Vatani | वाटणी

By

उन्हाळ्यातील रणरणती दुपार. सूर्य आकाशातून धिम्या पावलांनी नेहमीच्या वाटेने निघाला होता. मावळतीच्या मुक्कामावर उतरायला त्याला अजून बरीच मजल मारायची होती. वारा रुसलेल्या पोरागत कुठेतरी लपून बसलेला. माणसे सकाळीच शेतात कामाला गेलेली. घर सांभाळत थांबलेल्या म्हाताऱ्यांचा सखारामबापूंच्या अंगणातील निंबाच्या सावलीचा आधार घेत नेहमीप्रमाणे गप्पांचा फड रंगला होता. गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांचा गोंगाट तेवढा कानी पडत होता. गावाच्या दक्षिणेकडील टोकावर असलेल्या सरुमायच्या घराकडे तशी शांतताच होती. अंगणातील पिंपळाच्या झाडावर विसावलेल्या दोन-चार चुकार पाखरांच्या चिवचिवाटाशिवाय कसलाही आवाज नव्हता. नदीच्या वाटेने उतरणाऱ्या गल्लीच्या शेवटच्या टोकावरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज तेवढा अधूनमधून शांततेला दुभंगत होता. झाडाचं पानही हलत नव्हतं. ओसरीवर हताश चेहरा घेऊन सरूमाय बसलेली. ती केवळ देहाने ओसरीवर होती. मन वाट चुकलेल्या पाखरासारखं सैरभैर भटकत होतं. कुठल्या अनोळखी वाटेने ते पळत होतं, तिलाच कळत नव्हतं.

उन्हाच्या उकाड्याने बाहेरही पडता येत नव्हते आणि बसल्याजागी मनही लागत नव्हतं. झाडाच्या बुंध्याला सावली पाहून कुत्रं धापा टाकत बसलेलं. त्याच्याभोवती उडणाऱ्या माशांनी हैराण झालेलं. अंगावर बसून चावे घेणाऱ्या माशांना हाकलण्याचा प्रयत्न करूनही त्याला फारसं काहीही करता येत नव्हतं. सरुमाय लुगड्याचा पदराने चेहऱ्यावरला घाम पुसत होती. वारा घालून जिवाला थोडं बरं वाटत होतं, म्हणून तिचे हात तेवढे हालचाल करीत होते. मनात अस्वस्थता दाटून आलेली. बसल्याजागी घडणाऱ्या हालचालीतून तगमग तेवढी जाणवत होती. मनात उठलेली वादळे मनातच थोपवून ठेवण्याचा तिचा प्रयत्न अधिक केविलवाणा वाटत होता. डोळे शून्यात हरवलेले. आपलं असं काहीतरी शोधत होते. ते मिळणं शक्य नसल्याचे कळत असूनही उगीचच त्यांच्यात आशेचे कवडसे काजव्यांसारखे अधूनमधून चमकून जात होते. हे सगळं थांबवता येईल, अशी वेडी आशा मनात मृगजळासारखी धावत होती. तिला आकार तर होता, पण अस्तित्व होतंच कुठे? वंचना शब्दाचा अर्थ तिला माहीत असणं शक्यच नव्हतं, पण समोर पडलेल्या पसाऱ्यात ते सगळं दिसत होतं.

दुभंगणारी स्वप्ने आणि हातून निसटणारी सुखे कितीतरी दिवसापासून म्हातारी सावरून धरत होती. पोरांच्या मनात घर करून बसलेल्या मतलबीपणाने नात्यांचे धागे अधिक ताणले जात होते. त्यांची सहन करण्याची क्षमता संपली. तुटायचेच होते, ते तुटले. तुटायला कारणे अनेक होती. आजचा दिवस निमित्तमात्र ठरला एवढेच.

घरचं घरपण गेल्या वर्षभरापासून क्षणाक्षणाने हरवत गेलं. हसत्या खेळत्या घरच्या धावत्या पावलांना खीळ बसली. जगण्याचा सगळा नूर बदलून गेला. परिवाराच्या मनातून पाझरणारा आपलेपणाचा झरा आटत गेला. ममतेचे तीर धरून वाहणारा प्रवाह हरवला. आपलेपणाची डूब घेवून भरलेलं पात्र रितं झालं. वर्षानुवर्षे काडीकाडीने जमा केलेला संसार कोलमडण्याच्या टोकावर येऊन उभा राहिला. म्हातारीने हिमतीने आणि हिकमतीने आतापर्यंत त्याला सावरून धरले होते. तो सावरून धरायची तिची ताकद क्षीण होत गेली. माणसांचे अहं तुटेपर्यंत ताणले गेले आणि हाती उरले त्याचे विद्रूप तुकडे. दोष तरी कुणाला द्यायचा? आपलेच बेईमान असतील, तर कुणाला जबाबदार धरून परिस्थितीत बदल थोडाच घडणार होता. नशिबाला दोष देवून काहीही उपयोग नव्हता. जगण्याचे भोग म्हणून म्हातारी आल्या प्रसंगाकडे विकल होऊन बघत होती. आतून तीळतीळ तुटत राहिली. आपले काय चुकले याचा शोध घेत राहिली.

सकाळी सकाळी लोकांची शेतात कामावर जायची धांदल उडली होती. शक्य तितक्या लवकर त्यांना वावरात पोहचायचे होते. जो-तो आपापल्या धावपळीत. गल्लीत अचानक गलका वाढला. सरुमायच्या घरातून जोरजोरात भांडण्याचे आवाज यायला लागले. हातातील काम टाकून माणसे तिकडे वळले. गर्दी जमा होऊ लागली. काय झाले म्हणून चौकशी करू लागले. हे सगळं नवीन नसलं, तरी अनपेक्षित होतं. सरुमायच्या घरात भांडणं अनेकदा झाली, पण ती घरची घरातच मिटली होती. त्यांनी एवढं तीक्ष्ण टोक कधीच गाठलं नव्हतं. प्रत्येकजण प्रसंगाचा अर्थ शोधू लागले. काहींना हे एक ना एक दिवस घडणार असल्याची जाणीव होतीच. ते दोनही पोरांना दोष देत होते. बायाबापड्या हळहळत होत्या. सरुमाय पोरांना आवरत होती. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. त्यांची झटापट सुरु. तुकारामच्या अंगावरील सदऱ्याच्या चिंध्या झाल्या. दिनूच्या सदऱ्याची डावी बाही झोंबाझोंबीत तुक्याच्या हाती लागल्याने सदऱ्यापासून वेगळी होऊन लोंबत होती. दोघेही रेड्यांसारखे एकमेकांना धडका देत होते. कुणीच मागे सरकायला तयार नव्हतं. त्यांचं असं भांडणं चांगलं वाटत नव्हतं, म्हणून काहींनी आवरण्याचा प्रयत्न केला. तरीही ते दाद देत नव्हते. माणसे जमा झाल्याचे पाहून दोघांनाही जास्तच चेव आलेला.

“तू हात लाई तं देख घरमान्हन्या वस्तुसले. कसा वाटा पडतस, तेच देखस मी.” तुकाराम दिनूच्या अंगावर धावून जात बोलला.

“ये तू पुढे! आठेच तूनं तंगडं तोडीसन तुनाच हातमा नही दिधं तं खानदाननं नाव सांगाव नही.” तुकारामच्या चिंध्या झालेल्या सदऱ्याची हातात अडकलेली बाही ओढत दिनू बोलला.

दोघेही हातघाईला आलेले. शेजारी राहणारा पांडुरंगतात्या त्यांच्या भांडणात पडला. “अरे, तुमले जराशी काही लाज-बीज कायी शे का नही! सकायमा कोणी देवनं नाव ली राह्यनं, कोनी वावरमा जावासाठे तयारी करी राह्यनं, आनी तुमी एकदुसरासना कपडा फाडी राह्यनात. अरे, तुम्ही कोनी माणसं शेतस का हैवान?”

गर्दीत जमलेल्यांना तात्यांच्या बोलण्याने धीर आला. तुकारामच्या मित्रांनी हात धरून ओढतच थोडं बाजूला ढकललं आणि त्याला समजावू लागले. काही दिनूला सावरण्याचा प्रयत्न करीत होते. 

तेवढ्यात दिनूची बायको सुरेखा मनातला राग काढत म्हणाली, “तात्या, तुमी गावना करताधरता शेतस. तुमीच न्याय करा. सगळं मोठासनाच वाटले येवाले जोयजेल का? मोठाच फकस्त सरुमायना आंडोर शे. आनी आमीन काय नदीमा वाही येयेल शेतस का? मनी सासूबी जवयं देखो तवयं त्यास्नीच बाजू लीसन बोलस. कवयंमवयं आमनंबी आईकी लिधं तं घरवर काय संकट येवाव शे का?”

तिचं बोलणं मध्येच तोडत सुमन बोलती झाली. “हा वं बायजाबाई, तुम्ही मोठा धोयेल तांदूई ना मईक शेतस. तुमनं कोन कवयचं आईकतत नही. आमीनच तेवढा धल्लीना लाडका शेतस. आनी तुमनासाठे काहीच नही. आवं, कितलं खोटं बोलशी? थोडी लाज वाटू दे वं! गावमांन्हा लोके काय आंध्या-बहिरा शेतस का? त्यासले काहीच दिखत-आईकत नही का? खोटं बोलाले काही मर्यादा राहास. कोलेबी पटीन एवढंच खोटं बोलो मानूसनी.”

दोनही बायांनी भांडणात आणखी तेल ओतलं. लहान लेकरं बावचळून त्यांच्याकडे पाहू लागली. आपले मायबाप असे का भांडतायेत, याचा त्यांना काही उलगडा होत नव्हता. त्यांच्या रडण्याने गलका आणखी वाढला. लोकांनी समजावल्यामुळे आतापर्यंत शांत बसलेल्या दिनूचा सुमनच्या बोलण्याने पारा चढला. सकाळीसकाळीच हातभट्टीची ठासून आल्याने आधीच वाऱ्यावर तरंगत होता. त्याला आणखी चेव चढला. जिभेवरचे नियंत्रण सुटले. अदवातदवा बोलू लागला. त्या बोलण्याने चिडून तुकाराम दिनूच्या अंगावर धावून गेला. पाठीत एक सणसणीत लाथ घातली. आधीच पिलेला असल्याने दिनू तोल जावून कोसळला. निपचित पडला. काहीही हालचाल नाही. दिनूकडे पाहत त्याची बायको मोठ्याने रडायला लागली. शिव्याशाप देऊ लागली.

शेजारी उभ्या असलेल्या अण्णाने कुणाला तरी पाणी आणायला सांगितलं. त्याने तांब्या भरून अण्णाच्या हाती दिला. ओंजळीत पाणी घेऊन दिनूच्या तोडावर शिंपडले. थोडी हालचाल झाली. कसाबसा उठून बसला आणि पुन्हा शिव्या देत ओरडायला लागला.

रुखमामाय, जानकाबाई, कमलबाई सरुमायला समजावत होत्या. शेजारी आणखी चारपाच बाया म्हातारीला धीर देत होत्या.

जिजाबाई पोरांवर खेकसत म्हणाली, “याच दिन दाखाळना बाकी राह्येल होतात रे भाऊस होन! हाई दखासाठेच सगळं करं तिनी... तुमनाकरता दिन देखा नही, रात देखी नही... हौसमौस नही, कपडालत्ता नही. नुसती ढोरसारखी राबत राहिनी. आतडा तोडत बसनी. कोनासाठे करं तिनी हाई सगळं? गह्यरा चांगला पांग फेडी राह्यनात तुमीन. आरे, पायेल कुत्रंबी इमानदारी इसरत नही. तुमीन तं त्यानापेक्षा गयेलगुजरेल दिखी राह्यनात!”

म्हातारीने डोळ्याला पदर लावला आणि हमसून हमसून रडू लागली. बाया तिची समजूत काढू लागल्या.

तुकारामला मित्रांनी ओसरीवरून उठवून शेजारच्या ढोरघराकडे ओढून नेले. तात्या शहाणपणाच्या चार गोष्टी सांगून काठी टेकत ओसरीवरून उतरले. भांडण सोडवायला आलेले एकेक करून त्यांच्यामागे चालते झाले.

सगळे आपापल्या कामाकडे निघाले. एकमेकांशी बोलत होते. “असं कसं होयनं. सरुमायना पोरं असा तं कवयचं नही होतात. मंग आतेच कसं होयनं?”

“काय सांगता येत नही रे भो! सगळा मतलबना धनी शेतस. दुनियानी रीतच असी शे, त्याले कोन काय करीन. ज्याले-त्याले आपलीच पडेल शे. सगळं मालेच भेटाले पाहिजेल, मंग बाकींना खड्डामा का जायेत ना.”

“इतलाबी चांगला समजू नका तुमीन त्यासले. सरुमाय खमकी होती म्हनीसन आतेलोग त्या आवरायनात. नही तं कवयसना घरदार फुकी देतात त्या.”

“अरे, तो दिन्या, त्यांनी तं सगळी लाज सोडी देयेल शे. दिनभर दारूना अड्डावर पडेल राहस. घरदार कसा-कसानी चिंता नही. मोठाभी कवयलोग आवरीन. त्याले एखलालेच पडेल शे का? हाऊ आईतखाऊ बसीसन खाईन आनी वरतून रुबाब करीन, कसं सहन करी तोबी.”

