प्रेरणा

By

आयुष्यात आनंदाचे परगणे नांदते राहावेत म्हणून माणसे अज्ञात प्रदेशांच्या वाटा शोधत राहतात. हेतू एकच आयुष्याचं आभाळ असंख्य चांदण्यांच्या प्रकाशाने निखळत राहावं. जगण्याचे सोहळे आणि असण्याचे सण व्हावेत. पण हे वाटते इतके सहज असते का? सहज असते तर संघर्षाला काही अर्थ राहिला असता? कदाचित नाहीच. हजारो वर्षांच्या त्याच्या जीवनयात्रेत तो टिकून राहिला, कारण लढणे त्याने टाकले नाही. आणि सुखाचा सोसही त्याला कधी सोडता आला नाही. त्याच्या आयुष्यात आनंद ओसंडून वाहतो, तसे दुःखही अभावाचे तीर धरून प्रवाहित असतेच. समाधानाच्या प्रदेशात सर्जनाचा गंध सामावलेला असतो, तसा अभावाच्या आवर्तात अपेक्षाभंग असतो.

प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन समर्पण भावनेने काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल इतिहास घेत असतो. त्यांचा त्याग हाच इतिहास होतो. इतिहास अशा कार्यासाठी एक पान राखून ठेवतो. संघर्षात लहान मोठा असा फरक करता येत नाही, तर प्रत्येकाची एक लहानशी कृतीही तेवढीच महत्त्वाची असते, जेवढा इतिहासातला परिवर्तनाचा क्षण. परिवर्तनप्रिय विचारांच्या मशाली हाती घेऊन निघालेल्या साधकांच्या प्रेरक प्रज्ञेचा परिपाक परिस्थितीत घडणारा बदल असतो. म्हणूनच प्रेरणेचे दीप अनवरत तेवत ठेवणे आवश्यक असते.

परिवर्तनाची स्वप्ने काळजावर गोंदवून लक्षाच्या दिशेने निघालेले निःसंदिग्धपणे इतिहासाला सांगतात, आमचा संघर्ष प्रवृत्ती विरोधात होता, न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी होता, माणुसकीच्या परित्राणासाठी होता. पण हेही सत्यच, संघर्षरत असताना पदरी पडलेले एक यश म्हणजे लढ्याचा शेवट नसतो. संघर्षाला विश्रांती नसतेच. त्याला नवे परीघ निर्माण करावे लागतात आणि विस्तारावेही लागतात. त्यासाठी क्षणिक सुखाचा त्याग करून समर्पणाची पारायणे करावी लागतात.

कोणाला काय हवे, ते त्याच्याशिवाय कोणी कसं चांगलं सांगू शकेल? हवं ते काही सहज हाती नाही येत. त्यासाठी वणवण अनिवार्य ठरते. खरंतर शोध आपणच आपला घ्यायचा असतो. म्हणूनच तर काही वाटा उगीच साद देत असतात. त्यांना प्रतिसाद देता आला की, प्रवासाला पुढे नेणारी रेषा सापडते. याकरिता आपण फार काही वेगळे असण्याची किंवा काहीतरी निराळे करण्याची फारशी आवश्यकता नसते, फक्त आपल्या अंतर्यामी अधिवास करणाऱ्या आकांक्षांची स्पंदने तेवढी ऐकता यायला हवीत. त्यांचा आवाज समजून घेता यावा. अंतस्थ आवाजांचे सूर समजले की, त्यांना वेगळे शोधायची गरज नसते. आसपासच्या आसमंतात ते निनादत राहतात.

साचलेपण जगण्यात नकळत येतं. प्रवास घडत राहतो. तो घडतो म्हणून त्यांची परिभाषा करायला लागते. अर्थात, या दोनही गोष्टींची सुरवात आणि शेवट नेमका कुठे होत असतो, हे समजणे आवश्यक असते. संक्रमणाच्या सीमांवर कुठेतरी ते असू शकते. रेषेवरच्या नेमक्या बिंदूना अधोरेखित करता यायला हवं. ज्यांना जगण्याचे सूर शोधायचे असतात, ते नजरेत स्वप्ने गोंदवून निघतात, मनी विलसणाऱ्या क्षितिजांच्या शोधाला. अर्थासह असो अथवा अर्थहीन, चालणं नियतीने ललाटी अंकित केलेली प्राक्तनरेखा असते, संभवतः टाळता न येणारी. अर्थाचा हात धरून येणारी प्रयोजने यशाला समाधानाचं कोंदण देतात, तर अर्थहीन भटकंती आकांक्षांचे हरवलेले परीघ. ईप्सितस्थळी पोचण्याच्या आकांक्षेने निघालेल्या पावलांना अनभिज्ञ क्षितिजे सतत खुणावत राहतात. चालत्या पावलांचं भाग्य अधोरेखित करायला नियतीही वाटेवर पायघड्या घालून उभी असते. आवश्यकता असते फक्त क्षितिजाच्या वर्तुळाला जुळलेल्या रेषांपर्यंत पोहचण्याची अन् मनात आस असावी जमिनीशी असणाऱ्या नात्यांची वीण घट्ट करीत नवे गोफ विणण्याची.
**

4 comments:

  1. Replies
    1. मस्त एकदम भारी तुमचा विदयार्थी रोहन हवेले

      Delete
  2. सर खूप छान.अगदी खरंय प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन संघर्षपूर्ण मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी इतिहासही एक पान राखून ठेवतो.

    ReplyDelete