Anvay | अन्वय

By // 10 comments:
अन्वय आत्ममग्न असण्याचा

टीव्हीवर कार्यक्रम पाहत निवांत पहुडलेलो. शेजारीच मोबाईल पडलेला. रात्री दहा-अकराची वेळ असावी. फेसबुक, व्हॉटसअप, हाईकची घरं शोधत कुठून कुठून येणारे मॅसेज इनबॉक्स मध्ये येऊन धडकतायेत. वेगवेगळ्या रिंगटोन्सचा आवाज आपल्या आगमनाचा सांगावा घेऊन येतायेत. त्या आवाजांनी लक्ष विचलित होते. कोणते मॅसेज आलेयेत, हे पाहण्यासाठी उत्सुकतेने मोबाईल उचलतो. एव्हाना इनबॉक्समध्ये येणाऱ्या आगंतुक संदेशांची गर्दी बरीच वाढत चालली आहे. मॅसेज चाळताना मोबाईलमधील संपर्क नामावलीत आसनस्थ असणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याच्या नावाकडे लक्ष गेले. सहसा कोणाला मॅसेज न पाठवणारा हा गडी. ठरवून मॅसेज पाठवतो म्हणून कुतूहल जागे झाले. वाचून पाहूया, म्हणून पाहिला. ‘संपर्कमाध्यमे: किती उपयुक्त किती अनउपयुक्त’ याबाबत त्याला काही मुद्दे हवे होते. कुठल्यातरी निबंध, वक्तृत्त्व स्पर्धेत त्याचा चिरंजीव सहभागी झाला होता. म्हणून ते पाठवण्याची विनंती केलेली. तो मॅसेज वाचून क्षणभर मनाशीच हसलो. मीडियाचे माध्यम वापरून तू तरी काय करतो आहेस? असा प्रश्न त्याला विचारावासा वाटला, पण तो मोह टाळून त्याच्या समाधानासाठी दिले काही मुद्दे पाठवून.

निमित्त म्हणून हाती घेतलेल्या मोबाईलच्या मायाजालात एव्हाना नकळत गुंतत गेलो. आलेले मॅसेज वाचतांना त्यात हरवलो कधी ते कळलेच नाही. अर्थात हेही नेहमीचेच. एकदा का या मोहजालात गुंतले की, कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेल्या किटकासारखी स्थिती होते. कितीही सुटायचा प्रयत्न करा मुक्तता होणे अवघड. गुरफटणेच जास्त. समोर टीव्हीवर जाहिरातींचा अखंड रतीब सुरु. त्यांचा गलका वाढलेला. प्रत्येकजण आपलेच उत्पादन कसे उत्तम, हे पटवून सांगतोय. ते सांगण्यासाठी गरज असली काय, नसली काय, तरी आखीव, रेखीव देहाच्या लावण्यवती लचकत, मुरडत सुहास्य वदनाने पडद्यावर येतात. नाजूक किणकिणत्या आवाजाने काही सेकंदाचा संवाद साधतात. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही टीव्ही घेतला, त्यासाठी डिश आणला तर आम्ही ठरवू तेच पहा, हे त्यांनी परस्परच ठरवलेलं. कार्यक्रम पाहण्यासाठी महिन्याचे काही पैसे तुम्ही मोजत असलात तरी. दुसरा विकल्पच नसल्याने आलिया भोगाशी... म्हणत समायोजन साधणे एवढेच दर्शकाच्या हाती असते. या जाहिराती कितीजण मनापासून पाहतात, ते जाहिरातदारांनाच माहीत. ब्रेकमध्ये मोबाईल हाती घेऊन बसतो. मोबाईलच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित झाल्याने त्या आरडाओरडीचा परिणाम गोंगाटाशिवाय दुसरा शून्यच. मॅसेज एकेक करून वाचले जातायेत. काही आधी, काही नंतर एवढाच काय तो फरक.

मोबाईल आवश्यक की अनावश्यक, हा वादाचा विषय असू शकतो. त्याचं समर्थन करणारे तो दैनंदिन जीवनाची अनिवार्य आवश्यकता कसा ते आग्रहाने सांगतात. विरोधी मत असणारे हे उगीचच ओढवून घेतलेलं विकतचं दुखणं असल्याचं पटवून देतात. कुणी काही म्हणाले, नाही म्हणाले तरी यामुळे परिस्थितीत फारसा काही फरक पडत नाही. ज्याला जे करायचे, ते तो करतो, हेच वास्तव आहे. तसे नसते तर स्मार्ट झालेल्या मोबाईलने माणसांच्या मनांवर एवढी मोहिनी घातलीच नसती. घरात एकवेळ पुरेशा सुविधा नसल्या तरी चालेल; पण मोबाईल असलाच पाहिजे, हा सार्वत्रिक आग्रह. कधीकाळी संवादापुरता सीमित असणारा मोबाईल तंत्रक्रांतीच्या मार्गाने विकसित होत स्मार्ट झाला; पण माणसे तंत्रज्ञानाचा वापर करताना आपला अंगभूत स्मार्टनेस विसरली. महिन्यामहिन्याला बदलणाऱ्या त्याच्या रंगरुपाने विचलित झाली. कंपन्यांमधील तीव्र व्यावसायिक स्पर्धेतून तो नुसता स्मार्टच नाही, तर सुंदर आणि स्वस्तही झाला. संवादाव्यतिरिक्त संप्रेषणाच्या साऱ्या प्रवाहांना आपल्यात सामावून घेताना प्रतिष्ठेचे प्रतीक बनला. नवा मोबाईल, त्याचे नवे मॉडेल हाती असणे प्रगती, तर जुन्या मॉडेलसह वावरणे तंत्रक्षेत्रातील मागासपणा समजला जातोय.

काळासोबत तंत्रज्ञानही कूस बदलते आहे. ते आवश्यकही आहे. तंत्रज्ञानाला परिणत संवेदनांचा स्पर्श असला, तर ते उपयुक्त असते, याबाबत कुणाच्या मनात संदेह असण्याचे कारण नाही. हल्ली सर्वच क्षेत्रात संवेदनांचा प्रवास उतरणीला लागल्याचे बोलले जाते. विश्वाच्या पसाऱ्यात माणसांचे वेगळेपण अधोरेखित करणारे काही असेल, तर त्याच्याजवळ असणारे संवेदनशील मन. मनाचे व्यापार प्रसंगोत्पात कसे असतील, असावेत; याचं विश्लेषण मानसशास्त्रज्ञ करतील. पण हल्ली संवेदनांचा अर्थच मानसशास्त्रज्ञांनाही कळणे अवघड होत चालले आहे की काय, असे वाटण्याइतपत माणसांचे विचार गोठत चालले आहेत. भावना बोथट होत आहेत. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातात मदत करा, म्हणून फलक समोर दिसत असतात. दुर्दैवाने रस्त्यावर एखादा अपघात घडतो, तेव्हा मदती ऐवजी कुणीतरी आपल्याकडील मोबाईलमध्ये रक्ताळलेले चेहरे चित्रांकित करण्यात गुंतलेला असतो. त्याला ते फॉरवर्ड करायची घाई झाली असते. अपघातग्रस्त मदतीची याचना करीत अखेरच्या आचाक्यांकडे सरकत असतो आणि याच्या मोबाईलचा कॅमेरा झूम होऊन वेदनांनी विव्हळणाऱ्या चेहऱ्याजवळ पोहचत असतो. कुठलं हे आपलं माणूसपण? अशावेळी विचारांना थोडातरी वाव नसावा का? की माणसांची मनेही बर्फासारखी गोठत चालली आहेत?

कुणीतरी तो-ती कुठल्याशा तरल क्षणी एकमेकांच्या समीप येतात. स्नेहाच्या रेशीमधाग्यांचे गोफ विणले जातात. सहवासातून सहजपणे जवळीक वाढवण्याचं काम निसर्ग करीत राहतो. माणसं त्याला प्रेम, मैत्री, स्नेह वगैरे अशा काही गोंडस नावांची लेबले लावतात. झोपाळ्यावाचून झुलणाऱ्या क्षणांना सोबत घेऊन मने स्वप्नांच्या आकाशात विहरत असतात. त्या हळुवार क्षणांना स्मृतीच्या कोंदणात कायमचे कोंडण्याचा मोह ठरवूनही टाळता येत नाही. कॅमेराच्या डोळ्यांनी दृश्ये नजरबंद होतात. टिपलेल्या छब्या स्वतःच्या मर्जीने फेसबुकच्या वॉलवर चिटकवल्या जातात. अर्थात हा स्वखुशीचा सौदा असला, तरी त्याला सर्वजनिकतेचा स्पर्श लाभतो, तेव्हा संस्कारांच्या सीमारेषांचे सीमोलंघन घडते आहे का, हे पाहण्याचा विचार मनात येतोच असे नाही. हवे नको ते कॉमेंट्स ललाटी मिरवत त्यांचा प्रवास घडत राहतो. आप्त, मित्र, स्नेही अशा मार्गावरून प्रवास करीत राहतो. त्याच त्या छापाचे अर्थहीन लेबले ललाटी लावून त्यास अप्रतिम म्हणण्याची अहमहमिका लागते. आशयघन शब्दांचा दुष्काळ असलेल्या फालतू कॉमेंट्सची रेखाटने करीत ती पोस्ट भटकत राहते. कधी कुण्या छुप्या नजरेचा पाठलाग घडत राहतो. नको तितक्या समीप आणणारे क्षण कॅमेराच्या करामतीने कंटकांच्या कराल हाती लागतात. आणि पुढचा वेदनादायी प्रवास सुरु होतो. ते सार्वजनिक होताना कुणा अश्राप जिवाचे आयुष्य पणाला लागते. विकृत मानसिकता धारण करून वावरणाऱ्या विचारांचे विकृत शब्द एखाद्या पोस्टवर शब्दांकित होऊन जटिल प्रश्न निर्माण करतात. छुप्या नजरेने कॅमेरा कुठे डोकावेल, हे सांगणं ब्रह्मदेवालाही अवघड आहे. सार्वजनिक ठिकाणी सावज हेरण्यासाठी विकारग्रस्त नजरा भिरभिरत असतात. कपड्यांच्या दुकानातील ट्रायलरूम्सपासून हॉटेल्समधील रूम्सपर्यंत. तेथील मिनिटाच्या चित्रीकरणाने अनेकांच्या आयुष्याची झालेली वाताहत आपण ऐकतो, तेव्हा मनात विचार येतो, ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’

डोंगराच्या सुळक्यावर बसून मुलांनी काढलेला सेल्फी काही दिवसापूर्वी सर्वत्र संचार करीत होता. पाय खाली सोडून ही मुले बसली होती तेथून शेकडो फूट खोल दरी खाली. पाहणारा अवघडून जावा असे दृश्य. सेल्फी काढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण कोणी जगज्जेते सिकंदर, नेपोलियन असल्याचे भाव. एका क्षणाची चूक आणि तिचे भीषण परिणाम काय असू शकतात, हे न समजण्याइतपत ही पोरं विचारांनी वंचित असतील का? सेल्फीच्या नादात जीव गमावणाऱ्यांची उदाहरणे काही कमी नाहीत. जगात रोज लाखोंच्या संख्येने सेल्फी माध्यमांतून फिरत असतात. उगीचच वेडेवाकडे चेहरे करून, विक्षिप्त हावभाव करीत  काढलेली छायाचित्रे फॉरवर्ड करून त्यांना लाईक्स, कॉमेंट्स किती येतील, याची वाट पाहणारे अनेक वेडे जगात आहेत. सतत सेल्फी काढून स्वतःला मिरवत राहावसं वाटणं मनाचा असमतोल प्रदर्शित करीत नाही का? सेल्फी आजार होऊ पाहतो आहे. वैयक्तिक जीवनातील कोणत्या गोष्टी सार्वत्रिक कराव्या, याचेही तारतम्य प्रसिद्धीसन्मुख राहणाऱ्यांना नसावे का? अशा माणसांना स्थलकालाचे काही भान नसावे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या वर्तनात दडलेले असते. माणसाला मुळात मिरवण्याची हौस असतेच. तो कितीही नाही म्हणत असला तरीसुद्धा. कोणीतरी आपल्याला पाहतो आहे, आपल्या वर्तनाला अधोरेखित करतो आहे. हे विचार सुखावणारे असतात. हल्ली मिरवण्यासाठी अनेक प्रगत, अधिक वेगवान साधने हाती आल्याने मिरवणूक सुलभ झाली आहे, हेही सत्यच.

काही दिवसापूर्वी माध्यमांच्या संदर्भात आम्हा मित्रांमध्ये बोलणे सुरु असताना माझ्या एका स्नेह्याने त्याच्या मित्राच्या वर्तनविषयी त्याला आलेले अनुभव सांगितले. म्हणाला, स्वतःभोवती प्रसिद्धीचे आभासी वर्तुळ तयार करून त्यातल्या मृगजळी सहवासात रमणारा हा माणूस. त्याच्या स्वभावाचे अनेक परिचितांनी अनेक मार्गांनी विश्लेषण केले. या माणसाबाबत सगळीकडून उत्तर एकच, स्वतःला मिरवून घेण्यापलीकडे याच्याकडे आणखी काहीही नाही. काहींना मिरवण्याची हौस असते, त्यातलाच हा एक. काहीही करेल, पण प्रसिद्धीच्या प्रकाशात आपण राहायलाच हवे, असे वाटणारा. तीच जगण्याची निदान आपल्यापुरती तरी सुयोग्य रीत मानणारा. कुणी निंदा अथवा वंदा... असे याचे वावरणे. फेसबुकवर शेकडो मित्र, त्यांचे हजारो लाईक्स, व्हॉट्सअपवर एवढे मित्र, त्यांचे असे गृप, हे सांगण्यात श्रीमंती मानणारा. आत्मस्तुतीत रमणारा. स्वतःसाठी अनेक बिरुदावल्या लावून घेणारा. समोरची माणसे आपलं निरीक्षण करतायेत, वर्तनाचे विश्लेषण करीत आहेत. ते काय म्हणतील, याची जराही तमा न बाळगणारा. बरे कुणी समजावून सांगितले, तरी वर्तनात काडीचाही फरक न पडणारा. अशी माणसे शेकड्याने आपल्या आसपास संचार करीत असतात. समाज यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतो. आत्ममग्न माणसांसाठी माध्यमे मदतीला धावून आली आहेत. व्हर्च्युअल जगात रमणाऱ्यांना अॅक्च्युअल जगाशी डिसकनेक्ट करणारी मनोवृत्ती अमरवेलप्रमाणे वाढतेच आहे. ज्या झाडाच्या पर्णसंभारावर चढली तेथूनच विस्तारणारी. अशा काही प्रसिद्धीपरायण पुण्यात्म्यांच्या सहवासाने पावन होणारी ही साधने अशावेळी वैताग वाटायला लागतो.

स्वतःच्या सर्जनशील विचारांचा अविष्कार असेल आणि तसे काही विचार संप्रेषण माध्यमातून पाठवले जात असतील, तर कुणास संदेह वाटण्याचे काही कारण नाही. कुठूनतरी कॉपी करायचं आणि पेस्ट करून मिरवायचं व्यसनच काहींना लागले आहे. ना त्याला अर्थ, ना कोणते मोल. सगळा कचराच उडत असतो इकडे तिकडे. बरे समोरच्यास काय आवडेल, हे त्यांनीच परस्पर ठरवून घेतलेलं. गृपवर एकच मॅसेज परतपरत फिरून येत असतो. तो पाठवतांना जरा विचार तर कराल की नाही. गृपवर आहात तर आधी बघाना काय आलंय; पण नाही, यांना घाई झालेली. कुठल्यातरी फालतू चित्रावर, संदेशावर पसंतीची मोहर अंकित. व्वा! मस्तच! एक नंबर! असे काय काय लेबले लावून मैत्रीच्या गंधाने उतावीळ गृप दरवळत असतात. हल्ली तसेही माणसांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हसू हरवलेच आहे. ते स्माईलीतून उसनवार घेऊन हसरे चेहरे शोधण्याचा तर्कहीन प्रयत्न घडत राहतो. वाढदिवस शुभेच्छांच्या शुष्क कर्मकांडात पार पाडण्याची चढाओढ लागलेली असते. चित्रांचे केक आणि कुणीतरी केलेल्या अर्थहीन विशेषणांनीमंडित काव्यपंक्ती पाठवण्याची स्पर्धा सुरु असते. वाढदिवस साजरा करताना चिखलात लोळून घेतल्यासारखा केक चेहऱ्यावर चिटकवून काढलेले फोटो नित्याचे झाले आहेत. औपचारिक अभिनंदनात पार पडणाऱ्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणाऱ्याच्या मनात खंत असते. मी शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून समोरच्यास वाईट तर वाटणार नाही ना! म्हणून पाठव काहीतरी. माणूस भावनांनी एवढा क्षूद्र झाला आहे का? कुणी शुभेच्छा नाही दिल्या, म्हणून वाढदिवस पुढे वाढायचा राहणार आहे का?

माणूस समाजशील वगैरे असल्याचे म्हटले जाते. पण समाजपरायण असणे आणि तसेच वर्तने यात बरंच अंतर वाढत चाललंय. समाजाच्या प्रगतीसाठी माध्यमांतून काहीच घडत नाही, असे नाही. काही चांगलेही घडते आहे. पण सामाजिकतेच्या नावाखाली संपर्कमाध्यमातून चमकण्याची संधी शोधली जाते, तेव्हा शहाण्या माणसाने न बोलणंच संयुक्तिक ठरते. कोण्यातरी नेता, अभिनेता, खेळाडूच्या यशाचा उत्सव करणारे अनुयायी कोणती भक्ती प्रकट करतात कोणास ठावूक. इतिहासाच्या पानात विसावलेल्या आणि आपल्या असीम कर्तृत्त्वाची नाममुद्रा कालपटावर अंकित करीत, समाजासाठी आदर्शांची परिमाणे उभी करणाऱ्या थोरांच्या जीवनाचे चित्रण करून त्याखाली आपली छबी चित्रांकित करणाऱ्यांना महापुरुषांचे इहलोकी घडलेले अनुपम कार्य अभ्यासाने तरी अवगत झाले आहे का? असा प्रश्न कोण्याही विचारी माणसाच्या मनात आल्यास नवल वाटायला नको. बरे येथेही थोरांच्या कार्याला विविध जाती, धर्म, पंथ, वंश आदी चौकटींमध्ये बंदिस्त केलेले. ज्यांनी जात, धर्म, वंश भेदांच्या भिंती उभ्या करण्याचा कधी चुकुनही विचार केला नाही. अवघं विश्वच आपलं घर समजून जीवनयापन करणारी ही निर्मोही माणसे. चमकणाऱ्या माध्यमांच्या जगात आंधळ्या अनुयायांच्या विचारांच्या वर्तुळात कोंडले जातात. खरंतर ज्यांच्या जीवनकार्याच्या ज्योतीच्या प्रकाशात सद्विचारांचा पथ सहज सापडावा, त्यांच्या विचारांना वैयक्तिक अभिनिवेशात बंदिस्त करून कोणते समाधान प्रसिद्धीपरायण भक्तांच्या अंतर्यामी उदित होते, सांगणे अवघड आहे.