प्रत्येक जण आपल्या अनुभवानुसार मते मांडत होता.

सरुमायला चार गोष्टी समजुतीच्या सांगून, थोडा धीर देवून बाया घराकडे वळत्या झाल्या.

अख्खा दिवस सरुमाय विचार करत बसली. तिच्या थकलेल्या डोळ्यातलं पाणी वेदना बनून निथळत राहिलं. भविष्याच्या वाटेवर साकोळून आलेलं दाट धुकं तिला दिसू लागलं.

सत्तरी पार केलेली सरुमाय आयुष्याच्या वाटेवरून एक एक पावलांनी वार्धक्याच्या दिशेने सरकत होती. मुळचा गोरा वर्ण रात्रंदिन राबराब राबून रापलेला. सुमार उंची. तरतरीत नाक. चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावनांना गहिरेपणाची डूब देणारे डोळे वाढत्या वयाचे पडदे धरून धूसर होऊ लागलेले. सुख अंगणी नांदते ठेवण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली, कष्टाशिवाय त्यात दुसरे भाव कधी दाटून आलेच नाहीत. आज तेच डोळे आपलं काहीतरी हरवलेलं शोधत होते. देहावर सुरकुत्यांचे जाळे अंथरायला लागलेलं. त्याच्या रेघा वाढत गेल्या, तसा वर्तमान अधिक गुंतागुंतीचा बनत गेला. वर्तमानाच्या थकल्या क्षणांमध्ये आयुष्याचे अनेक चढउतार पाहणारा भूतकाळ हरवला. काळाची चाके अशी काही गरगरली की, भविष्य पाचोळ्यासारखे दिशाहीन भिरकावले गेले. वाऱ्याच्या स्वाधीन पाचोळ्याला निदान वारा देईल ती तरी दिशा असते. पण हिला कोणतीच दिशा आपली म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. मनात साकोळलेली सगळी स्वप्ने हरवली. सोबत उरले वास्तवाचे अस्ताव्यस्त विखुरलेले तुकडे.

कधीकाळी आनंदाच्या किलकिलाटाने भरलेलं घर आज प्रत्येक चौकटीत रितंरितं वाटू लागलं. सुख बनून निनादणारे सूर थबकले. सौख्याचा गंध परिस्थितीच्या वणव्यात कापरासारखा उडून गेला. ज्या घराच्या ओसरीवर आलेला याचक कधी विन्मुख होऊन परत गेला नाही, ती ओसरी आज ओसाड वाटू लागली. आतून कुणीतरी आतडी कुरतडतो आहे असे वाटू लागले.

सरुमायने कष्टाने संसार उभा केला. पै-पै जोडून सजवला. हवं नको ते साठवत गेली. भांड्याकुंड्यापासून ते औतफाट्यापर्यंत सगळंच जमा करीत राहिली. घराचा कोपरान कोपरा तिच्या ममतेने सजत राहिला. तिच्या प्रेमळ स्पर्शाने पुलकित होऊन हसत राहिला. तिच्या ओंजळभर सुखांनी मोहरला. आनंदाच्या क्षणांनी हसला. दुःखाने हिरमुसला. संकटांनी कोमेजून मलूल झाला. पण वात्सल्याच्या वर्षावाने पुन्हा नव्या उमेदीने उभाही राहिला.

नशिबाचे खेळ नियती खेळत असली, तरी जीवनाच्या पटावर टाकलेलं दान पदरी घेऊन आस्थेने आला दिवस सुखाचा करायचे कौशल्य तिने कधी विस्मरणात जाऊ दिले नाही.

भाऊ नसल्याने दोन बहिणीतली मोठी म्हणून वडिलांची लाडकी लेक बनून वाढलेली. बापाने कमावलेलं होतं नव्हतं, ते सगळं लेकींसाठी होतं. अनुरूप स्थळ चालून आलं. पदराच्या गाठी बांधून सप्तपदी घडली. नव्या नात्यात बद्ध झाली. गाठींना असणारे रेशीमबंधाचे पीळ घट्ट होत गेले. पहिल्या लेकराच्या आगमनाने घरात सुखाची पावले दुडूदुडू धावू लागली. त्यांची सोबत करीत दोन वर्षाच्या अंतराने आणखी लहानगी गोंडस पावले येऊन मिळाली. घर आनंदाच्या लाटांवर तरंगत होतं. कशाची ददात नव्हती. घराचा पसारा मोठा. पन्नाससाठ बिघे जमीन. सालदार, मजुरांचा सतत राबता. शेतात बहरून येणाऱ्या पिकांनी आणि गोठ्यातल्या गायी-वासरांनी संसारात चैतन्य भरून नांदत होते. दह्यादुधाने शिंक्यावर आसन मांडलेलं. सुख घेऊन वारा चहुबाजूने वाहत होता. त्याची झुळूक मनाला सुखावत होती.

