अवतीभवती

By
आसपास निनादणाऱ्या सगळ्याच स्पंदनांना सुरांचा साज चढवून नाही सजवता येत. नाही सापडत कधी त्यांचा ताल. प्रयत्न करूनही नसेल सापडत एखादा सूर, तर आपण आपलंच गाणं शोधून बघायला काय हरकत असते. जगाकडे बघण्याच्या आणि लोकांची मने सांभाळण्याच्या नादात आपल्याला काय वाटतं, हे विसरावं का माणसाने? नाही! कधी कधी चौकटींच्या बाहेर अन् चाकोऱ्यांच्या पलीकडे असणंही देखणं असतं, नाही का? 

'मी' म्हणून काही असतं आपल्या प्रत्येकाकडे. आपलं 'मी'पण आकळतं, त्यांना 'आपण' शब्दाच्या आशयाशी अवगत नाही करायला लागत. ज्यांचा 'मी' 'आपण'मध्ये विसर्जित झालेला असतो, त्यांना विरघळूनही उरण्यातले अर्थ अवगत असतात. दुधात पडलेल्या साखरेचं दृश्य अस्तित्व संपतं, पण तिच्यातलं माधुर्य दुधाच्या पदरी गोडवा पेरून जातं. माणसाला असंच माधुर्य मागे ठेऊन विरघळून जाता येणं अवघड आहे का? असेलही कदाचित. पण अशक्य नक्कीच नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतरी काही अहं अधिवास करून असतात. त्यापासून विभक्त होण्यासाठी विरक्तीची वसने परिधान करून विजनवासाच्या वाटा धरूनच चालावं लागतं असं काही नाही. विचारांना विकारांपासून वेगळं करता आलं तरी खूप असतं यासाठी. आपल्यातला 'अहं'वाला 'मी' नाही, तर आपली पर्याप्त ओळख करून देणारा 'मी' अवश्य सांभाळता यावा माणसाला.

सगळ्याच गोष्टी काही सहेतुक करायच्या नसतात. हेतूसाध्य असतील त्या कराव्यातच; पण काही निर्हेतुक गोष्टीही कधी कधी आनंददायी असू शकतात, त्याही करून पहाव्यात. काही गोष्टी अशाही असतात, ज्यांची प्रयोजने शोधण्याच्या भानगडीत पडू नये. त्या कराव्याशा वाटल्या म्हणून कराव्यात असंही नाही. पण त्या केल्याने प्रसन्नतेचा परिमल मनाचं प्रांगण प्रमुदित करीत असेल, तर तो गंध अंतरी का कोंडून घेऊ नये? प्रत्येक कृतीत किंतु अन् हरेक कामात परंतु शोधायचा नसतो, तर त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यात कृतार्थता कोरायची असते. असेल काही गोमटे मार्गावर तर वळावे त्या वाटेने. वेचावेत पळ लहानमोठ्या आनंदाचे अन् वाचावीत वाटेवरची वेडीवाकडी वळणे. झालंच शक्य तर घ्यावा त्यावर क्षणभर विसावा, नव्याने बहरून येण्यासाठी.

प्रत्येकाच्या अंतरी आनंदाचा कंद असतो. आस्थेचा ओंजळभर ओलावा त्याला अंकुरित करतो. जपावेत जिवापाड ते कोवळे कोंब. वेड्यागत बहरून येण्यासाठी स्वप्ने पेरावी पानांच्या हरएक हिरव्या रेषेत. मोहरून येण्यासाठी त्याला ऋतूंच्या मोहात पडता यावं. धरतीच्या कुशीत विसावलेल्या बिजाने पावसाच्या पहिल्या सरींसोबत कोंब धरून जागं व्हावं. देहावर पांघरून घेतलेल्या मातीचा पदर दूर सारत क्षितिजाच्या टोकावर विहरणाऱ्या रंगभरल्या किनारकडे हलकेच डोकावून पाहावं अन् आपणच आपल्याला नव्याने गवसावं. वाहत्या वाऱ्याशी सख्य करावं. प्रकाशाशी खेळावं. पाण्यासोबत हसावं. आकाशाशी गुज करावं अन् दिसामासांनी मोठं होताना एकदिवस आपणच आभाळ व्हावं. तसं वाढत राहावं आपणच आपल्या नादात. ना आनंदाचं उधाण, ना अभावाची क्षिती. उगीच कशाला खंत करावी पायाखाली पडलेल्या पसाऱ्याची, माथ्यावर खुणावणारं विशाल आभाळ असतांना. अफाट आभाळ माथ्यावर दिसतं म्हणून पायाखालची माती दुर्लक्षित होऊ नये. हेही लक्षात असू द्यावं की, उंचीची सोयरिक पायथ्याशी अन् विस्ताराचं नातं मुळांशी असतं. मुळं मातीला बिलगून असली की, उन्मळायची भीती नसते.   

नितळपण घेऊन वाहणारा परिमल प्रयोजनांच्या पसाऱ्यात हरवतो. तो जपता यावा. त्याकरिता प्रयोजनांची प्राथमिकता समजण्याएवढं जाणतेपण आपल्याकडे असावं. जगण्याचा गंध सापडला आहे, त्याला बहरलेल्या ताटव्याची कसली आलीये नवलाई. आयुष्यात विसावणाऱ्या प्रत्येक पळाला प्रमुदित करता आलं की, परिस्थितीच्या परिभाषा पाकळ्यांसारख्या उलगडत जातात. अमर्याद सुखांच्या कामनेपेक्षा परिमित समाधानासमोर सुखांची सगळीच प्रयोजने दुय्यम ठरतात. सुख अंगणी खेळतं राहावं म्हणून विचारांत समाधान अखंड नांदते असायला लागते. 

अथांगपण अंतरी अधिवास करून असले अन् विचारांत संवेदना वसती करून असल्या की, पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरे सारखी तात्कालिक सुखे केवळ टॅग म्हणून उरतात. त्यांना केवळ दिसणं असतं, पण पाहणं नसतं. दुःखात दडलेलं सौंदर्य पाहण्यासाठी नजरकडे नजाकत असायला लागते अन् वंचनेत सामावलेलं विकलपण समजून घेण्यासाठी विचारांत डूब. चमकत्या सुखांच्या तुकड्यांना लेबले लावून किंमत करता येते. पण विचारात नितळपण अन् कृतीत साधेपण घेऊन धावणाऱ्या आयुष्याचं मोल करणं अवघड असतं. आयुष्याच्या पटावर पसरलेल्या सगळ्याच सोंगट्या काही अनुकूल दान पदरी नाही टाकून जात. कधी कधी फासे उलटे पडतात. होत्याचं नव्हतं होतं क्षणात. नांदत्या चौकटी विसकटणारा हा एक क्षण समजून घेता येतो, त्याला कसली आलीये मोठेपणाची मिरासदारी. त्याचं मोठेपण त्या क्षणांना गोमटे करण्यात असतं. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment