काळ

By
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. 

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. त्याच्या गतीचे गोडवे नाही गात कोणी. एखादी गोष्ट डोळ्यांना देखणी दिसत असली तरी ती अनुभवणं प्रत्यक्षात तसं असेलच असंही नाही. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. 

काळाचे खेळ सुरू असतात अनवरत. आपल्याला वाटतं आपण परिस्थितीसोबत खेळतो आहोत. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. मूर्त-अमूर्त वगैरेच्या परिभाषा एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी असतीलही. या दोन मितींचा विचार करणे ठीकच, पण अनुभवणे ही आणखी तिसरी मिती असते. तिच्या बिंदूना सांधता येतं त्यांना शक्यतांचे अर्थ शोधावे नाही लागत.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच शेवाळल्या वाटांवरचा. आहे तेवढा तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. आयुष्य सजवण्याचा उद्योग तर सारेच करतात, पण त्याला समाधानाची किनार फार थोड्यांना लावता येते. सगळ्यांनाच नाही जोडता येत धागे धागे. नाही टाकता येत योग्य टाके. काळच आयुष्याच्या पटावर कशिदाकाम करतो. त्याची नक्षी तेवढी निवडता यायला हवी. रेषा सगळीकडे सारख्याच दिसत असल्या, तरी त्यांना मनाजोगती वळणे देता येतात. वळणांचा वळसा समजला, त्याला आकाराचं अप्रूप नसतं. हव्या तशा आणि तेवढ्या आकृत्या त्याला साकारता येतात.

कोणी काळाच्या सूत्रांची प्रशंशा करतात. कोणी त्याच्या गती गोडवे गातात. कोणी त्याने केलेल्या प्रगतीचे नगारे बडवतात. कोण आणखी काही काही. कोण कशाची महती मांडो, पण वास्तवात वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. त्या खुणांचे संकेत तेवढे समजून घेता यायला हवेत. ते आकळतात त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ समजून घेण्यासाठी कोशांचं आकलन अन् ग्रंथांचं परिशीलन करायची गरज नसते. परिस्थिती पुढ्यात प्रसंग पेरत जाते. आयुष्याच्या पटावर तिने पेरलेले कोंब जतन करता यावेत अन् विकल्पांचं तण तेवढं वेळीच विलग करता यायला हवं. 

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला असतो. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य. बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं. पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: