Shahanpan Dega Deva | शहाणपण देगा देवा

By
काही दिवसापूर्वी व्हॉटसअॅपवरून एक मॅसेज फिरत होता, ‘भारतात शाळेतून फर्स्टक्लास गुण मिळवणारे डॉक्टर, इंजिनियर होतात. सेकंडक्लासमध्ये पास होणारे एमबीएला प्रवेश घेतात, अॅडमिनिस्ट्रेटर बनतात आणि फर्स्टक्लासवाल्यांना हँडल करतात. थर्डक्लासमध्ये पास होणाऱ्यांना कुठेच प्रवेश मिळत नाही, म्हणून राजकारणात येतात आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात. फेल झालेले अंडरवर्ल्डमध्ये घुसतात अन् वरच्या तिघांना कंट्रोल करतात. ज्यांनी कधी शाळेचे तोंडपण पाहिले नसते ते साधू, स्वामी, बनतात आणि वरचे सगळे त्यांच्या पाया पडतात.’ खरंतर हा संदेश तयार करणाऱ्याच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक करावे की, आपल्या देशातील लोकांची मानसिकता ओळखून वर्तनातील विसंगतीवर नेमका आघात केला म्हणून दुःखी व्हावे की, हे असेच चालायचे म्हणून समोर दिसते आहे, त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करावे? समजणे जरा अवघड आहे. ते काही असो, या मॅसेजचा शेवट मात्र अचूक टिपला गेला आहे. कदाचित आपणापैकी काहींना हा मॅसेज आला असेल. काहींनी वाचला असेल. वाचून कोणालातरी फॉरवर्ड केला असेल किंवा डिलीट केला असेल. काहीही केले असले तरी परिस्थितीजन्य वास्तव नाकारून पुढे जाता येत नाही. आपण त्यावर विचार केला काय, न केला काय, म्हणून परिस्थिती थोडीच बदलणार आहे.

असा अनुभव कोणाला आला असेल, नसेल माहित नाही. असेल तर कसा, सांगणे अवघड आहे. संवेदनांना जाणवणाऱ्या या वास्तवावर किती जणांनी विचार केला असेल, हेही सांगणं तसं कठीण आहे. पण बहुदा कोणत्याही घटनेचा फारशा गांभीर्याने विचार करायची आम्हांला सवयच नसल्याने याचाही विचार झालाच नसावा, कारण अशा घटनांचा थोड्याशा गांभीर्याने विचार झाला असता, तर माणसे परत त्याच वर्तुळापाशी येऊन थांबली नसती. विज्ञानाचे दीप हाती घेऊन पावलापुरता प्रकाश शोधीत जीवनातील अज्ञानाला दूर करू पाहणारी संवेदनशील माणसं समाजात सर्वकाळी असतात. अशा घटनांविषयी ते सात्विक संताप व्यक्त करतात. हे काय चाललंय, म्हणून संयमित विरोध प्रदर्शित करतात. अशा विचारांनी वर्तणाऱ्यांची संख्या दुर्दैवाने कमीच असते. अज्ञानाच्या अंधारात आत्मतेज शोधू पाहणाऱ्यांच्या जगात सुधारणावादी आवाज क्षीण होत जातात. आंधळा उन्माद धारण करून वावरणाऱ्या वातावरणात विरतात. शहाणपण अशावेळी अंग चोरून कुठेतरी दूर कोपऱ्यात उभे असते. कोण्यातरी बुवाबाबांच्या अफाट लीला प्रकट होतात. त्या कशा घडल्या याची साग्रसंगीत वर्णने प्रिंट मीडियातून छापली जातात, इलेक्ट्रॉनिक मीडियातून दाखवली जातात. पण हे पाहूनही झापडबंद डोळे समोर दिसणारे वास्तव मान्य करायला तयार नसतात. अमक्या बाबांवर आमची आस्था आहे, असे घडेलच कसे? बाबांच्या आशीर्वादाने आमचं अगदी मस्त चाललंय. त्यांच्याकडून असं अघटित घडूच शकत नाही. या महान संत, महात्म्याला उगीच बदनाम करण्याचे, हे षड्यंत्र आहे. आमच्या श्रद्धास्थानाला आम्ही असे सहजी बदनाम होऊ देणार नाहीत. भलेतर आमचं काहीही होवो, आम्ही उभे राहू आणि कुणी बलप्रयोग करणार असेल तर आम्हीही रस्त्यावर येऊ.

असे प्रसंग घडणे आपल्या देशाला काही नवीन नाही. अधूनमधून येणाऱ्या अशा वार्तांनी मीडियाचा टीआरपी वाढतो. घडलेल्या घटनेवर चर्चेचे कार्यक्रम घेतले जातात. येथेही समर्थक आणि विरोधक विचारधारांचे सामने रंगतात. प्रत्येकजण आपणच कसे योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी आपापल्या पातळीवर समर्थन करीत असतात. पाहणारे, ऐकणारे ज्याला जे घ्यायचे आहे, ते घेतो. अर्धाएक तासात चर्चा संपते. चर्चांचा समाजमनावर किती परिणाम होतो कुणास ठाऊक? लक्षणीयरीत्या झाला असता तर पुनःपुन्हा त्यांचे आयोजन करावे लागले नसते. चर्चांमधून विचारांचा जागर घडूनही अंधश्रद्ध माणसं डोळ्यांवर बांधलेल्या अंधआस्थेच्या पट्ट्या सोडायला तयार नसतात. विज्ञानाच्या वाटेने प्रकाशाचा शोध घेत एखादे पाऊल चालते झाले आहे. चालत्या पावलांनी डोळ्यांवर बांधलेल्या आंधळ्याभक्तीच्या पट्ट्या नाकारून फेकल्या. सकारात्मक विचारांची ऊर्जा सोबतीला घेऊन माणसांचे वर्तनव्यवहार घडत आहेत. आपल्या समाजाचे असे चित्र सर्वत्र दिसते का? बहुदा नसावे, कारण तसे घडते तर साध्याभोळ्या भक्तांच्या फसवणुकीच्या घटना वारंवार घडल्याच नसत्या.

प्रबोधनयुगाचा प्रारंभ घडून काही शतके उलटली. निष्कर्ष, अनुमान आणि सत्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या विचारांना सोबत घेऊन प्रगतीच्या शिखराकडे जाऊ पाहणाऱ्या माणसांच्या अथक प्रयत्नातून विज्ञानाचे दीप उजळले. पण त्याचा प्रकाश अद्यापही काही उंबऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. देशाच्या वर्धिष्णू सामर्थ्याच्या, अस्मिताजागराच्या वार्ता करायच्या आणि दुसरीकडे अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटांवरून चालत जाऊन कुणातरी बुवाबाबाच्या आश्रमाचा रस्ता धरायचा. त्याच्या चरणी लीन होऊन, आपले दुःख सांगून मुक्तीचा मार्ग शोधायचा, याला काय म्हणावं? अशा वर्तनाला श्रद्धा म्हणणार असाल, तर अंधश्रद्धा कोणाला म्हणाल? श्रद्धा सार्वकालिक असते. ती असावी याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण अंधश्रद्धेची जळमटे समोर दिसत असूनही माणसं स्वतःहून त्यात अडकत जातात, तेव्हा विज्ञान मूक बनते. अवघं जगणंच बंदिस्त करणाऱ्या बंधनांना माणसे आशीर्वाद समजतात. असे असेल तर अद्यापही आपण अज्ञानाच्या अंधाऱ्या जंगलातून बाहेर आलेलोच नाहीत, असे म्हणणेच जास्त संयुक्तिक ठरेल. वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांनी अवकाशयाने चंद्र, मंगळापर्यंत यशस्वीरीत्या पोहचवली. पण दुर्दैव हे की, अंधश्रद्धाळू माणसांच्या मनापर्यंत विज्ञान पोहचू शकले नाही. आपल्या विनाशाचे पथ आपणच निवडून माणसं मार्ग आक्रमित असतील, तर दोष द्यावा कुणाला? अविचाराने घडणाऱ्या वर्तनाला की, अंधश्रद्धेलाच श्रद्धा समजून वागणाऱ्या मानसिकतेला.

ज्या देशाच्या मातीला विविध धर्माच्या तत्वज्ञानाच्या उन्नत परंपरांचा, विचारधारांचा समृद्ध वारसा आहे. कर्मयोग आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ हजारो वर्षे सोबत करीत आहेत, तेथे अंधश्रद्धा, कर्मकांड रुजतातच कसे? हे न उलगडणारे कोडे आहे. श्रद्धेच्या नावाखाली घडणाऱ्या कर्मकांडात फक्त दीन, दुबळे, वंचित, उपेक्षित, अशिक्षित, गरीबच सहभागी असतात असे नाही. गरीबश्रीमंत असा भेदभाव येथे नसतोच. असते ती आंधळ्या अनुकरणाची समानता, त्या समानतेचा केंद्रबिंदू असतो कुणीतरी स्वयंघोषित बुवाबाबा आणि त्याचे दांभिक आशीर्वाद. व्यवस्थेतील कोणतातरी कारभार चालवण्यासाठी नियुक्त केलेला जनप्रतिनिधीही आपला कार्यभार मुहूर्त पाहून स्वीकारत असेल, तेथे नवीन काही घडण्याची अपेक्षा करावी तरी कशी? विज्ञानतंत्रज्ञान शिकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर उच्चपदस्थ झालेला कोणी एखादा अधिकारी-पदाधिकारी काही लाख किमतीच्या मोटारीत बसून आश्रमाच्या वाटेने पळत असेल, लेकरांपासून चित्रपटांपर्यंत नामकरण करण्यासाठी अक्षरांच्या संख्येची, अंकांची आकडेमोड केली जात असेल, तेथे जगण्याचे गणित हरते. सुशिक्षितांच्या, प्रतिष्ठितांच्या सुखासीन जगात असे घडत असेल, तर अशिक्षित सर्वसामान्यांना दोष देऊन काही उपयोग आहे का?

समाजातील ज्या वर्गाने आपल्या आचरणातून वर्तनाच्या तर्कशुद्ध आचरणपद्धतींचा आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा, तेच अंधश्रद्धेच्या वाटेने निघत असतील, तर विज्ञानप्रणित विचारधारा अंगिकारून विरोध करणाऱ्यांच्या विरोधाची धार उरतेच किती? अज्ञानांत सुख शोधणाऱ्यांच्या जगात विरोधाचं अस्त्र घेऊन उभ्या ठाकणाऱ्यांना महत्त्व उरतेच किती? साधेपणा हेच जीवनाचे सौंदर्य मानणारे अनेक संत, महंत झाले. आपापल्या काळी सुधारणावादी विचारांच्या मशाली हाती घेऊन त्यांनी समाजजीवनातील अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटा उजळल्या. त्या निरासक्त संत, महंतांच्या देहावसानानंतर त्यांच्या कर्मयोगाच्या गाथा अंगिकारायच्याऐवजी त्यांनाच देवत्व प्रदान करून माणसे मोकळी झाली. मूर्ती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली. त्यांचं कार्य हेच बावनकशी सोनं समजून त्यांनी दाखविलेल्या वाटेने चालत कर्मयोग आचरणात आणण्याऐवजी लोकोत्तर महात्म्यांच्या मूर्तींना सोन्याने मढविण्याची भक्तांमध्ये अहमहमिका लागली असेल, तर तेथे वास्तवाचा वस्तुनिष्ठपणे विचार करतोच कोण?

सामाजिकस्तरावर अज्ञानातून एक प्रकारचे वैचारिक मांद्य आले आहे. भोंदूगिरी करणाऱ्या बाबाबुवांना चालून आलेली ती आयतीच संधी असते. लोकमानस मुळातच सश्रद्ध असते. श्रद्धावंतांच्या प्रवाहाला आपल्याकडील थोड्याशा वाक्चातुर्याने वळते करण्याचे कसब अशा काही दांभिकांना बऱ्यापैकी अवगत असल्याने साधीभोळी, श्रद्धाशील माणसं सहज भुलतात. बहुतेक ढोंगी बुवाबाबांचे जीवनचरित्र तपासून पाहा, त्यात सद्विचारांचे बहरलेले मळे आढळतात का? दांभिकता ज्यांच्या जगण्यात खच्चून भरली आहे, तो जगाची दुःखे काय दूर करणार आहे, याचंही जरा भान माणसांना नसावं का? बुवाबाबांच्या भजनी लागलेलं लोकमानस हा विचार का करीत नसावं? नाहीतरी सांप्रतकाळी दांभिकता जीवनाच्या सर्वच क्षेत्राला व्यापून काकणभर शिल्लक उरलेली आहे. सत्याची चाड अन् असत्याची चीड दिवसेंदिवस कमीकमी होत चालली आहे.

निर्लेप, निर्मोही, निर्लोभीवृत्ती, उच्चध्येयवाद, उदारमनस्कता या गुणांनी बहरलेले परगणे उजाड होत चालले आहेत. श्रेष्ठ संतत्त्व हा शब्द शब्दकोशापुरातच उरला आहे की काय, असं म्हणण्याइतपत संदेह वातावरणात भरला आहे. नानांविध मुखवटे धारण करणारे साध्याभोळ्या माणसांना फसवण्यासाठी तत्पर आहेत. आध्यात्मिकतेची वसने परिधान करून लुच्चे, लफंगे जटा वाढवून, कफनी धारण करून उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत. समाज आंधळ्या विचाराने निर्मित आस्थेतून त्यांना प्रतिष्ठा देत आहे. सहज घडणाऱ्या शिकारीसाठी जाळी अंथरून ते सावज हेरत असतात. परिस्थितीवश विकल झालेली माणसं विनासायास यांच्या हाती सापडतात. एकदा का ही सापडली की, यांचे मेंदू पद्धतशीर धुतले जातात. वॉश केलेले मेंदू स्वतःहून डोळ्यांवर आंधळेपणाच्या पट्ट्या बांधून घेतात. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधश्रद्धेच्या बांधलेल्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. अविचाराच्या अंधारात हरवलेल्यांचा प्रवास शोषणाच्या दिशेने सुरु होतो. पुढचं सारं आयुष्य शोषणाच्या वेदनादायी गाथांनी लिहिले जाते. शोषकांच्या अफाट लीला पाहून कोणाही संवेदनशील माणसांच्या कंठाशी प्राण यावा अशी स्थिती दिसते.

संत तुकाराम महाराजांनी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी अशा ढोंगबाजी विरोधात संघर्षाच्या मशाली पेटवून दांभिक, दुर्जनवृत्तीवर कठोर प्रहार केले. दंभ, अनीती, कपट, भ्रष्टआचरण असेल तेथे परमेश्वराचे अधिष्ठान कसे असेल? हा प्रश्न समाजाला विचारला. आपल्या शब्दांचीच अस्त्रे, शस्त्रे करून सद्विचारांचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजातील दंभावर कोरडे ओढताना सांगितले, ‘तुका म्हणे सोंग। दावी बाहेरील रंग। तुका म्हणे हाणोनि। त्यांचे फोडा तोंड॥’ एवढा ओजस्वी विचार सांगणारा अभंग लिहूनही आमच्या समाजातील अंधश्रद्धा अशीच अभंग राहणार असेल, तर तुकाराम महाराजांनाच इहलोकी पुन्हा अवतार धारण करून स्वार्थाची वसने परिधान करणाऱ्यांच्या कफन्या टराटरा फाडाव्या लागतील. लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्यासाठी सावधगिरीचा इशारा करूनही काहीच कसे घडत नाही, हे एक नवल आहे.

‘तीर्थी धोंडापाणी। देव रोकडा सज्जनी ॥’ म्हणणाऱ्या तुकोबांचे शब्द आमच्यापर्यंत पोहचलेच नाहीत का? माझे काय होईल, कसे होईल? याची माणसाच्या मनात सतत भीती असते. कधीतरी कळतनकळत हातून एखादा छोटामोठा प्रमाद घडतो. घडलेल्या चुकीच्या वर्तनाचा सल मनात घर करून असतो. प्रमादाचे परिमार्जन करता यावे, त्यातून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. मुक्तीचे मार्ग मिळवून मोक्षमार्गप्राप्तीची कामना माणसे करीत राहतात. मुक्तीपथ समोर दिसत नाही. संसारातील रोजच्या चक्रात गरगर फिरताना जेरीस आलेली माणसं दुःखांची अखंडित मालिका सोबत घेऊन जगतात. एक दुःखातून मुक्त व्हावे, तर दुसरे संकट समोर उभे. मन सैरभैर झालेले. समाधान, शांती मिळण्यासाठी जावे कुठे, हे सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न, समस्या भोंदू बुवाबाबांचे भक्कम भांडवल होतात. समस्या सोबत घेऊन जगणाऱ्या लोकांची परिस्थितीशरण मानसिकता यांच्या धंद्याला बरकत देणारी ठरते. वैयक्तिक समस्या सोबत घेऊन मठात, आश्रमात जाणारी माणसं यांचे सहज सावज ठरतात.

‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। साधू तोचि ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥’ हे तुकोबांनी आम्हाला सांगून तीन-साडेतीनशे वर्षे झाली. तरीही अंधश्रद्धाळूंच्या वर्तनात फारसे बदल घडतांना दिसत नाहीत. साधू कोण? संत, महंत कोण? हेही आम्हांस कळत नसेल, तर या इतके दुर्दैव आणखी काय असू शकते? श्रद्धाशील मनांनी इतकंही आंधळं असू नये, ज्यामुळे आपली अस्मिता, आपले सर्वस्व लुबाळले जाईल. स्वतःला ईश्वराचा अवतार समजणारे बुवाबाबा अध्यात्माच्या वाटेने लोकांना भूलवतात, झुलवतात. हे महान संत, महात्मे आहेत, तर यांना संपत्तीचा सोस कशापायी आहे? समाजातले दैन्य, दुःख, दारिद्र्य यांना दिसत नाही का? यांच्या निवासाच्या पंचतारांकित सुविधा, आश्रमासाठीच्या शेकडो एकर जमिनी, त्यावर उभारलेले अद्ययावत सुविधांनीमंडित सुखालये पाहून कोणाचीही मती गुंग व्हावी. सुखांची अनवरत बरसात करणाऱ्या येथील सुविधा पाहिल्यावर आपण खरंच दारिद्रयाशी लढणाऱ्या देशात राहतो आहोत का, असा संभ्रम पडावा. आंधळेभक्त आणि भोवतीने वावरणारा झापडबंद शिष्यगण बुवाबाबांच्या प्रासादतुल्य वास्तूंचं संरक्षक कवच बनून उभा राहतो. सुंदर ललनांचा सहवास भोंदूगिरी करणाऱ्यांच्या अवतारपथावरील मोक्षमार्ग असतो. यांचे महाल रंगमहाल बनतात. अशा काही दांभिकांच्या विकृत वर्तनाने शोषणाच्या बळी ठरलेल्या अनेक महिला आयुष्यातून उठतात.

अडलेल्या, नडलेल्या प्रजेला अगतिकतेतून मुक्तीचा काहीतरी मार्ग हवा असतो. यासाठी कुण्यातरी बुवाबाबांचा आश्रय ते शोधतात. भक्तांच्या आंधळ्या भक्तीचा फायदा घेऊन बुवाबाबा निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ करीत राहतात. वैगुण्यांचा विरोध करण्याऐवजी त्यांचा विशेष विकास साधण्यालाच दुर्दैवाने अंधश्रद्ध भक्तांकडून सारासार विवेक विसरून प्राधान्य दिले जाते. अविवेकाने मनात एवढे ठाण मांडले असते की, कोणताही नवा विचार या आसमंतात प्रवेशित होऊच शकत नाही. आपण कोणाचे समर्थन करीत आहोत, याचा जराही विवेक नसणाऱ्या आणि अंधारवाटेने चालणाऱ्या शिष्यांची मांदियाळी यांच्यासाठी रस्त्यावर उतरते. सारासार विचारही नाकारणाऱ्यांच्या अंगात विसंगत उन्माद चढतो. अशावेळी व्यवस्थेने काय करावे? हे वैचारिक अधःपतन पाहून तुकोबांचेच शब्द आठवतात ते म्हणतात, ‘ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू। अंगी लावूनिया राख। डोळे झाकूनि करिती पाप ॥’

श्रद्धांच्या नावाखाली लोकांची मनेच गोठली असतील, गोठवली जात असतील, अज्ञानाची आरास मांडली असेल, तर अज्ञानाच्या अंधारात विचार सहजरित्या बंदिस्त होतात. असत्याला लोकप्रियता लाभते. स्वार्थपरायण वृत्तीने वर्तणाऱ्यांच्या जगात सामान्य माणूस देवाशिवाय, प्रार्थनांशिवाय जगू शकत नाही का? असे जगणे वैयक्तिकरित्या संभव नसल्यास प्रार्थना, पूजा स्वतःपुरत्या सीमित ठेवता येणार नाहीत का? लोकपरलोक, पुनर्जन्म या गोष्टी सत्य किती, काल्पनिक किती याचा उहापोह न करता, याविषयी काहीही जाणून न घेता निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ होत असेल, तर यापेक्षा आणखी विपरीत, विसंगत काय घडू शकते? वास्तव काय, अवास्तव काय? याचा विचार विज्ञानप्रणित जगात जीवनयापन करणारी माणसे विज्ञाननिर्मित भौतिकसुखांच्या सहवासात जगत असूनही करीत नसतील, तर अशा वर्तनविसंगतीतील दोष कुठे शोधावा? दोषावर उपाय आणावा कुठून? हे देवालाच माहीत, म्हणून सारंकाही देवाच्या अधीन करून देणार असू, तर त्याच देवाला उपाय विचारायला लागतील. डोळस श्रद्धेतून निर्मित विचारांनी देवाचं अस्तित्व आपण माणसे मानणार असू, तर त्या देवाकडे सगळ्यांसाठी एकच मागणे मागावेसे वाटते, ‘शहाणपण देगा देवा...!’

0 comments:

Post a Comment