सौहार्दाचे कोपरे

By
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. त्याचं येणं कुणालाच नको असतं. हे खरं असलं तरी ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. अशावेळी प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. नसेल करता येत प्रतिकार प्राप्त परिस्थितीचा ते तिच्या पुढ्यात थांबतात. थांबणाऱ्याना गतीचे गणिते कळतील तरी कशी? मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्याची आस अंतरी नसेल तर प्रस्थानाचे पथ गवसतील तरी कसे?

संघर्ष कोणाच्या वाट्याला, कोणत्या कारणासाठी यावा, हे नियतीलाही कदाचित सांगता नाही येत. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. त्याकरिता परिस्थितीशी भिडता यावं लागतं. दोन हात करून आपला हात दाखवावा लागतो. हात दाखवताना हात मोडला म्हणून प्राक्तनाच्या पदरी आपल्या अपयशाचं माप टाकून पलायन नाही करता येत. परिस्थितीशी झगडताना पराजयचं दान पदरी पडलं म्हणून कोणी संपत नाही. तो काही संघर्षांचा शेवट नसतो. कोलमडण्याच्या आधी उमलण्याचे संदर्भ माहीत असले की, बहराच्या व्याख्या फुलून येतात. एका सीमित अर्थाने शोधलं तर संघर्ष सगळ्यां जिवांच्या ललाटी नियतीने गोंदलेलं प्राक्तन आहे. हे अभिलेख काही कुणाला मिटवता नाही येत, पण त्या अक्षरांचे अध्याय लिहून आयुष्याला अर्थपूर्ण आयाम अवश्य देता येतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. त्यांच्याशी दोन हात करताना काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात. 

आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटात आपलं स्वत्व सांभाळून सहीसलामत सुटणाऱ्याना संघर्षाची समीकरणे समजलेली असतात. संघर्षाची सूत्रे सांगता येतीलही, पण त्याची उत्तरे संक्षिप्त कधीच नसतात. संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकटसमयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.

द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय, तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.

हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो, हेही कसे अमान्य करता येईल?

- चंद्रकांत चव्हाण
••

2 comments:

  1. संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते
    अप्रतिम लेख

    ReplyDelete