Saturday 2 December 2023

कविता समजून घेताना... भाग: चौदा

 
गुऱ्हाळ

यंदाची उचल पोरीचं लगीन करायला
मागील उचल अधिक यंदाची उचल
शिलकीची वजाबाकी वाढतच जायची
भूक शिल्लक ठेऊन
सन वार न्हायपण ऊसतोडीची वाट
आणि मुकादमाची उचल
भुकेच्या मुक्कामी पोचायची न्हाय

धडूतं एखादं, हातराया बारदाणी,
काटवट, तवा, पाण्याची घागर आणि लाकडी पेटी
हाच काय तो रिता रिता संसार गाठीला बांधून
भूक गारठून जावी असं जगणं
परतून जातांना गावकुसात
भूक उपाशीच

भुकेलाही भूक असते बरं
जशी तहानेला पाण्याची
माणसाला श्वासाची
मातीला नात्यांची
फुलांना सुगंधाची
पायांना उंबऱ्याची
आणि देहाला देहाची तशी

पाल्हा पाचोळ्याचं जीणं
नाही वेदनांना उणं
जसं ऊस गेल्यावर
होतं शिवाराचं गाणं
आणि गुऱ्हाळाचं
चुलवाणात हताश
होऊन खोल खोल बघणं

प्रा. सुनिल तोरणे
*

माणूस शब्दाभोवती अर्थाचे जसे अनेक आयाम असतात, तसे त्याच्या जगण्याभोवती अनेक प्रश्नचिन्हेही अंकित झालेली असतात. मर्यादांची वर्तुळे असतात. तशी संकल्पित सुखांची चित्रेही असतात. आनंदाची तीर्थे असतात, तशी अपेक्षाभंगाची दुःखेही असतात. आस्थेचे अनुबंध असतात, तसे उपेक्षेचे, वंचनेचे आघातही असतात. भावनांचा कल्लोळ असतो. आकांक्षांचे हरवणे, स्वप्नांचे तुटणे असते. तरीही उमेदीचा एक हलकासा कवडसा मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आस ठेवून असतो. काळाचे धक्के झेलत तो भिडत असतो काळोखाशी, उद्याच्या प्रतीक्षेत. आयुष्यात संगती असते, तशी विसंगतीही असतेच. एकीकडे लक्ष्मीलाही आपल्या वैभवावर संदेह व्हावा अशी परिस्थिती, तर दुसरीकडे जगण्याचे पोत विटलेले आणि पावलोपावली पेच वाढत चाललेलेही दिसतात.

काळाचे हात धरून धावणाऱ्या जगण्याची गती वाढली, पण आयुष्याचा गुंताही अनाकलीय होत आहे. कोलाहलात वेदनांचे आवाज हरवत आहेत. आकांक्षा करपत आहेत. आयुष्याच्या प्रतलावर पसरलेल्या छाया अधिक गडद होत आहेत. प्रगतीच्या परिभाषा पांघरून चालत आलेले परिवर्तन संदेहाच्या सीमारेषेवर उभं करीत आहे. परिस्थितीच्या आवर्तात सापडलेली माणसं अस्वस्थ वणवण घेऊन भटकत आहेत, समाधानाची परिमाणे अंकित करणाऱ्या वाटा शोधत. पण जगण्याचे तिढे आणि आयुष्याचे गुंते काही सुटत नाहीयेत. व्यवस्थेच्या चौकटी अभ्येद्यच आहेत. आघात करूनही त्यांचा टवकासुद्धा उडत नाहीये. मूठभर लोकांच्या खिशात आलेल्या पैशाने देशाला महासत्ता होण्याची स्वप्ने येत आहेत. पण सामान्यांच्या स्वप्नांची वाताहत होते आहे. वाताहतीच्या वार्ता घडतात. माणसे मात्र परिस्थितीच्या चौकटीत अडकून पडतात. व्यवस्थानिर्मित चौकटींचा शोध ही कविता घेऊ पाहते. शब्द आतून येतात, तेव्हा नुसते अर्थच नाही, तर आस्थेचे अनुबंधही त्यासोबत वाहत येतात. काहीतरी सुटलेलं, निसटलेलं कवी त्यात शोधत रहातो. वंचितांच्या वेदनेला घेऊन ही कविता वाहत राहते, संवेदनांचे तीर धरून; मनाचे किनारे कोरत. आत्मशोध घेणाऱ्यांच्या जगण्यातल्या संगतीची समीकरणे शोधू पाहते.

शिक्षण झाले, त्यातून स्व शोधण्याइतपत जाणीव आली; पण शोषण काही संपले नाही. सामान्य माणूस आहे तेथेच आहे. जगण्यासाठी भटकंती आणि कर्जासाठी भिक्षांदेही अनेकांचे भागधेय होत आहे. कष्टांवर श्रद्धा ठेवून काम करणाऱ्यांच्या आयुष्यातलं साचलेपण काही संपत नाही. प्रत्येक हंगामाआधी दिसणारं हे दृश्य काही केल्या बदलत नाहीये. वर्षानुवर्षे दिसणाऱ्या या चित्राच्या ना रेषा बदलल्यात, ना रंग. पण चौकट मात्र अबाधित आहे. घेतलेल्या कर्जाचं ओझं डोक्यावरून उतरवता आले नाही, म्हणून आणखी नवे कर्ज. एक उचल घ्यायची. तिच्या फेडीसाठी अख्खा हंगाम राबराब राबायचं. आयुष्याच्या बदलणाऱ्या अर्थांची गणिते आखायची. स्वप्ने पहायची. आस लावून बसायचं. पण सुखांचा सांगावा घेऊन येणारे ऋतू काही अंगणी येत नाहीत. यांच्या जगापासून आणि जगण्यातून कोसो दूर उभे आहेत ते. अखंड सायास-प्रयास करूनही पर्याप्त मार्ग काही हाती लागत नाहीत. शिलकीची वजाबाकी वाढत जाते, पण बेरजेचे अर्थ विशद करणारी उत्तरे शोधूनही हाती नाही लागत. जगण्यातून कर्जच काय, पण भूकही वजा होत नाही ती नाहीच.

आयुष्य अनेक जबाबदाऱ्यांना सोबत घेऊन येते. जबाबदाऱ्या प्रश्न. प्रश्न वणवण अन् वणवण अगतिकता. जगण्याशी किती झटायचे? हा एक प्रश्न आयुष्यात कायमच वसतीला असतो. हंगाम येतात अन् जातात, पण यांच्या आयुष्याचा हंगाम कधी बहरत नाही. ऋतू काळाचा हात धरून निघतात. पुढच्या वळणावर विसावतात. पण जगण्याला कधी मोहर आलाच नाही. सगळेच प्रश्न काही सारखे नसतात. त्यांना काळसंगत, परिस्थितीसापेक्ष अर्थ असतात, याबाबत संदेह असण्याचे कारण नाही. कष्टकऱ्यांच्या आयुष्यात रुतलेल्या प्रश्नांना अनेक कंगोरे आहेत. ऊसाचे बहरलेले मळे अनेकांच्या आयुष्यात साखर पेरत असतीलही, पण ऊसतोड करणाऱ्यांची आयुष्ये कधी गोड झालीच नाहीत. रसरसून जगणं कोणाच्या वाट्याला आले असेल, ते येवो. पण परिस्थितीच्या चक्रात फिरताना ज्यांच्या आयुष्याचं पाचट झालं त्यांचं काय? गुऱ्हाळ कदाचित जगण्याचे आयाम अर्थपूर्ण करण्याचा मार्ग असेलही, पण त्याच्या धगीत अनेक आयुष्ये करपून गेली. त्यांचं कोरडं होत जाणं कोणाला दिसतच नसेल का?

ऊसतोडीची वाट आणि मुकादमाकडून मिळणाऱ्या उचलची प्रतीक्षा; ऊसतोड करणाऱ्यांच्या आयुष्यात नियतीने कोरलेले अभिलेख आहेत की काय, माहीत नाही. पण प्रत्येकवर्षी गरजेपोटी उचल घ्यावी लागते. ती येते तशी अनेक वाटांनी निघूनही जाते. देणे वाढत राहते. पण पोटात आग पेरणाऱ्या भुकेपर्यंत तिला काही पोहचता येत नाही. सुखी संसार शब्दाची परिभाषा अवगत असणाऱ्यां सुखवस्तू लोकांना पाठीवर बिऱ्हाड घेऊन निघालेल्यांची वणवण आकळणे खरंच अशक्य असतं का? माहीत नाही. पण घरात आणून अंथरलेल्या सुविधांवर लाखो रुपये उधळणारे मनाजोगती एखादी गोष्ट नाही म्हणून अस्वस्थ होतात. भिंतीना रंग कोणता द्यावा याचा दहावेळा विचार करतात. खिडकीचे पडदे आणि भिंतींच्या रंगांची संगती कशी साधता येईल, या विचाराने विचलित होणारी माणसे अंगावर ल्यायला एखादं धडूतं अन् अंथरायला लागणाऱ्या घोंगडीचा आयुष्यातला अर्थ आणि अभावाच्या जगण्याचं समीकरण समजू शकत नसतील का? दारिद्र्य सोबत घेऊन अंधाराच्या संगतीने चतकोर कवडसे शोधायला निघालेली माणसे काळोख घेऊन जगतात. पोट माणसाला कसरती करायला लावते. माणसांनीच नाही तर भुकेनेही गारठून जावं असं हे जगणं. नियतीशी अहर्निश संघर्ष करूनही कर्ज आणि त्या कर्जाला अबाधित ठेवणारी भूक कायमच सोबतीला असते. जातांना ती पोटाला बांधून घेऊन जाणं आणि परतताना तशीच घेऊन येणं काही सुटत नाही.

खरंतर भूक भूकच असते, ती देहाची असो अथवा मनाची. एक शाश्वत सत्य दिमतीला घेऊन आयुष्यात नांदत असते ती. तिची पूर्ती होणं मानसिक समाधानाची अनुभूती असेलही, पण तिचं असणं कसं नाकारता येईल? ती आसक्ती असते. सोस असतो. असोशी असते. आपणच आपल्याला ओळखून घेण्याची. माणसाला श्वासांची, तहानेला पाण्याची, फुलांना गंधाची, पायांना उंबऱ्याची, तशी पोटाला भाकरीची. भूक कोणतीही असू द्या तिचे पाश आयुष्याला वेढून असतात. पण भाकरीच्या भुकेला सरसकट परिमाणांच्या परिभाषेच्या चौकटीत कसे कोंडता येईल? जगण्याचे सगळे प्रवाह भाकरीजवळच येऊन थांबतात.

पालापाचोळ्यासारखं जगणं काही माणसाचं प्राक्तन नसावं; पण परिस्थितीच अशा वळणावर आणून उभे करते की, तिच्या आवर्तात जगणं भिरभिरत राहतं. जगण्यात प्रश्नांची कमतरता अन् समस्यांची वानवा कधी नसते? वेदनांना सोबत घेऊन घडणारा हा प्रवास नव्या दुःखांना जन्म देत असतो. भूक उगवून येते नव्याने रोजच. अंकुरतात अनेक प्रश्न तिच्यासोबत. शेतात भराला आलेला ऊस मूठभरांच्या पदरी समृद्धीचं दान टाकून जातो. सुखांच्या वाटांवर वावरताना शिवार आनंद पांघरून नांदतं. जगण्याचं गाणं होतं. चैतन्याचे मळे फुलत राहतात, सौख्याचा गंध घेऊन वाहणाऱ्या वाऱ्यासोबत. गुऱ्हाळ धगधगते ठेवणारे हात मात्र हताशपणे पसरत राहतात प्रत्येक हंगामाला याचकांसारखे. हंगाम संपतो. पडाव पांगतात. गुऱ्हाळाचे विझलेले निखारे राख पांघरून घेतात. राबणारे हात ठसठसणारं दुःख उरात घेऊन पहुडतात. निदान पुढच्या हंगामात आपल्या अस्तित्वाचे कंगोरे हाती लागतील या आशेने. खोल अंधारात दडलेल्या उद्याचे कवडसे शोधत.    

टिकून राहण्याचे प्रश्न अवघड होतात, तेव्हा आस्थेचे पाश तटातटा तुटतात. उसवलेल्या जगण्याचे धागे सुटत जातात. जीव तुटतो. केवळ पंचवीसतीस हजाराच्या कर्जासाठी कोणी विकल जीव वेठीस धरला जातो. तेव्हा आसपास कुठेतरी भोजनावळीच्या हजाराच्या पत्रावळी उठत असतात. या परिस्थितीला आपण सम्यक वगैरे म्हणावं तरी कसं? काहींच्या वाट्याला सगळंच काही असावं आणि काहींच्या जगण्यात काहीच नसावं का? माणसांना प्रश्न काही नवे नाहीत. ते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. त्यांचं रूप मात्र पालटलं आहे. देशाचं दरडोई उत्पन्न वाढलं, पण दरडोई संवेदनशीलता कमी होत आहे. मला काय त्याचं, हा संकुचित विचार जगण्याचा पोत असू शकत नाही. खिशात खुळखुळणारा पैसा आणि त्याच्या आवाजाने वेडावणारे मन, म्हणजे सगळंच काही असत नाही. बंगला, गाडी, माडी यातच सौख्य सामावलं असेल, तर पुस्तकातली प्रतिज्ञा शाळेत शिकण्यापुरतीच उरते.

विश्वाच्या वर्तुळातून माणूस वजा केला तर मागे काय उरेल? या प्रश्नाचं उत्तरही एक मोठं वर्तुळ हेच असेल. माणसाला हे ठाऊक आहे. उत्तर शोधण्याच्या पायऱ्या प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या, तरी अंतिमतः भोवतालच्या वर्तुळाला विश्वरूप देणारा एक घटक विश्वात आहे, तो माणूस. माणसाइतकं कुरूप कोणीही नाही अन् सुंदर काहीही नाही. ग्लोबल पसाऱ्याच्या वार्ता करणाऱ्यांना ओंजळभर लोकल समस्यांचे आकलन होत नसेल, तर दोष कुणाचा? संस्कृती, संस्कार, परंपरांचे उदात्तीकरण होतांना माहितीच्या फाईल्सनी फोल्डर्स गच्च भरत आहेत, पण मूल्यांचा डाटा करप्ट होत आहे, त्याचं काय? आसपास सुखांची कृत्रिम बेटे तयार होत आहेत. दुभंगत जाणारी मने आणि ध्वस्त होत जाणारं आयुष्य नियतीचे अभिलेख ठरू पाहत आहेत. काळाचे बरेवाईट ओरखडे संवेदनशील मनावर ओढले जातातचं. अशा बहुपेडी पेचानां ओंजळीत पकडणारी कविता अनुभव बनून येत असेल, तर तेही कालसंगतच असते. परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग करावे लागतात. पर्याप्त पर्याय हाती लागत नसतील, तर सूत्रे बदलावी लागतात. अंधारलेल्या दिशांची सोबत घडताना वाटा हरवत जाणं नियतीनिर्मित प्राक्तन नसून परिस्थितीशरण अगतिकता असते, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
**

No comments:

Post a Comment