हल्ली कुठल्या कारणांनी माध्यमांचा वापर करायचा, याचं भान समाजाने सोयिस्कररित्या विस्मृतीच्या कोशात टाकून दिले आहे की काय, असे वाटायला लागले आहे. फेसबुकवर माझे हजार मित्र आणि गल्लीत विचारात नाही कुत्रं, अशी स्थिती आसपास दिसते. माणसातला व्हर्च्युअल संवाद वाढतोय; पण अॅक्च्युअल संवाद संपतोय, त्याचं काय? एक काळ होता, जेव्हा माणसं गावाच्या पारावर, घरी, ओसरीवर, अंगणात चार घटका एकत्र येत. आपापसांत बोलणं घडत रहायचं. भावनांच्या वाटावरून आस्थेचा संवाद घडायचा. संवादाला आपलेपणाचा स्नेहिल स्पर्श लाभायचा. सारंकाही फेस टू फेस असायचं. राग, लोभ, मैत्रीचे बंध जुळवत माणसं जवळ यायची. आजचं चेहरा हरवलेलं जगणं नसायचं. हल्ली प्रत्येकच आत्ममग्न होत चालला आहे. मोबाईलच्या चारपाच इंची खिडकीत बंदिस्त होत आहे. मराठीत एक म्हण आहे, नऊ घरं आणि वाकडी दारं. आज घराची दारं बंद आहेत आणि घरात माणसं बंदिस्त. फ्लॅट संस्कृतीत स्पेस नावाचा विचार की विकार मूळ धरू लागला आहे. स्पेस नावाखाली स्वातंत्र्याचा सोयीस्कर अर्थ शोधला जातोय.

हल्ली कुठेही गेले तरी माणसांची डोकी मोबाईलमध्ये आणि डोळे स्क्रीनवर विसावलेले. संवाद मित्रांसोबत, पण अवधान दुसरीकडेच. कार्यालये, सिनेमागृहे, प्रवास काहीही असो साऱ्यांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खिळलेले दिसतील. कुठल्यातरी वक्त्याच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आधीच सूचित केलेले असते मोबाईल बंद ठेवा. पण कुणीही फारसं मनावर घेत नाही. मध्येच रिंग वाजते. माणसं सरावाने दुर्लक्ष करीत राहतात. काही क्षणभर चिडतात, पण काहीच करू शकत नाहीत. कारण आमचे सार्वजनिक वर्तन असेच असते. एवढेच काय; पण शाळा, महाविद्यालये- जेथे ज्ञानसाधना घडते, तेथे तरी आपापसात संवाद आहे कुठे. पूर्वी शिक्षकदालनात शाळा, शिक्षण, पुस्तके, विद्यार्थी असं काहीकाही शिक्षक आपापसांत बोलत असायचे. चर्चा घडायच्या. वादसंवाद रोजच असायचा. ऑफ तासिका विचारांचा जागर असायच्या. आता प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतला आहे. गुंतलेली माणसे अस्वस्थ होत आहेत. बेचैन झालेली मने उगीच द्वेषाचा, मत्सराच्या मुलाम्याचे मनावर लेपन करीत आहेत. आत्मलीन, आत्ममग्न होणाऱ्या माणसाकडून घडणारी प्रत्येक कृती संवादाला संपवते आहे. अर्थात याची जाणीव कुणास नसेल, असे म्हणणे विपर्यस्त ठरेल. तुटत जाणारी नाती संवादातून कधीकाळी सांधली, बांधली जायची. परिस्थितीच्या आघाताने विखुरलेली माणसे सावरली जात होती. हल्ली नाती विसरलेला संवाद तंत्रज्ञानातून निर्माण झालेली विसंगती ठरू पाहत आहे. दुर्दैव हेच की, हे सगळं माणसांना कळतंय; पण वळत मात्र नाही.

लहानापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या मनावर मोहिनी टाकणारं हे तंत्रज्ञान सररास वाईट आहे, असे म्हणण्याचे कारण काहीच नाही. तंत्रज्ञान कधीच वाईट नसते. चांगली किंवा वाईट असते, त्यास वापरण्याची पद्धत. तंत्रज्ञान कोणत्या हातात आहे आणि त्या हाताना नियंत्रित करणारे विचार कसे आहेत, त्यावर त्याचे मोल ठरत असते. तंत्रज्ञानाचा मोठा दोष कोणता असेल, तर ते मुक्त असणे हाच आहे. विचारवंतापासून समाजकंटकांपर्यंत कोणालाही त्याचा वापर करता येतो. वापरकर्ता कोण, कसा असेल त्यावर त्याचे परिणाम ठरतात. कधीतरी अनेक वर्षापासून हरवलेलं कुणी या तंत्रज्ञानाच्या संवादाने सापडते. कुण्या पीडितांच्या मुक्तीचे मार्ग माध्यमांचा वापर करून सापडतात. कुण्या गरजवंतास वेळीच मदत पोहचते. कधी विशिष्ट विचारांचे विखार पेटवून वातावरण कलुषितही होऊ शकते. कुणाच्या आयुष्यभराची पुंजी एका क्लिकने लंपास होते. कुणाच्या नावाने फेसबुकची खोटी पेजेस तयार करून अश्लाघ्य वर्तन घडते. कधी विचारांच्या शांत जलाशयात अविचारांचे विष पेरले जाते. माणसे भडकतात आणि दिसेल त्यावर जाऊन धडकतात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. कधी व्यवस्थेच्या विरोधातले आवाज क्रांतीचा उद्घोष करीत माध्यमांच्या भिंतींवर प्रकटतात. तर कधी अन्यायाच्या विरोधात विचारांना धार लावली जाऊन राजकीय, आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवता येणे शक्य असल्याचे संदेश येथूनच भटकत राहतात. अज्ञात असणारे परगणे, दुर्लक्षित असणारे काम आणि ते करणारी माणसे, सहज घडणारी सेवा माध्यमांच्या संवादातून समाजासमोर येते. सद्विचारांचे मळे फुलत जातात. असं बरंच कायकाय हे तंत्रज्ञान करू शकतं. अर्थात हे वापरणारे हात कोणाचे आणि त्या हातांना वळण देणारे विचार कोणते आहेत, तेच हे ठरवू शकतात.

डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहताना प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा व्हावा, हे ठरवणं अवघड नाही. तंत्रज्ञानाला स्वतःचा चेहरा असावा तो नुसताच देखणा नसावा, तर विचारांनी युक्त असावा. पण हल्ली विचारांची शक्तीच क्षीण होत चालली आहे की काय, असा संदेह विचारांमध्ये निर्माण होऊ पाहतो आहे. कसलाही विचार न करता पोस्ट फॉरवर्ड करणं. खाजगी जगण्यातले क्षण सार्वत्रिक करणं, एखादं क्षुल्लक यश जगजाहीर करणं, एखाद्याचा वाढदिवस म्हणजे कोण्या महात्म्याचा वाढदिवस असावा, या अभिनिवेशात साजरा होतांना फडकत राहणं. हे जरा अतीच होतंय. मीडियावर सकस, सुंदर, संवेदनशील असंकाही नसतं, असं अजिबात नाही; पण ते बोटावर मोजण्याइतकेच. बाकी सारा उकिरडा, असे कोणास वाटत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? तरीही आम्ही या कचऱ्यात का भटकतो आहोत? याचं उत्तर माहीत असूनही कोणी काहीच कसे करीत नसावं? मनात उदित होणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे कोणत्या संपर्कमाध्यमातून शोधावीत?

Kalaha | कलह

By // 10 comments:
कलह, भांडण, संघर्ष, तंटा, वाद असे शब्द बऱ्याचदा त्यांच्या अर्थाचा आशय भिन्न असला तरी बहुदा भांडण या अर्थाने वापरले जातात. अर्थात ढोबळमानाने या शब्दांचा वापर करायचा असेल तर. संघर्ष या अर्थाने बोलताना कलह हा शब्द विपुल प्रमाणात वापरला जातो. मला नाही वाटत या शब्दाविषयी आपल्यापैकी कोणी अनभिज्ञ असेल. जीवनात प्रत्येकाने कधीतरी लहानमोठ्या कलहांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतोच असतो. तसं पाहता कलह शब्दाचा वावर जितका वैयक्तिक असतो तितकाच वैश्विकदेखील. त्याच्या अस्तित्वाच्या सीमा स्वपासून सर्वस्वापर्यंत नेऊन शोधता येतात.

कलहप्रिय परिस्थिती आणि माणसेही कोणास आवडत नाहीत. हा अनुभव सार्वत्रिक असला तरीही कलह घडवून आणणारा परिस्थितीशिवाय आणखी एक घटक माणूसच असतो, हे सत्यही नाकारता येत नाही. जीवनात कलह नसणारा माणूस शोधून सापडणे मुश्कील आहे. जन्मापासूनच माणसांची संघर्षयात्रा सुरु असते. इहलोकी जन्म घेऊन वातावरणात त्याने घेतलेला पहिला श्वास त्याच्या वाट्यास आलेल्या संघर्षाचे फलित असते. जीवशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून एखादाच मॅरेथॉन रेस जिंकतो. ओव्हमशी संपर्क घडून जीव नावाचा आकार निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. खरंतर तेव्हापासूनच या संघर्षाला प्रारंभ होतो. अपेक्षित लक्षाच्या दिशेने धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून काहीच जगतात. बाकीचे मरतात. जगलेल्यातील एखादाच शक्तिशाली असतो, तो अपेक्षित लक्ष गाठतो. जीव नावाचा देह धारण करून आकाराला येईपर्यंत निर्मितीचा संघर्ष सुरूच असतो. जिवांच्या विकासक्रमातील सगळ्याच अवस्थांमध्ये पुढेही अटळपणे सोबत करीत राहतो. या अंगाने विचार करताना संघर्षाचे गुण आपल्या गुणसूत्रांसोबत घेऊनच कोणताही जीव धरतीवर येतो. नंतर सुरु होतो पुन्हा त्याच्या जगण्याचा आणखी एक नवा दीर्घकालीन कलह, हा असतो टिकून राहण्यासाठी.

कलह सजीवांच्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांना व्यापणारा आणि सामावून घेणारा आहे. माणसांच्या आदिम अवस्थेत जिवंत राहण्यासाठी आणि उदरभरणाच्या प्रश्नांपोटी कलह घडत राहिले आहेत. आपला परगणा, परिवार सुरक्षित राखण्यासाठी आणि परिस्थितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माणूस इतरांशी भांडत राहिला आहे. या कलहात स्वरक्षण हेतू असला तरी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न त्यास आंतरिक समाधान देणारा, सुखावणारा असतो. मनोवांछित सुख संपादन करताना माणूस केवळ माणसांशीच लढत राहिला असे नाही. निसर्गातील इतर जिवांशीसुद्धा त्याला दोन हात करीत राहावे लागले आहे. याहीपेक्षा टिकून राहण्यासाठी अधिक तीव्र संघर्ष निसर्गासोबत त्याला करावा लागला आहे. नैसर्गिक संकटांमधून सहिसलामत सुटकेसाठी संघर्षरत असणाऱ्या माणसांना कलहांनीमंडित आयुष्याची सोबत घडणं अनिवार्य होतं. या टाळता न येणाऱ्या संघर्षाचे स्वरूप गरजांनुसार वेळोवेळी बदलत गेले आहे. म्हणूनच जगण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी घडणारा संघर्ष सजीवांची प्राक्तनरेखा ठरला आहे. कोणत्या प्रसंगी कोणास काय हवे, त्यानुसार कलहाचे स्वरूप ठरत आले आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत त्याच्या परिणामात प्रासंगिक परिवर्तन घडत आले आहे. जगात घडलेल्या, वाढलेल्या संस्कृती माणसांच्या हजारो वर्षाच्या संघर्षयात्रेचे फलित आहेत.

रामायण, महाभारत यांना महाकाव्ये म्हणून माणसांच्या मनात मान्यता आणि मान असला, तरी या काव्यांचा केंद्रबिंदू संघर्ष आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. राम-रावण संघर्षात मर्यादांचे घडलेलं उल्लंघन कलहाचे कारण ठरले. तर महाभारतात मानिनीचा झालेला अधिक्षेप युद्धाचे निमित्त ठरला आहे. दोन्ही ठिकाणी ‘स्त्री’ संघर्षाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते; पण या संघार्षांमागे तेवढेच एक कारण आहे असे वाटत नाही, कारण त्या कलहकेंद्राभोवती असणारे अनेकांचे दुखावणारे अहं आणि सन्मानाचे, आत्मसन्मानाचे निकष माणसांना संघर्षापर्यंत ओढत नेणारे ठरले आहेत. मर्यादांचे बांध फोडले जातात, समाजाने निर्माण केलेल्या नियमांच्या आणि नैतिकतेच्या चौकटी तोडल्या जातात, तेव्हा कलह अटळ ठरत असतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती अन्यायातून मुक्तीसाठी घडणाऱ्या विधायक कलहाची प्रतीके आहेत. हा कलह विस्तारवादी सत्ता, सर्वंकष सत्ताधीशांच्या विरोधातला सर्वसामान्यांचा एल्गार होता. कोणतीतरी सर्वंकष सत्ता निर्धारित वर्तुळात राहून सत्तेचा वापर करायचे नियम नाकारते. ताल, तोल, तंत्र सोडून स्वार्थासाठी सत्तेचा वापर करायला लागते. सर्वसामान्यांचे जगणे अशा व्यवस्थेत दुष्कर होते, तेव्हा माणुसकीच्या परित्राणासाठी कोणासतरी हाती शस्त्रे धारण करायला लागतात. व्यवस्थापरिवर्तनासाठी घडणाऱ्या कलहात अनेक अनामिक जिवांच्या आहुती पडतात. तरीही माणूस अशा कलहाचे मोल चुकवूनही आनंदी असतो. असं का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्याच्या स्वातंत्र्यप्रिय मानसिकतेत दडलंय असं वाटतं.

कलहप्रियता सोबत घेऊन जगण्यातही कदाचित मानसिक समाधानाचे काही धागे अनुस्यूत असावेत असे वाटते. माणसाचं मन सुखावण्याइतकी माणसांच्या जगात कोणतीच भावना सुखाची नाही. एखादी व्यक्ती पद, पैसा, प्रतिष्ठेचा वापर इतरांवर जरब बसवण्यासाठी करते, तेव्हा त्याच्या अंतर्यामी असणारा अहं सुखावतो. याकरिता हाती असणाऱ्या पदाचा, अधिकारांचा वापर करून निम्नस्तरावर असणाऱ्या लोकांना प्रताडित करून तो आनंदतो. इतरांना आपण आपल्या अंकित ठेवतो, आपल्या कलाने वर्तण्यास बाध्य करतो, असे वाटणे सत्ताधीशांना सुखावणारे असते. भलेही अशा वर्तनाला नैतिकतेचे कोंदण नसले तरी. कोणी भाईगिरीच्या मार्गाने भीती निर्माण करून सुखावतो. पण हे घडताना स्वअस्मितेच्या तंत्राने चालणाऱ्या माणसांना आपल्या प्रतिष्ठेवर आघात होतोय, असे वाटते आणि ते या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी उभे राहतात. दोन भिन्न वृत्तींमध्ये घडणारा हा कलह सुष्ट आणि दुष्ट असे रूप धारण करतो.

एकाच वर्गात शिकणाऱ्या बालवाडीतील लहान मुलांमध्येही निर्व्याज कलह असल्याचे आपण पाहतो, अगदी पेन्सिलचा एक लहानसा तुकडा घेण्यावरून. थोडे मोठे झाले की समवयस्क मुलांच्या समूहातही दबंगगिरी करण्यासाठी तो सांभाळला जातो. यौवनातील कलह कोण्यातरी तिच्यावर जीव जडला म्हणून सर्वस्व उधळून लावण्यासाठीही घडू शकतो. आप्त, स्वकीय, परिवार, समाजासोबत आपल्या प्रिय पात्राच्या प्रेमासाठी विरोध पत्करताना होत राहतो. विवाहाच्या सप्तपदीवरून फेरे घालून संसारात पावलं रमल्यावर दोघांमध्ये घडणारा कलह ‘भांड्याला भांडं लागणं’ या नावाने ओळखला जातो. अर्थात समाजात घडणाऱ्या कोणत्याही भांडणांना अहंचे टोकदार काटे असतातच. या काट्यांनी कोणी घायाळ होत नाही तोपर्यंत सारे ठीक असते; पण त्याची टोकं टोचायला लागली की, शेवट माणसं दुरावण्यात होतो. कधीकधी संसारातले ताणून धरलेले वैयक्तिक अहं नवराबायको नात्याचा अध्याय कोर्टाच्या साक्षीने संपवतात. भलेही कोणी याला मने न जुळल्यामुळे नात्यांचे विभक्तीकरण म्हटले तरी.

रस्त्याने प्रवास करताना वाहनाचा कोणासतरी कळत नकळत धक्का लागतो. भारतीय रस्त्यांवर नित्य दिसणारे हे दृश्य आहे. असे काही घडले की, प्रत्येकाला आपणच कसे योग्य दिशेने आणि नियमांनी चाललो होतो असे वाटायला लागते. कोणीच हार मानायला तयार नसतो. रस्त्यावर घडणारे असे क्षणिक कलहसुद्धा इतरांचं येणं-जाणं बंद करू शकतात. बसमध्ये, रेल्वेत जागेवरून तू तू मै मै घडणे दैनंदिन कलहाचे सौम्य रूप आहे. कधी आपल्या कोणा परिचिताला, आप्तांना अपघात घडतो. माणसांचा संयम सुटतो. संताप बनून तो रस्त्यावर उतरतो. कधी रस्त्यांवरील बेजाबदार वाहतुकीने समस्या येऊन रागाचे रुपांतर कलहात घडते. रस्ते अडतात. संतापाचा अतिरेक हाती येणारा दगड भिरकावयाला उद्युक्त करतो. रस्ता अडतो. माणसं भडकतात आणि समोर दिसेल त्यावर धडकतात. संतापाला प्रकटण्यास मार्ग मिळण्याऐवजी प्रश्न निर्माण करणारा रस्ता सापडतो. लहानसा वाटणारा प्रासंगिक कलह एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह बनून माणसांसमोर उभा राहतो.

राजकारणाच्या प्रांगणात कलह नेहमीच प्रिय असावा असे वाटण्याइतपत रुजलेला दिसतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन भिन्न विचारधारांना सोबत घेऊन तो नांदतो. कधी पक्षीय अभिनिवेश कलहप्रियतेचे कारण ठरतात. तर कधी पक्षांच्या आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या विचारधारा. कधी वैयक्तिक विचारधारेतून विरोधाचं अस्त्र घेऊन तो रस्त्यावर प्रकटतो. माणसांनी चालते आणि वाहनांनी धावते रस्ते अडतात. परिसरात बंदचा नाद निनादायला लागतो. परिस्थिती नियंत्रणाच्या मर्यादा ओलांडते, तेव्हा सुरक्षायंत्रणेचे कवच रस्त्यांवर, वस्त्यांवर उभे राहते. संचाराला बंदी करून कलहनियंत्रणाचा प्रयत्न घडतो. कधी कलह अशांततेचे विध्वंसक रूप धारण करतात. सार्वजनिक मालमत्तेच्या जिवावर उठतात. कोणाच्यातरी कसल्यातरी कारणाने दुखावणाऱ्या भावना कलह पेटवण्यात इंधनाचे काम करतात. अशा अविवेकी संघर्षाने परिस्थितीबाबत अनभिज्ञ  असणाऱ्या काही जिवांची जीवनयात्रा संपते.

जगात कुठल्या गोष्टी सार्वत्रिक असतील, नसतील माहीत नाही; पण कलह अरत्र, परत्र, सर्वत्र नांदतो आहे. कधी तो जातीय तणावात, कधी पंथीय संघर्षात, कधी धार्मिक अभिनिवेशात प्रकटतो. अहंमन्य मानसिकता कलहाला निमंत्रित करते. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष आघात चाकोरीत चालणाऱ्या जीवनव्यवस्थेवर होतात. कायदासुव्यवस्थेच्या ठिकऱ्या उडून प्रासंगिक परिस्थिती माणसांना विस्थापित करते. माणसं आपलं मत प्रस्थापित करण्यासाठी उभे राहतात. आपली विचारधारा पेरण्यासाठी केल्या जाणाऱ्या कवायतीत कलहाचे आयुध हाती घेतले जाते. अतिरेकी विचारांना प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न अनेक निरपराध्यांच्या जगण्याची सांगता करतो. सार्वभौम अस्मितेवर आघात करणारा अविवेकी विचार अतिरेकी होतो. आतंकवादी मानसिकता दिमतीला घेऊन कोणाच्यातरी अविचारी वागण्यातून प्रकटतो. कलहांपासून कोसो दूर राहू इच्छिणाऱ्या शांतताप्रिय माणसांना विस्थापित करतो. मायभूमी सोडून माणसे वणवण भटकत फिरतात. अनियंत्रित सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या सत्ताधीशांच्या कलहवृत्तीपासून सुटून सुरक्षित परगणा शोधण्याच्या दुसऱ्या नव्या कलहात अडकतात. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धांचा विध्वंस वसाहतवादी, साम्राज्यवादी मानसिकता अंगीकारणाऱ्या स्वार्थपरायण विचारांच्या वर्तनाचा परिपाक होता. सर्वंकष सत्ताधीश होण्याच्या मानसिकतेतून घडलेल्या कलहाचा माणसांनी अनुभवलेला विनाश म्हणजे ही युद्धे. पूर्वीही राजसत्तांचे प्रदेशविस्तारासाठी संघर्षाच्या मार्गाने जाणे घडले आहे. आपले सैनिकी बल, आपली राजकीय ताकद सीमेलगतच्या सत्ताधीशाला दाखवणे, या हेतूने ते घडत असे. आकांक्षापूर्तीसाठी प्रादेशिक सीमा विस्तारताना घडणाऱ्या कलहाने अन्य परगण्यात वास्तव्य करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या सीमांना मर्यादांचे बांध घातले जात.

कलह कुठे नाही, तो घरापासून देशापर्यंत सगळीकडे आहे. घरात सोबतीने वाढणाऱ्या भावंडानाही तो नवीन नाही. वाटण्या होताना तांबा-पितळेच्या एका फुटक्या भांड्यासाठी भांडणारी भावंडे कलहात रक्ताची नाती विसरतात. शेताच्या बांधावरून शेजारच्याच्या टाळक्यात दांडके घातले जाते. शेजारी-शेजारी राहणारे क्षुल्लक कलहातून परस्परांचे कट्टर शत्रू होतात. सासू नावाचं नातं घरगुती कलहाचे सार्वत्रिक रूप असल्याचे अनुभव रंगवून सांगितले जातात. सासू-सून हा द्वंद्व समास कलहातूनच विग्रहित झालेला दिसतो. प्रेमाचं नितळपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांना कौटुंबिक कलह बाधित करतात. काही गावं कलहामुळे बदनाम होतात. सार्वजनिक अशांतता हीच त्या गावांची ओळख होते. गावातील एखादी वस्ती, त्या ठिकाणी असणारी माणसे कलहासोबत जगणारी म्हणून ओळखली जातात. काहींवर कलहप्रिय म्हणून शिक्का बसवून त्याच्या जगण्याला कायद्याच्या कलमांनी बंदिस्त कले जाते. काही माणसांच्या मनात विशिष्ट परिवाराची, परिसराची ओळख कलहप्रिय म्हणूनच गृहीत धरली जाते.

कलह फक्त माणूस नावाच्या प्राण्यातच असतो असे नाही. मानवेतर जिवातही तो मोठ्याप्रमाणात असतो. प्राणीसुद्धा जिवाच्या कराराने सजातीयांशी, अन्यांशी भांडताना दिसतात. पण त्यांच्या कलहामागील प्रेरणा फक्त नैसर्गिक असते. परिसर, मादी यांच्यावर वर्चस्व संपादनाची भावना या कलहाचे केंद्र असतात. अन्य जिवांच्या जगात नैतिक-अनैतिक प्रकार असण्याचे कारण नसते. स्वाभाविकपणे वागायला त्यांचे शरीरधर्म त्यांना उद्युक्त करत असतात. माणसाच्या जगात नैसर्गिक गरजांसोबत भावनिक गरजासुद्धा कलहांचे कारण असल्याचं आपण पाहतो. आपले अहं कुरवाळण्याच्या नादात माणसं वर्तनाच्या चौकटी विसरतात. कलहाला अस्मितेचे वसने चढवून आपले अहं जोपासत राहतात. नियमांना नैतिकतेच्या, मूल्यांच्या खुंटीशी घट्ट बांधून समाजाकडून सत्त्वशील आणि तत्त्वशील वर्तनाची अपेक्षा करतात. मात्र, इप्सित साध्य करण्यासाठी आपले नियम तयार करून जगतात. 

कलहांचे असे सार्वत्रिक आविष्कार पाहताना एक गोष्ट मनात येते, माणसांना आपल्या जगण्यातून कलह संपवता येणारच नाहीत का? मला वाटते संयम, सत्य, अहिंसा या मूल्यांचा अंगीकार कलहप्रिय जगाला शांततेच्या मार्गाने मार्गस्थ करू शकतो. माणसाच्या मनात पेटलेल्या अविवेकी विचारांच्या वणव्यालाही शांत करू शकतो. संतमहात्म्यांनी कलह टाळून प्रेमाची भजने गायली. सुधारकांनी सहअस्तित्वाने सहजपणे जगणाऱ्या जगाचे स्वप्न पाहिले. जगण्याला नैतिकतेच्या चौकटींनी मंडित करून स्वतःचा शोध घेऊ पाहणाऱ्या विचारधारा कोणत्याही संघर्षाला विराम देऊ शकतात. सत्व आणि स्वत्वाची ओळख दाखवणारा मार्गच विद्यमान जगातील माणसांची खरी गरज आहे. असा मार्ग पूर्वसुरींच्या कार्यातून स्मृतीरुपाने सोबत करीत असूनही आम्हां माणसांना अद्याप कळला का नसेल? कळला पण कदाचित वळायचे राहून गेले आहे असे वाटते. हे कळेल त्यावेळी माणूस कलहमार्गाने का वर्ततो? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. कलह टाळून संयमाने सात्विक जगण्याचा मार्ग दाखवणारे संत, महात्म्यांचे विचार वाचून, ऐकून माणसांचे मन आणि मतपरिवर्तन झाले नाही असे नाही; पण वास्तव असेही आहे की, माणूस अजूनही जीवनातील कलहप्रिय विचारांना कोणत्यातरी असुरक्षतेपोटी टाकायला तयार नाही. इतिहास हासुद्धा आहे, की माणसांच्या जगावर आणि जगण्यावर अनेक आघात घडूनही माणूस शहाणा होण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय संघर्षच असल्याचे मानतो. कलहाच्या मार्गाने कुठली शांतता प्रस्थापित करू इच्छितो कोणास ठाऊक? तसेही माणसांच्या जगण्यातून कलह हद्दपार होणे अवघड आहे. कारण काही गोष्टी सजीवांना उपजतच मिळालेल्या असतात, त्यातील एक कलह आहे.

Oze | ओझे

By // 10 comments:
परिसरात इमारतींची बांधकामे सुरु आहेत. बांधकाम करण्यासाठी तात्पुरत्या वास्तव्यास आलेल्या माणसांच्या राबत्याने गजबज वाढली आहे. आकाशाकडे झेपावणाऱ्या इमारतीच्या शेजारी मजुरांच्या झोपड्या अंग मुडपून बसल्या आहेत. उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या देखणेपणाकडे कौतुकाने पाहत असल्यासारख्या. तेथे कुणीतरी मोठ्या आवाजात रेडिओ लावून गाणी ऐकतो आहे. दुपारची निवांत वेळ. परिसरातील गजबज बऱ्यापैकी कमी झालेली असल्याने मोठ्याने सुरु असणाऱ्या रेडिओवरील गाण्याचे आवाज ऐकू येतायेत. हल्ली मोबाईलमध्ये गाणी ऐकण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्याने रेडिओचा वापर तसाही जवळपास संपल्यात जमा आहे. पण कधीतरी कुणी चुकूनमाकून रेडिओ सुरु करतो; गाणी वगैरे काही ऐकत असतो. रेडिओवरून कार्यक्रमांचे नियमित प्रसारण होत असले, तरी ठरवून एखादा कार्यक्रम ऐकणे सहसा घडत नाही. घरातल्या रेडिओने अडगळीत आपला निवारा शोधला आहे. बऱ्याच दिवसांनी रेडिओवरून प्रक्षेपित गाणी ऐकायला आली. तीही कोणीतरी लावली म्हणून. कुठल्याशा कार्यक्रमात गाणी वाजत होती. तसेही स्वतःहून गाणं लावून ऐकण्यापेक्षा कुणीतरी मोठ्या आवाजात लावलेली गाणी ऐकण्यात वेगळाच आनंद असतो. गाणी ऐकणारे आपल्या आसपास शेकड्याने असतात; पण त्यातल्या अर्थासह समजणारे मुठभरही असतात की, नाही शंकाच आहे. अशा शेकडोतला मीही एक. गाणं समजण्यापेक्षा ऐकण्यात आनंद शोधणारा. तसेही गाणे समजण्यापेक्षा ऐकण्यास प्राधान्य देणारेच संख्येने अधिक असतात.

रेडिओवर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणं सुरु आहे. गाण्यातील शब्दांवर नकळत मन रेंगाळत राहिले. खरंतर याआधी हे गाणं ऐकले नाही, असे नाही; शेकडोवेळा ऐकले असेल. पण कधीकधी एखादा क्षण असा येतो की, गाण्यातील शब्दांमध्ये असणारा आशय शोधण्यापेक्षा; मनातील आशयाचे अर्थ आपण त्यातून शोधू लागतो. गाण्यातल्या शब्दांना त्यांचा स्वतःचा अर्थ असला, स्वतःचं अवकाश असलं; तरी त्यास दूर सारून मनातल्या अर्थाच्या आशयाची फुलपाखरे सुरांभोवती पिंगा घालायला लागतात, त्यातल्या शब्दांभोवती उगीचच फेर धरून विहरायला लागतात.

या गाण्यातील शब्दांचा आशय, अर्थ कोणाला काय अपेक्षित असेल, तो असो. पण त्यातल्या ‘ओझे’ शब्दावर उगीचच रेंगाळत राहिलो, मनातल्या अर्थाचं अवकाश शोधत. तसंही माणसाचा स्वभाव आपण काही करण्यापेक्षा; शक्य झाल्यास स्वाभाविकपणे एखादे काम दुसऱ्याकडून करून घेण्याचा असतो. देता आले तर कुणाच्यातरी खांद्यावर ओझे देण्याचा असतो. तसं पाहता कुठलेही ओझे काही कोणी स्वच्छेने स्वीकारीत नसतो. कारणवश ते लादले जात असते किंवा परिस्थितीवश आपले म्हणून स्वीकारावे लागते. अर्थात हा सगळा परिस्थितीचा प्रासंगिक परिपाक असतो.

ओझं शब्दातच कुठेतरी एखाद्या गोष्टीला लादण्याचा भाग अधिक असतो, असे वाटते. मग ते ओझं स्वतःचे असो किंवा दुसऱ्याचे. तसंही माणसं जगताना अनेक लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरत असतात. ती कधी आप्तस्वकीयांनी, कधी स्नेह्यांनी नात्यांच्या धाग्यांची गुंफण करून आपलेपणाने आपल्या हाती दिलेली असतात. कधी व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना परिस्थितीने आपल्या पुढ्यात आणून टाकलेली असतात. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारून घेतलेली असतात. माणसांचा जीवनप्रवास अशी कुठली ना कुठली ओझी घेऊन घडत असतो. खरंतर ती टाळताही येत नाहीत आणि त्यापासून दूर पळताही येत नाही, म्हणून त्यांना दिमतीला घेऊन जीवनाच्या वाटेवर प्रवास घडत असतो. आयुष्याच्या अखेरपर्यंत कुठल्या ना कुठल्या ओझ्यांना घेऊन माणूस इहलोकी वावरत असतो. जीवनभर अनेक ओझ्यांना वाहत जगलेला माणूस एक दिवस कुणाच्यातरी खांद्यावर ओझं होऊन अखेरच्या यात्रेला निघतो. अपेक्षित, अनपेक्षित अपेक्षांची अनेक ओझी आयुष्यभर ओढणारा माणूस जातांना आपल्या कुणाच्यातरी खांद्यावर ते टाकून जातो. त्याच्या पश्चात त्याचे आप्त राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वागवत राहतात.

कोणते तरी ओझे घेऊन घडणारा माणसाचा जीवनप्रवास त्याच्यापुरती एक शोधयात्रा असतो. आपलं असं काही शोधत अज्ञात प्रदेशांकडे नेणाऱ्या रस्त्याने तो चालत राहतो. खरंतर जीव म्हणून इहलोकी येण्याआधीच कुणाच्यातरी अपेक्षा बनून तो मातेच्या उदरी वाढत असतो. कुणाला वंशासाठी दिवा हवा असतो. त्यासाठी झुरणी लागणारे जीव अपेक्षांचे ओझे मातृत्वाच्या पदावर असणाऱ्या मानिनीच्या मनी रुजवतात. जन्मास येऊन पहिला श्वास घेणं हेही जिवासाठी एक ओझंच, कारण तो श्वास निसर्गाने दिलेल्या आव्हानाविरोधात त्याच्या जगण्याच्या धडपडीचा एल्गार असतो. ओझं झुगारून देण्याचा प्रयत्न असतो. हे संघर्षाचे ओझे ज्याला पेलले, त्याला जीवनात आणखी काही ओझी वाहण्याचं बळ मिळतं. आयुष्याचा प्रवास क्रमसंगत मार्गाने पुढे सरकत राहतो, तशी ओझीसुद्धा आपले रंग, रूप, आकार बदलत जातात. त्यांना वैयक्तिकपासून वैश्विकपर्यंत परिमाण लाभत असते. नवे आयाम मिळत असतात. आपापली वर्तुळे सांभाळत माणसं ओझी दिमतीला घेऊन चौकटींमध्ये जीवनयापान करीत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार याअर्थाने मोजले जात नसले तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. गृहस्थाश्रम स्वीकारायचा तर इच्छा असो, वा नसो संसाराचं ओझं ओढावं लागतं. ते सोबत घेऊन माणसांचा संसार बहरत असतो. घर उभं राहत असतं. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले पर्यायच आणखी काही अनपेक्षित ओझी वाहून आणत असतात. स्वप्नातला स्वर्ग असणारं घर उभं करण्याचं काम मार्गी लागतं. घराचं गोकुळ होऊन हसऱ्या ताऱ्यांनी भरून येतं. अंगण लहानग्या पावलांनी दुडूदुडू धावू लागते. एका ओझ्याने निरोप घेतलेला असतो. पण पुढे मुलाबाळांना घडवतांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षांची ओझी त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे वाढत जातात. नकळत हीच ओझी मुलांच्या खांद्यावर दिली जातात. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, चांगला अभ्यास घडावा, जगणे मार्गी लागावे; म्हणून त्यांच्या घडणीच्या सीमांकित चौकटी उभ्या केल्या जातात. क्लास, शिबिरे, छंदवर्ग अशी लहानमोठी ओझी शोधून आणली जातात. हर्षभरीत अंत:करणाने ती डोक्यावर देऊन त्यांना स्पर्धेत ढकलले जाते. गुणवत्तेच्या स्वघोषित शिड्या तयार करून प्रगतीच्या इमाल्यांना लावल्या जातात. परीक्षेतल्या नव्वद टक्के गुणांचं ओझं डोक्यावर घेऊन चालणारी मुलं शाळेलाच ओझं मानायला लागतात. अशी ओझी वाहण्यात अवेळीच त्यांच्या वयापेक्षा मोठी होतात. ‘लहानपण देगा देवा’ म्हणणं प्रश्नपत्रिकेतील कल्पनाविस्ताराच्या प्रश्नापुरते उरते.

वाढत्या वयासोबत ओझी मोठी आणि वजनदार होत जातात. जीवनाच्या जडणघडणीसाठी समाजाने स्वतः निर्माण केलेल्या आयएसओ मानांकनाच्या प्रमाणित करून घेतलेल्या प्रतिष्ठेची वलये त्यांच्याभोवती तयार होतात. इंजीनियरींग, मेडिकल, व्यवस्थापनशास्त्रसारख्या प्रतिष्ठाप्राप्त अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवायचा, हे जीवनाचे प्राप्तव्य होते. हे समाजमान्य मृगजळ मिळवायचे कसे? या विवंचनेच्या चक्रव्यूहात अनेकांचा अभिमन्यू होतो. व्यूह भेदण्यासाठी रणांगणात उतरायचे कसे, याची चिंता मनाला कुरतडत राहते. प्रतिष्ठाप्राप्त परगण्यात प्रवेशाच्या प्रश्नाचं ओझं घेऊन झापडबंद घोड्याप्रमाणे धावताना समरसून जगणं विसरलेली मुलं कुणाच्यातरी अपेक्षांचे ओझे घेऊन पळत राहतात; आप्तांनी दाखवलेल्या शिखरावर प्रगतीचे, यशाचे निशाण रोवण्यासाठी. स्पर्धेला सर्वस्व समजून उरस्फोड धावाधाव करीत पदवीचा टिळा ललाटी लागला की, सुखासीन जगण्याची स्वप्ने यायला लागतात. उद्योग, व्यापार, नोकरीच्या प्रतिमा मनात उभ्या राहतात. नोकरी, चाकरीचे ओझे उतरून झाले की, विवाहाच्या वेदीवरील फेऱ्यांसाठी छोकरीचा शोध. त्यातही सुस्वरूप, गृहकृत्यदक्ष, कुटुंबवत्सल अशा अनेक अपेक्षांची लेबले लाऊन अवांछित ओझी आसपास उभी केली जातात. त्याच वाटेने घर, संसार, परिवार हे चक्र क्रमशः चालत राहते. हे सगळं मिळवायचे म्हणून येणारी ओझी घेऊन धावाधाव करण्यास परिस्थिती बाध्य करीत असते.

पण ओझी काही केवळ घर-परिवार-संसार आणि परिस्थिती एवढीच नसतात. राष्ट्र, समाज यांच्या अपेक्षांचीही असतात. राष्ट्राला सुजाण नागरिक हवे असतात. समाजाला मर्यादाशील माणसे. ओझी अनेक वाटांनी चालत येऊन आपली भेट घेत असतात. माणसं ती घेऊन कधी मुकाट, तर कधी खळखळ करीत चालत असतात. जगण्याच्या वाटेने चालताना निवडीचा विकल्प नसणारी काही ओझी कधीकधी जगण्यात गुंते निर्माण करतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रासंगिक अशी गोंडस नावे धारण करून येणाऱ्या ओझ्यांचा ताण वाढत जातो. मानसशास्त्राच्या परिभाषेत मनावर दडपण असणे संयुक्तिक नसल्याचे संगितले जाते. पण याकडे दुर्लक्ष करून काहीतरी मिळवण्यासाठी माणूस अपेक्षांची ओझी घेऊन धावत राहतो. कुठल्यातरी अशा लादलेल्या अथवा लादून घेतलेल्या ओझ्याने स्वच्छंदी, आनंदी जगणारे जीव वाकतात. काही कमकुवत कोलमडतात. काही कायमचे कोसळतात.

माणसाचं जगणंच मुळी कुठल्यातरी अपेक्षांच्या ओझ्याचा प्रवास असतो. आईबापाला आपलं अपत्य संस्कारित असावे असे वाटते. असे वाटणे हे काही ओझे होऊ शकत नाही; पण संस्कार म्हणजे काय? त्यांची चौकट कोणती असावी? तीत वर्तताना मर्यादांचे बांध असावेत का? असल्यास त्यांच्या मर्यादा कोणत्या? त्या कुणी ठरवायच्या? असे अनेक प्रासंगिक प्रश्न गुंता वाढवतात. समाज व्यक्तीकडून संस्कारांची अपेक्षा धरतो. संस्कार म्हणजे समाजमान्य नैतिकतेच्या चौकटी. अशा अनेक चौकटींना सांभाळून माणसे जगत असतात. चौकटीतल्या विशिष्ट विचारांची वर्तुळं घेऊन वर्तताना संस्कारांची सक्तीच कधीकधी ओझं होते. नैतिकतेच्या चौकटी तयार करून समाज माणसाला अपेक्षांच्या विशिष्ट साच्यात ओतून घडवीत असतो, व्यक्तीची इच्छा नसतानाही. मनाविरुद्ध घडणारा हा प्रवास अशावेळी कुणाला ओझं वाटायला लागतो. कुणाला आव्हान.

गेल्या काही दिवसापासून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्याविषयी चर्चा घडत आहे. अर्थात हे ओझे मुलं काही स्वखुशीने सोबत घेऊन शाळेत जात नसतात. त्यांच्या दप्तरात पुस्तकांच्या वजनापेक्षा पालकांच्या अपेक्षांचे ओझेच अधिक असते. त्याहून अधिक मनावर. आपलं मूल स्मार्ट असावं, अशी अपेक्षा करण्यात काहीही गैर नाही; पण सुपरहिरो बनवण्याच्या नादात काही अतिमहत्वाकांक्षी पालक त्याच्या जीवनाच्या बहरणाऱ्या रोपट्यालाच करपून टाकत आहेत. हे ओझे शाळेच्या दप्तरातून उतरेल तेव्हा उतरेल; पण पालकांच्या अपेक्षातून कधी उतरेल, हे सांगणं अवघड आहे. काही लोकांना कुठली ना कुठली उपयुक्त, अनुपयुक्त ओझी सोबत घेऊन चालायची सवयच असते. आपला अहं सुखावण्यात त्यांना असीम आनंदाची प्राप्ती होत असते. त्यांच्या दृष्टीने जगण्यातला खरा आनंद तोच असतो. खरंतर असे वैयक्तिक अहं हेच एक ओझे असते. भलेही कोणी असे मानायला कदापि तयार नसले तरी.

कुठलेही ओझे घेऊन न चालणारा माणूस विश्वात शोधूनही कदाचित सापडणार नाही. ओझं घेऊन चालण्याबाबतीत जगात खूप समानता आहे. येथे सगळेच भारवाहक असतात. कुणी मोठा, कुणी लहान; एवढाच काय तो फरक. तेथे राव-रंक असा भेद नाहीच. श्रीमंताच्या माथी आपलं ऐश्वर्य टिकवून कसं ठेवावं, याचं ओझं असत. उद्योगपतीला उद्योगविस्ताराचं अंगण उभं करायचं असतं. नेत्याला जनतेचे समर्थन कसे मिळवता येईल याचं, तर अभिनेत्याला एक हिट चित्रपट मिळून दुसरा सुपरहिट कसा होईल, याचं ओझं स्वस्थ बसू देत नाही. समाजसेवकाला सेवा करताना लोकांचा अपेक्षाभंग घडू नये म्हणून काय करता येईल याचं ओझं असतं. साहित्यिकाच्या लेखणीला शब्दांच्या अनवरत निर्मितीचं, वक्त्याला वैखरीतून प्रकटणाऱ्या शब्दांच्या लाघवाचं, गायकाला सुरांची धार लावायचं, तर नोकरदाराला नोकरीतील आव्हानांचं ओझं असतं. शेतकऱ्याला पीकपाणी कसं येईल, या विवंचनेचं ओझं असत. तर भिकाऱ्याला भिक्षापात्रात दान पडेल की नाही, या काळजीचं ओझं असतं. कुठे नाही ओझं! ते अरत्र, परत्र, सर्वत्र पसरलं आहे. राव-रंक साऱ्यांच्या जीवनाचं प्रांगण त्याच्या अस्तित्वाने व्यापले आहे.

प्रसंग, परिस्थितीचे काही धागे धरून ओझीसुद्धा आपले मुखवटे बदलत असतात. कुणीतरी शेतकरी प्रामाणिक परिश्रम करून उद्याच्या सुंदर दिवसांची स्वप्ने पाहत जगण्याची उमेद बांधून असतो. निसर्गाच्या लहरीपणाच्या एका फटक्याने अचानक होत्याचे नव्हते घडते. डोक्यावर कर्जाचा भार वाढतो. ते कसे फेडता येईल, याचं अवघड ओझं त्याच्या जगण्याला करपून टाकते. कोणी घरासाठी, व्यापारासाठी, शिक्षणासाठी, मुलामुलीच्या लग्नासाठी कर्जाचे ओझे घेऊन संसाराचा गाडा हाकत असतो. कोणी असाध्य आजाराचे ओझे घेऊन जगण्याच्या उमेदीचा किरण शोधत असतो. तर कोणाला जीवनप्रवासाच्या शेवटच्या वळणावरून वळून आयुष्याच्या उतरणीकडे चालताना राहिलेले श्वास ओझं वाटायला लागतात. कोणी वार्धक्याने थकलेल्या देहाचं ओझं सोबत घेऊन आपली अखेर दूरच्या क्षितिजावर किलकिल्या डोळ्यांनी शोधत राहतात. कोणीतरी विकल आईबाप आयुष्यभर आपण इतकी ओझी कुणासाठी वाहिली? या प्रश्नांचे उत्तर मुलंमुली असूनही वृद्धाश्रमातील थकलेल्या जगातून मिळवू पाहतात. 

आई, बहीण, मुलगी इत्यादी नात्यांचे गोफ विणीत समाजात स्त्रीला घडवले जाते. कोणत्यातरी नात्याचे लेबल तिच्या ललाटी लेखांकित करून तिच्या स्वातंत्र्याचा परिघ सीमित केला जातो. सामाजिक, कौटुंबिक अपेक्षांचे ओझे माथी ठेवून तिच्या जगण्याला मर्यादांचे बांध घातले जातात. सामाजिक परिस्थितीने दिलेलं, हे अनावश्यक दान पदरी घेऊन; त्या मुकाटपणे चालत राहतात, आपल्या अस्मितांचा शोध घेत. ‘मुलीची जात आहेस, मुलीसारखी वाग’, असे म्हणताना परंपरेच्या चौकटींचं ओझं तिच्या मनावर, माथ्यावर ठेवून व्यवस्था तिला मर्यादांच्या वर्तुळात उभी करते. पुरुषाने सर्वत्र असावं, स्त्रीने मात्र मर्यादांच्या कुंपणातच दिसावं, या विचाराने वर्तने संस्कारांचा भाग समजला जातो. मर्यादा म्हणजे काय? त्या कोणत्या असाव्यात? हे कोणी ठरवावे? अशा प्रश्नांचा विचार जणू कोणी करतच नाही. बंधनांनाच संस्कार मानण्याचा प्रमाद घडतो, तेव्हा नव्या क्षितिजावरच्या प्रकाशाला कवेत घेऊ पाहणारा विचार दुय्यम ठरतो. कधी अशी अनावश्यक ओझी झुगारून देण्यासाठी काही मानिनींचे आवाज बंडाचं निशाण हाती घेऊन बुलंद होतात. परंपरेचे ओझे घेऊन चालण्यास त्या नकार देतात. परंपरांमध्येच जगण्याचं सार्थक शोधणारे आणि अशा जगण्यालाच प्रमाण मानणारे परिवर्तन पथावर पडलेल्या पावलांच्या आवाजांनी हादरतात. हे आवाज थांबवावे कसे? या विवंचनेचं ओझं दमननीतीचा मार्ग अनुसरणाऱ्यावर येतं. परिवर्तनाचे प्रयोग थांबावेत, म्हणून कुठलीतरी नवी ओझी ते शोधत राहतात, माथी मारण्यासाठी.

माझा एक स्नेही आहे. स्वभाव मुळात परोपकारी. कुणी काही काम सांगितले की, कोणालाही सहसा नाही न म्हणणारा. एखादे काम आनंदाने स्वीकारतो. ते पूर्ण करताना त्याचा कुठलातरी गोंधळ हमखास होणारच, हे आम्हाला अनुभवाने ठाऊक असतं. गोंधळ झाला की, तो निस्तरताना आणखी दुसरे गोंधळ वाढवून ठेवतो आणि स्वतःला दोष देत राहतो. कामाचं ओझं वाढत जातं. हा त्या गुंत्यात गुरफटत जातो. कितीतरी वेळा त्याला सांगितले, “एकाच वेळी कामांची एवढी ओझी डोक्यावर का लादून घेतो?” म्हणतो, “आपलं म्हणून कोणी आपल्याकडे आलं, तर नाही कसं सांगावं? बरं नाही वाटत असं कुणाला फटकळपणे नाही म्हणून सांगणं, त्यांना वाईट वाटेल ना!” याचं असं परोपकारी तत्वज्ञान. ‘जगाच्या कल्याणा...’ या विचाराने वर्तणारा साधासरळ जीव. त्याची धावाधाव पाहून कुणीतरी मदतीला धावतो. गोंधळाचे कारण कळते. याच्या मनावरील ओझे उतरते. प्रसन्नतेची एक स्मित लकेर घेऊन चेहरा खुलतो. तेवढ्याच निरागसतेने मदतकर्त्याचे मनापासून आभार मानतो. त्याच्याकडे पाहून मनात नेहमी एक विचार येतो, अशी ओढवून घेतलेली ओझी याला प्रिय का असावीत? शेवटी काय; स्वभावो दुरित क्रमः म्हणतात, ते काही खोटे नाही. याचा स्वभावच कुणाचीतरी ओझी वाहून नेण्याचा आणि त्यात आनंद शोधण्याचा असल्याने; काहीही घडले तरी, याला काही फरक पडत नाही.

कारणं काही असोत, ओझी लादलेली असोत अथवा स्वीकारलेली; माणसाच्या प्रगतीचा तो अविभाज्य भाग आहे. ओझ्याशिवाय माणूस नाही. हजारो वर्षापासून त्यांची सोबत करीत; प्रगतीचे एकेक आयाम तो उभे करीत आला आहे. काहीतरी मिळवायचे असेल, तर अशी लहानमोठी ओझी घेऊन चालण्याशिवाय पर्याय नसतो. ओझ्यांसह घडणारा जीवन प्रवास त्याच्या जगण्याचे परगणे समृद्ध करीत असतो. जगताना त्याला आपले असे काहीतरी हवे असते. या काहीतरीचा शोध त्याच्या मनात वसणाऱ्या विजिगीषू मानसिकतेतून अनेक आव्हाने स्वीकारायला उद्युक्त करीत असतो. विपरीत परिस्थितीतही टिकून राहण्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्यासाठीच तो असतो. संकटे, समस्या माणसाचं सत्व आणि स्वत्व पाहण्यासाठीच असतात. त्यातून तावून, सुलाखून बाहेर पडणारा माणूस सोन्यासारखा चमकतो. म्हणतात ना, ‘टाकीचे घाव घातल्याशिवाय माणसाला देवपण येत नाही’, हे म्हणणे काही अतिशयोक्त नाही. अशावेळी नकळत मनात विचार येतो, परिस्थितीनिर्मित, प्रासंगिक, ऐच्छिक, अनैच्छिक अशी कुठलीही ओझी माणसाने वाहिलीच नसती तर...

Aavartan | आवर्तन

By // 4 comments:
आणखी एक आवर्तन:
कालगणनेच्या चौकटी निर्देशित करणाऱ्या कॅलेंडरची काही पाने उलटली. एक आवर्तन पूर्ण झाले. स्वतःभोवती आखून घेतलेल्या लहान-मोठ्या चौकटीत जगलेल्या क्षणांच्या काही स्मृतिशेष रेषा मनःपटलावर रेखाटल्या गेल्या. काळाच्या प्रवाहात कितीतरी गोष्टी घडतात आणि बिघडतातही. त्याच्या परिणामांचे प्रासंगिक ठसे परिस्थितीवर अंकित होतात. काळाची पालखी पुढे निघते. माणसं सोबत चालत राहतात. त्याला कुणासाठी थांबण्याचे काही कारण नसते. सोबत कुणी असले काय आणि नसले काय, काही फरक पडत नसतो. काळाच्या पटावर माणसाचं अस्तित्व तसंही नगण्यच आहे. काळाचे विस्तीर्ण वर्तुळ आणि त्यातून आपल्या वाट्यास आलेली काही वर्षे यांना जोडणाऱ्या रेषेला आयुष्य असे म्हटले, तर त्या दोन बिंदूना सांधणारी रेषा काळाचा एक लहानसा तुकडा असते. त्यातही नियतीने कोणाच्या ललाटी तो किती लेखांकित केला आहे, हे सांगणं अवघड. म्हणूनच मनात कोणतीतरी नवी उमेद घेऊन आयुष्यात आलेली वर्षे साजरी करण्यासाठी कुठली ना कुठलीतरी निमित्ते माणसं शोधत असतात. आनंदाचा एक कवडसा आपल्या अंगणी आणण्याकरिता धावाधाव करीत असतात.

काळ बदलला तसे माणसांचे जगणेही बदलले आहे. बदल कधी ऐच्छिक नसतात. प्रवाहासोबत ते घडत असतात. कधीकाळी खूप मोठे वाटणारे जग आज मोबाईलच्या स्क्रीनवर सामावण्याएवढे लहान झाले आहे. गतिमान साधनांनी जगाचे संपर्कसूत्र एका क्लिकवर जुळण्याइतके सहज, सुगम केले आहे. अन्य सांस्कृतिक प्रवाहांशी घडलेल्या परिचयातून काही नवे विकल्प हाती लागले आहेत. नववर्षाच्या स्वागताची आतिथ्यशीलता त्यातील एक. नव्या वर्षाचे निमित्त करून आनंद साजरा करण्याची ही पाश्चात्य रीत देशप्रदेशाच्या सीमा पार करीत स्थानिक प्रवाहात येऊन सामावली आहे. प्रादेशिक प्रवाहाशी तिचा संगम घडणं संयुक्तिक आहे की नाही, हा मतभेदाचा विषय असू शकतो. पण आनंद साजरा करणाऱ्यांना निमित्त हवे असते, मग ते काहीही असो.

माझा एक मित्र आहे. नववर्षाच्या आगमनाप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या प्रासंगिक जल्लोषाबाबत नाराजीनेच मत व्यक्त करीत असतो. म्हणतो, ‘ही पाश्चात्य संस्कारांची बांडगुळे येऊन आपल्या संस्कृतीच्या विशाल वृक्षावर जगली आहेत. आपल्याकडे अशा गोष्टींची आवश्यकताच काय? आनंद साजराच करायचा, तर निमित्त शोधायचेच कशाला? आणि शोधायचीच असतील, तर आपल्याकडे काय त्यांची कमी आहे?’ अर्थात त्याच्या विचारांच्या वर्तुळात हे म्हणणे ठीक असेलही. आनंदप्राप्तीला कसला आला देश आणि कसल्या आल्यात संदर्भांच्या सीमा. तो सहजपणे साजरा करता आला म्हणजे झाले. तसेही आनंद साजरा करताना त्यातील नितळपण जपणे आपल्याच हाती असते ना! सरत्या वर्षाला निरोप देतांना सुटणारा संयम योग्य नाही, हे मान्य. वर्ष साजरंच करायचं तर बेताल, बेमुर्वत धिंगाणा करायची आवश्यकताच काय? असेही वाटणे स्वाभाविक आहे.

त्याचा आणखी एक आक्षेप याप्रसंगी घडणाऱ्या मद्यप्राशनाला आहे. म्हणतो, ‘अशावेळी आपलं राज्य महाराष्ट्र न राहता मद्यराष्ट्र होतं. अंधाराला उजळून टाकणाऱ्या असंख्य झगमगत्या दिव्यांच्या साक्षीने आनंदप्राप्तीच्या नावाखाली सामाजिक मर्यादांचे बांध सोडून हा पूर दुथडी भरून वाहत असतो. त्यास काही नियंत्रण असायला नको का?’ त्याची मते कदाचित काहींना आवडणार नाहीत, पण त्यात काहीच तथ्य नाही, असेही नाही. अर्थात हे काही आपल्या समाजाचे सार्वत्रिक चित्र नाही. उत्साहाच्या उधानाला विधायक दिशेने वळते करणारे विचारही येथे आहेत. आपला आनंद कोणी कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकास आपल्यापरीने जगण्याचे स्वातंत्र्य आहे. पण जबाबदारीचे यथोचित निर्वहन करण्याची अपेक्षाही असतेच की. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.

याहीवर्षी नेहमीप्रमाणे नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा केला जाईल. तो साजरा करतांना सामाजिक मर्यादांचे भान जपले जात आहे का? असा प्रश्न समोर येतो, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपल्या वर्तनातूनच शोधायला लागते. आनंद साजरे करताना मर्यादांची जाणीव किती जणांच्या मनात असेल, हे सांगणे अवघड आहे. सुखाचे सोहळे साजरे करण्याचे मनसुबे मनात घेऊन माणसे अज्ञात परगण्याच्या शोधात निघतात. प्रासंगिक सुखाचा परीस हाती लागतोही, पण त्या नादात परिस्थितीने पुढ्यात मांडलेले वास्तव विसरतात. काळाने आखून दिलेल्या रेषेवर चालताना नियतीने आयुष्याला दिलेलं एक वर्ष कमी झालं, याचं दुःख वाटण्याऐवजी माणूस गेलेल्या वर्षाला निरोप देतांना आनंद साजरा करतो, हेपण एक नवलच वाटते. खरंतर आयुष्यातून कमी झालेल्या एका वर्षाचे परिशीलन घडायला हवे. गेलेल्या वर्षात काय मिळवले आणि काय मिळवायचे राहिले, याचा शोध प्रांजळपणे घ्यायला हवा. पण असं कितीजणांना वाटत असतं, कोणास माहीत. काही असतील असेही, जे चिंतनाच्या वाटेने हातून निसटलेल्या काळाची गणिते जुळवत आयुष्यातल्या आनंदाची बेरीज-वजाबाकी करीत असतील.

वर्षे केवळ व्यक्तीच्या आयुष्यातूनच कमी होत नसतात, तर व्यवस्थेच्या वर्तुळातूनही अलगद निसटत असतात. व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणताना प्रत्येक बदलाला माणूसपणाच्या निर्णायक कसोट्यांवर घासून-पुसून स्वीकारणे आवश्यक असते. जगणं आनंदी करण्यासाठी निरामय विचारांची निरांजने प्रज्वलित करायला लागतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून सुरक्षित सांभाळावीही लागतात. आजचे परिवर्तन उद्याचा आनंद असतो. सुख आपल्या अंगणी आणायचे, तर दुरितांचे तिमिर संपणे आवश्यक असते. वैगुण्यांचा नाश करण्यासाठी सद्विचारांचे संकल्प सोडायला लागतात. प्रासंगिक औचित्य पाहून ते करावे लागतात. नववर्षाचे संकल्प नव्याची नवलाई म्हणून नऊ दिवस सांभाळून पुन्हा पहिल्या वाटेला लागणारे अनेक संकल्पप्रिय माणसे आपण पाहतो. संकल्पसिद्धीसाठी संयम, सत्व आणि स्वत्व अंतर्यामी असायला लागते, तेव्हाच अपेक्षापूर्तीची इच्छित फळे हाती लागतात.

मागचं वर्ष खूप भरभराटीचे गेलं, असं कुठल्याही वर्षाबाबत कोणी कधीच म्हटल्याचे निदान मला स्मरत नाही. आसमानी, सुलतानी संकटे घेऊन वर्षे येतात आणि व्यवस्थेवर ओरखडे कोरून जातात. हे वर्षसुद्धा असंच काहीसं संपल्याचं आपण अनुभवतो आहोत. पावसाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीने शेतीचा कणा मोडला. पावसाशी बांधलं गेलेलं कृषीकारण उध्वस्त झालं आणि अर्थकारणाला आचके यायला लागले. मातीशी बांधल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाचा खेळखोळंबा झाला. नियतीच्या खेळाने अनेक अभाग्यांच्या जीवनाचा खेळ संपवला. कारुण्याची ही काळी किनार नववर्षाचा आनंद साजरा करताना स्मरणात असायला नको का? नव्यावर्षाच्या स्वागताला पायघड्या घालताना मनात संवेदनांचा एक कोपरा जागा असावा.

प्रतिष्ठितांच्या, प्रस्थापितांच्या जगातील पंचतारांकित सेलिब्रेशनच्या प्रचंड झगमगाटात कुठेतरी दूर पहाडाच्या पायथ्याशी अंधारा कोपरा सोबतीला घेऊन पडलेल्या वाडी-वस्तीवर जगणाऱ्यांची वंचना विस्मरणात जाणे विचारांचा विपर्यास आहे. डोंगरदऱ्यांच्या सांदेकपारीत राहणाऱ्या आदिवासींच्या अभावग्रस्त जगण्याला विसरणे सामाजिक अपराध आहे. स्वातंत्र्यसंपादनाला अडुसष्ट वर्षे होऊनही ज्यांच्या जगण्यात आनंदाचं वर्ष अद्याप आलंच नाही त्यांचं काय? त्यांची अस्वस्थ वणवण स्वार्थाची झापडबंदपट्टी डोळ्यावर बांधून आनंदाच्या उन्मादात झुलणाऱ्या मनांना कळणार आहे का? धनिकांच्या घरात नांदणाऱ्या लक्ष्मीला वंचितांच्या वेदनांनी व्यथित होणं घडेल का? प्रगतीच्या पंखांवर स्वार झालेल्या मूठभरांचा उन्मादी जल्लोष म्हणजे विकास. प्रगतीचा असा अर्थ होत नाही. समस्यांच्या निबिड अंधारात चेहरा हरवलेल्या माणसांचे उध्वस्त जगणे न दिसणे ही विसंगती आहे. आनंद साजरा करायचा, तर आसपासचं आसमंतही आनंदलहरींनी भरून यायला लागतं. एकीकडे जगण्याचे सगळेच सूर लागणे आणि दुसरीकडे जीवनाचं गाणं बेसूर होणं म्हणजे आनंद नसतो.

जग अनेक कलहांनी फाटले आहे. अविचाराने उसवले आहे. त्याला टाके घालण्याचा संकल्प नव्यावर्षात घडणार आहे का? जात, धर्म, पंथ नावाचे अभिनिवेश माणसातलं माणूसपण विसरण्यास कारण ठरत आहेत. ते संपवण्याचा विचार यानिमित्ताने घडणार आहे का? विचारवंतांच्या विचारांचा, बुद्धीमंतांच्या प्रज्ञेचा प्रकाश आपल्यात सामावून घेण्याएवढं शहाणपण आम्हाला यायला काय हरकत आहे? माणसाचा माणूस म्हणून यथोचित सन्मान घडण्याची सहिष्णू मानसिकता जागी राहावी. न रूचणाऱ्या मतांनाही स्वीकारण्याइतके सहजपण आमच्यात यावे. माणसांच्या जगात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नको. मनभेदामुळे कलह विकोपास जाऊन माणूसच नको वाटणे, हा अविचार आहे. अविवेकी कृत्यांनी काजळलेलं जग विवेकी विचारधारांना प्रमाण मानून जगणाऱ्यांसाठी कधीच नसतं. ही जाणीव अंतर्यामी जागी राहावी.

माझं म्हणणं कदाचित वांझोटा आदर्शवाद आहे, असे काहींना वाटेल. नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना आपल्या विचारांत संवेदनांची किमान एक लहानशी पणती पावलापुरता प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रज्वलित असावी. तिचा प्रकाश मनाच्या आसमंतात असावा. विसंगतीने विटलेले, अविवेकाने विसकटलेले आणि अविचाराने फाटलेले जग कसे जगते आहे, हे कळण्याइतपत संवेदना विचारांच्या वर्तुळात जिवंत असणे माणूस म्हणून आवश्यक आहे. जगात अज्ञान, अन्याय, अत्याचार, आतंक, उपासमार, विस्थापन, दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा अशी अनेक दुरिते असताना मी काहीही करू शकत नाही, ही खंत अंतर्यामी असली तरी खूप आहे. निष्क्रिय आदर्शवादाने जगाच्या परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल घडवता नाही येत. कोरड्या कर्मयोगात कुणाचे मंगल करण्याचे बळ नसते. कोणा एकट्याला हे शक्यही नाही. माझ्या अंगणी येणाऱ्या आनंदाच्या प्रकाशाचा एक कवडसा वंचितांच्या अंधाऱ्या जगात मला नेता यावा. तिमिराच्या सानिध्यात स्वतःला शोधण्याची धडपड करूनही हाती काही न लागल्याने विकल झालेल्या असहाय झोपडीपर्यंत ओंजळभर उजेड नेण्याइतके माझ्या विचारांना विशाल होता यावे. प्रश्न केवळ आनंदाचा नाहीये. संवेदनांचाही आहे. अविचाराने विसकटलेले जग नको असेल, तर अविवेकाचे जळमटे चढलेल्या विचारांना मूळापासून तपासून पाहावे लागेल. गरज भासल्यास त्यात बदल करावे लागतील. बदलांचा प्रारंभ स्वतःपासून करायला लागेल. परिवर्तन सांगणे सोपे आहे, घडवून आणणे कठीण आणि आचरणात आणणे त्याहून अवघड असते. पण मनात सत्यान्वेषी विचारांचा संचार असेल, तर ते घडणं अशक्यही नाही. कदाचित यासाठी काळाला आणखी काही पावलं पुढे चालायला लागेल. म्हणतात ना, चालणाऱ्याचे भाग्य चालते. भाग्योदयाचे साचे घडवावे लागतील. येणाऱ्या नव्यावर्षात ते तयार व्हावेत. अशी आशा आपण सगळ्यांना करायला काय हरकत आहे. कारण माणूस आशावादी असतो आणि कोणतीतरी स्वप्ने डोळ्यात घेऊन जगत असतो.

Chaukatitil Vartulat | चौकटीतील वर्तुळात

By // 9 comments:
शाळेला दिवाळीच्या सुट्या असल्याने गावी गेलो. घरी थोडं थांबून निघालो पाराकडे. गावातल्या घरी आलो की पाराकडे फिरून यायची माझी सवय तशी जुनीच. गावात आपलं सहजच फिरून आलं की कळतंय कोण आलं, कोण गेलं. सोबत आणखी इतर गोष्टीही कळतात. गावातली माणसं आपलीच असली, तरी यानिमित्ताने त्यांच्यासोबत घडणाऱ्या संवादाचे चार शब्द मनास नवी ऊर्जा देऊन जातात. कोणाचं सुख, कोणाचं दुःख, कोणा घरातली लग्नकार्ये, शेतशिवार, गुरंवासरं, देव, धर्म, परंपरा, नवससायास, यात्रा-जत्रा, परिसर काय काय विषय कळत-नकळत कळतात. ओळखीच्या माणसांचे आपलेपणातून प्रकटणारे शब्द भूतकाळ जागा करतात. स्मृतींचे आभाळ सोबत घेत मन पंख पसरून पिंगा घालत राहते. गावात नसतील सगळीच नाती रक्ताची. पण मानलेली, निर्माण केलेली आणि जाणीवपूर्वक जोपासलेली ही नाती आपलेपणाच्या रेशमी धाग्यांची वीण घट्ट करत राहतात. नात्यांचा गोफ विणला जातो. गावात फिरताना घडणाऱ्या अशा भटक्या संवादाला गगनभरल्या आठवणींचे कोंदण लाभते. भूत, वर्तमान आणि भविष्य येथे येऊन विसावतात. अशावेळी संवादाचे शब्द नुसते शब्द न राहता मन आणि भावनांना सांधणारे साकव होतात.

आजही गल्लीतून पाराकडे चालत निघालो होतो. पाठीमागून आवाज आला. “मास्तर! वो मास्तर!” मागे वळून पाहिले लहानपणापासून संगतीने राहणारा मित्र आवाज देत होता. आमचं शिक्षण पूर्ण झालं. लहानपणही संपलं. तसं पोटापाण्याच्या प्रश्नांना सोबत घेऊन कोण कुठे, कोण कुठे गेलं. विसावले तेथेच आपलं लहान-मोठं घरटं तयार केलं आणि रमले तिकडेच. सुट्या, सणावाराच्या निमित्ताने गावी जाणे घडते तेव्हा भेटतात सगळे. काही जणं राहिले गावाकडेच. हा सध्या गावातच बऱ्यापैकी शेती करतो. शालेय शिक्षणाच्या पुढे या गड्याची मजल गेलीच नाही. शाळा याच्या जीवनातला सगळ्यात अप्रिय अध्याय. जितक्या सहजपणे शाळा टाळता येईल तितकी टाळणारा; पण शेत-शिवारात तितका सहज रमणारा हा जीव. शाळेत शिक्षणातले शिकवलेले प्रयोग सोडून बाकी सगळे प्रयोग करणारा. शाळेच्या गणितातल्या शून्यात आपली शैक्षणिक प्रगती शोधणारा; पण शेतात मात्र शून्यातून विश्व उभं करू पाहणारा हा हिकमती गडी. “काय रे! काय करतोयेस असा इकडे? आणि आज शेतात नाही गेलास?” माझे प्रश्नांचे वाढणारे शेपूट पकडून मला थांबवत म्हणाला, “गुरुजी, सुट्या काय तुम्ही लोकांनीच घ्यायच्या असा काही नियम सरकारने केला काय? आम्ही शेतकऱ्याने घेऊ नये असे ठरवले की काय तुम्ही!” म्हणून हसत राहिला. “वो साहेब, तसं नाही. पण जेव्हा बघावं तेव्हा तुझा देह शेतातल्या झोपडीत पहुडलेला असतो. शेत-शिवार हेच तुझं जगणं. तेथे तू रमलेला. शेतात कामं करताना तुझी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. असलंच काही महत्त्वाचं काम तरच तुला गावाचा रस्ता दिसतो, म्हणून म्हणालो.” माझं बोलणं तो ऐकत राहिला. पुढे काय बोलावे म्हणून मनातल्या मनात वाक्यांची, शब्दांची जुळवाजुळव करीत राहिला.

एक मोठा पॉझ घेऊन शून्यात हरवल्यासारखं म्हणाला, “आता शेतात काय राहिलंय! होतं नव्हतं ते निसर्गाने एक फटक्यात संपवलं. उरल्या कोरड्या वेदना आणि हरवलेल्या संवेदना. आज उगीचंच वाटतं शाळेत असताना दिलं असतं शिकण्याकडे लक्ष अन् मेहनत घेऊन केला असता थोडा अभ्यास तुझ्यासोबत तर... ते जाऊ दे! ते काही आता शक्य नाही. पण एवढं सगळं करूनही शेतात टिकून राहण्याचा मोह निर्माण करणारं काही दिसायला तर हवं. अरे, जेथे शेत-शिवारासोबत जगण्याचे रस्ते सापडत होते. जीवनाची उमेद जागत होती. डोळ्यात स्वप्ने रुजत होती, तीच सगळी करपली बघ. मग शेतात राहून तरी काय करू? मातीची कोरडी ढेकळे पाहत बसू का? त्यापेक्षा गावात, माणसांत थांबून जिवाला होणाऱ्या जखमांचा थोडातरी विसर पडतो. राहतो आता गावात दुःखाच्या कहाण्या ऐकत. येथे प्रत्येकाचं जगणं सारखंच. कोणी शेट नाही आणि कोणी सावकार नाही. सगळेच भणंग बसतो असे पारावर एकत्र येऊन एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालत. आमचं दुखणं ऐकून या पारावरच्या मंदिरातला मारुतीही कंटाळला असेल. कदाचित त्याला आपण ब्रम्हचारी असल्याचा आनंदच होत असेल. नको संसार आणि नको ते रोजचं मरणं. त्यापेक्षा असाच राहिलो तेच बरं म्हणून सुखावत असेल बिचारा. कसल्या कसल्या गोष्टींना सांभाळणार आहोत. सगळं आभाळच फाटलंय कुठं कुठं टाका घालायचा. म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे. आमचं मरणं रोजचंच आहे.” आपण काय बोलतोय आणि असे का, याची कदाचित त्याला जाणीव झाली असावी, म्हणून तो शांत बसला. मलाही पुढे काय बोलावे काही सुचेना.

याच्याशी बोलून आपण उगीचंच जखमेवरची खपली काढली असे वाटायला लागले. म्हणून मनात दाटून आलेला अपराधभाव चेहऱ्यावर दिसू न देता विषयाला दुसऱ्या रस्त्याने वळवले. इकडच्या-तिकडच्या गोष्टींवर बोलत राहिलो, ऐकत राहिलो. पश्चिम क्षितिजावरून सायंकाळ धरतीवर उतरायला लागली. रानात चरायला गेलेली गुरंढोरं परतायला लागली. त्यांच्या हंबरण्याने वातावरणात एक आतूर थरथर उभी राहिली. गोठ्याकडे परतणाऱ्या गायीवासरांच्या पायांनी उडालेल्या धुळीने मरगळलेल्या परिसरात उत्साह संचारला. सूर्य मावळतीच्या वाटेने निघून अंधार हलक्या पावलांनी दबकत दबकत गावाकडे चालत आला. दिवेलागणीला घरी आलो. तशी आई ओरडलीच, “आल्या आल्या गेलास ना गावात उंडारायला. लहानपणाच्या सवयी अजून काही जात नाहीयेत तुझ्या.” तिचं बोलणं मधेच थांबवत म्हणालो, “अगं, उगचं बरं वाटतं मनाला गावात गेलो की. म्हणून आलो थोडा फिरून. कळतं काही नवंजुनं. भेटतात मित्र. त्यांच्याशी बोललो की, मनात लपलेलं आठवणींचं गाव जागं होतं.” माझ्या बोलण्याचा अर्थ नीट न समजल्याने माझ्याकडे विस्मयाने बघत आई म्हणाली, “असं कोड्यात काय बोलतोस? मला काय समजतं अडाणी बाईला तुमचं हे असं बोलणं! आणि गाव काय जागं होईल? सगळेच झोपलेत. केला घात पाण्यापावसानं आणि देवानंही. हाती नाही नाना (पैसा) आणि तोंड किलावना (केविलवाणे) अशी परिस्थिती झाली आहे सगळ्यांची. काय करतील माणसे? आहेत बिचारी अशीच पडलेली. आहेत तेथेच रखडलेली. जातील कुठे? जगतायेत कशीतरी रडत कुढत.” आईच्या शब्दांतून गावातील माणसांच्या जगण्याचं दुःख वेदना बनून निथळत होतं.

आमचं बोलणं सुरु असताना लहान भाऊ शेतातून परत आला. केव्हा आलास म्हणून विचारले. मोरीकडे जाऊन हातपाय धुवून आला आणि शेजारी येऊन बसला. शेतात काय कामं सुरु आहेत म्हणून विचारलं. कापूस काढून गहू पेरण्याची तयारी सुरु असल्याचं म्हणाला. बोलता बोलता विषय कापसावर येऊन पोहचला. सहज म्हणून त्याला विचारले, “कापूस किती आला रे या वर्षी? काही ठोक रकम जमते का नाही. की परत आपलं तसंच गेल्या सालसारखं. हाती भोपळा!” समोरील भिंतीकडे हात दाखवत म्हणाला, “मोज त्या भिंतीवरच्या ओढलेल्या रेघोट्या. जेवढ्या आहेत तेवढा विकला. भाव काय म्हणून विचारत असशील तर आपलं तसंच पहिले पाढे जशेच्या तसे.” आमच्याकडे व्यापाऱ्याला कापूस विकताना एक तोल चाळीस किलोचा करून मोजला जातो. याप्रमाणे एकेक रेघ ओढत पाचपाच रेषांचा एक गट करून पाच रेघा म्हणजे दोन क्विंटल, असं साधं गणित घेऊन शेतकरी आपला कापूस बहुदा घरीच विकतो. दोन पैसे व्यापाऱ्याने कमी दिले म्हणून मनाला काही वाटून नाही घेत, कारण फेडरेशनमध्ये जाऊन कापूस विकण्याचा त्याचा अनुभव त्याला बरंच काही शिकवून गेलेला असतो. त्या शहाणपणातून आलेला त्याचा स्वतःचा एक अनुभव असतो. कापूस खरेदी केंद्रावरील सोपस्कार पार पाडून जीव टांगणीला लावण्यापेक्षा येथेच थोड्या मोलभावात मेलेलं चांगलं, असं त्याला वाटतं. भिंतीवर ओढलेल्या रेषा मोजून म्हणालो, “बस, एवढाच! काय प्रकार आहे हा? जरा लक्ष द्यारे शेताकडे. अरे, याच शेतात एकेकाळी शे-सव्वाशे मण कापूस घेत होतो आपण. आणि आत्ता हे चित्र.” घरात मी मोठा असल्याने मोठेपणाचा फायदा घेत अधिकारवाणीने लागलो उपदेश करायला. तो, आई, आणखी एक लहान भाऊ माझं म्हणणं ऐकत होते. जरा नीट लक्ष द्या. हे असंच सुरु राहिलं तर कसं करणार आहात पुढे? ही काही लक्षणं नाहीत खऱ्या शेतकऱ्याची वगैरे वगैरे काही सांगत राहिलो.

माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, “भाऊ, जी दयस तिलेच कयस, बाकी काय गोंडा घोयस. तुमचं नोकरी करणं आणि आमचं शेती करणं कसं सारखं असेल रे! आम्हाला काय हौस आहे का कमी पिकवायची. देवच (तिला निसर्ग म्हणायचे असते) साथ देत नाही. तुमची ही बायजाबाई (लाईट) तर तासनतास बघायला मिळत नाही आम्हाला. मिळते सात-आठ तास, तिच्यात काय होते. हे सगळं कमी का काय म्हणून आमच्या घरात पिकं आली की, लागले तुमचे भाव खाली उतरायला. कसं होईल मग.” शेतात राबण्याच्या तिच्या उभ्या हयातीतील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा सारा अनुभव सोबत घेऊन ती बोलत राहिली. मनातली सल शब्द बनून प्रकटत होती. कोणी काही बोललं नाही. थोडावेळ लांबलेली शांतता. त्या शांततेला छेद देत मीच बोललो, “शेती करायची पद्धत बदला. एकच एक पीक घेताच कशाला? वापरा ना शेती करण्याचं नवं तंत्र. आधुनिक पद्धतीची शेती करा ना! फळं, फुलं, भाजीपाला अशी काहीतरी. सोबतीला कोंबड्या, शेळ्या, गायीम्हशी पाळा. काय ऊस आणि कापूस एकचएक घेऊन बसलात!” माझ्याकडे मिश्कील नजरेने पाहत लहान भाऊ म्हणतो, “आपल्या शेतातील पपई पाहिलीस ना! अरे, ढोर मेहनत करून राबराब राबून पिकवली. आलीही बदाबदा, पण भाव काय? दोन रुपये किलो. याआधी गंगाफळं लावली, त्यांचंही असंच. लाईट वेळेवर नसायची पिकाला पाणी द्यायचे वांधे. गेलं सगळं करपून. कांदा लावला गोण्या भरून भरून पडला. आज भाव मिळेल, उद्या मिळेल वाट पाहून कंटाळलो, सडून फेकण्यापेक्षा विकला मिळेल त्या मोलभावात. आज तुम्ही तोच कांदा काय भावाने घेता आहात? भाऊ, कितीही केलं, मरमर मरलो तरी शेतकऱ्याचं मरणं ठरलेलं. कधी देवानं मारायचं, कधी माणसांनं! शेवटी मरतो शेतकरीच ना!”

माझ्याकडे पाहत मधला भाऊ म्हणाला, “आम्हालाही वाटतं सगळं कसं व्यवस्थित करावं. पण प्रयोग करायला आहेच अशी किती जमीन आपल्याकडे? या चार तुकड्यात काय प्रयोग करायचे? हे प्रयोगाचे खेळ करायला पुरेशी जमीन तर हाती असायला हवी ना! की नुसता जुगारच खेळायचा? ज्यांच्याकडे कुठे असेल, ते करतात काय काय प्रयोग. पण म्हणून आम्ही काहीच करीत नाहीत का? आम्ही आपलं सगळं व्यवस्थित करावं; पण परिस्थितीच साथ देत नाही. सगळीकडून मार खातोय. तुम्ही रोज पेपरात वाचतात ना अमक्या-तमक्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे. ते काय सगळे वेडे होते का मरणारे? अरे, बापजाद्यांपासून शेतकरी आहेत ते! त्यांना काय शेती शिकवणार तुमचं शिक्षण? सगळे रस्ते बंद झाले की, माणसं काय करतील मग. जगणं ओझं झालं की जातो तो जिवानिशी, मागे राहिलेल्यांच्या जिवाला घोर. त्यांचं जगणं त्यांनाच शाप वाटायला लागतो. तीस-चाळीस हजारासाठी बँक, पतपेढ्या जप्त्या आणतात यांच्या घरावर. शेतातल्या पाण्याच्या मोटारीचं वीजबिल थकलं म्हणून कनेक्शन कापलं जातं. सावकारकडून काही कर्ज घेतलं असेल तर गावात फिरताना तोंड लपवत फिरतो. असा चारचौघात अपमान. घर चालवणं मुश्कील. पैसा हाती यायचं नावं घेत नाही. घरसंसार, लेकरंबाळं यांचा मोह त्याला नसतो? त्याला काय सुखी संसाराची स्वप्ने पाहता येत नसतात का? पण परिस्थितीच चहूबाजूने अशी भक्कम घेरते की, गुंत्यातून कितीही सुटायचा प्रयत्न केला तरी नाही सुटत. जगणं कोंडी करतं. नाही काही मार्ग सापडत, मग संपतं सगळचं.” बोलता बोलता तो थांबला.

मी काही बोलायची आवश्यकताच नव्हती. पुस्तकी शिक्षणातून कमावलेलं माझं लेखी शहाणपण वाचलेल्या थेअरीमधे अडकलेले. ते सांगून समोरील प्रश्न थोडीच सुटणार होते. प्रॅक्टिकल जगून हाती आलेल्या निष्कर्षावर हे सगळे बोलत होते. उक्ती आणि कृती यात अंतर असतं. माणूस तरी काय करणार. राजाने छळलं, पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर दाद कोणाकडे मागणार? व्यवस्थेने निर्माण केलेल्या चौकटीत आपलं एक वर्तुळ आखून त्याच्या परिघात ही माणसं फिरत आहेत. हा परिघ हीच त्यांची नियती झाली आहे. चौकटीतल्या सीमांकित वर्तुळात साकारणारी जीवनाची आकृती यांचे प्राक्तन बनले आहे. कारण नसता यांचा धीर खचू नये म्हणून म्हणालो, “असू द्या, आज नाही निदान येणाऱ्या पुढच्या हंगामात परिस्थिती पालटेल.” माझं वाक्य पूर्ण करीत आई म्हणाली, “उकिरड्यालाही देव पावतो एक दिवस. फिटतील अंधाराचेही पांग. दुःखाचे दिवस काही कायमच मुक्कामाला राहत नाहीत घरी. अरे, आम्हाला तरी एवढं दिसतंय. बाकीच्यांचं काय? ज्याला काहीच नाही. देवच त्यांचा आधार बनेल. येईल सुख दारी फिरून एकदा पुन्हा. आमचं आणि तुमचं सुख जरी वेगळं असलं तरी सुख ते सुखच.”

बोलता बोलता बराच उशीर झाला. उशिरा जेवणं आमच्या खेड्यातील घरांच्या वहिवाटीत नाही बसत. अंधारायच्या आधी जेवणारे हे सगळे. तसाही रोजच अंधार सोबतीला घेऊन जगतायेत. लाईट नाही म्हणून चिमणी, कंदिल लावून आहे त्या उजेडात जेवण करणं घडतं. आम्हा शहरी माणसांना कॅण्डललाईट जेवणाचं केवढं अप्रूप. त्यासाठी वेगळे पैसे मोजून हॉटेलमध्ये मेणबत्या पेटवून त्यांच्या मंद प्रकाशात जेवायला बसतो आम्ही. यांच्यासाठी रोजचंच कंदीललाईट जेवण, तेही सक्तीचं. त्यात कसल्या आल्यात एक्सायटिंग वगैरे अशा फिलिंग्ज आणि कसला आलाय रोमॅन्टिक मूड. ही कौतुकं आमची, शहरी सुखात रमणाऱ्यांची. आईसोबत जेवायला बसलो. शेजारी दोघं भाऊ बसले. आई भाजी-भाकरी वाढत होती. स्वतःच्या हाताने भाकरीचा काला मोडून देत होती. अजूनही लहानपणातल्या मला सांभाळत होती. कितीतरी दिवसातून चुलीवर तयार केलेल्या आईच्या हातच्या भाजी-भाकारीचे साधेसे, पण आपली एक खास चव असणारं जेवण करीत होतो. दोन घास जास्तच जेवलो.

जेवण उरकून ओसरीवर पसरलेल्या वळकटीवर पडलो. इकडचं-तिकडचं बोलणं सुरु होतं. भावकीतले, शेजारचे काही मित्र येऊन बसले. गप्पांना पुन्हा रंग यायला लागला. लाईटने नेहमीप्रमाणे डोळे मिटले. कंदील, चिमण्या पेटल्या. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात हलणाऱ्या सावल्या पाहत बराच वेळ बोलणं सुरु होतं. एकेक जुन्या आठवणींना जाग येत होती. एव्हाना बाहेर ओसरीवर वळकटी पसरून, गल्लीत खाटा टाकून पडलेली, थकलेली माणसं निद्रेच्या कुशीत शिरली. निबिड अंधाराची चादर गावाने आपल्या अंगावर ओढून घेतलेली. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या जिवांच्या डोळ्यात झोप उतरायला लागली. उद्या शेतात कामं असल्याने लवकर झोपावं म्हणून गप्पांमधून एकेक करत मंडळी निरोप घेऊन घरी निघाली. माझ्याही डोळ्यात झोप यायला लागली. वळकटीवर अंग टाकून पडलो. अंधारासोबत सगळीकडे शांतता पसरलेली. रातकिड्यांच्या आवाजाची पट्टी वाढलेली. अकरा-बारा वाजले तरी गावातील मंदिरात भजन सुरुच. भजनांचा सूर चांगलाच लागलेला. आपलं दुःख विसरून भक्तिरसात लीन झालेली माणसं सुरांमध्ये तल्लीन झालेली. संगीताचं, सुरांचं कुठलही शास्त्रोक्त ज्ञान नसलं तरी मनापासून गात होती. तेवढाच त्यांच्या जिवाला विरंगुळा वाटत असेल. सश्रद्ध अंतःकरणातून निर्माण झालेल्या विश्वासाचे पाथेय सोबत घेऊन ही माणसं आपल्या जगण्याचा अंधारा कोपरा उजळवू पाहत होती. पडल्यापडल्या भजनातील शब्द कानावर येत होते, ‘विठू माउली, तू माउली जगाची.’ उगीच मनाला वाटले, खरंच यांची ही माउली यांना सांभाळेल का?

Sakha-Soyara | सखा-सोयरा

By // 15 comments:
गेल्या आठवड्यात गावी गेलो. म्हणजे आवश्यक होतं म्हणून जाणं घडलं. अन्यथा स्वतःभोवती तयार करून घेतलेल्या शहरी सुखांच्या कोशातून बाहेर पडून गावी जाणं कठीणच. कारण मध्यमवर्गीय मानसिकतेने घडत गेलेल्या आत्मकेंद्रित विचारांची झूल मनावर पांघरून घेतली असल्याने, ती उतरवणे अवघड. कोण उगीच चाकोरीत चालणाऱ्या दैनंदिन क्रमात व्यत्यय आणून गावाकडे जातो? पण कधीकधी कामंच अशी काही निघतात की अनिच्छेने का असेना, शहरी सुखांची पांघरलेली घोंगडी काढून आपल्या अस्तित्वाच्या मुळांशी जुळावंच लागतं. अर्थात याचा अर्थ असाही नसतो की, आपल्या मातीच्या ओलाव्याला आपण विसरलेलो असतो. फक्त सुखासीन जगण्याची सवय करून घेतल्याने गावाकडील गैरसोयीत जाऊन राहावंसं वाटत नाही एवढंच. म्हणूनच एखाददोन दिवसाचंही गावी राहणं जीवावर येतं. पण हेही सत्य आहे की, गैरसोयीपासून कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केला, तरी गाव मनाच्या मातीत रूजलेलं असतं. वरकरणी गावाचा सहवास कितीही टाळत असलो, तरी मन तेथील निळ्याभोर आभाळात घिरट्या घेत असतं.

अनेकातला एक मीही. उपजीविकेच्या वाटेने गावातून बाहेर पडून शहरात येऊन विसावलो. देहाला आणि मनाला शहरी सुविधांचा सराव झालेला. झालेला म्हणण्यापेक्षा करून घेतलेला. ती सुखं मनाला कायमची बिलगलेली. जीवनाच्या क्रमसंगत मार्गावरून चालताना जीवनयापनाच्या दिशा बदलल्या; मन मात्र हे बदल मानायला बहुदा तयार नसते. ते कोणती ना कोणती निमित्ते शोधून गावच्या आसमंतात विहरत असते.

मुलांच्या शैक्षणिक कामाकरिता काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याने आणि ते मूळ गावीच मिळणार असल्याने जाणे घडले. शासकीय नियमांचे हे एक चांगले आहे, तुम्ही देशात कुठेही वास्तव्याला असला तरी शेतीच्या, जातीच्या दाखल्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मूळगावी जाणे घडते. निदान नियमांच्या निमित्ताने का असेना, गावाकडे जाणाऱ्या वाटेने पावले वळती होतात. आपण गावी जाणं कितीही टाळत असलो, तरी तेथे जाण्यात एक अमोघ आनंद असतो. गावाकडील घर, परिवार, गुरंवासरं, शेतशिवार, तेथील गजबज मनाला अनामिक समाधान देत असते.

माझं गाव- ज्याचं नाव फक्त तेथील रहिवाश्यांना आणि त्यांच्या नातेसंबंध असणाऱ्यांना ठावूक. इतरांना माहीत असण्यासारखं गावाचं कोणतंही लक्षणीय महात्म्य नाही आणि उदंड कर्तृत्वही नाही. म्हणून जाणीवपूर्वक कोणी लक्षात ठेवण्याचं संयुक्तिक प्रयोजनही नाही. सरकार दरबारी एक गाव म्हणून असेलली नोंद हीच काय त्याची सार्वत्रिक ओळख. असे असले तरी त्याच्या सहवासाच्या खुणा मनपटलावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत. तशा त्या प्रत्येकाच्या मनात असतातच. मनाच्या गाभाऱ्यात असणारी आपल्या गावाची ओळख ज्याची त्याला मोठीच वाटत असते, तसंच आम्हालाही. इतरांसाठी नसेलही; पण आमच्यापुरता आमच्या गावाचा इतिहासही मोठा आणि भूगोलही समृद्ध.

तीन-चारशे उंबरे अंगावर घेऊन गाव आपल्याच तोऱ्यात उभे आहे. कधीपासून कोणास माहीत. कोणी त्याला वसवले, त्याचे त्यालाच माहीत. पण काळ्यामातीच्या जमिनीचा कसदारपणा आणि जवळूनच वाहणाऱ्या तापी नदीच्या पाण्याची विपुलता सोबतीला घेऊन गावात नांदणारी माणसं आपापल्या अस्मिता घेऊन स्वतःपुरता का असेना इतिहास घडवत होती, जगाच्या दैनंदिन व्यवहारात त्याचं काहीही योगदान नसलं आणि त्याला तिळमात्र महत्त्व नसलं तरी. पूर्व-पश्चिमबाजूने वाढीसाठी मर्यादांच्या सीमांचा पायबंद पडला आणि दक्षिण दिशेने विस्तारला निसर्गाने पुरेशी जागाच दिली नसल्याने उत्तर बाजूला पाय पसरत गावाने स्वतःला वाढवत ठेवले आहे. नदीच्या खोऱ्यांच्या सोबतीने उभ्या असणाऱ्या विस्तीर्ण टेकडीच्या पसरट अंगावर हसत, खेळत वाढते आहे, शेकडो वर्षापासून.

दक्षिणबाजूने गावाचा विस्तार जेथे थांबतो, त्याच्या अलीकडे दोनतीन घरे सोडून मावळतीकडे घरंगळत नदीच्या रस्त्याला जाऊन मिळणारी पायवाट गाव आणि नदी यांना जोडण्याचं साधन. या वाटेने सरळ खाली उतरून रस्त्याने लागतांना नदीच्या खोऱ्यांच्या परिघातील परीसरादरम्यान पसरलेलं बरचसं सपाट मैदान आहे. गावाच्या दुसऱ्या अंगाने पश्चिमबाजूला कवेत घेत वळसा घेऊन नदीकडे येणारा मोठा रस्ता याच ठिकाणी येऊन मिळतो; पण या रस्त्याचा उपयोग बैलगाड्यांच्या येण्याजाण्यासाठी. माणसे पायवाटेचाच वापर अधिक करीत असायची, अजूनही करतात. ही पायवाट उतरून, बऱ्याचदा घसरून, पावसाळ्यात तर हमखास- डावीकडे एक लहानसे वळण घेत पुढे मोकळ्या जागी जाऊन मिळते, त्या ठिकाणी पहिली भेट होते पिंपळाच्या झाडाशी. तेथून सरळ पुढे काही पावलांच्या अंतरावर उभं आहे वडाचं मोठं जुनं झाड. पलीकडे खोऱ्यात जागा मिळाली तेथे वेडीवाकडी वाढलेली बाभळीची झाडं आणि माळावरील मोकळ्या जागा बघून दूरदूर विखुरलेली निंबाची पाचसहा झाडं. या जागेला लाभलेला हा निसर्गदत्त परीघ. जणू कुशल कलाकाराने कोरलेलं शिल्प. हा परिसर आमच्या मनाची श्रीमंती. आमच्या लहानपणाला कुबेराचं वैभव देणारी दौलत. या जागेने मला, माझ्यासारख्या अनेकांना, आमच्या पिढीला घडवलं. खेळवलं. वाढवलं. आमचं लहानपण सगळ्याबाजूने समृद्ध, संपन्न केलं. जगण्याचं आकाश आणि अवकाश व्यापक केलं. झाडांसोबत परिसरातील मातीत आठवणींची अनेक रोपं अजूनही रुजली आहेत.

थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकोळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो. आठवणीतल्या वाटा आणि परिसर तसाच प्रसन्न, प्रफुल्लीत आणि टवटवीत. पण नजरेच्या वर्तुळात दिसणारा परिसर भग्न उदासपण घेऊन उभा असलेला, कोणीतरी भिरकावून दिलेल्या कचऱ्यासारखा. अंगावर अवकळा घेऊन केविलवाणा उभा असलेला. कुपोषित मुलासारखा, सगळीच रया गेलेला. निंब, बाभळीची झाडं हिरमुसलेल्या चेहऱ्याने पांगलेली. पिंपळ पोरक्या पोरासारखा अवघडून उभा. वड तपस्व्यासारखा ध्यानस्थ बसलेला; पण त्याच्या जगण्यातील श्रीमंती आता हरवली आहे. आपला भूतकाळ आठवीत हरवलेलं चैतन्य शोधत आहे. परिसराने जगण्यातील श्रीमंती शेवटचा डाव खेळून जुगाऱ्यासारखी उधळून दिलेली. सगळीकडे खुरटं गवत वाढलेलं. रानवनस्पतींनी आपापल्या जागा हेरून धरलेल्या. त्या असण्यापेक्षा असण्याचीच अधिक अडचण. त्यांच्या अतिक्रमणाने परिसर आपलं अंगभूत वैभव हरवून बसलेला.

कधीकाळी माणसांच्या राबत्यात रमलेला हा परिसर सळसळते चैतन्य घेऊन नांदायचा. दिवसभर आनंदाचे तराणे गात राहायचा. गावातील लहानमोठी माणसे या ना त्या निमित्ताने येथे येऊन जुळत रहायची. आम्हां मुलांसाठी हे वड आणि पिंपळ परिसरासह आंदणच दिलेले. आपलं पोरगं इतकावेळ कुठे पसार झालं आहे, म्हणून त्याला पाहत, शोधत फिरणाऱ्या आईबापाचा शोध येथेच येऊन संपायचा. पोरगं गावात अन्य कुठे नसलं म्हणजे हमखास येथे हुंदडत असायचं. अंगाखांद्यावर उड्या मारणाऱ्या पोरांना वड प्रेमळ आजोबासारखा मिरवत राहायचा. त्याच्या पारंब्यांच्या जटा पार जमिनीपर्यंत पसरलेल्या; अगदी लहानसं पोरगंही त्या पकडून वर चढायचा. वडाच्या आश्रयाने गावाकडील मातीतले खेळ रंगात यायचे. सकाळ आणि संध्याकाळ विलक्षण चैतन्य घेऊन यायची. परिसराच्या क्षितिजावर उतरून मुलांसोबत आनंदरंगांची मुक्त उधळण करीत राहायची.

सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूरपारंब्यांचा सूर लागलेला असायचा. पोरं माकडांसारखी या फांदीवरून त्या फांदीवर सरसर सरकत रहायची. वडाच्या सानिध्यात विटीदांडूचा खेळ टिपेला पोहचलेला असायचा. सगळा गलका चाललेला. खेळात महारत असणारे मैदानात उतरायचे, लहानग्यांना फारशी संधी नसायची. तेव्हा एकतर त्यांनी आपल्या खेळाची वेगळी चूल मांडायची, नाहीतर वडाच्या फांद्यांवर बसून खेळणाऱ्यांना पाहण्याचा आनंद घेत राहायचा. शाळेत जायची वेळ झाली तरी पावलं काही येथून निघत नसत. पण आईबापाच्या आणि मास्तरच्या माराच्या धाकाने हळूहळू मुलं पांगायाची. शाळेत जाऊन बसायची, मन मात्र वडाच्या अवतीभोवती भटकत राहायचे.

माळावर चरून दुपारच्या निवांत वेळी गावातली गुरंवासरं वडाच्या सावलीत विसावलेली असायची. डोळे मिटून शांतपणे रवंथ करीत बसलेली, जणू एखादा तत्वचिंतक चिंतनसाधना करीत असल्यासारखे. वड त्यांच्यावर ममतेची सावली धरायचा. दुपारची आळसावलेली मरगळ झटकीत सायंकाळी पश्चिमेला उन्हं कलताना परिसर पुन्हा जागा होऊन गजबजायचा, तो थेट चांदणं आकाशात उतरेपर्यंत. चांदण्याच्या शीतल प्रकाशात कबड्डीचा खेळ उशिरापर्यंत सुरु असायचा. धर, पकड, सोडू नको, आउट अशा आरोळ्यांनी निनादत राहायचा.

गावात पाण्यासाठी नळांची सोय नसल्याने नदीवरून पखाली भरून पाणी रेड्याच्या पाठीवरून घरी आणायचे. ज्यांच्याकडे पखालींची सोय नसायची ते घागरी, हंडे भरून पाणी वाहून आणायचे. भरलेल्या घागरी डोक्यावरून उतरवून थोडा विसावा घेण्यासाठी वडाखाली थांबायचे. नदीकडून आणलेल्या पाण्याच्या ओझ्याने थकलेल्या रेड्याचीही पावलं या परिसरात येऊन हमखास मंदावयाची. तो वडाच्या सावलीत थांबायचा. हातातला कासरा सोडून त्याचा मालक; असला हाती वेळ थोडा, तर तेवढ्या वेळात खिशातून पानतंबाखूची चंची काढून वडाच्या पायथ्याशी टेकायचा. नदीवरून पाणी भरायला जाणारी आणि येणारी माणसे वडाच्या बुंध्याशी बसून पानतंबाखूची देवघेव करीत बोलत असायचे. विडी काढून आनंदाचे झुरके मारले जायचे. तेवढ्या वेळात शेती, पीकपाण्याच्या, हंगामाच्या गप्पा रंगायच्या. गावातल्या सासुरवाशिणी पाण्यासाठी, धुणं धुण्यासाठी नदीवर जातांना-येताना डोक्यावरील ओझं उतरवून वडाच्या सावलीत आपल्या माहेरच्या आठवणींची मुळं शोधत राहायच्या. थोडं थांबून एकमेकींचे सुख-दुःख सांगत मन हलकं करून घ्यायच्या. सुना, लेकीबाळी आपल्या सत्यवानाला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करीत वटसावित्रीच्या सणाला वडास प्रेमाच्या धाग्यांनी बांधून ठेवीत. त्याच्याकडे मोठ्या भक्तिभावाने आपल्या यजमानासाठी दीर्घ आयुष्य मागत. तोही आस्थेने आपल्या लेकीबाळींचे सौभाग्य सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारी घ्यायचा. सुताचे ते धागे बरेच दिवस आपल्या देहावर अभिमानाने मिरवत असायचा.

धार्मिक आस्था बाळगणाऱ्या गावातल्या माणसांसाठी वड नेहमीच आस्थेचा विषय असायचा. परिसरात मंडप टाकून पारायणाचा जागर घडायचा. मंत्रजागराने परिसर दुमदुमत राहायचा. धूप-अगरबत्त्यांच्या सरमिसळ गंधाने दरवळत राहायचा. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा जे काही असतील, त्या ग्रंथांच्या वाचनाचे सूर वातावरणात मंगलनाद निर्माण करीत राहायचे. माणसे आस्थेने ऐकत असायची. भागवतातील कथेला रंगत चढलेली असायची. बायाबापड्या वाती वळत मोठ्या भक्तीभावाने कथा ऐकत बसलेल्या. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने वयस्कांच्या थकलेल्या देहात अनामिक ऊर्जा संचारायची. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तेज यायचे. पारायणाच्या मधल्या वेळेत जेवणखाणं करून माणसं परत यायची. फावल्या वेळात गप्पांचे फड रंगायचे. गतकाळाच्या स्मृती जाग्या व्हायच्या. एकत्र जमलेली पोक्त माणसे आठवणीत रमलेली असायची. स्मृतीच्या पोतडीत पडलेल्या आठवणी एकेक करून काढल्या जायच्या. आम्ही मुलं त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत असयाचो. एकीकडे बहरलेला भक्तीचा मळा, तर दुसरीकडे आठवणींचा रंगलेला सोहळा. भूतकाळाच्या उबदार शालीत झोपलेल्या आठवणींना जाग यायची. स्मृतिकोशातल्या मातीत रूजलेल्या विचारांच्या रोपट्यांना पालवी फुटून चैतन्याचा वसंत बहरत राहायचा.

नदीच्या पात्रापासून वड तसा बराच दूर. पण नदीला मोठा पूर आला की, पाणी परिसरातील खोऱ्यातून उड्या मारत उनाड मुलाप्रमाणे मुक्त उधळत राहायचे. मग गावातली माणसे चौकशी करीत रहायची. पुराचे पाणी कुठपर्यंत आले, म्हणून प्रश्न विचारायचे. वडाजवळ पाणी पोहचले का? पारंब्या पाण्यात कुठपर्यंत बुडाल्या? या प्रश्नांच्या उत्तरांवरून पुराचे प्रमाण ठरवले जायचे. वड ओलांडून पाणी पिंपळापर्यंत पोहचले की, माणसे चिंतीत व्हायची. दक्षिण-पूर्वेच्या अंगाने पुराचे पाणी गावाला धडका देत राहायचे. ते पाहून माणसांना धडकी भरायची. एव्हाना पुराच्या पाण्याने आसपासच्या शेतातील पिकं बुडून संपलेली असायची. पिकं गेली तर जाऊ दे, निदान शेतंतरी वाहून जाऊ नयेत, म्हणून शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलेला असायचा. पाणी कमी होऊ दे, म्हणून देवाकडे धावा केला जायचा. मग गावातली माणसे पुराच्या पाण्याची पूजा करून नदीची ओटी भरायचे. पाणी कमी होण्याची वाट पाहत असायचे. कधीकाळी महापूर येवून गेल्याचे वयस्कर मंडळी सांगायची. म्हणायचे, ‘तेव्हा सगळा वड पाण्यात बुडाला होता. त्याचा शेंडा तेवढा दिसायचा.’ टेकडीच्या डोक्यावर असणाऱ्या घरांच्या भिंतीपर्यंत पाणी कसे पोहचले, वगैरे वगैरे काही काही सांगत रहायची. जुनीजाणती माणसं म्हणायची, ‘हं! हा काय पूर आहे? आम्ही केवढा मोठ्ठा पूर पाहिला आहे! एवढ्या पाण्याने काही होत नाही!’ म्हणून बाकीच्यांना धीर देत रहायची. त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकून वड गालातल्या गालात हसत असल्यासारखा वाटायचा.

या वडाशी सगळ्या गावाचं जगणं जुळलेलं. कोणत्यातरी निमित्ताने माणसं वडाच्या कुशीत क्षण-दोनक्षण विसावयाची, जिवंतपणी आणि अखेरच्या यात्रेच्या वेळीसुद्धा. अंत्ययात्रा नदीकडे जातांना गावाला वळसा घालून येणाऱ्या लांबच्या रस्त्याने चालत यायची. खांदेकरी थकलेले असायचे. नदीकडे जातांना वडाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थोडे थांबायचे. वडासोबत वाढलेला देह त्याच्या पायाशी अखेरचा विसावा घ्यायचा. पिठाचा नैवद्य ठेऊन; कुठूनतरी कोणी एक दगड आणायचा, म्हणे तो जीव असतो. तो सोबत घेऊन तिरडी उचलली जायची. चैतन्य विसर्जित झालेला निष्प्राण देह खांद्यावर घेऊन माणसे चालती व्हायची. वड जणू डबडबलेल्या अंतःकरणाने त्याला अखेरचा निरोप द्यायचा. वडाखाली खेळणाऱ्या आम्हा मुलांचं खेळणं अशावेळी थोडं पुढे पांगायचं. ठेवलेल्या नैवेद्याला स्पर्श करायचा कोणाला धीर होत नसायचा. पण नदीकडील माळावर चरण्यासाठी, पाण्यासाठी जाणाऱ्या गुरांवासरांच्या वावराने तो भिरकावला जायचा. क्षणभर दुःखी झालेला वड आणि शेजारचा परिसर दुःख गिळून पूर्वपदावर यायचा. आनंदाचे झुले परत हलायला लागायचे. मुलं खेळण्यात दंग व्हायची. आस्थेचे नवे गीत बनून परिसर पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटायचा.

मुलंमाणसांनाच नाही तर पोपट, कावळे, चिमण्यांच्या संसाराला वडाने आपल्या अंगाखांद्यावर आश्रय दिला. त्यांचे चिमणसंसार त्यावर बहरले. या बहरणाऱ्या संसारातल्या पिलांना पाहण्याचा मोह आम्हा मुलांना पडायचा. वडाच्या ढोलीत पोपटांनी केलेल्या घरात उत्सुकतेने डोकावून पाहिले जायचे. खोप्यातल्या पोपटाच्या पिलांना हाती अलगद धरून बाहेर काढून पाहत राहायचे, त्यांना गोंजारायचे. कावळे मात्र हुशार त्यांची घरं वडाच्या शेंड्यांना धरून असायची. तेथपर्यंत पोहोचायची आमची हिंमत होत नसायची. पक्षांच्या पिलांना उगीचंच त्रास देणारी मुलं एखाद्या जाणत्या माणसाला दिसली की, हमखास रागवायचे. पिलं पुन्हा घरट्यात ठेवली जायची. रोज त्या घरट्यात डोकावून पाहण्याची अनिवार इच्छा असायची. काही बघूनही घ्यायचे. पिलं वाढत राहायची आणि एक दिवस खोपा रिकामा व्हायचा. पिलं आकाशी झेप घेऊन निघून जायची. आम्ही मात्र तेथेच रमलेलो असायचो.

दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असायचा. ठरल्यावेळी ऋतू बदलायचा. ऋतुमानानुसार वड आपल्या पानांची वस्त्रे बदलवत राहायचा. उन्हाळ्यात कोरडीठाक पडलेली त्याची अंगकांती पावसाच्या पाण्याने चिंब भिजून सुस्नात लावण्यवतीच्या रूपाशी स्पर्धा करताना दिसायची. हिवाळ्यात माळावर खेळणारी मुलं उड्या मारण्यात थंडी विसरायची. पाण्याला गेलेली माणसे ओली होऊन कुडकुडत नदीवरून हंडे, घागरी घेऊन यायची. शेत राखायला आलेली आणि थंडीने कुडकुडणारी माणसं शेकोटी पेटवून अंग शेकत गप्पा झाडीत बसलेली असायची. त्यांच्या शेजारी अंग शेकीत थोडी टेकायची. खेळात लक्ष नसलेली मुलं कोवळे ऊन अंगावर घेत वडाच्या कडेवर जाऊन बसायची. शाळा चुकवून मास्तराच्या माराच्या धाकाने येथेच लपून बसायची. वडाच्या संगतीने मुलांचं वर्षभर खेळणं, वाढणं सुरु असायचं. हा वड सगळ्या पोरांना आपला वाटायचा. हे आपलेपण परिसराशी जुळलेल्या नात्याच्या धाग्यांची वीण घट्ट करीत राहायचे. आस्थेवाईकपणाचा अनमोल ठेवा घेऊन जीवनऊर्जा घेत कितीतरी पिढ्या आपल्या पंखांनी येथूनच आकांक्षांच्या आकाशात उडल्या, आपलं क्षितिज शोधण्यासाठी. वडपिंपळ अन् तेथला परिसर तसाच मागे ठेवून.

काळ बदलला. विज्ञानतंत्रज्ञानाची साधने हाती घेऊन विद्यमान पिढ्याही बदलत आहेत. त्यांच्या जगण्याची दिशा आणि प्रयोजनेही बदलली. जागतिकीकरणाच्या सुधारणेचे वारे गावापर्यंत पोहचले. सुविधांनी गावात संचार करायला सुरवात केली. गावात, घरात टीव्ही आल्या. मुलं त्याभोवती गर्दी करू लागली. पडद्यावरच्या आभासी रंगीत जगामुळे बाहेरच्या जगाचे रंग फिके वाटू लागले आहेत. मुलं हल्ली मनमुराद खेळत नाहीत. गावमातीतले साधेसेच, पण आनंदाची पखरण करणारे खेळ इतिहासजमा होऊन मोबाईलवरील खेळ आवडू लागले. टचस्क्रीनने स्मार्ट झालेल्या फोनचा स्पर्श त्यांना सुखद वाटतो. रानातला पिकांचा गंध, झाडाफुलापानांचा, मातीचा, नदीच्या पाण्याचा स्पर्श त्यांना सुखावत नाही. मोबाईलच्या माध्यमातून जगाच्या टचमध्ये असणारी पिढी परिसराच्याच टचमध्ये नाही. निसर्गाच्या मुक्त वातावरणाचा स्पर्श त्यांना पुलकित करीत नाही. विज्ञानाने जग हातात सामावण्याएवढे लहान केले; पण सहजपणाने जगण्याचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. अनेक बाजूंनी माणसं रिती होत आहेत. रितेपणातून आलेले मनाचे कोतेपण वाढत आहे.

गावांगावात थोड्याफार फरकाने असेच घडत आहे. माळावरील मोकळ्या जागेत हुंदडणारी पावलं थांबली, थबकली. त्यांची जागा घेऊन रानगवत, रानवनस्पतींनी आपले पाय परिसरात पसरवले. त्यांच्या पावलांचा पसारा वाढला. त्या पसाऱ्यात परिसराची रया पार हरवली आहे. एक बकाल उदासपण त्यावर पसरलेलं आहे. कधीकाळी माणसांच्या सहवासाने फुललेला परिसर शापित जगणं घेऊन उभा आहे. आपलं गतवैभव परत येईल या आशेवर, कोण्या उद्धारकर्त्या प्रेषिताची वाट पाहत. पण तो येईल का? माहीत नाही. आणि आला तरी फार काही करू शकेल असे वाटत नाही, कारण येथील प्रेत्येक माणूस स्वतःलाच महात्मा समजून वागतो आहे. इतरांचे महात्म्य दुर्लक्षित करून जगणं म्हणजे स्वातंत्र्य असे समीकरण होऊ पाहत आहे. स्वातंत्र्याचा सोयिस्कर अर्थ लावून वागणं घडत आहे. चांगलं, वाईट काहीही ऐकून घ्यायची तयारी नाहीये. मी जसं वागतोय, तेच आणि तेवढंच आदर्शवर्तन असल्याचा समज दृढ होतोय. जगण्यातले साधेपण विसर्जित करून स्वार्थात परमार्थाचे प्रतिबिंब पाहिले जाते, तेव्हा माणसाची प्रतिमा धूसर होत जाते. स्वाभाविक जगणं विसरलेली माणसं मनाने संकुचित होत जातात. माणसे खुजी झाली म्हणजे बदलसुद्धा थिटे होतात, नाही का?

Aswasth Chitre | अस्वस्थ चित्रे

By // 12 comments:
१. सन. २०१५,
सीरियात राहणाऱ्या आयलान कुर्दीच्या मृत्यूने जगभरातील संवेदनशील माणसांची मने गलबलून आली. समुद्रकिनाऱ्यावर निपचित पडलेल्या लहानग्याच्या देहाचं चित्र ज्यांनी पाहिलं, त्या प्रत्येक मनात कालवाकालव झाली. ज्या वयात मुलांनी हसावं, खेळावं त्या वयात मुठभर देह सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला पालकांसोबत विस्थापित व्हावं लागलं. नियतीने पाश घट्ट आवळले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. जीवनाचं रुजलेलं रोपटं उखडून फेकलं गेलं. सगळ्याबाजूनेच परिस्थितीच बेईमान झाली. स्वकीयांच्या सहवासाचे सगळे पाश सोडून ओंजळभर सुखाच्या शोधासाठी आशेच्या मृगजळामागे धावणे नियतीने निर्धारित केले. जीवनाचे गाठोडे घेऊन दिशाहीन वणवण करणे नशिबी आले. ज्या भूमीत जीवनवृक्षाच्या अस्तित्वाची मूळं रुजली होती तेथील आस्थेचा ओलावा संपला. सहज, साधं, सरळ जगणं शक्य नसल्याने अन्य वाटांनी प्रवास करीत जीवनाची नवी पहाट शोधणे आवश्यक ठरले. जीवनाचा नम्रपणे शोध घेत सरळ मार्गाने वर्तणारी माणसे कलहप्रिय माणसांच्या जगात वेडी ठरतात. त्यातील हेही एक कुटुंब. प्रयत्न करूनही आपलेपणाचा स्नेह हाती लागण्याचा संभव नसल्याने समस्यांच्या सागरात ढकलून सुखाचा किनारा गाठण्याच्या प्रयत्नात नियतीने सगळा खेळ संपवला. डोळ्यात साठवलेला आणि मनात गोठवलेला आशेचा कवडसा परिस्थितीच्या निबिड अंधारात हरवला. सोबत आयलानची आई आणि भाऊही गेले. वडील वाचले, पण त्यांच्याकडे जगण्याची आसक्ती निर्माण करेल असे काहीच शिल्लक नाही. जगातला कोणताही देश आता त्यांना नकोय.

२. सन. १९९३,
सुदानमध्ये दुष्काळ पडला. माणसं हाडांचे सापळे झाले आहेत. उपासमार आणि त्या मार्गाने चालत येणारे भूकबळी जगण्याचे विधिलिखित बनले आहे. एकीकडे जगाचे व्यवहार सुनियोजित सुरु असताना; त्याच जगाच्या दुसऱ्या बाजूला रोजचं जगणं उध्वस्त झालं आहे. माणसे जगण्याच्या संघर्षात तुटत आहेत. परिस्थितीच्या पहाडाला धडका देऊन गलितगात्र झाली आहेत. संघर्ष करूनही हाती काहीच लागत नसल्याने सभोवताली भकासपण दाटून आले आहे. केविन कार्टर नावाचा छायाचित्रकार दुष्काळाचे चित्रण करण्यासाठी तेथे गेला. एक दिवस धान्य घेऊन गाडी आली. प्रत्येकाने मिळाले ते घेतले. केविन काही चित्रे कॅमेऱ्यात बंदिस्त करून थोडा निवांत बसला. अचानक त्याचं लक्ष एका दृश्याकडे गेले. एक मुलगी- तिच्या देह हाडांचा सापळा झालेला. कशीतरी खुरडत खुरडत ती चालते आहे. चालण्याएवढेही त्राण तिच्या देहात उरलेले नाही. खाली पडलेले धान्याचे दाणे कसेतरी वेचते आहे. तेवढ्यात एक गिधाड तिच्या मागे येऊन थांबते. त्याचे लक्ष त्या मुलीच्या खंगलेल्या देहाकडे लागलेले. गिधाडाच्या डोळ्यात सावज सापडल्याचा आनंद. केव्हा एकदा त्या देहातील चैतन्य संपते, याची त्या गिधाडाला प्रतीक्षा. केविन ते दृश्य कॅमेऱ्यात टिपतो. तो प्रसंग कॅमेऱ्यात कैद करून कायमचा साठवला जातो. १९९४ मध्ये न्यूयॉर्क टाईम्समधून ते प्रकाशित झाले. चित्र पाहून संवेदनशील मनं हादरली. त्या मुलीचे काय झाले असेल, या प्रश्नाने अस्वस्थ झाली. छायाचित्रणासाठी असलेल्या पुलित्झर पारितोषिकाने केविनला सन्मानित करण्यात आले. कोणत्याही छायाचित्रकारासाठी असलेले सन्मानाचे स्वप्न स्वतःहून केविनकडे चालून आले. आपल्याकडे काम करण्यासाठी मागेल तो पगार व पद द्यायला नामांकित नियतकालिकं तयार होती. मान-मरातब सारेकाही मिळाले. पण केविन मात्र विमनस्क, विषण्ण होता. त्याच्या डोळ्यासमोरून दुष्काळाची भेसूर दृश्ये हलायला तयार नव्हती. जगाचं भीषण वास्तव पाहून मनातील संवेदना सुन्न झाल्या. अगतिक माणसांसमोर परिस्थितीने निर्माण केलेले प्रश्न त्याला विचलित करीत होते. समस्यांनी दुभंगलेल्या जगासाठी मी काहीही करू शकत नाही, ही खंत मनातून निघत नव्हती. तो अस्वस्थ झाला. माणसांचे असे जग त्याला नको होते. समोर दिसणारे हाडांचे सापळे, भूकबळी, असहाय उपासमार काहीही केल्या विसरू शकत नव्हता. जग स्वतःच्या सुखाच्या वर्तुळातून बाहेर यायला तयार नव्हते. प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. अखेर एक दिवस त्याने आत्महत्या करून आपल्यापुरते या प्रश्नाचे उत्तर शोधले.

३. सन. १९६९,
व्हिएतनाम आणि अमेरिका संघर्षकाळातील हे एक चित्र. युद्धात सारे नीतिसंकेत गुंडाळून ठेवण्याचा माणूस जातीचा इतिहास तसा खूपच जुना आहे. काहीही किंमत मोजून विजय आपल्याला मिळावा म्हणून अनेकदा अविचाराने वागणे घडत आले आहे. हे माहीत असूनही परत त्याच मार्गाने वर्तण्याचा हा परिपाक. अमेरिकेने नापाम बॉम्बचा (पेट्रोलमध्ये अन्य रसायने- जसे रबर, अल्युमिनियमची भुकटी वगैरे मिसळून तयार करण्यात येतो. पेट्रोलच्या प्रत्येक थेंबाची ज्वलनशीलता वाढून अधिक विनाशकारी ठरतो.) वापर केल्याने माणसांचं जगणं होरपळून निघाले. बॉम्बहल्ल्याने  उडालेल्या आगीच्या लोळांपासून स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी जीवाच्या आकांताने लहान लहान मुलेमुली रस्त्यावरून पळत आहेत, आपला ओंजळभर जीव वाचावा म्हणून. त्यांच्या भेदरलेल्या डोळ्यात मूर्तिमंत मृत्यू दिसतो आहे. जगण्याचे पाश सहज सुटत नाहीत. पण जगणंच जाळायला निघालेल्या उन्मत्त मानसिकतेला ते सहसा नजरेस येत नाही, कारण डोळ्यांवर स्वार्थपूरित विचारांची पट्टी घट्ट बांधून घेतल्यावर समोरचे काही दिसण्याची शक्यता नसतेच. दिसत असतात फक्त फायद्याची गणिते आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सारासार विवेक विसरून घडणारं वर्तन. नापाम बॉम्ब्स काय करू शकतात याचं हे भयावह चित्र. ही मुले जणू याचंच प्रतीक बनली.

माणसांच्या जगण्याची ही काही अस्वस्थ चित्रे.

संबंधित घटनांच्या काळात काही वर्षांचे अंतर असले, त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आणि त्यांच्या मागे असणारे संदर्भ वेगळे असले तरी वेदनांचा चेहरा मात्र सारखाच. सहृदय माणसांचे हृदय पिळवटून टाकणारा.

विद्यमान विश्वाने विकासाची नवी क्षितिजे निर्माण केली, प्रगतीचे नवे आयाम उभे केले म्हणून आम्ही माणसांनी आपलेच कौतुक करून घेण्यात कोणतीही कसर राहू दिली नाही. मानवजातीच्या कल्याणाच्या वार्ता जग करीत आहे. विज्ञाननिर्मित शोधांनी निर्माण केलेली सुखं सोबत घेऊन समृद्धीची गंगा दाराशी येऊन थांबली आहे आणि तिच्या प्रवाहाने जगण्याच्या प्रांगणात संपन्नता आणली आहे. माणसांसमोर आता कोणतेही जटील प्रश्न जणू शिल्लक राहिलेच नाहीत, अशा आविर्भावात वागणे घडत आहे. माणसे सुखाने जीवनयापन करीत असून त्यांच्या समोरील समस्यांचा गुंता बहुतेक सुटला आहे, असे आभासी चित्र उभे केले जात आहे. वास्तव काय आहे, हे लक्षात यायला आवश्यक असणारे सहजस्फूर्त शहाणपण आपल्याकडे आहे का? असा प्रश्न विचारायची कोणालाच गरज नसल्यासारखे वागणे घडत आहे.

जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. तेथेही विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. महासत्ता, विकसित, विकसनशील, अविकसित अशा परगण्यात जगाला विभागून प्रत्येकाला आपआपला फायदा लाटायची घाई झाली आहे. स्वार्थाकरिता कोणी कितीही कुलंगड्या केल्या तरी काही बिघडत नाही, या विचारांवर विश्वास ठेवून वर्तणाऱ्याची वानवा नाही. यातही विशेष असा की, प्रत्येक देश-प्रदेशाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा बदलत असते. तिच्यात प्रसंगानुरूप परिवर्तन घडत असते. सत्तेच्या सारीपाटावर सोंगट्या सरकवल्या जातात. लहान-मोठे प्यादे हाती घेऊन वजिराला कोंडीत पकडून राजाला शह देण्यासाठी खेळ खेळले जातात. आपापले अहं सांभाळण्यासाठी अतर्क्य, असंभव, अवास्तव गोष्टी घडवून आणल्या जातात. फायद्याचे गणित जुळत असते तोपर्यंत विस्तवाशीही खेळले जाते. गरज संपली की, त्याचं सोयिस्कर विसर्जन केलं जातं. स्वार्थाच्या गणिताच्या उत्तरासाठी आपण म्हणू तसे आणि तेच उत्तर देणारी सूत्रे वापरली जातात. नसतील तर तशी तयार करून घेतली जातात. निसटलेच काही हातचे तर पुन्हा नवा खेळ नव्या पटावर मांडला जातो; फायद्याची गणिते नजरेसमोर ठेऊन.

माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, माणसाची प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्यासाठी एकीकडे त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. त्याचे विसकटलेले रंग अजूनही माणसांना बदलता आलेले नाहीत. स्वार्थाच्या कलहात सामान्य माणसांचे जगणे उसवत आहे. अविचाराने घडलेल्या कृतीतून विचारांचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. स्वार्थपरायण विचारांच्या विकृतीने जग फाटतेय, याची जाणीव असून नसल्यासारखे वागणे घडत आहे. सत्तेसाठी, स्वार्थासाठी विधिनिषेधशून्य खेळ खेळत राहायचे आणि सामान्य माणसांनी अशा जगण्याला आपलं नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे, हे जगण्याचे प्राक्तन होऊ पाहत आहे. नियतीने नशिबी लादलेले भोग घेऊन माणसे धूसर क्षितिजावर दिसणारा सुखाचा एक पुसटसा कवडसा जीवनाच्या प्रांगणात आणण्यासाठी अस्वस्थ वणवण करीत आहेत. जीवनाच्या विसकटलेल्या वाटांनी फाटक्या नशिबाला सांधण्यासाठी चालत आहेत. आज नसेल निदान उद्यातरी नियती कूस बदलून आनंदाचे ऋतू जीवनी आणेल, या आशेवर जगण्यासाठी किमान आवश्यक गरजांची पूर्तता करू शकणाऱ्या प्रदेशाकडे नेणाऱ्या वाटांचा शोध घेत आहेत.

जग कसे आहे, कसे असावे, याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत. मुत्सद्यांच्या मुद्देसूद विचारांमध्ये जगाचे चित्र काही असो. विचारवंतांच्या विवक्षित विचारांमध्ये जगाची प्रतिमा कशीही आकाराला येवो. सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. जगण्याच्या अगणित अवघड प्रश्नांच्या भोवऱ्यात ते भिरभिरत असतात. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे. असंख्य प्रश्न घेऊन गरगर फिरणारे. त्यांच्या गरजा समृद्धीची बेटे निर्माण करण्याच्या कधीच नसतात. प्रगतीच्या पंखांवर स्वार होऊन आकाशात मुक्त विहरायच्या नसतात. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्यायांशी त्या निगडित असतात. भाकरीचा शोध त्याच्यासाठी गहन प्रश्न असतो. भुकेने निर्माण केलेल्या वर्तुळाशी त्याचं जगणं करकचून बांधलेलं असतं. जेव्हा त्याच्याकडून भाकरीच हिरावून घेतली जाते, तेव्हा समस्यांचा गुंता वाढत जातो. व्यवहारातील साधेसेच प्रश्न अवघड होतात आणि हाती असलेले उत्तरांचे पर्याय विफल ठरतात. माणसे परिस्थितीने विकल होतात, तेव्हा मनाच्या मातीत गाडून टाकलेला वणवा वेगाने उसळून बाहेर येतो. त्याला कोणी क्रांती नावाने संबोधतात, कोणी परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग म्हणतात. अन्यायाविरोधात, सर्वंकष सत्तेच्या अत्याचाराविरोधात, अविचाराविरोधात एल्गार घडतो. संथ लयीत चालणाऱ्या जीवनप्रवाहात वादळे उठतात. प्राप्त परिस्थितीविरोधात संघर्ष घडतो. अशा संघर्षांचे मोल शेवटी सामान्यांनाच चुकवावे लागते. माणूस म्हणून माणसाला मिळणारा सन्मान नाकारला जातो, तेव्हा सन्मानाने जगण्यासाठी हाती शस्त्रे धारण केली जातात. सत्तेच्या सिंहासनाच्या ठिकऱ्या केल्या जातात. राजा, राजपाट बदलूनही स्वस्थता जीवनी यायला तयार नसते, तेव्हा सुखाच्या लहान-मोठ्या तुकड्यांचा शोध घेत माणसांना अन्य क्षितिजे गाठावी लागतात.

अनियंत्रित सत्ताधीशांच्या, अविवेकी आक्रमकांच्या अनन्वित अत्याचारांनी सर्वस्व हरवून बसलेली माणसे दुभंगलेले जगणं सोबत घेऊन रोजचं मरण अनुभवत आस्थेचा ओलावा आणण्यासाठी चालत असतात. जगण्याची छोटीशी आस बांधून समस्यांच्या वावटळीत हरवलेली स्वप्ने शोधत राहतात. डोळ्यांनी दिसणारे आणि सुखांची अनवरत रिमझिम बरसात करणारे जग फक्त काही लोकांसाठीच का? या विचाराने विचलित होतात. एकीकडे मूठभर लोकांसाठी सगळंच असणं आणि दुसरीकडे काहीच नसणं, हा जगाचा खरा चेहरा असू शकत नाही, याची जाणीव घडून येते. आपण उपेक्षित का? नियतीने आपल्याच ललाटी हे भोग का लिहिले असावेत? या विचाराने अस्वस्थ होतात. वेगवेगळे प्रासंगिक मुखवटे धारण करून कष्टकऱ्यांच्या जगण्याचा चेहरा आपल्या फायद्यानुसार बदलणाऱ्या स्वार्थपरायण माणसांनी निर्माण केलेली व्यवस्था याचे कारण असल्याचे जाणवते, तेव्हा परिस्थितीने गांजलेली माणसे दांभिकांनी धारण केलेला बेगडी मुखवटा उतरवण्यासाठी रणक्षेत्री उतरतात. आपलं अस्तित्व आणि अस्मिता शोधण्यासाठी संघर्षाची अस्त्रे, शस्त्रे हाती घेत परिस्थिती परिवर्तनाकरिता सर्वस्व उधळण्याची तयारी ठेऊन दोन हात करीत उभे ठाकतात.

कलहाने फाटलेले आणि संघर्षाने विटलेले जग सोबत घेऊन माणूस किती काळ सुखाच्या शोधात जगणार आहे? अस्तित्वाचा हरवलेला ओलावा शोधण्यासाठी सैरभैर झालेलं, स्वतःची ओळख हरवलेल्या चेहऱ्याचं जगणं आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांच्या हाती देणार आहोत का? माणूस म्हणून प्रत्येकाला आपलं स्वयंभू अस्तित्व असणारं जगणं देण्यासाठी काहीच न करणारं जग देणार आहोत का? ज्याच्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याइतपत प्रज्ञा आहे, असा कोणीही माणूस अविचाराने दुभंगलेल्या आणि संवेदनांनी उसवलेल्या जगास आपले म्हणणार नाही. प्रत्येकास त्याच्या वकुबाप्रमाणे जगण्यालायक अंगण मिळावे, म्हणून आधी आपणास इतरांचा सन्मान करता यायला हवा. माणूस म्हणून इतरांना दिली जाणारी प्रतिष्ठा साहजिकच आपणासही सन्मानाच्या परिघापर्यंत पोहचविते. जगाच्या वर्तनाचे प्रवाह सगळेच वाईट असतात किंवा सगळेच चांगले असतील, असे कधीही नसते. चांगले आणि वाईट यांच्या संयोगाने घडणारे व्यामिश्र वेगळेपण हाती घेऊन अनुकूल ते आणि तेवढेच आचरणात आणणे, यातच माणूसपणाचे सौख्य सामावले आहे. वेगवेगळ्या विचारधारांचा तौलनिक मागोवा घेत; चांगले ते स्वीकारणारे व्यापकपण विचारांच्या विश्वात रुजणे म्हणूनच आवश्यक असते.

माणूस जातीचा इहतलावरील जीवनाचा इतिहास संघर्षगाथा आहे. जगण्याचे असंख्य प्रश्न सोबत घेऊन सहस्त्रावधी वर्षापासून तो चालतो आहे, सुखाचे ओअॅसिस शोधत. आहे ते जगणं समृद्ध करून आणखी काही हवे वाटल्याने वेगवेगळ्या विचारधारांचे परिशीलन करीत तो वर्ततो आहे. असंख्य प्रश्नांच्या गुंत्यातून आपणास हवे ते शोधत राहिला आहे. मुक्त असण्याची उपजत ओढ घेऊन जगत आला आहे. तरीही राज्य, राजसिंहासन, धर्म, जात, वंश, कधी आणखी काही, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या सहज जगण्याला सीमित करीत राहिले आहेत. जोपर्यंत फक्त माणूस म्हणून माणूस जगत होता, तोपर्यंत त्याला माणूस म्हणणे संयुक्तिक वाटत असे; पण माणूसपणाच्या मर्यादांना ओलांडून आपले अहं सुखावण्यासाठी त्याने इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला, तेव्हा त्याच्या जगातून आधी माणुसकी हरवली आणि त्यामागे विचारांचे उसवलेपण आले. स्वाभाविक जगण्याला तिलांजली दिली गेली. सहज प्रेरणांनी प्रेरित जगण्याच्या प्रवाहांना पायबंद पडला. स्वातंत्र्याचा संकोच होत गेला. वेगवेगळ्या प्रासंगिक अपेक्षांच्या चौकटीत बंदिस्त होताना माणसांचं जगणं अधिक जटील होत आहे. प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटलेली माणसे ओंजळभर सुखाच्या शोधात धावत आहेत.

वैयक्तिक स्वार्थ साधणारे सारे विधिनिषेध विसरून स्वार्थाच्या वर्तुळांची भक्कम तटबंदी करून आपले परगणे सुरक्षित करीत आहेत. माणसांसमोरील सगळ्या प्रश्नांचे मूळ अविचाराने घडणाऱ्या कृतीत असते. तसेच आपण वागतो आहोत, ते आणि तेवढेच योग्य आहे, असे समजण्यातही असते. ज्याला माणूस म्हणून जगण्याची प्रयोजने समजतात त्याला जगावे कसे, हे प्रश्न सहसा पडत नाहीत. पण हल्ली विचारांचं व्यापकपण सोबतीला घेऊन वर्तणाऱ्याची वानवा नजरेत भरण्याइतपत जाणवत आहे. समाजाच्या संवेदनांचे प्रवाह संकुचित होणे सांस्कृतिक तेजोभंग असतो. सांस्कृतिक पडझड माणसांना नवी नाही. माणसाच्या इतिहासाचे ते अविभाज्य अंग आहे. पडझडीनंतर उठून पुन्हा उभं राहण्यात संस्कृतीचे सामर्थ्य सामावलेले असते. पुनर्निर्माणाची ताकद गमावलेली माणसे विकासगामी पथ निर्माण करण्याची क्षमता हरवून बसतात. ज्याला परंपरांचे पायबंद पडतात ते आनंदाचे नवे प्रदेश निर्माण करू शकत नाहीत. संवेदनांचे विस्मरण घडलेला समाज माणसांच्या मनात आकाशगामी आकांक्षांचे दिवे प्रदीप्त करू शकत नाही. विचारांचे तेजस्वीपण हरवलेली पराभूत मानसिकता आस्थेचा कवडसा शोधायला निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या अंधारल्या वाटा उजळू शकत नाही.

एक मरे दुजा त्याचा शोक वाहे, नकळत तोही पुढेच जात आहे, असे म्हणतात. आरंभ, स्थिती, लय क्रमाने प्रत्येक जिवाची जीवनयात्रा सुरु असते. देहासह नांदणारे चैतन्य एक दिवस संपते. शिल्लक काहीही उरत नाही. उरल्याच तर स्मृती; तेही संबंधितांचे कार्य त्या रुतब्याचे असेल तर, अन्यथा अनेक जीव जसे जन्माला आले आणि गेले त्यातला हाही एक. पण एखाद्याच्या जाण्याने अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावतात. त्यांच्या जाण्याने अनामिक अस्वस्थता निर्माण होते. ओळखीचे कोणी असेल तर माणसे हळहळतातच; पण जगात अशीही काही माणसे असतात, ज्यांना आयुष्यात आपण कधीही पाहिले नसते. ना त्यांचा देश ठाऊक असतो, ना त्यांचे नाव-गाव ठावूक असते, तरीही त्यांचे अनपेक्षितपणे जाणे समोर येते आणि माणसे अस्वस्थ होतात. त्यांच्यातील माणूसपणाला देश, प्रदेश, धर्म, पंथ, जातीची कुंपणे नाही बंदिस्त करू शकत. ज्याच्याजवळ मनाचं नितळपण शिल्लक आहे आणि संवेदनांनी गहिवरणारी मन नावाची अमूर्त; पण सहवेदना बनून प्रकटणारी भावना आहे, त्यातून प्रकटणारी स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून डोळ्यांमध्ये आसवांचे दोन थेंब आहेत अशी माणसे अस्वस्थ होतात, हे अस्वस्थपण माणसातील माणूसपण शिल्लक असल्याचे द्योतक असते.