नियतीच्या मनात काय होते, कुणास ठावूक. एका अवचित क्षणी तिने कूस बदलली. सुख, समाधान घेऊन वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा पालटली. नितळ झऱ्यासारख्या झुळूझुळू वाहणाऱ्या सुखांना नजर लागली. नवरा नावाचं नातं घेऊन जीवनात सामावलेला पुरुष कसा असेल, हे कदाचित नियतीलाही कळत नसावं. नवऱ्याच्या हाती दारूची बाटली अलगद येवून विसावली आणि घरचे वासे फिरले. 

वडिलांनी वाढत्या वयाच्या वाटेने काळाचा हात धरून डोळे मिटले. घर-जमीनजुमल्याच्या वाटण्या झाल्या. नशिबाने मांडलेले खेळ जीवनपटावर सजू लागले. नियतीने टाकलेलं प्रत्येक दान जगण्यातून काहीतरी घेण्यासाठीच येऊ लागलं.

नवऱ्याचं नशेत तर्र होऊन घरी येणं नित्याचं झालं. कटकटी वाढू लागल्या. मारझोडपर्यंत मजल गेली. नांदत्या घरात गोंधळ नित्याचा झाला. शेजारी, नातेवाईक मध्यस्थी करीत राहिले. समजावत धीर देत राहिले. सरुमाय परिस्थितीच्या अंधारात उद्याच्या प्रकाशाचा कवडसा शोधत राहिली.

पदरी पडलेलं पवित्र मानून सरुमाय सगळं सहन करीत राहिली. नवरा नावाला आणि कपाळावरचा कुंकू सौभाग्याला. त्याला ना घराची चिंता, ना पोरासोरांची काळजी, ना कसली जबाबदारी. द्यायचं काहीच नाही, पण होतं तेवढं सुखही हिरावून नेलं. सुखाचे सूर कधी छेडले नाहीत, पण कली बनून संसारात नाचू लागला. आपल्याच मस्तीत जगत राहिला, असून नसल्यासारखा. घर रोजच नव्या आघातांनी हादरू लागलं. सरुमाय पडक्या संसाराला आवरू लागली. पोट पिकून पदरी पडलेल्या पोरवाड्याला घेऊन संसाराचा सुटणारा तोल हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून सावरू लागली.

सततच्या पिण्याने खंगलेल्या नवऱ्याने नशेतच एक दिवस मान टाकली. जगाचा निरोप घेतला. सरुमाय जाचातून मुक्त झाली. सगळं सहन करूनही कुंकवाचा धनी म्हणून नवऱ्याची काळजी करत होती. त्याने एक लाज सोडली मी कशी काय दगडाच्या काळजाची बनू, म्हणून नवऱ्याला दोष देणाऱ्यांना सांगत होती. कसा का असेना, पण जगण्याला त्याची सोबत होती म्हणणारी सरुमाय नवऱ्याच्या जाण्याने हबकली. त्याच्या त्रासातून सुटली, पण परंपरांच्या परिघातून तिला मुक्त होताच आले नाही. कपाळावरचे कुंकू पुसले गेले. पण नियतीचे खेळ एवढ्या लवकर मिटले जाणार नव्हते.

आज नियती तोच दुभंगवणारा खेळ नव्याने खेळायला सज्ज झाली होती. फक्त सोंगट्या तेवढ्या बदललेल्या होत्या. ठसठसणारी जखम भळभळून वाहू लागली. मनात दिशाहीन वादळे घोंगावू लागली. अर्धा संसार पार पडला होता, अर्धा विसकटून परिस्थितीच्या वाऱ्यावर सैरभैर होऊन हेलकावे खात होता.

असं का? या प्रश्नांचं उत्तर शोधूनही तिच्या हाती लागत नव्हतं. पोटाला चिमटा देत प्रसंगी अंगावरील दागदागिने गहाण ठेऊन, कधी मोडून घरचा गाडा ढकलत राहिली. मनात खूप इच्छा होती पोरांनी शिकावं. ढोर मेहनत करूनही हाती चतकोर भाकरीशिवाय काहीही न देणाऱ्या जमिनीत राबून जीव मातीचा करून घेऊ नये, म्हणून धडपडत होती. पोरांना तिची तगमग कधी समजली नाही. अडाणी बाई शिक्षणातून पोरांचं भविष्य शोधत होती, पण त्यांनीच आपण होऊन अंधाराचं राज्य निवडलं. त्याला ती तरी काय करणार होती. तिची स्वप्ने प्रत्येक वळणावर हरत होती. येथेही गारद झाली.

म्हातारीच्या डोळ्यात झोप नव्हती. डोक्यात विचारांचं काहूर दाटून आलेलं. रात्रीच्या अंधारात तिला उद्याच्या विसकटलेल्या वाटा दिसत होत्या. फार ताणून उपयोग नव्हताच. आतापर्यंत तिने घर विभक्त होण्यापासून सावरून धरलं होतं. प्रसंगी रागावून, कधी दोन पावले मागे घेऊन अभंग ठेवण्याचा प्रयत्न केला; पण आता पाणी डोक्यापार पोहचलं. तिचा जीव गुदमरायला लागला. मनात काहीतरी निश्चय करून पाहट होण्याची प्रतीक्षा करू लागली. खूप उशिरा केव्हातरी तिचा डोळा लागला.

पहाटे प्रभातफेरीला निघालेल्यांच्या टाळमृदुंगाच्या आवाजाने तिला जाग आली. कोंबड्याच्या आरवण्याने सकाळच्या आगमनाची नांदी दिली. गुरा-वासरांची धावाधाव सुरु झाली. पाखरे आभाळात किलबिल करीत मुक्त विहार करू लागली. नेहमीप्रमाणे अंगणात सडा टाकला. चूल पेटवून अंघोळीसाठी पाणी तापवत बसली. सूर्य चांगला कासराभर वर आला. सगळं आवरून घरातल्या कोपऱ्यात मांडलेल्या देव्हाऱ्यातून देव काढले. त्यांना अंघोळ घातली. देव्हाऱ्यातला आरतीचा दिवा शेजारीच पडलेल्या फडक्याने स्वच्छ केला. त्यात तेल घातले. फुलवात काढून त्यात टाकली आणि आगकाडी ओढून पेटवला. प्रकाशाची क्षीण थरथर भिंतीवरील तिच्या सावलीशी खेळत राहिली. दिव्याच्या थरथरत्या वातीकडे बराचवेळ बघत राहिली. ओंजळभर प्रकाशाने पसाभर परिसर उजळून टाकणाऱ्या वातीकडे बघताना तिच्या मनात भक्तीभाव दाटून यायचा. देव्हाऱ्यातला दिवा आजही तोच होता. प्रकाशही रोजच्यासारखाच. पण प्रसन्नतेचे दान पदरी टाकणाऱ्या दिव्याची वात आज सरुमायला मलूल वाटू लागली. परिसरात पसरलेला प्रकाश थकल्यासारखा भासत होता.

पांडूतात्या अंगणात खाट टाकून खोकत बसलेला. बिडीचे उरलेलं थोटूक हातात धरून उगीचच त्याच्याकडे पाहत होता. सरुमाय तात्यांकडे चालत आली आणि म्हणाली, “तात्या, आते मी घर कितलबी आवरी धराना प्रयत्न करा तरीबी उपयोग होवाव नाही! तुमीन एक काम करा, तुमना भावड्याले सांगीसन पोरस्ना काकाले आनी बळीराम अण्णाले बलावनं धाडा. यासना बिल्ला मोक्या करीसन मीबी सुटस रोजना कटकटमाई. वाटा करीसन मीभी सुटसू सगळा जंजाय मायीन. उंडारा कथाभी. मंग जे व्होवाव हुईन, ते होवो.”

तात्या तिच्या चेहऱ्याकडे नुसता पाहत राहिला. काय बोलावे काही सुचेना. कशीतरी शब्दांची जुळवाजुळव करीत सरुमायला समजावू लागला. म्हणाला, “असं कसं म्हनी राह्यनी माय तू? तू काय सांगी राह्यनी, तुले समजी राह्यनं का? होस थोडंसं आथं-तथं, म्हनीसन लगोलग काहीभी करानं का? चुकायनात पोरं, मान्य शे! पन पोरंच नं त्या. त्या नही चुकावतीन, तं कोन चुकाईन मंग. सुधरतीन, जाईन त्यासना राग. लागतीन आपापला कामले.”

तात्यांना थांबवत सरुमाय बोलली, “असं काही होवाना लक्षनं नही दिखी राह्यनात तात्या. त्या आणि त्यासन्या बायका काही कोनंच आईकाव नहीत. त्यासनापेक्षा त्या चुडेलीसलेच वाटा पाडानी ज्यास्ती पडेल शे. कवयं वाटा पडतीन आनी आपन रान्या बनसूत यानीच जल्दी लागेल शे तिसले. ते काही नही, तुमी मनं एवढं काम कराले सांगा भावड्याले फकस्त.”

तात्याचा नाईलाज झाला. त्यांनी मुलाला अंगणातूनच आवाज दिला. बोलावून सगळं सांगितलं. सरुमाय पुन्हा घराकडे वळती झाली. ओसरीच्या कोपऱ्यात पडलेल्या खाटेवर येऊन बसली. शेजारीच दोनही नातू खेळत होते. त्यांच्याकडे शून्य नजरेने पाहत राहिली. मोठ्या नातीने घरातून चहा आणून दिला. बशीत ओतून पिण्यासाठी घेतला, पण कोणीतरी गळा आवळून धरल्यासारखे वाटत होते. चहाचा घोट मोठ्या मुश्किलीने ती पोटात ढकलत होती.

दुपारीच नारायण काका आणि बळीराम अण्णा घरी आले. दोनही पोरांना समोर बसवून समजावून सांगितले. थोडे रागावले, दम भरला; पण काहीही उपयोग नव्हता. त्यांच्या डोक्यात वेगळं व्हायचं भूत स्वार झालेलं. बोलून फायदा नव्हताच. नाईलाज झाला. अखेर यांना बंधनातून मोकळे करा म्हणून सगळ्याचं मत झालं.

दिवस मावळतीला उतरू लागला. तिसऱ्या प्रहरी मंडळी घरच्या ओसरीवर बसलेली. तात्या, जिभाऊ, अण्णा सगळे जमले. एकेक करून घरातील भांडीकुंडी बाहेर येऊ लागली. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या. सरुमाय कोपऱ्यात बसून खिन्न नजरेने पाहत होती. वर्षानुवर्षे जमा केलेला संसार विखरून पडलेला तिला बघवत नव्हता. कमलबाई, जानकाबाई तिला समजावत होत्या. नात्यातली, परिचयातली माणसे शांततेत वाटेहिस्से करा म्हणून सांगत होते. पण पोरांच्या डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्यांनी झापडबंद अंधार केलेला. हे सगळं समजून घ्यायला तयार होतेच कुठे. कोणालाच काही समजून घ्यायचं नव्हतं. एकेक वस्तूंवरून वाद सुरु झाले. कोणीही मागे सरकायला तयार नव्हतं. आपण काय करीत आहोत आणि कशासाठी याचं भान उरलंच नव्हतं.

मुलांचा मतलबीपणा म्हातारीला असह्य झाला. मनात सलणाऱ्या वेदना कोंडून धरणे अशक्य झालं. जमिनीतून लाव्हा उसळून वर यावा तसा म्हातारीचा संताप उसळून आला. थरथरत ती ओरडली, “आरे, नालायकसहोन जराशी जननी नही, तं मननी तरी लाज ठेवा रे! असा कसा औस ना पोटे कौंस जलमले उनात रे! जलमताच कसा नही मरणात. असाबी तुमना राहीसन फायदाच काय शे? आख्खी जिन्दगानीभर तुमनासाठे ढोरना मईक राबनू! ऊन देखं नही, पानी देखं नही. वारा-वावधन देखं नही. रातदिन हाडसना काडं करात. याच पांग फेडासाठे होतं का रे हाई समदं?”

म्हातारीच्या बोलण्याकडे ढुंकूनही न बघता पितळच्या मोठ्या पातेल्याकडे हात दाखवत तुकाराम त्याच्या बायकोला म्हणाला, “उचल वं हाई बघोनं. कोन आडावंस माले ते देखस!”

आधीच हातभट्टीची टाकून तर्र झालेला दिनू भडकला. मोठ्याच्या अंगावर धावून येत बोलला, “देखस नं मी! तू कसा काय बघोनाले हात लावस ते. तू हात लाई तं देख, तोडीच टाकस का नही तवयं बोलजो. सगळंच तुना बापनं शे का!” झोकांड्या खात त्याने बघोनं ओढून बाजूला ठेवलं.

माणसं अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली. पांडूतात्या समजावण्याचा प्रयत्न करू लागला. “अरे, कोनीतरी दुसरं भांडं ल्या ना! एक हाई ठेवा, दुसरानी ते ठेवा. थोडं आथं-तथं होयनं तं काय मरी जावव शेतस, का कंगाल हुई जावव शेतस तुम्हीन?”

तात्याला अडवत दिनकरची बायको बोलली, “तात्या, आमीन धाकला शेत, माहीत शे सगळी दुनियाले. पण मनी सासू कवयं आमले त्यासना समजनी. जवय देखो तवय भेदभाव करस. आमीन कोनीच नहीत का यासना? न्याय काय डोया मिटीसन बसेल शे. हाऊ अन्याव कोलेच कसा दिखत नही. तरीबी आमीच समदं आयकाले जोयजेल का?”

समोर बसलेली माणसे काय करावे या विवंचनेत. कोणीही कोणाला जुमानायला तयार नव्हते. आबा-बाबा करीत शेवटी कशीतरी समजूत काढून मोठ्याला शांत बसवले. त्यांच्या बोलण्याने तो थोडा वरमला. बायकोला काही बोलू नको म्हणून खुणेनेच सांगितलं. लहान्याच्या मनात हे सगळं पोहोचणं शक्य नव्हतं. तो ऐकण्याच्या पलीकडे कधीच पोहचला होता. मनात सगळा अंधारच असल्याने विचारांचा कवडसा दिसणे शक्य नव्हते.

कसेतरी करून वाटे हिस्से झाले. त्यांच्या बायका भांडीकुंडी उचलून वाट्याला आलेल्या घराच्या हिश्शात रचू लागल्या. ओसरीत अस्वस्थ शांतता पसरली. भांड्यांच्या आवाजाने सरुमायच्या मनाला वेदना होऊ लागल्या. तो आवाज तिला कासावीस करू लागला. सगळं बोलणंच संपलं. पर्याय थकले. मनातल्या अहंकाराने घराच्या मधोमध न दिसणारी, पण नात्यांच्या गहिरेपणाला वेगळं करणारी रेषा ओढली गेली कायमची. मध्यस्ती करायला आलेली माणसे घराकडे चालती झाली.

पांडूतात्या, नारायण काका आणि बळीराम अण्णा बराच वेळपर्यंत म्हातारीशी बोलत बसले. तिच्या मनातली वादळे आस्थेच्या शब्दांनी थांबवण्याचा प्रयत्न करीत राहिले.

सकाळपासून घरात चूल पेटलीच नव्हती. जेवणाचं काहीतरी बघावं म्हणून सरुमाय चुलीकडे वळली. इकडे-तिकडे विखरून पडलेल्या भांड्यांमधून बाजरीच्या पिठाचा डबा शोधू लागली. तेव्हाशी राधामायचा निरोप घेऊन पांडूतात्यांचा भावड्या आला. सगळ्यांना आपल्या सोबत जेवणासाठी घरी घेऊन गेला.

जेवणं करून सगळे ओसरीतच पडले. बराच वेळपर्यंत नारायण काका आणि बळीराम अण्णा बोलत होते. त्यांच्या बोलण्याकडे सरुमायचं लक्षच नव्हतं.

रात्रीचा हात धरून अंधार जमिनीवर हलक्या पावलांनी उतरू लागला. जसजसा अंधार गडद होऊ लागला. तसा सरुमायच्या मनाचा कोपरानकोपरा भीतीने भरून आला. राहून राहून तिचे डोळे भरून येत होते. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांना काही दिसणे शक्यच नव्हते. तसेही तिच्यासाठी बघण्यासारखे उरलेच काय होते? भविष्याच्या वाटेवर दाटून आलेल्या अंधारात तिचं भरकटणारं आयुष्य हरवत होतं. घर, जमीनजुमला सारंसारं काही तुकडे होऊन विखुरलं. पोरांनी वाटून घेतलं... पण तिचं काय? कोण तिच्या उतार वयाच्या सरकत्या वर्षांना आपल्या वाट्याला घेणार होते?
सरुमायच्या डबडबलेल्या डोळ्यांतून उसळणाऱ्या लाटा किनाऱ्याकडे धावत होत्या, पण त्यांचा काठ हरवला होता.
***

1 comment:

  1. अस्सल ग्रामीण कथा खाचणे

    ReplyDelete