काळ

By

काळ खेळत राहतो
अंधार-उजेडाशी
दिवस महिने वर्षे...
आणखी असंच काही...
अनवरत... अथक... अनाहत... वगैरे वगैरे
गणतीच्या अगणित खुणा गोंदवून घेतल्या असतील
त्याने आपल्या कायेवर
लोटली असतील युगे त्याच्या खेळण्याला
आज... उद्या... परवा...
किंवा आणखी पुढे... त्याहून पुढे...
तो तसाच खेळेल

खेळत राहतो कधी क्रूर बनून
कधी होतोही कोमल
कधी कातर
कधी विभोर
कधी होतो कठोर कातळासारखा
खेळत राहतो तो
नितळ भावनांशी...
निर्व्याज मनाशी...
निखळ इच्छांशी...
निरलस अपेक्षांच्या तुकड्यांशी... 

कधी भरलेलं आभाळ बनून
उगीच मनात दाटून राहतो
कधी झरत राहतो थेंबाथेंबाने
कधी वेड्यासारखा धो धो कोसळतो
कधी झड लागल्यागत बरसत राहतो
कधी वाहत राहतो नुसता
कधी नुसताच कोरडा होऊन
कोरत राहतो मनाचे कोपरे
माणसे मात्र शोधत राहतात
त्याला पुन्हा पुन्हा गणनेच्या शुष्क चौकटीत

••

किती चौकटी आखल्या असतील काळाच्या चालत्या पावलांनी वळणांवर क्षणभर विसावताना. खरंतर त्याला ना कसला मोह, ना कसली आसक्ती, ना कसला आकार, ना रूप, ना गंध. पण संवेदनांना स्पर्शून जातो तो. तो निराकार असेल तर त्याला आकार देण्याचा मोह का नाही टाकून देता येत माणसाला? मोहात पडतो माणूस कसल्या ना कसल्या. म्हणूनच तर निमित्त शोधली जातात. उत्सव केले जातात त्या क्षणांचे.

कुणाच्या हाती देऊन जातो तो आनंदाचे दोनचार कवडसे. कुणाच्या ओंजळीत टाकून जातो अपेक्षांच्या मूठभर पाकळ्या. कुणाच्या ओटीत ओतून जातो अंधार. तरीही माणसं मोजत राहतात त्याचे तुकडे, स्वतःच तयार केलेल्या समाधानाच्या परिभाषांच्या पट्ट्या वापरून. खरंतर क्षणाला जोडून क्षण येतो अन् पुढच्या क्षणाला भूतकाळाच्या कुशीत सामावून घेतो, पुढच्या क्षणाची वाट पाहत राहतो. तो पुढचा क्षणही रेंगाळतो वर्तमानचे कवडसे हाती घेऊन पळभर अन् निघतो पाऊलखुणांचा माग काढत... चालणं त्याचं अन् आपलंही भागधेयच, नाही का?
••

0 comments:

Post a Comment