कविता समजून घेताना... भाग: पाच

By

 कसं जगायचं आम्ही?

कसं जगायचं आम्ही?
तुम्ही वावर घेताय,
म्हणजे नुस्तं वावर घेतायं का?

वावर म्हणजे नुस्ती जमीन,
नुस्ती लॅण्ड नाही हो सरकार
माझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलयं, इतिहासयं,
सगळी शास्र, पुराणं, सगळं सगळंय हो!

दुर्बिनीनं नका बघू,
माझ्या नजरेनं बघा ना-
नजरेच्या एका टप्प्यात
अख्खं वावर...
 
मला गर्भाशयासारखं दिसतं माईच्या...
अन् तुम्ही अचानक
संपादन करणार
या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या
गर्भाशयाचं?

- केशव खटिंग
••

भारत कृषिप्रधान देश आहे. पर्यायाने तो खेड्यांचाही देश आहे. खेड्यांनी या देशाचं देशपण जपलं आहे. घडवलं आहे. म्हणूनच की काय महात्मा गांधीनी ‘खेड्याकडे चला’ म्हणत लोकांना या वाटांनी वळते करण्याचा प्रयत्न केला. खेडी घडली तर देश घडेल, या विचारातून कदाचित हे सगळं असेल. पण उक्ती आणि कृतीत अंतराय आले की, गांधींसारख्या महात्म्याच्या विचारांचा पराभव होणे नियतीचे अटळ भागधेय ठरते. शासन, प्रशासन, प्रजा ही व्यवस्थेतील लहानमोठी बेटे सुरक्षित राखायला लागतात. ती राखण्यासाठी विकल्प उभे करायला लागतात. प्रयोजने अधोरेखित करायला लागतात. मर्यादांच्या रेषा ओढून त्यांना कार्यान्वित करावे लागते, तेव्हा व्यवस्था उभी राहते. कारण व्यवस्थेला आवाज असला, तरी पाय नसतात. ती कुणाच्या तरी आज्ञेने आणि आधाराने चालत असते. व्यवस्थेच्या अंतरंगातून आपलेपणाचे झरे स्त्रवत असतील, तर आस्थेचे मळे फुलवता येतात. पण हे इतकं काही सोपं नाहीये.

व्यवस्थेचा हत्ती संदेहाच्या कर्दमात रुतातो, तेव्हा विकासाच्या क्षितिजांकडे नेणाऱ्या वाटा अवरुद्ध होतात. विसंगत विकल्पांना विशेषत्वाची लेबले चिटकवली जातात, तेव्हा नको असणाऱ्या पर्यायांना बरकत येते. विसंगतीचीच संगती लावण्यात काळाचा मोठा तुकडा खर्ची पडतो. खरंतर विकास हीच मुळात सापेक्ष संज्ञा आहे. त्याच्या अर्थांचे आयाम कालसंगत असतीलच, असे नाही. असल्यास तिकडे वळती होणारी पावले आनंदतीर्थी पोहचू शकतात, पण हे असं चित्र कितीही सुंदर वगैरे दिसतं असलं, तरी सहजसाध्य नसतं. व्यवस्थेच्या कोरडेपणाने मनात रुजलेली क्षितिजे कोमेजतात, हेही तितकेच खरे. दुभंगलेल्या वाटांनी माणसे भविष्य कसे शोधू शकतील, हा खरा प्रश्न आहे. तसेही प्रश्न कधी सोबतीला नसतात. त्यांचा संचार सार्वकालिक आणि सार्वत्रिक. त्यांची उत्तरे शोधायला लागतात. त्यासाठी काही सूत्रे तयार करायला लागतात. काही आडाखे आखायला लागतात. काही साचे घडवून घ्यावे लागतात. पर्याप्त समाधानाचा शोध माणूस सतत घेत आला आहे. समाधानाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असली, तरी मातीच्या अस्तित्वाशी नाळ जुळली आहे, त्यांच्यासाठी जमीन केवळ मातीचा निर्जीव तुकडा नसतो. त्याचे असणे-नसणे तेथून रोजच उगवून येत असतं. जीवनाची रोपटी तेथे बहरत असतात. आयुष्याला आकार देणारी सूत्रे तेथूनच गवसत असतात. माय, माती आणि मायभूमी याचं नातं धमन्यांमधून अखंड वाहत असतं. त्याला निकषांच्या मोजपट्ट्यामध्ये मोजता नाही येत. ते प्रलोभन, पैसा, प्रतिष्ठा, पदाच्या अनुषंगाने नाही मिळवता येत. पैसा व्यवहाराच्या वर्तुळात जमिनीच्या तुकड्याचे मोल करू शकतो, पण भावनांचे बंध नाही खरेदी करू शकत.   

उगवणारा दिवस स्वप्ने घेऊन येतो. दिवस, महिने, वर्षे चालत राहतात पुढे. माणसे काळाच्या तुकड्यात आपल्या अस्तित्वाचे धागे शोधत त्याला सोबत करीत राहतात. स्वप्नांचे प्रदेश उभे करण्याच्या गोष्टी काही माणसे करतात. त्यासाठी सोयीस्कर परिभाषा केल्या जातात. विकासाचे आराखडे आखले जातात. पण विकासाची फळे सामान्यांच्या हाती लागतात का? सुखांचा वर्षाव करणारी साधने दिमतीला असणाऱ्या माणसांनी हाती शून्य घेऊन जगणाऱ्या माणसांच्या कल्याणाच्या वार्ता करणारे विचार काही अलीकडचे नाहीत. संपन्न जगण्याची स्वप्ने दाखवण्याच्या पद्धतीही जगाला काही नव्या नाहीत. सामन्यांच्या आयुष्यात समाधानाचे रंग भरण्याच्या गोष्टी कितीतरी वर्षापासून सांगितल्या जात आहेत. पण त्यातील किती पूर्ण झाल्या, याची गणिते काही मांडली जात नाहीत. देशाचं अर्थशास्त्र शेती, माती आणि मातीत मळणाऱ्या माणसांच्या कष्टाभोवती फिरते आहे, असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, हे भौगोलिक सत्य असले तरी ती पैशाभोवती फिरते आहे, हे आर्थिक सत्य आहे. सत्तेची वसने परिधान केलेली माणसे विकासाच्या वार्ता करतात, पण धुळीत मळलेल्या माणसांची भाषा काही त्यांना अंगीकारता येत नाही.

सगळ्याच जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे उपयुक्त नसते अन् कालसंगतही. उपयुक्ततेचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्यांची मूल्ये आकळून घ्यावी लागतात. आवश्यक असल्यास कसोट्यांवर घासून स्थापित करायला लागतात. उपयुक्ततेचे मूल्ये शोधून मांडले जातात, पण अनुपयुक्ततेचे आयामही कळायला नकोत का? अपेक्षांनाही काही अंगभूत अर्थ असतात, हे समजणे आवश्यक नसते का? धूसर क्षितिजावर असणारी लहानमोठी स्वप्ने साकळून आणून सामांन्यांच्या पदरी ज्यांना टाकता येतात, ते वंदनीय ठरतात. विकासाचे प्रदेश उभे करायला लागतात. पण त्याला सामान्यांच्या अपेक्षांची किनार असायला लागते. धरणे, रस्ते, सेझ, औद्योगिक परिसर, प्रकल्प आदि नावांच्या गोंडस झुली पांघरून येणारा विकास विस्थापनासाठी की, उन्नतीसाठी याचं आकलन आधी घडणं आवश्यक नसते का? विस्थापितांच्या वेदनांचे विकल्प शोधता यायला नकोत का? माणसांचे आयुष्य उजाड करायला सरकारी आदेशाचा एक कागद पुरेसा असतो. सैरभैर आयुष्यांना स्थापित करण्यासाठी कागदांचे ओझे, आदेशांचे क्रमांक घेऊन फायली परिभ्रमण करीत राहतात व्यवस्थेच्या केंद्राभोवती, जगण्याचे रंग बदलण्यासाठी काळ कूस बदलतो आहे म्हणत. पण ज्याच्या आयुष्याच्या क्षितिजावरून इंद्रधनुष्य हरवलं त्यांचं काय?

