Chaukatitil Vartulat | चौकटीतील वर्तुळात

By // 9 comments:
शाळेला दिवाळीच्या सुट्या असल्याने गावी गेलो. घरी थोडं थांबून निघालो पाराकडे. गावातल्या घरी आलो की पाराकडे फिरून यायची माझी सवय तशी जुनीच. गावात आपलं सहजच फिरून आलं की कळतंय कोण आलं, कोण गेलं. सोबत आणखी इतर गोष्टीही कळतात. गावातली माणसं आपलीच असली, तरी यानिमित्ताने त्यांच्यासोबत घडणाऱ्या संवादाचे चार शब्द मनास नवी ऊर्जा देऊन जातात. कोणाचं सुख, कोणाचं दुःख, कोणा घरातली लग्नकार्ये, शेतशिवार, गुरंवासरं, देव, धर्म, परंपरा, नवससायास, यात्रा-जत्रा, परिसर काय काय विषय कळत-नकळत कळतात. ओळखीच्या माणसांचे आपलेपणातून प्रकटणारे शब्द भूतकाळ जागा करतात. स्मृतींचे आभाळ सोबत घेत मन पंख पसरून पिंगा घालत राहते. गावात नसतील सगळीच नाती रक्ताची. पण मानलेली, निर्माण केलेली आणि जाणीवपूर्वक जोपासलेली ही नाती आपलेपणाच्या रेशमी धाग्यांची वीण घट्ट करत राहतात. नात्यांचा गोफ विणला जातो. गावात फिरताना घडणाऱ्या अशा भटक्या संवादाला गगनभरल्या आठवणींचे कोंदण लाभते. भूत, वर्तमान आणि भविष्य येथे येऊन विसावतात. अशावेळी संवादाचे शब्द नुसते शब्द न राहता मन आणि भावनांना सांधणारे साकव होतात.

आजही गल्लीतून पाराकडे चालत निघालो होतो. पाठीमागून आवाज आला. “मास्तर! वो मास्तर!” मागे वळून पाहिले लहानपणापासून संगतीने राहणारा मित्र आवाज देत होता. आमचं शिक्षण पूर्ण झालं. लहानपणही संपलं. तसं पोटापाण्याच्या प्रश्नांना सोबत घेऊन कोण कुठे, कोण कुठे गेलं. विसावले तेथेच आपलं लहान-मोठं घरटं तयार केलं आणि रमले तिकडेच. सुट्या, सणावाराच्या निमित्ताने गावी जाणे घडते तेव्हा भेटतात सगळे. काही जणं राहिले गावाकडेच. हा सध्या गावातच बऱ्यापैकी शेती करतो. शालेय शिक्षणाच्या पुढे या गड्याची मजल गेलीच नाही. शाळा याच्या जीवनातला सगळ्यात अप्रिय अध्याय. जितक्या सहजपणे शाळा टाळता येईल तितकी टाळणारा; पण शेत-शिवारात तितका सहज रमणारा हा जीव. शाळेत शिक्षणातले शिकवलेले प्रयोग सोडून बाकी सगळे प्रयोग करणारा. शाळेच्या गणितातल्या शून्यात आपली शैक्षणिक प्रगती शोधणारा; पण शेतात मात्र शून्यातून विश्व उभं करू पाहणारा हा हिकमती गडी. “काय रे! काय करतोयेस असा इकडे? आणि आज शेतात नाही गेलास?” माझे प्रश्नांचे वाढणारे शेपूट पकडून मला थांबवत म्हणाला, “गुरुजी, सुट्या काय तुम्ही लोकांनीच घ्यायच्या असा काही नियम सरकारने केला काय? आम्ही शेतकऱ्याने घेऊ नये असे ठरवले की काय तुम्ही!” म्हणून हसत राहिला. “वो साहेब, तसं नाही. पण जेव्हा बघावं तेव्हा तुझा देह शेतातल्या झोपडीत पहुडलेला असतो. शेत-शिवार हेच तुझं जगणं. तेथे तू रमलेला. शेतात कामं करताना तुझी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. असलंच काही महत्त्वाचं काम तरच तुला गावाचा रस्ता दिसतो, म्हणून म्हणालो.” माझं बोलणं तो ऐकत राहिला. पुढे काय बोलावे म्हणून मनातल्या मनात वाक्यांची, शब्दांची जुळवाजुळव करीत राहिला.

