Rahun Gelela Kahi | राहून गेलेलं काही...

By // No comments:
अगणित दिव्यांनी आसपासचं अवघं आसमंत उजळून निघालेले आहे. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने धरती न्हाऊन निघाली आहे. सर्वत्र दीपोत्सवाची आनंदपर्यवसायी धावपळ सुरु आहे. घराच्या कोपऱ्यापासून देवाच्या गाभाऱ्यापर्यन्त सारंकाही प्रकाशाने पुलकित झालेलं. प्रकाशाची मुक्त उधळण सुरु आहे. प्रसन्न प्रकाश परिसरात पसरलेला आहे. चैतन्याच्या सुरांचा आनंददायी साज वातावरणाला लाभला आहे. माणसांच्या उत्सवप्रियतेचा आनंदाविष्कार होऊन प्रकाश इहतली विसावतो, पूजनाचा सोहळा बनून प्रकटतो. दिव्यांच्या अनंत रांगांनी तेजाचे रंग धारण करून चैतन्य उभे केले आहे. जीवनाच्या धावपळीत आनंदाचे चार क्षण हाती गवसले म्हणून माणसं सुखावली आहेत. पण या आनंदाची बरसात सगळीकडेच होतेय असेही नाही. आभाळभर पसरलेल्या प्रकाशातील ओंजळभर उजेड आपल्या वाट्याला का नसावा? हा विचार काहींना अवस्थ करत आहे. माणसांच्या गर्दीत हरवलेले काही हताश चेहरे या वाटेवर उभे आहेत. आपल्या वाट्यास आलेल्या अगतिक परिस्थितीला पाहत. त्यांच्या मनात अस्वस्थ कालवाकालव उभी आहे. परिसरात पसरलेल्या प्रकाशातील चिमूटभर उजेड आपल्या अंगणात आणण्यासाठी आपण काहीही करू शकत नसल्याची अस्वस्थता अंतर्यामी घर करते आहे.

नियतीने आखून दिलेल्या चौकटींच्या बाहेर उभ्या असणाऱ्या मनांची असहायता आतल्याआत पोखरते आहे. समोरील प्रश्नांचा गुंता वाढत जातो. अस्वस्थ मन विचारतेय काय करावे? कसे करावे? म्हणजे उजेडाचा कवडसा आपल्या अंधारल्या अंगणात आणता येईल? शोधशोध शोधूनही उत्तर हाती लागत नाही. अशावेळी परिस्थितीला शरण जाण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. ‘आलीया भोगाशी’ हेच विधिलिखित ठरते. समोरच्या परिस्थितीशी धडका देत मार्ग काढण्यासाठी माणसं प्रयत्न करीत आहेत; पण सगळं करुनही फारसं काही हाती न आल्याने दैवाला दोष देत दूर कोणत्यातरी कोपऱ्यात संकोचून उभी आहेत. विवंचना सोबत घेऊन कसेतरी जगणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती आहेत, ज्यांच्या घरात लखलखत्या दिव्यांचा प्रकाश पोहचलाच नाही. प्रकाशाने भरलेली तबकं त्यांच्यापर्यंत न्यायला दैव विसरलं आहे. दुसरीकडे आनंदाची मुक्त उधळण सुरु आहे. या वर्षावात आकंठ न्हाऊन निघालेली माणसं आपलं घर, अंगण उजळून निघताना पाहत आहेत. वाट्याला आलेल्या प्रकाशातील थोडासा कवडसा अंधारल्या दारापर्यंत न्यायची वाट कळत नकळत प्रकाशाच्या पखरणीत विसावणाऱ्याकडून विस्मरणात जाते.

माणसांच्या जगात अनेक घरं अशीही असतील, जेथे विवंचनेमुळे हवी असणारी आवश्यक वस्तूही आणता येत नसेल. मात्र, काही सुदैवी घरं अशीही असतील जेथे हौसेला कोणतेच मोल नसल्याने काही हजारांची ‘स्मार्ट’ खरेदी सहज केली जात असेल. वस्तूच्या किंमतीचा विचार कदाचित कुणाच्या गावीही नसेल. ज्यांच्या हाती पैसा नावाचा चंद्र विसावला आहे, ते त्याचा आल्हाददायक गारवा अनुभवत आहेत; पण तो हाती नसल्याने ज्यांच्या जीवनात अभावाची सोबत घडते आहे, त्यांच्यासाठी जगणं अंधारयात्रा ठरत आहे. अंधारवाटेने चालणे ज्यांचे प्राक्तन ठरले आहे. अशा पथिकाना आम्ही किती आठवतो? या लोकांच्या जगण्यात एवढा विरोधाभास का असावा? असा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? देशात कोणत्यातरी कोपऱ्यात अशीही काही माणसे आहेत, ज्यांना हाती पैसा नसल्याने आवश्यक गरजांची पूर्ततासुद्धा करता येत नाही. अनेक असेही आहेत जे ऑन लाईन शॉपिंगवर सवलत आहे, म्हणून कारण नसताना हजारो रुपयांच्या वस्तूंची खरेदी करतायेत. वस्तू खरेदी करायला कोणाची काहीच हरकत असण्याचा प्रश्न नाही; पण खरेदी करताना आवश्यकता किती आहे, हे लक्षात घेतले जाते का?

काहींना वाटेल की, आमच्याकडे हे करण्यासाठी आहे पैसा आणि परिस्थिती, मग आम्ही का करू नये? हे सगळं करायला कोणाची हरकत नाहीये. नसावी. आपल्याकडे नियतीने दिलेली सगळी सुखं आहेत. त्या सुखाचा उपभोग जरूर घ्यावा; पण इतरांसाठीही त्याचा थोडा विनियोग करायला काय हरकत असावी? समाजातून मिळवलेल्या संपत्तीचा समाजासाठी थोडातरी विनियोग आमच्या हातून घडायला नको का? देवदर्शनाला गेल्यावर आत्मिक समाधानासाठी हजारोंच्या देणग्या देताना आमचा हात आखडत नाही, पण सामाजिक कार्यासाठी काही देताना आमचे हात का अवघडतात? आमचा तोच हात माणसातल्या देवाला पूजताना का थांबतो? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, रानी, वनी  देवाचे अस्तित्व असल्याच्या वार्ता करायच्या. तो अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याचे आध्यात्मिक तत्वज्ञान सांगत राहायचे. अध्यात्माचे ज्ञान आम्हाला असावे; पण सामाजिक परस्थितीबाबत भान नसावे का? आमच्या आत्मभानाला माणसातला देव दिसू नये का? हृदयातला भगवंत हृदयात उपाशी राहणे, हा वर्तनाचा विपर्यास आहे.

आप्तांकडे गेल्यावर गरज नसतानाही आग्रहाने वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या डिश हाती कोंबल्या जातात. समोरचा व्यक्ती नकार देत असेल तरीही त्याच्या हाती हे पदार्थ ठेवले जातात. आवश्यकता नसतानाही ते त्यांना देण्यात असा कोणता आनंद सामावलेला आहे? खरंतर त्यांचं आपल्या भेटीला येणं हाच आनंद आहे, असे आपण का मानू नये? त्यांना हे सगळं नको असेल, त्याऐवजी कोण्यातरी उपेक्षितांपर्यंत हे पदार्थ आस्थेने पोहचवले तर त्यातून मिळणारा आनंद खऱ्याअर्थाने सण असेल. वंचित चेहऱ्यावर प्रसन्न समाधान बनून पसरलेला प्रकाश जगातल्या कोणत्याच दिव्याला निर्माण न करता आलेला उजेड असेल. औपचारिकता म्हणून डिशमधील दोन घास समोरच्यांना वाईट वाटू नये, म्हणून नावापुरते खाल्ले जातात आणि राहिलेलं तसंच टाकून देतो. दूर कुठेतरी एखाद्या उपेक्षित कोपऱ्यात यातील काहीच आपल्या लहानग्या लेकरांना मी का देऊ शकत नाही, म्हणून परिस्थितीशरण गरिबीत जगणाऱ्या एखाद्या गृहिणीच्या डोळ्यात व्यथित अंत:करणाने टचकन पाणी उभं राहतं. त्या विकल मातेच्या अगतिक डोळ्यात उभं राहणारं पाणी, पदार्थ टाकून देताना का दिसत नसावे? अशा परिस्थितीतही माणसं जगत आहेत, हेही आम्हाला यावेळी आठवू नये का? दीपपर्वाच्या कोणत्यातरी शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने हजारो रुपयांच्या दागिन्यांची केवळ हौस म्हणून खरेदी होते. काही दिवस मिरवल्यानंतर हे दागिने एकतर लॉकरमध्ये स्थिरावतात किंवा तिजोरीत जाऊन विसावतात. पण दुसरीकडे सौभाग्याच्या संदर्भांशी जुळलेल्या भावनेतून पत्नी अनेक दिवसापासून साध्याशाच मंगळसूत्राची मागणी आपल्या यजमानाकडे करते आहे. काहीही करून तिच्या सौभाग्याच्या आस्थेचं प्रतीक निदान तिच्या समाधानासाठी आणून द्यावं, हे कधीपासून मनात असूनही अनेक कारणांनी मनात राहिलेल्या इच्छेला पूर्ण करता न आलेला, म्हणून पत्नी हाच आपला अनमोल दागिना आहे, अशी मनाची समज घालून वर्तणारा हताश पतीही या जगात आहे, हे जगण्याच्या धावपळीत आमच्याकडून बघायचे राहूनच जाते.

जगण्याच्या संघर्षात आनंद देणारी अनेक सुखं आयुष्यातून नियतीने हद्दपार केलेली असतात. त्यांच्या अंधारल्या जीवनात थोडातरी उजेड पेरण्याची व्यवस्था आपल्या समाजाला निर्माण करणे अवघड आहे का? इच्छा असूनही प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी एकही नवा कपडा घेता न आलेली असंख्य माणसे आपल्या आसपास असतील. मनात असूनही एक साधासा ड्रेसही घेता आला नसेल. कारण कधी मुलांच्या शिक्षणाचा, तर कधी अनपेक्षित खर्चाचा, तर कधी जगण्याचाच प्रश्न समोर आवासून उभा होता. प्राथमिकता कशाला द्यावी या विवंचनेत बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्यात. एकेक प्रश्न सोडवताना दमछाक होत गेली. त्यांच्यामागे धावताना स्वतःसाठी काही घेताच आले नाही, म्हणून कधी तक्रार केली नाही, असे असंख्य आईबाप, बहिणभाऊ आपल्या नजरेतून निसटले असतील. केवळ काहीतरी खरेदी करायचे म्हणून आपण कपड्यांची खरेदी करतो. आवश्यकता असूनही परिस्थितीवश कपडे खरेदी करता आले नाहीत, अशांचे स्मरण आपणास अनावश्यक खरेदी करताना असू नये का?

जगात अशीही अनेक माणसे आहेत, ज्यांच्या अंगावर धड वस्त्रे नाहीत. आम्हांला मात्र आम्हीच घेतलेल्या कपड्यांचा कधी रंग आवडत नाही. कधी ते वापरायचा कंटाळा येतो. कधी फॅशन आउट डेटेड झाली म्हणून अवेळी अडगळीत टाकले जातात. यावेळी सामाजिकतेचे थोडेसे भान मनात का उदित होत नसावे? परिस्थितीशरण अगतिक माणसांच्या ओटीत नियती समृद्धीचे दान टाकायला विसरली आहे, असे अनेक अभागी जीव आला दिवस ढकलत जगत आहेत. माणूस म्हणून इहलोकी जन्माला आलेल्या; परंतु माणूस म्हणून जगण्यासाठी अहर्निश संघर्षरत राहूनही फारसं काहीच हाती न लागलेली असंख्य माणसे आपल्या आसपास आहेत. अशी दुर्लक्षित माणसं आपल्या प्रामाणिकपणालाच संपत्ती मानून जगत आहेत. परिस्थितीने सर्वबाजूंनी कोंडी केलेली असूनही, आहे त्यात समाधान मानून जगणारी ही माणसं आमची आहेत, याचं स्मरण असणं आवश्यक नाही का? दुर्दैवाने यांनी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला तर... आमचा आनंद आमच्याजवळ उरेलच किती? परिस्थतीच्या भोवऱ्यात भोळवंडून निघालेली, दुर्दैवाच्या दशावतारात गुरफटलेली अशी किती माणसे आनंद साजरा करताना आम्हाला आठवतात? म्हणून, ज्यांच्याकडे नियतीने दिलेलं सगळं काही आहे; त्यांना जरा समजू दे की, जगात परिस्थितीच्या चाकाच्या आकाभोवती अनवरत फिरणारे असेही अनेक उपेक्षित, वंचित, दीन, दुःखी जीव आहेत. ज्यांचं रोजचं जगणं कधीही न थांबणारी संघर्षयात्रा आहे. व्यवस्थेत सरपटत कसेतरी जगणारी ही माणसं रोजच आपुले मरण आपल्या डोळ्यांनी अनुभवतात. त्यांच्याही मनात सुखाची आस असते. सुखांनीमंडित जगातील सगळेच नाहीत; पण काही थोडे तरी रंग आपल्या मिळावेत. सगळं जगणं नाही; पण जीवनाचा एखादा पदर तरी रंगवला जावा, असे वाटत असते. रंगांचे इंद्रधनुष्यच काय, पण त्यातील एखादा काळापांढरा रंगसुद्धा यांना न देता परिस्थितीशरण जगण्याचे दान नियतीने दिले आहे. वाट्याला आलेल्या जगण्याला आपले नशीब समजून मुकाटपणे चालणारी ही माणसं आपल्या जीवनाचा नम्रपणे शोध घेत आहेत.

आपल्या आसपास अशी असंख्य माणसे आहेत. कधी रस्त्यावर आहेत. कधी फुटपाथवर आहेत. कधी जगण्याच्या वाटा शोधत रानोमाळ भटकत भटक्यांचं आयुष्य जगत आहेत. कधी मानवनिर्मित सुविधांचा कोणताच प्रकाश पोहचू न शकलेल्या प्रदेशात आपली संस्कृती सांभाळत टिकून आहेत. झगमग जगापासून कोसो दूर कुठे तरी. त्यांच्या जगण्याची तगमग आम्ही किती आठवतो? दैवाने ललाटी लिहलेला परिस्थितीचा वणवा संपून परिवर्तनचा वसंत अशा अभाग्यांच्या आयुष्यात कधी बहरेल? समृद्धीचे भरभरून फुललेले मळे नकोत, निदान सुखाची चार रोपटी तरी त्यांच्या अंगणात रुजावीत, म्हणून प्रकाशाचा थोडा कवडसा अंधारल्या अंगणात आपणास नेता येणार नाही का? आस्थेची पणती हाती घेऊन एक पाऊल उचलता येणार नाही का? चालत्या पावलांनी परिवर्तनाचे पथ निर्माण होतील. कदाचित आसपासच्या आसमंताचे रंग बदलायला वेळ द्यावा लागेल; पण बदल घडेल हे नक्की, कारण जगात एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे परिवर्तन. माणूस हा प्रगमनशील, परिवर्तनशील प्राणी आहे. त्याला परिवर्तनाइतके काहीही प्रिय नाही, हेही खरेच आहे, नाही का?

Prema Tuza Rang Kasa | प्रेमा तुझा रंग कसा?

By // 12 comments:
रोमियो-ज्यूलियट, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी ही नावे इतिहासाच्या पात्रातून वाहत प्रेम परगण्यात चिरंजीव झाली. या नावांभोवती कधी संशयाचे धुके दाटले आहे, कधी त्यांना विस्मयाचे वलय लाभले आहे. निस्सीम प्रेमाचे संदर्भ म्हणून माणसांच्या मनात ती आजही आहेत. त्याग, समर्पण, निष्ठा या भावनांना आपल्यात सामावून घेणारी ही नावे अमर्याद, अथांग प्रेम कसे असते, याची साक्ष देत स्मृतीतून विहरत आहेत. प्रेमपरगण्यात जगलेल्या या जोड्यांच्या जीवनाला अक्षय आशय प्राप्त झाला आहे. यांनी केलेले प्रेम उत्कट प्रेमाचा भावस्पर्शी आविष्कार होता. प्रेमाचे असे समर्पणशील क्षण किती जणांच्या आयुष्यात येतात? माहीत नाही. पण प्रेमभावनेशी कोणत्यातरी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कारणाने माणूस परिचित असतो. प्रेमाबाबत प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते एवढेच. काहींचं प्रेम मनातल्या मनात समीप राहणं असतं, तर काहींचं मनात उगम पावून जनात प्रकटतं, सर्जनाचा गंध लेऊन वहात राहतं. माणूस प्रेमाचा भुकेला असतो, असे म्हणतात, हे खरेही आहे. जीवनातून स्नेह बनून वाहणारा प्रेमाचा झरा काढून टाकल्यास मागे काय उरेल, हाही एक प्रश्नच आहे.

