कविता समजून घेताना भाग: छत्तीस

By // No comments:

देवा विठू तू सावळा

देवा विठू तू सावळा
माझा करपला मळा
तुझ्यासवे चंद्रभागा
माझा सुकलाय गळा

तुझा रांगोळीचा ओटा
माझा हंबरतो गोठा
पिलं झोपली उपाशी
पोटा घेऊन चिमटा

सुखी रखुमाई तुझी
सखी वादळात माझी
किती मोजू मी हुंदके
साद ऐक ना रे माझी

तुझी आनंदी पंढरी
शोकसभा माझ्या दारी
पाय थकले चालून
कशी करावी मी वारी?


- चंद्रकांत वानखेडे

काही नावांभोवती विस्मयाची वलये असतात, काहींभोवती कुतुहलाचे कंगोरे. काही नावे खरी असतात, काही कल्पित. पण काही नावांना अक्षय आशय प्राप्त झालेला असतो. अनेकांच्या अंतर्यामी ती अधिवास करून असतात. परिस्थितीच्या पथावरून प्रवास करताना अनेक गोष्टी बदलतात. पण काही अशा असतात, ज्यांना काळही कासरे लावून मर्यादांच्या कुंपणात नाही कोंडू शकत. काळाने कोरलेल्या कोणत्याही तुकड्यात शोधलं, तरी त्या नावाचा नाद अनाहत निनादत असतो. ‘विठ्ठल’ हे असंच एक नाव. या एका शब्दाभोवती अनेकांच्या आस्था जुळल्यायेत.

किती ऋतू आले अन् गेले, पण विठ्ठल नावाचा ऋतू अजूनही तसाच आहे. किती उन्हाळे सरकले, किती पावसाळे झरले असतील तरी हिरवाई घेऊन बहरतोच आहे. विठ्ठल केवळ दैवत नाही, तर दानवालाही देवत्त्वाच्या वाटेने वळता करणारा विचार आहे. वारी केवळ चार माणसांनी एकत्र येऊन पंढरीच्या वाटेने चालणे नाही. तो मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित आहे. भक्तीचा सहजोद्गार आहे. सद्विचारांचे पाथेय घेऊन भक्तांची मांदियाळी सहासातशे वर्षांपासून पंढरीच्या वाटेने धावते आहे. दिंडी घेऊन निघालेल्या भक्तांच्या पावलांनी वाटाही मोहरलेपण घेऊन फुलत राहतात. धावत्या पावलांच्या सोबतीने सजीव होतात. सुंदरतेचे साज लेवून सजतात. पंढरीच्या वाटेने धावणाऱ्या या सगळ्यांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस नशिबाने दिलेलं फाटकं जगणंही आपलं मानतो. उसवलेलं आयुष्य सोबत घेऊन; आहे त्यात सुख शोधत राहतो. ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने विठ्ठल भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. प्रवासात मिळेल तो घास-तुकडा खातो. सांज समयी आहे तेथे मुक्कामाला थांबतो. दिली कुणी ओसरी देह टेकवायला, तर तेथेच अंग टाकतो. नाहीच काही असले तर गावातल्या मंदिराचा ओटाही त्याला विश्रांतीसाठी पुरेसा असतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचलेला असतो.

पंढरपुरात कोणी कशासाठी जावं? हा प्रश्न तसा गौण. कुणाला आयुष्याची प्रयोजने सापडतात. कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आणखी काही. आपण आपल्याला शोधण्यासाठी जावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत, म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत, म्हणून माणूस बनून मिसळून जावं माणसांत. समूहात विसर्जित करून घ्यावं जतन करून ठेवलेलं आपलं वेगळेपण. आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी काय हवं, किती हवं, याच्या परिभाषा करता यायला हव्यात. आपण नेमकं काय शोधतो? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? शोध केवळ सुखांचाच असतो का? माहीत नाही. पण माणूस अवश्य शोधावा तेथून. समाधानही शोधता यायला हवं. त्यासाठी आयुष्याचे कोपरे सुखांनी भरलेले असावेतच असे नाही. अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते त्याच्यासाठी. कोणी म्हणतं हे सुखाचं सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. श्रद्धेचे तीर धरून वाहणारे भक्तीचे प्रवाह सरकत आहेत असेच अनेक वर्षांपासून. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या परिभाषेत. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच आपला विठोबा शोधावा. शेवटी विठ्ठल एक प्रतीक आपणच आपल्याला ओळखण्याचं. नाही का?

प्रत्येकाचा विठोबा वेगळा. आस्तिकांचा तो आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाकारला तर नाही. त्याचं असणं-नसणं तसं गौण. अध्यात्माने अधोरेखित केलेल्या अनुबंधातून त्याच्या असण्याचे अन्वयार्थ आकळतील, पण ऐहिक चौकटीच्या मापात त्याला बसवता येईलच असं नाही. त्याच्या निमित्ताने 'मी'पणाचा परीघ आकळत असेल, मनाला वेढून असलेल्या विकल्पांचा विस्तार सीमांकित होत असेल अन् अविचारांचे तणकट उपटून काढता येत असेल तर त्यात वावगं काय? मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. विठ्ठल आयुष्याला आयाम देणारे प्रतीक म्हणून पाहायला काय हरकत आहे? प्रघातनीतीच्या पलीकडे पाहून अमंगलाचा परिहार करणारे काही गवसत असेल तर ते वेचावे. आपणच आपल्याला वाचावे. सापडली चार अक्षरे तर नव्याने लिहावे. तो कुणाला कुठे अन् कसा गवसेल हे कसे सांगावे? कोणाला तो वारीत भेटतो, तर कुणाला वावरात सापडतो. त्याच्या सावळ्यारंगात आपलं अंतरंग शोधता आलं म्हणजे झालं.

पण कधी कधी परिस्थितीच अशा वळणावर आणून उभी करते की, आपण आपल्यावरचाच काय, पण ज्याच्या असण्याबाबत तिळमात्र संदेह नसतो, त्याच्यावरचा विश्वासही दोलायमान होतो. अंतःकरणात जतन केलेल्या प्रतिमेला तडे जावू लागतात. उत्तरांपेक्षा स्पष्टीकरणे मोठी होऊ लागली की, श्रद्धांचे किनारे धरून वाहणारे विचार प्रवाह बदलून प्रश्नांभोवती प्रदक्षिणा करू लागतात. संदेहाचे भुंगे विचारांना कोरु लागतात. आस्था अनुत्तरीत होऊ लागल्या की, प्रश्नांशिवाय हाती उरतेच काय? म्हणूनच असेल की काय कवी त्यालाच प्रश्न विचारतो, मी तुझी वारी का म्हणून करावी? तुझी ओवरी आनंदाने ओसंडून वाहते आहे. पण माझा ओंजळभर ओटा ओसाड का? सुखांची वसती तुझ्या आसपास अन् आनंदाची अभिधाने तुझ्या आयुष्यात. शेकडो वाटांनी वाहत येणारी सुखं तुझ्यावर तृप्तीचा अभिषेक करतायेत. समाधानाचा एक कवडसा गवसावा म्हणून माझी मात्र अखंड वणवण. शोधूनही आयुष्याचे अन्वयार्थ हाती लागत नाहीत. परिश्रमाला गीता अन् कष्टांना गाथा समजून अभावाताल्या आयुष्याला अंतरीच्या आस्थेने सामोरे जातो आहे. जीवनग्रंथाच्या पानांवर श्रमाचे अध्याय लिहूनही प्रसन्नतेचा पसाभर प्रसादपण हाती न यावा, हे कोणते भोग? प्रामाणिकपणाची परिभाषा कष्टाहून आणखी काही वेगळी असते का? खरंतर वणवण हाच जीवनाचा समानार्थी शब्द झाला आहे. हे प्राक्तनभोग माझ्याच वाट्याला का?

वावरातल्या पिकांचे मळे करपले, तर पुन्हा पेरता येतात. पण आकांक्षांचे मळे करपले, तर आस्थेच्या बिया कुठून शोधून आणाव्या? तुझ्या ओसरीला रांगोळीच्या रंगांनी देखणं केलंय, पण अंतरीच्या आस्थेने ठिपके टाकूनही आयुष्याच्या रेषा का जुळत नाहीत? कशाचीही क्षिती न करता रात्रंदिन धावाधाव करूनही घरात पिलं अन् गोठ्यात वासरं उपाशीपोटी का? युगानुयुगे तुझ्या सवे असणारी तुझी सखी रखुमाई तिकडे सुखी अन् इकडे वादळवाऱ्याशी झटाझोंबी घेत फाटक्या संसाराला माझी सखी टाके टाकतेय; पण आयुष्याची वाकळ काही सांधली जात नाही. गळ्यातल्या गळ्यात तिने किती आवंढे गिळले असतील? किती हुंदके तिने काळजात कोंडून ठेवले असतील? तुला काहीच कसे दिसत नाही? भक्तांच्या हाकेला अनवाणी धावणारा तू. पण माझ्या विनवणीचे विकल आवाज काही तुला ऐकू येत नाहीत की, तुझं काळीज कातळाचं झालं? कधीतरी साद ऐक ना रे माझी! आणखी किती परीक्षा पाहणार आहेस? पुढे प्रश्न. मागे प्रश्न. समोर प्रश्न. केवळ प्रश्न आणि प्रश्नच. प्रश्नांचं मोहळ आयुष्याला वेढा घालून बसलेलं. खरंतर त्यांची उत्तरे नाहीत असं नाही. ती तुझ्याकडेच आहेत. पण तुला परीक्षाच घ्यायची असेल तर...

अंतरी अधिवास करणाऱ्या आस्थेचे अनुबंध तुझ्या नावाशी जुळले आहेत. तो ओलावा ओंजळभर आकांक्षाना घेऊन आभाळ होऊ पाहतोय; पण आसपासचं आसमंत वावटळीच्या वेढ्यात वेढलं गेलंयं. भक्तांच्या वेदनांशी असणारं तुझं नातं कधीच नीट कळलं नाही. तू तिकडे तुझ्या सुखात मश्गूल. आणि इकडे आम्ही वेदनांचे वेद वाचतोय. नव्या जखमा काळजावर रोज चरे ओढत राहतात. जखमांवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित होत नसते. वेदनांच्या वर्तुळात विहार करणे कपाळी कोरलेले भागधेयच असेल, तर तुझा धावा तरी कशाला करावा? तुझ्या वारीच्या वाटेने कोणती सुखे वेचण्यासाठी मी चालावे?

भक्ताच्या मनाचं हे आक्रंदन नसून अंतरीच्या आस्थेने विठ्ठल नामाशी अनुबंधित असलेल्या मनाचं मनोगत आहे. त्यात रागावणं असलं, चिडणं असलं तरी आतून उमलून येणंही आहेच. अभिनिवेशांनी अंतरी अधिवास केला की, अभिव्यक्तीतील आपलेपण हरवतं अन् शब्द केवळ कवायती पुरते उरतात. शब्द सहअनुभूतीचे किनारे धरून वाहताना वेदना टिपतात, तेव्हा लेखांकित होणाऱ्या अक्षरांना नुसते देखणेपण नाही, तर आपलेपणाचा परिसस्पर्श लाभतो. खरंतर ही कविता अंतरी अधिवास करून असलेल्या आस्थेचा शोध आहे. म्हटलं तर एका सरळ रेषेत पुढे सरकणारी. शोधलं तर आशयाच्या अथांग शक्यतांना आपल्यात सामावून घेणारी. हा केवळ शब्दांचा लोभस खेळ नाही, तर प्राक्तनाने मोडलेल्या, पण उमेद न सोडलेल्या मनाचा मेळ आहे. सहज, सोपे शब्द एक अस्वस्थता अंतरी पेरत जातात. त्यात नुसत्या सहानुभूतीच्या शुष्क पसारा नाही, तर अनुभूतीच्या वाटेने येणारा विचार आहे. विठ्ठलास दूषण देण्याचा आव कवितेतील शब्दांतून दिसत असला, तरी आशयाचा भाव मात्र भक्तीचा आहे. निःसीम आपलेपण अंतरी नांदते असल्याशिवाय हक्क सांगता येत नाही आणि हाक देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, हेच खरं. विठ्ठल आणि त्याच्या भक्तांमध्ये असलेलं नातं असंच काहीसं असतं, नाही का?

चिमूटभर स्वप्ने घेऊन जगणं शोधणाऱ्या माणसांच्या आयुष्याला चिकटलेले भोग काही केल्या टळत नाहीत, हेच खरे. परिस्थिती जगण्याच्या स्थितीवर स्वार होते, तेव्हा शक्यतांचे सगळे सूर संपतात. अंधाराच्या सोबतीने घडणाऱ्या प्रवासात आयुष्याचे अन्वयार्थ हरवतात. स्वप्ने परागंदा होतात अन् जगणं समस्यांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतं. हरवलेली उत्तरे शोधत माणूस धावतो आहे, किती वर्षे झाली असतील त्याला. पण उत्तरांचा विकल्प काही हाती लागत नाही. टीचभर पोटाची खळगी अवघं आयुष्य आपल्या आत सामावून घेतं. नियतीने म्हणा किंवा निसर्गाने ललाटी कोरलेले भोग काही केल्या सरत नाहीत.

जगणं एक शोधयात्रा आहे. प्रत्येकाला काहीतरी हवंय आणि ते मिळवण्याची आस अंतरी अनवरत अस्तित्वात आहे. कुणाला सुखाचा शोध घ्यायचा, कुणाला समाधानाची नक्षत्रे वेचून आणायची आहेत, कुणाला पैसा शोधून गाठीला बांधायचा आहे, कुणाला प्रतिष्ठेचे परगणे खुणावत आहेत, कुणाला पदप्राप्ती करून आपलं वेगळं असणं अधोरेखित करायचं आहे. कुणाला आणखी काही. एकुणात इहतली असा कोणताही जीव नाही, ज्याला काही मिळवायचं नाही. काहीतरी असण्याची आस अंतरी घेऊन सगळेच नांदत आहेत. शक्य झालं तर सगळ्यांना सगळंच हवं आहे. पण त्या सावळ्या रंगाच्या मोहात पडलेल्यांना सुखांची कसली आलीये मिजास. त्याचा सहवास हेच त्याचं सुख. पण तेच मृगजळ होऊ पाहत असेल, तर त्यामागे धावावे तरी किती?  
 
अपार कष्ट करून सुखं वेचून आणायची उमेद अंतरी नांदती असूनही केवळ परिस्थितीच्या आघातांनी सगळ्याच आकांक्षांवर पाणी फिरत असेल, तर विकल मनाने हळहळण्याशिवाय हाती उरतेच काय? ‘प्राप्ती' या एका शब्दाभोवती माणसांचे जगणे प्रदक्षिणा करीत असते. प्राप्तीसाठी घडणारा प्रवास दमछाक करणारा, सत्वाचा कस लावणारा, थकवणारा. पूर्णत्व शब्दाची परिभाषाच पर्याप्त नाहीये. हवं असलेलं काहीतरी हातून निसटतंच. कुणाच्या वाट्याला मोहरलेपण येतं, कुणाच्या ओसाडपण. माणूस मात्र पळत राहतो, सुखाचं चांदणं वेचण्यासाठी. पण आसपास ओसाडपणच नांदते असेल, तर त्याला वाचावं तरी कसं? प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, तर पदर पसरून सुखाचं दान मागवं कुठून अन् कसं? प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हाती शून्य उरण्याची वेदना घेऊन ही कविता मनाचे किनारे धरून सरकत राहते.

माणसाला जगण्यासाठी श्वास जेवढे आवश्यक तेवढी श्रद्धाही. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय भक्तीचे अर्थ आकळत नाहीत. विठ्ठल या एका शब्दात महाराष्ट्राच्या भक्तीच्या प्रेरणा सामावल्या आहेत. विठ्ठल केवळ मूर्ती नाही, भक्तीचं निधान आहे. श्रद्धेचं अभिधानही आहे. येथल्या कष्टकरी समूहाचे प्रेरणा पाथेय आहे. आपत्ती येथील शेतकऱ्यांच्या आयुष्याला वर्षानुवर्षे सोबत करीत आहे. परिस्थिती उन्मळून टाकण्याची कोणतीही संधी जाऊ देत नाही. पण याच्या आस्थेची मुळं विठ्ठल नावाच्या मातीत घट्ट रुजली आहेत. संकटांशी दोन हात करत दैवाशी आणि देवाशी तो झगडतो. केवळ माझ्या वाट्यालाच असं का? म्हणून त्याला जाब विचारतो. त्याच्याशी भांडतो. तू तुझ्या सुखात तिकडे मश्गूल असताना, मी कसा तुझ्या वाटेने चालत येऊ? म्हणून त्यालाच बोल लावतो. तुला तर भक्तांचा लळा आहे म्हणतात, मग माझ्याच ललाटी हे अभिलेख का म्हणून प्रश्न विचारतो. आपलेपणाचा अथांग डोह अंतरी असल्याशिवाय आस्था उदित नाही होत आणि आस्था असल्याशिवाय आपलेपणाला अर्थ नसतो. विठ्ठल या आस्थेचंच प्रतिरूप आहे, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••