Apur | अपूर

By

पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात. त्यांचं सार्वकालिक असणंही नाकारता येत नसतं. कदाचित तात्कालिक घटितांचाही तो परिपाक असू शकतो. पण सगळ्याच गोष्टींना काही प्रासंगिकतेची परिमाणे वापरून मोजता येत नाही. सुख, दुःख, हर्ष, वेदनांचा प्रवाह जीवनातून अनवरत वाहत असतो. आस्थेचे तीर धरून वाहणारे आपलेपण मात्र समजून घ्यायला लागते. संवेदनांचे साचे काही घडवता येत नाहीत. सहजपणाची वसने परिधान करून त्या अंतर्यामी सामावलेल्या असतात. आपलेपणाचे पाझर आटत चालले आहेत. अशा शुष्क पसाऱ्यात आतला झरा सतत सांभाळावा लागतो. पापण्यांनी पेलून धरलेलं भावनांचं आभाळ समजून घ्यायला लागतं. पापण्यांच्या परिघात सामावलेलं ओथंबलेपण डोळ्यातून उतरून मनात वसतीला आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. आपलेपण समजून घेता आलं की, आयुष्याच्या वाटा भले प्रशस्त होत नसतील; पण परिचयाच्या नक्कीच होतात. त्यांच्याशी संवाद साधता आला की, परिसराशी सख्य साधणे सुगम होते. सख्य साधता आलं की, आसपासचा आसमंत चैतन्य घेऊन उमलत राहतो. उमलण्याची पुढची स्वाभाविक पायरी बहरणे असते. असे असले, तरी बहरलेले परगणे सांभाळून समृद्ध करायला लागतात.

पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला परिपूर्णतेचा परिसस्पर्श घडणे कितीही सुंदर वाटत असले, तरी तो प्रवास काही सहजसाध्य नसतो. त्याकरिता आपल्या मर्यादांना समजून घेत मनी वसणाऱ्या परिघाचा विस्तार पारखून, निरखून, समजून घेतल्यावर तो कुठेपर्यंत न्यायचा याच्या मर्यादा आखून घ्यायला लागतात. मोठं होणं म्हणजे काय, हे आकळून घ्यायला लागतं आणि हे सगळ्यांनाच समजतं असंही काही नसतं. मोठेपणाची परिभाषा आधी समजून घ्यायला लागते. मोठेपणाच्या वाटेने चालताना आपल्याला पडलेले मर्यादांचे पडलेले बांध आधी ओलांडता यायला हवेत. माझा वकूब समजणे, म्हणजे मला माझ्या कुंपणांचे आकलन होणे. आपल्या परिघाचा विस्तार समजणे, म्हणजे मोठं होण्याच्या दिशेने पडलेलं पाहिलं पाउल असतं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

माहात्म्याची महती सांगून काही कोणाला मोठं होता येत नसतं किंवा एखाद्यावर माहात्म्याच्या गोण्या लादून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण नाही. मोठेपणाच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. माणसे त्या ठरवतात. त्यांच्या मर्यादाही तेच आखून घेतात आणि निकषांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजतातही तेच. त्यांचे साचे तयार असतात. तुम्हाला तुमचा आकार त्या साच्यात सामावण्याएवढा करता आला की, तुमच्या प्रवासाला महानतेची लेबले चिटकवताना सोपं होतं. आयुष्याच्या वाटेवर चालताना कुठलीतरी चौकट सोबत घेऊन अशी लेबले समोर येत असतातच.

संकल्पित सुखांचे प्रत्येकाचे आकार वेगळे असतात. कधी त्याच्या मनाजोगत्या आकृत्या साकारतात, तर कधी त्यांचे कोपरे दुभंगतात. या प्रवासात अभंग राहता येतं, त्यांचा संग सगळ्यांनाच निःसंग वृत्तीने घडतो का? अवघड प्रवास असतो तो. आसपास कायमच धग असते त्याची. त्याची दाहकता अनुभवायला लागते सतत. मोठेपण काही मागून नाही मिळत. ते प्रयत्नपूर्वक संपादित करायला लागते. म्हणून की काय माग काढणारे त्याचा शोध घेत हिंडतात. कोणी पदाच्या वाटेने तो मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुणी पदामुळे चालत येणाऱ्या प्रतिष्ठेला मोठेपणाच्या परिभाषेत बंदिस्त करू पाहतो, तर कुणी त्याचे मोल पैशात लावून मोठेपणाच्या चौकटी आखून घेतो. साधनसंपत्तीच्या बेगडी झगमगाटात डोळे दिपवणारे क्षणिक कवडसे मोठेपण परिभाषित करतात. माणसे अशा चमकदमकलाच वास्तव समजायला लागतात. अर्थात, अशा विकल्पांचा उपयोग करून मोठेपण मिळेलच असे नाही. समजा मिळवून मिरवता आले, तरी त्याला चिरंजीवित्व असतेच असे नाही. अप्रस्तुत पर्याय जगण्यातील सात्विकता संपवतात. म्हणूनच मोठेपणावर लोकमान्यतेची मोहर अंकित होणे आवश्यक असते. ते फुलासारखे सहज उमलून यायला हवे. उमलून येणे साध्य झाले की, आरास मांडायची आवश्यकता नाही उरत. ये आतूनच देखणेपण घेऊन येते.

मिरवून घेण्याची मनीषा असणाऱ्यांना तर नाहीच मोठं होता येत. तो मोठेपणाचा आभास असू शकतो. मृगजळही पाण्यासारखे दिसते, म्हणून त्यामुळे काही तहान भागत नाही. आयुष्याचं आभाळ सांभाळत सगळ्यांनाच आपापली क्षितिजे शोधावी लागतात. जीवनाच्या वाटेवरुन पुढे पळताना आपणास काय करायचं आहे, एवढं कळलं तरी पुरेसे असते. मोठेपणाच्या पाऊलखुणांचा माग काढत वणवण करून हाती काही लागते का? बहुदा नाही. कारण काही गोष्टी स्वयंभू असतात. स्वतःच्या विचारांवर विश्वास असणाऱ्यां जाणत्यांना दिशाहीन वाटांनी वळायची आवश्यकता नाही उरत. योजकतेने उचललेली त्यांची पावले योजनांची मुळाक्षरे ठरतात. नेणत्यांसाठी सगळेच पर्याय फोल ठरतात. विचारांच्या वाटेने चालणारी माणसे मोठेपणाचा परीघ स्वतः आखतात आणि आवश्यकतेनुरूप विस्तारत नेतात. तो कुठे थांबतो हे जाणतात आणि थांबायचे कुठे हेही समजून असतात.

मखरांमध्ये मंडित होता येतं, पण मनात आसनस्थ होणं अवघड असतं. आरास मांडून अगरबत्त्यांच्या धुरात ओवाळूनही घेता येतं, पण अंतर्यामी झिरपता नाही येत. मढवून घेऊन मिरवणूक सहज काढता येते, पण मिरवून घेतांना धुरळा अंगावर येतो. रंग देहावर चिकटतात, त्यांची जबाबदारी समजून घ्यावीच लागते. नव्हे असे माखलेले रंगच माणसाला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात. जाणिवा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विसर नाही पडू देत. माणूस म्हणून माझे कर्तव्य काय? या प्रश्नाची सोबत ज्याला असते, त्याला मखरात मढवायची आवश्यकता नसतेच. मखरे मळतात, पण मने मळायला नको. एवढं जरी कळलं तरी खूप असतं, माणूस म्हणून इहतली जीवनयापन करायला.

बाकी प्रश्न काय असतातच. उत्तरेही असतात, पण नेमकं उत्तर शोधणारे आणि ते मनाजोगते हाती नाही लागत म्हणून धडपड करणारे किती असतात आपल्या आसपास? समजा नसतीलही, मग आपण या गर्दीत नेमके कोठे उभे आहोत, हे तरी आपल्याला नीटसं उमगलेलं असतं का? नसेल समजलं तर मी काय करतो, हे तरी आपल्याला अवगत असते का? माहीत नाही. पण हे शोधायची आवश्यकता असणे, म्हणजे अपूर्णता, नाही काय?
(चित्र गूगलवरून साभार)
***

0 comments:

Post a Comment