‘प्रेम’ शब्दाला शक्यतांच्या कोणत्या मर्यादांमध्ये स्थापित करता येईल, हे त्यावेळची परिस्थिती ठरवीत असते. म्हणूनच ते परिस्थिती सापेक्ष आहे. प्रेम शब्दाचे अर्थ शोधताना त्याचं अमर्याद, अथांग असणं लक्षात घेतलेले असतेच असे नाही. कोणाचे तरी कोणावर असणारे प्रेम, म्हणजे ‘विषयाच्या गुंत्यात गुरफटलेली मने.’ अशीच धारणा बहुदा दिसते. समाजाचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित विचारांनी घडणाऱ्या आकलनाच्या वर्तुळात ठरत असल्यामुळे प्रेमातील तरल भावनेला, नात्यातील ओलाव्याला बाधित करतो. प्रेम म्हणजे विशिष्ट वयातील कोणीतरी तो आणि कोणीतरी ती, असेच गृहीत धरून व्याख्या केली जाते. हा अनुदार विचार प्रेमाकडे बघण्याच्या बंदिस्त चौकटींतून तयार झालेला असतो. कोणातरी दोघांमध्ये असणाऱ्या प्रेमाच्या भावस्पर्शी नात्यातून निर्माण होणारा मनाचा गुंता बहुदा समजून घेण्याचा प्रयत्न झालेला नसतो. प्रेमात असेही काही असू शकते, हे गृहीत धरण्याची समाजाची बऱ्याचदा मानसिक तयारी नसते.

कोणत्यातरी चित्रपटातील नायक-नायिकेच्या प्रेमालापाची पडद्यावरील दृश्ये पाहून आनंद होतो, हे खरंय. पण ते प्रेम काही खरे नसते, याची जाणीव चित्रपट पाहताना मनात कायम असते. तरीही भावनिक पातळीवर आपणास त्याच्याशी जुळवून पाहतो. क्षणभर का असेना, ते आपल्या परिचयाचे आहे असेही वाटते. पण वास्तवात असं काही दिसलं की, आमच्यातील समाजपरायण भाव नको तेव्हा, नको तितके जागे होतात. मॉरल खळबळून उभे राहते. मग सुरु होतं पोलिसिंग. एक सीमित मर्यादेत हे ठीक आहे. प्रेमाच्या वाटेवरून नात्यांचा शोध घेण्यासाठी निघणारे सगळेच अगदी असे-तसेच असतात, अशी समजूत करून घेतो. समजा तसं काही असलं, तरी त्यांना व्यापकपणाच्या परिघात का पाहत नाहीत? नियतीने जोडलेल्या त्यांच्या नात्यातील भावना खऱ्या नाहीतच, असे कशावरून? अर्थात यापाठीमागे बरेवाईट काही अनुभवही असू शकतात. जे असं मत ठाम करायला बाध्य करतात. पण ते मत कायमसाठी असू शकत नाही. कारण, परिस्थिती परिवर्तनीय असते. यातील काही वैयक्तिक भावनेतून एकत्र येतही असतील, म्हणून तो काही सर्वमान्य नियम होत नाही.

प्रेम या शब्दाचं आकाश अफाट, अमर्याद आहे. प्रेम फक्त त्याचं आणि तिचंच नसतं. आणखीही काही असू शकतं. ते कोणावरही करता येते. त्याच्या प्रकटीकरणाचे आविष्कार भिन्न असू शकतात. आपले आपल्या कुटुंबावर प्रेम असते. नात्यांवर आपला जीव जडलेला असतो. आप्तस्वकीयांवर, आईवडिलांवर आपले प्रेम असते. बहीण-भाऊ नात्यातला स्नेह अथांग असतो, गहिरा असतो. मैत्रीच्या नात्यातील स्नेहगंध अमर्याद असू शकतो. कधीकधी दोन अनोळखी व्यक्तींच्या परिचयातून निर्माण होणारा स्नेह नात्यांतील नावांच्या कोणत्याही चौकटीत कोंबता येत नाही. कितीतरी नात्यांना आपल्यात सामावून प्रेमाचा निर्झर वाहत असतो. नात्यातील तरलपण समजण्यासाठी तो भाव अंतर्यामी उदित व्हायला लागतो. आईच्या वात्सल्यातून प्रकटणाऱ्या प्रेमाला कुणाच्या आदेशाची गरज नसते. बहीण-भावातील लटकी भांडणे प्रेमाचा गोडवा व्यक्त करीत असतात. मैत्रीचा गंध लेवून सजलेले प्रेम निरपेक्ष असू शकते. प्रेमाचा परिमल सोबत घेऊन प्रमुदित होणारे मन नव्या परिभाषेचे पाठ लेखांकित करीत असते. त्याला नात्यांचे नाव द्यायची गरजच नसते. मनी उमलणारे सहजभाव प्रेमाचे मळे फुलवीत असतात. स्नेहाचे साकव उभे करीत असतात. नात्यांमधून बहरणारा स्नेह नवा वसंत फुलवत असतो.

देशाच्या मातीवर, भाषेवर, संस्कृतीवर, इतिहासावर आपण प्रेम करतो. माणसाच्या प्रेमाची परिणती त्यागात, समर्पणात असते. देशाला देव समजायला लावणारे प्रेम मनात कोणतेच किंतू उपस्थित होऊ देत नाही. माणसं देशासाठी कोणताही त्याग करायला तयार का होतात? कारण एकच, ‘माझे माझ्या देशावर प्रेम आहे’ ही समर्पणशील, सोज्वळ भावना मनात असते म्हणूनच ना! या भावनेतून माणसं वर्ततात, तेव्हा त्यांच्या प्रेमाचा रंग कोणता? हा प्रश्न मनात येत नाही. जगावं का, या प्रश्नांची उत्तरे ज्याला सापडतात, त्याला जगावं कसं, हे प्रश्न पडत नाहीत. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे, असे म्हणणरे पाडगावकर माणसांकडून कोणत्या प्रेमाची अपेक्षा व्यक्त करतात? जगणं सुंदर करण्यासाठी आपलं मनही सुंदर असणं आवश्यक असते. ज्यांना आसपासच्या लहानातल्या लहान वस्तूवरही प्रेम करता येते. त्यांची मने प्रेमाचे गंधगार स्नेहसोहळे झालेले असतात. जीवनाविषयी असणारी भक्ती, जगण्याची आसक्ती, आपलेपणाचा जिव्हाळा प्रेमाचे झरे निर्माण करीत असतात. आपल्या संतमहात्म्यांनी अवघ्या विश्वावर प्रेम केले. विश्व माझे घर आहे, या प्रेमभावनेने वर्तले. देव त्यांच्या प्रेमाचे निधान असेल, अभिधान असेल; पण माणसांविषयी असणारा आंतरिक कळवळा त्यांच्या प्रेमाचा सर्जन सोहळा झाला.

प्रेमभावनेचा परीसस्पर्श ज्याच्या मनाला झाला, त्याला अवघं विश्व आपलंच वाटतं. सर्वत्र आपल्याच अस्तित्वाच्या खुणा त्याला दिसतात. जगात सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. प्रेमात पडलेल्या माणसांना सगळं जगच ‘आनंदी आनंद गडे...’ असंच वाटत असतं. उमलत्या वयात मनात प्रेमभाव निर्माण होणं स्वाभाविकच. या प्रेमभावामागे विचारांपेक्षा आकर्षणाचा भाग कदाचित अधिक असेलही. अशावेळी कोणीतरी तो आणि ती आपणास ‘मेड फॉर इच अदर’ समजतात. त्याला तिच्याशिवाय, तिला त्याच्याशिवाय आणि दोघांना एकमेकांशिवाय काहीही दिसत नाही. त्यांचं एकमेकांमध्ये गुंतत जाणं म्हणजे प्रेम. अशा निरतिशय प्रेमातून बहरत जाते ते जीवन. पण त्यात वास्तव प्रेमाचा भाग किती आणि आकर्षणाचा किती, हेही जरा समजून घ्यायला नको का? कदाचित आकर्षणच अधिक असण्याची शक्यता असते, असू शकते. प्रेमापेक्षा आकर्षणच अधिक असल्याचे लक्षात येते, तेव्हा उशीर झालेला असतो. हे लक्षात येऊन सावरेपर्यंत बराच मार्ग सोबत चालून झालेला असतो.

तुम्ही करीत आहात, हे प्रेम काही खरे प्रेम नाही. तात्कालिक भावनांचा फुललेला पिसारा आहे, असं समजावून सांगणारे त्यांना प्रेमाचे मारेकरी वाटतात. उमलत्या वयात प्रेमभाव मनात उदित होऊन विचार झापडबंद झालेले असतात. त्यामुळे कुणाचे अनुभवाचे बोल कवडीमोल वाटतात. या वयात प्रेम अनुभवणारे आपण प्रेमात पडलो, असं काहीतरी म्हणतात. पडणे हा अपघातही असू शकतो. पडणे ठरवून घडत नसते. पडताना विचारांना जागाच असते कुठे? अपघातातून सावरावे लागते. ‘लव अॅट फर्स्ट साईट’ पाहताच क्षणी प्रेमात पडणे, ही कल्पना कितीही मोहक वाटत असली, तरी वास्तव वेगळे असते. परस्परांच्या प्रेमात पडण्याला अपघात म्हणा किंवा आणखी काही, क्षणात होणाऱ्या प्रेमात निसर्गाचा सहजभाव किती आणि विचारपूर्वक निर्माण होणारे प्रेम किती? हा प्रश्न उरतोच ना! माणसं मोहाच्या मायावी क्षणांना फसतात. मोहरलेल्या क्षणांचे मनावरील गारुड ओसरते, डोळ्यासमोरील प्रेमाचे दाटलेले धुके विरते, तेव्हा समोरचे सारेकाही सुस्पष्ट दिसायला लागते, जाणवायला लागते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.

प्रेम कोणतीच बंधने वगैरे काही काहीच मानीत नाही, असं म्हणतात. ते खरेही आहे. प्रेम परगण्यात धर्म, जात, पंथ इत्यादी गोष्टी गौण ठरतात. तेथे एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे, तू मला आवडतेस आणि मी तुला. प्रेम करणाऱ्यांना तितके पुरेसे असतेही. प्रेमाला आणखी कसली आलीय परीक्षा. पण दुर्दैवाने अशा परीक्षांना बऱ्याच जणांना सामोरे जावे लागते. सुरवातीच्या गाठीभेटी, अनामिक हुरहूर, आतुरता, कासावीस होणं, हे सारंसारं एका टप्प्यावर मागे पडते. प्रेमाचा फुललेला वसतऋतू कूस बदलतो आणि व्यवहाराचा रुक्ष शिशिर हलक्या पावलांनी दारी येतो. वास्तवाचे विखारी डंख टोचत राहतात. त्यांच्या निरतिशय प्रेमाला बाधित करणारे ‘इगोज्’ यक्षप्रश्न उभे करीत राहतात. त्यांच्याशी धडका देत काही होतात यशस्वी. काहींच्या प्रेमाची सांगता धक्कादायक होणे जणू नियतीची प्राक्तनरेषा ठरते. ओलांडताही येत नाही. तोडताही येत नाही. 

जगाच्या रुक्ष व्यवहारात भावूक प्रेम करपते. प्रश्न अभिमानाची टोकं विखार धारण करतात. कुल, घराणे, जात, धर्माच्या नावाने इभ्रतीच्या भक्कम भिंती उभ्या केल्या जातात. त्यांना उध्वस्त करणं काही सहजसाध्य गोष्ट नसते. समस्यांशी दोन हात करून हवे ते मिळवता येतेही. पण संसाराचा मांडलेला पट कोणत्यातरी कारणाने अनपेक्षित उधळला जातो. प्रेमाचे विणलेले धागे तुटायला लागतात. पीळ सुटायला लागतात. प्रेमात पडताना दोघांचे दोघांच्या दोषांकडे दुर्लक्ष होते किंवा जाणीवपूर्वक केले जाते. व्यवहारात वर्तताना वास्तव अधोरेखित होत जाते. परिस्थितीच्या पेटलेल्या वणव्याची प्रखर दाहकता जाणवायला लागते, तेव्हा जाण आणि भान येते. प्रेमाचा बहरलेला ऋतू संपतो पानगळ सुरु होते. मग सुरु होते दोघांच्या मनातील घालमेल.

प्रेमातील उदात्तभावनेला समजायला विचारांमध्येही उमदेपण असायला हवे. नैतिकतेचे अधिष्ठान असायला हवे. प्रेम करता येणे आणि ते सर्व संकटांशी सामना करून निभावून नेणे; या परस्पर भिन्न बाबी आहेत. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणे, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणे.’ आसपास वणवे लागलेले असताना वास्तवाच्या विखारी विळख्यात जळतानाही टिकून रहायची तयारी ठेवावी लागते. प्रेम कोणालाही, केव्हाही, कसेही करता येईल इतके सहजसाध्य सोपे असते तर... जिवापाड प्रेम कुणी केलेच नसते. पर्यायी विकल्प शोधले गेले असते. प्रेमाच्या मोहरलेल्या क्षणांचे जीवनात महत्त्वच किती उरले असते? प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं, असं सांगता तरी आलं असतं का? टोकदार प्रेम करण्यासाठी मनातील प्रेमभावही धारदार व्हायला लागतात. त्यासाठी प्रेमाचा परिघ समजणे, समजून घेणे आवश्यक असते.

प्रेम विषयात अडते तेव्हा त्यातील भव्यता, उदात्तता संपलेली असते. देहावरील प्रेमाला प्रतीक्षा करायला वेळ नसतो. मनावरील प्रेमाला प्रतीक्षेत आनंद असतो. यासाठी यगानुयुगे थांबण्याची मानसिक तयारी असायला लागते. असे निर्व्याज प्रेम कधी मीरा नाव धारण करून भक्ती बनते. कधी राधा बनून समर्पणाच्या गाथा लेखांकित करते. प्रेमासाठी समर्पित अनेकांनी आपापल्यापुरता इतिहास लेखांकित केला. त्यांच्यापुरते ते शहाजहान आणि मुमताज झाले. त्यांनी स्वप्नांचे आरस्पाणी महाल उभे केले. प्रेमाच्या साम्राज्याचे सम्राट झाले. बाजीराव मस्तानीच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्या रणांगणावरील पराक्रमाला सीमा नव्हती; पण या पराक्रमी योध्याच्या प्रेमाला मर्यादांची कुंपणे का पडली असावीत? प्रेमासमोर सारेकाही तुच्छ असले तरी अशावेळी पराक्रमही द्वंदात सापडून हताश का होत असावा? समर्पित प्रेमाची कासावीस व्यवहारी जगास कळू नये का? की कळूनसुद्धा स्वार्थासाठी निस्सीम प्रेमाला वेदीवर चढायला लागते, माहीत नाही. पण समर्पित प्रेमालाच वारंवार परीक्षेला सामोरे जावे लागते.

प्रेमींचे जग त्यांच्यापुरता परीघ निर्माण करते. वातावरण अनुकूल असेल, तर तो क्वचितप्रसंगी विस्तारतोही. आजूबाजूचा अवकाश आपल्यात सामावून घेतो. प्रेमात स्नेहाचे मळे फुलवण्याची किमया असते. माणसांच्या जगातून प्रेम भावनेला काढून टाकले तर... साहित्य, कला सारंकाही ओस पडेल. कवींच्या कविता शून्य होतील. कथा-कादंबऱ्या निरस होतील. रुक्ष, वैराण, निरस जगणे अभिशाप वाटेल. निर्हेतुक वाटेल. उद्यानातील फुले कोमेजतील, उंचावरून स्वतःला झोकून देत कोसळणारे प्रपात आटतील, कोकिळेचे कूजन बेसूर भासेल, पूर्व क्षितिजावरून सोन्याची पखरण करीत येणारा सूर्य निस्तेज दिसेल, शीतल गारवा देणारा चंद्र दाहक वाटेल, गायींचं वासरांसाठी हंबरणे करुण वाटेल. जात्यावरील ओव्यांतील सौंदर्य हरपेल. जग जागच्या जागी असेल. त्याचं चक्रही सुरळीत चालेलं असेल. क्षणाला लागून क्षण येतील आणि जातील; पण त्यांचा चिरंजीव नाद संपलेला असेल. निसर्गाच्या सुंदर चित्रातले रंग विटतील. आनंदाचे निर्झर आटतील. मातीवर, फुलांवर, फुलपाखरांवर चराचरावर प्रेमाची पाखर घालणारं, त्याला जिवापाड जपणारं, आसमंताला आपल्यात सामावून घेणारं प्रेम माणसांच्या आयुष्यातून संपल्यास जीवनगाणे सूर हरवून बसेल.

Anastha | अनास्था

By // No comments:
गेल्या आठवड्यात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणी नेली. मुलं तशी लहान-लहान होती. त्यांना स्थळांच्या दर्शनापेक्षा आपण सहलीस जातोय याचाच अधिक आनंद. अर्थात ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्यांच्याशीच देणंघेणं. आणखी बाकीचं काय? हा प्रश्न मनात येणंही शक्य नाही. वयानुरूप तसं आवश्यकही नाही किंवा तशी अपेक्षा करणेही संयुक्तिक नाही. पण तरीही ओघओघाने काही गोष्टी घडतात. त्या तशा लहानसहान असतात; पण कधीकधी कळत-नकळत खूप मोठा विचार मांडून जातात. तो ठरवून प्रकटत नसतो. सहजरीत्या समोर येतो. आपण जाणीवपूर्वक थोडं लक्ष केंद्रित की, त्या लहानशा घटनेत खूप मोठा आशय सामावलेला असल्याचे दिसते.

घडलं असं की, सहलीतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवास करून पोहचले वेरूळला. लेण्या पाहत राहिले. चेहऱ्यावर एक भारावलेपण सोबत घेऊन विहरत राहिले. शिल्पाकृती पाहून काहींच्या मुखातून आश्चर्यदग्ध उद्गार उमटले. त्यातील काही मुले लेण्यांच्या अवतीभोवती खेळत राहिले. पळत राहिले. काहींनी भिंतीना, स्तंभांना, मूर्तींना हात लाऊन पाहिले. हळुवार हात फिरवीत आपल्या मनात जागा करून देत साठवत राहिले. काहींनी इतिहासाच्या पुस्तकातील धड्यात दिलेले चित्र याच शिल्पाचे आहे का, म्हणून खातरजमा करून घेतली. काहींनी आपल्याकडील माहितीच्या आधारे आपलं मत मांडून पाहिलं. आणि ते सारं मनात कोंडून पुढच्या प्रवासाने देवगिरी किल्ल्यावर पोहचले. किल्ल्याचे विशाल रूप पाहताना मनाचे आसमंतही व्यापक होत गेलं. किल्ल्याच्या पायऱ्या चढून जाताना आजूबाजूच्या गोष्टी पाहत गेले. निरखीत गेले. सगळे एका वेगळ्या भारावलेल्या भावविश्वात येऊन उभे राहिले.

किल्ला पाहण्यात सारे रमले. मात्र, त्यातील एक मुलगा किल्ल्याचे भग्न अवशेष वेगळ्या विचारातून निरखून बघत होता. किल्ल्याच्या ढासळलेल्या चिऱ्यांकडे आपलंच काहीतरी उध्वस्त झाल्यासारखे पाहत होता. कदाचित किल्ल्याच्या गतकाळाच्या वैभवाला कल्पनेने पाहणं सुरु असावं. त्याशी तुलना करून पाहताना आजची अवस्था पाहून मनातून खंतावत होता. त्याच्याकडे सहजच लक्ष गेलं. बोलायचं म्हणून विचारलं, “कायरे बाळा, सगळी पोरं किल्ला पाहतायेत. तू काय या ढासळलेल्या चिऱ्यांशी संवाद करतोय का?” मुलाने क्षणभर अवकाश घेऊन मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मलाच प्रतिप्रश्न केला. म्हणाला, “सर, या किल्ल्याची अवस्था अशी का झाली असावी, कोणी केले असेल हे?” प्रश्न साधासाच होता; पण मीही विचारात पडलो. या पोराला उत्तर काय सांगावे? मी काय सांगितले म्हणजे याचे समाधान होईल. नीट समजेल. खरंतर माझीच वाचा बंद व्हायची वेळ आली होती. शिक्षकही कधीकधी निरुत्तर होतो. हा अनुभवाला ‘याचि देहा याचि डोळा’ घेत होतो.

किल्ल्याची अशी अवस्था का झाली असावी? त्या मुलाने विचारलेला प्रश्न एकच होता; पण उत्तरे कितीतरी होती. यातील कोणते उत्तर अचूक असेल? मीही विचार करतोय, नेमकी काय कारणं असतील या सगळ्यामागे? ती काहीही असोत; पण माझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात सांगता येईल ‘अनास्था’. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतातच, असे नाही. ती मिळवीत म्हणून शोधण्यासाठी थोडीशी वणवण करावी लागते. त्या प्रश्नाविषयी आस्था असावी लागते. आस्था असेल तर निदान त्या प्रश्नांचा विचार तरी करता येतो. मात्र आपणास काहीच देणंघेणं नाही, जे होईल ते होवो. इतक्या निर्विकारपणे वागलो, तर प्रश्नांचं गांभीर्य संपते. आपल्या वर्तनाचा सार्वजनिक अनास्था एक मोठा दोष आहे. आपल्या सामाजिक जीवनात वास्तव्य करून आहे. हेच काहीही न घडण्यामागचे मुख्य कारण आहे. मला काय त्याचं? या विचाराने आपण बहुदा वर्ततो. अशा वर्तनाचे परिणाम आपल्या सार्वजनिक जीवनातून याप्रकारे दृगोचर होत राहतात. क्षणभर विचार करूया, देवगिरीचा किल्ला माझ्या मालकीचा असता तर..., कैलास मंदिर माझ्या मालकीचे असल्याची सातबाराच्या उताऱ्यात नोंद असती तर..., या वास्तूंना अशी अवकळा आली असती का?

खरंतर ‘आपले’ हा शब्द जेव्हा आपण सर्वांसाठी वापरला जातो, तेव्हा त्याला व्यापकपणाचे अवकाश प्राप्त होते. व्यापकपणाला आपलेपणाच्या अंगणात अधिष्ठित का करीत नाहीत? कदाचित यासाठी अनेक कारणे असतील. सांगता येतीलही. त्यातील कोणत्यातरी एका कारणासाठी निदान काही अंशी आपण जबाबदार असू शकतो. पण हे लक्षात कोण घेतो? आपण काहीही करायचे नाही. कोणीतरी हे करतील, म्हणून वाट पाहत राहणे हेच आपले कर्तव्य असल्यासारखे वागतो. या वास्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी सरळसरळ सरकारवर ढकलायची अन् व्यवस्थेच्या नावाने बोटं मोडायची. याला काय म्हणावं? या वास्तूंना संरक्षित केले असल्याचे फलक पुरातत्व खात्याने वास्तूंच्यासमोर लावलेले असतात. ते वाचूनही आपण निरक्षर असल्यासारखे वागतो. अशावेळी मनातून एक प्रश्न उभा राहतो. आपण शिकलो, पदवी मिळवली. पदवीच्या कागदांना दाखवून नोकरी, उपजीविकेचे साधन किंवा तत्सम काहीतरी मिळविले. आपण शिकल्याचा पुरावा पदवीच्या कागदाने दिला. मात्र, आपण खऱ्याअर्थाने परिपूर्ण शिक्षित झाल्याची हमी आपणास त्यासोबत मिळालीच नाही.

वास्तूंवर काहीतरी लिहून त्यांचं विद्रुपीकरण करणारे बहुसंख्य साक्षरच आहेत. वास्तूंच्या भिंती, बुरुज, शिल्पे, चित्रे काहीही बघा; येथे येऊन कोणीतरी प्रेमवीर आपली नाममुद्रा कोणातरी तिच्या नावासह अंकित करतो. सोबतीने गळ्यात गळे घालून फोटो काढून जातो. यातील काहींना तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. मग हे डेअरिंग वास्तूंवर करून पाहतो. तिच्या पश्चात तिचं नाव येथे कोरून ठेवतो. आपण कोणी ऐतिहासिक व्यक्तित्व असल्याचे स्वतःला समजून घेतो. लोकांना आपल्या अशा वागण्याची जराही खंत वाटत नसावी का? अहोरात्र खपून या वास्तू ज्यांनी उभ्या केल्या, त्यांनी कधी आपली नावं तेथे कोरली नाहीत. त्यांना आपल्या नावापेक्षा वास्तूचं नाव मोठं व्हावं असं वाटत असेल. ते खरेही आहे, कारण या वास्तू निर्मिणाऱ्यानी आपली नावे काही तिथे लिहिलेली दिसत नाहीत. 

वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेमवीरांच्या नावांच्या जोड्या जणूकाही विश्वातील अजरामर व्यक्तित्वे आहेत, या विचारातून वास्तूंवर लेखांकित होतात. गणितातील सूत्रे आधुनिक रूपं धारण करून; कोणीतरी X + कोणीतरी Y = Love असे प्रकटत असतात. वास्तूंवर कोरलेली अशी अलौकिक कारागिरी अनेकदा आपण पाहतो. पण काहीच करू शकत नाहीत, कारण आपली सार्वजनिक अगतिकता. अशावेळी समोर प्रश्न उभा राहतो करावे काय? आपण एकटे काही करू शकत नाहीत. हे थांबवू शकत नाहीत, हेही सत्य आहे. निदान आपल्यापुरते आपण संवेदनशील राहिलो, तर हा प्रश्न सर्वांशाने नाही; आपल्यापुरता तरी सुटेल. अनेकातील एकेक स्वतःपुरते बदलले तरी खूप काही झाले. असं काही लिहिलेलं पाहून मी माझ्या सहकारी शिक्षकांना बऱ्याचदा उपहासाने म्हणतो, प्रश्नपत्रिकेतील जोड्या जुळवा प्रश्नच आपण काढून घ्यायला हवा; म्हणजे जुडलेल्या जोड्यांची उत्तरे वास्तूंच्या भिंतींवरून आपणास पाहायला लागणार नाहीत.

वास्तूंच्या भव्यतेचे गुणगान करायचे. त्यामागील इतिहासाचे पोवाडे गायचे आणि आपल्याच हाताने वास्तूंच्या सौंदर्याला बाधित करायचे. केवढी ही आपल्या वर्तनप्रवाहातील विसंगती. केवढे अंतर आहे आपल्या उक्ती आणि कृतीत. प्रवासात खाण्यासाठी नेलेल्या पदार्थातील उरलेले तेथेच टाकून आपण मोकळे होतो. कॅरीबॅग झेंडे बनून वाऱ्यासोबत आपल्या नावाचे निशाण फडकवत राहतात. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फुटबॉल बनून लाथाडत राहतात. पावलोपावली कचरा लोळण घेत आसपास घुटमळत असतो. पर्यटकांच्या झुंडी हसतखेळत येत-जात असतात. वास्तूचं शापित जगणं असह्य होत राहते. तिचे दुर्दैवाचे दशावतार काही केल्या कमी होत नाहीत. याविषयी काही उत्साही विश्लेषक आपली मते आग्रहाने मांडतात. म्हणतात, या वास्तू परदेशात असत्या तर अशा जतन केल्या गेल्या असत्या. तशा सांभाळल्या गेल्या असत्या. संरक्षित वारसा म्हणून गतकाळाचे वैभव सोबत घेऊन डौलाने उजळीत राहिल्या असत्या. आपल्याकडे अशा गोष्टींविषयी आस्थाच नाही. आपण असेच आहोत वगैरे तत्वज्ञानपर, चिंतनपर बरेच काही काही विवेचन करीत असतात. पण ही माणसं बोलताना एक विसरतात की, कायदे तेथेही आहेत आणि येथेही आहेत. प्रश्न आहे आपल्या सकारात्मक, संवेदनशील मानसिकतेचा. कायद्याने सगळेच प्रश्न सुटत नसतात. कायद्याने शिक्षा जरूर होते; पण माणसाची मानसिकता कायद्याच्या शिक्षेने नाहीतर प्रगमनशील, परिणत विचारांनीच बदलत असते. याकरिता बदलांना स्वीकारून स्वतः बदलणारे आणि बदल घडवणारी माणसं मोठ्या संख्यने समोर येणे आवश्यक आहे. विधायक बदल अंगीकारणारे व्यक्तित्वे जागोजागी उभे राहिल्याशिवाय परिस्थितीत परिवर्तन घडणे अवघड असते.

उदाहरणच सांगायचे झाले तर आपल्या एसटी महामंडळाच्या बसेस आणि खाजगी मालकीच्या बसेसची तुलना करून पाहा. आपल्या रेल्वेचे लावण्य पाहा. सार्वजनिक कचरापेट्या करून टाकल्या आहेत आपण त्यांना. रेल्वेत बसून प्रवास करणारा हा माणूस विमानात बसून प्रवासाला निघतो, तेव्हा त्याच्या वर्तनात असा अनपेक्षित बदल कसा काय होतो? विमानतळावर तो कचरा का टाकत नाही? बसस्थानकात आला की पचापचा का थुंकतो, भिंती रंगवतो. हे घडतं, कारण आपली मानसिकता. खरंतर माणूस बदलण्याआधी त्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्यासाठी सार्वजनिक सुविधा केलेल्या असतात. त्यांची आपण किती काळजी घेतो? पाणपोईवर पाणी पिण्यासाठी ग्लास असतो, तोसुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. दवाखान्यात लिहावे लागते, शांतता राखा. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेलं असतं थुंकू नका. माणसं त्यावरच थुंकतात. रस्त्यावरून रोजच प्रवास करावा लागतो. रस्त्यावर आपण खरंच संपूर्ण सुरक्षित प्रवास करतो का? रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक पाहिली म्हणजे आपण वाहतुकीच्या नियमांचे किती काटेकोर निर्वहन करतो, हे कोणालाही सहज कळेल. त्याकरिता दाखले, उदाहरणे द्यायची आवश्यकता नाही. हा सार्वजनिक गोंधळ पाहिल्यावर आपण भारतीय असल्याचा अभिमान आपणास वाटल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांवर यातायातदर्शक दिवे असतात. लालरंगाचा दिवा समोर दिसत असतो तरीही तो ओलांडून जाणे हाच पुरुषार्थ आहे, असे काहींना वाटत असते. आपण सुपरहिरो असल्याचे फिलिंग होत असते. आपण नियम मोडतो आहोत, याचे कोणालाच सोयरसुतकही नसते. नुसता नियमच मोडत नाहीतर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्याचा जीव अनपेक्षितपणे धोक्यात टाकतो आहोत, हेही भान नसते. कसं बदलावं या परिस्थितीला? अवघड आहे... पण अशक्य नाही. उशिरा का होईना बदल होतील. याकरिता आपणच आपले मार्गदर्शक व्हावे लागेल. आपले सार्वजनिक वर्तनप्रवाह विधायक विचारांच्या दिशेने वळते करावे लागतील.

सहलीतील विद्यार्थ्यांना आम्ही जेवणासाठी बसवलं. साऱ्यांनी जेवणाचे डबे उघडले. जेवणापूर्वी त्यांना सक्त सूचना दिल्या. आपल्याकडील राहिलेले उष्टे पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद जे काही टाकण्यासारखे असेल, ते जेवणानंतर सगळं उचलून कचरापेटीत टाका. काही विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केले. बाकीच्यांनी आम्ही जणू त्या गावाचे नाहीतच, असं समजून राहिलेले पदार्थ, कागद दिले तसेच भिरकावून. ते पाहून मी त्या मुलांना रागावलो. आपापल्या टाकलेल्या वस्तू उचला म्हणून परत-परत सूचना दिल्या. कुणीही फारसे गांभीर्याने घेतलेच नाही. सोबतचे अन्य शिक्षकही रागावले. त्याच त्या सूचना सांगायला लागले; पण परिणाम शून्य. शेवटी स्वतः उठलो. त्यांनी टाकलेले पदार्थ, कागद इत्यादी वस्तू उचलू लागलो. पण पोरांना त्याच्याशी काही देणंघेणंच नव्हतं. छानपैकी माझ्याकडे पाहतायेत. कोणालाही साधी खंतही वाटत नव्हती की, हा कचरा आपणच टाकला आहे. म्हणून तो आपणासच उचलावा लागणार आहे.

अस्ताव्यस्त टाकून दिलेला कचरा मी वेचतो आहे, हे पाहून दोन विद्यार्थी आले माझ्याकडे. माझ्यासोबत तेही लागले कचरा वेचायला. त्यातील एकाने मी गोळा केलेला कचरा एका पिशवीत नीट कोंबला आणि कचरापेटीत नेऊन टाकला. मी अवाक होऊन समोरच्या परिस्थितीकडे पाहत होतो. मनात विचारांचा कालवा सुरु. आम्ही शाळेत मुलांना नेमकं शिकवतो काय? आम्ही कोणती गुणवत्ता घडवतो आहोत? प्रगतिपत्रकातील कागदी गुणवत्ता की, समाजपरायण विचारांविषयी आस्था असणारी गुणवत्ता? कागदी गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे सारेच आहेत. जीवनाची गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे नसावेत का? कोठारी आयोग सांगतो, शाळेच्या भिंतीच्या आत उद्याचं उज्ज्वल भविष्य घडत आहे. हेच ते उज्ज्वल भविष्य का? जे संवेदनशीलता हरवून बसले आहे. संवेदनशीलता फक्त शाळेतच शिकवावी लागते का? घरच्यांची यासंदर्भात काहीच जबाबदारी नाही का? कुटुंबाने, समाजाने दिलेले संस्कार शाळेतील धड्यांमधून मिळणाऱ्या संस्कारांपेक्षा मोठे असतात. हे आपण विसरत आहोत का? दोनशे विद्यार्थ्यांमधून केवळ दोघांनीच पुढे यावं. बाकीच्यांनी आजूबाजूला कचरा टाकून पाहत राहावे. यांचे हे संस्कार वर्तनाच्या कोणत्या प्रगतिपत्रकात बसवावेत?

माझ्या सोबतच्या काही शिक्षकांनी हे सगळं पाहिलं. त्यांना मी म्हणलो, “सर, हीच आपली यशस्वी शिक्षणप्रणाली बरं का! जी माणसाला श्रम करायला लाजवते.” त्यांच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर एवढं काही वाईट वाटून घेऊ नका हो! शेवटी आपण भारतीय आहोत.” त्यांच्या बोलण्यातील उपहास थोडावेळ बाजूला ठेवला, तरी एक सत्य शिल्लक राहतेच. आपण आपल्या घरी कसे वागतो. घराचा परिसर नीटनेटका राहावा म्हणून सगळंकाही करतो. पण सार्वजनिक ठिकाणी गेलो की, आपण असे का वागतो? याला संस्कारांचा भाग म्हटला तरी हा प्रश्न एवढं म्हणून सुटत नाही, कारण संस्कार सर्वत्र असतात. महत्वाचे आहे, ते कुठे आणि कसे होतात. संस्कारांची अक्षरे मनावर कशी गिरवली जातात. आपण उज्ज्वल वारशाच्या वार्ता करीत असतो. तो तसा आहेही; पण विद्यमान वर्तनाला, परिस्थितीला नाव कोणतं द्यावं? असे पढतपंडित शाळांमधून घडणार असतील, तर इतिहासकालीन वास्तूचं एकवेळ राहू द्या; पण देश नावाच्या वास्तूचं काय? अशा वर्तनाने वर्तणारे ती भक्कम कशी करू शकतील? या वास्तूला संरक्षित करण्यासाठी त्याग, समर्पण भावनेतून निर्मित संस्कार मनावर कोरावे लागतात. असे कोरीव संस्कार आचरणातून आणावे लागतात. सार्वत्रिक पातळीवर घडवावे लागतात. याकरिता प्रगल्भ विचार करणारी माणूस नावाची शिल्पे घडवावी लागतील. ती घडविणारे शेकडो हात परत एकदा वर्षानुवर्षे काम करीत ठेवावे लागतील.  

Shala, Shikshak ani Shikshan | शाळा, शिक्षक आणि शिक्षण

By // No comments:
‘शाळा’ असा एक शब्द जो बहुतेकांच्या जीवनाशी कोणत्यातरी निमित्ताने जुळलेला असतो. शिकणारा असेल तर शाळेशी त्याच्या शैक्षणिक जगण्याचा थेट सबंध असतो. नसेल शिकलेला, तर मनात आपण शिकलो नाहीत याची खंत असते. निमित्त काहीही असो, माणसाच्या सुजाण होण्याच्या वाटा शाळेशी जुळलेल्या असतात. शाळा शब्दासोबत केवळ अभ्यास, परीक्षा, पुस्तके, शिक्षक आणि शिकणे एवढंच चित्र नजरेत उभं राहत नाही. एक विशिष्ट प्रतिमा शाळा नाव धारण करून मनाच्या कॅनव्हॉसवर प्रकटते. इमारत, क्रीडांगण, भौतिकसुविधांसोबत शाळेचा आसमंत चैतन्याचा गंधाने भरलेला असतो. मुलांच्या रूपाने चैतन्याचे प्रवाह प्रवाहित होत राहतात. या उत्साहाला आपल्यात सामाऊन घेणारा परिसर जगण्याचं समृद्धपण सोबत घेऊन उभा राहतो. शाळा आणि शिक्षक हे परस्परांना पूरक शब्द. यांच्या साहचर्यातून जगण्याचं आभाळ समृद्ध करणारी व्यवस्था उभी राहते. शाळा शब्दांमध्ये जगणं आकाराला आणण्याचं सामर्थ्य एकवटलेलं आहे. व्यक्तित्व घडविण्यासाठी माणूस जे काही करीत आला, त्यातील जीवनाच्या जडणघडणीची एक वाट शाळेकडे जाते. सक्षम व्यक्तित्वे घडविण्यासाठी शाळा नावाचे स्त्रोत माणसांनी निर्माण केले. त्यास नवे आयाम दिले. सद्विचारांचे मळे येथे फुलत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त होत राहिली. काळाचे अनेक आघात झेलत ही व्यवस्था वाढत राहिली. माणसाचं अस्तित्व तिच्यात सामावलं गेलं. शिकण्यासोबत शाळेतून उमलणं, फुलणं, बहरणंही घडत राहावं म्हणून प्रयत्न होत राहिले.

माणसाला जाणीवपूर्वक घडावे लागते. जीवनप्रवाहाला विधायक दिशेने नेण्यासाठी मार्ग आखावे लागतात. त्याच्या जडणघडणीचे नीतिसंमत प्रवाह निर्माण करावे लागतात. प्रवाहांचं उगमस्थान शाळेतून शोधले गेले. माणसांना शिकविण्याचं शाळा एक साधन आहे, भलेही ते एकमेव नसेल. विश्वाच्या अफाट, अमर्याद नभांगणाखाली माणूस स्वतःही शिकू शकतो, ती स्वयंसाधना असते. पण जीवनाचं समृद्ध आभाळ पेलण्यासाठी माणसाचं मनही आभाळाएवढं करणारे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात. म्हणूनच शाळा विचारांनी समृद्ध करणारी संस्कारकेंद्रे ठरतात. समाजाला परिवर्तनाच्या वाटेने नेण्यासाठी प्रेरित करणारी व्यवस्था म्हणून शाळेकडे पाहिलं जातं. नुसते पाहून अंतर्यामी परिवर्तनाची प्रेरणा रुजत नसते. बीज रुजण्यासाठी भूमीची मशागत करावी लागते. मगचच रोपटी तरारून वर येतात. त्यांचं यथासांग जतनसंवर्धन करावं लागतं. माणसाव्यतिरिक्त अन्य जिवांना औपचारिक शिक्षण देण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात; पण माणसांना मनालाही घडवावं लागतं. म्हणून जडणघडणीच्या वाटा शाळा नावाच्या संस्कारकेंद्राकडे जाणीवपूर्वक वळत्या कराव्या लागतात. म्हणूनच शिकण्याइतकं माणसाला काहीही प्रिय नसावं. त्याच्या मनी वसणाऱ्या कुतूहल, जिज्ञासापूर्तीसाठी निश्चित दिशा असावी लागते. ती दिशा शिक्षणातून, शाळेतून माणसाला गवसते.

शाळा काही माणसाला नवी नाही. प्राचीनकाळापासून ती माणसासोबत आहे. गुरुकुलापासून ग्लोबलस्कूलपर्यंत वेगवेगळ्या काळी वेगवेगळी नावं धारण करून माणसांना सोबत करीत आहे. या शेकडो वर्षाच्या प्रवासात शाळा उभी करताना नेमके काय मिळविले, काय मिळवायचे राहिले याचे हिशोब जुळवायचे आहेत. आमच्यावेळी शाळा अशा नव्हत्या, अशा असायच्या, असे अनेक अभिप्राय शाळेविषयी ऐकत असतो. शाळा आज नवे साज लेऊन उभ्या आहेत. पण या देखणेपणातून आत्मा हरवत चाललाय अशी शंका मनात निर्माण होण्याइतकी परिस्थिती पालटली आहे. शाळा, शिक्षक आणि शिक्षण यांच्याविषयी समाजातून विशिष्टप्रसंगी नकारात्मक प्रतिक्रिया उमटतात, तेव्हा प्रकर्षाने अधोरेखित होते की, शिक्षणातून काहीतरी हरवत चाललं आहे. शिक्षणातून काहीतरी मिळवायचे राहिल्याची खंत समाजाच्या विचारात असणे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश आहे. शिक्षणाचं अभियान उभं करून शिक्षणाला सार्वत्रिक करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरु आहे. शिक्षणाची गंगोत्री खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर पोहचवण्याचा प्रयत्न होतोय; पण तिचं तीर्थरूप जल तेथल्या भूमीत झिरपत आहे का? त्याच्या प्राशनाने ज्ञानासक्त मने घडत आहेत का? असे काही प्रश्न अद्यापही सोबतीला आहेत.

युनोस्कोच्या एका अहवालात शाळाबाह्य मुलांच्या संख्येत भारताचा जगात चौथा क्रमांक असल्याचे काही दिवसापूर्वी वाचनात आले. एवढ्या संख्येने मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहत असतील किंवा परिस्थितीमुळे फेकली जात असतील, तर समाजव्यवस्थेत संपन्न विचारांचे मळे बहरतील कसे? व्यवस्थेचे संतुलन घडेल कसे? सर्वशिक्षा अभियान आणून प्रत्येक घरापर्यंत शिक्षणाच्या गंगेचा प्रवाह पोहचविण्याचा प्रयत्न होऊनही त्यात भिजण्याऐवजी कोरडाठाक राहण्यात कोणतं शहाणपण सामावलं आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्रात एखादी योजना कार्यान्वित करताना असंख्य प्रश्न, अनंत अडचणी उभ्या राहतात. भारत संघराज्य म्हणून एक असला, तरी येथे समाजव्यवस्थेत अनेक सामाजिक, आर्थिक, वर्गीय, जातीय पदर आहेत. अनेक धाग्यांचा विणलेला गोफ भारत असेलही; पण या सुट्यासुट्या धाग्यांचे अनेक पीळ असतात. त्यांच्या स्वतंत्र अस्मिता असतात. कधी टोकदार प्रश्न असतात. मतमतांतराच्या ठिणग्या असतात. अशावेळी त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात बरीच ऊर्जा खर्ची पडते. नको त्यागोष्टींकडे लक्ष वळवावे लागते. विकासाचे पथ चालताना दुसऱ्याच वाटांची सोबत घडते.

शिक्षणाचे महत्त्व विद्यमानकाळी समाजाला बऱ्यापैकी समजले असले, तरी शिक्षणाविषयी असणारी अक्षम्य उदासिनताही दुर्लक्षित करण्याजोगी नाही. जगण्याचे प्रश्नच एवढे कठीण आहेत की, त्यांच्याशी भिडताना अनेक आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. घरातले सगळे हात राबल्याशिवाय हातातोंडाची गाठ पडणे शक्य होत नाही, तेथे शिक्षणाचं रोपटं जगेलच कसं? जगण्याचे प्रश्न मोठे होत असतांना अन्य प्रश्न दुय्यम होत जातात. पंधरावीस वर्षापूर्वीचा भारत आणि आजच्या भारताच्या स्थितीत प्रचंड स्थित्यंतर झाले आहे. जीवनात संपन्नता आलेली आहे. तरीही जगण्याच्या प्रश्नांना रोज सामोरे जाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. रोजच समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर माणसं कोणत्या गोष्टींना प्राथमिकता देतील? भाकरीच्या प्रश्नासमोर सगळेच प्रश्न लहान वाटायला लागतात.

शाळा आणि शिक्षणात आतापर्यंत अनेक बदल घडून आलेत. बदलांना कार्यान्वित करताना शाळा प्रयोगशाळा झाल्या. अपेक्षित निष्कर्ष हाती येण्यासाठी प्रयोग करावे लागतात हे मान्य; पण प्रयोगाचे परिणामही तपासून पाहावे लागतात. त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. तरीही एक सत्य नाकारून चालणार नाही, ते म्हणजे याच शाळांनी देशाच्या पिढ्या घडविल्या. भले येथे सुविधांची वानवा असेल. शिकण्या, शिकवण्याविषयी आस्था असायची. येथे वावरणारे मास्तर नावाचं विद्यापीठ संस्कारपीठ वाटायचं. हातांवर छम छम बसणाऱ्या छडीमुळेच विद्या घम घम येते, असं समजलं जात असे. गुरुजी साधेच होते. त्यांच्या साधेपणातून प्रकटलेले विचार जीवनसौंदर्य बनून मनःपटलावर अंकित होत राहायचे. असे ‘डिव्होटेड’ गुरुजी तेव्हा जागोजागी भेटत असल्याचे जुनी पिढी सांगते. विद्यमानकाळीही असे अनेक अध्यापक आहेत. अपवाद वगळल्यास अध्यापनाचे व्रत अंगिकारून प्रामाणिकपणे जगणारे खूप आहेत. मागच्या पिढ्यांचा गुरुशिष्य नात्यातील इमोशनल टच आजच्या गुरुशिष्य नात्याला नाही.  या नात्यातील ओलावा हरवत चालला आहे. माणसं कालोपघात एकेकटी होत चालली आहेत. समूहापासून सुटी होत आहेत. अशा जगण्यालाच सन्मान समजायला लागली आहेत.

आम्हा काही शिक्षकांमध्ये बोलणं सुरु होतं. विषय शाळा, शिक्षण आणि शिक्षकांकडे वळला. मनातील खंत व्यक्त करीत एक शिक्षक म्हणाले, “आपल्या शाळांची अवस्था पाहून वाटते, अजूनही आम्ही अंधारयुगात वावरतो आहोत. अशा शाळांना शाळा का म्हणावे, असा प्रश्न पडतो? यांना शाळा म्हणण्याऐवजी खरेतर कोंडवाडे म्हणणे अधिक योग्य वाटते.” तोच धागा पकडत दुसऱ्या शिक्षक म्हणाले, “सर, काही शाळा अशा असतीलही. शिकणाऱ्या मुलांचं भविष्य ज्यांच्या हाती आहे ते शाळेत कमी आणि अन्य ठिकाणीच जास्त रमलेले असतील, तेथे आणखी काय होणार आहे? ही माणसं कधी राजकारणाच्या फडात रंगतात. कधी अर्थकारणात रमतात. कधी कृषिकारणाला हातभार लावताना राबतात. पण शाळेतील अध्यापनाच्या प्रांगणात किती वेळ संचार करतात. असं वागताना यांच्या मनात काहीच वेदना होत नसतील का? इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवून समर्थ बनवणारी, ही माणसं स्वतःच नैतिकतेचे पाठ विसरले असतील का?”

आपलं मत कळकळीने व्यक्त करणाऱ्या या शिक्षकाची खंत खरी असेलही. पण सगळेच शिक्षक, शाळा अशा असतात असे नाही. काही अपवाद असतात. अशा चारदोन शाळा, शिक्षक असतीलही. ते असणे म्हणजे सगळी शिक्षण व्यवस्था कुजली आहे. सगळा प्रवासच अंधारयात्रा झाला आहे, असे नाही. पलीकडे उजेडाचेही एक जग उभं आहे. तेथे सदसदविवेकाच्या मिणमिणत्या का असेनात, पणत्या पेटल्या आहेत. काही पावलं धडपडत का होईनात, पण जीवनाचा शोध घेत प्रकाशाच्या दिशेने निघाली आहेत. कदाचित काहींना योग्य वाट न सापडल्याने चुकून काही पावलं आडवाटेने निघत असतीलही. पण ती वाट काही सगळेच चालत नाहीत. 

हे सगळं खरं असलं तरी कधीकधी निराशेचे मळभ काही काळासाठी विचारांच्या आभाळात दाटून यावेत असंही घडतंय. गेल्या पंधरावीस वर्षात शिक्षणातून विधायक विचारांना रुजवण्याचे प्रयत्न झालेत. आपण बरेच पुढे सरकलो असलो तरी मंझील अभी बहोत दूर है, अशीच परिस्थिती दिसते आहे. समाजव्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्या वर्गातील मुलामुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण, विशिष्ट चौकटींमध्ये बंदिस्त झालेले शाळा, शिक्षक आणि शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवताना कौशल्यसंपादनातील समस्या; असे अनेक लहानमोठे प्रश्न आहेत, अडचणी आहेत. सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले कोणत्या वर्गाची आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते खाजगी शाळांमध्ये विसावतात. ज्यांच्याकडे नाहीच काही, ते येतात सरकारी शाळांच्या आश्रयाला. या शाळांचा दर्जा उंचावणार नसेल, तर सामान्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवावे कसे अन् शिकावे कसे?

शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचे आव्हान समोर उभे आहे. देशाचा उच्चशिक्षणाचा आलेख अद्यापही अठरा-एकोणावीस टक्क्यांवर रेंगाळतो आहे. उच्चशिक्षणाचा सोपान चढणे सामान्यांना दमछाक करणारे ठरतेय. तेथे पोहचले त्यांचे ठीक आहे असे समजलो, तरी राहिलेल्या बाकीच्यांचे काय? हा प्रश्न उरतोच. परीक्षांच्या निकालानंतर गुणवंतांच्या गुणवत्तेला गौरवान्वित करणारे गौरवसोहळे पार पडतात. पण संधी मिळाली नाही म्हणून मागे पडलेल्या गुणवंतांचे काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपल्याला सापडत नाहीये. ‘माणसाला जगण्यासाठी सक्षम बनविते ते शिक्षण’, असे म्हणतात. शिक्षणातून या कसोटीस पात्र ठरणारी गुणवंतांची मांदियाळी अजूनही उभी राहत नसेल तर दोष नेमका कुणाचा? शिक्षकांचा, शिक्षणव्यवस्थेचा की धोरणांचा? कुठलीही गोष्ट फारशी गांभीर्याने न घेण्याची आपली मानसिकता आणि सामाजिक, राजकीय अनास्था शैक्षणिक विकासास मारक ठरते. पदव्यांचा टिळा ललाटी लावून हजारो सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधार्थ अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण सोबत घेऊन हिंडत आहेत. पदवी मिळवणाऱ्या शंभरातील वीस-पंचवीस जणच आवश्यक कौशल्य संपादन करून रोजगारास पात्र असल्याचे सांगतात, याचाच अर्थ पंचाहत्तर टक्के अपात्र ठरतात. म्हणजे यांना घडविणाऱ्या शाळाही इतकेच टक्के अपात्र आहेत का?

शाळांच्या परीक्षेच्या निकालांचा उंचावलेला आलेख म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता नाही. शाळेचा शंभर टक्के निकाल म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण असा अर्थ होत नाही. गुणवत्ता संपादण्याचे शिक्षण एक साधन आहे, ते साध्य नाही. आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून दोन्ही हातांचा वापर होतो का? असा प्रश्न महात्मा गांधींनी शिक्षणव्यवस्थेविषयी कधीकाळी विचारला होता. समस्यांशी संघर्ष करून स्वतःला आणि सोबतच समाजाला आकार देणारे सक्षम हात आमचं शिक्षण घडवीत आहे का? सांगणे अवघड आहे. समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. सक्षम हातांसोबत प्रगल्भ मनेही शिक्षणातून, शाळेतून घडत राहण्यात शिक्षणाचे यश असते. समृद्ध मने घडविणारा शिक्षक कुशल शिल्पकार असतो. सुंदर शिल्पे घडविण्याचे उत्तरदायित्व त्यालाच पार पडायचं आहे. भलेही प्रवासात अनंत अडचणी, असंख्य प्रश्न उभे राहतील. एखादी कलाकृती  तयार करण्यासाठी अवधी लागतो. झाड लावल्यानंतर लागलीच फलप्राप्ती होत नाही. मधुर फळांसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्याआधी रोपट्याची काळजी घेऊन त्याचं अवकाश मिळवून द्यावं लागतं. आपला अवकाश घेऊन उभी राहणारी झाडं निकोप फळे देतात. झाडांच्या निकोप वाढीत माळ्याची मशागत उभी असते. शिक्षकही कुशल माळी असतो. झाड जोमाने वाढावे म्हणून माळी तण काढून त्याला सुरक्षित करतो. आम्हा शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या मनातील विकल्पाचं तण वेळीच उपटून काढायला लागेल. तेव्हाच आम्ही लावलेली रोपटी शाळा नावाच्या उद्यानातून जोमाने वाढतील, वाढताना बहरतील, नाही का?

Shikshak Din | शिक्षक दिन

By // 5 comments:
पाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार पडतील. शिक्षकांचे समाजव्यवस्थेतील स्थान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील योगदान अधोरेखित केले जाईल. संस्कारांचे संवर्धन करणारा, मूल्यव्यवस्था टिकवून ठेवणारा जबाबदार घटक म्हणून तो प्रशंशेस पात्र असल्याचे सांगितले जाईल. त्याच्या कार्याचे कौतुक करताना अध्यापकीय पेशाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचीही आवर्जून आठवण करून दिली जाईल. शिक्षकी पेशात लक्षणीय कार्य करणाऱ्या आचार्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्शाच्यारूपाने सन्मानित करण्यात येईल. अशा आदर्श अध्यापकांनी उभी केलेली यशाची शिखरे संपादित करण्याची उर्मी अन्यांच्या अंतर्यामी उदित व्हावी म्हणून लहानमोठ्या समारोहातून प्रेरणेच्या ज्योती प्रज्वलित केल्या जातील. आहेत त्याहून मोठ्या यशाची शिखरं उभी रहावीत म्हणून प्रयत्न करू पाहणाऱ्या संवेदनशील मनांना प्रेरित केले जाईल. त्यांच्या हाती प्रेरणेचे पाथेय देऊन मार्गस्थ केले जाईल. काहींच्या वाणीतून गुरु-शिष्य नात्यातील गोडवा गौरवगाथा बनून प्रकटेल. जीवनाला आकार देणाऱ्या अध्यापकांच्या अंतर्यामी जतन करून ठेवलेल्या स्नेहमयी स्मृती काहींच्या लेखणीतून लेखांकित होतील. सगळा दिवस शिक्षक नावाच्या संस्कारकेंद्रांना सन्मानित, गौरवान्वित करण्यात संपेल. कृतज्ञतेचा भाव अंतर्यामी साठवत सूर्य निरोप घेऊन मावळेल. रात्र धरतीवर अवतीर्ण होईल.

क्षितिजाच्या वर्तुळाला पार करीत येणारा दिवस नवी आव्हाने घेऊन उदयाचली येईल. त्याच्या पसरलेल्या प्रकाशाच्या परिघात आपल्या व्यवस्थेचे वास्तव पुन्हा समोर येईल. माणसं ते सरावाने स्वीकारायला शिकल्यामुळे त्याकडे कदाचित फारसे लक्ष दिले जाणार नाही. शिक्षणाला परिवर्तनाचे साधन वगैरे म्हणतात. परिवर्तनाची आयुधे हाती घेऊन साध्याच्या परगण्यात पोहोचण्यासाठी प्रयोग होत राहतील. शिक्षणातून जे साध्य करायचे आहे, त्यापर्यंत आपली शिक्षणव्यवस्था पोहचली आहे का? या प्रश्नांचे उत्तर कदाचित पुन्हा जुनेच पाढे म्हणताना दिसेल. शिक्षणातून परिवर्तन घडणे अपेक्षित असेल, तर शिक्षक त्या परिवर्तनाचा भाष्यकार असावा हेसुद्धा ओघानेच आले. अर्थात परिवर्तनप्रिय विचार प्रबळ आसक्ती बनून अंतकरणात रुजल्याशिवाय बदल घडणं अवघड असतं. परिवर्तनशील समाजच प्रगतीचे नवे आयाम निर्माण करू शकतो. समाजाच्या वृत्तीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षणातही परिवर्तन घडणे म्हणूनच अपेक्षित असते. माणसाचा इहलोकीचा प्रवास ईप्सितप्राप्तीसाठी असल्यास त्याच्या हाती व्यवस्थापरिवर्तनाची साधनं असणं आवश्यक असते. शिक्षण हे परिवर्तनाचे असेच एक अमोघ साधन आहे. माणसाच्या वैचारिक वाटचालीतील संचित आहे.

औपचारिक शिक्षणाच्या परिघात आत्मशोध घेत नावीन्याच्या शोधासाठी निघालेल्या वाटेवर अध्ययनार्थी, अध्यापक आणि अध्यापनात परस्पर संवादाचे सेतू बांधल्याशिवाय व्यवस्थेत अपेक्षित परिवर्तन घडत नसते, हेही वास्तवच. शाळा केवळ सिमेंट, विटा, माती वापरून उभ्या केलेल्या निर्जीव इमारती नसतात. त्यांच्यातून चैतन्याचे झरे विद्यार्थ्यांच्या रूपाने अखंड प्रवाहित होत असतात. हे सळसळते चैतन्य घडविण्याची नैतिक जबाबदारी पालक आणि समाजासोबत शिक्षकाचीही आहे, हे वास्तव कोणीही शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नाकारू शकत नाही. शिक्षक म्हणून या चैतन्यदायी प्रांगणात पहिले पाऊल ठेवताना अध्यापकाच्या अंतर्यामी विद्यार्थी घडविण्याची आंतरिक उर्मी असल्याशिवाय तो अपेक्षित परिवर्तन घडवू शकणार नाही. निराकाराला आकार देऊनच साकारता येते. संस्कारांचे संचित दिमतीला घेऊन आकाराला आलेली व्यक्तित्वेच देशाची प्राक्तनरेखा स्वकर्तृत्वाने लेखांकित करीत असतात. विकसनशील, विकसित किंवा महासत्ता म्हणून एखाद्या देशाला माणसंच घडवीत असतात. शिक्षणातून विधायक विचारांचे पाथेय घेऊन घडलेली माणसं देश नावाची अस्मिता आकारास आणत असतात. अशी कुशल माणसं घडविण्याचं काम शाळा आणि शिक्षक करीत असतात.

समाजात रुजणाऱ्या विधायक विचारांच्या निर्मितीचं आणि माणसाच्या जडण-घडणीचं श्रेय शिक्षणाला द्यायचं असलं, तर स्वातंत्र्य संपादनानंतरच्या सत्तर वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेत काय घडलं, काय बिघडलं अन् काय निसटलं, याचं परिशीलन होणं प्रगतीच्या वाटेवरचा प्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक ठरते. आपली शिक्षणव्यवस्था प्रयोगशाळा झाल्याचा सूर आजही आपल्या आसपास उमटताना दिसतो. संस्कारसाधनेसाठी शिक्षण नावाचं नंदनवन प्रयत्नपूर्वक उभारावं लागतं. शासन, समाज, शिक्षक आणि शाळा ते घडवत असतात. शाळेतून केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता जीवनशिक्षण मिळावे, अशी अपेक्षा समाजाकडून व्यक्त होत असेल, तर त्यात अवास्तव असे काही नाही. शाळा केवळ परीक्षा घेऊन उत्तीर्ण-अनुतीर्णतेचे ठसे कपाळी अंकित करणारे उद्योगकेंद्रे नसतात. येथे येणारी मुले उत्तीर्ण होण्यासाठीच येत असली अन् उत्तीर्णतेचा मळवट कपाळी असल्याशिवाय चालणार नसले, तरी पुस्तकी ज्ञानातून प्राप्त पदवी म्हणजे सर्वकाही असते, असेही नाही. संपादित केलेली पदवी दिलेल्या परीक्षा, सोडवलेल्या उत्तरपत्रिका, व्यवस्थेने निर्धारित करून दिलेला अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याचं प्रमाण असतो. पण जीवनातील सुख-दुःख, समस्या, संकटे यात उत्तीर्ण होण्याएवढं प्रगल्भ मन क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे मिळणाऱ्या अनुभवातून घडवावं लागतं. ते संवेदनशील संस्कारांतून घडत असतं.

शिक्षक म्हणून आपण या क्षेत्रात प्रवेशित होताना व्यवस्थेच्या परिघाभोवती असणारी संवेदनशीलता सोबत घेऊन आल्याशिवाय शिक्षकीपेशाचे मोल समजणे अवघड आहे. उत्क्रांत मने घडवण्याच्या जबाबदारीचं निर्वहन शिक्षकांना करायचं असल्याने, आधी त्याचं मन उत्क्रांत होणं आवश्यक आहे. आपल्या अंतर्यामी अधिवास करून असणारा आनंद आपण इतरांना तेव्हाच देऊ शकतो, जेव्हा आपल्या मनोविश्वात प्रसन्नतेचे निर्झर अनवरत प्रवाहित असतील. शिक्षकाची ओळख त्याचं निरामय चारित्र्य असतं, तसंच त्याचं परिणामकारक अध्यापनही. त्याच्या अध्यापनातून आसपासच्या आसमंतात आनंदलहर निर्माण होणं आवश्यक आहे. असा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षकाला निर्माण करता यावा. एखादा घटक शिकविताना आधी आपणच तो धडा, ती कविता होणं आवश्यक नाही का? मुलं संस्कारांनी घडविण्याचं समाधान तेव्हाच मिळू शकते, जेव्हा एखादा धडा, कविता आणि त्यातून प्रतीत होणारा अनुभव विद्यार्थ्यांच्या हृदयात जावून विसावतो. त्याचं मन हेच अनुभवांचं सदन होतं. सुंदर शिल्प साकारण्यासाठी कुशल कलाकाराच्या सर्जनशील हाताचा स्पर्श दगडाला घडावा लागतो. संवेदनशील शिल्पकाराला ओबडधोबड दगडातील सौंदर्य तेवढे दिसते. त्यातला अनावश्यक भाग काढून तो ते साकारतो. मुलांच्या अध्ययन प्रवासातील विकल्पांचे अनावश्यक ओझे शिक्षकाला वेळीच काढता आले की, त्यांचं जीवन सौंदर्याची साधना होते. अर्थात, यासाठी शिक्षक म्हणून त्याला लाभलेल्या हाताचा परीसस्पर्श वेळीच घडायला हवा. शिक्षक एक संवेदनशील कलाकार असतो. त्याचं अध्यापन समर्पणशील कलावंताची साधना असते. गायकाला रियाज करून सुरांना धार लावावी लागते. तलवारीला पाणी असल्याशिवाय मोल नसतं. म्यान रत्नजडीत अन् तलवार गंजलेली असेल, तर तिचं मोल शून्य असतं.

परंपरांच्या चौकटी मोडीत काढून परिघाबाहेर पाऊल ठेवल्याशिवाय वेगळे साहस सहसा घडत नाही. मनात ध्येयवेडी स्वप्ने उदित झाल्याशिवाय आकांक्षांची क्षितिजे खुणावत नाहीत आणि नवे परगणेही हाती लागत नाहीत. ज्याला परंपरांचा पायबंद पडला, त्याला नवे रस्ते कसे निर्माण करता येतील? परंपरांच्या चौकटी मोडण्याचा, ओलांडण्याचा प्रयत्न करताना अडचणींचे अनेक अडथळे अनाहूतपणे उभे राहतात. ते असणारच आहेत. पलायनवाद स्वीकारणाऱ्यांच्या जीवनग्रंथात नवे अध्याय कधी लेखांकित होत नसतात. कधी परिस्थिती अनुकूल नसते, तर कधी माणसे प्रतिकूल ठरतात. रस्त्यात अनंत अडचणींचे डोंगर उभे राहतात. कधी शासनाचे, कधी व्यवस्थापनाचे प्रश्न व्यवधाने बनून अनपेक्षितपणे वाटेवर भेटतात. कधी नियम आडवे येतात. कधी कायदे वाकुल्या दाखवितात. एवढं सगळं पार करून पुढे गेलात की, ज्यांच्यासाठी हे सगळं सव्यापसव्य करतो आहोत; तेच पालथे घडे बनतात. अशावेळी करावं काय? म्हणून प्रश्न समोर उभा राहतो. प्रश्नांची उत्तरे शोधूनही हाती लागत नाहीत. प्रश्नांचा गुंता आपला अर्जून करतो. अडचणी अनंत असतात. त्यांना अंत नाही. समस्या कुठे नसतात? सगळीकडेच त्या आहेत. परिस्थिती कोणत्याही बाजूने अनुकूल नसतांना समोर आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्नांनी निर्माण केलेल्या मार्गांवरून निघालेली ध्येयवेडी पाऊले पाहून नियतीही विस्मयचकित होते. अन् ध्येयप्रेरित जगणाऱ्यांचे वेगळेपण कालपटावर अधोरेखित करीत जाते.

