?
संस्कारांच्या वर्तुळात वर्तताना अनावश्यक बंधनांच्या चौकटी नाकारण्याएवढी तू प्रगल्भ कधी झाली कळलेच नाही. तुझं विश्व सीमांकित करणाऱ्या काही चौकटी तू नाकारल्या. काहींना ध्वस्त करण्यासाठी प्रहार केले. काही जगण्याचा भाग म्हणून अंगीकारल्या. तरीही चौकटींच्यापलीकडे जाऊन तुला खुणावणाऱ्या आकाशाचा तुकडा शोधण्याची स्वप्ने कधी विस्मरणाच्या कोशात दडवून ठेवली नाहीत. परिस्थितीने बांधलेले बांध तुझ्या कांक्षांना बाधित नाही करू शकले. गगनभरारीचे वेड तुझ्या भाववेड्या डोळ्यांत टिकवून ठेवले. त्या वेडाला आकांक्षांचे आकाश आंदण दिले. तुझं जगण्याचं आकाश आणि अवकाश विस्तारले. स्वप्नांचे तुकडे वेचता वेचता खूप काही हातून निसटले, पण बरंच काही हाती लागलंही तुझ्या. पण तरीही आपलं अन् आपल्यांसाठी अजूनही काही शोधतेच आहेस. ते मिळेल न मिळेल, याची खंत न करता कर्मयोगाच्या वाटेने प्रवास करते आहेस. _कोणाला काय वाटतं याची काडीमात्र काळजी न करता आपल्या काळजाला प्रमाण मानून पुढे चालते आहेस.
माझ्या वाटण्याने प्रश्नांचे पैलू काही पालटणार नाहीत. पण या एका वास्तवाकडे दुर्लक्ष करून पुढे वळता नाही येत की, नजरेला खुणावणाऱ्या क्षितिजाची ओढ सगळ्यांच्याच अंतरी अधिवास करून असते. ही आसच आयुष्याचे अर्थ शोधत असते, की आणखी काही, माहीत नाही. पण एक नक्की, स्वप्न बनून डोळ्यात सजलेल्या अन् कांक्षा बनून विचारांत रुजलेल्या क्षितिजाच्या वार्ता सगळेच करतात. त्याचा कोरभर तुकडा हाती यावा म्हणून धावाधाव करत राहतात. या सगळ्या यातायातला सफल आयुष्याचे परिमाण मानून असेल अथवा कृतकृत्य जगण्याचे प्रमाण समजून असेल, माणूस पळत राहतो पुढे, आणखी पुढे, त्याहून पुढे, खूप पुढे. या धावण्यास आसक्ती समजावं, विभ्रम म्हणावं, की आणखी काही? काहींना हे असं सांगणं अप्रस्तुत वाटेलही. काही म्हणतील, हा प्रश्नच अशावेळी गौण ठरतो.
मत मतांतरांचा गलबला काहीही असो. आपल्याला किती धावायचं अन् कुठे विराम घ्यायचा आहे, या कळण्यास प्रगल्भता म्हणतात. हे पक्व होत जाणं म्हणजेच वाढणं असतं नाही का? तुझ्या वयाच्या वाढत्या वाटेने पुढे पडत्या पावलांना आयुष्याचे अर्थ अवगत होत राहोत. तुझ्या या शोधयात्रेत मोडलेली माणसे अन् त्यांच्या वेदनांप्रती सहानुभूती अनवरत वाहती राहो. समाजातल्या शेवटच्या माणसाचं दुःख समजून घेण्याएवढी तू संवेदनशील आहे याबाबत संदेहच नाही. पण तू ज्या पदावर अधिष्ठित आहेस, त्या पदाचे सारे पर्याय वंचितांच्या वेदना वेचण्यासाठी झिजत राहोत. तुझ्या तू असण्याचे सारे संदर्भ स्वत्वाचा शोध घेत सत्त्व टिकवणारे होवोत.
हट्ट करून तू कधी काही मागितल्याचे आठवत नाही. मागितलंच नसेल तर आठवेलच कसं? कदाचित तुला आपल्या वडिलांच्या जगण्याच्या मर्यादांची जाणीव नकळत्या वयातच झाली असेल का? की आपल्या वडिलांनी आपल्याला काही देण्यापेक्षा आपणच ते मिळवावे, असे तुला वाटले असेल? की त्यांचा स्वाभिमान कुणासमोर विकायला अन् वाकायला नको वाटलं असेल? माहीत नाही. काय असेल ते असो, पण संत तुकाराम महाराज म्हणतात, 'कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।।' देवाच्या हरिखचं माहीत नाही, पण माझ्या पदरी पेरलेला हा आनंद देवत्त्वाच्या अशा अंशाना शोधण्याची परिभाषा अवश्य असू शकतो. म्हणूनच की काय, अशी लेकरे सगळ्या घरांत असोत, असे नेहमी वाटतं.
पण हेही खरंय की, सगळं काही असून काहीच हाती न लागलेलेही अनेक असतात. त्यांना सत्ता सापडते, संपत्तीही मिळते, पण जगण्यातून सद्बुद्धी सुटून जाते. आपल्या ओंजळीतून स्वनिर्मित सुखाचे तुकडे निसटायला लागले की सुरू होतो समर्थनाचा खेळ. पण याचा अर्थ आपण केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं, म्हणजे मी चुकलोच नाही असा नाही होत. अर्थात, हे कळायलाही आयुष्याला प्रगल्भता वेढून असायला लागते. पुस्तकी ज्ञानातून नाही सापडत सगळीच उत्तरं. परिपक्व होणं म्हणजे आपल्या आत असलेल्या 'अहं'मधून मुक्त होण्यासाठी आपणच आपला धांडोळा घेणं असतं. काहींकडे सगळंच असतं, पण सगळं असूनही आपण कोण आणि आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय, हे कळत नाही त्यांच्याकडे काहीच नसतं.
परिस्थिती माणसाला समंजस करते, असं म्हणतात. तुम्हां भावंडांना मी म्हणा किंवा आम्हीं घडवलं म्हणणं सत्य असेलही, पण ते अर्धसत्य आहे असं वाटतं. आम्हीं केवळ आम्हांस अवगत असलेल्या वाटा अन् आमच्या नजरेस सापडलेले परीघ तुमच्या जगण्यात पेरले. पिकांसोबत तणही दणकून येतं. हे विकल्पांचं तण तुमचं तुम्ही वेळीच विलग केलं. त्याचा परिपाक बहरलेले मळे आज पाहणाऱ्याच्या नजरेला पडतायेत. पण ते फुलवण्यामागे कितीतरी सायासप्रयास असतात, हे दुर्लक्षून कसं चालेल? फुललेल्या ताटव्यावरून नजर भिरभिरताना मेहनत दिसत असली, तरी तो उभा करण्यामागील तगमग सगळ्यांना समजेलच असं नाही.
मला वाटतं, तुम्हांला परिस्थितीने घडवलं म्हणण्यापेक्षा परिस्थिती बघून तुम्ही घडलेत, हे म्हणणं अधिक रास्त राहील. तुम्हां दोघा भावंडांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं असावं का? की त्यामागे आणखी काही अज्ञात कारणे असतील? की 'झरा मूळचाच आहे खरा', हे कारण असेल? माहीत नाही. काय असतील ती असोत, पण तुमच्या यशाला बिलगून असलेल्या या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या मर्यादांचे भान ठेवून शोधतोय. कदाचित कोणाला घडवताना सांगायला कामी येतील म्हणून. अद्यापही मला ती काही मिळाली नाहीत, पण मी तेवढ्याच जिज्ञासेने ते शोधतो आहे. मिळतील, न मिळतील, माहीत नाही. बिघडण्याचे अनेक सुलभ पर्याय सहज उपलब्ध असलेल्या मोहतुंबी काळाच्या तुकड्यात राहूनही तुम्ही घडलेत, याचं समाधान आयुष्याचे किनारे पकडून वाहत आहे, याबाबत किमान मलातरी संदेह असण्याचे काहीच कारण नाही. यालाच तर कृतार्थ, कृतकृत्य वगैरे आयुष्य म्हणतात, नाही का?
असो, खूप दीर्घ लिहलं गेलंय. त्यापेक्षा तत्त्वज्ञानपरच जास्त झालंय. तसंही अशा स्वयंनिर्मित बोजड ज्ञानसत्राकडे वळायला बरीच हिंमत एकवटावी लागते. माणसाने एवढा धीर तरी कुठून आणावा? म्हणतात ना, ‘अति सर्व वर्ज्य असतं म्हणून...’ किमान या भीतीने का असेना लेखनाला विराम देतो.
जन्मदिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा!
आनंदाची अगणित नक्षत्रे तुझ्या अंगणी अनवरत नांदती राहोत, ही कामना!!
- पप्पा
••
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।।
Like This Post? Please share!
0 comments:
Post a Comment