ही कविता व्यवस्थेला नुसते प्रश्न विचारत नाहीये. प्रश्नाच्या आत तुटण्याच्या वेदना एकवटलेल्या आहेत. सामन्यांच्या सामाजिक, आर्थिक पिळवणुकी विरोधातला निषेध मुखरित करणारा आवाज आहे. ठसठसणारी वेदना आहे. व्यवस्थेसमोर हतबल झालेल्या वेदनांचं आक्रंदन आहे. वातानुकूलित यंत्रणेच्या गारव्याने भरलेल्या खोल्यांमध्ये कोणीतरी कागदाच्या तुकड्यावर आडव्या-उभ्या रेषा आखून निर्देशित केलेला टीचभर भाग म्हणजे जमीन नसते. त्या चतकोर तुकड्यात वर्षानुवर्षाच्या आकांक्षा रुजलेल्या असतात. आस्था सजलेल्या असतात. अनेक स्वप्ने पेरलेली असतात. जगण्याचे श्वास तेथून अंकुरित होत असतात. सुखाचे रंग वाऱ्यासोबत उडत असतात. माथ्यावरील आभाळ आश्वस्त करीत असते. मातीचं सत्व घेऊन एक अख्खं विश्व तेथे नांदत असतं, गुरावासारांसोबत. संस्कृतीचे तीर धरून संस्कार वाहत असतात तेथून. सणवार, उत्सव, देवदेवता, यात्राजत्रा, रूढीपरंपरा, कुलाचा इतिहास त्याच मातीतून उगवून येत असतो, पिढीगणिक. जमिनीचा तुकडा घडणाऱ्या बिघडणाऱ्या अनेक आयुष्याचा इतिहास असतो. जगणं समृद्ध करणारा भूगोल येथूनच आकाराला येत असतो. घरातल्या जितराबालाही जीव लावणारी ही माणसे भले धनिकांच्या जगात भणंग असतील, पण अर्ध्या भाकरीतून चतकोर देण्याएवढं विशाल अंतःकरण राखणारी आहेत. प्रथितयश असणाऱ्यांच्या जगात वावर शब्द जमिनीचा केवळ एक तुकडा असेल, पण मातीला माय मानणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काळजाचा तुकडा आहे. काळीज असं देहापासून सहज काढता येतं का? पिढ्यांचा वावर आहे तेथे. आस्थेचे अनुबंध सामावले आहेत या मातीच्या कणाकणात. दिवस-रात्री सकाळ-दुपार-संध्याकाळ वावराच्या बांधावर बांधलेल्या आहेत. आयुष्यातले सगळेच ऋतू मातीतून उगवून येतात, त्यांच्यासाठी वावराचं मोल पैशात खरंच करता येते का?

फक्त स्वतःभोवती प्रदक्षिणा करता येतात, त्यांना प्रार्थनांचे मोल कळावे कसे? वाळवंटात सौंदर्य शोधणाऱ्यांना भावनाचे ओलावे घेऊन वाहणारे झरे कसे आकळतील? लॅण्ड, जमीन वगैरे केवळ एक शब्द म्हणून उरतो, त्यांना भावनांचे मोल कळण्यासाठी आधी जिव्हाळा जपता यायला हवा. दुर्बिणीचे डोळे घेऊन वावराच्या तुकड्यांना रेखांकित करता येईलही, पण संवेदनांचे डोळे कोणत्या प्रयोगशाळेत शोधून प्रत्यारोपित करता येतील? मनाला डोळेच नसतील, तर त्यात साकळलेल्या आकांक्षा, सजलेले स्वप्ने कसे दिसतील? प्रगतीचे पंख लावून माणसाने समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांचा शोध घेतला, पण संवेदनांच्या वाटेने चालत भावनांच्या प्रदेशांपर्यंत तो काही पोहचू शकला नाही. ज्ञानविज्ञानतंत्रज्ञान दिमतीला घेऊन त्याच्या प्रगतीची याने अवकाशात विहार करीत आहेत. पण सामान्यांच्या जगण्याचे आकाश काही त्याला गाठता आलं नाही. मातीसाठी मनातून उगवून येणाऱ्या भावनांचा डोळा कोणत्याही शास्त्राने कमावलेल्या ज्ञानाच्या प्रगतीने शस्त्रक्रिया करून नाही लावता येत. तो शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन मिळवावा लागतो. त्यासाठी मातीत जन्म मिसळून घ्यावे लागतात.

डोळे सगळ्यांना असतात, पण दृष्टी किती जणांकडे असते? शेतकऱ्याच्या नजरेने पाहिले तर जमीन केवळ जमीन नाही. तिच्याशी त्याची नाळ जुळलेली असते. त्याच्यासाठी आईचं गर्भाशयचं असते ती. ज्यातून सर्जनचे सोहळे वाहत असतात अनवरत, अनेक आकांक्षाना जन्म देत. केवळ कुण्यातरी मनात आले, म्हणून संपादनाच्या गोंडस नावाखाली शस्त्रक्रिया करून हे गर्भाशयच काढून घेणं विकासाच्या कोणत्या चौकटींमध्ये अधिष्ठित करता येतं? एक शुष्क निर्णय पुढच्या पिढ्यांचे जन्म संपवतो. आयुष्याचे ऋतू उजाड करतो. ज्यांचा जन्मच परिश्रमाच्या गाथा लिहिण्यासाठी झाला आहे, त्यांना बेगडी सुखाच्या परिभाषा कशा आकळतील? जगताना निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी निघालेली माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. यांच्या वेदनांचे अभिलेख काही मिटत नाहीत. ललाटी लिहिलेल्या अभिशापातून सुटका काही होत नाही. मुक्ती कोण पथे... हा प्रश्न कष्टकऱ्यांच्या जगण्याला जळूसारखा चिकटला आहे. खरंतर त्याला मुक्ती नको, मोक्षही नको. फक्त सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि थोडा आपलेपणाचा ओलावा हवा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

4 comments: