Shodh | शोध

By
माणूस इहलोकी जन्माला येतो तो नियतीने दिलेलं गाठोडं सोबत घेऊन. नियतीने रेखांकित केलेल्या जीवनरेषेवरून त्याचा जगण्याचा प्रवास घडत असतो. ही रेषा सरळसोट असेलंच असे नाही. बऱ्याचदा ती वेगवेगळी वळणं घेऊन पुढे सरकत असते. माणसं चालत राहतात परिस्थितीने नेमलेल्या मार्गावरून काहीतरी शोधत. जे त्याला खुणावत असते आपल्याकडे येण्यासाठी. त्यातून लागते हाती काही, काही निसटते. सुटले ते मिळवण्याकरिता सुरु होतो पुन्हा शोध. माणसं धडपड, धावाधाव करीत राहतात. ज्याचा शोध घेत होते ते हाती लागल्याने सुखावतात. शोधूनही हवं ते न मिळाल्याने निराश होतात. मार्ग अवरुद्ध होत जातात. आलेल्या अपयशाशी दोन हात करीत उभं राहण्याची उमेद अशी सहज टाकता नाही येत, म्हणून परिस्थितीशी धडका देत राहतात. प्रश्नांचा गुंता वाढत जातो. त्यांचे पीळ सैल करीत, गाठी-निरगाठी सोडत माणसांची शोधयात्रा सुरु असते. कोणास काय हवे, ज्याचे त्याला माहीत; पण हे शोधणंच माणसांच्या जगण्याला विश्वास देत असते. हा विश्वास जीवनात लहानसहान गोष्टीतून मिळणारा आनंद निर्माण करण्यासाठी प्रेरित करीत राहतो.

माणसांचं जगणं हीच एक शोधयात्रा आहे. त्याच्या आदिम अवस्थेपासून ती सुरु आहे. निसर्गाच्या सानिध्यात टिकून राहावं कसं, या प्रश्नाचा शोध त्याच्या जीवनाच्या शोधयात्रेचा प्रारंभ होता. निसर्गाचा न्यायच कठोर असल्याने तेथे पुनर्विचार नाही. चुकांना क्षमा नसते. एक चूक आयुष्याचा शोध संपण्याचे कारण ठरू शकते, म्हणूनच सुखमंडित जगण्यासाठी अनुकूल पर्यायांचा शोध घेणं त्याची आवश्यकता होती. उपजीविकेची प्रगत साधने हाती नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नित्याचाच होता. भाकर कमावण्याचे तंत्र अवगत नसल्याने जिवंत राहण्याकरिता शिकारीमागे धावाधाव करणे गरजेचे होते. एवढे करूनही हाती काही लागले नाही की, हताश होण्याशिवाय काही उरत नसे. अशावेळी भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी अन्य पर्याय तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली असेल. कालांतराने काही विकल्प हाती लागत गेले. जीवन स्थिरचित्त होण्याच्या दिशेने निघाले. निसर्गाच्या सानिध्यात विहरताना अनेक गोष्टी दिसत गेल्या, त्यांची चिकित्सा होत गेली. जगण्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टी स्वीकारल्या गेल्या. धरतीतून अंकुरित होणारी रोपटी भाकरीच्या शोधाचे उत्तर असू शकते याची जाणीव झाली. शेतीचा शोध लागून भाकरी हाती आल्याने आपणाकडे आणखी काही असावे असे वाटायला लागले. जिज्ञासा, कुतूहल उपजतच असल्याने स्थिरचित्त झालेल्या मनात अन्य गरजांचा शोध घेण्याची आकांक्षा निर्माण झाली. जीवनाच्या विकासक्रमातील प्रगतीचे एकेक टप्पे प्रासंगिक गरजपूर्तीच्या उत्तरांचा शोध होता. माणूस तंत्रज्ञान निर्माण करणारा जीव असल्याने ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, साहित्य आदी क्षेत्रात त्याच्या प्रज्ञेचा प्रकाश पडायला लागला. वास्तव्याच्या ठिकाणी भिंतींवर कोरलेल्या साध्याशा रेषेपासून नाना रंगांनी मंडित जगण्याच्या आविष्कारांपर्यंत घेतलेली झेप त्याच्या सामाजीकरणाच्या वाटेवरील सहज प्रेरणांचा शोध होता.

माणूस आज ज्या स्थानी येऊन पोहचला आहे, तेथपर्यंतचा प्रवास त्याच्या प्रामाणिक परिश्रमांची शोधगाथा आहे, त्याच्या आकाशगामी आकांक्षांचे फलित आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत पोहचण्यामागे माणसांची शोधवृत्तीच महत्त्वाचे कारण ठरली आहे. मनात उदित होणाऱ्या अनेक प्रश्नांनी त्याच्या प्रवासाला दिशा दिली. प्रश्नांकित समस्या त्याला अपरिचित परगण्याच्या शोध घेण्यास प्रेरित करीत राहिल्या. मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अज्ञात प्रदेशांचा शोध घेण्यास उद्युक्त केले. विश्वाचे गूढ त्याच्या भटकंतीच्या आयुष्यापासून सोबत होतेच. ते जाणून घेण्याच्या इच्छेतून अनेक घटनांचे अन्वयार्थ लावीत तो अज्ञाताचा शोध घेत राहिला. आपण इहतली आहोत, तसेच विश्वात अन्यत्र कुणीतरी जीव अस्तित्वात असतील का? या प्रश्नाच्या शोधासाठी विज्ञानतंत्रज्ञानाचे पंख लेऊन अवकाशात भराऱ्या घेतो आहे. मनी विलसणारे कुतूहल त्याच्या शोधदृष्टीचा परीघ विस्तारत नेण्याचे कारण आहे. धरतीवर जीवनयापन घडताना अनेक जीवजातीसोबत वावरतो आहे. जीवनयात्रा घडते कशी, या प्रश्नाचा धांडोळा घेतो आहे. कितीतरी गोष्टी शोधूनही मनाला स्वस्थता लाभत नसल्याने त्याला आणखी काही हवे आहे. हवं ते मिळणे त्याच्यासाठी सुखाचा शोध आहे. सुख माणसांची सार्वकालिक गरज आहे. पण सुख म्हणजे काय? याचाच शोध अद्याप लागायचा आहे. कुणाला सत्तेचं सुख हवं आहे, कुणाला संपत्तीत सुख गवसतं, कुणाला पदांमध्ये प्रतिष्ठा दिसते. कुणाला आणखी काही हवं आहे. हे काहीतरी मिळणं महत्त्वाचं वाटल्याने, ते मिळवण्याकरिता सगळेच पर्याय तपासून पाहतो आहे.

माणूस समाजशील प्राणी असल्याचे म्हणतो. समाजाचं जगणं संपन्न होण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असते. सर्वांच्या सहकार्याचा परिणाम समाजजीवनाचा विकास असतो. माणूस समाजाचा घटक असल्याने त्याच्या मनात उदित होणाऱ्या भावभावनांना सत्प्रेरित विचारांच्या कोंदणात अधिष्ठित करण्याची गरज सामाजिक जाणिवांचा शोध होता. सहकार्य भावनेतून घडणारा माणसाचा प्रवास उन्नतीकडे घडतो, उदात्त विचारांची प्रतिष्ठापना करण्यास कारण होतो. सर्वांचे वर्तन नीतिसंमत असावे म्हणून जगण्याच्या चौकटींना मर्यादांची कुंपणे घातली. बंधनांच्या शृंखलांनी स्वतःला सीमित करून घेतले. शोध माणसाची सार्वकालिक आवश्यकता आहे. तिचा कधी शेवट होत नाही. एका शोधाचा शेवट दुसऱ्याचा आरंभ असतो. आहे त्यापेक्षा आपल्याकडे अधिक काही असावे, असे वाटण्याच्या भावनेचा तो परिपाक असतो. सार्वजनिक व्यवहारात वर्तताना जबाबदारीचे विकेंद्रीकरण घडणे आवश्यक असते. पण सगळ्याच गोष्टी काही सामाजिक मर्यादांच्या चौकटींमध्ये अधिष्ठित करता येत नाहीत. बऱ्याच बाबी वैयक्तिक सुखांच्या वर्तुळांना वलयांकित करतात. तोही त्याच्यापुरता शोधच असतो. हव्यासापायी कुणी पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा शोध घेतात. मर्यादांची बंधने विसरून वर्ततात. जवापाडे सुख हाती लागावे, म्हणून पर्वताएवढ्या दुःखाला सामोरे जातात. वैयक्तिक सुख हव्यासात बदलत नसेल तर सकारात्मक अर्थाने तो आनंदाचा शोध असतो. हव्यासाचा अतिरेक विसंगतीचे कारण ठरते. माणसांच्या स्वकेंद्रित, स्वार्थलोलुप जगण्याचा त्याग घडणे समाजाची आवश्यकता असते. म्हणूनच सद्विचारांच्या वाटांनी माणसांची पावले वळती करून जगण्याला दिशा मिळावी असे वाटणे हा सत्प्रेरित विचारांचा शोध असतो.

शोध सगळेच चांगले असतील असे नाही. प्रबोधनयुगातील बदलत्या विचारधारांनी माणसांच्या जीवनात क्रांती घडवली. पण सोबत स्वार्थलोलुप विचारही मोठे झाले. स्वार्थपरायण विचारधारांनी सर्वसामान्यांचे जिणे दुःसह केले. समाजाच्या रचनेच्या चौकटी बंदिस्त केल्या. विषमतेने, अन्यायाने, अत्याचाराने कळस गाठला, तेव्हा अन्यायग्रस्त समूह क्रांतीचा उद्घोष करीत माणसाच्या मुक्तीगाथा लेखांकित करता झाला. माणसांच्या सामाजिक सुखांसाठी घेतलेल्या शोधाचा परिणाम या क्रांती होत्या. साम्राज्यवाद, वसाहतवाद सामाजिक अभिसरणातील व्यवधाने होती. त्यांचा शेवट करणाऱ्या मार्गाचा शोध व्यवस्थापरिवर्तनाच्या मार्गावरील विसावा होता. परिस्थिती परिवर्तनासाठी कुणी हाती शस्त्रे घेतली, कुणी शास्त्रे, कुणी लेखण्या. माणसे आपापल्या मार्गांनी परिवर्तनाचा शोध घेत होती. कोलंबसला सागरी मार्गाने भारताकडे यायचे होते. जुजबी माहितीच्या आधारावर सफर करणे त्याच्यासाठी जसा शोध होता, तसा जगासाठीही काहीतरी मिळवण्यासाठीचा शोधच होता. जगाचा अंधार दूर सारण्याची किमया करू शकणारा अणू विभाजनाचा प्रयोग जगात कायमचा अंधार निर्माण करू शकतो, हे ज्ञात असूनही त्याचा शोध घेण्याची इच्छा सामरिकदृष्ट्या सक्षम बनू पाहणाऱ्या लालसेचा शोध होता. पाण्यात माशासारखे सूर मारण्याचे स्वप्न पाणबुड्या आणि जहाजांच्या शोधाचे कारण होते. डोक्यावरील निळ्याशार आभाळाची विशाल पोकळी विहरण्यासाठी माणसांना खुणावत होती. पक्षांचे पंख घेऊन आपण विहार करू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर विमानांचा शोध आहे. कुणीतरी युरी गागारीन अवकाशात जाऊन परत येतो. तेथे आणखी काही आहे का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मार्ग मोकळा होतो. न्यूटनच्या अंगावर पडणारे सफरचंद गुरुत्वाकर्षणाचा शोध ठरते. एडिसनचा दिवा जगातला अंधारा कोपरा उजळवणारा शोध ठरतो. चाकाच्या शोधाने जगाला गती दिली. प्रगतीवर पंखांवर स्वार झालेले विद्यमान विश्व जीवनाच्या नव्या प्रेरणांचा शोध घेत आहे. ग्लोबलायझेशनच्या चक्रावर आरूढ होऊन प्रवासास निघालेल्या जगाच्या सीमा लहान होत आहेत. बदलत जाणाऱ्या संदर्भांना आपल्यात सामावून जग नव्या अर्थकारणाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा शोध घेऊ पाहतेय.

गौतम बुद्धांची तपःसाधना जीवनातील शाश्वत सत्यांचा शोध होता. गांधीजींचे सत्याचे प्रयोग स्वतःच स्वतःचा घेतलेला शोध ठरला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक महाराष्ट्रीय अस्मितांचा शोध म्हटला गेला. विश्व स्वधर्म पाहो अशी आकांक्षा करणाऱ्या ज्ञानदेवांनी विश्वमानवाच्या कल्याणाचा शोध घेण्याचा विचार अनेक मनात रुजवला. बुडती हे जण देखवे ना डोळा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या हृदयातले दुःख व्यवस्थापरिवर्तनाचा प्रयोग होता. वंचितांच्या वेदनादायी जीवनात प्रज्ञेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी त्यांच्या अंतरंगातला दीप प्रज्वलित करून माणूस म्हणून जगण्याची अस्मिता देणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संवेदनशील विचार वर्णव्यवस्थेच्या, जातीपातीच्या शृंखलातून मुक्तीचा शोध होता. अडाणी, अशिक्षितांना आत्मभान देऊन माणूसपणाची जाणीव निर्माण करू पाहणारा महात्मा फुल्यांचा कर्मयोग समतेवर आधारित व्यवस्था निर्मितीचा प्रयोग ठरला. कुष्ठरोग्यांच्या आयुष्याच्या उजाड झालेल्या बागेत आत्मविश्वासाची रोपटी लावून त्यांच्या जीवनातला हरवलेला वसंत फुलवण्यासाठी उभं राहिलेलं आनंदवन बाबा आमटेंच्या सहृदय विचारांच्या निर्मितीचा शोध आहे. एकेका शोधासाठी स्वतःला वर्षानुवर्षे प्रयोगशाळेत गाडून घेणारा वैज्ञानिक, रात्रंदिवस आभाळाकडे टक लावून पाहत बसणाऱ्या खगोलशास्त्रज्ञाच्या मनात लुकलुकणाऱ्या असंख्य प्रश्नांच्या चांदण्या शोधाचे तारे बनून चमकतात, तेव्हा कोणत्यातरी ग्रहाचे स्थान नवे नाव धारण करून माहितीच्या जगात वास्तव्यास येते.

सर्वांभूती समन्वय साधणाऱ्या सत्यान्वेषी विचारांचा शोध माणुसकीच्या परित्राणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयासांचा परिपाक असतो. या मार्गाने चालण्यासाठी माणसांना प्रेरित करणारा विचार सहजभावनेने जगण्याचा आविष्कार असतो. समाजाच्या जगण्याला दिशा मिळावी या अपेक्षेने विचारांचे पाथेय सोबत घेऊन चांगुलपण शोधण्यासाठी निघालेल्या माणसांच्या शोधयात्रेचे फलित जगण्याला आलेला मोहोर होतो. काहीतरी करू पाहणाऱ्या जिद्दीची ती लोभसवाणी रूपे असतात. माणूस लाखो वर्षापासून जगात भटकतो आहे. त्याच्या भटकंतीला निर्णायक दिशा देण्याचे काम शोधदृष्टीने केले. सृष्टीतील नवलाई शोधण्याची दृष्टी देणारी शोधयात्रा त्याच्या जगण्याचा परिघ व्यापक करीत आहे. विश्वातील अनेक गोष्टी माणसाने शोधल्या; पण एक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेच, त्याला स्वतःचा शोध लागला आहे का? तो चंद्रावर जाऊन आला. मंगळावर जाण्याचे मनसुबे रचतो आहे; पण स्वतःच्या मनापर्यंत पोहचून आपण आपलाच शोध घेतला का? आपल्या जगण्यात असणारी अनेक वैगुण्ये अजूनही आहेत तशीच आहेत, याची जाणीव त्याला आहे का? लालसा, स्वार्थ जगण्यातून निरोप का घेत नाही? माणसांचं मन विकारांचे माहेर आहे असे म्हणतात. तो विकारांनी घडला आहे, हे माहीत असूनही विकारांचा शेवट करणाऱ्या मार्गाचा शोध अद्याप का घेता आला नसेल? समाजात अनेक दूरिते आजही आहेत. त्यांचा शेवट करण्याच्या उपायांचा शोध कधी होणार आहे? विश्व समजून घेतले, पण माणूस अजून समजायचा आहे. त्याच्या मनात काय आहे याचा शोध घ्यायचे तंत्र अवगत व्हायचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, नाही का?

6 comments:

  1. Chhan ahe sir
    Neha Kalantri

    ReplyDelete
  2. सुख पाहता जवापाडे.....

    तुमच्या लेखी महत्वाचे काय? सुख की समाधान ?

    ReplyDelete
    Replies
    1. समाधान,
      आपल्याकडे समाधान असले की, सुख आपल्या पावलांनी चालत येते. शेवटी प्रश्न आपणास काय हवे, हे माहीत असण्याचा असतो.

      Delete
  3. Very nice sir
    Shivani

    ReplyDelete