Vartulatale Ani Vartulabaherache | वर्तुळातले आणि वर्तुळाबाहेरचे

By // 7 comments:
आम्ही काही शिक्षक उत्तरपत्रिका तपासत बसलो होतो. या कोंडाळ्यात बसून आमचे एक सहकारी शिक्षक त्यांच्याकडील उत्तरपत्रिका तपासत आहेत. त्यांचं लाल रंगाच्या रेषांनी उत्तरपत्रिका रंगवण्याचं काम सुरू आहे. ‘जसे कर्म तसे फळ’ न्यायाने गुणांचं दान उत्तरपत्रिकेच्या ओटीत ओतले जाते आहे. मध्येच एक उत्तरपत्रिका त्यांच्या हाती लागते. ती पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पालटायला लागतात. त्यांना आश्चर्याचा अनपेक्षित धक्का बसतो. गठ्ठ्यातून उत्तरपत्रिका वेगळी काढून सर्वाना दाखवत ते म्हणाले, “सर, या महोदयाची गुणवत्ता कोणत्या रंगांनी अधोरेखित करू मी आता? याला, याच्या शैक्षणिक प्रगतीला कसं गौरवान्वित करावं? तुम्हीच सांगा, याचं शैक्षणिकविश्व कसं फुलवायचं?” त्यांचं उद्विग्न सुरातलं बोलणं ऐकून इतर विषयावर सुरू असणारे आमचे चर्चेचे गुऱ्हाळ थांबले. साऱ्यांच्या नजरा त्यांच्या बोलण्याकडे केंद्रित. त्यांच्या हाती असलेली उत्तरपत्रिका विस्फारलेल्या नेत्रांनी पाहत राहिले. सगळेच निःशब्द.

थोडावेळ शांतता. त्या नीरव शांततेला छेद देत एक शिक्षक म्हणाले, “सर, हे आपल्या शैक्षणिक प्रगतीचे मधुर फळ आहे. अहो, असं घडणं तुम्ही फार काही मनास लावून घेऊ नका! आत्तापर्यंत प्रगतीच्या शिड्या हा जशा चढत आला, तशी आणखी एक पायरी वर चढवा याला. नाहीतरी कोणाला नापास करायचेच नसल्याने, धोरणाशी प्रतारणा ठरेल तुमचं वागणं. पाठवा पुढे! बघतील पुढचे रस्ते याला कसं घडवायचं, वाढवायचं की अडवायचं ते!”

आणखी एक शिक्षक बोलते झाले. म्हणाले, “सर, कसं शक्य आहे हे? नापास करायचेच नाही, असे कोण म्हणतो? असंच काही नाही बरं का! हां, एक मात्र खरं नापास करायचंच असेल, तर याच्या अभ्यासाचं पुनर्भरण करायला लागेल तुम्हां लोकांना. यासाठी आहे का तुमची मानसिक तयारी? असेल तर बघा, अन्यथा आपलं धोरण यशस्वी समजून मुकाट्याने चाकोरीत चला.”

या सगळ्या प्रकाराचा एवढावेळ मूक साक्षीदार असणारे एक शिक्षक म्हणाले, “सर, येथपर्यंत पोहोचलाच कसा हा? याला येथे आणून टाकणाऱ्यांचा खरंतर सत्कारच करायला हवा. शासनाने अध्ययन-अध्यापनविषयक काही धोरणे आखली असतील. ती अंमलात आणायची म्हणून दिशा निर्धारित केली असेल. उद्दिष्टसाध्यतेच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी पथ तयार केला असेल, तर या विचारांना तिलांजली देणारा कोणीतरी असेलच ना! त्याला व्यवस्थेने जाब विचारायला नको का?”

त्यांचं बोलणं मध्येच थांबवत आणखी एक शिक्षक म्हणाले, “सर, तुमचा आदर्शवाद व्यक्त होण्यापुरता चांगला आहे, पण प्रत्यक्षात आणणे एवढे सोपे आहे का हो? हे सगळं करायचं तर मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? आहे हे करायची मानसिकता आपल्याकडे?” त्यांनी आपला युक्तिवाद आमच्या अंगावर फेकला.

“सर, तुम्ही चुकता आहात. मानसिकता, इच्छा, आशावाद, आदर्शवाद सारंसारं आहे, पण परंपरांचे पायबंद पडल्यावर तुम्ही तरी काय करणार आहात? काहीही भव्यदिव्य न करता ज्यांना प्रशंसेस पात्र होण्याची कला अवगत असते, ते कशाला धोरणांचा विचार करणार आहेत. त्यांचे धोरण एकच, डोळ्यांना झापडं बांधून कुणीतरी दाखविलेल्या मार्गाने चालणे. अशा मानसिकतेत धोरणं असली काय अन् नसली काय, त्यानी काय फरक पडणार आहे?” आणखी एका शिक्षकाचे मत विचार बनून प्रकटले.

संवाद पुढे सरकत होता. चर्चेचा सगळा रोख एकाच दिशेने धावत होता. धोरणे उदंड झाली, पण अंमल करणारे हात हरवत चालले आणि दिशा दाखवणारे दुर्मिळ होतायेत. अर्थात, एखाद दोन बरेवाईट अनुभव गाठीशी असणाऱ्यांकडून व्यक्त झालेली अशी मते समाजात वावरताना कानी येतात. पण प्रत्यक्षात दिसतं तितकं सगळंच काही वाईट घडत नाहीये, हाही अनुभव जमेस असतो, म्हणून ते फारसं मनावर न घेता सोडून देतो. तरीही मनात एक संदेह असतोच. व्यवस्थेततून व्यक्त होणारी अशी मते आपल्या शैक्षणिक प्रगतीच्या दिशा प्रवाहपतित होत चालल्याचे निर्देशित करतायेत का? अर्थात, या प्रश्नांची उत्तरं अशाच कोणत्यातरी अनुभवांच्या, मर्यादांच्या आकलनातूनच प्रकटतात आणि मर्यादांच्या चौकटीतूनच समजून घेतली जातात हेही सत्यच.

कधीकाळी आपल्या देशातील शिक्षणक्षेत्र संख्यात्मक प्रगतीच्या निकषांवर थिटे असेल. त्याला सार्वत्रिकतेचा परीसस्पर्श भलेही झाला नसेल, पण गुणवत्ता त्याचा केंद्रबिंदू होता असं म्हटलं जायचं. हे एका सीमित अर्थाने खरं मानलं तरी त्यात काही अंगभूत दोष होते, हे वास्तव स्वीकारावे लागतेच. परीक्षा नावाच्या वर्तुळाभोवती ही शिक्षणव्यवस्था फिरत राहिली. आज माणूस बदलला, तशी त्याच्या जगण्याची उद्दिष्टेही बदलत आहेत. अंतरंगापेक्षा बाह्यरंगालाच जास्त महत्त्व आलं आहे. बेगडी चमक यशाचं परिमाण ठरू लागली आहे. कधीकाळी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षा आयुष्याचे सार्थक वाटायच्या. जीवनाच्या या निर्णायक वळणावर गुण किती मिळतील, याची साऱ्यांना प्रचंड उत्सुकता असायची. सांप्रत गुणवत्तायादीचा ताण हलका झाला. यादी गेली हे चांगलेच. पण गुणवत्तेचे काय? गुणांच्या दिशेने धावणारे सगळेच; पण गुणवत्तेच्या वाटेने पळणारे अपवादच, असे का? अंतर्गत गुणांचा आयता रतीब शिकणाऱ्याला कागदावरचा ‘पदवीधर’ बनवतो; पण ‘विद्याधर’ बनायचे राहूनच जाते, त्याचे काय? आपणास काय हवे, या प्रश्नाच्या उत्तराचा विकल्प शेवटी समाजालाच निवडावा लागतो. ज्ञानसंपन्न पिढी असणं, हे या प्रश्नाचं उत्तर असेल, तर सध्या समाजात दिसणारी मूठभर हुशारांची पुस्तककेंद्रित शैक्षणिक प्रगती हीच आपल्या धोरणांची यशस्विता समजावी का? आपण ज्ञानाचे आणि गुणांचे विलीनीकरण केले, पण अंगभूत गुणवत्तेचं संवर्धन करायचं विसरलो आहोत का?

विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असेल, तर शिक्षक त्याचा मानबिंदू असावा. शिक्षणप्रणालीतील घटकांची मान उंचावणारी धोरणे व्यवस्थेत अबाधित असणे आवश्यक असते. शिक्षणाविषयी आस्था निर्माण करण्याचे उत्तरदायित्व कुणाचे? शिक्षकाची अस्मिता टिकवण्याची जबाबदारी कुणाची? या प्रश्नांची उत्तरे आपण साऱ्यांचीच, असे का असू नये? शिक्षकाची अस्मिता मुख्याध्यापकाला आपली वाटावी. मुख्याध्यापकाचा सन्मान व्यवस्थापनाला आपला मान वाटावा आणि या साऱ्यांचा समाजाला अभिमान वाटावा. पण दुर्दैवाने या साखळीतील प्रत्येक घटक सुटासुटा होत चालला आहे. समाजाला शिक्षकाचा पेशा दिसतो. व्यवस्थापनाला शिक्षकाची कार्यप्रणाली, मुख्याध्यापकाला मर्यादांचे वर्तुळ, तर शिक्षकाला परिस्थितीचा परिघ.

विद्यमान वातावरणात अध्ययन-अध्यापनाची मानसिकता घडवणारी प्रणाली हरवत चालल्याचे बोलले जातेय, हे खरं असेल का? कधीकाळी डी. एड., बी. एड. करणे प्रतिष्ठेचे समजले जात असे. सांप्रत स्थितीत या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे मोठेच धाडस असायला लागते. समजा काहींनी मनाचा हिय्या करून या प्रांगणात येण्याचे ठरवले आणि प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयात गेले. प्रवेश घेतेवेळीच त्यांच्या हाती पडणाऱ्या माहितीपत्रकात ‘नोकरी- नो गॅरंटी’, असा शासनप्रणित वैधानिक इशारा लिहिलेला असेल तर काय होईल? आश्चर्य वाटले ना! पण हे वास्तव आहे. शासनाचा तसा मानस असल्याची बातमी अलीकडेच वाचनात आली. अशी धोरणे अंमलात येणार असतील, तर आपण प्रगतीच्या वाटेने कुठून कुठे चाललो आहोत, याचे परिशीलन होणे अगत्याचे नाही का? अध्यापक घडवणारी सगळीच महाविद्यालये प्रतिष्ठेच्या प्रांगणात अधिष्ठित झालेली होती असे नाही. पण आहेत त्यांचे आत्ताचे अवकाळी मरण हा आपल्या शैक्षणिक धोरणांचा परिपाक नाही का?

शिक्षकी पेशात खरंतर स्वायत्तता, स्वयंपूर्णता असावी. पण दुर्दैवाने असे चित्र अस्तित्वात असल्याचे प्रत्यक्षात किती दिसते? सुमार गुणवत्ता आणि संकुचित प्रज्ञा असणाऱ्यांच्या हातात शिक्षकांच्या कार्याच्या संयोजनाची सूत्रे असतील तर स्वातंत्र्य, स्वाभिमान, समर्पण यासारख्या शब्दांना अर्थच उरत नाही. शिक्षक विचारांनी पराभूत होणे व्यवस्थेचे अपयश असते. शिक्षकाला उभं करून उद्दिष्टांच्या दिशेने नेण्यासाठी प्रेरित करणारे हात दिमतीला असतील, तर वाळवंटातसुद्धा नंदनवन फुलवण्याची किमया तो करू शकतो. मात्र त्यासाठी प्रेरणेचे सतत सिंचन घडत राहणे आवश्यक असते. अस्मिता हरवलेला, कणा मोडलेला शिक्षक व्यवस्थेत घडणार असेल तर शिक्षणाचं भविष्य काय असेल?

शिक्षण सेवकाचे ‘सहायक शिक्षक’ नामकरण करून परिस्थितीत परिवर्तन घडत नसते. उच्चविद्याविभूषितांना एखाद्या मजुरापेक्षा कमी वेतनावर काम करायला भाग पाडणारी धोरणे गुणवत्तेला मारक ठरतात, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. ज्ञानाचे दीप प्रज्ज्वलित करण्यासाठी हाती आस्थेची पणती घेऊन निघालेल्या पांथस्थाला परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून संरक्षणाचा पदर नसेल, तर पेटलेल्या वाती विझणारच. भरल्यापोटी जगाला शहाणपण शिकवता येते; पण ते अंगीकारता येत नसेल, तर शुष्क कर्मयोग कोणत्या कामाचा? कायद्याने समाजातील वेठबिगारी हद्दपार झाली; पण शिक्षितांच्या जगात नव्या परिभाषेनेमंडित असलेली हीसुद्धा वेठबिगारीच नाही का? शिक्षकांच्या पेशाचा सन्मान करण्यासाठी कुठल्यातरी पुराणग्रंथातून त्याच्या महतीची स्तोत्रे शोधून आणायची, त्याला गुरुवर्य म्हणून संबोधायचे, गुरुपौर्णिमेला त्याच्या चरणी नतमस्तक व्हायचे. त्याचा गौरव करायचा आणि नंतर मर्यादांच्या दोरांनी व्यवस्थेच्या खुंट्यावर आणून बांधायचे, ही कसली मानसिकता विद्येच्या प्रांगणात रुजते आहे कोणास ठाऊक?

मोफत सार्वत्रिक शिक्षण कायद्याच्या वाटेने शिक्षण सामान्यांच्या दारापर्यंत आले. पण धोरण म्हणून हे सगळं स्वीकारताना यातील बाधा बनणाऱ्या फटी शोधून बुजायच्या कशा, याचा किती विचार झाला आहे? शिक्षणाचे सर्वशिक्षा अभियान झाले. अभियानाचे यान वेगाने स्वप्नांच्या अवकाशात झेपावले, पण यशसिद्धी किती? या प्रश्नाने आपण परत जमिनीवर येतो. अभियानाचे यशापयश वादाचा, चर्चेचा विषय असू शकतो. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार वेगात झाला, पण उद्दिष्टे तेवढ्याच वेगात साध्य झालीत का? या प्रश्नाचे उत्तर आपापल्या वकुबानुसार, आकलनानुसार जाणकारांनीच शोधणे संयुक्तिक ठरेल.

शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये देशाचे भविष्य आकारास येते आहे, असे म्हणणे कितीही चांगले वाटत असले, तरी ज्या शाळांना शाळा म्हणण्यासारखे त्यांच्याकडे अद्याप काहीच नाही त्यांचे काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. डोक्यावर धड छत नाही, भिंती नाहीत. फळा आहे तर खडू नाही. हे आहे तर शिक्षक नाहीत आणि हे सगळं आहे तर पुरेसे विद्यार्थीच नाहीत, अशा शाळांचे भविष्य काय? अपुऱ्या सुविधांसह कार्यरत असणाऱ्या शाळांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. कितीतरी शाळांमध्ये पुरेशीच काय, पण किमान सुविधा, साधनेही नसतील, तर त्यांना शाळा या शब्दाच्या व्याख्येत कसे अधिष्ठित करता येईल? अजूनही शेकडो शाळांकडे स्वच्छ पाणी, प्रसाधन गृहे, क्रीडांगण, अध्ययन साहित्य आदी सुविधा उपलब्ध नसतील तर दोष कोणाचा? चार चांगल्या शाळा हा गुणवत्तेचा निकष होऊ शकत नाहीत. भले तर आपण त्यांना मॉडेल म्हणू शकतो. एकेक शिक्षक दोन-तीन वर्ग एकत्र सांभाळतो, तेथे गुणवत्ता कशी काय सांभाळली जात असेल, या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपला समाज शोधतोच आहे. अर्थात, संबंधित शाळांच्या आणि शिक्षकांच्या गुणवत्तेवर, क्षमतांवर प्रश्नचिन्ह नाही रेखांकित करायचे. पण गुणवत्तेचे संवर्धन हे न उलगडणारे कोडे आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाने परिस्थितीत कायापालट होऊ शकतो हे मान्य; पण साध्यापर्यंत पोहचायचे तर साधनेही सक्षम असायला नकोत का? स्वातंत्र्य मिळवून एकोणसत्तर वर्ष झाली तरी आपल्या देशाचा शिक्षणावरचा खर्च साडेतीन-चार टक्क्यांवर रेंगाळतो आहे. शिक्षण ही भविष्यातील गुंतवणूक असते, असे म्हणतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सचा पत्रकार थॉमस फ्रीडमन म्हणाला होता, ‘जेवण वेळेवर करावं म्हणून आम्ही लहान असताना आमचे आईबाप आम्हाला भीती घालताना म्हणायचे, ‘चीनची मुले येतील आणि तुमची भाकरी पळवून नेतील. आहे ते लवकर खावून घ्या.’ आता आम्ही आमच्या मुलांना सांगतो, ‘भारतातली मुले येतील आणि तुमच्या नोकऱ्या पळवून नेतील.’ भाषणात टाळ्यांसाठी हे म्हणणं ठीक; पण वास्तव काय सांगते? आपला उच्चशिक्षणाचा आलेख अठरा-एकोणावीस टक्क्यांच्या वर अजूनही चढत नाहीये. शंभरातील अठरा-एकोणावीस या शिखरावर पोहचले, मग राहिलेल्या बाकीच्यांचे काय? शिखराकडे पाहताना त्याची उंची नजरेत भरते, पण पायथा दुर्लक्षित राहतो. आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवले त्याकाळी आपल्याकडे जेमतेम वीस-बावीस विद्यापीठे होती. आज त्यांची संख्या सातशेच्या आसपास आहे. येथे हजारोच्या संख्येने मुलेमुली शिकतायेत, पण गुणवत्ता मात्र शेकड्यानेच, असे का?

एकविसाव्या शतकाच्या आपण गप्पा करतो, मात्र या शतकाची चाल ओळखून आपण असे किती शोध लावले, ज्याने जगाच्या वर्तनाची दिशाच बदलवून टाकली. कुणी कुठे काही नवे शोधले की, हे तर आमच्याकडे आधीच आहे. आमच्या पुराणात सांगितले आहे. शोधून पहा, असे समर्थन होते. आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती, ग्रहताऱ्यांचे ज्ञान अवगत होते. विमाने पण होती म्हणायचे. मग असे असेल तर अनेक दशके तुम्ही बैलगाड्या, गाढव-घोडे का वापरत होता, असा प्रश्न कोणासही पडत नसावा का? देशाची लोकसंख्या वाढली. ओघानेच शिकणाऱ्यांची संख्याही वाढली. पण शिकणाऱ्यांची संख्या वाढली म्हणून सगळीकडेच गुणवत्ता वाढली का? उच्चविद्याविभूषितांची रोजगाराच्या शोधार्थ वणवण सुरू आहे. ज्यांच्या मागे पद, पैसा, प्रतिष्ठेचे वलय आहे, ते लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन सत्तेची सिंहासने खरेदी करीत आहेत. ज्यांच्याकडे काहीच नाही, ते दैवाला दोष देत परिस्थितीशी दोन हात करीत उभे आहेत. उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या शोधात.

प्राथमिक शिक्षण राज्याची घटनात्मक जबादारी आहे. पण या जबादारीच्या निर्वहनात अनेक व्यवधाने आहेत. समस्या आहेत. कारण आपल्या समाजाची चौकट आणि विचारांची बैठकच अशी काही आहे की, तिच्या भिंतीना कितीही धडका देण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा टवकादेखील उडत नाही. कोणत्याही समाजाची उदासीनता एकूणच धोरणावर परिणाम करते. आपल्या सामाजिक जीवनाचा उदासीनता जणू गुण ठरावा अशी सार्वजनिक वर्तनाची रीत दिसते. बालमजुरांचा प्रश्न, आदिवासी, भटक्याजमातीतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अवघड दुखणं आहे. पटसंख्या मोजून, शैक्षणिक प्रगतीचे पडघम वाजवून धोरण ठरवण्यात वावगे काहीच नाही. पटावरील विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी व्यवस्थेच्या आदेशाने शाळा सोडून रानावनात, वाडे, वस्त्या, रस्त्यांवर मुले शोधत शिक्षकांना भटकवले म्हणजे अभियानाची जबाबदारी पार पडली असे होते का? शाळाबाह्य मुलं शोधण्यासाठी आहेत ती मुलं वाऱ्यावर सोडून वणवण करायची. शिक्षणाच्या वर्तुळातून निसटलेली मुले पकडून आणायची. पण त्यांच्या पोटपाण्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच. नुसत्या पोषण आहाराने प्रश्न मार्गी लागत नसतात. आपल्या सामाजिक व्यवस्थेतील कुपोषण दूर करणं गरजेचं आहे.

आपल्या समाजाची घडीच बहुपदरी आहे. त्यातून समाजाची मानसिकता घडली आहे. जात, धर्म, संस्कृती, परंपरांतून उभ्या राहणाऱ्या भेदाभेदाच्या भिंती व्यवस्थेचा स्थायीभाव बनला आहे. या सगळ्यांचा प्रभाव शिक्षणावर कळत नकळत असतोच. शिक्षणाला विशिष्ट विचारधारांचे रंग देणं प्रगतीतील अडसर ठरतो. शासनसत्तांच्या बदलांनी शिक्षण बदलणारे नसावे. ते काळाच्या ओघाने आणि जगाच्या प्रगतीच्या दिशेने बदलणारे असावे. त्याला रंगहीन राखण्याची जबाबदारी समाजाची असते.

राष्ट्राच्या धोरणांची दिशा बदलली की सेवाक्षेत्राच्या, उत्पादनक्षेत्राच्या दिशा बदलतात, असे म्हणतात. याला शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. परिस्थितीचा रेटाच भयंकर असल्याने आपल्याला हे धोरण अंगीकारावे लागले. मुक्तवाटांची सोबत करीत परदेशी विद्यापीठे देशात येण्याचा मार्ग प्रशस्त होतो आहे. जेथे शिक्षणाच्या पुरेशा सुविधाही नाहीत तेथे स्पर्धा होणार आहे, तीसुद्धा गुणवत्तेशी. ही स्पर्धा सुविधांशी असणार आहे. ज्याच्या हाती पैसा नावाचा चंद्र आहे, त्यांचा प्रश्नच नाही. पण नाहीरे वर्गाचे काय? सर्वांना शिक्षण हा आपल्या शैक्षणिक धोरणाचा भाग असेल, तर अशा व्यवस्थेत समान न्याय मिळेल का? अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण झाले. विनाअनुदान तत्वावर सुरू होणाऱ्या शाळामधून विद्यादानाचा संकल्प केला गेला. वाटले शिक्षणाचा कायाकल्प होईल. पण तसे घडले आहे, असे किती जणांना वाटते? विकल्पच प्रश्नचिन्हे बनून समोर उभे राहिले आहेत. सुमार आर्थिक वकुब असणाऱ्या समाजात खाजगीकरण पेलवणारे नाही. खरंतर हे वास्तव दुर्लक्षित व्हायला नको. बरेच जण प्रवाहापासून अंतरावर राहणार असतील तर याचा नेमका फायदा कोणाला?

बहुसंख्यांकडे क्रयशक्तीच नसल्याने प्राप्त परिस्थितीतील विसंगती पाहत बसण्याशिवाय त्यांच्या हाती आहेच काय? राखीव जागा समाजातील समतेचे संपूर्ण उत्तर असू शकत नाही. समता शिक्षणातून मनात रुजायला हवी आणि वर्तनातून प्रकटायला हवी. संधी साऱ्यांच्या हाती लागायला हव्यात. पायाभूत सुविधांचा अभाव, दर्जेदार अध्यापनाची वानवा असणाऱ्या परिघात प्रगतीचा प्रभाव तरी कसा निर्माण व्हावा. सोयी देणे शासनाचे, व्यवस्थापनाचे कर्तव्य. सकस अध्यापन करणे अध्यापकाची जबाबदारी. पण जेथे संस्थांची संकुले उभी राहतात, तेथे नफ्याची गणिते आखली जातात. जेथे चालक सरंजामी थाटात वर्ततात आणि त्यांच्या कृपाकटाक्षासाठी अंगभूत गुणवत्ता नसणारी पात्रता लोटांगण घालण्यात धन्यता मानते, तेथे निखळ गुणवत्ता दुर्मिळ होते. सुमारांची सद्दी आणि सज्जनांना विजनवास घडत असेल, तेथे शिक्षण विकासाच्या वाटांनी कसे चालेल?

परंपरेने शिक्षकाकडे सकलजन शहाणे करण्याची जबाबदारी दिली. समाजाला शैक्षणिक, वैचारिक अंगाने सक्षम करण्याचे उत्तरदायित्त्व दिले. कधीकाळी त्याचा यथोचित सन्मान समाजाकडून घडत असे. त्याच्याप्रती असणाऱ्या कृतज्ञेतून त्याच्या उदरभरणाचा प्रश्न समाजच सोडवत असायचा. गुरुकुलात गुरूला मिळणारा सन्मान ग्लोबलस्कूलच्या वर्तुळात लघू होत गेला. सारे व्यवहार वैयक्तिक फायद्याच्या चौकटीत बंदिस्त झाले. डिव्होशन जावून कॉशन, कॅपिटेशन मनी आले आणि शिक्षणाविषयी असणारे आस्थेवाईकपण दुभंगले. शिक्षकी पेशा आर्थिक गणिताच्या परिघात बंदिस्त झाला. कधीकाळी शिक्षक ‘गुरूजी’ म्हणून आदराने उल्लेखला जायचा. तो अशिक्षित आईबापाच्या मुलांचा पालक व्हायचा. आता तो ‘सर’ झाला आणि त्याच्याविषयी असणारा आदरही सरसर उतरणीला लागला. तो शासन, प्रशासन, व्यवस्थापन यांच्या तंत्राने चालणारा रोबोट झाला.

याचा अर्थ शिक्षणक्षेत्रात काहीच सकारात्मक घडत नाही, असे नाही. व्यवस्थेच्या बंदिस्त चौकटींमध्ये आपल्या अस्मितांचा शोध घेणारे समाजात अनेक आहेत. माळावरील एकाकी फुलासारखे फुलणारे, आपल्या अंगभूत गुणवत्तेच्या गंधाने आसपासचा आसमंत गंधित करणारे आहेतच. दिलेल्या धोरणांच्या चौकटीत मनी विलसणारी छोटी-छोटी स्वप्ने शोधणारे, त्यांच्या पूर्ततेचा ध्यास धरून नव्या दिशांचा शोध घेणारे; मुक्कामाची नवी वसतिस्थळे निर्माण करीत आहेत. शिक्षणाच्या वर्तुळात कोणतेही वाद आले, विसंवाद उभे राहिले तरी त्यातून संवाद साधणारे आहेतच.

काही दिवसापूर्वी नामदेव माळी यांचे ‘शाळाभेट’ पुस्तक वाचत होतो. भेट दिलेल्या शाळांविषयी त्यांनी आत्मीयतेने लिहिले आहे त्यात. या शाळा प्रतिकूल परिस्थिती परिवर्तनाची लहान लहान बेटे आहेत. प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षण धोरणांवर आपली अमिट नाममुद्रा अंकित करणाऱ्या. शासन, प्रशासन, व्यवस्थापन यांच्या चौकटीतील व्यवहारांच्या शुष्क वाळवंटात ओअॅसिस निर्माण करीत, आपल्या पावलापुरती वाट उजळीत नव्या प्रकाशाचा वेध घेणारे त्यांचे प्रयोग एक समर्पणगाथा आहेत. प्राप्त परिस्थितीचे परिशीलन करून प्रमाणिक प्रयास करीत यशोगाथा उभ्या करता येतात, याची मूर्तिमंत प्रतीके असणाऱ्या या सगळ्या शाळा आणि तेथील शिक्षक. ज्ञानसंरचनावाद, स्वयंअध्ययन, अध्ययनसमृद्धी आदी प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळा ठरल्या आहेत.

‘मुलं घडवणं म्हणजे देश घडवणं,’ असं समजून देशाच्या बौद्धिक संपत्तीत भर घालू पाहणारे ध्येयवेडे समाजात आजही आहेत. पैशामागे धावणाऱ्या जगात संस्कारांची संपन्नता शोधणारे समर्पणशील कुबेर आपल्या समाजात काही कमी नाहीत. फक्त त्यांच्याकडील संपत्तीची चमक बेगडी चमकधमक पाहणाऱ्या नजरेला दिसत नाही एवढेच. कुठूनतरी मागून एखादी गोष्ट कदाचित मिळवता येईलही, पण मिळालेल्या गोष्टीला उचित न्याय देता येईलच असे नाही. मोठेपण मागून अथवा लादून कधीही मिळत नसते. त्यासाठी आधी आपली उंची वाढवावी लागते. स्वकर्तृत्वाने एव्हरेस्टहून मोठे व्हावे लागते. आकाशाशी हितगुज करणाऱ्या अशा शिखरांचा शोध मात्र समाजाला घेता यायला हवा.

ज्ञानासोबत संस्कार देतो, तो पिढीच्या जगण्याला आकार देणारा मूर्तिकार असतो. घडणे-घडवणे हा द्विमार्गी संवाद असतो. तो संवेदनांचा अनाहत नाद असतो. स्वप्न वास्तवात आणणारा प्रवास असतो. पण त्यासाठी संवेदना जागृत असायला लागतात. शिक्षक संवेदनशील असावा, असं म्हणतात. पण संवेदना काय फक्त शिक्षकालाच असतात? त्या समाजाकडे, व्यवस्थेकडे नसतात का? याचं उत्तर समाजाने आणि व्यवस्थेनेच शोधणे अधिक संयुक्तिक नाही काय?

Jaate | जाते

By // 9 comments:
जातं:

‘घट्या पाट्या टाकी ल्या…!’ अशी साद घालीत रस्त्यावरून आवाज ऐकू येतो आहे. घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली दुपारच्या निवांतवेळी वाचन करीत बसलो होतो. आवाजाची आवर्तने सुरु. वाढत्या वयाच्या साऱ्या खुणा देहावर धारण करून दारासमोरून एक बाई चालली आहे; घरातलं कुणी जातं, पाटा, वरवंटा टाकून घेतोय का, या अपेक्षेने ती परत-परत साद घालते आहे. कष्टाने रापलेला तिचा देह वार्धक्याच्या वाटेने आयुष्याच्या उतरणीवर लागलेला. अंगावर नववारी लुगडं तेही वापरून जवळपास विटलेलं. एका हातात लहानसा हातोडा. डोक्यावर धडूत्याचं बोचकं. त्यात छिन्नी वगैरे सारखी आणखी काही जुजबी औजारे. माणसांनी गजबजलेल्या वस्तीतून साद घालीत ती बाई चालते आहे. साद घालणाऱ्या आवाजात कुणी आपणास हाक देईल, याची आस लागलेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपापल्या वैभवाला मिरवीत तोऱ्यात उभ्या असलेल्या इमारतीसमोरील रस्त्यावरून तिची थकलेली पावलं आयुष्याच्या चुकलेल्या गणिताचं ओझं दिमतीला घेऊन पुढे सरकत आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये जगण्याच्या प्रवासातील सारी प्रश्नचिन्हे एकवटलेली. सायासप्रयासाने हाती लागणाऱ्या कामातून जीवनकलहाच्या प्रश्नांची उत्तरे ती शोधू पाहते आहे. प्लॉट संस्कृतीच्या तुकड्यांमध्ये विभागलेल्या जगण्यावर मध्यमवर्गीय प्रतिष्ठेची झूल पांघरलेलं कोणतंही दार किलकिलं होत नाही, की कुठूनही थांबा! म्हणून आवाज काही तिच्या कानी येत नाही. येईलच कसा? जवळपास साऱ्यांनीच स्वयंखुशीने आपापल्या घराचे कोंडवाडे करून घेतलेले. पैसा मोजून आणलेल्या आभासी सुखांची त्यात आरास मांडलेली. घरांना विज्ञाननिर्मित साधनांनी वेढलेलं. सुखाच्या मृगजळी सहवासात माणसांनी स्वतःला सीमित करून घेतलेलं. स्वयंघोषित प्रगतीच्या चौकटी उभ्या करून सजवलेल्या बंदिस्त घरात पारंपरिक साधनांना आहेच कुठे जागा. आता आहेत कुठे घरात जाते, पाटे-वरवंटे शिल्लक? असलेच तर तेही अपवाद. जगणं धावत्या चाकावर स्वार झालेलं. प्रगतीच्या प्रचंड वेगात हे संथ लयीतलं जगणं हरवले. त्यासोबत पारंपरिक प्रवाहांचे संदर्भसुद्धा.

साद घालीत जाणाऱ्या आवाजाने पुस्तकाच्या पानातून लक्ष विचलित झालं. भूतकाळातील एकेक आठवणी नकळत मनाभोवती फेर धरू लागल्या. फार काही जास्त नाही, पण पंधरा-वीस वर्षे मागे जावून पाहिले, तर गावात तेव्हा असे एकही घर नसेल, ज्यात ग्रामपरंपरेशी नाते सांगणाऱ्या जाते, पाटा-वरवंटा वगैरे सारख्या वस्तू नसतील. या वस्तूंशिवाय जगण्याची कुणी कल्पनाही करू शकत नसे. अशा कितीतरी गोष्टींची मुळे ग्रामसंस्कृतीच्या मातीत घट्ट रुजलेली होती. या वस्तू दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग होत्या. या वस्तूंच्या निर्मितीसोबत जुळलेला आणि त्यांला उदरनिर्वाहचे साधन मानणारा माणसांचा एक वर्गही होता. दगडापासून पाटा-वरवंटा, जाते तयार करणारे, गुळगुळीत झाल्यावर टाकून देणारे त्यातील एक. त्यांच्या जगण्याच्या वाटा निर्धारित करणाऱ्या या वस्तू काही त्यांच्या पदरी ऐहिक श्रीमंतीचं दान देणाऱ्या नसल्या, तरी कष्ट करून प्रामाणिक जगण्याला प्रतिष्ठेचे प्रांगण उपलब्ध करून देणाऱ्या होत्या. श्रम करून माणसाला सन्मानाने जीवनयापन करता येते, याचा वस्तुपाठ होत्या.

गावागावातून आपला फाटका आणि भटका संसार पाठीवर घेऊन फिरत राहणारी ही माणसे अनिकेत असली, तरी अनेकांच्या निकेतनात यांनी तयार करून दिलेल्या वस्तूंमुळे कोणतातरी कोपरा सजलेला असायचा. दळताना विशिष्ट लयीत ऐकू येणारी जात्यांची घर-घर शब्दांचा साज लेवून कोण्या मानिनीच्या सुरेल आवाजाची सोबत करीत झऱ्यासारखी झुळझुळ वाहत रहायची. दळण करताना कोण्या ललनेच्या ओठी आलेले शब्द जीवनाचं गाणं बनून प्रकटायचे. राग, लोभ, प्रीती, स्नेह, दुःख, वेदना सोबत घेऊन जात्यातून निघणाऱ्या पिठासोबत ते उमलून यायचे. मनात घर करून वसतीला असलेला आनंद, व्यथा, वेदना मनाच्या गाभाऱ्यातून ओठी यायच्या. शब्दांना सूर सापडायचे, सुरांना गाणे आणि गाण्याला जगणे. शब्द कधी आनंदाची पखरण करणारे, तर कधी वेदनांनी विव्हळणारे. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी त्यात आस्थेचे रंग भरले जायचे. कधी काळजाला चिरे पाडणारा, कधी सासर-माहेर द्वंद्वात अडकलेला, कधी सणावाराला माहेरच्या माणसाची प्रतीक्षा करणारा, कधी आईबापाने दिल्याघरी कष्टाचं जगणं जगूनही त्यांना आयुष्य मागणारा आवाज हृदयातून उमलून यायचा.

रात्रीच्या अंधाराला छेद देत प्रकाशाची पखरण करणारा विजेच्या दिव्यांचा लख्ख उजेड गावाच्या सोबतीला तेव्हा नव्हताच. रात्र काय अन् सकाळ काय कंदील, चिमण्यांची सोबत करीत उजेड हलक्या पावलांनी अंगणात उतरायचा. चिमणीच्या, दिव्यांच्या मिणमिणत्या उजेडात सकाळच्या प्रहरी जात्याला सश्रद्ध अंतःकरणाने हात जोडून बायाबापड्या दळण दळायला बसायच्या. वजनदार जातं फिरवताना कस लागायचा. दळताना बारीक पीठ यावं म्हणून जात्यावर दगडाचे वजनदार पेंड ठेवले जायचे. एकट्याने हे ओढणे अवघड असायचं म्हणून दोघीजणी समोर बसून जातं फिरवत असायच्या. सरावाने त्यांचे हात गहू, ज्वारी, बाजरी त्याच्या मुखी मूठ-मूठ ओतीत राहायच्या. त्याभोवती पांढऱ्याशुभ्र पिठाचं गोल खळं पसरलेलं. हलक्या हाताने ते डब्यात, टोपलीत भरलं जायचं. माय, मावशी, आजी, आत्या कुणीतरी जातं बराच वेळ ओढीत राहायच्या. चेहऱ्यावरील घाम लुगड्याच्या पदराने टिपत दळण दळायची लगबग चाललेली असायची. घरातील कामांची झुंबड उडालेली असायची. कामं आवरून शेताचा रस्ता धरायचा असे. घरातलं कुणी तेथूनच पीठ घेऊन चुलीवर भाकरी थापत बसलेलं असायचं. त्यातही एक घाई झालेली असायची, कारण गडी-माणसांना शेतात जातांना भाकरीचं गठुडं सोबत न्यायला लागायचं. 

घराच्या ओसरीत, विशिष्ट जागी ही जाती मांडलेली असायची. त्या जागांनाही स्वच्छतेचा गंध असायचा. जात्याभोवातीच्या जागेला शेणाने सारवणे, मातीने पोतारणे घडायचे. स्वच्छतेची काळजी जाणीवपूर्वक घेतली जायची. कुण्या रसिकमनाच्या कल्पकतेने त्याच्याभोवती गेरू, चुना वगैरे तत्सम साहित्यानिशी रांगोळीसारखे रेखांकन केलेलं असायचं. घरातल्या बायांचा जीव जात्यात गुंतलेला असायचा. सकाळी दळण दळण्याचे, दही घुसळण्याचे सरमिसळ आवाज कानी पडायचे. गायी-म्हशींचे दूध गोठ्याकडून चुलीकडे आणले जायचे. पातेल्यात ओतले जायचे. चुलीतील धुराने अख्खं घर भरलेलं असायचं. बिछान्यातून उठून आम्ही मुलं सरळ जात्याकडे पळत जायचो. पारोश्या अंगाने येथे का आलास, म्हणून हमखास बोलणं ऐकावं लागायचं. कोळशाचं बारीक वाटलेलं असेल, नाहीतर चुलीत जाळलेल्या गोवऱ्यांच्या राखेचं मंजन कोणीतरी जबरदस्तीने हातात कोंबून जायचे. ते हाती घेऊन दात घासत तेथेच बसायचो. दात घासण्याकडे तसेही फारसे लक्षच नसायचं. नजर जात्याभोवती जमा झालेल्या पिठाकडे. मऊशार पिठावर बोटांनी रेघोट्या ओढण्यात काय आनंद वाटायचा कोणास माहीत? पण पांढऱ्याशुभ्र मऊ पिठाला परत-परत स्पर्श करावासा वाटायचा. आई ओरडत राहायची. फारच झालं की, पाठीत धपाटे घातले जायचे. रट्टा बसला की, भोकाड पसरीत बसायचो. आजी, आजोबा असे कुणीतरी आईवर ओरडायचे. आजी तेथून उचलून आपल्यासोबत न्यायची. एव्हाना दात मंजनाने घासले आहेत, याचा विसर पडलेला असायचा. चुलीवर तापायला ठेवलेलं दूध ग्लासात ओतून हाती यायचे. रडतच ते ओठी लावले जायचे.

जातं बहुतेक सगळ्यांच्या आस्थेचा विषय. उदरभरणाचे पहिलं काम त्याच्यामुळेच; म्हणूनच की काय, त्याबाबत मनात एक श्रद्धा असायची. खेळतांना आम्हा पोरासोरांचा पाय नकळत जात्याला लागला की, कुणीतरी पाय पडायला सांगायचे. असे का करत असावेत, याचा उलगडा काही तेव्हा होत नसायचा. पण आज कळतं, की ही आस्था अतीव श्रद्धेतून निर्माण झालेली असायची. रोजच्या जगण्याचे अनेक धागे फिरणाऱ्या जात्याच्या वर्तुळाभोवती गुंफलेले असायचे. जात्यातून केवळ भाकारींसाठी पीठच दळले जात नसे, तर उडीद, मूग, तूर, हरभरा आदी भरडून डाळीही केल्या जायच्या. अर्थात यासाठी आणखी लहानमोठ्या आकाराची जाती असायची. पीठ दळण्यासाठी वेगळे, धान्य भरडण्यासाठी आणखी वेगळे. दळताना त्यांना विशिष्ट लयीत ओढायचे कौशल्यसुद्धा निराळे. हे सगळं सरावाने आत्मसात केलेलं, शिकलेलं. कुणाकडे कधी जातं टाकलेलं नसलं, खराब झालेलं असलं, की शेजारची कुणीतरी सायजा, बायजा दळण घेऊन हक्काने शेजारच्या घरी जायच्या. कुणाला त्यात अवघडल्यासारखे काही वाटत नसायचे. प्रायव्हसी वगैरे सारखे स्वतःची स्पेस शोधणारे आधुनिक प्रकार नसायचे. जगण्याच्या नात्यात स्वकेंद्रित जगण्याला प्रमाण मानणारी ‘स्पेस’ नावाची पोकळी नसायची. आस्था, आपुलकी, स्नेह अंगभूत गोडवा घेऊन साठलेला असायचा. त्यासोबत आपलेपणाचा हक्कही गृहीत असायचा.

मनातले सल, व्यथा, वेदनांना दळण दळताना एकमेकींशी बोलून वाट मोकळी करून दिली जायची. नव्यानेच सासरी आलेल्या मुलीच्या घरकामांची परीक्षा जात्यावरील दळण दळताना व्हायची. काही कामे तिला सफाईदारपणे करता येत नसतील, तर युक्तीच्या चार गोष्टी हक्काने सांगितल्या जायच्या. जावा, नणंदा, वहिन्या एकमेकींची थट्टा करीत राहायच्या. अशावेळी कोणी नवपरिणत वधू त्यांचं सहज सावज असायचं. मनातलं गुज एकमेकींना सांगितलं जायचं. ऐकलं जायचं. दुःखाने भरलेले डोळे आसवांना मोकळी वाट करून देत जात्यासोबत मुक्त वाहायचे. तेवढ्याच आस्थेने त्यांना संयमाचे बांध घातले जायचे. समजुतीच्या चार गोष्टी शिकवल्या जायच्या. स्त्रीचा जन्मच असा. वेदनांचा सहवास टाळूनही न टळणारा, म्हणून परिस्थितीत टिकून राहण्याची नवी उमेद, नवी स्वप्ने मनाच्या मातीत रुजवली जायची. सासरी होणाऱ्या जाचास सामोरे जाणाऱ्या सुनांना धीर द्यायचा. बाईचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी, म्हणून त्या नवख्या पोरीची समजूत काढून दुःखावर फुंकर घातली जायची. आपलं जगणंही जात्यासारखं परिस्थितीभोवती गरगर फिरणारं, म्हणून मनात आसक्तीचे दीप लावले जायचे. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणाऱ्या गोडव्याने, आस्थेने ओथंबलेल्या आश्वस्त शब्दांनी घडणाऱ्या संवादातून खचलेल्या जिवाला धीर यायचा. कधी थट्टामस्करीला उधान आलेलं असायचं. तोंडाला पदर लाऊन ओठी आलेलं हसू कोंडलं जायचं.

आज हे सगळं बदललं. कालचक्राची सोबत करीत, प्रगतीचे पंख लेऊन जग बरेच पुढे निघून आले आहे. गावात पिठाच्या गिरण्या आल्या. जात्यावर केले जाणारे दळण-कांडण भूतकाळात जावून विसावले. आतातर घराघरातून लहान चक्क्यांनी आपलं आसन मांडलं आहे. जात्यांची थकवणारी घरघर संपली. मिक्सर, ग्राईंडर, प्रोसेसर भन्नाट वेगात फिरत आहेत. त्यांच्या कर्कश आवाजात विशिष्ट लयीत चालणारी जात्यांची घरघर संपली. त्या आवाजाचा गोडवाही हरवला. त्यासोबत ओठी येणाऱ्या ओव्या, गाणी इतिहास जमा झाली. बायाबापड्यांच्या मनातील सुख-दुःख बोलून हलकं करायचं हक्काचं ठिकाण हरवलं. बोलणं थांबलं. मनातील अंधाऱ्या गाभाऱ्यात भावना आस्थेचा ओलावा शोधत आहेत. प्रगतीच्या पंख लेऊन विहार करणारी माणसं जगण्याच्या नव्या परिमाणात बंदिस्त झाली आणि मनेही आपल्याभोवती तयार करून घेतलेल्या वर्तुळात कोंडली गेली.

गावात विजेच्या दिव्यांचा लखलखाट होण्याआधी डीझेल इंजिनवर चालणाऱ्या चक्क्या आल्या. त्यावेळी त्यांचीही एक गम्मत वाटत असायची. हाती हॅण्डल घेऊन गरगरा फिरवीत इंजीन सुरु केलं जायचे. सुरु झालेल्या इंजीनमधून निघणारा धूर छतापर्यंत पाईप टाकून बाहेर फेकला जायचा. बऱ्याच ठिकाणी औषधाच्या इंजेक्शनची रिकामी बाटली विशिष्ट कोनात पाईपाच्या तोंडावर बांधलेली असायची. इंजीन सुरु झाले की, त्यातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या हवेने शिट्टीसारखा आवाज ऐकू यायचा. त्या आवाजाने चक्की सुरु झाली आहे, हे गावाला कळायचे. त्यासाठी ओरडून सांगायची गरज नसायची. ज्याच्या मालकीची चक्की असायची असा एखादाच असायचा. त्याची गावातील ओळखही चक्कीवाला म्हणूनच. पुढे सरावाने त्यांना तेच नाव चिकटायचं. अजूनही माझ्या गावात पहिली पिठाची गिरणी सुरु केली, त्या घराची ओळख चक्कीवाला अशीच आहे. आतातर गावात दोन-तीन चक्क्या आल्या. गावात पहिली पिठाची गिरणी सुरु करणाऱ्यांकडे आता ती राहिली नाही, तरी त्यांची चक्कीवाला ही ओळख काही पुसली जात नाही.

पिठाच्या गिरण्या आल्या आणि जात्यांची गरजच संपली. मिक्सर, ग्राईंडरने पाटा-वरवंटा दैनंदिन जगण्यातून हद्दपार केला. त्यासोबत घटे (जातं) पाटे (पाटा-वरवंटा) तयार करणारे, टाकून देणारेही. ही सगळी माणसं गावगाड्यातून हळूहळू उणे होत गेली. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांच्या जगण्याची नवी ओळख निर्माण केली. पण परंपरागत कौशल्यावर जगणाऱ्यांची ओळख हरवली. व्यवस्थेच्या चौकटीतून परिस्थितीने त्यांना हद्दपार केले. नियतीने त्यांच्या ललाटी जगण्यासाठी दाही दिशा वणवण करायला लावणारी भटकंती लेखांकित केली. कुणी म्हणेल गरजच काय या साधनांची आता, एवढी सगळी विज्ञाननिर्मित साधने आणि त्यांच्यासोबत चालत येणारी सुखे हाती असताना. या सगळ्या पारंपरिक वस्तूंची गरज कदाचित संपली असेलही. विज्ञानाने सुखं देणारी साधने माणसांच्या हाती दिली; म्हणून तो सर्वार्थाने सुखी झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर काही असो. कदाचित काही सुखे हाती लागलीही असतील; पण अनेकांना व्यवस्थेतून विस्थापित करून दारोदारी भटकायला लावणारं जगणं ज्यांच्या जीवनात आलं, त्याचं काय?

रस्त्यावरून ओळीने उभ्या असलेल्या ढाबा नामक संस्कृतीला सध्या बऱ्यापैकी बरकत आलेली दिसते. येथे येऊन जिभेचे चोचले पुरवण्याच्या छंदाला हल्ली खवैय्येगिरी, भोजन रसिकता वगैरे असे काही संबोधले, समजले जाते. काही ढाब्यांवर जेवण चुलीवर तयार करून दिले जात असल्याच्या जाहिराती डिजिटल पाट्यांवर वळणदार अक्षरांनी कोरलेल्या दिसतात. सामिष स्वयंपाकासाठी येथे वापरला जाणारा मसाला पाट्यावरवंट्यावर वाटून वापरला जात असल्याचं आश्वस्त केलेलं असतं. लोकांना त्या चवीची मोहिनी पडतेही. जिभेचे चोचले पुरे करता येतात. पण कष्टाच्या जगण्याला आनंदयोग मानून; या वस्तू जीव ओतून तयार करणाऱ्यांचे काय? प्राप्त परिस्थितीलाच जीवनयोग समजून जगणाऱ्यांचं काय? हे प्रश्न कदाचित कोणाच्या मनात येत असतील, नसतील माहीत नाही; पण ही माणसे विज्ञानप्रणित साधनांनी निर्माण केलेल्या सुखांच्या वर्तुळातून बाहेर फेकली गेली. या लोकांनी परंपरागत कौशल्ये वापरून तयार केलेल्या साधनांना चव निर्मितीचे श्रेय द्यायचे आणि हे काम करणाऱ्यांना सोयीस्कर विसरायचे याला काय म्हणावे?

जाते, पाटा-वरवंट्याने कधीकाळी परिसरात श्रमसंस्कार रुजवले, त्यांचं काय? ही साधने केवळ प्रासंगिक गरजपूर्तीची साधने नव्हती, तर जगण्याचं अनिवार्य अंग होती. अजूनही आठवते एखाद्या घरी लग्नकार्य असले की, पहिली खरेदी केरसुणी, माठ, सूप आदी वस्तूंची असायची. वधू-वराच्या अंगाला लागणारी हळद जात्यावरच दळली जायची. आज इव्हेंट मॅनेजमेंटच्या जमान्यातील बेगडी चमक-धमकमध्ये कदाचित या सगळ्यांची आवश्यकता उरली नसेल आणि हे करायला कोणाकडे तेवढा वेळही नसेलही. पण परंपरेचा बंध तुटला तो तुटलाच, त्याला परत सांधणे अवघड आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीच्या पात्रातून वाहताना प्रगतीच्या प्रवाहात हरवल्या. जाते त्यातीलच एक. नुसते जातेच नाही हरवले, तर त्यावर दळताना ओठी येणाऱ्या गाण्यांचे सूरही संपले आणि सोबत सांस्कृतिक अंगाने चालत येणारे संदर्भसुद्धा.

कधीतरी चुकून पाटा-वरवंटा, जाते टाकून देण्यासाठी साद घालणारा आवाज कानी येतो. पण त्या आवाजातला आत्मविश्वासही आता हरवल्यासारखा वाटतो. कोणी प्रतिसाद देईल का? या शंकेतून निर्मित संदेह घेऊन केविलवाणा झाल्यासारखा ऐकू येतो. तो ऐकून मनाच्या गाभाऱ्यात अंग आकसून बसलेल्या स्मृतींची पाने सळसळायला लागतात. एकेक आठवणी जाग्या होतात. ग्रामीण संस्कृतीचे सांस्कृतिकबंध निर्माण करणारे स्वयंपूर्ण चित्र नजरेसमोरून सरकून जाते. मनःपटलावर उमटलेल्या प्रतिमांनी क्षणभर अंतर्यामी अस्वस्थता भरून येते. पण मी यासाठी काय करू शकतो? काहीच नाही, कारण मीसुद्धा विज्ञाननिर्मित संस्कृतीने निर्माण केलेल्या प्रगतीच्या वर्तुळात फिरणारा आणि त्या गतीलाच प्रगती समजणारा मळलेल्या वाटेवरचा पथिक. प्रवास करताना मुक्कामाचे कोणतेही नवे ठिकाण शोधू न शकणारा. फारफारतर यानिमित्ताने मनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त आठवणी हात धरून धूसर झालेल्या काळाच्या सीमेवर आणून उभ्या करतात. भूतकाळ जागा होतो. आपलं असं काही निसटलेलं हाती लागल्यासारखे वाटते. पण माझ्यात, माझ्या शब्दांत कालचक्राला उलट फिरवण्याइतकी ताकद आहेच कुठे? तेवढी पात्रता असायला मी काही असामान्य कोटीतला कोणी नाही. विश्वाच्या पसाऱ्यात आहेच किती जागा माझ्या अस्तित्वाला. परिस्थितीच्या परिघाभोवती घडणाऱ्या परिवलनाला प्रगती समजणाऱ्या अनेकातला मीही एक. काळाच्या प्रवाहाला वेगळे वळण देणारा एखादा युगप्रवर्तक विद्यमानकाळी इहतली असेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही हाती काही न लागणारा. असणे संभव नाही, अशी स्वतःची समजूत काढून घेणारा. कारण विज्ञानप्रणित साधनांनी हाती लागलेल्या स्वयंघोषित सुखांची उंची वाढत जाते, तेव्हा संस्कृतीने निर्माण केलेल्या साध्याशा साधनांनी गाठलेली प्रगती संपते. प्रगतीला परिस्थितीचे पायबंद पडतात तेथे नवे भव्य, दिव्य घडण्याची शक्यता उरतेच किती? अर्थात या वर्गाने असेच पारंपरिकतेच्या चौकटीत अभावात जगावे असे चुकुनही वाटत नाही, पण यांचे जगणं उध्वस्त होताना जगण्याची नवी प्रयोजने, विज्ञानप्रणित प्रगत साधने यांच्या हाती देण्याचे उत्तरदायित्त्व आपले आहे, असे प्रगतीच्या पंखांवर स्वार झालेल्या माणसांनी मानायला नको का? चुकून कधीतरी एखाद्यावेळी परिस्थितीच्या शुष्क होत जाणाऱ्या प्रवाहाच्या पात्रातून वाहत येणारा असा आवाज कानी येतो. काही वर्षांनी तोही असण्याची शक्यता नाही. जातं, पाटा-वरवंटा काय असतो, ते पुढच्या पिढ्यांना चित्रातून दाखवावे लागेल. कदाचित तेव्हा ते यालाच क्लासिक वगैरे असं काही म्हणतील का? माहीत नाही; पण जगण्याच्या वेगात आपण आणखी काय काय हरवणार आहोत, कोणास माहीत?

Gaav | गाव

By // 7 comments:
गाव: आठवणींच्या वर्तुळातील 

शाळेत सोबत शिकणारा सवंगडी परवा अचानक भेटला. काहीतरी कामानिमित्ताने जळगावात आला होता. बऱ्याच दिवसांनी भेट घडली. रस्त्याच्या कडेनेच थांबून लागला बोलायला. रस्त्यावर उभं राहून बोलणं प्रशस्त वाटेना. म्हणून म्हणालो, “अरे, असं रस्त्यावर थांबून आपण काय बोलत उभे आहोत. घरी चल, बोलू निवांत.” मला पुढे बोलायची उसंत न देता म्हणाला, “नाही, तेवढा वेळा नाही. कामं खोळंबली आहेत. बघू नंतर कधी.” त्याच्या आर्जवी नकाराने माझ्या अपेक्षेला पूर्णविराम मिळाला. तेथून चहाच्या टपरीवर गेलो. चहा मागवला. चहा घेताना म्हणाला, “अशात कधी गावाकडे गेला होतास का?” त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात न आल्याने आश्चर्यचकित मुद्रेने पाहत राहिलो थोडा वेळ तसाच. म्हणालो, “हो, पण का रे! काही विशेष घडलं का गावाकडे?” म्हणाला, “नाही, विशेष असं काही नाही; पण हल्ली आपलं गाव किती बदललंय नाही! गावाचं गावपण उरलं नाही. आपल्या वेळचं अख्खं गाव हरवलंय असं वाटतंय. अगदी एखादा दिवस मोठ्या मुश्किलीने थांबावसं वाटतं. सगळा आपलेपणाच संपलाय. जो-तो आपापल्या कोशात दडून बसला आहे. माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत.” त्याला काय वाटले कोणास ठावूक पण बोलत होता, आपलं काहीतरी हातून निसटल्याची खंत घेऊन. चहा घेईपर्यंत काय काय सांगत होता. एकेक गोष्टी आठवत होता. मला बसस्थानकावर सोड म्हणून सांगितले. निघालो तिकडे. गाडी निघायच्या तयारीत. घाईतच गाडीत बसला आणि निघाला.

घरी आलो. पण ‘गाव बदललं, गावपण संपलं.’ हे त्याचं म्हणणं काहीकेल्या मनातून निघत नव्हतं. एका सीमित अर्थाने ते खरंही होतं. काळाचे संदर्भ बदलतात, तशा इतर काही गोष्टीही ओघाने बदलत जातात. बदल निसर्गाचा सहजभाव असल्याने ते टाळताही येत नसतात. प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही. मग आमचं गावही यास कसे अपवाद असेल! पण गाव बदललं, म्हणजे नेमका काय बदल झाला म्हणायचा त्यात. गावाचा चेहरा-मोहरा, जगणं, वागणं, सणवार, रूढीपरंपरा, माणसे असं सगळंच किंवा थोडंफार काळानुरूप बदललं. हा बदल टाळता न येणारा. मात्र घडणाऱ्या बदलात चेहरा हरवलेलं गाव त्यास नको होते. आमच्या पिढीने जगलेलं गाव अद्यापही त्याच्या मनात रुजलेलं. गावाचं निर्व्याज, साधंस जगणं स्मृतीत जपलं आहे, तेच आणि तसेच त्यास हवे आहे. हे सगळं आठवणींच्या कोंदणात ठीक आहे; पण वास्तवात असेच कसे असेल? वास्तव आणि स्वप्ने यात बरंच अंतर असतं. स्वप्नं कितीही सुंदर असली, तरी ती खरी होतीलच याची कोणाला खात्री देता येते का?

खरंतर माझ्याही मनात गावाची प्रतिमा काहीशी अशीच आहे आणि अद्यापही तशीच जपून ठेवली आहे. काळाचा पडदा दूर करून पाहताना तीस-चाळीस वर्षापूर्वीचे गाव आजही स्मृतींच्या गाभाऱ्यात नंदादीपाचा मंद प्रकाश बनून मनाचं आसमंत उजळत आहे. तिच गजबज, तोच आपलेपणा सोबतीला घेऊन. एकेक आठवणी अनमोल ठेवा आहेत. आजच्या बदललेल्या गावाशी तुलना करताना गावाचं त्यावेळचं साधसं जगणं रमणीय वाटतं. सगळ्या देखाव्यांपासून, चमकधमकपासून कोसो दूर असणारं; पण आपलेपणाचा ओलावा घेऊन नांदणारं. सात्विक जगण्याला संस्कार समजणारं. साधेपणाचा साज लेवून नटलेलं. कोणतेही अभिनिवेश धारण न करता साधंसरळ जगणं, हीच गावाची ओळख. जगण्याच्या दैनंदिन व्यवहारात गुंतलेलं, पण कोणताही गुंता न करता जगणारं गाव आपल्या संथ लयीत चालत राहायचं. कोणाला कसली घाई नाही आणि पुढे निघायची मनात आसक्तीही नाही. लहानमोठ्या कुरबुरी, हेवेदावे असतील; पण मोठ्या कलहांपासून चार हात लांबच असायचं. शेतशिवारात प्रामाणिक कष्ट करायचं. निढळाच्या घामाने कमावलेल्या भाजीभाकरीची गोडी अनुभवत जगायचं. तूपसाखरेचा मोह मनाला पडला, तरी अशा मृगजळापासून सुरक्षित अंतरावर राहायचं. कोणत्यातरी सणवाराच्या निमित्ताने मुखी पडणारा गोडधोडाचा घास मनाच्या प्रसन्नतेची परिसीमा असायचा. ‘मन करारे प्रसन्न...’ या संतवचनावर विश्वास ठेवून वर्तणारे आणि आपल्या ओटीत पडलेले चिमणसुख वरदान समजून सुखाने नांदणारे. कधीकाळी बहुतेक गावे अशीच असायचीही, साधी तरीही सुंदर. अशी गावं गावपणाचा परिघ समृद्ध करीत होती.

काही दिवसापूर्वी गावी जाणं घडलं. एव्हाना गावी जावं तेव्हा प्रत्येक फेरीत काहीना काही बदल झालेले दिसतात. आताही ते दिसले, पण या बदलांना आपलेपणाचा स्पर्श नसल्याचे का कोण जाणे उगीचंच वाटत राहते. गावात प्रवेशताना वाटेवरचा कचरा नेहमीप्रमाणे स्वागताला सज्ज. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उकिरड्यांनी आपापली आसनं धारण केलेली. गटारीच्या पाण्याच्या मुक्त संचाराने त्यांना घडणारा अभिषेक. पाण्याऐवजी गटारी कचऱ्याने तुडुंब भरलेल्या. हे चित्र काही अद्याप बदलायला तयार नाही. स्वच्छता अभियानाने येथे शरणांगती पत्करलेली. हे सगळं पाहून मनास वाटत होते, गावात कोणालाच अशा अस्वच्छतेची खंत वाटत नसेल का? आरोग्याच्या प्रश्नांविषयी कोणी काहीच ऐकले नसेल का? की ही आमच्या सार्वजनिक वर्तनाची सुधारित आवृत्ती आहे?

रस्त्याने चालत पुढे येतो. शासकीय सुविधांमुळे गावातील मातीचे रस्ते इतिहासात जमा होऊन त्यांचं कॉंक्रिटीकरण झालं; पण त्यांच्या नशिबी असणारे दुर्दैवाचे भोग काही संपले नाहीत. दर दहाबारा पावलांवर उखडलेले. तुंबलेलं पाणी दारासमोरून वाहत नाही म्हणून कोणीतरी मध्येच कुदळचे घाव घालून जखमी केलेले रस्ते अंगावर नागमोडी नाल्यांचे गोंदण करून पहुडलेले. घरात पाण्याचा नळ घेतला म्हणून त्यासाठी केलेल्या खड्ड्यांचे सौभाग्य ललाटी मिरवणारे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या घरांचे चेहरे मात्र देखणे झालेले. पूर्वीची धाब्याची, मातीची घरं जाऊन सिमेंट, विटांची पक्की घरं तयार झाली. कुणाची कृपा, कुणाच्या आशीर्वादाची अक्षरे माथ्यावर मिरवणारी. परिसरातल्या निष्काळजीपणात घरांची स्वच्छता ठळकपणे नजरेत भरत होती. येथेही आपपरभाव अधोरेखित केला जातच होता. वैयक्तिक चेहरा सुंदर; पण सार्वजनिक चेहरा कुरूपपणाकडे वळणारा.

थोडं पुढे येऊन मंदिरापाशी थांबलो. त्याचाही कायापालट झालेला आहे. आस्थेचा, भक्तीचा टिळा ललाटी लेऊन वर्षानुवर्ष उभं असणारं लहानसं मंदिर आता इतिहास जमा झालं. त्याचं साधेपणातील सौंदर्य संपलं. लोकांनी सढळ हातानी केलेल्या मदतीने आधुनिक देखणा लूक घेऊन सुंदर झालं. गाभाऱ्यातल्या देवालाही समृद्धी आली. त्याचंही स्टेटस सुधारलं. पण माणसं आपलं सार्वजनिक वर्तनाचं स्टेटस का बदलू शकली नसतील? या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मला सापडत नाहीये. मंदिराच्या भव्यपणात त्याच्या आसपासचा मोकळा परिसरही बंदिस्त झाला आणि तेथल्या मोकळ्या जागी खेळणारी पावलं थबकली. कधीकाळी गावातील मुलांच्या खेळण्याने गजबजलेला हा परिसर आज सुनासुना वाटत होता. आमच्या लहानपणातील खेळत्या पावलांना मन उगीचंच तेथे शोधत राहिले. गावाच्या मध्यावर असणारं हे मंदिर गावातल्या धार्मिक आस्थेचे केंद्र. कुणाघरी शुभकार्य असली की, पहिला कौल येथेच लावला जायचा. सुगीच्या दिवसात शेतात येणारे पहिले कणीस आधी देवाच्या पायाशी वाहिले जायचे. नित्यनेमाने देवाचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरवात करणारे सगळ्या ऋतूत येथे दिसायचे. रात्रीच्या प्रहरी भजनांचा भक्तीरस मिणमिणत्या दिवट्यांच्या प्रकाशात सुरांचे रंग भरायचा. पूजापाठ, पोथ्या-पुराणांचे वाचन, सप्ताह, भंडारा असे काही ना काही वर्षभर सुरु असायचे. परिसर नेहमीच माणसांच्या राबत्याने जागा असायचा. गावाचं जगणं देवाच्या आशीर्वादाने चाललेलं असायचं. त्यातही एक प्रामाणिक श्रद्धा असायची. मंदिर जेवढा आस्थेचा विषय होता तेवढाच उर्जेचाही. मंदिराच्या मोकळ्या जागी खेळणाऱ्या मुलांचा गलका वाढून भांडणं लागली की, कोणीतरी हमखास रागावणार. पण त्यात रागापेक्षा प्रेमच जास्त असायचं. प्रगतीच्या वाटेने आलेल्या बदलांनी हक्काने रागावणंही संपलं. रागावणारेही निसर्गनियमांच्या शिड्या धरून चालते झाले. आहेत काही, ते खूप थकलेले, आपली अखेर शोधणारे.

मंदिराकडे पाहत उभा होतो. मंदिराच्या ओट्यावर माणसांचं हल्लीही थांबणं असतं. गावातील काही जण तेथे बसलेले. त्यातील एकाने विचारले, “काय सर, काय बघतोय मंदिराकडे असं? पहिल्यांदा पाहतोस का?” मंदिराच्या आजूबाजूने पाहत त्यांना म्हणालो, “नाही, पहिल्यांदा वगैरे पाहत नाही. पण हे मंदिर, हा परिसर कसा नीटनेटका ठेवलाय तुम्ही लोकांनी. मग गावात येतानाचे रस्ते, परिसर असे का? कोणालाच काही करावेसे का वाटत नाही, याचा विचार करतोय.” माझ्याकडे पाहत त्यातला एक जण म्हणाला, “सर, तुझं म्हणणं ठीक आहे, पण हे सगळं करेल कोण? येथे कोणालाही सांगून पाहा, एकच उत्तर मिळेल, तू तुझं पाहा ना! आता सांग, अशानं काय होणार आहे. येथे प्रत्येक जण स्वतःला मोठा समजतो. कधीकाळी ठीक होतं, कुणी जुणंजाणतं माणूस बोललं की ऐकून तरी घेत होतो. आता काही कुणाला तशी गरज उरली नाही.” त्याचं म्हणणं ऐकून खंत व्यक्त करीत बोललो, “म्हणजे, असं कसं! आरोग्याचे प्रश्न काय एकट्याची गरज असते का? गावातील स्वच्छतेचा प्रश्न सार्वजनिक आहे, तो सर्वांनी सोडवायचा.” मी माझं मत मांडलं, पण मत कितीही चांगले असले तरी त्याचा उपयोग नाही, असाच सगळ्यांचा सूर होता.

असं का होत असावं? या प्रश्नांचा भुंगा काही केल्या पिच्छा सोडायला तयार नव्हता. मला वाटतं अशा का नावाच्या प्रश्नांचं उत्तर आपल्या मानसिकतेत दडलंय. जगण्यातील साधेपणाला तिलांजली दिली जाते, तेव्हा बेगडी जगणंच देखणं वाटायला लागतं. अशा जगण्या-वागण्याला माणसं आपलं म्हणायला लागली आहेत. जगण्याची परिमाणं बदलवून माणसं स्वतःला तसे सेट करून घेत आहेत. आपलं सुख आणि आपण या सीमित वर्तुळाला जीवनाचा परिघ करून वागणं घडत असेल तर त्यास कोण काय करेल? सगळ्याच व्यवहाराच्या परिभाषा बदलत आहेत. पैशाला माणसापेक्षा अधिक मोल आले आहे. श्रीमंतीची व्याख्याही बदलून ज्याच्याकडे पैसा अधिक तो लोकप्रिय ठरतो आहे. पूर्वी दारासमोर उभ्या असलेल्या बैलगाड्या आणि बैलजोड्या गावातील आसामी ठरवीत असायच्या. दारासमोरून बैलगाड्या जाऊन ट्रॅक्टर, मोटारसायकली उभ्या राहिल्या. गावात पैसाही बऱ्यापैकी आला. जागतिकीकरणाच्या वाटेने जगण्याच्या दिशा समृद्ध केल्या; पण माणसांची मने मात्र संपन्न होण्याऐवजी संकुचित होत गेली. विज्ञाननिर्मित सुखसाधनं आपणाकडे असावीत, म्हणून अहमहमिका सुरु झाली. आमच्या लहानपणी रेडिओ श्रीमंतीचा निकष असायचा. आज स्मार्टफोन, संगणक, एलइडी टीव्ही वगैरे साधनं असलेली घरं प्रतिष्ठाप्राप्त ठरली आहेत. घरांचा चेहरा सुंदर झाला; पण माणसांचा विरूप होत आहे. आस्था, आपुलकी शब्दांतला ओलावा आटत चालला आहे. पैशाने माणसांचा ताल, तोल आणि तंत्र बदलवलं.

गावागावात राजकारण शिरलं आणि माणसांच्या जगण्याचे रंग पालटले. पूर्वी जत्रेच्या निमित्ताने गावातून तमाशाचे फड रंगायचे. आता राजकारणाने गटतट उभे करून शहकाटशहाचे खेळ रंगू लागले आहेत. कोणत्यातरी निवडणुकीच्या निमित्ताने मने कलुषित होतात. भावकीत दोन गट-तट तयार होणं आता कोणी मनाला नाही लावून घेत. त्याहीपुढे मजल गाठून एकाच घरात दोन भाऊ, दोन पक्षांचे कार्यकर्ते बनतात आणि एकमेकाला पाण्यात पाहतात. कोणत्यातरी संघटनांच्या, पक्षांच्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे जागोजागी उगवलेल्या पाट्या गावात प्रवेशताना हार्दिक स्वागत करू लागल्या आहेत. कोण्यातरी दादा, भाऊ, आप्पाचा वाढदिवस पोस्टर बनून भिंतीवर नाहीतर झाडाच्या फांदीवर लटकतो आहे. कधीकाळी आपलेपणाच्या संवादाने हितगुज करणारा गावाचा पार पोरका वाटायला लागला आहे. शेतात जाण्याचा कंटाळा केला म्हणून पारावरच बापाच्या हाताचा मार खाणारी पोरं आता गावात राहिली नाहीत. आहेत ती स्मार्टफोनच्या मोहजालात गुंतली आहेत. गावातल्या निवडणुका आखाडे बनल्या. विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकाही आमदार, खासदारांच्या निवडणुकांसारख्या लढवल्या जात आहेत.

ग्रामीण जीवनाची आयडेंटीटी असणारे गुरावासरांनी भरलेले गोठे. त्यांची गजबज कुठल्या कुठे पळाली. गोठ्यात बांधलेल्या बैलजोड्या मालकाची आर्थिक क्षमता प्रदर्शित करायच्या. आज बैलांचीच फारशी गरज उरली नाही, तेथे गोठ्यातील इतर जनावरांना कोण सांभाळतो. गावात एकवेळ दूध मिळणार नाही, पण कोणत्याही ब्रान्डची कोल्ड्रिंक्स सहज मिळतात. रस्त्याने प्रवास करणाऱ्या पांथस्थांसाठी पूर्वी पाणपोया असायच्या. आता परमिटरूम, बियरबार नामक तीर्थस्थळे दाटीवाटीने उभी राहिली आहेत. ओठावर मिसरूडही न फुटलेल्यांची पावलं तिकडे वळत आहेत. पूर्वी गावात मद्यपान करणारा कोणी असला की, रस्त्याने लपतछपत घरी येवून गुपचूप पडायचा. व्यसन करणाऱ्यासही मोठ्यांचा धाक वाटायचा. हल्ली बऱ्याच गावात हातभट्टीच्या कौशल्याला बरकत आलेली दिसते. विदेशी पेयाच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी हाकेच्या अंतरावर सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांची सोय झाली आहे.

गावात लाईट येऊन बरेच दिवस उलटले. दिव्यांचा लख्ख प्रकाश रस्त्यावर ओसंडून वाहतो. चिमण्या, कंदील अडगळीत गेले. लोडशेडिंगपासून मुक्तीसाठी इन्व्हर्टर, बॅटऱ्या आल्या. पणत्यांनी कधीच जीव सोडला आहे. दिवाळीच्या उजेडापुरता त्यांचा सहवास उरला. पूर्वी ग्रामपंचायतीचा शिपाई गावातील रस्त्यावरचे खुटकंदील रॉकेल भरून रोज पेटवून जायचा. आता स्ट्रीटलाईटने त्याचीही अवश्यकता उरली नाही. जात्यावर दळण दळण्याचा, नदीवरून घागरी, हंडे भरून पाणी आणण्याचा प्रश्नच लाईटने संपवला. सकाळच्या प्रहरी ऐकू येणाऱ्या जात्यावरच्या ओव्या मुक्या झाल्या. दही घुसळण्याचे आवाज विजेच्या प्रकाशात हरवले. गोठ्यात गायी-म्हशीच नसल्याने दूधदुभते नाही आणि आहे तेथे ते बाजारात जात असल्याने घरातल्या शिंक्यांवर ठेवलेलं दही, दूध, लोणी आता शोधूनही दिसत नाही. असलेच काही शिल्लक ते फ्रीजमध्ये जाऊन कुडकुडत बसलेय. नसेल तेथे कोणत्यातरी डेअरीतून येऊन तेपण गावात मिळायला लागले आहे. दूधदुभते शब्दातला संपन्न आशय संपून तो गरजेपुरते असा झाला आहे.

शेतीचे आधुनिक तंत्र आणि यंत्र शेतकऱ्याच्या सोबतीला आल्याने शेतातल्या कामांची लगीनघाई संपली आहे. एखाद्याकडे हंगामाच्या दिवसात बैलजोडीची, काम करणाऱ्यांची अडचण असली तर मदतीला जाण्याचे उदारपण उरले नाही. शेतीशी निगडित असणारा एक श्रमजीवी वर्ग कधीकाळी गावातच सुखनैव नांदत होता, त्यांचं जगणं यांत्रिकीकरणाने उजाड होत गेलं. शेतकऱ्याकडे वर्षभराच्या कामाचा मोबदला हक्काने घेणाऱ्या अलुतेदार-बलुतेदारांच्या जगण्याच्या वाटा सैरभैर झाल्या. लोहाराचा भाता वेल्डिंगच्या दुकानांनी विस्थापित केला. कुंभाराचा आवा स्टीलभांड्यांच्या आवाजात आणि फिल्टर पाण्याच्या जाहिरातीत कधीच हरवला. सुतारनेट नेट लावूनही उभं राहण्याच्या परिस्थितीत उरलं नाही. पेरणीच्या दिवसातल्या औजारं तयार करताना तेथे घडणारा संवादही संपला. सोबत आपलेपणही. भांड्यांना कल्हई करणारा, बुडे लावणारा चुकूनही दिसत नाही. सकाळ जागवत येणारा वासुदेव, भविष्य सांगणारे, रोमडी लावणारे, अस्वल, नंदीबैल घेऊन येणारे, माकडवाले, कसरतीचे खेळ करणारे, सुयाबिब्बे विकायला येणाऱ्या बाया यातलं हल्ली कोणी दिसतंच नाही.

शेतीकामाला यंत्रे आल्याने ना मळणी राहिली, ना उपणणी. खळे तयार करायची गरजच संपली. सगळे कसे वेगात होऊ लागले; पण या वेगानेच माणसांच्या जगण्याचा आवेग संपवला. सणावाराला घडणारे संस्कृतीचे दर्शनही बदललं. त्यातही आधुनिकतेने बेगडी झगमग आली. कळत नकळत सगळ्याच गोष्टींचे सीमोल्लंघन घडत आहे. दसऱ्याला दिल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानांतला स्नेह संपला. दिवाळीचा प्रकाश विजेच्या दिव्यांनी सजायला लागला आहे. उकिरड्यावरसुद्धा आस्थेने लागणाऱ्या पणत्यांतील आपलेपणाचा स्नेह हरवला. संक्रांतीचा गोडवा कमी झाला. पोळा, होळी, अक्षयतृतीया, नागपंचमी यासारखे सण आपलं ग्रामीण साजाचं अस्तित्व हरवून बसले आहेत. एक सोपस्कार म्हणूनच उरले आहेत. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत असायचं त्या निमित्ताने भरणाऱ्या जत्रा माणसांच्या आस्थेचा आणि संवेदनशीलतेचा उत्कर्षबिंदू असायचा. मॉलच्या गर्दीत जत्रेतली माणसं हरवली आहेत. बर्गर, पिझ्झाची चव घेणाऱ्या पिढीला जत्रेतल्या गुळाच्या जिलेबीची आणि गोडशेवची चव कशी कळेल. काळाच्या ओघात खाद्यसंस्कृतीही बदलली. मोसमानुसार येणाऱ्या रानभाज्या, खाद्यपदार्थ भूतकाळ झाले आहेत. 
    
तमाशा, कीर्तन, आख्यान आधुनिक काळात लोककला म्हणून अभ्यासाचे विषय झाले आहेत. ढोलकीच्या आवाजाने बेधुंद होऊन भिरकावले जाणारे फेटे आता कोणी वापरत नाही. टीव्हीच्या रंगीत दुनियेने माणसांची मने आकर्षित केली. मुलांचं सायंकाळी गल्ल्यांमध्ये हुंदडणं टीव्हीवरील कार्टून्सनी थांबवलं. माणसे शेतातून परत आल्यावर ओसरीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करायला विसरली. काहीही रियल नसणाऱ्या टीव्ही सिरियल्समध्ये गुंतली आणि तेथेच हरवली आहेत. आमच्याकाळी सायंकाळी मुलांचा खेळण्याचा धिंगाणा अंधाराच्या संगतीने सुरु असायचा. आई जेवणाला बोलावून थकायची; पण खेळणं काही थांबत नसायचे. माणसे गल्लीत खाटा टाकून गप्पा करीत बसायची. पाऊसझडीच्या दिवसात ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात शेतशिवार, गुरंवासरं, हंगाम असं काही काही बोलत असायची. एखाद्याच्या शेताला फटका बसायचा, अशावेळी कोणीतरी धीर द्यायचे. त्याच्या मनाला उभारी यायची. एक आस्था जगायची. बोलण्याने मने हलकी होत जायची. नकळत स्नेह वाढायचा. त्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज नसायची. आज हे सगळं थांबलं आहे. एक उदासपण परिसरावर पसरलेलं आहे. असं किती आणि काय काय आम्ही या बदलांमध्ये हरवलंय कोणास ठावूक.

आपलेपणाचा ओलावा हल्ली सगळीकडेच वरचेवर कापरासारखा उडत चालला आहे, असे उगीचच वाटायला लागले आहे. आपलेपणाभोवती कोणतीतरी अदृश्य चौकट उभी राहते आहे. या चौकटीने आतले एक आणि बाहेरचे एक अशा दोन जगात विभागणी केलीय. आपलेपणाच्या ओलाव्यातून पाझरणारा माणुसकीचा झरा आटत चालला आहे. चौकटींबाहेरील जग माणसांना सैरभैर करते आहे. आपलं काहीतरी शोधण्यासाठी माणसे वेड्यासारखी धावत आहेत. धावताना हेलपाटत आहेत. धावून धाप लागत आहे, तरी आभासी सुखांमागे मनाचा वारू मुक्त उधळतोय, तोंडाला फेस येईपर्यंत. आपण असे का धावत आहोत? आपणास काय हवे? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची गरजच उरली नसल्यासारखे. अर्थात याला काही अपवाद जरूर आहेत; पण अपवाद म्हणजे काही नियम नसतो. कालाय तस्मै नमः म्हणतात. काळाची गती जाणून प्रगती करतो तो टिकतो बाकी संपतात, हे मान्य. पण काळ अनंत, अगाध असला तरी त्याच्या उदरातून निर्माण होणारा स्नेह, सात्विकता, संस्कार, सौंदर्य हे संस्कृतीचं संचित असतं. संस्कृतीने हाती दिलेलं हे पाथेय सोबत घेऊन जगण्यात प्रकटणारा साधेपणा हीच माणसांची खरी दौलत असते. माणसांच्या जगण्यात बदलांची गती असावी, प्रगतीही असावी; पण शेकडो वर्षाच्या मंथनातून हाती लागलेल्या मूल्यांचं मोल देऊन नाही.
***

Anvay | अन्वय

By // 10 comments:
अन्वय आत्ममग्न असण्याचा

टीव्हीवर कार्यक्रम पाहत निवांत पहुडलेलो. शेजारीच मोबाईल पडलेला. रात्री दहा-अकराची वेळ असावी. फेसबुक, व्हॉटसअप, हाईकची घरं शोधत कुठून कुठून येणारे मॅसेज इनबॉक्स मध्ये येऊन धडकतायेत. वेगवेगळ्या रिंगटोन्सचा आवाज आपल्या आगमनाचा सांगावा घेऊन येतायेत. त्या आवाजांनी लक्ष विचलित होते. कोणते मॅसेज आलेयेत, हे पाहण्यासाठी उत्सुकतेने मोबाईल उचलतो. एव्हाना इनबॉक्समध्ये येणाऱ्या आगंतुक संदेशांची गर्दी बरीच वाढत चालली आहे. मॅसेज चाळताना मोबाईलमधील संपर्क नामावलीत आसनस्थ असणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याच्या नावाकडे लक्ष गेले. सहसा कोणाला मॅसेज न पाठवणारा हा गडी. ठरवून मॅसेज पाठवतो म्हणून कुतूहल जागे झाले. वाचून पाहूया, म्हणून पाहिला. ‘संपर्कमाध्यमे: किती उपयुक्त किती अनउपयुक्त’ याबाबत त्याला काही मुद्दे हवे होते. कुठल्यातरी निबंध, वक्तृत्त्व स्पर्धेत त्याचा चिरंजीव सहभागी झाला होता. म्हणून ते पाठवण्याची विनंती केलेली. तो मॅसेज वाचून क्षणभर मनाशीच हसलो. मीडियाचे माध्यम वापरून तू तरी काय करतो आहेस? असा प्रश्न त्याला विचारावासा वाटला, पण तो मोह टाळून त्याच्या समाधानासाठी दिले काही मुद्दे पाठवून.

निमित्त म्हणून हाती घेतलेल्या मोबाईलच्या मायाजालात एव्हाना नकळत गुंतत गेलो. आलेले मॅसेज वाचतांना त्यात हरवलो कधी ते कळलेच नाही. अर्थात हेही नेहमीचेच. एकदा का या मोहजालात गुंतले की, कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेल्या किटकासारखी स्थिती होते. कितीही सुटायचा प्रयत्न करा मुक्तता होणे अवघड. गुरफटणेच जास्त. समोर टीव्हीवर जाहिरातींचा अखंड रतीब सुरु. त्यांचा गलका वाढलेला. प्रत्येकजण आपलेच उत्पादन कसे उत्तम, हे पटवून सांगतोय. ते सांगण्यासाठी गरज असली काय, नसली काय, तरी आखीव, रेखीव देहाच्या लावण्यवती लचकत, मुरडत सुहास्य वदनाने पडद्यावर येतात. नाजूक किणकिणत्या आवाजाने काही सेकंदाचा संवाद साधतात. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही टीव्ही घेतला, त्यासाठी डिश आणला तर आम्ही ठरवू तेच पहा, हे त्यांनी परस्परच ठरवलेलं. कार्यक्रम पाहण्यासाठी महिन्याचे काही पैसे तुम्ही मोजत असलात तरी. दुसरा विकल्पच नसल्याने आलिया भोगाशी... म्हणत समायोजन साधणे एवढेच दर्शकाच्या हाती असते. या जाहिराती कितीजण मनापासून पाहतात, ते जाहिरातदारांनाच माहीत. ब्रेकमध्ये मोबाईल हाती घेऊन बसतो. मोबाईलच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित झाल्याने त्या आरडाओरडीचा परिणाम गोंगाटाशिवाय दुसरा शून्यच. मॅसेज एकेक करून वाचले जातायेत. काही आधी, काही नंतर एवढाच काय तो फरक.

मोबाईल आवश्यक की अनावश्यक, हा वादाचा विषय असू शकतो. त्याचं समर्थन करणारे तो दैनंदिन जीवनाची अनिवार्य आवश्यकता कसा ते आग्रहाने सांगतात. विरोधी मत असणारे हे उगीचच ओढवून घेतलेलं विकतचं दुखणं असल्याचं पटवून देतात. कुणी काही म्हणाले, नाही म्हणाले तरी यामुळे परिस्थितीत फारसा काही फरक पडत नाही. ज्याला जे करायचे, ते तो करतो, हेच वास्तव आहे. तसे नसते तर स्मार्ट झालेल्या मोबाईलने माणसांच्या मनांवर एवढी मोहिनी घातलीच नसती. घरात एकवेळ पुरेशा सुविधा नसल्या तरी चालेल; पण मोबाईल असलाच पाहिजे, हा सार्वत्रिक आग्रह. कधीकाळी संवादापुरता सीमित असणारा मोबाईल तंत्रक्रांतीच्या मार्गाने विकसित होत स्मार्ट झाला; पण माणसे तंत्रज्ञानाचा वापर करताना आपला अंगभूत स्मार्टनेस विसरली. महिन्यामहिन्याला बदलणाऱ्या त्याच्या रंगरुपाने विचलित झाली. कंपन्यांमधील तीव्र व्यावसायिक स्पर्धेतून तो नुसता स्मार्टच नाही, तर सुंदर आणि स्वस्तही झाला. संवादाव्यतिरिक्त संप्रेषणाच्या साऱ्या प्रवाहांना आपल्यात सामावून घेताना प्रतिष्ठेचे प्रतीक बनला. नवा मोबाईल, त्याचे नवे मॉडेल हाती असणे प्रगती, तर जुन्या मॉडेलसह वावरणे तंत्रक्षेत्रातील मागासपणा समजला जातोय.

काळासोबत तंत्रज्ञानही कूस बदलते आहे. ते आवश्यकही आहे. तंत्रज्ञानाला परिणत संवेदनांचा स्पर्श असला, तर ते उपयुक्त असते, याबाबत कुणाच्या मनात संदेह असण्याचे कारण नाही. हल्ली सर्वच क्षेत्रात संवेदनांचा प्रवास उतरणीला लागल्याचे बोलले जाते. विश्वाच्या पसाऱ्यात माणसांचे वेगळेपण अधोरेखित करणारे काही असेल, तर त्याच्याजवळ असणारे संवेदनशील मन. मनाचे व्यापार प्रसंगोत्पात कसे असतील, असावेत; याचं विश्लेषण मानसशास्त्रज्ञ करतील. पण हल्ली संवेदनांचा अर्थच मानसशास्त्रज्ञांनाही कळणे अवघड होत चालले आहे की काय, असे वाटण्याइतपत माणसांचे विचार गोठत चालले आहेत. भावना बोथट होत आहेत. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातात मदत करा, म्हणून फलक समोर दिसत असतात. दुर्दैवाने रस्त्यावर एखादा अपघात घडतो, तेव्हा मदती ऐवजी कुणीतरी आपल्याकडील मोबाईलमध्ये रक्ताळलेले चेहरे चित्रांकित करण्यात गुंतलेला असतो. त्याला ते फॉरवर्ड करायची घाई झाली असते. अपघातग्रस्त मदतीची याचना करीत अखेरच्या आचाक्यांकडे सरकत असतो आणि याच्या मोबाईलचा कॅमेरा झूम होऊन वेदनांनी विव्हळणाऱ्या चेहऱ्याजवळ पोहचत असतो. कुठलं हे आपलं माणूसपण? अशावेळी विचारांना थोडातरी वाव नसावा का? की माणसांची मनेही बर्फासारखी गोठत चालली आहेत?

कुणीतरी तो-ती कुठल्याशा तरल क्षणी एकमेकांच्या समीप येतात. स्नेहाच्या रेशीमधाग्यांचे गोफ विणले जातात. सहवासातून सहजपणे जवळीक वाढवण्याचं काम निसर्ग करीत राहतो. माणसं त्याला प्रेम, मैत्री, स्नेह वगैरे अशा काही गोंडस नावांची लेबले लावतात. झोपाळ्यावाचून झुलणाऱ्या क्षणांना सोबत घेऊन मने स्वप्नांच्या आकाशात विहरत असतात. त्या हळुवार क्षणांना स्मृतीच्या कोंदणात कायमचे कोंडण्याचा मोह ठरवूनही टाळता येत नाही. कॅमेराच्या डोळ्यांनी दृश्ये नजरबंद होतात. टिपलेल्या छब्या स्वतःच्या मर्जीने फेसबुकच्या वॉलवर चिटकवल्या जातात. अर्थात हा स्वखुशीचा सौदा असला, तरी त्याला सर्वजनिकतेचा स्पर्श लाभतो, तेव्हा संस्कारांच्या सीमारेषांचे सीमोलंघन घडते आहे का, हे पाहण्याचा विचार मनात येतोच असे नाही. हवे नको ते कॉमेंट्स ललाटी मिरवत त्यांचा प्रवास घडत राहतो. आप्त, मित्र, स्नेही अशा मार्गावरून प्रवास करीत राहतो. त्याच त्या छापाचे अर्थहीन लेबले ललाटी लावून त्यास अप्रतिम म्हणण्याची अहमहमिका लागते. आशयघन शब्दांचा दुष्काळ असलेल्या फालतू कॉमेंट्सची रेखाटने करीत ती पोस्ट भटकत राहते. कधी कुण्या छुप्या नजरेचा पाठलाग घडत राहतो. नको तितक्या समीप आणणारे क्षण कॅमेराच्या करामतीने कंटकांच्या कराल हाती लागतात. आणि पुढचा वेदनादायी प्रवास सुरु होतो. ते सार्वजनिक होताना कुणा अश्राप जिवाचे आयुष्य पणाला लागते. विकृत मानसिकता धारण करून वावरणाऱ्या विचारांचे विकृत शब्द एखाद्या पोस्टवर शब्दांकित होऊन जटिल प्रश्न निर्माण करतात. छुप्या नजरेने कॅमेरा कुठे डोकावेल, हे सांगणं ब्रह्मदेवालाही अवघड आहे. सार्वजनिक ठिकाणी सावज हेरण्यासाठी विकारग्रस्त नजरा भिरभिरत असतात. कपड्यांच्या दुकानातील ट्रायलरूम्सपासून हॉटेल्समधील रूम्सपर्यंत. तेथील मिनिटाच्या चित्रीकरणाने अनेकांच्या आयुष्याची झालेली वाताहत आपण ऐकतो, तेव्हा मनात विचार येतो, ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’

डोंगराच्या सुळक्यावर बसून मुलांनी काढलेला सेल्फी काही दिवसापूर्वी सर्वत्र संचार करीत होता. पाय खाली सोडून ही मुले बसली होती तेथून शेकडो फूट खोल दरी खाली. पाहणारा अवघडून जावा असे दृश्य. सेल्फी काढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण कोणी जगज्जेते सिकंदर, नेपोलियन असल्याचे भाव. एका क्षणाची चूक आणि तिचे भीषण परिणाम काय असू शकतात, हे न समजण्याइतपत ही पोरं विचारांनी वंचित असतील का? सेल्फीच्या नादात जीव गमावणाऱ्यांची उदाहरणे काही कमी नाहीत. जगात रोज लाखोंच्या संख्येने सेल्फी माध्यमांतून फिरत असतात. उगीचच वेडेवाकडे चेहरे करून, विक्षिप्त हावभाव करीत  काढलेली छायाचित्रे फॉरवर्ड करून त्यांना लाईक्स, कॉमेंट्स किती येतील, याची वाट पाहणारे अनेक वेडे जगात आहेत. सतत सेल्फी काढून स्वतःला मिरवत राहावसं वाटणं मनाचा असमतोल प्रदर्शित करीत नाही का? सेल्फी आजार होऊ पाहतो आहे. वैयक्तिक जीवनातील कोणत्या गोष्टी सार्वत्रिक कराव्या, याचेही तारतम्य प्रसिद्धीसन्मुख राहणाऱ्यांना नसावे का? अशा माणसांना स्थलकालाचे काही भान नसावे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या वर्तनात दडलेले असते. माणसाला मुळात मिरवण्याची हौस असतेच. तो कितीही नाही म्हणत असला तरीसुद्धा. कोणीतरी आपल्याला पाहतो आहे, आपल्या वर्तनाला अधोरेखित करतो आहे. हे विचार सुखावणारे असतात. हल्ली मिरवण्यासाठी अनेक प्रगत, अधिक वेगवान साधने हाती आल्याने मिरवणूक सुलभ झाली आहे, हेही सत्यच.

काही दिवसापूर्वी माध्यमांच्या संदर्भात आम्हा मित्रांमध्ये बोलणे सुरु असताना माझ्या एका स्नेह्याने त्याच्या मित्राच्या वर्तनविषयी त्याला आलेले अनुभव सांगितले. म्हणाला, स्वतःभोवती प्रसिद्धीचे आभासी वर्तुळ तयार करून त्यातल्या मृगजळी सहवासात रमणारा हा माणूस. त्याच्या स्वभावाचे अनेक परिचितांनी अनेक मार्गांनी विश्लेषण केले. या माणसाबाबत सगळीकडून उत्तर एकच, स्वतःला मिरवून घेण्यापलीकडे याच्याकडे आणखी काहीही नाही. काहींना मिरवण्याची हौस असते, त्यातलाच हा एक. काहीही करेल, पण प्रसिद्धीच्या प्रकाशात आपण राहायलाच हवे, असे वाटणारा. तीच जगण्याची निदान आपल्यापुरती तरी सुयोग्य रीत मानणारा. कुणी निंदा अथवा वंदा... असे याचे वावरणे. फेसबुकवर शेकडो मित्र, त्यांचे हजारो लाईक्स, व्हॉट्सअपवर एवढे मित्र, त्यांचे असे गृप, हे सांगण्यात श्रीमंती मानणारा. आत्मस्तुतीत रमणारा. स्वतःसाठी अनेक बिरुदावल्या लावून घेणारा. समोरची माणसे आपलं निरीक्षण करतायेत, वर्तनाचे विश्लेषण करीत आहेत. ते काय म्हणतील, याची जराही तमा न बाळगणारा. बरे कुणी समजावून सांगितले, तरी वर्तनात काडीचाही फरक न पडणारा. अशी माणसे शेकड्याने आपल्या आसपास संचार करीत असतात. समाज यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतो. आत्ममग्न माणसांसाठी माध्यमे मदतीला धावून आली आहेत. व्हर्च्युअल जगात रमणाऱ्यांना अॅक्च्युअल जगाशी डिसकनेक्ट करणारी मनोवृत्ती अमरवेलप्रमाणे वाढतेच आहे. ज्या झाडाच्या पर्णसंभारावर चढली तेथूनच विस्तारणारी. अशा काही प्रसिद्धीपरायण पुण्यात्म्यांच्या सहवासाने पावन होणारी ही साधने अशावेळी वैताग वाटायला लागतो.

स्वतःच्या सर्जनशील विचारांचा अविष्कार असेल आणि तसे काही विचार संप्रेषण माध्यमातून पाठवले जात असतील, तर कुणास संदेह वाटण्याचे काही कारण नाही. कुठूनतरी कॉपी करायचं आणि पेस्ट करून मिरवायचं व्यसनच काहींना लागले आहे. ना त्याला अर्थ, ना कोणते मोल. सगळा कचराच उडत असतो इकडे तिकडे. बरे समोरच्यास काय आवडेल, हे त्यांनीच परस्पर ठरवून घेतलेलं. गृपवर एकच मॅसेज परतपरत फिरून येत असतो. तो पाठवतांना जरा विचार तर कराल की नाही. गृपवर आहात तर आधी बघाना काय आलंय; पण नाही, यांना घाई झालेली. कुठल्यातरी फालतू चित्रावर, संदेशावर पसंतीची मोहर अंकित. व्वा! मस्तच! एक नंबर! असे काय काय लेबले लावून मैत्रीच्या गंधाने उतावीळ गृप दरवळत असतात. हल्ली तसेही माणसांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हसू हरवलेच आहे. ते स्माईलीतून उसनवार घेऊन हसरे चेहरे शोधण्याचा तर्कहीन प्रयत्न घडत राहतो. वाढदिवस शुभेच्छांच्या शुष्क कर्मकांडात पार पाडण्याची चढाओढ लागलेली असते. चित्रांचे केक आणि कुणीतरी केलेल्या अर्थहीन विशेषणांनीमंडित काव्यपंक्ती पाठवण्याची स्पर्धा सुरु असते. वाढदिवस साजरा करताना चिखलात लोळून घेतल्यासारखा केक चेहऱ्यावर चिटकवून काढलेले फोटो नित्याचे झाले आहेत. औपचारिक अभिनंदनात पार पडणाऱ्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणाऱ्याच्या मनात खंत असते. मी शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून समोरच्यास वाईट तर वाटणार नाही ना! म्हणून पाठव काहीतरी. माणूस भावनांनी एवढा क्षूद्र झाला आहे का? कुणी शुभेच्छा नाही दिल्या, म्हणून वाढदिवस पुढे वाढायचा राहणार आहे का?

माणूस समाजशील वगैरे असल्याचे म्हटले जाते. पण समाजपरायण असणे आणि तसेच वर्तने यात बरंच अंतर वाढत चाललंय. समाजाच्या प्रगतीसाठी माध्यमांतून काहीच घडत नाही, असे नाही. काही चांगलेही घडते आहे. पण सामाजिकतेच्या नावाखाली संपर्कमाध्यमातून चमकण्याची संधी शोधली जाते, तेव्हा शहाण्या माणसाने न बोलणंच संयुक्तिक ठरते. कोण्यातरी नेता, अभिनेता, खेळाडूच्या यशाचा उत्सव करणारे अनुयायी कोणती भक्ती प्रकट करतात कोणास ठावूक. इतिहासाच्या पानात विसावलेल्या आणि आपल्या असीम कर्तृत्त्वाची नाममुद्रा कालपटावर अंकित करीत, समाजासाठी आदर्शांची परिमाणे उभी करणाऱ्या थोरांच्या जीवनाचे चित्रण करून त्याखाली आपली छबी चित्रांकित करणाऱ्यांना महापुरुषांचे इहलोकी घडलेले अनुपम कार्य अभ्यासाने तरी अवगत झाले आहे का? असा प्रश्न कोण्याही विचारी माणसाच्या मनात आल्यास नवल वाटायला नको. बरे येथेही थोरांच्या कार्याला विविध जाती, धर्म, पंथ, वंश आदी चौकटींमध्ये बंदिस्त केलेले. ज्यांनी जात, धर्म, वंश भेदांच्या भिंती उभ्या करण्याचा कधी चुकुनही विचार केला नाही. अवघं विश्वच आपलं घर समजून जीवनयापन करणारी ही निर्मोही माणसे. चमकणाऱ्या माध्यमांच्या जगात आंधळ्या अनुयायांच्या विचारांच्या वर्तुळात कोंडले जातात. खरंतर ज्यांच्या जीवनकार्याच्या ज्योतीच्या प्रकाशात सद्विचारांचा पथ सहज सापडावा, त्यांच्या विचारांना वैयक्तिक अभिनिवेशात बंदिस्त करून कोणते समाधान प्रसिद्धीपरायण भक्तांच्या अंतर्यामी उदित होते, सांगणे अवघड आहे.

हल्ली कुठल्या कारणांनी माध्यमांचा वापर करायचा, याचं भान समाजाने सोयिस्कररित्या विस्मृतीच्या कोशात टाकून दिले आहे की काय, असे वाटायला लागले आहे. फेसबुकवर माझे हजार मित्र आणि गल्लीत विचारात नाही कुत्रं, अशी स्थिती आसपास दिसते. माणसातला व्हर्च्युअल संवाद वाढतोय; पण अॅक्च्युअल संवाद संपतोय, त्याचं काय? एक काळ होता, जेव्हा माणसं गावाच्या पारावर, घरी, ओसरीवर, अंगणात चार घटका एकत्र येत. आपापसांत बोलणं घडत रहायचं. भावनांच्या वाटावरून आस्थेचा संवाद घडायचा. संवादाला आपलेपणाचा स्नेहिल स्पर्श लाभायचा. सारंकाही फेस टू फेस असायचं. राग, लोभ, मैत्रीचे बंध जुळवत माणसं जवळ यायची. आजचं चेहरा हरवलेलं जगणं नसायचं. हल्ली प्रत्येकच आत्ममग्न होत चालला आहे. मोबाईलच्या चारपाच इंची खिडकीत बंदिस्त होत आहे. मराठीत एक म्हण आहे, नऊ घरं आणि वाकडी दारं. आज घराची दारं बंद आहेत आणि घरात माणसं बंदिस्त. फ्लॅट संस्कृतीत स्पेस नावाचा विचार की विकार मूळ धरू लागला आहे. स्पेस नावाखाली स्वातंत्र्याचा सोयीस्कर अर्थ शोधला जातोय.

हल्ली कुठेही गेले तरी माणसांची डोकी मोबाईलमध्ये आणि डोळे स्क्रीनवर विसावलेले. संवाद मित्रांसोबत, पण अवधान दुसरीकडेच. कार्यालये, सिनेमागृहे, प्रवास काहीही असो साऱ्यांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खिळलेले दिसतील. कुठल्यातरी वक्त्याच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आधीच सूचित केलेले असते मोबाईल बंद ठेवा. पण कुणीही फारसं मनावर घेत नाही. मध्येच रिंग वाजते. माणसं सरावाने दुर्लक्ष करीत राहतात. काही क्षणभर चिडतात, पण काहीच करू शकत नाहीत. कारण आमचे सार्वजनिक वर्तन असेच असते. एवढेच काय; पण शाळा, महाविद्यालये- जेथे ज्ञानसाधना घडते, तेथे तरी आपापसात संवाद आहे कुठे. पूर्वी शिक्षकदालनात शाळा, शिक्षण, पुस्तके, विद्यार्थी असं काहीकाही शिक्षक आपापसांत बोलत असायचे. चर्चा घडायच्या. वादसंवाद रोजच असायचा. ऑफ तासिका विचारांचा जागर असायच्या. आता प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतला आहे. गुंतलेली माणसे अस्वस्थ होत आहेत. बेचैन झालेली मने उगीच द्वेषाचा, मत्सराच्या मुलाम्याचे मनावर लेपन करीत आहेत. आत्मलीन, आत्ममग्न होणाऱ्या माणसाकडून घडणारी प्रत्येक कृती संवादाला संपवते आहे. अर्थात याची जाणीव कुणास नसेल, असे म्हणणे विपर्यस्त ठरेल. तुटत जाणारी नाती संवादातून कधीकाळी सांधली, बांधली जायची. परिस्थितीच्या आघाताने विखुरलेली माणसे सावरली जात होती. हल्ली नाती विसरलेला संवाद तंत्रज्ञानातून निर्माण झालेली विसंगती ठरू पाहत आहे. दुर्दैव हेच की, हे सगळं माणसांना कळतंय; पण वळत मात्र नाही.

लहानापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या मनावर मोहिनी टाकणारं हे तंत्रज्ञान सररास वाईट आहे, असे म्हणण्याचे कारण काहीच नाही. तंत्रज्ञान कधीच वाईट नसते. चांगली किंवा वाईट असते, त्यास वापरण्याची पद्धत. तंत्रज्ञान कोणत्या हातात आहे आणि त्या हाताना नियंत्रित करणारे विचार कसे आहेत, त्यावर त्याचे मोल ठरत असते. तंत्रज्ञानाचा मोठा दोष कोणता असेल, तर ते मुक्त असणे हाच आहे. विचारवंतापासून समाजकंटकांपर्यंत कोणालाही त्याचा वापर करता येतो. वापरकर्ता कोण, कसा असेल त्यावर त्याचे परिणाम ठरतात. कधीतरी अनेक वर्षापासून हरवलेलं कुणी या तंत्रज्ञानाच्या संवादाने सापडते. कुण्या पीडितांच्या मुक्तीचे मार्ग माध्यमांचा वापर करून सापडतात. कुण्या गरजवंतास वेळीच मदत पोहचते. कधी विशिष्ट विचारांचे विखार पेटवून वातावरण कलुषितही होऊ शकते. कुणाच्या आयुष्यभराची पुंजी एका क्लिकने लंपास होते. कुणाच्या नावाने फेसबुकची खोटी पेजेस तयार करून अश्लाघ्य वर्तन घडते. कधी विचारांच्या शांत जलाशयात अविचारांचे विष पेरले जाते. माणसे भडकतात आणि दिसेल त्यावर जाऊन धडकतात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. कधी व्यवस्थेच्या विरोधातले आवाज क्रांतीचा उद्घोष करीत माध्यमांच्या भिंतींवर प्रकटतात. तर कधी अन्यायाच्या विरोधात विचारांना धार लावली जाऊन राजकीय, आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवता येणे शक्य असल्याचे संदेश येथूनच भटकत राहतात. अज्ञात असणारे परगणे, दुर्लक्षित असणारे काम आणि ते करणारी माणसे, सहज घडणारी सेवा माध्यमांच्या संवादातून समाजासमोर येते. सद्विचारांचे मळे फुलत जातात. असं बरंच कायकाय हे तंत्रज्ञान करू शकतं. अर्थात हे वापरणारे हात कोणाचे आणि त्या हातांना वळण देणारे विचार कोणते आहेत, तेच हे ठरवू शकतात.

डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहताना प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा व्हावा, हे ठरवणं अवघड नाही. तंत्रज्ञानाला स्वतःचा चेहरा असावा तो नुसताच देखणा नसावा, तर विचारांनी युक्त असावा. पण हल्ली विचारांची शक्तीच क्षीण होत चालली आहे की काय, असा संदेह विचारांमध्ये निर्माण होऊ पाहतो आहे. कसलाही विचार न करता पोस्ट फॉरवर्ड करणं. खाजगी जगण्यातले क्षण सार्वत्रिक करणं, एखादं क्षुल्लक यश जगजाहीर करणं, एखाद्याचा वाढदिवस म्हणजे कोण्या महात्म्याचा वाढदिवस असावा, या अभिनिवेशात साजरा होतांना फडकत राहणं. हे जरा अतीच होतंय. मीडियावर सकस, सुंदर, संवेदनशील असंकाही नसतं, असं अजिबात नाही; पण ते बोटावर मोजण्याइतकेच. बाकी सारा उकिरडा, असे कोणास वाटत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? तरीही आम्ही या कचऱ्यात का भटकतो आहोत? याचं उत्तर माहीत असूनही कोणी काहीच कसे करीत नसावं? मनात उदित होणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे कोणत्या संपर्कमाध्यमातून शोधावीत?

Kalaha | कलह

By // 10 comments:
कलह, भांडण, संघर्ष, तंटा, वाद असे शब्द बऱ्याचदा त्यांच्या अर्थाचा आशय भिन्न असला तरी बहुदा भांडण या अर्थाने वापरले जातात. अर्थात ढोबळमानाने या शब्दांचा वापर करायचा असेल तर. संघर्ष या अर्थाने बोलताना कलह हा शब्द विपुल प्रमाणात वापरला जातो. मला नाही वाटत या शब्दाविषयी आपल्यापैकी कोणी अनभिज्ञ असेल. जीवनात प्रत्येकाने कधीतरी लहानमोठ्या कलहांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतोच असतो. तसं पाहता कलह शब्दाचा वावर जितका वैयक्तिक असतो तितकाच वैश्विकदेखील. त्याच्या अस्तित्वाच्या सीमा स्वपासून सर्वस्वापर्यंत नेऊन शोधता येतात.

कलहप्रिय परिस्थिती आणि माणसेही कोणास आवडत नाहीत. हा अनुभव सार्वत्रिक असला तरीही कलह घडवून आणणारा परिस्थितीशिवाय आणखी एक घटक माणूसच असतो, हे सत्यही नाकारता येत नाही. जीवनात कलह नसणारा माणूस शोधून सापडणे मुश्कील आहे. जन्मापासूनच माणसांची संघर्षयात्रा सुरु असते. इहलोकी जन्म घेऊन वातावरणात त्याने घेतलेला पहिला श्वास त्याच्या वाट्यास आलेल्या संघर्षाचे फलित असते. जीवशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून एखादाच मॅरेथॉन रेस जिंकतो. ओव्हमशी संपर्क घडून जीव नावाचा आकार निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. खरंतर तेव्हापासूनच या संघर्षाला प्रारंभ होतो. अपेक्षित लक्षाच्या दिशेने धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून काहीच जगतात. बाकीचे मरतात. जगलेल्यातील एखादाच शक्तिशाली असतो, तो अपेक्षित लक्ष गाठतो. जीव नावाचा देह धारण करून आकाराला येईपर्यंत निर्मितीचा संघर्ष सुरूच असतो. जिवांच्या विकासक्रमातील सगळ्याच अवस्थांमध्ये पुढेही अटळपणे सोबत करीत राहतो. या अंगाने विचार करताना संघर्षाचे गुण आपल्या गुणसूत्रांसोबत घेऊनच कोणताही जीव धरतीवर येतो. नंतर सुरु होतो पुन्हा त्याच्या जगण्याचा आणखी एक नवा दीर्घकालीन कलह, हा असतो टिकून राहण्यासाठी.

कलह सजीवांच्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांना व्यापणारा आणि सामावून घेणारा आहे. माणसांच्या आदिम अवस्थेत जिवंत राहण्यासाठी आणि उदरभरणाच्या प्रश्नांपोटी कलह घडत राहिले आहेत. आपला परगणा, परिवार सुरक्षित राखण्यासाठी आणि परिस्थितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माणूस इतरांशी भांडत राहिला आहे. या कलहात स्वरक्षण हेतू असला तरी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न त्यास आंतरिक समाधान देणारा, सुखावणारा असतो. मनोवांछित सुख संपादन करताना माणूस केवळ माणसांशीच लढत राहिला असे नाही. निसर्गातील इतर जिवांशीसुद्धा त्याला दोन हात करीत राहावे लागले आहे. याहीपेक्षा टिकून राहण्यासाठी अधिक तीव्र संघर्ष निसर्गासोबत त्याला करावा लागला आहे. नैसर्गिक संकटांमधून सहिसलामत सुटकेसाठी संघर्षरत असणाऱ्या माणसांना कलहांनीमंडित आयुष्याची सोबत घडणं अनिवार्य होतं. या टाळता न येणाऱ्या संघर्षाचे स्वरूप गरजांनुसार वेळोवेळी बदलत गेले आहे. म्हणूनच जगण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी घडणारा संघर्ष सजीवांची प्राक्तनरेखा ठरला आहे. कोणत्या प्रसंगी कोणास काय हवे, त्यानुसार कलहाचे स्वरूप ठरत आले आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत त्याच्या परिणामात प्रासंगिक परिवर्तन घडत आले आहे. जगात घडलेल्या, वाढलेल्या संस्कृती माणसांच्या हजारो वर्षाच्या संघर्षयात्रेचे फलित आहेत.

रामायण, महाभारत यांना महाकाव्ये म्हणून माणसांच्या मनात मान्यता आणि मान असला, तरी या काव्यांचा केंद्रबिंदू संघर्ष आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. राम-रावण संघर्षात मर्यादांचे घडलेलं उल्लंघन कलहाचे कारण ठरले. तर महाभारतात मानिनीचा झालेला अधिक्षेप युद्धाचे निमित्त ठरला आहे. दोन्ही ठिकाणी ‘स्त्री’ संघर्षाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते; पण या संघार्षांमागे तेवढेच एक कारण आहे असे वाटत नाही, कारण त्या कलहकेंद्राभोवती असणारे अनेकांचे दुखावणारे अहं आणि सन्मानाचे, आत्मसन्मानाचे निकष माणसांना संघर्षापर्यंत ओढत नेणारे ठरले आहेत. मर्यादांचे बांध फोडले जातात, समाजाने निर्माण केलेल्या नियमांच्या आणि नैतिकतेच्या चौकटी तोडल्या जातात, तेव्हा कलह अटळ ठरत असतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती अन्यायातून मुक्तीसाठी घडणाऱ्या विधायक कलहाची प्रतीके आहेत. हा कलह विस्तारवादी सत्ता, सर्वंकष सत्ताधीशांच्या विरोधातला सर्वसामान्यांचा एल्गार होता. कोणतीतरी सर्वंकष सत्ता निर्धारित वर्तुळात राहून सत्तेचा वापर करायचे नियम नाकारते. ताल, तोल, तंत्र सोडून स्वार्थासाठी सत्तेचा वापर करायला लागते. सर्वसामान्यांचे जगणे अशा व्यवस्थेत दुष्कर होते, तेव्हा माणुसकीच्या परित्राणासाठी कोणासतरी हाती शस्त्रे धारण करायला लागतात. व्यवस्थापरिवर्तनासाठी घडणाऱ्या कलहात अनेक अनामिक जिवांच्या आहुती पडतात. तरीही माणूस अशा कलहाचे मोल चुकवूनही आनंदी असतो. असं का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्याच्या स्वातंत्र्यप्रिय मानसिकतेत दडलंय असं वाटतं.

कलहप्रियता सोबत घेऊन जगण्यातही कदाचित मानसिक समाधानाचे काही धागे अनुस्यूत असावेत असे वाटते. माणसाचं मन सुखावण्याइतकी माणसांच्या जगात कोणतीच भावना सुखाची नाही. एखादी व्यक्ती पद, पैसा, प्रतिष्ठेचा वापर इतरांवर जरब बसवण्यासाठी करते, तेव्हा त्याच्या अंतर्यामी असणारा अहं सुखावतो. याकरिता हाती असणाऱ्या पदाचा, अधिकारांचा वापर करून निम्नस्तरावर असणाऱ्या लोकांना प्रताडित करून तो आनंदतो. इतरांना आपण आपल्या अंकित ठेवतो, आपल्या कलाने वर्तण्यास बाध्य करतो, असे वाटणे सत्ताधीशांना सुखावणारे असते. भलेही अशा वर्तनाला नैतिकतेचे कोंदण नसले तरी. कोणी भाईगिरीच्या मार्गाने भीती निर्माण करून सुखावतो. पण हे घडताना स्वअस्मितेच्या तंत्राने चालणाऱ्या माणसांना आपल्या प्रतिष्ठेवर आघात होतोय, असे वाटते आणि ते या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी उभे राहतात. दोन भिन्न वृत्तींमध्ये घडणारा हा कलह सुष्ट आणि दुष्ट असे रूप धारण करतो.

एकाच वर्गात शिकणाऱ्या बालवाडीतील लहान मुलांमध्येही निर्व्याज कलह असल्याचे आपण पाहतो, अगदी पेन्सिलचा एक लहानसा तुकडा घेण्यावरून. थोडे मोठे झाले की समवयस्क मुलांच्या समूहातही दबंगगिरी करण्यासाठी तो सांभाळला जातो. यौवनातील कलह कोण्यातरी तिच्यावर जीव जडला म्हणून सर्वस्व उधळून लावण्यासाठीही घडू शकतो. आप्त, स्वकीय, परिवार, समाजासोबत आपल्या प्रिय पात्राच्या प्रेमासाठी विरोध पत्करताना होत राहतो. विवाहाच्या सप्तपदीवरून फेरे घालून संसारात पावलं रमल्यावर दोघांमध्ये घडणारा कलह ‘भांड्याला भांडं लागणं’ या नावाने ओळखला जातो. अर्थात समाजात घडणाऱ्या कोणत्याही भांडणांना अहंचे टोकदार काटे असतातच. या काट्यांनी कोणी घायाळ होत नाही तोपर्यंत सारे ठीक असते; पण त्याची टोकं टोचायला लागली की, शेवट माणसं दुरावण्यात होतो. कधीकधी संसारातले ताणून धरलेले वैयक्तिक अहं नवराबायको नात्याचा अध्याय कोर्टाच्या साक्षीने संपवतात. भलेही कोणी याला मने न जुळल्यामुळे नात्यांचे विभक्तीकरण म्हटले तरी.

रस्त्याने प्रवास करताना वाहनाचा कोणासतरी कळत नकळत धक्का लागतो. भारतीय रस्त्यांवर नित्य दिसणारे हे दृश्य आहे. असे काही घडले की, प्रत्येकाला आपणच कसे योग्य दिशेने आणि नियमांनी चाललो होतो असे वाटायला लागते. कोणीच हार मानायला तयार नसतो. रस्त्यावर घडणारे असे क्षणिक कलहसुद्धा इतरांचं येणं-जाणं बंद करू शकतात. बसमध्ये, रेल्वेत जागेवरून तू तू मै मै घडणे दैनंदिन कलहाचे सौम्य रूप आहे. कधी आपल्या कोणा परिचिताला, आप्तांना अपघात घडतो. माणसांचा संयम सुटतो. संताप बनून तो रस्त्यावर उतरतो. कधी रस्त्यांवरील बेजाबदार वाहतुकीने समस्या येऊन रागाचे रुपांतर कलहात घडते. रस्ते अडतात. संतापाचा अतिरेक हाती येणारा दगड भिरकावयाला उद्युक्त करतो. रस्ता अडतो. माणसं भडकतात आणि समोर दिसेल त्यावर धडकतात. संतापाला प्रकटण्यास मार्ग मिळण्याऐवजी प्रश्न निर्माण करणारा रस्ता सापडतो. लहानसा वाटणारा प्रासंगिक कलह एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह बनून माणसांसमोर उभा राहतो.

राजकारणाच्या प्रांगणात कलह नेहमीच प्रिय असावा असे वाटण्याइतपत रुजलेला दिसतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन भिन्न विचारधारांना सोबत घेऊन तो नांदतो. कधी पक्षीय अभिनिवेश कलहप्रियतेचे कारण ठरतात. तर कधी पक्षांच्या आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या विचारधारा. कधी वैयक्तिक विचारधारेतून विरोधाचं अस्त्र घेऊन तो रस्त्यावर प्रकटतो. माणसांनी चालते आणि वाहनांनी धावते रस्ते अडतात. परिसरात बंदचा नाद निनादायला लागतो. परिस्थिती नियंत्रणाच्या मर्यादा ओलांडते, तेव्हा सुरक्षायंत्रणेचे कवच रस्त्यांवर, वस्त्यांवर उभे राहते. संचाराला बंदी करून कलहनियंत्रणाचा प्रयत्न घडतो. कधी कलह अशांततेचे विध्वंसक रूप धारण करतात. सार्वजनिक मालमत्तेच्या जिवावर उठतात. कोणाच्यातरी कसल्यातरी कारणाने दुखावणाऱ्या भावना कलह पेटवण्यात इंधनाचे काम करतात. अशा अविवेकी संघर्षाने परिस्थितीबाबत अनभिज्ञ  असणाऱ्या काही जिवांची जीवनयात्रा संपते.

जगात कुठल्या गोष्टी सार्वत्रिक असतील, नसतील माहीत नाही; पण कलह अरत्र, परत्र, सर्वत्र नांदतो आहे. कधी तो जातीय तणावात, कधी पंथीय संघर्षात, कधी धार्मिक अभिनिवेशात प्रकटतो. अहंमन्य मानसिकता कलहाला निमंत्रित करते. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष आघात चाकोरीत चालणाऱ्या जीवनव्यवस्थेवर होतात. कायदासुव्यवस्थेच्या ठिकऱ्या उडून प्रासंगिक परिस्थिती माणसांना विस्थापित करते. माणसं आपलं मत प्रस्थापित करण्यासाठी उभे राहतात. आपली विचारधारा पेरण्यासाठी केल्या जाणाऱ्या कवायतीत कलहाचे आयुध हाती घेतले जाते. अतिरेकी विचारांना प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न अनेक निरपराध्यांच्या जगण्याची सांगता करतो. सार्वभौम अस्मितेवर आघात करणारा अविवेकी विचार अतिरेकी होतो. आतंकवादी मानसिकता दिमतीला घेऊन कोणाच्यातरी अविचारी वागण्यातून प्रकटतो. कलहांपासून कोसो दूर राहू इच्छिणाऱ्या शांतताप्रिय माणसांना विस्थापित करतो. मायभूमी सोडून माणसे वणवण भटकत फिरतात. अनियंत्रित सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या सत्ताधीशांच्या कलहवृत्तीपासून सुटून सुरक्षित परगणा शोधण्याच्या दुसऱ्या नव्या कलहात अडकतात. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धांचा विध्वंस वसाहतवादी, साम्राज्यवादी मानसिकता अंगीकारणाऱ्या स्वार्थपरायण विचारांच्या वर्तनाचा परिपाक होता. सर्वंकष सत्ताधीश होण्याच्या मानसिकतेतून घडलेल्या कलहाचा माणसांनी अनुभवलेला विनाश म्हणजे ही युद्धे. पूर्वीही राजसत्तांचे प्रदेशविस्तारासाठी संघर्षाच्या मार्गाने जाणे घडले आहे. आपले सैनिकी बल, आपली राजकीय ताकद सीमेलगतच्या सत्ताधीशाला दाखवणे, या हेतूने ते घडत असे. आकांक्षापूर्तीसाठी प्रादेशिक सीमा विस्तारताना घडणाऱ्या कलहाने अन्य परगण्यात वास्तव्य करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या सीमांना मर्यादांचे बांध घातले जात.

कलह कुठे नाही, तो घरापासून देशापर्यंत सगळीकडे आहे. घरात सोबतीने वाढणाऱ्या भावंडानाही तो नवीन नाही. वाटण्या होताना तांबा-पितळेच्या एका फुटक्या भांड्यासाठी भांडणारी भावंडे कलहात रक्ताची नाती विसरतात. शेताच्या बांधावरून शेजारच्याच्या टाळक्यात दांडके घातले जाते. शेजारी-शेजारी राहणारे क्षुल्लक कलहातून परस्परांचे कट्टर शत्रू होतात. सासू नावाचं नातं घरगुती कलहाचे सार्वत्रिक रूप असल्याचे अनुभव रंगवून सांगितले जातात. सासू-सून हा द्वंद्व समास कलहातूनच विग्रहित झालेला दिसतो. प्रेमाचं नितळपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांना कौटुंबिक कलह बाधित करतात. काही गावं कलहामुळे बदनाम होतात. सार्वजनिक अशांतता हीच त्या गावांची ओळख होते. गावातील एखादी वस्ती, त्या ठिकाणी असणारी माणसे कलहासोबत जगणारी म्हणून ओळखली जातात. काहींवर कलहप्रिय म्हणून शिक्का बसवून त्याच्या जगण्याला कायद्याच्या कलमांनी बंदिस्त कले जाते. काही माणसांच्या मनात विशिष्ट परिवाराची, परिसराची ओळख कलहप्रिय म्हणूनच गृहीत धरली जाते.

कलह फक्त माणूस नावाच्या प्राण्यातच असतो असे नाही. मानवेतर जिवातही तो मोठ्याप्रमाणात असतो. प्राणीसुद्धा जिवाच्या कराराने सजातीयांशी, अन्यांशी भांडताना दिसतात. पण त्यांच्या कलहामागील प्रेरणा फक्त नैसर्गिक असते. परिसर, मादी यांच्यावर वर्चस्व संपादनाची भावना या कलहाचे केंद्र असतात. अन्य जिवांच्या जगात नैतिक-अनैतिक प्रकार असण्याचे कारण नसते. स्वाभाविकपणे वागायला त्यांचे शरीरधर्म त्यांना उद्युक्त करत असतात. माणसाच्या जगात नैसर्गिक गरजांसोबत भावनिक गरजासुद्धा कलहांचे कारण असल्याचं आपण पाहतो. आपले अहं कुरवाळण्याच्या नादात माणसं वर्तनाच्या चौकटी विसरतात. कलहाला अस्मितेचे वसने चढवून आपले अहं जोपासत राहतात. नियमांना नैतिकतेच्या, मूल्यांच्या खुंटीशी घट्ट बांधून समाजाकडून सत्त्वशील आणि तत्त्वशील वर्तनाची अपेक्षा करतात. मात्र, इप्सित साध्य करण्यासाठी आपले नियम तयार करून जगतात. 

कलहांचे असे सार्वत्रिक आविष्कार पाहताना एक गोष्ट मनात येते, माणसांना आपल्या जगण्यातून कलह संपवता येणारच नाहीत का? मला वाटते संयम, सत्य, अहिंसा या मूल्यांचा अंगीकार कलहप्रिय जगाला शांततेच्या मार्गाने मार्गस्थ करू शकतो. माणसाच्या मनात पेटलेल्या अविवेकी विचारांच्या वणव्यालाही शांत करू शकतो. संतमहात्म्यांनी कलह टाळून प्रेमाची भजने गायली. सुधारकांनी सहअस्तित्वाने सहजपणे जगणाऱ्या जगाचे स्वप्न पाहिले. जगण्याला नैतिकतेच्या चौकटींनी मंडित करून स्वतःचा शोध घेऊ पाहणाऱ्या विचारधारा कोणत्याही संघर्षाला विराम देऊ शकतात. सत्व आणि स्वत्वाची ओळख दाखवणारा मार्गच विद्यमान जगातील माणसांची खरी गरज आहे. असा मार्ग पूर्वसुरींच्या कार्यातून स्मृतीरुपाने सोबत करीत असूनही आम्हां माणसांना अद्याप कळला का नसेल? कळला पण कदाचित वळायचे राहून गेले आहे असे वाटते. हे कळेल त्यावेळी माणूस कलहमार्गाने का वर्ततो? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. कलह टाळून संयमाने सात्विक जगण्याचा मार्ग दाखवणारे संत, महात्म्यांचे विचार वाचून, ऐकून माणसांचे मन आणि मतपरिवर्तन झाले नाही असे नाही; पण वास्तव असेही आहे की, माणूस अजूनही जीवनातील कलहप्रिय विचारांना कोणत्यातरी असुरक्षतेपोटी टाकायला तयार नाही. इतिहास हासुद्धा आहे, की माणसांच्या जगावर आणि जगण्यावर अनेक आघात घडूनही माणूस शहाणा होण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय संघर्षच असल्याचे मानतो. कलहाच्या मार्गाने कुठली शांतता प्रस्थापित करू इच्छितो कोणास ठाऊक? तसेही माणसांच्या जगण्यातून कलह हद्दपार होणे अवघड आहे. कारण काही गोष्टी सजीवांना उपजतच मिळालेल्या असतात, त्यातील एक कलह आहे.

Oze | ओझे

By // 10 comments:
परिसरात इमारतींची बांधकामे सुरु आहेत. बांधकाम करण्यासाठी तात्पुरत्या वास्तव्यास आलेल्या माणसांच्या राबत्याने गजबज वाढली आहे. आकाशाकडे झेपावणाऱ्या इमारतीच्या शेजारी मजुरांच्या झोपड्या अंग मुडपून बसल्या आहेत. उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या देखणेपणाकडे कौतुकाने पाहत असल्यासारख्या. तेथे कुणीतरी मोठ्या आवाजात रेडिओ लावून गाणी ऐकतो आहे. दुपारची निवांत वेळ. परिसरातील गजबज बऱ्यापैकी कमी झालेली असल्याने मोठ्याने सुरु असणाऱ्या रेडिओवरील गाण्याचे आवाज ऐकू येतायेत. हल्ली मोबाईलमध्ये गाणी ऐकण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्याने रेडिओचा वापर तसाही जवळपास संपल्यात जमा आहे. पण कधीतरी कुणी चुकूनमाकून रेडिओ सुरु करतो; गाणी वगैरे काही ऐकत असतो. रेडिओवरून कार्यक्रमांचे नियमित प्रसारण होत असले, तरी ठरवून एखादा कार्यक्रम ऐकणे सहसा घडत नाही. घरातल्या रेडिओने अडगळीत आपला निवारा शोधला आहे. बऱ्याच दिवसांनी रेडिओवरून प्रक्षेपित गाणी ऐकायला आली. तीही कोणीतरी लावली म्हणून. कुठल्याशा कार्यक्रमात गाणी वाजत होती. तसेही स्वतःहून गाणं लावून ऐकण्यापेक्षा कुणीतरी मोठ्या आवाजात लावलेली गाणी ऐकण्यात वेगळाच आनंद असतो. गाणी ऐकणारे आपल्या आसपास शेकड्याने असतात; पण त्यातल्या अर्थासह समजणारे मुठभरही असतात की, नाही शंकाच आहे. अशा शेकडोतला मीही एक. गाणं समजण्यापेक्षा ऐकण्यात आनंद शोधणारा. तसेही गाणे समजण्यापेक्षा ऐकण्यास प्राधान्य देणारेच संख्येने अधिक असतात.

रेडिओवर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणं सुरु आहे. गाण्यातील शब्दांवर नकळत मन रेंगाळत राहिले. खरंतर याआधी हे गाणं ऐकले नाही, असे नाही; शेकडोवेळा ऐकले असेल. पण कधीकधी एखादा क्षण असा येतो की, गाण्यातील शब्दांमध्ये असणारा आशय शोधण्यापेक्षा; मनातील आशयाचे अर्थ आपण त्यातून शोधू लागतो. गाण्यातल्या शब्दांना त्यांचा स्वतःचा अर्थ असला, स्वतःचं अवकाश असलं; तरी त्यास दूर सारून मनातल्या अर्थाच्या आशयाची फुलपाखरे सुरांभोवती पिंगा घालायला लागतात, त्यातल्या शब्दांभोवती उगीचच फेर धरून विहरायला लागतात.

या गाण्यातील शब्दांचा आशय, अर्थ कोणाला काय अपेक्षित असेल, तो असो. पण त्यातल्या ‘ओझे’ शब्दावर उगीचच रेंगाळत राहिलो, मनातल्या अर्थाचं अवकाश शोधत. तसंही माणसाचा स्वभाव आपण काही करण्यापेक्षा; शक्य झाल्यास स्वाभाविकपणे एखादे काम दुसऱ्याकडून करून घेण्याचा असतो. देता आले तर कुणाच्यातरी खांद्यावर ओझे देण्याचा असतो. तसं पाहता कुठलेही ओझे काही कोणी स्वच्छेने स्वीकारीत नसतो. कारणवश ते लादले जात असते किंवा परिस्थितीवश आपले म्हणून स्वीकारावे लागते. अर्थात हा सगळा परिस्थितीचा प्रासंगिक परिपाक असतो.

ओझं शब्दातच कुठेतरी एखाद्या गोष्टीला लादण्याचा भाग अधिक असतो, असे वाटते. मग ते ओझं स्वतःचे असो किंवा दुसऱ्याचे. तसंही माणसं जगताना अनेक लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरत असतात. ती कधी आप्तस्वकीयांनी, कधी स्नेह्यांनी नात्यांच्या धाग्यांची गुंफण करून आपलेपणाने आपल्या हाती दिलेली असतात. कधी व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना परिस्थितीने आपल्या पुढ्यात आणून टाकलेली असतात. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारून घेतलेली असतात. माणसांचा जीवनप्रवास अशी कुठली ना कुठली ओझी घेऊन घडत असतो. खरंतर ती टाळताही येत नाहीत आणि त्यापासून दूर पळताही येत नाही, म्हणून त्यांना दिमतीला घेऊन जीवनाच्या वाटेवर प्रवास घडत असतो. आयुष्याच्या अखेरपर्यंत कुठल्या ना कुठल्या ओझ्यांना घेऊन माणूस इहलोकी वावरत असतो. जीवनभर अनेक ओझ्यांना वाहत जगलेला माणूस एक दिवस कुणाच्यातरी खांद्यावर ओझं होऊन अखेरच्या यात्रेला निघतो. अपेक्षित, अनपेक्षित अपेक्षांची अनेक ओझी आयुष्यभर ओढणारा माणूस जातांना आपल्या कुणाच्यातरी खांद्यावर ते टाकून जातो. त्याच्या पश्चात त्याचे आप्त राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वागवत राहतात.

कोणते तरी ओझे घेऊन घडणारा माणसाचा जीवनप्रवास त्याच्यापुरती एक शोधयात्रा असतो. आपलं असं काही शोधत अज्ञात प्रदेशांकडे नेणाऱ्या रस्त्याने तो चालत राहतो. खरंतर जीव म्हणून इहलोकी येण्याआधीच कुणाच्यातरी अपेक्षा बनून तो मातेच्या उदरी वाढत असतो. कुणाला वंशासाठी दिवा हवा असतो. त्यासाठी झुरणी लागणारे जीव अपेक्षांचे ओझे मातृत्वाच्या पदावर असणाऱ्या मानिनीच्या मनी रुजवतात. जन्मास येऊन पहिला श्वास घेणं हेही जिवासाठी एक ओझंच, कारण तो श्वास निसर्गाने दिलेल्या आव्हानाविरोधात त्याच्या जगण्याच्या धडपडीचा एल्गार असतो. ओझं झुगारून देण्याचा प्रयत्न असतो. हे संघर्षाचे ओझे ज्याला पेलले, त्याला जीवनात आणखी काही ओझी वाहण्याचं बळ मिळतं. आयुष्याचा प्रवास क्रमसंगत मार्गाने पुढे सरकत राहतो, तशी ओझीसुद्धा आपले रंग, रूप, आकार बदलत जातात. त्यांना वैयक्तिकपासून वैश्विकपर्यंत परिमाण लाभत असते. नवे आयाम मिळत असतात. आपापली वर्तुळे सांभाळत माणसं ओझी दिमतीला घेऊन चौकटींमध्ये जीवनयापान करीत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार याअर्थाने मोजले जात नसले तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. गृहस्थाश्रम स्वीकारायचा तर इच्छा असो, वा नसो संसाराचं ओझं ओढावं लागतं. ते सोबत घेऊन माणसांचा संसार बहरत असतो. घर उभं राहत असतं. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले पर्यायच आणखी काही अनपेक्षित ओझी वाहून आणत असतात. स्वप्नातला स्वर्ग असणारं घर उभं करण्याचं काम मार्गी लागतं. घराचं गोकुळ होऊन हसऱ्या ताऱ्यांनी भरून येतं. अंगण लहानग्या पावलांनी दुडूदुडू धावू लागते. एका ओझ्याने निरोप घेतलेला असतो. पण पुढे मुलाबाळांना घडवतांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षांची ओझी त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे वाढत जातात. नकळत हीच ओझी मुलांच्या खांद्यावर दिली जातात. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, चांगला अभ्यास घडावा, जगणे मार्गी लागावे; म्हणून त्यांच्या घडणीच्या सीमांकित चौकटी उभ्या केल्या जातात. क्लास, शिबिरे, छंदवर्ग अशी लहानमोठी ओझी शोधून आणली जातात. हर्षभरीत अंत:करणाने ती डोक्यावर देऊन त्यांना स्पर्धेत ढकलले जाते. गुणवत्तेच्या स्वघोषित शिड्या तयार करून प्रगतीच्या इमाल्यांना लावल्या जातात. परीक्षेतल्या नव्वद टक्के गुणांचं ओझं डोक्यावर घेऊन चालणारी मुलं शाळेलाच ओझं मानायला लागतात. अशी ओझी वाहण्यात अवेळीच त्यांच्या वयापेक्षा मोठी होतात. ‘लहानपण देगा देवा’ म्हणणं प्रश्नपत्रिकेतील कल्पनाविस्ताराच्या प्रश्नापुरते उरते.

वाढत्या वयासोबत ओझी मोठी आणि वजनदार होत जातात. जीवनाच्या जडणघडणीसाठी समाजाने स्वतः निर्माण केलेल्या आयएसओ मानांकनाच्या प्रमाणित करून घेतलेल्या प्रतिष्ठेची वलये त्यांच्याभोवती तयार होतात. इंजीनियरींग, मेडिकल, व्यवस्थापनशास्त्रसारख्या प्रतिष्ठाप्राप्त अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवायचा, हे जीवनाचे प्राप्तव्य होते. हे समाजमान्य मृगजळ मिळवायचे कसे? या विवंचनेच्या चक्रव्यूहात अनेकांचा अभिमन्यू होतो. व्यूह भेदण्यासाठी रणांगणात उतरायचे कसे, याची चिंता मनाला कुरतडत राहते. प्रतिष्ठाप्राप्त परगण्यात प्रवेशाच्या प्रश्नाचं ओझं घेऊन झापडबंद घोड्याप्रमाणे धावताना समरसून जगणं विसरलेली मुलं कुणाच्यातरी अपेक्षांचे ओझे घेऊन पळत राहतात; आप्तांनी दाखवलेल्या शिखरावर प्रगतीचे, यशाचे निशाण रोवण्यासाठी. स्पर्धेला सर्वस्व समजून उरस्फोड धावाधाव करीत पदवीचा टिळा ललाटी लागला की, सुखासीन जगण्याची स्वप्ने यायला लागतात. उद्योग, व्यापार, नोकरीच्या प्रतिमा मनात उभ्या राहतात. नोकरी, चाकरीचे ओझे उतरून झाले की, विवाहाच्या वेदीवरील फेऱ्यांसाठी छोकरीचा शोध. त्यातही सुस्वरूप, गृहकृत्यदक्ष, कुटुंबवत्सल अशा अनेक अपेक्षांची लेबले लाऊन अवांछित ओझी आसपास उभी केली जातात. त्याच वाटेने घर, संसार, परिवार हे चक्र क्रमशः चालत राहते. हे सगळं मिळवायचे म्हणून येणारी ओझी घेऊन धावाधाव करण्यास परिस्थिती बाध्य करीत असते.

पण ओझी काही केवळ घर-परिवार-संसार आणि परिस्थिती एवढीच नसतात. राष्ट्र, समाज यांच्या अपेक्षांचीही असतात. राष्ट्राला सुजाण नागरिक हवे असतात. समाजाला मर्यादाशील माणसे. ओझी अनेक वाटांनी चालत येऊन आपली भेट घेत असतात. माणसं ती घेऊन कधी मुकाट, तर कधी खळखळ करीत चालत असतात. जगण्याच्या वाटेने चालताना निवडीचा विकल्प नसणारी काही ओझी कधीकधी जगण्यात गुंते निर्माण करतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रासंगिक अशी गोंडस नावे धारण करून येणाऱ्या ओझ्यांचा ताण वाढत जातो. मानसशास्त्राच्या परिभाषेत मनावर दडपण असणे संयुक्तिक नसल्याचे संगितले जाते. पण याकडे दुर्लक्ष करून काहीतरी मिळवण्यासाठी माणूस अपेक्षांची ओझी घेऊन धावत राहतो. कुठल्यातरी अशा लादलेल्या अथवा लादून घेतलेल्या ओझ्याने स्वच्छंदी, आनंदी जगणारे जीव वाकतात. काही कमकुवत कोलमडतात. काही कायमचे कोसळतात.

माणसाचं जगणंच मुळी कुठल्यातरी अपेक्षांच्या ओझ्याचा प्रवास असतो. आईबापाला आपलं अपत्य संस्कारित असावे असे वाटते. असे वाटणे हे काही ओझे होऊ शकत नाही; पण संस्कार म्हणजे काय? त्यांची चौकट कोणती असावी? तीत वर्तताना मर्यादांचे बांध असावेत का? असल्यास त्यांच्या मर्यादा कोणत्या? त्या कुणी ठरवायच्या? असे अनेक प्रासंगिक प्रश्न गुंता वाढवतात. समाज व्यक्तीकडून संस्कारांची अपेक्षा धरतो. संस्कार म्हणजे समाजमान्य नैतिकतेच्या चौकटी. अशा अनेक चौकटींना सांभाळून माणसे जगत असतात. चौकटीतल्या विशिष्ट विचारांची वर्तुळं घेऊन वर्तताना संस्कारांची सक्तीच कधीकधी ओझं होते. नैतिकतेच्या चौकटी तयार करून समाज माणसाला अपेक्षांच्या विशिष्ट साच्यात ओतून घडवीत असतो, व्यक्तीची इच्छा नसतानाही. मनाविरुद्ध घडणारा हा प्रवास अशावेळी कुणाला ओझं वाटायला लागतो. कुणाला आव्हान.

गेल्या काही दिवसापासून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्याविषयी चर्चा घडत आहे. अर्थात हे ओझे मुलं काही स्वखुशीने सोबत घेऊन शाळेत जात नसतात. त्यांच्या दप्तरात पुस्तकांच्या वजनापेक्षा पालकांच्या अपेक्षांचे ओझेच अधिक असते. त्याहून अधिक मनावर. आपलं मूल स्मार्ट असावं, अशी अपेक्षा करण्यात काहीही गैर नाही; पण सुपरहिरो बनवण्याच्या नादात काही अतिमहत्वाकांक्षी पालक त्याच्या जीवनाच्या बहरणाऱ्या रोपट्यालाच करपून टाकत आहेत. हे ओझे शाळेच्या दप्तरातून उतरेल तेव्हा उतरेल; पण पालकांच्या अपेक्षातून कधी उतरेल, हे सांगणं अवघड आहे. काही लोकांना कुठली ना कुठली उपयुक्त, अनुपयुक्त ओझी सोबत घेऊन चालायची सवयच असते. आपला अहं सुखावण्यात त्यांना असीम आनंदाची प्राप्ती होत असते. त्यांच्या दृष्टीने जगण्यातला खरा आनंद तोच असतो. खरंतर असे वैयक्तिक अहं हेच एक ओझे असते. भलेही कोणी असे मानायला कदापि तयार नसले तरी.

कुठलेही ओझे घेऊन न चालणारा माणूस विश्वात शोधूनही कदाचित सापडणार नाही. ओझं घेऊन चालण्याबाबतीत जगात खूप समानता आहे. येथे सगळेच भारवाहक असतात. कुणी मोठा, कुणी लहान; एवढाच काय तो फरक. तेथे राव-रंक असा भेद नाहीच. श्रीमंताच्या माथी आपलं ऐश्वर्य टिकवून कसं ठेवावं, याचं ओझं असत. उद्योगपतीला उद्योगविस्ताराचं अंगण उभं करायचं असतं. नेत्याला जनतेचे समर्थन कसे मिळवता येईल याचं, तर अभिनेत्याला एक हिट चित्रपट मिळून दुसरा सुपरहिट कसा होईल, याचं ओझं स्वस्थ बसू देत नाही. समाजसेवकाला सेवा करताना लोकांचा अपेक्षाभंग घडू नये म्हणून काय करता येईल याचं ओझं असतं. साहित्यिकाच्या लेखणीला शब्दांच्या अनवरत निर्मितीचं, वक्त्याला वैखरीतून प्रकटणाऱ्या शब्दांच्या लाघवाचं, गायकाला सुरांची धार लावायचं, तर नोकरदाराला नोकरीतील आव्हानांचं ओझं असतं. शेतकऱ्याला पीकपाणी कसं येईल, या विवंचनेचं ओझं असत. तर भिकाऱ्याला भिक्षापात्रात दान पडेल की नाही, या काळजीचं ओझं असतं. कुठे नाही ओझं! ते अरत्र, परत्र, सर्वत्र पसरलं आहे. राव-रंक साऱ्यांच्या जीवनाचं प्रांगण त्याच्या अस्तित्वाने व्यापले आहे.

प्रसंग, परिस्थितीचे काही धागे धरून ओझीसुद्धा आपले मुखवटे बदलत असतात. कुणीतरी शेतकरी प्रामाणिक परिश्रम करून उद्याच्या सुंदर दिवसांची स्वप्ने पाहत जगण्याची उमेद बांधून असतो. निसर्गाच्या लहरीपणाच्या एका फटक्याने अचानक होत्याचे नव्हते घडते. डोक्यावर कर्जाचा भार वाढतो. ते कसे फेडता येईल, याचं अवघड ओझं त्याच्या जगण्याला करपून टाकते. कोणी घरासाठी, व्यापारासाठी, शिक्षणासाठी, मुलामुलीच्या लग्नासाठी कर्जाचे ओझे घेऊन संसाराचा गाडा हाकत असतो. कोणी असाध्य आजाराचे ओझे घेऊन जगण्याच्या उमेदीचा किरण शोधत असतो. तर कोणाला जीवनप्रवासाच्या शेवटच्या वळणावरून वळून आयुष्याच्या उतरणीकडे चालताना राहिलेले श्वास ओझं वाटायला लागतात. कोणी वार्धक्याने थकलेल्या देहाचं ओझं सोबत घेऊन आपली अखेर दूरच्या क्षितिजावर किलकिल्या डोळ्यांनी शोधत राहतात. कोणीतरी विकल आईबाप आयुष्यभर आपण इतकी ओझी कुणासाठी वाहिली? या प्रश्नांचे उत्तर मुलंमुली असूनही वृद्धाश्रमातील थकलेल्या जगातून मिळवू पाहतात. 

आई, बहीण, मुलगी इत्यादी नात्यांचे गोफ विणीत समाजात स्त्रीला घडवले जाते. कोणत्यातरी नात्याचे लेबल तिच्या ललाटी लेखांकित करून तिच्या स्वातंत्र्याचा परिघ सीमित केला जातो. सामाजिक, कौटुंबिक अपेक्षांचे ओझे माथी ठेवून तिच्या जगण्याला मर्यादांचे बांध घातले जातात. सामाजिक परिस्थितीने दिलेलं, हे अनावश्यक दान पदरी घेऊन; त्या मुकाटपणे चालत राहतात, आपल्या अस्मितांचा शोध घेत. ‘मुलीची जात आहेस, मुलीसारखी वाग’, असे म्हणताना परंपरेच्या चौकटींचं ओझं तिच्या मनावर, माथ्यावर ठेवून व्यवस्था तिला मर्यादांच्या वर्तुळात उभी करते. पुरुषाने सर्वत्र असावं, स्त्रीने मात्र मर्यादांच्या कुंपणातच दिसावं, या विचाराने वर्तने संस्कारांचा भाग समजला जातो. मर्यादा म्हणजे काय? त्या कोणत्या असाव्यात? हे कोणी ठरवावे? अशा प्रश्नांचा विचार जणू कोणी करतच नाही. बंधनांनाच संस्कार मानण्याचा प्रमाद घडतो, तेव्हा नव्या क्षितिजावरच्या प्रकाशाला कवेत घेऊ पाहणारा विचार दुय्यम ठरतो. कधी अशी अनावश्यक ओझी झुगारून देण्यासाठी काही मानिनींचे आवाज बंडाचं निशाण हाती घेऊन बुलंद होतात. परंपरेचे ओझे घेऊन चालण्यास त्या नकार देतात. परंपरांमध्येच जगण्याचं सार्थक शोधणारे आणि अशा जगण्यालाच प्रमाण मानणारे परिवर्तन पथावर पडलेल्या पावलांच्या आवाजांनी हादरतात. हे आवाज थांबवावे कसे? या विवंचनेचं ओझं दमननीतीचा मार्ग अनुसरणाऱ्यावर येतं. परिवर्तनाचे प्रयोग थांबावेत, म्हणून कुठलीतरी नवी ओझी ते शोधत राहतात, माथी मारण्यासाठी.

माझा एक स्नेही आहे. स्वभाव मुळात परोपकारी. कुणी काही काम सांगितले की, कोणालाही सहसा नाही न म्हणणारा. एखादे काम आनंदाने स्वीकारतो. ते पूर्ण करताना त्याचा कुठलातरी गोंधळ हमखास होणारच, हे आम्हाला अनुभवाने ठाऊक असतं. गोंधळ झाला की, तो निस्तरताना आणखी दुसरे गोंधळ वाढवून ठेवतो आणि स्वतःला दोष देत राहतो. कामाचं ओझं वाढत जातं. हा त्या गुंत्यात गुरफटत जातो. कितीतरी वेळा त्याला सांगितले, “एकाच वेळी कामांची एवढी ओझी डोक्यावर का लादून घेतो?” म्हणतो, “आपलं म्हणून कोणी आपल्याकडे आलं, तर नाही कसं सांगावं? बरं नाही वाटत असं कुणाला फटकळपणे नाही म्हणून सांगणं, त्यांना वाईट वाटेल ना!” याचं असं परोपकारी तत्वज्ञान. ‘जगाच्या कल्याणा...’ या विचाराने वर्तणारा साधासरळ जीव. त्याची धावाधाव पाहून कुणीतरी मदतीला धावतो. गोंधळाचे कारण कळते. याच्या मनावरील ओझे उतरते. प्रसन्नतेची एक स्मित लकेर घेऊन चेहरा खुलतो. तेवढ्याच निरागसतेने मदतकर्त्याचे मनापासून आभार मानतो. त्याच्याकडे पाहून मनात नेहमी एक विचार येतो, अशी ओढवून घेतलेली ओझी याला प्रिय का असावीत? शेवटी काय; स्वभावो दुरित क्रमः म्हणतात, ते काही खोटे नाही. याचा स्वभावच कुणाचीतरी ओझी वाहून नेण्याचा आणि त्यात आनंद शोधण्याचा असल्याने; काहीही घडले तरी, याला काही फरक पडत नाही.

कारणं काही असोत, ओझी लादलेली असोत अथवा स्वीकारलेली; माणसाच्या प्रगतीचा तो अविभाज्य भाग आहे. ओझ्याशिवाय माणूस नाही. हजारो वर्षापासून त्यांची सोबत करीत; प्रगतीचे एकेक आयाम तो उभे करीत आला आहे. काहीतरी मिळवायचे असेल, तर अशी लहानमोठी ओझी घेऊन चालण्याशिवाय पर्याय नसतो. ओझ्यांसह घडणारा जीवन प्रवास त्याच्या जगण्याचे परगणे समृद्ध करीत असतो. जगताना त्याला आपले असे काहीतरी हवे असते. या काहीतरीचा शोध त्याच्या मनात वसणाऱ्या विजिगीषू मानसिकतेतून अनेक आव्हाने स्वीकारायला उद्युक्त करीत असतो. विपरीत परिस्थितीतही टिकून राहण्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्यासाठीच तो असतो. संकटे, समस्या माणसाचं सत्व आणि स्वत्व पाहण्यासाठीच असतात. त्यातून तावून, सुलाखून बाहेर पडणारा माणूस सोन्यासारखा चमकतो. म्हणतात ना, ‘टाकीचे घाव घातल्याशिवाय माणसाला देवपण येत नाही’, हे म्हणणे काही अतिशयोक्त नाही. अशावेळी नकळत मनात विचार येतो, परिस्थितीनिर्मित, प्रासंगिक, ऐच्छिक, अनैच्छिक अशी कुठलीही ओझी माणसाने वाहिलीच नसती तर...

Aavartan | आवर्तन

By // 4 comments:
आणखी एक आवर्तन:
कालगणनेच्या चौकटी निर्देशित करणाऱ्या कॅलेंडरची काही पाने उलटली. एक आवर्तन पूर्ण झाले. स्वतःभोवती आखून घेतलेल्या लहान-मोठ्या चौकटीत जगलेल्या क्षणांच्या काही स्मृतिशेष रेषा मनःपटलावर रेखाटल्या गेल्या. काळाच्या प्रवाहात कितीतरी गोष्टी घडतात आणि बिघडतातही. त्याच्या परिणामांचे प्रासंगिक ठसे परिस्थितीवर अंकित होतात. काळाची पालखी पुढे निघते. माणसं सोबत चालत राहतात. त्याला कुणासाठी थांबण्याचे काही कारण नसते. सोबत कुणी असले काय आणि नसले काय, काही फरक पडत नसतो. काळाच्या पटावर माणसाचं अस्तित्व तसंही नगण्यच आहे. काळाचे विस्तीर्ण वर्तुळ आणि त्यातून आपल्या वाट्यास आलेली काही वर्षे यांना जोडणाऱ्या रेषेला आयुष्य असे म्हटले, तर त्या दोन बिंदूना सांधणारी रेषा काळाचा एक लहानसा तुकडा असते. त्यातही नियतीने कोणाच्या ललाटी तो किती लेखांकित केला आहे, हे सांगणं अवघड. म्हणूनच मनात कोणतीतरी नवी उमेद घेऊन आयुष्यात आलेली वर्षे साजरी करण्यासाठी कुठली ना कुठलीतरी निमित्ते माणसं शोधत असतात. आनंदाचा एक कवडसा आपल्या अंगणी आणण्याकरिता धावाधाव करीत असतात.

काळ बदलला तसे माणसांचे जगणेही बदलले आहे. बदल कधी ऐच्छिक नसतात. प्रवाहासोबत ते घडत असतात. कधीकाळी खूप मोठे वाटणारे जग आज मोबाईलच्या स्क्रीनवर सामावण्याएवढे लहान झाले आहे. गतिमान साधनांनी जगाचे संपर्कसूत्र एका क्लिकवर जुळण्याइतके सहज, सुगम केले आहे. अन्य सांस्कृतिक प्रवाहांशी घडलेल्या परिचयातून काही नवे विकल्प हाती लागले आहेत. नववर्षाच्या स्वागताची आतिथ्यशीलता त्यातील एक. नव्या वर्षाचे निमित्त करून आनंद साजरा करण्याची ही पाश्चात्य रीत देशप्रदेशाच्या सीमा पार करीत स्थानिक प्रवाहात येऊन सामावली आहे. प्रादेशिक प्रवाहाशी तिचा संगम घडणं संयुक्तिक आहे की नाही, हा मतभेदाचा विषय असू शकतो. पण आनंद साजरा करणाऱ्यांना निमित्त हवे असते, मग ते काहीही असो.

माझा एक मित्र आहे. नववर्षाच्या आगमनाप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या प्रासंगिक जल्लोषाबाबत नाराजीनेच मत व्यक्त करीत असतो. म्हणतो, ‘ही पाश्चात्य संस्कारांची बांडगुळे येऊन आपल्या संस्कृतीच्या विशाल वृक्षावर जगली आहेत. आपल्याकडे अशा गोष्टींची आवश्यकताच काय? आनंद साजराच करायचा, तर निमित्त शोधायचेच कशाला? आणि शोधायचीच असतील, तर आपल्याकडे काय त्यांची कमी आहे?’ अर्थात त्याच्या विचारांच्या वर्तुळात हे म्हणणे ठीक असेलही. आनंदप्राप्तीला कसला आला देश आणि कसल्या आल्यात संदर्भांच्या सीमा. तो सहजपणे साजरा करता आला म्हणजे झाले. तसेही आनंद साजरा करताना त्यातील नितळपण जपणे आपल्याच हाती असते ना! सरत्या वर्षाला निरोप देतांना सुटणारा संयम योग्य नाही, हे मान्य. वर्ष साजरंच करायचं तर बेताल, बेमुर्वत धिंगाणा करायची आवश्यकताच काय? असेही वाटणे स्वाभाविक आहे.

त्याचा आणखी एक आक्षेप याप्रसंगी घडणाऱ्या मद्यप्राशनाला आहे. म्हणतो, ‘अशावेळी आपलं राज्य महाराष्ट्र न राहता मद्यराष्ट्र होतं. अंधाराला उजळून टाकणाऱ्या असंख्य झगमगत्या दिव्यांच्या साक्षीने आनंदप्राप्तीच्या नावाखाली सामाजिक मर्यादांचे बांध सोडून हा पूर दुथडी भरून वाहत असतो. त्यास काही नियंत्रण असायला नको का?’ त्याची मते कदाचित काहींना आवडणार नाहीत, पण त्यात काहीच तथ्य नाही, असेही नाही. अर्थात हे काही आपल्या समाजाचे सार्वत्रिक चित्र नाही. उत्साहाच्या उधानाला विधायक दिशेने वळते करणारे विचारही येथे आहेत. आपला आनंद कोणी कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकास आपल्यापरीने जगण्याचे स्वातंत्र्य आहे. पण जबाबदारीचे यथोचित निर्वहन करण्याची अपेक्षाही असतेच की. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.

याहीवर्षी नेहमीप्रमाणे नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा केला जाईल. तो साजरा करतांना सामाजिक मर्यादांचे भान जपले जात आहे का? असा प्रश्न समोर येतो, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपल्या वर्तनातूनच शोधायला लागते. आनंद साजरे करताना मर्यादांची जाणीव किती जणांच्या मनात असेल, हे सांगणे अवघड आहे. सुखाचे सोहळे साजरे करण्याचे मनसुबे मनात घेऊन माणसे अज्ञात परगण्याच्या शोधात निघतात. प्रासंगिक सुखाचा परीस हाती लागतोही, पण त्या नादात परिस्थितीने पुढ्यात मांडलेले वास्तव विसरतात. काळाने आखून दिलेल्या रेषेवर चालताना नियतीने आयुष्याला दिलेलं एक वर्ष कमी झालं, याचं दुःख वाटण्याऐवजी माणूस गेलेल्या वर्षाला निरोप देतांना आनंद साजरा करतो, हेपण एक नवलच वाटते. खरंतर आयुष्यातून कमी झालेल्या एका वर्षाचे परिशीलन घडायला हवे. गेलेल्या वर्षात काय मिळवले आणि काय मिळवायचे राहिले, याचा शोध प्रांजळपणे घ्यायला हवा. पण असं कितीजणांना वाटत असतं, कोणास माहीत. काही असतील असेही, जे चिंतनाच्या वाटेने हातून निसटलेल्या काळाची गणिते जुळवत आयुष्यातल्या आनंदाची बेरीज-वजाबाकी करीत असतील.

वर्षे केवळ व्यक्तीच्या आयुष्यातूनच कमी होत नसतात, तर व्यवस्थेच्या वर्तुळातूनही अलगद निसटत असतात. व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणताना प्रत्येक बदलाला माणूसपणाच्या निर्णायक कसोट्यांवर घासून-पुसून स्वीकारणे आवश्यक असते. जगणं आनंदी करण्यासाठी निरामय विचारांची निरांजने प्रज्वलित करायला लागतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून सुरक्षित सांभाळावीही लागतात. आजचे परिवर्तन उद्याचा आनंद असतो. सुख आपल्या अंगणी आणायचे, तर दुरितांचे तिमिर संपणे आवश्यक असते. वैगुण्यांचा नाश करण्यासाठी सद्विचारांचे संकल्प सोडायला लागतात. प्रासंगिक औचित्य पाहून ते करावे लागतात. नववर्षाचे संकल्प नव्याची नवलाई म्हणून नऊ दिवस सांभाळून पुन्हा पहिल्या वाटेला लागणारे अनेक संकल्पप्रिय माणसे आपण पाहतो. संकल्पसिद्धीसाठी संयम, सत्व आणि स्वत्व अंतर्यामी असायला लागते, तेव्हाच अपेक्षापूर्तीची इच्छित फळे हाती लागतात.

मागचं वर्ष खूप भरभराटीचे गेलं, असं कुठल्याही वर्षाबाबत कोणी कधीच म्हटल्याचे निदान मला स्मरत नाही. आसमानी, सुलतानी संकटे घेऊन वर्षे येतात आणि व्यवस्थेवर ओरखडे कोरून जातात. हे वर्षसुद्धा असंच काहीसं संपल्याचं आपण अनुभवतो आहोत. पावसाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीने शेतीचा कणा मोडला. पावसाशी बांधलं गेलेलं कृषीकारण उध्वस्त झालं आणि अर्थकारणाला आचके यायला लागले. मातीशी बांधल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाचा खेळखोळंबा झाला. नियतीच्या खेळाने अनेक अभाग्यांच्या जीवनाचा खेळ संपवला. कारुण्याची ही काळी किनार नववर्षाचा आनंद साजरा करताना स्मरणात असायला नको का? नव्यावर्षाच्या स्वागताला पायघड्या घालताना मनात संवेदनांचा एक कोपरा जागा असावा.

प्रतिष्ठितांच्या, प्रस्थापितांच्या जगातील पंचतारांकित सेलिब्रेशनच्या प्रचंड झगमगाटात कुठेतरी दूर पहाडाच्या पायथ्याशी अंधारा कोपरा सोबतीला घेऊन पडलेल्या वाडी-वस्तीवर जगणाऱ्यांची वंचना विस्मरणात जाणे विचारांचा विपर्यास आहे. डोंगरदऱ्यांच्या सांदेकपारीत राहणाऱ्या आदिवासींच्या अभावग्रस्त जगण्याला विसरणे सामाजिक अपराध आहे. स्वातंत्र्यसंपादनाला अडुसष्ट वर्षे होऊनही ज्यांच्या जगण्यात आनंदाचं वर्ष अद्याप आलंच नाही त्यांचं काय? त्यांची अस्वस्थ वणवण स्वार्थाची झापडबंदपट्टी डोळ्यावर बांधून आनंदाच्या उन्मादात झुलणाऱ्या मनांना कळणार आहे का? धनिकांच्या घरात नांदणाऱ्या लक्ष्मीला वंचितांच्या वेदनांनी व्यथित होणं घडेल का? प्रगतीच्या पंखांवर स्वार झालेल्या मूठभरांचा उन्मादी जल्लोष म्हणजे विकास. प्रगतीचा असा अर्थ होत नाही. समस्यांच्या निबिड अंधारात चेहरा हरवलेल्या माणसांचे उध्वस्त जगणे न दिसणे ही विसंगती आहे. आनंद साजरा करायचा, तर आसपासचं आसमंतही आनंदलहरींनी भरून यायला लागतं. एकीकडे जगण्याचे सगळेच सूर लागणे आणि दुसरीकडे जीवनाचं गाणं बेसूर होणं म्हणजे आनंद नसतो.

जग अनेक कलहांनी फाटले आहे. अविचाराने उसवले आहे. त्याला टाके घालण्याचा संकल्प नव्यावर्षात घडणार आहे का? जात, धर्म, पंथ नावाचे अभिनिवेश माणसातलं माणूसपण विसरण्यास कारण ठरत आहेत. ते संपवण्याचा विचार यानिमित्ताने घडणार आहे का? विचारवंतांच्या विचारांचा, बुद्धीमंतांच्या प्रज्ञेचा प्रकाश आपल्यात सामावून घेण्याएवढं शहाणपण आम्हाला यायला काय हरकत आहे? माणसाचा माणूस म्हणून यथोचित सन्मान घडण्याची सहिष्णू मानसिकता जागी राहावी. न रूचणाऱ्या मतांनाही स्वीकारण्याइतके सहजपण आमच्यात यावे. माणसांच्या जगात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नको. मनभेदामुळे कलह विकोपास जाऊन माणूसच नको वाटणे, हा अविचार आहे. अविवेकी कृत्यांनी काजळलेलं जग विवेकी विचारधारांना प्रमाण मानून जगणाऱ्यांसाठी कधीच नसतं. ही जाणीव अंतर्यामी जागी राहावी.

माझं म्हणणं कदाचित वांझोटा आदर्शवाद आहे, असे काहींना वाटेल. नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना आपल्या विचारांत संवेदनांची किमान एक लहानशी पणती पावलापुरता प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रज्वलित असावी. तिचा प्रकाश मनाच्या आसमंतात असावा. विसंगतीने विटलेले, अविवेकाने विसकटलेले आणि अविचाराने फाटलेले जग कसे जगते आहे, हे कळण्याइतपत संवेदना विचारांच्या वर्तुळात जिवंत असणे माणूस म्हणून आवश्यक आहे. जगात अज्ञान, अन्याय, अत्याचार, आतंक, उपासमार, विस्थापन, दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा अशी अनेक दुरिते असताना मी काहीही करू शकत नाही, ही खंत अंतर्यामी असली तरी खूप आहे. निष्क्रिय आदर्शवादाने जगाच्या परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल घडवता नाही येत. कोरड्या कर्मयोगात कुणाचे मंगल करण्याचे बळ नसते. कोणा एकट्याला हे शक्यही नाही. माझ्या अंगणी येणाऱ्या आनंदाच्या प्रकाशाचा एक कवडसा वंचितांच्या अंधाऱ्या जगात मला नेता यावा. तिमिराच्या सानिध्यात स्वतःला शोधण्याची धडपड करूनही हाती काही न लागल्याने विकल झालेल्या असहाय झोपडीपर्यंत ओंजळभर उजेड नेण्याइतके माझ्या विचारांना विशाल होता यावे. प्रश्न केवळ आनंदाचा नाहीये. संवेदनांचाही आहे. अविचाराने विसकटलेले जग नको असेल, तर अविवेकाचे जळमटे चढलेल्या विचारांना मूळापासून तपासून पाहावे लागेल. गरज भासल्यास त्यात बदल करावे लागतील. बदलांचा प्रारंभ स्वतःपासून करायला लागेल. परिवर्तन सांगणे सोपे आहे, घडवून आणणे कठीण आणि आचरणात आणणे त्याहून अवघड असते. पण मनात सत्यान्वेषी विचारांचा संचार असेल, तर ते घडणं अशक्यही नाही. कदाचित यासाठी काळाला आणखी काही पावलं पुढे चालायला लागेल. म्हणतात ना, चालणाऱ्याचे भाग्य चालते. भाग्योदयाचे साचे घडवावे लागतील. येणाऱ्या नव्यावर्षात ते तयार व्हावेत. अशी आशा आपण सगळ्यांना करायला काय हरकत आहे. कारण माणूस आशावादी असतो आणि कोणतीतरी स्वप्ने डोळ्यात घेऊन जगत असतो.