विचारांचे विश्व!

By
सुख, सत्ता, संपत्तीच्या प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे बाणेदारपणे आत्मसन्मानार्थ उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो, नाही का? पण असे क्षण कितीदा आपल्या प्रत्ययास येतात? जवळपास नगण्य. याचा अर्थ अशी कणा असलेली माणसे आसपास नसतात असं नाही. ती असतात, पण त्यांचं असणं काळाच्या कोणत्याही तुकड्यात तपासून पाहिलं तरी जवळपास नसण्यातच जमा असतं. आणि म्हणूनच ती अनेकांच्या आस्थेचा विषय असतात. एकांगी विचारांनी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? ती कितीही मोठी असली, अगदी हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी असली, पण त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागले असेल तर... आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या टीचभर माणसांसमोर खुजी वाटू लागतात.

बोन्साय फक्त कुंड्यात शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, तरी वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नियतीने कोरलेलं नसतं. त्यांच्या आकांक्षांचे आकाश कोणाच्या दारी गहाण पडलेले असते. मुळं मातीशी असलेले सख्य विसरले की, विस्ताराचे परीघ हरवतात अन् सीमांकित झाले की उंची हरवते. मूल्यांमधून माणूस हरवला, की विचारांचे विश्व आक्रसत जातं अन् माणूस म्हणून आपल्या असण्याच्या सीमा संकुचित होत जातात. एकवेळ माणूस हरवला तर शोधून आणता येईलही, पण जगण्यातून नीतिसंस्कारांनी निरोप घेतला अन् मूल्यांनी पाठ फिरवली की, माणूसपणाच्या कक्षा विस्ताराचे अर्थ विसरतात.

मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ एक शून्य ज्याला आकार तर असतो पण विस्तार नसतो. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसे आसपास असणे अस्वस्थ करणारे असते. अविचारांशी लढावं लागलं की, विचारांचं महत्त्व अधोरेखित होतं. वेदना प्रखर होतात, तेव्हा सहनशीलता शब्दाचे अर्थ आकळतात. वैयक्तिक स्वार्थापायी सामूहिक समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. पण स्वतःला सजवायच्या सगळ्या संधी सहजपणे हाती असतानाही केवळ समूहाच्या सुखांचा विचार करून स्वार्थाच्या सीमा पार करता येतात, त्यांचं जगणं अधिक देखणं असतं.

समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. त्यावरून पुढे जाण्याची वाट असेल, तर परतीचा मार्गही असतो. पण स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या एकेरी मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. तसंही प्रत्येक वेळी, प्रत्येकाला काही समंजसपणे नाही वागता येत; पण संवेदना जाग्या ठेवता येणे काही अवघड नसते. संवेदनांचे किनारे धरून प्रवास करता आला की, स्नेहाचे एकेक संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. असतो केवळ आपलेपणाच्या ओलाव्याचा शोध.

स्वार्थ जगण्याचा सम्यक मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी कपोलकल्पित  वाटू लागतात. केवळ स्वहित साध्य करण्यासाठी केलेल्या कुलंगड्या वाटतात. आपलेपणाचा ओलावा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात. आपणच आपल्या विश्वात विहार करू लागलो की, आपलेपणाचा परिमल घेऊन वाहणारे वारे दिशा बदलतात. झुळूझुळू वाहणारे स्नेहाचे झरे आटत जातात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो.

आस्था आपलेपणाचे किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने प्रवास करत नसते. किनारे प्रवाहाशी कधीही प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात त्याला आपल्या कुशीत. नात्यांमधील अंतराय कलहनिर्मितीचे एक कारण असू शकते. ते सयुक्तिकच असेल असे नाही. प्रत्येकवेळी ते पर्याप्त असेलच असेही नाही. माणसे दुरावतात त्याला कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो. पण खरं हेही आहे की, प्रत्येकवेळी त्यांची पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते.

वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही उरत; पण वेगळे विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प तर अबाधित राहतातच ना! असतील अथवा नसतील. या असणे आणि नसणे दरम्यान एक संदेह असतो. तो आकळला की, आयुष्याचे एकेक अर्थ उलगडत जातात. पण वास्तव तर हेही आहे की, स्वार्थाच्या परिघाभोवती परिवलन घडू लागते, तेव्हा पर्यायांचा प्रवास संपतो अन् पर्याप्त शब्दाचे आयुष्यातले अर्थ हरवतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment