कविता समजून घेताना... भाग: चोवीस

By

जेव्हा आपण

आजच्या काळात...
जेव्हा आपण कुलकर्णी असतो
तेव्हाही असतात आपल्याला
तितकेच प्रॉब्लेम्स
जितके असतात कांबळे असतांना

कधी कधी गुप्ता असणं
सोयीचं ठरतं
चौबे असण्यापेक्षा

देशपांडेला
मी बारमधे पाहिलयं वेटर म्हणून
अन्
वाल्मिकला
टेबलवर ऐसपैस बसून पेग मारताना

आपण मेहरा असतो तेव्हाही
आभाळ असतं डोक्यावरच
अन्
फर्नांडीस असतो तेव्हाही
जमीन असते पायाखालीच

प्रत्येक वेळेस ठाकरेच येईल कामात असं नसतं
तर
अन्सारीही डोळे पुसून जातो कधीकधी

नावात काय आहे?
चला जगूया,
नावाशिवाय...


- किशोर मुगल

‘नावात काय असतं?’ हे प्रश्नार्थक विधान शेक्सपिअरचा हवाला देवून आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कोणीतरी सांगत असतो. शेक्सपिअर असं काही म्हणाला असेल की नाही, माहीत नाही. आपण मात्र तो आपल्या समक्ष उभा राहून अगदी असंच म्हणाला, या आविर्भावात सहजपणे सांगत असतो. अर्थात, असं सांगण्यात काही वावगं आहे असंही नाही. नावाशिवाय माणूस माणसांच्या गर्दीतून वेगळा करता येत नाही. व्यक्ती म्हणून ओळखण्याची ती खूण असते. ती त्याच्यापुरती स्वतंत्र ओळख असते. एवढे वेगळेपण असण्याला हरकत असण्याचा प्रश्न नाही. पण कोणीतरी आखलेल्या चौकटीत त्याला बसवून ओळखीचे टॅग लावण्यात कोणते शहाणपण असते? हे न उलगडणारं कोडं आहे. माणूस म्हणूनच त्याला आधी ओळखावे, नंतर काय लेबले लावता येतील त्याचा विचार करावा, असे या विधानात अनुस्यूत आशयाला अभिप्रेत असेल का? व्यक्तीची ओळख असण्याचे नाव समर्थनीय कारण असायलाच हवं असंही नसतं काही.

काही दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्यात एक विनोदाचा उल्लेख होता- भारतीय लोकांचा आवडता खेळ कोणता? त्याचं उत्तर होतं- आडनावावरून जात ओळखणे. विनोदातही वेदनादायी वाटावं असं हे वास्तव. या विधानातील उपहास वेगळा करून आपल्या सार्वजनिक जगण्याकडे थोडं सजगपणे पाहिलं, तर यात काही अतिशयोक्त आहे, असं वाटत नाही. विश्वातील अन्य परगण्यात जात वगैरे प्रकार नसल्याचे कंठशोष करून कोणी कितीही सांगत असला, तरी भारत तिचा हक्काचा अधिवास आहे. या वास्तवाकडे डोळेझाक करून पुढेही निघता येत नाही. अन्य देशप्रदेशांमध्ये भेदाच्या भिंती नाहीत, असे नाही. पण त्यांची उंची आणि इमले आपल्याइतके नसावेत कदाचित.