शिकण्याचं, शिकविण्याचं व्यवस्थेतील हरवलेपण समोर येते, तेव्हा परिस्थितीची उदासीनता ठळकपणे अधोरेखित होते. आसपास दिसणारे उसवलेपण पाहून आपणास काही करता येणार नाही, असे वाटायला लागते. उदासिनतेचे मळभ मनाच्या आसमंतात दाटून येते. परिस्थितीच्या अंधारात आपण हरवतो. पायाखालच्या वाटा बेईमान होतात. अशा समयी अपेक्षित उत्तरांच्या शोधासाठी केलेली संयत प्रतीक्षा भोवताली दाटून आलेल्या अंधाराचे सावट दूर करते. काळ परिवर्तनशील असतो. तो सतत बदलत असतो. आताही तो बदलाच्या वाटेने नव्या क्षितिजांच्या शोधासाठी निघाला आहे. कालचक्राच्या वेगाशी सुसंगत वर्ततात, तेच संघर्षात टिकतात. शिक्षकालाही कालानुरूप बदलणं अनिवार्य आहे. विज्ञाननिर्मित सुखांनी वेढलेले जग नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून प्रगतीच्या दिशेने प्रचंड वेगाने झेपावत आहे. शिक्षकालाही आपली झेप बदलावी लागेल. ती आणखी पल्लेदार करावी लागेल, तेव्हाच तो मुलांपर्यंत पोहचेल. तो निद्राधीन असेल, तर व्यवस्थेत त्याला आपले अवकाश कसे निर्माण करता येईल? त्याला त्याचा व्यावसायिक सन्मान मिळेलच कसा? परंपरेच्या चौकटीत फारफारतर धडे, कविता, गणिते, सूत्रे, व्याख्या शिकवून शिक्षक होता येईलही; पण विद्यार्थिप्रिय अध्यापक नाही होता येणार. शिक्षक म्हणून मिळणारा आदर चौकटींच्यापलीकडे जाऊन काहीतरी नवीन केल्याशिवाय मिळत नसतो. भोवताल बंदिस्त करणाऱ्या चौकटींचे सीमोल्लंघन केल्याशिवाय आकांक्षांचे नवे आकाश हाती लागत नसते.

शिक्षक नावाच्या शिखराला आदर तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या शिखराची उंची लोकांच्या मनातील उंचीपेक्षा काकणभर अधिक असते. शिक्षकाची अनास्था, उदासिनता, निष्क्रियता त्याच्या पेशातील आदराची सांगता करीत असते. मुलांच्या मनातील शिक्षकांप्रती असणारा आदर उगवत्या सूर्यासारखा स्वाभाविक आणि उमलणाऱ्या फुलाइतका सहज असतो. सहजपण शिक्षकाच्या कर्तृत्वातून गंधित होत असतो. रेडिमेट नोटस् चा आयता रतीब घालणाऱ्या वर्तुळात आणि क्लास नावाच्या समांतर व्यवस्थेत शिक्षकाला स्वतःचा ‘क्लास’ टिकवून ठेवावाच लागेल. तो टिकून राहावा म्हणून आपल्या अध्यापनाचा ‘क्लासही’ वरच्या दर्ज्याचा असावा लागतो. आपुलाच वाद आपणाशी, तसा आपलाच संवाद आपल्याशी घडणे आवश्यक ठरते. स्वकेंद्रितवृत्ती आपल्यातील अंतर्मुखता संपविते. पोरांनी थोर व्हावे, यासाठी थोरांना काहीकाळ पोर व्हावे लागते. एखाद्या विद्यार्थ्याला घडविणे म्हणजे आपल्या अध्यापक पेशाचे यश नाही. यशाची शिखरे लहानमोठी का असेनात; ती चालत्या वाटांवर शिक्षकांना उभी करता यायला हवी. अर्थात असे यश सहजगत्या आपल्या पदरी येणार नाही हे मान्य. माणूस परिस्थितीचा निर्माता नसतो; पण तो परिवर्तनाचा प्रेषित बनू शकतो. मुलांच्या मनात आकांक्षांचं अफाट आभाळ कोरण्यासाठी आपणच आभाळ व्हावं लागतं.

परिस्थितीला व्यवस्थेच्या वर्तुळातून शोधून वेगळं केल्याशिवाय अध्यापकाला आपल्या पेशाची डूब कळत नसते. शाळा नावाच्या व्यवस्थेत आणि अभ्यासक्रमाच्या चौकटीत बंदिस्त करून निर्धारित केलेलं शिक्षण सगळ्यांना देता येईलही. पण संस्कारांचं आणि मूल्यांचं शिक्षण चौकटींच्या सीमांमध्ये बंदिस्त करून कसे देता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना संयमित जगण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावा लागेल. सार्वकालिक मूल्यांची बिजे विद्यार्थ्यांच्या अंतर्यामी रुजवणं शिक्षकाचं काम आहे. भौतिकसुविधांच्या बेगडी समाधानात सारेच आपापली सुखे शोधत आहेत. आजूबाजूला मृगजळी मोहाचे मायावी पाश अधिक घट्ट होत आहेत. स्वार्थप्रेरित जगण्याच्या झळा माणसांची मने शुष्क करीत आहेत. अंतर्यामी अधिवास करून असलेला आपलेपणाचा ओलावा आटत चालला आहे. आपापसातल्या संवादाची परिभाषा बदलत आहे. तंत्रज्ञानाने त्याला वैश्विकतेचे परिमाण लाभले. विज्ञानतंत्रज्ञानाच्या वाटेने घडणारा संवाद व्हर्च्युअल झाला, तसा माणसाला अॅक्च्युअल जगण्याचा विसर पडत गेला. आभासी जगण्याला सुविधांच्या विश्वात प्रतिष्ठा प्राप्त झाली. फेसबुकने संवाद सुगम होत असेलही; पण त्यात ‘फेस टू फेस’ व्यक्त होण्याचे समाधान कसे गवसेल?

शिक्षणातून संपादित केलेल्या जुजबी ज्ञानावर पोट भरण्याची सोय लावता येते. ती कौशल्ये पुस्तकातील धड्यांमधून मिळतात; पण जीवनासाठी शिक्षण घेताना त्याचे स्त्रोत शोधावे लागतात. या स्त्रोतांच्या शोधाची एक वाट शिक्षकाच्या दिशेने वळणारी असावी. पोटार्थी शिक्षण आणि शिक्षक परिस्थितीत परिवर्तन कसे घडवू शकतील? माणूस उदरभरणासाठी जगतो, हे वास्तव असले तरी त्यापलीकडे काहीतरी त्याला हवं असतं. फक्त उदरभरणाचा विचार करून उचललेली कोणतीही पाऊले नवनिर्माणाची मुळाक्षरे ठरत नसतात. पोटापासून सुरु होणारे प्रश्न पोटापर्यंतच जाऊन संपतात, तेव्हा नवे काही करता येत नाही. पण पोटतिडकीने केलेली विधायक कामे अनेकांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवू शकतात. आकांक्षांचं व्यापक आभाळ पंखावर घेण्याचं बळ वैनतेयाने घेतलेल्या डौलदार झेपेत नसतं. झेप आधी मनात उमलून यावी लागते, तेव्हा ती पंखातून प्रकटते. आकाश कवेत घेण्यासाठी मनालाही आकाशाएवढं अफाट, अमर्याद व्हावं लागतं. अमोघ कर्तृत्वाचं गगन हे समाधानाचे सदन असते. अशी कर्तृत्वसंपन्न मने विद्यमानकाळाची अनिवार्य आवश्यकता आहे.

माझा आसपास वेगवेगळ्या कारणांनी दुभंगतो आहे. जगण्याचे टाके उसवत आहेत. मीपणाचा परीघ समृद्ध होत आहे. अशा वातावरणात मी अभंग राहणे आवश्यक आहे. क्षणिक सुखांची बरसात करणऱ्या फसव्या मोहापासून अलिप्त राहून विचारांचं आणि संस्कारांचं अभंगपण शिक्षक टिकवू शकतो. याकरिता मनात उगवणारं विकल्पांचे तण वेळीच काढून टाकावे लागेल. ‘गुरुजी’ या शब्दाला आपल्या सांस्कृतिक प्रवाहात लाभलेलं अढळपण टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ‘लघूरुपाला’ व्यापकतेच्या कोंदणात अधिष्ठित करून आकांक्षांचे आकाश आंदण द्यावे लागेल. जगण्याला वैश्विक विचारांचे परिमाण द्यावे लागेल, तेव्हाच त्याला ‘गुरुपण’ येईल. शिक्षक पेशाव्यतिरिक्त अन्य काही पेशांमधील यशापयशाची चर्चा फार थोड्या नफा नुकसानापुरती सीमित असते. त्यांच्या चुकांना दुरुस्तीसाठी कदाचित अवधी मिळू शकतो. ते चुकल्यास फारतर काहींना त्याचा फटका बसेल; पण शिक्षक चुकला तर पिढी बिघडते. पिढी बिघडणे हे दुर्लक्षीण्याजोगे नुकसान नक्कीच नाही.

शिक्षकाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागते. परिस्थती विपरीत असताना मी एकटा काय करू शकतो? असं अनेकदा मनात येईलही; पण असे एकएकटे प्रयत्नही विधायकतेचे एव्हरेस्ट उभे करू शकतात. विधायक कामे करण्यासाठी माणसानं झिजलं तरी चालेल. कारण गंजून जाण्यापेक्षा झिजून जाणे केव्हाही चांगलं. बिंदू-बिंदू जमा होऊन त्याचा सिंधू होतो. कणात असते, ते मणात दिसते. बिंदूत असते, ते सिंधूत दिसते. असे कणाकणाने, थेंबाथेंबाने जमा होणारे कर्तृत्व व्यक्तित्वालाच नाहीतर जगण्यालाही व्यापकपण देते. एखाद्या विशाल वृक्षाची उंची पाहणाऱ्याच्या अनुभवावर अवलंबून नसते. ती स्वयंभू असते. त्याची मुळे आपल्या अस्तित्वाचा ओलावा शोधत जमिनीत खोलवर जातात. धरतीला घट्ट धरून ठेवणाऱ्या मुळांमुळे तो वादळवाऱ्याशी झुंज देत उभा असतो, येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाना शीतल गारवा देत. अखंड. अविरत. शिक्षकांना असा वृक्ष होता येणार नाही का?

Paus: Athavanitala | पाऊस: आठवणीतला

By // 6 comments:
गंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत आहेत. गारवा घेऊन आलेला वारा अंगावरून अलगद मोरपीस फिरवतोय. झाडे पावसाच्या वर्षावात सुस्नात न्हाऊन आपल्या नितळ अंगकांतीकडे कुतूहलाने पाहत उभी आहेत. दूर क्षितिजावर इंद्रधनुष्याने सप्तरंगी कमान धरली आहे. ढगांआडून डोके अलगद वर काढून सूर्य बघतो आहे. पक्षांनी निळ्याशार आभाळाच्या विस्तीर्ण पटावर आपल्या पंखांनी फेर धरला आहे. त्यांच्या मोहक हालचालींनी आभाळभर नक्षी कोरली जात आहे. श्रावणातील ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ रंगला आहे. टेकड्यांच्या उतारावरून पाणी अवखळ पोराप्रमाणे उड्या मारीत धावते आहे. माळावरील गवत वाऱ्यासोबत झुलत, डुलत खेळते आहे. आजूबाजूच्या आसमंतात प्रसन्न चैतन्य ओसंडून वाहते आहे. हिरव्या माळरानावरून वाहत येणारा वारा मंत्रमुग्ध करणाऱ्या गंधाची सरमिसळ सोबतीला घेऊन येतोय. परिसरातील उत्साहाने आनंदाचा सूर धरला आहे. त्या सुरांनी मनःपटलावर गारुड केले आहे. डोक्यावरील पावसाळी आभाळाचा तुकडा मनाच्या गाभाऱ्यात साठत चालला आहे. पायाखालच्या माळाच्या चौकटीत पाऊले फिरताना मनातील स्मृतींचे कोष आठवणींनी ओलावून चिंबचिंब भिजत आहेत. भिजलेल्या देहावरून निथळणाऱ्या पावसासोबत मनातील पावसाळी आकाश हलकेच धरतीवर उतरत आहे. कळत नकळत तिकडे पावलं आतुरतेने चालती होतात. मनातील साठलेले झरे मोकळे होऊन वाहत राहतात.

किती दिवस, महिने, वर्षे झाली असतील डोईवरच्या निळ्याभोर विस्तीर्ण आकाशाला मनात साठवून याचा हिशोब मन करतंय. तो जुळत नाही. कारण स्वतःभोवती आखून घेतलेल्या स्वयंघोषित चौकटीत हे मुक्त आकाश नाही सामावत. आठवणींचा पाऊस दाटत जातो. मन आठवणींच्या ओथंबलेल्या झाडाखाली क्षणभर विसावते. नेणतेपणापासून ते जाणतेपणापर्यंत अनुभवलेला मनमुक्त पाऊस आणि आजचा स्वतःभोवती कोरून घेतलेल्या रेखीव चौकटीतला पाऊस, केवढं अंतराय निर्माण झाले आहे भिजलेल्या सहवासाच्या नात्यात. मध्यमवर्गीय बेगडी आवरणात जगण्याचा मुक्त आनंद मी कधीच झाकून घेतला आहे. वयासोबत शहाणपण आलं; पण जगण्यातलं सहजपण मात्र हरवलं. शहराच्या मध्यमवर्गीय सुखांच्या खिडकीतील आकाशाला डोक्यावरचं ते अफाट आकाश पेलणं अवघड होतंय. माणूस शिकून शहाणा होतो; पण त्याचं शहाणपण पुस्तकांत बंदिस्त होताना जीवनातून पाऱ्यासारखे अलगद निसटत जातं. हरवत जातं.

स्वतः भोवतीच्या परिघाला जग समजण्याचा स्वतःपुरता समजूतदारपणा (?) निसर्गातून मिळणाऱ्या आनंदातील सहजपणा हरवून टाकतो. प्रत्येक गोष्टींमध्ये माणूस प्रतिष्ठा शोधू लागतो. स्वनिर्मित कुंपणामध्ये बंदिस्त होताना त्यापलीकडील देखण्या जगाला विसरतो. पंचवीस-तीस वर्षापूर्वीच्या माझ्या जगण्यातील सहजपण हातून निसटले ते निसटलेच. ते पुन्हा हाती येईल का, माहीत नाही. निरामय आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सानिध्यात आटत चालला आहे. मनाच्या सांदिकोपऱ्यात तो काळ आक्रसून लपला आहे. आठवणींवर काळाची धूळ साठली आहे. पहिल्या पावसाच्या आगमनाला प्रतिसादाचा सहज हुंकार देणारा मृद्गंध दूरदूर कुठेतरी राहिला आहे. कोणत्यातरी पुस्तकातील वाक्यातून मातीचा दरवळ घेऊन सोबतीला क्षणभर आला, पण त्याचा मूळचा गंध हरवून. कधीकाळी मनाच्या आसमंताला भरून उरणारा तो गंध आसपास आजही आहे, याची गंधवार्ताही जगण्याच्या धडपडीत नाही. हे जगणं परिस्थितीशरण अगतिकतेतून अगदी सहज स्वीकारले आहे.

आयुष्यातील बराचकाळ खेड्यातील मातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या निर्व्याज सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. अनंत जलधारा बनून पाऊसकाळ हृदयात विसावला आहे. त्या क्षणांना चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले. आनंद बनून मनाच्या आसमंताला असीम, अमर्याद करीत गेलं. म्हणूनच की काय पुस्तकातल्या कवितेतून भेटणारा पाऊस अन् ती कविताही हवी हवीशी वाटू लागली. धडा, कविता वाचताना तो आपल्यासमोर उभा असल्याचे वाटायचे. बालकवींच्या कवितेतील श्रावणमास हिरवाई घेऊन मनातील भावनांना गहिरा रंग द्यायचा. त्या घनगर्द छटा गहिऱ्या होत जायच्या. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार होऊन मनात साठत राहायचा. त्याच्या विभ्रमाना पाहताना मनाला सुखद भ्रम होत राहायचा.

मधल्या सुटीनंतर दुपारची शाळा भरलेली असायची. शिक्षक वर्गात काहीतरी शिकवत असायचे. सगळी मुलं वर्गात शांतपणे बसलेली असायची. पण डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं मात्र खिडकीतून दिसणाऱ्या पश्चिमेकडील आकाशाच्या तुकड्याकडे झेपावत असायची. तेथे विहरत रहायची. आकाशाचे रंग पालटत जायचे. काळ्या रंगांची चादर त्यावर ओढली जायची. काळ्याशार रंगाने आकाश रंगायचे. इकडे आमची मने बरसणाऱ्या पाण्याने रंगायची. आमची अस्वस्थ चुळबूळ सुरु व्हायची. सरांचं लक्ष आमच्याकडे. "काय चाललंय?" म्हणून डोळ्यावरील चष्म्याच्या काचांवरून पाहत ओरडायचे. तेवढ्यापुरतं त्यांच्याकडे लक्ष. मनं मात्र आभाळाकडे केव्हाच पोहोचलेली. पुस्तकातील धडे मस्तकापर्यंत पोहोचणे अवघड होत जायचे. पुस्तकातल्या धड्यातील रंगापेक्षा बाहेरील पावसाचा रंग अधिक हवासा वाटायचा. पुस्तकातील धडे त्यांच्या तालात चालत राहायचे; पण आमच्या मनात पावसाने एव्हाना चांगलाच ताल धरलेला असायचा.

आमच्यातील कोणीतरी उभं राहून सरांना सांगायचा; "सर, पाऊस जोराचा येईल असं वाटतंय! आम्ही घरी जायचय का?" सरांचाही नाईलाज असायचा. शाळा गावापासून दीडदोन मैल अंतरावर. चिखलमाती, काट्याकुट्यातून तो रस्ता रोजच पायी तुडवत जावे लागायचे. पाऊस आला की रस्त्यावरील नाले, ओढे तुडुंब भरून वाहयचे. पाणी कमी होईपर्यंत इकडची माणसं इकडे आणि तिकडची तिकडे अडकून राहत असतं. पाऊस येणार असला म्हणजे शाळेतून घरी जाण्याची आम्हां पोरांना अनुमती असायची. दप्तर स्थानिक राहणाऱ्या मित्रांकडे नाही तर शाळेतच टाकून घरी जाण्यासाठी सारे भन्नाट सुटायचे. रस्त्यावरून चिखल, माती, पाणी उडवत, बोंबा मारीत निघायचे. जोराचा पाऊस येऊन ओढे, नाले नेहमीच तुंबायचेत असे नाही; पण पावसामुळे शाळा नावाच्या कोंडवाड्यातून काही वेळेसाठी का असेना आमची सुटका व्हायची. शाळा नावाच्या तुरुंगातून आम्हांला मुक्त करणारा पाऊस मुक्तिदाता वाटायचा. वाटायचे, हा असाच वर्षभर बरसत राहावा. मात्र सुटीचा दिवस सोडून. यासाठी आम्ही पावसाला मनातल्यामनात तशी विनंतीही करायचो; पण त्याने कधीही आमचे म्हणणे ऐकले नाही.

वाढत्या वयासोबत पाऊसही बदलत गेला. कधीकाळी कथा, कादंबरी, सिनेमातून नायक-नायिकांना चिंबचिंब भिजवणारा पाऊसच खरा पाऊस असतो, असे वाटायचे. पण तो फक्त पुस्तकांत, चित्रपटात राहिला. वास्तवात असा पाऊस आयुष्याच्या चालत्या वाटांवर कधी भेटलाच नाही. पुस्तकातून वाचताना भेटलेला, मनमुराद आनंदाची बरसात करणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. पण कोसळताना, धूळधाण करताना त्याला पाहिला, अनुभवला तेव्हा तो नकोसाच वाटायला लागला. त्याचं येणं हाच जीवनातील शाश्वत आनंद आहे, असे मानणारी मने; तो संततधार लागताना त्रासायची. वैतागायची. गावातील घरांनी सिमेंटची छते आपल्या डोक्यावर तेव्हा धारण केलेली नव्हती. सगळ्यांची घरे मातीची, धाब्याची. संततधार लागल्याने सारखी गळायची. धाब्यावरून गळणाऱ्या पाण्याने वैताग यायचा. घरात अंतरावर, अंतरावर भांडी आपलं आसन मांडून स्थानपन्न व्हायची. आई ओरडायची. छतावर मुंग्यांनी केलेली घरे मातीच्या पाट्या टाकून, बुजून गळती थांबवायला लागायची. पावसात छतावर चढून भिजताना माती टाकणे जिवावर यायचे. अंधाऱ्यारात्री धोधो बरसणाऱ्या पावसात हाती कंदील घेऊन डोक्यावरील गोणपाटाच्या घोंगडीला सावरत गोठ्यातल्या गायीवासरांना, बैलांना चारा टाकायला जाताना पावसाला बिनदिक्कत शिव्यांची लाखोली वाहिली जायची. पण त्याचा काही उपयोग नसायचा. तो आपलं कोसळण्याचं काम प्रामाणिकपणे करीत राहायचा.

शेतात खूप कामे असली की, तो अवचित यावा. चांगला जोराचा यावा असे वाटायचे. कारण शेतात वाफसा नसल्यावर ना निंदणी, ना कोळपणी. त्यादिवशी कामातून सुटका व्हायची. पण हाही आनंद तसा क्षणिकच असायचा. पाऊस कमी असेल, थोडी उघडीप मिळाली असेल, तर गोठ्यातली गुरंवासरं चरायला न्यावी लागत. हे काम टळत नसे; पण त्यातल्या त्यात बरे वाटायचे. आम्ही सगळीच समवयस्क मुले आपापली गुरंढोरं घेऊन माळावर एकत्र येत असू. सगळे जमल्यावर कधी सूरपारंब्यांचा तर कधी विटीदांडूचा खेळ रंगत आलेला असायचा. सारे खेळण्यात रंगलेले असायचे. आमच्यातल्याच काही लहान मुलांना गुरावासरांवर नजर ठेवायला सांगून मोठी मुले खेळत असायची. त्यांचं खेळणं पाहून लहान मुले आपलं काम विसरून खेळ पाहण्यात रमायची. तेव्हाशी नजर चुकवून दोनचार ओढाळ ढोरं शेजारच्या कोणत्यातरी शेतात घुसायची. योगायोगाने शेतमालक शेतात असला की, शिव्यांची बरसात करीत, बोंबलत यायचा. अशावेळी न बोलणंच शहाणपणाचे असायचे. हे शहाणपण अनुभवातून आम्ही चांगल्याप्रकारे आत्मसात केले होते.

शाळा शिकता, शिकता वर्ग वाढत गेले. तसा पाऊसही आठवणीतून वाढत, साठत गेला. शालेय वयातील भाबडा, निरागस पाऊस वाढत्या वयासोबत बदलत गेला. परिस्थतीची वास्तवता अनुभवात, अनुभवातून जीवनात प्रवेशित झाली. कथाकादंबऱ्यामधून रोमँटिक रुपात भेटणारा पाऊस कितीही खास, कितीही चांगला वाटत असला, तरी परिस्थतीच्या दाहकतेत तो रुक्ष होतो. हे कळायला लागले. त्याच्या याही रूपाशी हळूहळू परिचित झालो. त्याच्या आगमनाच्या वाटांशी शेतकऱ्याच्या जीवनाचे चक्र बांधले गेले असल्याने माणसं त्याच्या येण्याने का आनंदतात, न येण्याने विकल का होतात, हे कळायला लागले. पाऊसही प्रत्येकाचा वेगळा आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो. आपला पाऊस वेगळा आणि शहरातल्या लोकांचा वेगळा, असे वाटायचे. त्यांच्यासाठी आनंदाची बरसात करणारा. आपल्यासाठी राबराब राबून कष्टाचे डोंगर उपसायला लावणारा. कधी आला नाही म्हणून, तर कधी प्रमाणापेक्षा अधिक येऊन कोसळला म्हणून माणसं हमखास त्याच्या नावाने बोटं मोडत असत. त्याच्या अनियमित येण्याने उध्वस्त होणाऱ्या माणसांच्या डोळ्यातून कोसळताना पाहत होतो. तो दिसत होता. जाणवत होता. त्याचे अस्तित्व माणसांच्या जीवनाला, जाणीवांना वेढून टाकणारं असायचं. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार वगैरे असल्याचे वाचलेलं अशावेळी आठवायचे. वाटायचं हा आलाच नाही तर... आपलं कसं व्हायचं? त्याचं येणं लांबल्याने घरातील कर्त्या मंडळीच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट मनातलं आनंदगर्भ आभाळ काळवंडून टाकायचं. पण आशावादी मन हलकेच म्हणायचं, असं नाही होणार.

पावसाच्या गंधगार सहवासाच्या हिंदोळ्यावर झुलत कधी अभावात, तर कधी अविर्भावात जगलो. वाढलो. पावसाने त्याच्या धारांसोबत मनाचा आसमंत भिजवत परिस्थतीच्या मातीत रुजवले. शिकलो. चार पुस्तकांची सुंदर सोबत घडली. जगण्याच्या शाश्वत वाटा परिस्थितीतून सापडल्या, तशा पुस्तकातूनही सापडल्या. पदवीधर, द्विपदवीधर झालो. अंगावरची ठिगळांची नक्षी लागलेली कापडं गेली. परीटघडीचे कपडे परिधान करून वेगळ्या चौकटींच्या जगात आलो. परिस्थितीने शिकवलेल्या शहाणपणामुळे मिळालेल्या धड्यातून स्वतःला सिद्ध करीत गेलो. स्वतःला लेखत गेलो. तपासत गेलो. जगण्याने अस्तित्वाच्या भूमीत मुळं घट्ट रुजवली. काही मी शिकलो. काही अनुभवाने शिकवले. नोकरीच्या वाटेने पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो येथेच निवांत. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! आठवणींचा पाऊस कधीतरी असा अवचित आभाळभरून कोसळतो. मनात साठलेले आठवणींचे मेघ झरायला लागतात. मनातील आसमंताच्या क्षितिजावर आठवणींच्या इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान धरून कोसळणारा पाऊस रिमझिम बरसत राहतो. आठवणींचा ऊनपावसाचा खेळ सुरु होतो. मनातील गाव आणि गावातील पाऊस सोबत घेऊन शहराच्या सिमेंटच्या छतावरून ओघळत राहतो, आठवणींच्या रूपाने. 

Swatantrya | स्वातंत्र्य

By // No comments:
पंधरा ऑगस्ट एकोणाविसशे सत्तेचाळीस रोजी इतिहासाने कूस बदलली. गुलामगिरीच्या शृंखला तुटल्या. मुक्तीचे पंख लेऊन अस्मिता अवतीर्ण झाली. परदास्याचा काळ इतिहासाच्या पानात स्मृती बनून बंदिस्त झाला. अंधाराचे पटल दूर सारीत आकांक्षांच्या नक्षत्रांना सूर्य तेजाचे दान देता झाला. गलितगात्र मनांच्या मशाली पेटल्या. साम्राज्यवाद, वसाहतवादाच्या वणव्यात होरपळणाऱ्या देशासाठी मुक्तीचा आनंद शब्दातीत होता. नियतीशी करार करून मध्यरात्रीच्या अंधाराला छेदत स्वतंत्र ओळख घेऊन स्वातंत्र्य दारी आले. पारतंत्र्याच्या अनेक वर्षाच्या निद्रेतून देश जागा झाल्याचे इतिहास विस्मयाने पाहत होता. स्वातंत्र्य शब्दाभोवती स्वत्वाचे, अस्तित्वाचे अनेक हळवे क्षण जुळले. परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी चुकते केलेले मोलही मोठे होते. अनेक ज्ञात-अज्ञात देहाच्या समिधा स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित झाल्या. स्वातंत्र्याच्या वेदीवर धारातीर्थी पडणाऱ्या अनेक अनाम वीरांची नावे कदाचित इतिहासालाही ज्ञात नसतील. यांच्या पराक्रमाची परिसीमा पाहून काळही क्षणभर स्तब्ध झाला असेल.

जगातील सारे संघर्ष माणसांच्या शापित जगण्यातून मुक्तीसाठी झाले आहेत. स्वातंत्र्याचे हे संग्राम कधी मनोवांछित, तर कधी रक्तलांछित झाले. रक्ताळलेल्या वाटांवरून अगणित अडथळे पार करीत पाऊले स्वातंत्र्याच्या सूर्याला घेण्यासाठी निघाली होती. डोळ्यात स्वातंत्र्य नावाचे स्वप्न सजले होते, रुजले होते. भारावलेली मने स्वातंत्र्याच्या प्रकाशाचा कवडसा आणण्यासाठी क्षितिजाकडे चालती झाली. त्यांच्या पावलांनी पुढच्या पिढ्यांसाठी स्वातंत्र्याचे नंदनवन उभे केले. संघर्ष कोणताही असो, तो जटील असतो. जशास तसे न्यायाने वर्तणाऱ्या क्रांतिकारकांपासून, अहिंसेचे अमोघास्त्र हाती धारण करून सत्याग्रहाच्या मार्गाने संघर्षरत राहणाऱ्या गांधीजींच्या अहिंसामार्गापर्यंत साऱ्यांच्या मनात दास्यमुक्त भारताची प्रतिमा आकारास आलेली होती. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम जहाल, मवाळ आणि क्रांतिकारकांच्या मार्ग भिन्न असलेल्या; पण उद्दिष्ट एक असलेल्या ध्येयाचा साक्षात्कार आहे.

सदुसष्ट वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्य मिळविले. त्या मोहरलेल्या क्षणांची आपली पिढी साक्षीदार नसली, तरी तो ऊर्जस्वल इतिहास प्रेरणेचे दीप बनून अंतर्याम उजळण्यासाठी अनवरत तेवत आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील पिढ्यांना स्वातंत्र्य मिळविणे जीवनाची इतिकर्तव्यता वाटत होती. विद्यमान पिढी त्याकडे हक्क या भावनेने पाहत आहे. हक्क सांगितले जातात, तेव्हा कर्तव्ये दुर्लक्षित होतात. त्याग, समर्पण शब्द अशावेळी कोशात दडतात. कर्तव्यपराड्.मुख समाज देशाला ऊर्जितावस्था कशी देऊ शकेल? इतिहास घडवावा लागतो. तो काही सहज घडत नाही. त्याकरिता कोणतेतरी वेड धारण करावे लागते. ध्येयप्रेरित वेडेच इतिहास घडवितात. जो समूह आपला गौरवशाली वारसा विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही. भूतकाळाच्या गर्भातून भविष्य शोधावे लागते. त्यासाठी वर्तमानाचा प्रत्येक क्षण जिवंत करावा लागतो. जिवंत मनेच नवनिर्माणाचे शिल्पकार ठरतात. इतिहास घडविणारे आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात.

‘भारताला पंधरा ऑगस्ट एकोणाविसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले.’ हे वाक्य आपण शाळेत असताना शिकलो. आजही बहुदा तसेच शिकवले जाते. खरंतर आपणास स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. ते प्रयत्नपूर्वक मिळविले आहे. गोरे साहेब आपल्या देशात वर्षानुवर्षे राहून कंटाळले. आता आम्ही आमच्या देशात जातो. सांभाळा तुम्ही तुमचे राज्य, म्हणून ते काही आपणास ‘गिफ्ट’ देऊन गेले नाहीत. येथून जाण्यासाठी भाग पाडून ते आम्ही मिळविले आहे. असे असताना किती सहजगत्या आम्ही स्वातंत्र्य मिळाले, असा शब्दप्रयोग करतो. आधीच्या पिढ्यांनी सुखांचा, सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवले. त्याचं मोल सांप्रतकाळी आम्ही कसे करीत आहोत. सदुसष्ट वर्षात देशाला आम्ही काय दिले, याचा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? पराभूत मन आणि पराधीन मानसिकता वास्तव्य करून असते, तेथे स्वातंत्र्य असून नसल्यासारखेच असते.

विद्यमान भारत विकासाच्या कोणत्या बिंदूवर उभा आहे? त्याचं विश्वातील स्थान नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधली, तर काय चित्र दिसते. कधीकाळी विकासाची पुरेशी साधनेही हाती नसणाऱ्या देशाचा विकासाभिमुख प्रवास एक विस्मयगाथा आहे. साध्या-साध्या सुविधांसाठी परकीय मदतीकडे अपेक्षेने पाहणे देशाचे प्राक्तन होते. पण आज विज्ञान, तंत्रज्ञानाने संपन्न होत स्वसामर्थ्याने चंद्रापर्यंत पोहोचणारा अन् मंगळावर निघालेला भारत सामर्थ्यसंपन्न मानसिकतेचा आणि अमोघ जिद्दीचा साक्षात्कार आहे. कधीकाळी अभावात जगणारा देश आज अभावानेही कोणी दुर्लक्षित करू शकत नाही. भारताची ही गगनगामी प्रगती प्रामाणिक प्रयत्नांची परिश्रमगाथा आहे. देशांना मिळणारं मोठेपण सहजपणे त्यांच्याकडे चालत आलेले नसते. ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तो परिपाक असतो. त्याग, समर्पणाचा परिणाम असतो. शांतीचे स्वप्न डोळ्यात घेऊन मांगल्याची आराधना करीत, विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत असलेला भारत आशेचा किरण आहे. माणूस म्हणून जगण्याचा सन्मान करणाऱ्या विचारांचा एक उत्कट भाव आहे. माणूस नावाची अस्मिता जपण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या प्रयत्नांची यशोगाथा आहे. उद्याचं प्रसन्न, प्रमुदित जग निर्माण करणारे आशास्थान आहे. कलह टाळून सहअस्तित्वाला, सहजीवनाला सहजप्रेरणा समजणाऱ्या समृद्ध विचारांचा सहज सुंदर साक्षात्कार आहे.

देशांच्या विकासाचे लहानमोठेपण उपलब्ध साधनसुविधांनी उंचावलेल्या आर्थिक आलेखांनी निर्देशित करता येते. माणुसकीच्या परित्राणासाठी प्रयत्नरत असणारा विचार हीच विद्यमान विश्वाची आवश्यकता आहे. वैयक्तिक लालसेतून निर्माण होणारे स्वार्थप्रेरित कलह टाळूनच विकास साध्य होतो. विकासाला विधायक विचारांची सोबत असायला लागते. विकासाच्या वाटेने चालताना अवतीभवतीच्या भकासपणाला समजून घेत शुष्क डोळ्यात जगण्याची प्रयोजने पेरून आशावाद निर्माण करावा लागतो. उदास डोळ्यात स्वप्नांचे दीप प्रज्वलित करून आश्वस्त करू शकणारे विचारच शाश्वत सत्ये असतात. मानवकुळाचे आर्त दूर करून जगण्याला नैतिक अर्थ देऊ पाहणारे विचार आपली संपत्ती असते. मांगल्याची आराधना करीत प्रगतीचा प्रकाश निर्मिण्यासाठी प्रयत्नरत असणारे विचार चिरंजीव असतात. आपल्या देशाचे ‘भा-रत’ (आभा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे रममाण) हे नाव म्हणूनच सार्थ ठरते. 

शेकडो वर्षापूर्वी रानावनात, गिरिकंदरात राहणाऱ्या आदिमानवापासून विद्यमानकाळी प्रगतीची एकेक शिखरे संपादित करणाऱ्या माणसाचा जीवनप्रवास एक विस्मयगाथा आहे. माणूस परिणत होत गेला, तसे जगण्याचे संदर्भ बदलत गेले. शतकामागून शतके उलटत जाऊन एकविसाव्या शतकाच्या अस्मितांना सोबत घेत उदित झालेला सूर्य मानवकुलाच्या प्रगतीचा प्रकाश पाहत आहे. दुसऱ्या बाजूने अधोगतीही घडत आहे. प्रगतीच्या प्रखर प्रकाशात अधोगतीचा अंधार नेहमीच अव्हेरला जातो. अंधाराला विसरणे वैचारिक अपराध आहे. सांप्रतकाळी भारताने प्रगतीचे नवे परगणे निर्माण केलेले आपण पाहतो. प्रगतीचा प्रजेला अभिमानही आहे. पण भ्रष्ट्राचार, बेकारी, दारिद्र्य या व्यवधानांची सोबत स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे लोटली तरी घडतेच आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीची, विकासाची फळे सर्वसामान्यांच्या दारी पोहचली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही संदेहाच्या सीमेवर उभे आहे.

मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी अद्यापही संघर्ष करायला लागत असेल, तर याला सामाजिक विकास म्हणावा का? एकीकडे संपन्नतेचे, सुखाचे दुथडी भरून वाहणारे प्रवाह आहेत. तर दुसरीकडे परिस्थितीशरण भकासपण उभं आहे. देशातील कोट्यधिशांच्या संपत्तीचे आकडे उंचीच्या परिमाणांशी स्पर्धा करीत आहेत. स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षानंतरही जगण्याच्या वाटेवर सरपटणारी माणसंही आहेत. विस्कटलेलं जगणं सावरण्यासाठी धडपड करीत आहेत. दारिद्र्याच्या दशवातारांना सामोरे जात परिस्थितीशी धडका देत आहेत. दारिद्र्याची प्रशासकीय आकडेवारी कोणती गणितं मांडून केली जाते, माहीत नाही. पण ३५-४० रुपयात माणसं सुखात, समाधानात जगू शकतात, असं म्हणणारे अहवालातील आकडे विकासाच्या वाटेवर वाकुल्या दाखवत उभे आहेत.

काहींकडे सगळंच असावं आणि काहींकडे काहीच नसावं का? एकीकडे भरपेट भोजनाने अजीर्ण झालं असेल, तर अमकंतमकं औषध, गोळी घेण्याचे टीव्हीच्या रंगीत पडद्यावरून सुचविलं जातं. पण पोटापुरते पसाभरही नसल्याने जीर्ण होणाऱ्या देहांचं काय? अन्नसुरक्षा यांच्या उसवलेल्या जगण्याला सुरक्षा देऊ शकेल काय? कुपोषण अजूनही हद्दपार होत नसेल आणि म्हणून काहींची जीवनयात्रा अवकाळीच संपत असेल, तर याला विकास म्हणावे का? स्वातंत्र्य सर्वाना मिळाले असले, तरी त्याची फळे तळागाळातील लोकांपर्यंत सर्वार्थाने पोहचलीत का? अन्नधान्याच्या गोदामातील उंदीर-घुशींनामात्र सुरक्षा नक्की लाभली आहे. असुरक्षित माणसं वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते कसेतरी खाऊन जगण्याची उमेद सोडता येत नाही म्हणून परिस्थितीशी धडका देत आहेत. हजारो माणसांच्या जगण्याची वणवण अद्यापही थांबलेली नाही. त्यांच्यातील माणसाला हरवून टाकणारं अभावाचं वेगळं जग व्यवस्थेत उभे आहे. ना त्यांना घर, ना दार. चारदोन गाडगी, मडकी हाच त्यांचा संसार. गाठोड्याना डोक्यावरून, घोड्या-गाढवावरून घेऊन भटकणाऱ्यांचं भविष्य काय? कोणताही आशावाद न जागवणारं वणवण जगणं प्रगत जगाच्या विकासाच्या कोणत्या चौकटीत आपण बसवणार आहोत?

देशातील दारिद्र्याचा प्रश्न खरंच संपला आहे का? डोळे दिपवून टाकणाऱ्या झगमगीत हाती काहीच नसणाऱ्यांची जगण्यासाठीची तगमग समाजव्यवस्थेला दिसत नसावी का? विकासगामी वाटचालीचा अभिमान देशवासियांना असला, तरी तो सर्वंकष आहे असे म्हणवत नाही. मनात आशेचे दीप प्रज्वलित करण्याएवढी प्रगती देशाने केली असली, तरी अनेक घरांच्या ओट्यांवर आस्थेच्या पणत्या प्रज्वलित करायच्या राहिल्या आहेत. दारिद्र्याचा शाप सामाजिक अभिसरणाच्या वाटेवरचे व्यवधान आहे. वाढत जाणारी खाती तोंडे सांभाळायची, तर हातांना काम मिळणे आवश्यक आहे. बेकारीचा शाप सोबत घेऊन अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण करणारी तरुणाई सैरभैर भटकते आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांच्या हातांनी देशाच्या विकासाचं बांधकाम करावे लागेल. ही नवनवोन्मेषशालिनी, सर्जनशील ऊर्जा विकासाकडे वळती करावी लागेल. या अफाट ऊर्जेला दिशा देण्यात आपण अद्यापही पुरेसे यश मिळवू शकलो नाहीत. या सळसळत्या चैतन्याचा विचार देश घडवतांना करावा लागेल. संधीचा सदुपयोग करणारा सत्प्रेरित विचार सांभाळावा लागेल. सांभाळलेले सामर्थ्य संवेदनांचा साक्षात्कारात परावर्तीत करायचे असल्यास नव्या युगाचा, नव्या दमाचा, नवा शिपाई शस्त्राने नव्हे, तर शास्त्राने संपन्न करावा लागेल.

भ्रष्ट्राचाराचा संसर्ग देशाच्या प्रगतीच्या स्वप्नांना उध्वस्त करणारा शाप आहे. श्रमाशिवाय समृद्धी शोधणाऱ्या स्वार्थांध बांडगुळांच्या लालसेने येथला संपन्न वारसाही मलीन होत आहे. ‘कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरेची चोरी नको’ यासारखी वाक्ये सुविचार बनून शाळेच्या भिंतीवर लटकली आहेत. भ्रष्ट्राचाराचे कोटीच्याकोटी आकडे ऐकून सर्वसामान्यांची मती गुंग होते आहे. अनैतिकमार्गाने मिळवलेली संपत्ती हव्यासाचा सोस बनून उभी आहे. वामनाची विश्वव्यापी तीन पाऊले प्रतीकात्मक असतील; पण भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या पावलांनी कोपरानकोपरा व्यापला आहे. भ्रष्ट्राचारमुक्त भारत हे वाक्य म्हणण्यासाठी कितीही चांगले असले, तरी नीतिमूल्यांची घसरलेली पातळी भ्रष्ट्राचारमुक्त भारत उभा राहू देत नाहीये. भ्रष्ट्राचाराने सारेच हात भरले आहेत, असे नाही. चिरीमिरी दिल्याशिवाय कामेच मार्गी लागत नसतील, तर दोष नेमका कुणाचा? स्वातंत्र्याचा की स्वातंत्र्याच्या नावाखाली घडणाऱ्या सैल आचरणाचा की, स्वैराचाराला प्रतिष्ठा मिळत जाणाऱ्या विचारांचा, सांगणे अवघड आहे.

ऊर्जाक्षेत्रातला बाकी असलेला अंधार अजूनही दूर करायचा शिल्लक आहे तो आहेच. विकासाचे पर्याय उभे करूनही अपेक्षांचे दीप आपण प्रज्वलित करू शकलो नाहीत. आठ-दहा तास विजेशिवाय जगणे, हेच आपलं नशीब म्हणून लोकांनी स्वीकारले असेल, तेथे पिकांनी बहरलेली शेते, वाढलेले उद्योग उभे राहतील कसे? अशावेळी रिकामी मने नसते उद्योग करीत असतील, तर दोष नेमका कुणाचा? प्रगतीचे अपेक्षित परिणाम साधता का आले नाहीत, हे सांगताना मोठी लोकसंख्या कारण सांगून क्षणिक समाधान मिळवता येते. हे काही एकमेव कारण नाही. प्रगतीचा झगमगाट ज्यावर अवलंबून आहे, त्या ऊर्जानिर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अपेक्षित फळे अजूनही येत नाहीत. आरोग्यसुविधातील वाणवा जणू नियतीचे देणे झाले आहे. व्याधीग्रस्त जीवन जगणे प्राक्तन समजून जगणारी माणसे कोणते स्वातंत्र्य अनुभवत आहेत? योजना अनेक आहेत. पण अनेकांपर्यंत त्या पोहचतच नाहीत. सामान्यांना सामान्य दरात आणि त्यांच्या दारात आरोग्य सुविधा मिळणे दिवसेंदिवस दुरापस्त बनत चालले आहे. आजारी पडणे जणू महागडा शोक होत चालला आहे. आरोग्यकेंद्रे आहेत; पण त्यांच्याकडून सामन्यांच्या अपेक्षांची पूर्ती होत नसल्याने आरोग्यकेंद्रांचेच आरोग्य तपासून पहायची गरज आहे, असे माणसांना वाटत असेल तर दोष नेमका द्यायचा कुणाला?

शिक्षणक्षेत्र देशाच्या विकासाचा राजमार्ग असतो. अद्यापही आमच्या शिक्षणपद्धतीला प्रवासाचा निश्चित मार्ग सापडत नाही. शिक्षण प्रयोगशाळा झाले आहे. नुसत्या मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून शिक्षणव्यवस्था परिणत वगैरे होत नसते. असली तरी त्यासाठी प्रयोग करायला लागतात. पुस्तकातून मूल्ये शोधून आपणही तसेच वागण्याची शिकवण वर्गातून देता येते; पण आचरणात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. माणसांच्या जीवनातील मूल्ये हरवत चालली आहेत. माणूस हरवू नये, म्हणून शिकवावे काय आणि कसे याचे उत्तर अजूनही सापडत नाहीये. शिक्षणातून सक्षम हात आणि संवेदनशील मने निर्माण होणे अवघड होत आहे. ज्यांच्याकडे साधनं आहेत, मोजण्यासाठी पैसा आहे ते पंचतारांकित शिक्षणसुविधा मिळवितात. ज्यांच्याकडे देण्यासाठी यापैकी नाहीच काही, त्यांच्याकरिता आहेत सरकारी शाळा, आश्रमशाळा नावाची विद्यामंदिरे. नावात मंदिर असले, तरी पावित्र्याचे, प्रसन्नतेचे प्रवाह शिक्षण नाव धारण करून येथून प्रकटायला हवेत, अशी सक्ती नाही. सरकारी आणि खाजगी शाळांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणसुविधात आणि पद्धतीत असणारे उत्तरदक्षिण ध्रुवाइतके अंतर कधी कमी होईल? प्रश्न एवढेच नाहीत. अनेक आहेत. अडचणी आहेत. व्यवधानातून मार्ग काढीत अपेक्षित लक्ष गाठणे दिवसेंदिवस अवघड कसरत होत चालली आहे.

स्वातंत्र्य मिळवून देशाने प्रगतीचे नवनवे आयाम उभे केले आहेत. तरीही झालेल्या प्रगतीच्या खुणांचे ठसे सगळीकडे का दिसत नाहीत? विकासाची पाऊले अप्रगत परगण्यांकडे वळती करावी लागतील. या पथावर उभे असणारे अडथळ्यांचे हर्डल्स बाजूला करावे लागतील. प्रगतीच्या प्रकाशाने प्रत्येक परगणा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्नांच्या मशाली प्रज्वलित कराव्या लागतील. प्रामाणिक प्रयत्नांनी, परिश्रमाने हे साध्य होईल. केवळ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळपासून राष्ट्रभक्तिगीतांचे सूर कानी पडत राहणे, तात्कालिक भावनेचे प्रवाह वाहत राहणे, म्हणजे राष्ट्रप्रेम नसते. क्षणभराच्या भावनिक आवेगाने दिलेल्या उंच आवाजातल्या घोषणा आणि उंचावलेले ध्वज यातून राष्ट्रप्रेमाची प्रतीती येत असेलही; पण हे प्रेम मनातून वर्षभर वाहते का? पंधरा ऑगस्टला सकाळी मनात उदित झालेलं राष्ट्रप्रेम सूर्यास्ताबरोबर मावळत जाऊन विरत जाणे आणि पुन्हा सव्वीस जानेवारीलाच प्रकटणे, जमल्यास अधूनमधून त्याची प्रासंगिक आठवण होताना मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत राहणे, हा राष्ट्रप्रेमाचा उत्कट आविष्कार नसतो. स्वातंत्र्यदिनाची मिळणारी सुटी आजूबाजूच्या सुट्यांमध्ये जोडून हिलस्टेशन गाठण्यासाठी नसून; आपली सामाजिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आहे, याची जाणीव आपणास असावी. मला देशाच्या प्रगतीसाठी काय योगदान देता येईल, याचे चिंतन करण्यासाठी असावी. राष्ट्रभक्तिगानाबरोबर जनजागरण घडत राहणेही आवश्यक आहे. जयगानासोबत जबाबदारीचे भानही राहावे. लक्षप्राप्तीचे पथ शोधण्याकरिता निघालेल्या पावलांना कर्त्या मनाचे मोठेपण मिळावे. स्वातंत्र्याला स्वयंशिस्त असल्याशिवाय विकासाची शिखरे उभी करता येत नाहीत. आकाशाशी हितगुज करणाऱ्या आकांक्षांच्या शिखरांवर स्थिरावणारी नजर आणि त्या दिशेने निघालेली पाऊले म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य केवळ राजकीय असून चालत नाही. ते जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांमध्ये असणे आवश्यक आहे. तितकेच प्रत्येकाच्या विचारांमध्येही असणे महत्वाचे असते. कारण स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या साऱ्या वाटांचा जन्म विधायक विचारातून होत असतो. विचारांत अस्मिता असेल, तर स्वातंत्र्याचा सूर्य अपेक्षांच्या गगनात आपले सदन शोधतो. त्याच्या प्रकाशाला अन्य क्षितिजे शोधण्याची आवश्यकता उरत नाही.