Prashna...? | प्रश्न...?

By
‘का, कसे, कुठे, कधी, केव्हा, कोणता’ या शब्दांना भाषिक व्यवहारात नेमके कोणते स्थान आहे. हे शब्द भाषेत कसे आले असतील? हे शब्द नसते तर काय घडले असते? खरंतर या शब्दांविषयी लिहितानाही प्रश्न चिन्हांकित वाक्ये तयार होत आहेत. प्रश्नांची निर्मिती हेच या शब्दांचे काम आहे. माणसं प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघतात. मिळतात कधीतरी त्यांची उत्तरे सहज. कधी वणवण भटकतात. लागली उत्तरे हाती तर आनंदतात. पण हा आनंदही तसा क्षणिकच असतो, कारण पुढच्या पावलावर दुसरा प्रश्न असतोच उभा. माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? हा प्रश्नसुद्धा आपणासमोर अनेक पर्यायात उत्तरे आणतो. कोणाला काय महत्वाचे वाटेल, कसं सांगावं? मला वाटतं माणसांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट ‘प्रश्न’ हीच असावी. कारण माणसांना प्रश्नच पडत गेले नसते तर...! त्याला प्रगतीची शिखरे गाठता आली असती का? माणूस विचारांच्या संगतीत रमणारा आणि प्रश्नांच्या पंगतीत फिरणारा प्राणी आहे. प्रश्न पडत जाणे आणि त्याची उत्तरे मिळत जाणे हेच माणसांच्या प्रगतीचे गमक असावे. माणसांच्या जीवनातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल, हाही एक प्रश्नच आहे.

माणसं प्रश्नचिन्हे सोबत घेऊनच समाजात वावरत असतात. प्रत्येकाचं जगणं त्याच्यापुरता एक प्रश्न असतो. माणसांचे भलेबुरे प्रासंगिक व्यवहार पाहून कधीकधी वाटते ही अशी का वागतात? या प्रश्नांचे उत्तर मिळणे अवघडच आहे. मिळतील कधीतरी तीही उत्तरे. मिळतील तेव्हा मिळतील, पण माणसाच्या जगण्यात प्रश्नांचे योगदान अनन्यसाधारण आहे. रानावनात, गिरिकंदरात राहणाऱ्या माणसांपासून ते आजच्या अनेक सुविधांनी मढविलेल्या जगात जगणाऱ्या माणसांपर्यंत एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे, मनात प्रश्न निर्माण होणे. त्याच्याकडे असणाऱ्या कुतूहलबुद्धीतून, जिज्ञासेतून त्याला प्रश्न पडत गेले. त्यांची उत्तरे शोधताना एकेक गोष्टी तो मिळवीत गेला. हाती लागलेल्या उत्तरातून सुखाच्या वाटा तयार करीत गेला. सुखाची उपजत ओढ माणसांच्या मनात नवे प्रश्न निर्माण करीत गेली. माणसं कालचक्राच्या सोबतीने चालत राहिली. काहीतरी नवे शोधत राहिली. शतकांच्या वाटचालीत माणसांनी अनेक शोध लावले. यातील सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता? असा प्रश्न मला विचारल्यास भाषा असे निसंदिग्ध उत्तर माझ्यापुरते तरी असेल. तुम्ही पुन्हा प्रश्न विचाराल, का? तर मला वाटते, भाषेतूनच सारे शोध लागले. भाषा माणसांच्या मनात भावकल्लोळ निर्माण करीत विचारांना शब्दबद्ध करीत असते. माणूस चंद्रावर जाऊ शकतो का? हा प्रश्न आधी कोणाच्यातरी मनात निर्माण झाला. मनातील हा प्रश्न भाषेचा ‘अक्षर’ हात धरून कागदावर कोरला गेला. कृतीसाठी उचललेले पाऊल आकाशी झेपावून चंद्राच्या मातीवर उमटले.

नानाविध रंग, रूपं धारण करून मनाच्या आसमंतात आपल्या अस्तित्वाचे इंद्रधनुष्य हे प्रश्न उभं करतात. कधी ते सामाजिक असतात. कधी राजकीय, कधी आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक असतात, तर कधी वैयक्तिक असतात. ते कसेही असले तरी असतात, हे मात्र खरे. आदिम अवस्थेतील माणसाच्या मनातही अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची कक्षा कदाचित त्याच्या जगण्यापुरती सीमित असेल. पण प्रश्न होतेच. उत्तरे शोधणे त्याच्यासाठी आवश्यक होते. भाकरी (शिकार) कशी मिळवावी? हा तेव्हाचा जटिल प्रश्न असेल. शेतीचा शोध लागून तो सुटला. वणवण थांबली. एकदाची भाकर मिळाल्यावर पुन्हा पुढच्या टप्यावर आणखीही काही हवे, असे त्याला वाटू लागले. अशा वाटण्याला मूर्तरूप देताना त्याची पूर्ती कशी करावी, याचा विचार करू लागल्याने मनात आणखी काही प्रश्न उभे राहिले असतील. त्यांच्या शोधात तो बदलत राहिला. काळ बदलतो तसे जीवनही बदलत जाते. जगण्याच्या तऱ्हासुद्धा बदलतात. तसे प्रश्नही बदलतात आणि त्यांची उत्तरेही. काळ आपल्यासोबत अनेक प्रश्न घेऊन येत असतो. त्या-त्या प्रश्नांची उत्तरे माणूस आपल्यापरीने शोधत असतो.

झाडावरून पडणारे फळ खालीच का पडते? हा प्रश्न न्यूटनच्या मनात आला  नसता, तर गुरुत्वाकर्षण असते, पण त्याचे तीन नियम शब्दांचा देह धारण करून ‘अक्षर’वाटेने जन्माला आले नसते. जगात एवढे दुःख का आहे? हा प्रश्न सिद्धार्थाने आपल्या मनाला विचारला नसता, राजप्रासादातील पायाशी लोळण घेणारी सारी सुखे, सारे वैभव टाकून जगात सत्य, अहिंसेचे प्रासाद निर्माण करणारे भगवान गौतम बुद्ध घडले नसते. त्यांनी केलेल्या आत्मशोधातून विश्वातील दुःख विसर्जित करू पाहणारा कालजयी विचार सर्वसामान्यांच्या कल्याणार्थ अवतीर्ण झाला असता का? वंचितांच्या वाट्याला आलेले उपेक्षित जीवन आपणास बदलता येणार नाही का? या प्रश्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्वस्थ केले नसते, तर समतेसाठी संघर्ष घडला नसता. कुष्ठरोग माणसांचे आयुष्य उध्वस्त का करतो? हा प्रश्न बाबा आमटेंना अस्वस्थ करता झाला नसता, तर आनंदवन उभे राहिले नसते. अणूच्या छोट्याशा कणात प्रचंड ताकद असेल का? हा प्रश्न वैज्ञानिकांच्या मनात उदित झाला नसता, तर अणुशक्तीचा शोध लागला नसता. अणूच्या या प्रचंड शक्तीचा विधायक उपयोग करता येईल का? हा प्रश्न पुढे आला नसता तर... हे आणि यासारखे अनेक प्रश्न समोर येत राहिले, म्हणून माणसांच्या जगात विघातक कृत्यांचा अंधार दूर करण्यासाठी विधायक कामे उभी राहिली. या साऱ्या अनुकूल प्रतिकूल विचारांना जन्म देणारा मुख्य घटक प्रश्न हाच आहे.

प्रश्न कालही होते, तसे आजही आहेत. त्यांचा चेहरा तेवढा बदलला आहे. तो तसाही कालानुरूप बदलतच असतो. कालच्या प्रश्नांची धार वेगळी होती. आजच्या प्रश्नाचे पाणी वेगळे आहे, एवढेच. प्रश्न तर कायम आहेतच. कदाचित आजचे प्रश्न टोकदार झाले असल्यामुळे अधिक बोचणारे ठरतात. कालच्या माणसासमोर प्रगतीचे कोणते पाऊल प्रथम उचलावे, हा प्रश्न होता. आजच्या माणसासमोर अधोगतीपासून माणसांना सुरक्षित ठेवावे कसे, हा प्रश्न आहे. आसपासच्या आसमंतात विद्वेषाचे वणवे पेटले असताना सुरक्षित राहावे कसे? या वणव्यांना थांबवावे कसे, हा प्रश्न आहे. विद्यमान जगाचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहेत. कधीकाळी खूप मोठ्ठे वाटणारे जग आज हातात सामावण्याएवढे लहान झाले आहे. हातातल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर ते दिसते. संगणकाच्या पडद्यावर ते आलंय. त्यात सामावलं; पण माणसांच्या मनात कसं साठवावं, हा प्रश्न आहे. प्रश्न आतले आहेत, तसे बाहेरचेही आहेत. त्यांच्याशी संघर्षरत राहावे लागेल. पण तरीही एक प्रश्न समोर उभा राहतोच. सुरवात नेमकी कोठून आणि कशी करावी?

आजचं जग सुखी आहे का? हा एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसले, तरी अवघड आहे. जगाचं तात्पुरतं बाजूला राहू द्या. आपलं स्वतःपुरतं जगतरी सुखाचं आहे का? पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य केव्हा मिळेल, असा प्रश्न साऱ्यांच्या मनात होता. स्वातंत्र्य मिळालं; पण माणूस खरंच स्व-तंत्र झाला का? जातीय, धार्मिक, राजकीय परगण्यातील अभिनिवेश आपल्यासमोर कळत-नकळत अनेक प्रश्न उभे करतात. त्यांची अखंड मालिका सुरु असतेच. माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित कशी करावी? हा गुंतागुंत निर्माण करणारा प्रश्न समोर आहेच. खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? येथे जगताना अनेक मुखवटे घेऊन जगावे लागते. मुखवटे धारण करून जगताना कोणता मुखवटा निवडावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित अनुभवातून येईलही निवडता. पण तो आपल्या चेहऱ्यावर फिट्ट बसेलच, असे नाही. समजा बसलाच तर बदलावा लागणार नाही, याची खात्री काय? आपणास भेटणारी माणसं नेमकी कोण असतात? याची खात्री कशी करून घ्यावी? हासुद्धा एक अवघड प्रश्न. जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो.

विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. व्हाटस अॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसंमात्र स्वतःशी, स्नेह्यांशी, आप्तस्वकियांशी डिसकनेक्ट होत चालली आहेत. लोकांचा संपर्क ‘फेस टू फेस’ कमी होत चालला आहे. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो? हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. आपल्या आसपास अन्याय होत असतो. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? दंगली घडतात, महिलांची मानखंडना होत असते. त्यांच्यावरील अत्याचार नित्याचे झाले आहेत. गुंडगिरी घडत राहते. का होते असे? असा प्रश्न कधी मनात येतो. गरिबांचं, वंचितांचे शोषण का होत आहे? समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारे प्रश्न गंभीर रूप धारण करून समोर का उभे राहतात? प्रश्नांची उत्तरे शोधूनही काही आपल्या हाती लागते आहे का?

चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जीवन जगणं, हे याचे उत्तर नाही. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने चौकटींचे कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर त्यांचे पंख कापले जातात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा त्यांच्या तोंडात बोळे का कोंबले जातात? जाळपोळ दंगली कोणत्या तत्वांच्या स्थापनेसाठी होत असतात? जाळपोळ करणाऱ्या उन्मत्त हाताना विचारा, त्यांच्याकडे याचे उत्तर आहे का? अन्याय का होतो आहे, म्हणून प्रश्न विचारून आपण कधी पाहतो का? विचार करतो का? विद्वेषाचे वणवे का पसरत चालले आहेत? हे आणि असे अनेक प्रश्न माणसाच्या जगण्याची दुसरी बाजू घेऊन समोर उभे राहतात. इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो. त्याची उत्तरे देण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश निर्माण करीत घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? काहीच न शिकणे, हा अपराध आहे. इतिहासाचा वृथा अभिमान शाप असतो. त्याचे यथार्थ ज्ञान आवश्यक गरज आहे.

आपल्या घरातील लहान मुले अनेक प्रश्न विचारीत असतात. आपण त्यांच्या प्रश्नांना कशीतरी, काहीतरी उत्तरे देतो. म्हणजेच त्यांच्यातील कुतूहल बुद्धीसोबत मनात उदित होणाऱ्या प्रश्नांनाही मारतो. तरीही त्यांचे प्रश्न विचारणे थांबते काय? नाही ना! मग जी गोष्ट थांबवता येणार नाही, ती थांबवण्याचा प्रयत्न माणूस करतोच का? ज्या समाजाच्या मनात आपणच निर्माण केलेल्या व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण होत नाहीत, तो देश प्रगतीचे, परिवर्तनाचे कोणतेही परगणे निर्माण करू शकत नाही. खरंतर माणूस प्रश्नांशिवाय जगूच शकत नाहीत. समजा माणसासमोर प्रश्नच नसते तर... मी हे लिहू तरी शकलो असतो का? माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला, हे असेच का घडत आहे? माणसाच्या जीवनात अनेक व्यवधाने आहेत. त्यांचे निराकरण करावे लागते. ते व्हावे कसे? हाही प्रश्नच आहे. चंद्र, सूर्य, तारे हजारो वर्षापासून आपले विहित काम नित्यनेमाने करीत आहेत. ऋतू कूस बदलून येत आहेत. जात आहेत. पुन्हा फिरून नियत वेळेवर येत आहेत. निसर्गात पावलोपावली आनंद भरून वाहतो आहे. आपल्या समोरील अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत. कदाचित हे सगळं वाचताना तुम्हाला वाटत असेल, हा माणूस लिहितो काय आहे? लिहितो का आहे? आणि यालाच प्रश्न का पडतायेत? याला काही काम दिसत नाहीये. बघा, तुम्हीही नकळत प्रश्नांच्या संगतीत उभे राहिलातच ना! आत्ता मला सांगा, माणसांच्या जीवनातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?

0 comments:

Post a Comment