एक मोठा पॉझ घेऊन शून्यात हरवल्यासारखं म्हणाला, “आता शेतात काय राहिलंय! होतं नव्हतं ते निसर्गाने एक फटक्यात संपवलं. उरल्या कोरड्या वेदना आणि हरवलेल्या संवेदना. आज उगीचंच वाटतं शाळेत असताना दिलं असतं शिकण्याकडे लक्ष अन् मेहनत घेऊन केला असता थोडा अभ्यास तुझ्यासोबत तर... ते जाऊ दे! ते काही आता शक्य नाही. पण एवढं सगळं करूनही शेतात टिकून राहण्याचा मोह निर्माण करणारं काही दिसायला तर हवं. अरे, जेथे शेत-शिवारासोबत जगण्याचे रस्ते सापडत होते. जीवनाची उमेद जागत होती. डोळ्यात स्वप्ने रुजत होती, तीच सगळी करपली बघ. मग शेतात राहून तरी काय करू? मातीची कोरडी ढेकळे पाहत बसू का? त्यापेक्षा गावात, माणसांत थांबून जिवाला होणाऱ्या जखमांचा थोडातरी विसर पडतो. राहतो आता गावात दुःखाच्या कहाण्या ऐकत. येथे प्रत्येकाचं जगणं सारखंच. कोणी शेट नाही आणि कोणी सावकार नाही. सगळेच भणंग बसतो असे पारावर एकत्र येऊन एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालत. आमचं दुखणं ऐकून या पारावरच्या मंदिरातला मारुतीही कंटाळला असेल. कदाचित त्याला आपण ब्रम्हचारी असल्याचा आनंदच होत असेल. नको संसार आणि नको ते रोजचं मरणं. त्यापेक्षा असाच राहिलो तेच बरं म्हणून सुखावत असेल बिचारा. कसल्या कसल्या गोष्टींना सांभाळणार आहोत. सगळं आभाळच फाटलंय कुठं कुठं टाका घालायचा. म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे. आमचं मरणं रोजचंच आहे.” आपण काय बोलतोय आणि असे का, याची कदाचित त्याला जाणीव झाली असावी, म्हणून तो शांत बसला. मलाही पुढे काय बोलावे काही सुचेना.

याच्याशी बोलून आपण उगीचंच जखमेवरची खपली काढली असे वाटायला लागले. म्हणून मनात दाटून आलेला अपराधभाव चेहऱ्यावर दिसू न देता विषयाला दुसऱ्या रस्त्याने वळवले. इकडच्या-तिकडच्या गोष्टींवर बोलत राहिलो, ऐकत राहिलो. पश्चिम क्षितिजावरून सायंकाळ धरतीवर उतरायला लागली. रानात चरायला गेलेली गुरंढोरं परतायला लागली. त्यांच्या हंबरण्याने वातावरणात एक आतूर थरथर उभी राहिली. गोठ्याकडे परतणाऱ्या गायीवासरांच्या पायांनी उडालेल्या धुळीने मरगळलेल्या परिसरात उत्साह संचारला. सूर्य मावळतीच्या वाटेने निघून अंधार हलक्या पावलांनी दबकत दबकत गावाकडे चालत आला. दिवेलागणीला घरी आलो. तशी आई ओरडलीच, “आल्या आल्या गेलास ना गावात उंडारायला. लहानपणाच्या सवयी अजून काही जात नाहीयेत तुझ्या.” तिचं बोलणं मधेच थांबवत म्हणालो, “अगं, उगचं बरं वाटतं मनाला गावात गेलो की. म्हणून आलो थोडा फिरून. कळतं काही नवंजुनं. भेटतात मित्र. त्यांच्याशी बोललो की, मनात लपलेलं आठवणींचं गाव जागं होतं.” माझ्या बोलण्याचा अर्थ नीट न समजल्याने माझ्याकडे विस्मयाने बघत आई म्हणाली, “असं कोड्यात काय बोलतोस? मला काय समजतं अडाणी बाईला तुमचं हे असं बोलणं! आणि गाव काय जागं होईल? सगळेच झोपलेत. केला घात पाण्यापावसानं आणि देवानंही. हाती नाही नाना (पैसा) आणि तोंड किलावना (केविलवाणे) अशी परिस्थिती झाली आहे सगळ्यांची. काय करतील माणसे? आहेत बिचारी अशीच पडलेली. आहेत तेथेच रखडलेली. जातील कुठे? जगतायेत कशीतरी रडत कुढत.” आईच्या शब्दांतून गावातील माणसांच्या जगण्याचं दुःख वेदना बनून निथळत होतं.

आमचं बोलणं सुरु असताना लहान भाऊ शेतातून परत आला. केव्हा आलास म्हणून विचारले. मोरीकडे जाऊन हातपाय धुवून आला आणि शेजारी येऊन बसला. शेतात काय कामं सुरु आहेत म्हणून विचारलं. कापूस काढून गहू पेरण्याची तयारी सुरु असल्याचं म्हणाला. बोलता बोलता विषय कापसावर येऊन पोहचला. सहज म्हणून त्याला विचारले, “कापूस किती आला रे या वर्षी? काही ठोक रकम जमते का नाही. की परत आपलं तसंच गेल्या सालसारखं. हाती भोपळा!” समोरील भिंतीकडे हात दाखवत म्हणाला, “मोज त्या भिंतीवरच्या ओढलेल्या रेघोट्या. जेवढ्या आहेत तेवढा विकला. भाव काय म्हणून विचारत असशील तर आपलं तसंच पहिले पाढे जशेच्या तसे.” आमच्याकडे व्यापाऱ्याला कापूस विकताना एक तोल चाळीस किलोचा करून मोजला जातो. याप्रमाणे एकेक रेघ ओढत पाचपाच रेषांचा एक गट करून पाच रेघा म्हणजे दोन क्विंटल, असं साधं गणित घेऊन शेतकरी आपला कापूस बहुदा घरीच विकतो. दोन पैसे व्यापाऱ्याने कमी दिले म्हणून मनाला काही वाटून नाही घेत, कारण फेडरेशनमध्ये जाऊन कापूस विकण्याचा त्याचा अनुभव त्याला बरंच काही शिकवून गेलेला असतो. त्या शहाणपणातून आलेला त्याचा स्वतःचा एक अनुभव असतो. कापूस खरेदी केंद्रावरील सोपस्कार पार पाडून जीव टांगणीला लावण्यापेक्षा येथेच थोड्या मोलभावात मेलेलं चांगलं, असं त्याला वाटतं. भिंतीवर ओढलेल्या रेषा मोजून म्हणालो, “बस, एवढाच! काय प्रकार आहे हा? जरा लक्ष द्यारे शेताकडे. अरे, याच शेतात एकेकाळी शे-सव्वाशे मण कापूस घेत होतो आपण. आणि आत्ता हे चित्र.” घरात मी मोठा असल्याने मोठेपणाचा फायदा घेत अधिकारवाणीने लागलो उपदेश करायला. तो, आई, आणखी एक लहान भाऊ माझं म्हणणं ऐकत होते. जरा नीट लक्ष द्या. हे असंच सुरु राहिलं तर कसं करणार आहात पुढे? ही काही लक्षणं नाहीत खऱ्या शेतकऱ्याची वगैरे वगैरे काही सांगत राहिलो.

माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, “भाऊ, जी दयस तिलेच कयस, बाकी काय गोंडा घोयस. तुमचं नोकरी करणं आणि आमचं शेती करणं कसं सारखं असेल रे! आम्हाला काय हौस आहे का कमी पिकवायची. देवच (तिला निसर्ग म्हणायचे असते) साथ देत नाही. तुमची ही बायजाबाई (लाईट) तर तासनतास बघायला मिळत नाही आम्हाला. मिळते सात-आठ तास, तिच्यात काय होते. हे सगळं कमी का काय म्हणून आमच्या घरात पिकं आली की, लागले तुमचे भाव खाली उतरायला. कसं होईल मग.” शेतात राबण्याच्या तिच्या उभ्या हयातीतील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा सारा अनुभव सोबत घेऊन ती बोलत राहिली. मनातली सल शब्द बनून प्रकटत होती. कोणी काही बोललं नाही. थोडावेळ लांबलेली शांतता. त्या शांततेला छेद देत मीच बोललो, “शेती करायची पद्धत बदला. एकच एक पीक घेताच कशाला? वापरा ना शेती करण्याचं नवं तंत्र. आधुनिक पद्धतीची शेती करा ना! फळं, फुलं, भाजीपाला अशी काहीतरी. सोबतीला कोंबड्या, शेळ्या, गायीम्हशी पाळा. काय ऊस आणि कापूस एकचएक घेऊन बसलात!” माझ्याकडे मिश्कील नजरेने पाहत लहान भाऊ म्हणतो, “आपल्या शेतातील पपई पाहिलीस ना! अरे, ढोर मेहनत करून राबराब राबून पिकवली. आलीही बदाबदा, पण भाव काय? दोन रुपये किलो. याआधी गंगाफळं लावली, त्यांचंही असंच. लाईट वेळेवर नसायची पिकाला पाणी द्यायचे वांधे. गेलं सगळं करपून. कांदा लावला गोण्या भरून भरून पडला. आज भाव मिळेल, उद्या मिळेल वाट पाहून कंटाळलो, सडून फेकण्यापेक्षा विकला मिळेल त्या मोलभावात. आज तुम्ही तोच कांदा काय भावाने घेता आहात? भाऊ, कितीही केलं, मरमर मरलो तरी शेतकऱ्याचं मरणं ठरलेलं. कधी देवानं मारायचं, कधी माणसांनं! शेवटी मरतो शेतकरीच ना!”

माझ्याकडे पाहत मधला भाऊ म्हणाला, “आम्हालाही वाटतं सगळं कसं व्यवस्थित करावं. पण प्रयोग करायला आहेच अशी किती जमीन आपल्याकडे? या चार तुकड्यात काय प्रयोग करायचे? हे प्रयोगाचे खेळ करायला पुरेशी जमीन तर हाती असायला हवी ना! की नुसता जुगारच खेळायचा? ज्यांच्याकडे कुठे असेल, ते करतात काय काय प्रयोग. पण म्हणून आम्ही काहीच करीत नाहीत का? आम्ही आपलं सगळं व्यवस्थित करावं; पण परिस्थितीच साथ देत नाही. सगळीकडून मार खातोय. तुम्ही रोज पेपरात वाचतात ना अमक्या-तमक्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे. ते काय सगळे वेडे होते का मरणारे? अरे, बापजाद्यांपासून शेतकरी आहेत ते! त्यांना काय शेती शिकवणार तुमचं शिक्षण? सगळे रस्ते बंद झाले की, माणसं काय करतील मग. जगणं ओझं झालं की जातो तो जिवानिशी, मागे राहिलेल्यांच्या जिवाला घोर. त्यांचं जगणं त्यांनाच शाप वाटायला लागतो. तीस-चाळीस हजारासाठी बँक, पतपेढ्या जप्त्या आणतात यांच्या घरावर. शेतातल्या पाण्याच्या मोटारीचं वीजबिल थकलं म्हणून कनेक्शन कापलं जातं. सावकारकडून काही कर्ज घेतलं असेल तर गावात फिरताना तोंड लपवत फिरतो. असा चारचौघात अपमान. घर चालवणं मुश्कील. पैसा हाती यायचं नावं घेत नाही. घरसंसार, लेकरंबाळं यांचा मोह त्याला नसतो? त्याला काय सुखी संसाराची स्वप्ने पाहता येत नसतात का? पण परिस्थितीच चहूबाजूने अशी भक्कम घेरते की, गुंत्यातून कितीही सुटायचा प्रयत्न केला तरी नाही सुटत. जगणं कोंडी करतं. नाही काही मार्ग सापडत, मग संपतं सगळचं.” बोलता बोलता तो थांबला.

मी काही बोलायची आवश्यकताच नव्हती. पुस्तकी शिक्षणातून कमावलेलं माझं लेखी शहाणपण वाचलेल्या थेअरीमधे अडकलेले. ते सांगून समोरील प्रश्न थोडीच सुटणार होते. प्रॅक्टिकल जगून हाती आलेल्या निष्कर्षावर हे सगळे बोलत होते. उक्ती आणि कृती यात अंतर असतं. माणूस तरी काय करणार. राजाने छळलं, पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर दाद कोणाकडे मागणार? व्यवस्थेने निर्माण केलेल्या चौकटीत आपलं एक वर्तुळ आखून त्याच्या परिघात ही माणसं फिरत आहेत. हा परिघ हीच त्यांची नियती झाली आहे. चौकटीतल्या सीमांकित वर्तुळात साकारणारी जीवनाची आकृती यांचे प्राक्तन बनले आहे. कारण नसता यांचा धीर खचू नये म्हणून म्हणालो, “असू द्या, आज नाही निदान येणाऱ्या पुढच्या हंगामात परिस्थिती पालटेल.” माझं वाक्य पूर्ण करीत आई म्हणाली, “उकिरड्यालाही देव पावतो एक दिवस. फिटतील अंधाराचेही पांग. दुःखाचे दिवस काही कायमच मुक्कामाला राहत नाहीत घरी. अरे, आम्हाला तरी एवढं दिसतंय. बाकीच्यांचं काय? ज्याला काहीच नाही. देवच त्यांचा आधार बनेल. येईल सुख दारी फिरून एकदा पुन्हा. आमचं आणि तुमचं सुख जरी वेगळं असलं तरी सुख ते सुखच.”

बोलता बोलता बराच उशीर झाला. उशिरा जेवणं आमच्या खेड्यातील घरांच्या वहिवाटीत नाही बसत. अंधारायच्या आधी जेवणारे हे सगळे. तसाही रोजच अंधार सोबतीला घेऊन जगतायेत. लाईट नाही म्हणून चिमणी, कंदिल लावून आहे त्या उजेडात जेवण करणं घडतं. आम्हा शहरी माणसांना कॅण्डललाईट जेवणाचं केवढं अप्रूप. त्यासाठी वेगळे पैसे मोजून हॉटेलमध्ये मेणबत्या पेटवून त्यांच्या मंद प्रकाशात जेवायला बसतो आम्ही. यांच्यासाठी रोजचंच कंदीललाईट जेवण, तेही सक्तीचं. त्यात कसल्या आल्यात एक्सायटिंग वगैरे अशा फिलिंग्ज आणि कसला आलाय रोमॅन्टिक मूड. ही कौतुकं आमची, शहरी सुखात रमणाऱ्यांची. आईसोबत जेवायला बसलो. शेजारी दोघं भाऊ बसले. आई भाजी-भाकरी वाढत होती. स्वतःच्या हाताने भाकरीचा काला मोडून देत होती. अजूनही लहानपणातल्या मला सांभाळत होती. कितीतरी दिवसातून चुलीवर तयार केलेल्या आईच्या हातच्या भाजी-भाकारीचे साधेसे, पण आपली एक खास चव असणारं जेवण करीत होतो. दोन घास जास्तच जेवलो.

जेवण उरकून ओसरीवर पसरलेल्या वळकटीवर पडलो. इकडचं-तिकडचं बोलणं सुरु होतं. भावकीतले, शेजारचे काही मित्र येऊन बसले. गप्पांना पुन्हा रंग यायला लागला. लाईटने नेहमीप्रमाणे डोळे मिटले. कंदील, चिमण्या पेटल्या. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात हलणाऱ्या सावल्या पाहत बराच वेळ बोलणं सुरु होतं. एकेक जुन्या आठवणींना जाग येत होती. एव्हाना बाहेर ओसरीवर वळकटी पसरून, गल्लीत खाटा टाकून पडलेली, थकलेली माणसं निद्रेच्या कुशीत शिरली. निबिड अंधाराची चादर गावाने आपल्या अंगावर ओढून घेतलेली. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या जिवांच्या डोळ्यात झोप उतरायला लागली. उद्या शेतात कामं असल्याने लवकर झोपावं म्हणून गप्पांमधून एकेक करत मंडळी निरोप घेऊन घरी निघाली. माझ्याही डोळ्यात झोप यायला लागली. वळकटीवर अंग टाकून पडलो. अंधारासोबत सगळीकडे शांतता पसरलेली. रातकिड्यांच्या आवाजाची पट्टी वाढलेली. अकरा-बारा वाजले तरी गावातील मंदिरात भजन सुरुच. भजनांचा सूर चांगलाच लागलेला. आपलं दुःख विसरून भक्तिरसात लीन झालेली माणसं सुरांमध्ये तल्लीन झालेली. संगीताचं, सुरांचं कुठलही शास्त्रोक्त ज्ञान नसलं तरी मनापासून गात होती. तेवढाच त्यांच्या जिवाला विरंगुळा वाटत असेल. सश्रद्ध अंतःकरणातून निर्माण झालेल्या विश्वासाचे पाथेय सोबत घेऊन ही माणसं आपल्या जगण्याचा अंधारा कोपरा उजळवू पाहत होती. पडल्यापडल्या भजनातील शब्द कानावर येत होते, ‘विठू माउली, तू माउली जगाची.’ उगीच मनाला वाटले, खरंच यांची ही माउली यांना सांभाळेल का?