परिस्थितीच्या प्रांगणी

By
निसर्गाच्या प्रकोपासमोर क्षतविक्षत होताना माणसाला आपल्या वकुबाचा प्रत्यय येतो तेव्हा वास्तव अन् कल्पितातले अंतर त्याला कळते. एका लहानशा आघाताने माणूस असल्याचा सारा आविर्भाव गळून पडतो अन् तो अधिकच खुजा होत जातो. माजाचे एकेक मजले मातीशी मिळताना सपाट होत जातो. आकांक्षांचे अगणित तुकडे होतांना एकटा होत जातो. ध्वस्त होत जातो तसा त्याच्या ज्ञानाने, अभ्यासाने आत्मसात केलेल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर वाटू लागतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत जाणं अनुभवतो, तसा तो विखरत जातो. विखरत जातो तेवढा अधिक सश्रद्ध होत जातो. फरक एवढाच असतो की, काही दैवावर सगळा भार टाकून निष्क्रिय प्रारब्धवाद कुरवाळत राहतात. काही पुढयात पसरलेली शक्यतांची क्षितिजे पाहतात. तेथे नेणाऱ्या वाटा निरखत राहतात. त्या परगण्यात पोहोचवणाऱ्या पथावरून प्रवास करताना ऊर्जास्त्रोतांचा शोध घेत राहतात. काही परिस्थितीच्या पुढ्यात पदर पसरून उद्धारकर्त्या प्रेषिताची प्रतीक्षा करतात. काही परिस्थितीच्याच पदरी पर्याय पेरतात.

आपल्या गती-प्रगतीचे आपण कितीही नगारे बडवले, तरी निसर्गाच्या एका आघाताने हाती शून्य उरतं. या वास्तवाचं विस्मरण होणं विकल्प नाही होऊ शकत. हाती शेष असणाऱ्या शून्याचं भान असलं की, आयुष्याचे अन्वयार्थ कोशात नाही शोधायला लागत. ते आपल्या जगण्यात दिसतात अन् असण्यात सापडतात. संकटे समोर ठाकली की प्रार्थना विचारांना अधिक कणखर अन् मनाला प्रबळ बनवतील कदाचित. पण पूर्ण पर्याय नाही होऊ शकत. सम्यक पर्याय शोधावे लागतात अन् निवडावेही. श्रद्धेतून गवसला एखादा कवडसा तर तो परिस्थितीचा परिपाक असू शकतो. श्रद्धेचं पाथेय सोबत घेऊन परिस्थितीच्या प्रांगणी प्रयत्नांचं दान पेरता येत असेल तर त्या इतके गोमटे काही नाही. पण खरं हे आहे की, आपत्तीला सामोरे जाणाऱ्यांना पर्याय शोधावे लागतात. देव, दैव स्तब्ध होतात, प्रार्थनास्थळे मूक होतात, तेव्हा तेथल्या मौनाची भाषांतरे करता यायला हवी. मौनाची भाषा कळते, त्यांना श्रद्धेचे अर्थ अवगत असतात. 

आघात अनाकलनीय असले की, सगळ्याच कृतींमध्ये साचलेपण सामावतं. हतबल झालेली माणसे, गलितगात्र झालेली प्रज्ञा पर्याप्त पर्याय तयार करू शकत नाही. हतबुद्ध शास्त्र आयुष्याच्या चौकटींना वेढून असणाऱ्या रेषा सुरक्षित राखू शकत नाही, तेव्हा माणूस अधिक अगतिक बनत जाऊन अज्ञात शक्तीच्या कृपेची कांक्षा करू लागतो. दोलायमान जगण्यात अपघाताने असेल अथवा योगायोगाने कुण्यातरी अनामिक शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो अन् आस्था अधिक गहिऱ्या होऊ लागतात. संसाराची सूत्रे कोण्या अज्ञाताच्या हाताची किमया असल्याचं वाटू लागतं. आधीच यकश्चित असलेला माणूस संयमाच्या सूत्रातून सुटत जातो अन् अंतरी अधिवास करून असलेल्या श्रद्धा अधिक घट्ट होत जातात. असं असू नये असं अजिबात नाही. पण एक खरंय की, त्यांचं असणं डोळस असलं की, आयुष्याला सूर गवसतो अन् जगण्याला गाणं. विचारांना ताल सापडला की, जगण्याचा तोल सावरता येतो. विवेक विराम घेतो, तेव्हा विचार पोरके होतात. विचारांचं पोरकेपण माणसाला एकटं करत जातं अन् एकटा माणूस सुटत जातो आपल्या मुळांपासून.

दुःख, संकटे, आजार आपल्या पावलांनी चालत अंगणी येऊन उभी राहतात. यांना काही कोणी सस्नेह आवतन देत नाही. ते झेलण्याची एक सीमा असते अन् पेलण्याची एक मर्यादा. त्याचं असणं असह्य झालं की, कुण्या अज्ञाताचा अदृश्य हात आपल्याला आठवायला लागतो. कुठलेतरी नवस-सायास केले जातात. अनामिक शक्तीला अवागहन केलं जातं. तिच्या कृपाकटाक्षाची कामना केली जाते. अशावेळी ज्याला जसे सुचेल ते आणि तसं करीत असतो. माणसाच्या मर्यादा माणसाला केवळ सीमांकितच नाही तर अगतिकही करत जातात. अगतिकतेचे अध्याय वेगाने आयुष्याला वेढू लागले की, गतीच्या व्याख्या अधिक अवघड होऊ लागतात. गती हरवली की, प्रगतीच्या परिभाषा सोयीचे कोपरे शोधतात.  

श्रद्धा जगण्याचे पाथेय असते. त्यात तसूभरही वावगं नाही. इहतली अधिवास करणारा प्रत्येक जीव कोणत्यातरी श्रद्धेवर जगतो आहे. श्रद्धा कशावर असावी याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. काही गोष्टी स्वाभाविकपण सोबत घेऊन येतात. एखादी गोष्ट आहे म्हणून त्याचे अगणित फायदे असतात आणि नाही म्हणून प्रचंड नुकसान असतं, असं नाही. तो प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो. प्रश्न श्रद्धेचा आहे. संकटांचा हात धरून येणाऱ्या अंधश्रद्धांचा नाही. डोळ्यांना केवळ आसपासचा आसमंतच दिसायला नको. अंतर्यामी असलेला कणभर कवडसाही पाहता यावा. याचा अर्थ असाही नाही की, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं सम्यक आकलन सहजपणे होतं. समजुतीच्या धूसर पटलाआड दडलेलं काही असलं की, धुकं निवळण्याची प्रतीक्षा करावी लागते. वास्तवाकडे डोळसपणे बघण्याची नजर असते, त्यांना परिस्थिती परिवर्तनाच्या परिभाषा समजून घेण्यासाठी कोश शोधायला नाही लागत, फक्त आपल्या कोशातून बाहेर पडायला लागतं. कोशांची कुंपणे पार करता आली की, विस्ताराच्या व्याख्या अन् त्याचे परिघही समजायला लागतात, नाही का?  
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: