समाज नावाच्या विस्तीर्ण वर्तुळात विहार करताना माणूस म्हणून प्रत्येकाच्या असण्याचे काही अर्थ असतात. काही पैलू, काही कोपरे असतात अन् काही कंगोरेसुद्धा. त्यातून त्याची प्रतिमा आकारास येत असते. काहीना संकल्पनेप्रमाणे आयुष्याला आकार देता येतो. काहींच्या आकृत्या अर्धवट राहतात. अखंड सायास-प्रयास करूनही हाती काही लागत नाही. एक मोठं शून्य नियतीने कपाळी कोरलेलं असतं. त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेयच असतं त्यांचं. ना आयुष्याचे अर्थ हाती लागतात, ना जगण्याचे संदर्भ. संगतीची सूत्रे शोधायला जावं तर विसंगतीच्या वाटांकडे पावले वळती होतात.आहे ते पर्याप्त मानून जीवनाचा विनम्र शोध घेता आला की, आनंदाचे वाहते ओहळ शोधायला नाही लागत. सोस सोबत असला की, आहे तेही अपर्याप्त वाटतं. आसपास एक अस्वस्थता दाटत राहते. मग सुरू होते कवायत भाग्याचे साचे बदलता यावेत म्हणून....
प्रतिवादाच्या परिभाषा
विश्वाचे व्यवहार कोणत्या एकाच एक गोष्टीवर सुरु आहेत? उत्तर फक्त एकच पर्यायात यायला हवं आणि तेही कोणत्याही किंतुशिवाय. असा काहीसा प्रश्न तुम्हांला कुणी विचारला तर एकतर तुम्ही त्याच्या ठीकठाक असण्याची खातरजमा कराल किंवा मनातल्या मनात त्याच्या मेंदूचं माप घ्याल. अर्थात, असं काहीसं वाटणंही स्वाभाविकच. विचारणाऱ्यास तत्काळ वेड्यात काढण्याची अनायासे चालून आलेली संधी काहीजण अजिबात वाया जाऊ देणार नाहीत. काही सहानुभूतीच्या ओंजळी भरून पाहतील. पण खरं हे आहे की, कोणती तरी एकच एक गोष्ट व्यवहार सुरळीत करण्यासाठी कारण असते असं नाही आणि ते संभव सुद्धा नाही. व्यवस्था नावाचं वर्तुळ व्यापक असतं. त्यात अनेक शक्यता नांदत्या असतात. वेगवेगळे विकल्प विहार करत असतात अन् त्यासोबत विचारही वाहते असतात. जगणं समृद्ध करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना विवक्षित वाटेने...