पावलापुरता प्रकाश

By // No comments:
गती, प्रगती अन् अधोगती हे प्रास साधणारे शब्द. कुठल्याशा वाक्यात टाकले की, देखणे वगैरे वाटतात. पण हेच शब्द आयुष्यात आले की, त्यांचे अर्थ बदलतात. ते समजून घेण्यासाठी अन्वयार्थ लावावे लागतात. परत परत पाहावे लागतात. पारखावे लागतात. आयुष्याच्या व्याख्या ज्याने त्याने आपापल्यापरीने करून ठेवलेल्या असल्या, तरी त्या पर्याप्त असतीलच असं नाही. प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. कोण कोणत्या कोनातून त्या कोपऱ्यांकडे बघतो, यावर ते ठरत असतं. नजरेस पडणारे त्याचे कंगोरे निराळे असतात. जगणं समजून घेण्याच्या सगळ्याच व्याख्या काही सारख्या नसतात. म्हणून त्यांचे अर्थ तपासून पाहू नये असंही नसतं काही. ज्याला आयुष्याकडे  डोळसपणे पाहता येतं, त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. नजरेचा कोन थोडा अलीकडे पलीकडे करून पाहिलं तरी प्रमुदित जगण्याची अनेक प्रयोजने अन् आनंदाची अनेक अभिधाने आपल्या आसपास गवसतील. पण त्यासाठी काय पाहावं, हे कळायला हवं. 

गतीप्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणं आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. तो समजून घेण्यासाठी नजरेला क्षितिजाचा वेध घेता यावा. डोळ्यात सामावणारे क्षितिज अन् मनात कोरलेले क्षितिज सारखे असले की, विस्ताराच्या परिभाषा कळतात. त्यांची प्रयोजने समजली की, परिमाणे परिणत होत जातात अन् परिघांच्या सीमा विस्तीर्ण शब्दाशी सलगी करू लागतात.

आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा अनवरत वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपण कोरलं असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. आपणच आपल्याला ओळखण्याचा सराव असायला लागतो. ‘मी’ कळला त्याला ‘आपण’ शब्दाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदता असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. सौंदर्याला परिभाषा असतीलही, पण भविष्यातील परिणामांचा विचार करून त्याला परिमाणे द्यावी लागतात.

अनेक चौकटी असतात आसपास. काही दृश्य काही अदृश्य एवढाच काय तो फरक असतो त्यात. त्या सगळ्याच काही आपण तयार केलेल्या नसतात पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे त्यावर मान्यतेची मोहर अंकित केलेली असते. चौकटी जगणं देखणं करणाऱ्या असतील तर बंधने नाही होत. पण कुंपणांचा काच होऊ लागला की, विस्ताराचे परीघ आक्रसत जातात. कुंपणे पार करणं परीक्षा असते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतात असं नाही. आपला आपण शोध घेण्यासाठी आयुष्याचे एकेक अध्याय अभ्यासावे लागतात, तपासून पाहावे लागतात. कालबाह्य अक्षरे काढून कालसंगत विचार कोरावे लागतात. आयुष्याला सीमांकित करणारी समीकरणे काढून नवी गणिते आणावी लागतात. सोडवावी लागतात. त्यासाठी सूत्रे शोधावी लागतात. 

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. नाहीच सापडली काही उत्तरे म्हणून विकल होऊन पलायनाचा पथ नाही धरता येत. असतील अन्य पर्याय आसपास कुठे तर तेही पडताळून पाहावे लागतात. प्रयासाने पदरी पडलेल्या समाधानाला पर्याय नसतो. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. 

पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच. ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. 

विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

विवेक हरवलेलं विश्व

By // No comments:
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. 

रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात. जगण्यावर चढलेला स्वभिमानाचा रंग अन् आयुष्याला लागलेला मिंधेपणाचा रंग सारखा कसा असेल? खरं हेही आहे की, लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, सगळेच रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की, जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं कोणतंही अप्रूप नाही उरत. मिंधेपणाचा रंग एकदाका जगण्यावर चढला की, विचारांचं नानाविध रंगात न्हाऊन निघणं थांबतं अन् माखल्या रंगांना देखणे करण्याच्या कवायतीत मूळचं सौंदर्य करपतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विकारांचं विश्व विस्तारू लागलं की, स्वाभिमानाच्या व्याख्या बदलतात. मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं.
 
याचक बनून पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही ते मळले असतील. पण कणा आबाधित नसला की, असे विचार केवळ सांगण्यापुरते उरतात. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो आणि माणसं आपल्या अस्मिता. अविवेकाच्या वाती उजळू लागल्या की, अस्मितेचे रंग विटू लागतात. अंधाराला बरकत आली की, उजेडाचे सगळे संभार संपतात. अहंपणाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असण्याचे संदर्भ साखळीतून सुटतात. सन्मानाचा कणा अन् जगण्याचा बाणा उसवतो. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही.

व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती संख्येने नगण्य असतील. काळाच्या कोणत्याही तुकड्यात शोधून पाहिलं तरी त्यांची वानवा असलेलंच दिसेल. गढूळलेला प्रवाह पुढे सरकत नाही तोपर्यंत नितळपणाच्या परिभाषा पाण्याच्या ललाटी पेरता नाही येत. त्याकरिता त्याला वाहते राहावे लागते. 

वाहता वाहता आरस्पानी होता येतं. फक्त मार्ग तेवढा गवसत राहावा. कणा असलेली माणसे संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. त्याकरिता आवतन नाही द्यायला लागत. हे भ्रमण अज्ञानाने घडत असेल अथवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय, पण सत्य आहे. 

विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, किंतु-परंतु अनेक सापडतील, वादही विपुल असतील. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद, वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. 

पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे उमेदीचे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणारे किती असतात? असं करणं सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

काळाचे खेळ

By // No comments:
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. 

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. त्याच्या गतीचे गोडवे गाता येतात म्हणून काही त्या आवेगाला माथ्यावर नाही धारण करता येत. एखादी गोष्ट डोळ्यांना देखणी दिसत असली तरी ती अनुभवणं प्रत्यक्षात तसं असेलच असंही नाही. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. 

काळाचे खेळ सुरू असतात अनवरत. आपल्याला वाटतं आपण परिस्थितीसोबत खेळतो आहोत. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. मूर्त-अमूर्त वगैरेच्या परिभाषा एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी असतीलही. या दोन मितींचा विचार करणे ठीकच, पण अनुभवणे ही आणखी तिसरी मिती असते. तिच्या बिंदूना सांधता येतं त्यांना शक्यतांचे अर्थ शोधावे नाही लागत.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच शेवाळल्या वाटांवरचा. आहे तेवढा अन् मिळाला तितका तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. अर्थात सगळेच सूर जुळून जगणं संगीत होतं असं नाही. आयुष्य सजवण्याचा उद्योग तर सारेच करतात, पण त्याला समाधानाची किनार फार थोड्यांना लावता येते. सगळ्यांनाच नाही जोडता येत धागे धागे. नाही टाकता येत योग्य टाके. काळच आयुष्याच्या पटावर कशिदाकाम करतो. त्याची नक्षी तेवढी निवडता यायला हवी. रेषा सगळीकडे सारख्याच दिसत असल्या, तरी त्यांना मनाजोगती वळणे देता येतात. वळणांचा वळसा समजला, त्याला आकाराचं अप्रूप नसतं. हव्या तशा आणि तेवढ्या आकृत्या त्याला साकारता येतात.

कोणी काळाच्या सूत्रांची प्रशंशा करतात. कोणी त्याच्या गतीचे गोडवे गातात. कोणी त्याने केलेल्या प्रगतीचे नगारे बडवतात. कोण आणखी काही काही. कोण कशाची महती मांडो, पण वास्तवात वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. त्या खुणांचे संकेत तेवढे समजून घेता यायला हवेत. ते आकळतात त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ समजून घेण्यासाठी कोशांतून अर्थ नाही शोधायला लागत. त्यांचं जगणंच ग्रंथ असतो, अनेक ज्ञातअज्ञात अध्यायांनी सजलेला. परिस्थिती पुढ्यात प्रसंग पेरत जाते. आयुष्याच्या पटावर तिने पेरलेले कोंब जतन करता यावेत अन् विकल्पांचं तण तेवढं वेळीच विलग करता यायला हवं. 

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला असतो. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य. बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं. पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रमादाच्या पथावर

By // No comments:
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या. निस्तेज चेहरा घेऊन उभ्या असलेल्या. उजळणारा दिवस कफल्लकपण घेऊन येणारा अन् मावळणारा पदरी कंगालपण पेरून जाणारा. भार पेलून पेलून खोडाचा थकलेला खांदा. तोही विसर्जनाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला. 

कंगाल होऊन गेल्यावर गतकाळातील ऐश्वर्य आठवणाऱ्या अगतिक माणसाला बहराचे अर्थ विचारा. केविलवाणे ऋतू त्याच्या डोळ्यात जमा होतात. त्यांचे हरवलेले अर्थ डबडबलेल्या पाण्यात शोधू पाहतो. पण आसपास अभावाचा अंधार अधिक गहिरा होत राहतो. बहराच्या मोसमाने कधीच निरोप घेतलेला असतो. एक उजाडपण नांदते असते तेथे. परिस्थितीने परिवर्तनाचे सगळे संदर्भ पध्दतशीरपणे पालटलेले असतात. प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. 

यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो. परिस्थितीच असं काही जाळं विणते की, कोणत्याही कोपऱ्यातून कुठलीही पायवाट दिसत नाही, ना कोणती पळवाट. ना कुठला कवडसा दिसतो आसपास असलेल्या अंधाराला छेदत प्रवासाची वाट दाखवणारा. काहींपासून पलायनाचा पर्याय असला तरी प्रत्येकवेळी तो पर्याप्त असेलच असंही नाही. 

पुढ्यात पडलेल्या परिस्थितीसोबत पळता येईलच असं नाही. कधी कधी परिस्थितीच माणसांची अशी काही कोंडी करते की, कुंपणांच्या पलीकडे आणखी एक जग आहे आणि तेथे अनेक शक्यता आहेत हेच आठवत नाही. आठवलं तरी अवलंब करायला मन धजत नाही. कच खाणे वगैरे असं काही म्हणतात, ते हेच. कुणी याला परिस्थितीशरण अगतिकता वगैरे म्हणतील. असेलही तसं, पण माणसांची खरी पारख होते पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांशी दोन हात करण्यात. मग माणूस म्हणून माणसाने माणसांच्या केलेल्या व्याख्या काही असूद्या.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. 

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो?

काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. ना कोणाचा सोयरा. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्या पावलांशी जुळवून घेता येतं त्यांना गतीच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा नाही समजून सांगायला लागत. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. खरं हेच आहे की, विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

सद्गुणांचं संचित

By // No comments:
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच. कारण परिपूर्ण शब्दाची पूर्ण परिभाषा अद्यापपर्यंत तरी तयार झालेली नाही. आहे असं कोणाला वाटत असेल, तर त्यात काही वावगं नाही. शोध जिवांची सहजवृत्ती असली, तरी काही उत्तरे शोधणं अवघड असतं. याचा अर्थ अगदीच अशक्य असतं असं नाही. त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे पर्याय सहज नसतात इतकंच. त्यातला हासुद्धा एक असावा. 

इतिहासाला निःसंदिग्धपणे प्रश्नांची उत्तरे देता यावीत म्हणून काही गोष्टी निसर्गाने जन्माला घातलेल्या असतात. अशी माणसेही त्यातील एक. ती असतात, नाही असं नाही. पण अपवाद म्हणूनच. अभावानेच ती आढळतात. बहुदा दुर्मिळच. म्हणूनच की काय सामान्यांना अशा असामान्य असणाऱ्यांचं अप्रूप वगैरे वाटत असेल का? खरंतर यातल्या एखाद्या गुणानेही सामान्यांच्या असण्याचे अर्थ अन् आयुष्याचे आयाम बदलू शकतात. एवढे गुण कुण्या एकाच व्यक्तीच्या ठायी असतील तर... पुरुषोत्तम वगैरे म्हणतात ते हेच असावं. अर्थात, असं काही होण्याचा मार्ग सगळ्यांना मोकळा असला, तरी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्यांना पोहचता येतंच असं नाही. म्हणून अशा असण्याचे अन्वयार्थ लावणं अवघड असतं.

प्रश्नांचा संग माणसांच्या जगण्यातून काही केल्या सुटत नाही अन् त्यांची उत्तरे शोधण्याची आस आयुष्यातून काही केल्या मिटत नाही, हेच खरं. काही उत्तरे सहज हाती लागतात. काही इकडेतिकडे धांडोळा घेतला की सापडतात. काहीं प्रश्नांची उत्तरे काळच देतो, तर काही काळाच्या उदरात सामावून नाहीसे होतात. समाजसंकेतांनी प्रमाणित केलेल्या वर्तनव्यवहारांच्या निकषांच्या मोजपट्टीत तंतोतंत सामावणारं कदाचित कुणी असेल अथवा नसेलही. संभवत: सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही. पुढ्यात पेरलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे काही सहज हाती लागत नसतात त्यातलं हे एक. काही उत्तरे अनुभवसिद्ध असतात. काळाची परिमाणे त्यांचे परिणाम तपासून पाहत असतात.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुगम, तेवढा अवघडसुद्धा. एकासाठी असणारा सद्गुण दुसऱ्यासाठी दुर्गुण ठरणारच नाही, असे नाही.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला माणूस म्हणून मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात.  लोभस रंगांची उधळण करीत पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. अर्थात, यासाठी माणूस शब्दाची व्याख्या माणसाला नीट कळायला हवी. स्वभावात असणारं उमदेपण स्वाभाविक असतं, ते विकत नाही मिळत किंवा उसनंही नाही आणता येत कुठून. माणूस म्हणून स्वतःची ओळख स्वतःलाच तयार करावी लागते. ती शोधयात्रा असते आपणच आपल्याला आणण्यासाठी केलेली. 

स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

परिमाणे: व्यवस्थेची अन् आयुष्याची

By // No comments:
जगणं देखणं अन् आयुष्य सुंदर वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली असली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं समजून घेता येतं, तसं नसणंही जाणून घेता येतं. असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावता येतात. तिच्या अभावाचे परिणाम पाहता येतात अन् प्रभावाची परिमाणे समजून घेता येतात. त्यांचे असणे आकळले की, आवश्यक आकारही देता येतात. तिला कोणत्या तरी रंगलेपनद्रव्यांनी सुशोभित, सुंदर वगैरे करायचं की, तिचा चेहरा आहे तसा राहू द्यायचा, हा त्या त्या प्रसंगी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो.
 
व्यवस्था नावाच्या व्यवहारात कितीतरी गोष्टी सामावून गेलेल्या असतात. कधी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे सरकत त्या निघून गेलेल्या असतात. काही कालोपघात नामशेष होतात. काही नव्याने येऊन मिळतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. नियंत्रणाचे बांध असतात. उभे केलेले बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. 

पायाला चाके बांधून काळ पुढे पळत असतो. ते त्याचं प्राक्तन असतं. असं असलं तरी एक वास्तव त्यापासून विलग नाही करता येत, ते म्हणजे त्याचा मार्ग एकेरी असतो. त्याला फक्त पुढे पळता येतं, मागे नाही वळता येत. ही त्याची मर्यादा असली, तरी अनेक गोष्टींना सरळ-वाकडी वळणे देण्याइतपत असलेला त्याचा वकूब अद्यापपर्यंत कोणालाही नाकारता नाही आला. व्यवस्थेने काही चौकटी निर्धारित करून घेतलेल्या असतात. त्यांच्या विस्ताराच्या सीमा असतात. व्यवस्थेने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. त्यांच्या थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा. 

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या आकारात कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा काय तो तोळामासा थोडाफार फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणं सगळीकडे सारखं. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत तर काही साचतात. इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीने आणि सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. त्यात अनेक वळणे असतात. काही वाटा असतात. उपलब्ध विकल्पांमधून योग्य पर्याय तेवढे अचूक निवडता यायला हवेत. 

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या परिमाणात स्वतःला ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात, व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत असे वाटत नाही. केवळ अन् केवळ व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? व्यवस्था सोयीसाठी असली तर समजून घेता येईल, संधी असली तर स्वीकारताही येईल; पण ती सर्वस्व होऊ लागली की, जगण्यातून सत्व हरवतं अन् सत्व हरवलेली माणसे स्वत्वाचे संदर्भ गमावून बसतात.

परंपरेचे किनारे धरून वाहताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. त्यांचे अर्थ शोधत अन् आयुष्याच्या पटावर पसरलेल्या पसाऱ्याचे अन्वयार्थ लावत जगण्याचा मागोवा घ्यावा लागतो. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
•  

वर्तन विपर्यास

By // No comments:
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी. त्यासाठी मुखवटे काढून चेहरा शोधावा लागतो. चेहरा असेल तसा सापडेलही एकवेळ, पण माणूस...? तो गवसेलच याची शाश्वती नाही देता येत.

पण तरीही एक मुद्दा शेष राहतो, तो म्हणजे माणूसपण सगळंच संपलं आहे असं सरसकट नाही म्हणता येत. पण आसपास सगळंच काही गोमटं आहे असंही नाही. हे सगळं निर्विवाद मान्य केलं, तरी एक वास्तव विसरता नाही येत की, माणूस माणसापासून सुटत अन् आपलेपणापासून तुटत चालला आहे. आसपास माणसं तर अनेक आहेत, पण गर्दीत केवळ आकृत्या दिसतात. चेहरे कधीच हरवले आहेत. 

अंतरी कोरलेल्या प्रतिमांना आकार देऊन माणूस नावाची आकृती माणूस उभी करू पाहतोय. खरं सांगायचं म्हणजे आभासी विश्वात आपलं ओंजळभर विश्व शोधू पाहतो आहे. ते हाती आहेही. पण सत्य अन् तथ्य यात अंतराय असतं, याचा विसर त्याला पडलाय. हाती लागलेल्या चतकोर विश्वाभोवती तो प्रदक्षिणा करतो आहे अन् त्यालाच प्रगती वगैरे समजतो आहे. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो, हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? 

रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. त्यातल्या सगळ्याच नाही अधोरेखित करता येत कुणाला अन् सगळ्यांचीच समर्पक उत्तरे नाही शोधता येत. खरं तर हेही आहे की, कुण्या एकाला जगाचं जगणं देखणं नाही करता येत. काळ कोणताही असो आसपास कुठेतरी, कोणावर तरी अन्याय होतच असतो. त्याचं प्रमाण कमी अधिक असलं म्हणून त्याच्या परिभाषा नाही बदलत. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. 

स्वतःला शोधण्यासाठी चौकटीनी निर्देशित केलेल्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी हात अगत्याने पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? अन्याय होतो आहे, म्हणून परिस्थितीला प्रश्न विचारून पाहतो का? निदान आपणच आपल्याला तरी विचारतो का? 

इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो! एकदोनदा नाही अनेकवेळा विचारतो. पण प्रत्येकवेळी ते कळतातच असं नाही. त्याची उत्तरे शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का? 

माणूस नावाच्या जिवाभोवती विपुल व्यवधाने आहेत. आयुष्यात अनेक गुंते आहेत. ते असतातच. त्यांना टाळून कुणालाही पुढे नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत. एकतर त्यांना सामोरे तरी जावे लागते, नाहीतर निराकरण तरी करावे लागते. पण, ते व्हावे कसे? हाही एक जटिल प्रश्नच आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••