जात सुखनैव नांदते आहे, कितीतरी वर्षांपासून आपल्याकडे. माणूस नावाचा प्राणी कालोपघात प्रगतीच्या पायऱ्या पार करून शिखरे संपादित करता झाला. तरी आपल्याला व्यवस्थेत विसावलेल्या वैगुण्याच्या वर्तुळांच्या पार काही होता आले नाही. जातवास्तव येथील अटळ भागधेय आहे अन् याला मिरवण्यात धन्यता मानणारेही आहेत. माणसाला जन्मासोबत ज्याकाही गोष्टी मिळत असतील त्या असोत. पण येथे जन्माने जात आंदण मिळते अन् ती अखेरपर्यंत सोबत करते. काहींसाठी वेदना घेऊन, काहींच्या वाट्याला वंचना देवून, काहींना मखमली आसनावर अधिष्ठित करून किंवा आणखी काही... हे कसं नाकारता येईल? जात संपवायच्या वार्ता कोणी कितीही करीत असलं तरी ते केवळ स्वप्नं आहे, निदान अजूनतरी. हे दिसत असूनही माणसं परत परत त्याच त्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात धन्यता का मानत असावीत? वर्षामागे वर्षे सरत जातात. व्यवस्था गतीची चाके बांधून पुढे सरकत राहते. संचिताची गाठोडी घेऊन व्यवस्थेचा गाडा अनेक योजने पुढे गेला, पण जात मात्र आहे तेथेच आहे. परिस्थिती परिवर्तनाची स्वप्ने पाहणारे मर्यादांचे हात धरून निसर्गाच्या कुशीत सामावतात. जात सगळ्यांना आपल्यात सामावून तिच्या अस्तित्वासह मुळं घट्ट रुजवून उभी असते. म्हणूनच की काय जाता जात नाही, ती जात म्हणण्याचा प्रघात पडला असावा का?  

अप्रिय, पण वास्तव आहे हे. व्यवस्थेतील वैगुण्याला अधोरेखित करणारी ही कविता वाहत राहते मनाच्या प्रतलावरून येथील संचिताचे अर्थ शोधत. माणूस सर्व सुखांचा केंद्रबिंदू असावा. त्याच्या जगण्याच्या वाटा प्रगतीचे आयाम आखणाऱ्या असाव्यात. माणूस म्हणून माणसाच्या जगात माणसाने माणूस ओळखावा, ही साधी अपेक्षा कवी व्यक्त करतो. विज्ञानतंत्रज्ञानाधिष्ठित विश्वात सहजपणाचे साज लेवून माणसाला वर्तायला काय हरकत आहे? काहीच नसावी. पण जगण्यात सहजपण येण्याआधी ते विचारात वसतीला असायला हवे ना? सगळ्याच गोष्टी काही निकषांच्या पट्ट्या वापरून मोजता येत नसल्या, तरी चांगुलपणाला अपेक्षांच्या परिघात मोजता येतं एवढं नक्की.

नावाशिवाय आपल्याला जगता येणार नाही का? हा अगदी साधा प्रश्न कवी विचारतो. पण कधीकधी साधे प्रश्नच अधिक गुंतागुंतीचे ठरतात. शतकांचा वारसा घेऊन येणारा हा गुंता सुटण्याऐवजी अधिक जटिल होत आहे. प्रत्येकाला आपापली वर्तुळे अधिक आश्वस्त करणारी वाटतात. आयुष्याचे समर्पक अर्थ त्यात ते शोधतात. त्यांना सुरक्षित करण्यात जगण्याचे सार्थक असल्याचे अनेकांना वाटते. एकीकडे जगाला सहिष्णुता शिकवणाऱ्या संस्कृतीच्या वार्ता करायच्या अन् आपल्या अपेक्षांच्या संकुचित वर्तुळात त्यांच्या परिभाषा लेखांकित करायच्या, हा विरोधाभास नाही का?

आपण कोणीही असलो तरी आधी माणूस असतो, हा विचार आपल्या विचारविश्वात अगत्याने का विसावत नसेल? आपण आणि आपले वगळले की, सगळेच आपल्यासाठी परके का ठरत असावेत? प्रेषित, संत, महंत, महात्म्यांनी सत्प्रेरीत विचारांच्या पणत्या आपल्या हाती घेऊन पावलापुरती वाट उजळेल येवढा प्रकाश अंतर्यामी पेरला. त्याचा एखादाही कवडसा आपल्या अंतरंगाच्या अंधाऱ्या कोपऱ्याला उजळू शकला नसेल का? माणसे देव शोधायला धावाधाव करतात. माणसातला देव शोधण्याच्या वार्ता करतात. तो शोधू नये असे नाही. शोधाल तेव्हा तो शोधा; पण आधी माणूस तर शोधा. माणूसच अद्याप आपल्याला पूर्ण कळला नसेल तर देव, देवत्व वगैरे पर्यंत पोहोचणे अवघड. माणूस समजून घेण्यासाठी कोणत्यातरी परिमाणात त्याच्या असण्या-नसण्याचे मापे काढणे कितपत सयुक्तिक असते? विशिष्ट विचारांची लेबले लावून माणूस माणसापासून वेगळा करता येतो, पण मूल्यप्रणीत जगण्यापासून वेगळा करता येतो का?

जन्मदत्त मिळणाऱ्या जातीमुळे कदाचित काहींच्या आयुष्यातल्या समस्या कमीअधिक होत असतीलही, काहीना त्यांची दाहकता जाणवत नसेलही. पण समस्या तर सार्वकालिक असतात. कुठेही गेलात तरी त्यांचा चेहरा सारखाच. त्यांचं सार्वत्रिक असणं कसं नाकारता येईल? मग आपण कुलकर्णी असा किंवा कांबळे. यामुळे माणूस म्हणून असण्यात कोणते अंतराय निर्माण होते? समस्या कुलकर्णी असताना असतात, तेवढ्याच कांबळे असतानाही. व्यवस्थेने दिलेल्या वर्तुळात कांबळेच्या वाट्याला अधिक येत असतील, पण कुलकर्णी केवळ परंपरेने जातीच्या उतरणीत अधिक किमतीचा टॅग लावून आले, म्हणून त्यांच्या उदरभरणाचे प्रश्न काही वेगळे नसतात. व्यवस्थेने दिलेल्या संधींचा जगण्यावर काही तात्कालिक, दूरगामी वगैरे परिणाम होतो मान्य. हा वाद-विवाद, संवाद-विसंवादाचा विषय असू शकतो. पण आपापली लेबले फेकून माणूस म्हणून या प्रश्नाकडे, असण्याकडे पाहिले तर निसर्ग काही यांच्या असण्यात कुठल्या भिंती उभ्या करीत नाही. बऱ्याच गोष्टी कमीअधिक प्रमाणात वाट्यास येत असतील, पण त्या वगळून माणूस म्हणून त्यांच्या समस्या वेगळ्या कशा असतील?

बऱ्याचदा येथे कोणीतरी असणं अधिक फायद्याचं, सोयीचं असतं. ही सोय जोपर्यंत जात नावाचा विचार सोयीने टिकवून ठेवला आहे तोपर्यंत असणार आहे, याबाबत संदेह असण्याचे कारण नाही. याच कारणांनी कधी कधी गुप्ता असणं सोयीचं ठरतं, चौबे असण्यापेक्षा. देशपांडेला जातीच्या मनोऱ्यात बसवला, तर त्याची उंची मोठी असेल. व्यवस्थेच्या नजरेत त्याचं मोल अधिक असेलही; पण त्याला लागणाऱ्या भाकरीचे प्रश्न मनोऱ्यातल्या झगमगाटाने नाही सुटत. बारमधल्या मंद प्रकाशात त्याच्या भाकरीच्या प्रश्नांचे उत्तर सापडू शकते. आपण मेहरा असतो तेव्हा आभाळ काही आपल्या ओंजळीत नसतं. ते डोक्यावरच असतं. त्याला ढकलता नाही येत आपल्या मर्जीने हवं तिकडे. फर्नांडीस असलो म्हणून जमीन जागा सोडून चालत नसते आपल्या आज्ञेने.

माणूस माणसाच्या कामी येत असतो. आपले जवळ असल्याने कदाचित अधिक कामी येत असतीलही, म्हणून प्रत्येक वेळेस त्यांचे साहाय्य असेलच, हे कोणत्या विश्वासाने सांगता येईल? संकटात अन्सारीही आपलाच असतो ना? की त्याच्या जीवनयापनाच्या पद्धतीत थोडं वेगळेपण असलं, म्हणून माणूस असण्यातही काही वेगळं असतं? संकटात मदतीचा हात हाती देणाऱ्याला कसला आलाय धर्म अन् कसली आली आहे जात. पु. ल. म्हणाले होते, ‘दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुमचे डोळे भरून येत असतील, तर ते भरून आलेले तुमचे डोळे म्हणजे संस्कृती.’ खरंतर आजही आमचे डोळे भरून येतात; पण त्यातून ओघळणाऱ्या पाण्याचे संदर्भ बदलले आहेत.

माणूस समाजशील वगैरे प्राणी असल्याचं कुठेतरी लिहिलेलं वाचतो. तसाच तो भावनाशील असल्याचेही म्हणतो. तो विचारांचं प्रतीक आहे, तसा विकारांचे प्रतिबिंबही आहे, हे दुर्लक्षून चालत नाही. विचारांपेक्षा विकार प्रबळ होतात, तेव्हा जगण्याचे प्रश्न अधिक जटिल होत जातात. सारासारविवेकाने विचारविश्वातून काढता पाय घेतला की, अप्रिय गोष्टी वैगुण्य बनून येतात अन् माणसं जगण्यातील सहजपण हरवून बसतात. माणूस समाजाचाच घटक असल्याने याचं उत्तरदायित्व शेवटी समाजाच्या व्यवहारातच शोधायला लागतं. माणसाच्या आयुष्याचे संचित त्याने आत्मसात केलेले संस्कार असतात. ती त्याच्या जगण्याची श्रीमंती असते. संस्कारांनी निर्मिलेली वाट चालणारा समाज भरकटतो, दिशाहीन होतो, तेव्हा जगण्याच्या पद्धतींना मुळापासून तपासून पाहावे लागते.

उत्क्रांतीच्या क्रमसंगत मार्गावरून चालताना इहतलावरील सर्वाधिक विचार करणारा प्राणी म्हणून तो घडला. म्हणूनच तो अधिकाधिक उन्नत, परिणत व्हावा ही अपेक्षा त्याच्या प्रवासाला आहे. एखाद्या घटनेने माणूसपणावरील विश्वासच उठून जावा असे काहीतरी घडते. विचारविश्व विचलित होऊ लागते. व्यवस्थेवरून विश्वास उडत जाणे विकास नसतो. विनाशाच्या वाटेने पडणारे पाऊल असते ते. माणूस कितीही विकसित झाला, तरी जीवशास्त्राच्या परिभाषेत तो प्राणीच असल्याचे अशावेळी प्रकर्षाने जाणवते. विचारांनी वर्तला तर प्रेषित होतो आणि विकारांनी वागला तर पशू.

वर्षामागून वर्षे सरतात. काळाची पालखी पुढे चालत असते. पुढे जाताना, जगताना आपल्या असण्याचे, नसण्याचे प्रश्नही बदलतातच ना? काळ चांगला की वाईट, हे त्या-त्या वेळची परिस्थिती ठरविते. परिस्थितीच्या, परिवर्तनाच्या रेट्यात माणसं बदलली, त्यांच्या जगण्याचे संदर्भही बदलले. स्वतःभोवती कुंपण तयार करून त्यात ‘स्व’ सुरक्षित ठेवू लागली आहेत. स्वार्थपरायणतेत सार्वजनिक हित हरवलंय. स्वतःच्या सुखापलीकडे कुणाला काही दिसत नसल्याने, निर्व्याज, नितळ स्नेह बाजूला पडून भाऊबंदकीचे नवे परगणे उभे राहत आहेत. कधी नव्हे इतका पैसा माणसांकडे आला, पण मनं दरिद्री झाली. इमारतींची उंची आम्ही वाढवली; पण माणसं उंची हरवून बसली. अगदी चंद्रावर पोहचली, मंगळावर वसतीसाठी शोध घेणं सुरु झालं. यानं शनिपर्यंत पोहोचल्याच्या गोष्टी ऐकू येतात. पण आपल्या शेजारी कोण राहतो, हेही माहीत नसावं का?

वर्तमानाने मोठेपणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. ज्ञान शेकडो वाटांनी चालत आलं; पण जगण्याचं भान आम्हाला किती आलं? देश महासत्ता बनण्याच्या आपण वार्ता करतो; पण या महासत्तेच्या पथावर उभ्या असणाऱ्या व्यवधानांचा विचार किती गांभीर्याने करतो? मोठेपणाच्या व्याख्या काय असतील त्या असोत. पण मूल्यांच्या परिभाषा नैतिकतेची परिमाणे वापरून अन् परिणामांचा विचार करून प्रयत्नपूर्वक प्रस्थापित कराव्या लागतात. हे सगळं घडावं म्हणून आयुष्याच्या पाट्या कोऱ्या करून त्यावर केवळ आणि केवळ ‘माणूस’ हा एकच शब्द लिहिता आला तर... अवघड आहे थोडं; पण अशक्य नाही. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment