सत्य असत्याशी मन केले ग्वाही...

By

झूठ बोलकर तो मै भी
दरिया पार कर जाता,
डुबो दिया मुझे
सच बोलने की आदत ने...

शब्दांशी सख्य साधायला साऱ्यांनाच आवडते, पण त्यांच्या संगतीने नेमके व्यक्त होणे सगळ्यांनाच अवगत असते असे नाही. सुंदर शब्दांचा सहवास अंतरी आनंद पेरतो. त्यांना भावनांचा ओलावा लाभला की, आकांक्षांची रोपटी अंकुरित होतात. परिस्थितीचा ऊनवारा झेलत ते बहरत राहतात. अशावेळी गिरवलेली, लिहिलेली अक्षरे केवळ ध्वनींना अंकित करणारी चिन्हे नाही राहत, तर भावनांचं आभाळ होऊन अंतरी सुखसंवेदना पेरत असतात. या अनुभूतीला कोणी अपवाद असेल, असं वाटत नाही. म्हणूनच शब्दांचं महात्म्य सांगताना संत तुकाराम महाराज 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने...' असं आत्मविश्वासपूर्वक लिहिते झाले असतील का? नक्की काय, ते आज सांगणे अवघड असले, तरी शब्दांचं सामर्थ्य त्यांना ज्ञात होतं अन् अवगतही होतं, असं खात्रीपूर्वक म्हणता येईल. म्हणूनच तर इतकी वर्षे त्यांचे शब्द संस्कृतीचे किनारे धरून वाहत राहिले आहेत. 'गाथा' त्यांच्या शब्दांचं सौष्ठव असेल, अनुभूतीचं आभाळ असेल; तर तिने अंकित केलेले शब्द सामान्यांच्या विचारसौंदर्याचा स्रोत आहे, प्रेरणांचे पाथेय आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये. संत ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका असो अथवा संत एकनाथांचे भागवत किंवा अन्य संतमहंतांचे, प्रज्ञावंतांचे, सिद्धहस्त साहित्यिकांचे साहित्य; वर्षानुवर्षे लोकमनावर गारुड करुन राहण्यामागे त्यांच्याठायी असणारे प्रांजळ मन अन् त्यात अधिवास करणाऱ्या नितळ भावना, हे एक कारण असावं, असं म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

वर उद्धृत केलेल्या रचनेचा रचियेता कोण? माहीत नाही. पण जो कोणी असेल, तो परिस्थितीने चांगलाच पोळला असेल, याबाबत संदेह नाही. वास्तवाचा वणवा अनुभवल्याशिवाय, त्याची धग जाणवल्याशिवाय असे पीळ घेऊन येणारे शब्द नाही लिहिले जात. आयुष्याची सुसंगत व्याख्या शोधता शोधता कधीतरी विसंगतीच्या वाटेने चालणे घडते अन् चटके बसतात, तेव्हा असं काहीतरी भावनांचे किनारे धरून वाहत राहतं. असंगाशी संग घडला की, दुर्धर प्रसंगांना सामोरे जाणे अटळ भागधेय ठरते. तुम्ही किती काबिल आहात, याला अशावेळी फारसा अर्थ राहत नाही.

कोणी याला कल्पनाविलास, कविप्रतिभा वगैरे म्हणून वास्तवाचा अन् अशा शब्दांचा सुतराम संबंध नसल्याचे सांगेल, कोणी अनुभवातून हाती आलेलं संचित म्हणेल, कोणी आणखी काही. कोणी काही म्हटले म्हणून विधानांचे अर्थ काही एवढ्या सहजी बदलत नसतात. ते त्यात अनुस्यूत असतातच. फक्त प्रासंगिक परिमाणांनी निर्धारित केलेला भ्रम तेवढा अधिक गुंता वाढवतो. हे काही असले, तरी एक खरं आहे की, साहित्यात समाजमनाची भावांदोलने स्पंदित होतात. आसपास घडणाऱ्या घटितांचे ओरखडे उमटतात, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? कुणीतरी तथ्य अनुभवल्याशिवाय शब्द कसे आशयघन होतील? 'पिंडी असलेलं ब्रह्मांडी असतं', असं म्हणतात. मग, अवघ्या विश्वाच्या कल्याणच्या वार्ता माणूस उगीच का करीत असेल? आपला पिंड असा कवचात सुरक्षित राखण्याचा प्रयास करत असेल, तर तो स्वार्थच नाही का? कोणी म्हणेल, असं काही असू शकतंच असं नाही. प्राप्त परिस्थितीचा तो परिपाक असतो, प्रासंगिक परिमाणे त्यामागे उभी असतात वगैरे वगैरे. तात्विकदृष्ट्या हे असं म्हणणं मान्य केलं, तरी काही संदेह शेष राहतातच ना!

असो, मुद्दा हा नाही की, हे खरं आहे की खोटं. पण खऱ्याखोट्याशी निगडित आहे, एवढं मात्र खरं. माणूस खरंखोटं या शब्दापासून स्वतःला सुरक्षित अंतरावर का उभा करत असेल? 'खरं ते माझं, माझं ते खरं नाही.' वगैरे तत्सम विचार अक्षरांना देखणे रूप देऊन भिंतीवर अंकित करतो. मनातले रंग निवडून त्यातल्या विचारांची संगती लावतो. आवडत्या किंवा सहज हाती लागणाऱ्या रंगांनी रंगवून भिंतींवर चिटकवतो. पण याचा अर्थ असा नाही की, भिंतींच्या भाळावर सुविचारांनी अक्षरे गोंदवली, म्हणून तिचे भाग्य बदलते.

एक बाब यानिमित्ताने प्रकर्षाने अधोरेखित करायला लागेल ती म्हणजे, उक्ती अन् कृतीत अंतराय असतं. ते असू नये असं कोणी म्हणणारही नाही. पण ते एवढंही असू नये की, त्याचे अर्थच वास्तवापासून फारकत घेतील. कुणी म्हणेल माणसाच्या स्वभाव विसंगतीतील एवढं साधं सत्य स्मरणात असायला नको का? मान्य आहे, सगळ्यांनाच महात्म्यांच्या मार्गाने प्रवास करायला पेलवत नाही. माणूस म्हणून माणसांच्या काही मर्यादा असतातच. पण मर्यादा म्हणजे समर्थन नाही होऊ शकत, हेही तेवढंच खरं.

स्वार्थ साध्य करायचा विचार आला की, सुविचार आंधळे होतात. लोकप्रबोधनासाठी वेचलेली अन् कृतींची प्रयोजने अधोरेखित करणारी अशी अक्षरे एखाद्याच्या वर्तनात नितळता, विचारांत निर्मळता अन् कृतीत निखळपणा निर्माण करायला असमर्थ का ठरत असतील? स्वार्थप्रेरित विचारांना प्रमाण मानून सुरक्षित अंतर राखणाऱ्यांना याबाबत विकलांग तर्कांवर आधारित समर्थनीय विधाने करणे काही अवघड नाही. नजरेचा कोन थोडा विस्तृत करून पाहिलं, तर काही गोष्टी प्रकर्षाने प्रतीत होतात, त्यात स्वभाव हे त्याचं एक कारण आणि त्याचे काही प्रासंगिक अर्थ असू शकतात, हे दुसरे. पण याही पलीकडे आणखी बऱ्याच गोष्टी शिल्लक असतात. त्यातील एक लाचारी अन् मूठभर स्वार्थासाठी स्वीकारलेले मिंधेपण.

मांडलिकत्व, मग ते कोणतेही असो; एकदा का आत्मसन्मान गहाण ठेवला की, तत्त्व पोरकी होतात. लाचारीचे मळे सर्वांगाने बहरू लागतात. नीतिविसंगत वर्तनाला बरकत येते. सद्विचारांचे मोहरले ऋतू वणव्यात कोमेजतात. लाचारांच्या गलक्यात अस्मितांची पाती बोथट होतात. स्वाभिमानावर गंज चढला की, बाणेदारपणाचा कणा निखळतो. मूल्यांची संगत सुटते. विसंगतीला आशयाचे अर्थ चिटकवले जातात अन् संगतीला विवादाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतात. कोमल वाणी, विमल करणी अन् धवल चारित्र्याचे धनी आसपास अनवरत नांदते असावेत, ही अपेक्षा अशा वातावरणात वांझोटी ठरते. उक्तीला कृतीची प्रयोजने देता नाही आली, तर अंधारचं अधिपत्य निर्विवादपणे निर्माण होतं, हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही उरत.

आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही. शपथ घेताना सत्याची कास सोडणार नाही म्हणून माणूस माणसाला आश्वस्त करतो. पण सार्वजनिक समाधान, सौख्य स्थापित करण्यासाठी एखादी निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आली की, पलायनाचे पथ का शोधत राहतो?

सत्याचा महिमा विशद करण्यासाठी आपण राजा हरिश्चंद्रला पिढ्यानपिढ्या वेठीस धरत आलो आहोत. निद्रेत राज्य स्वामींच्या पदरी टाकणारा सत्यप्रिय राजा म्हणून आम्हाला किती कौतुक या कृतीचं. या कथेमागे असणारं वास्तव काय किंवा कल्पित काय, असेल ते असो. सगळंच नाही पण निदान जागेपणी यातलं थोडं तरी आपण करायला का तयार नसतो? अर्थात, अशा निकषांच्या मोजपट्ट्या लावून आयुष्याचे सम्यक अर्थ आकळत नसतात. तसंही साऱ्यांनाच एका मापात कसं मोजता येईल?व्यवस्थेच्या वर्तुळात सगळेच काही सारख्या विचारांनी वर्तत नसतात. तशी अपेक्षा करणेही रास्त नाही. कुठल्याही काळी, स्थळी ठाम भूमिका घेऊन वर्तनाऱ्यांची संख्या तशीही फार विस्तृत नसते. अर्थात, हे विधानही तसे ढोबळ अनुमानांचं अपत्य म्हणूयात आपण. सत्य कोणत्याही समूहाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यापासून पलायनाचे पर्याय नसतात. त्याच्या प्रतिष्ठापणेसाठी पर्याप्त प्रयास हा एक प्रशस्त पथ असतो. पण सगळ्यांनाच हा प्रवास पेलवतो, असंही नाही.

देशोदेशी नांदत्या विविध विचारधारांनी सत्याचा नेहमीच आग्रह धरला आहे. ते जीवनाचं प्रयोजन वगैरे असल्याचे सगळ्याच शास्त्रांनी विदित केले आहे. पण याचा अर्थ सगळ्यांनीच ते अंगीकारले आहे, असा होत नाही. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले परमता' असं म्हणायला मत असायला लागतं. ते संत तुकारामांकडे होते म्हणूनच ते हे लोकांना सांगू शकले. पण दुर्दैव असे की, संकुचित स्वार्थासाठी माणसे सोयिस्कर भूमिका घेतात. त्यांना समर्थनाची लेबले लावतात. बोंबलून बोंडे विकण्याची कला अवगत असलेले विसंगतीला विचार म्हणून बुद्धिभ्रम करत राहतात. माणसे अशा भ्रमाभोवती भोवऱ्यासारखे फिरत राहतात. भोवऱ्याला गती असते, पण ती काही अंगभूत नसते. कोणीतरी त्याचा वेग निर्धारित केलेला असतो. लोकांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा लाचारांचा सद्दीचा काळ असल्याचे म्हणा, ते सकुशलपणे पैलतीर गाठतात. बरं, ही वर्तनपद्धत स्वपुरती सीमित असेल, तर एकवेळ समजू शकतो. पण स्वहित साध्य करण्याच्या प्रयत्नात सामूहिक कल्याणाला तिलांजली दिली जात असेल, तर प्रश्न अधिक गहिरे होत जातात. तरीही एक प्रश्न उरतोच तो म्हणजे, सत्य सापेक्ष संज्ञा आहे अन् तिचा अक्ष किंचित स्वार्थाकडे झुकलेला असतो. त्याचा सुयोग्य तोल सावरता आला की, ते झळाळून येते अन्यथा अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन मुक्तीच्या शोधात भटकत राहते. त्याला हा अभिशापच असावा बहुतेक, नाही का?
••

0 comments:

Post a Comment