Sunday 30 June 2019

भार

‘ओझं’ शब्दात आनंदापेक्षा लादण्याचा भागच अधिक असतो, नाही का? मग ते ओझं स्वतःचं असो अथवा दुसऱ्याचं. माणसांना आयुष्यात अनेक लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरावं लागतं. कधी ती आपल्यांनी आपल्या माथी मारलेली असतात. कधी परिस्थितीने पुढ्यात आणून टाकलेली, तर कधी अनपेक्षितपणे समोर आलेली. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारून घेतलेली असतात. आयुष्याच्या अखेरपर्यंत कुठल्या ना कुठल्या वांच्छित, अवांच्छित ओझ्यांना घेऊन माणूस वावरत असतो. अनेक लहानमोठी ओझी वाहत जगलेला माणूस एक दिवस कुणाच्यातरी खांद्यावर निघतो. अपेक्षांची अनेक ओझी आयुष्यभर ओढणारा माणूस जातांना आपल्या कुणाच्यातरी खांद्यावर ते टाकून जातो. त्याच्या पश्चात त्याचे आप्त, स्वकीय त्याच्या राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वागवत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार याअर्थाने मोजले जात नसले, तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. गृहस्थाश्रम स्वीकारायचा तर इच्छा असो अथवा नसो संसाराचं ओझं ओढावं लागतं. ते घेऊन संसार बहरतो. घर उभं राहतं. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले विकल्पच आणखी काही अनपेक्षित ओझी वाहून आणतात. घर उभं करण्याचं काम मार्गी लागतं. एका ओझ्याने निरोप घेतलेला असतो. पण पुढे मुलाबाळांना घडवतांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षांची ओझी वाढत जातात. नकळत हीच ओझी मुलांच्या खांद्यावर दिली जातात. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, चांगला अभ्यास घडावा, जगणे मार्गी लागावे; म्हणून त्यांच्या घडणीच्या सीमांकित चौकटी उभ्या केल्या जातात. क्लास, शिबिरे, छंदवर्ग अशी लहानमोठी ओझी शोधून आणली जातात. हर्षभरीत अंत:करणाने ती डोक्यावर देऊन त्यांना स्पर्धेत ढकलले जाते. गुणवत्तेच्या स्वघोषित शिड्या तयार करून प्रगतीच्या इमाल्यांना लावल्या जातात. परीक्षेतल्या नव्वद टक्के गुणांचं ओझं डोक्यावर घेऊन चालणारी मुलं शाळेलाच ओझं मानायला लागतात. ओझी वाहण्यात अवेळीच वयापेक्षा मोठी होतात. ‘लहानपण देगा देवा’ म्हणणं प्रश्नपत्रिकेतील कल्पनाविस्ताराच्या प्रश्नापुरते उरतं.

इंजीनियरींग, मेडिकल, व्यवस्थापनशास्त्र सारख्या प्रतिष्ठाप्राप्त अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवणे जीवनाचे प्राप्तव्य होते. हे समाजमान्य मृगजळ मिळवायचे कसे? या विवंचनेच्या चक्रव्यूहात अनेकांचा अभिमन्यू होतो. व्यूह भेदण्यासाठी रणांगणात उतरायचे कसे, याची चिंता मनाला कुरतडत राहते. स्पर्धेला सर्वस्व समजून धावाधाव करीत पदवीचा टिळा ललाटी लागला की, सुखासीन जगण्याची स्वप्ने यायला लागतात. वाढत्या वयासोबत ओझी मोठी आणि वजनदार होत जातात. प्रतिष्ठेची वलये तयार होतात. उद्योग, व्यापार, नोकरीच्या प्रतिमा मनात उभ्या राहतात. नोकरी, चाकरीचे ओझे उतरून झाले की, विवाहाच्या फेऱ्यांसाठी अनुरूप छोकरीचा शोध. त्यातही सुस्वरूप, गृहकृत्यदक्ष, कुटुंबवत्सल अशा अनेक अपेक्षांची अवांछित ओझी आसपास उभी केली जातात. त्याच वाटेने घर, संसार, परिवार हे चक्र क्रमशः चालत राहतं. हे सगळं मिळवायचे म्हणून येणारी ओझी घेऊन धावाधाव.

ओझी काही केवळ घर-परिवार-संसार आणि परिस्थिती एवढीच नसतात. राष्ट्र, समाज यांच्या अपेक्षांचीही असतात. राष्ट्राला सुजाण नागरिक हवे असतात. समाजाला मर्यादाशील माणसे. अर्थात, ही प्रत्यक्ष नसली तरी व्यवस्थेचे तीर धरून सरकताना सोबत करीत राहतात. अपेक्षा शब्दात ती अधिवास करतात. अध्याहृत असतात. ओझी अनेक ज्ञात-अज्ञात वाटांनी चालत येऊन आपली भेट घेतात. ती घेऊन माणसं कधी मुकाट, तर कधी खळखळ करीत चालतात. जगण्याच्या वाटेने वाहताना निवडीचा विकल्प नसणारी काही ओझी कधीकधी जगण्यात गुंते निर्माण करतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रासंगिक अशी गोंडस नावे धारण करून येणाऱ्या ओझ्यांचा ताण वाढत जातो. मानसशास्त्राच्या परिभाषेत मनावर दडपण असणे संयुक्तिक नसल्याचे संगितले जाते. पण याकडे दुर्लक्ष करून काहीतरी मिळवण्यासाठी माणूस अपेक्षांची ओझी घेऊन धावत राहतो. अशा लादलेल्या अथवा लादून घेतलेल्या कुठल्यातरी ओझ्याने काही जीव वाकतात. काही कोलमडतात. काही कोसळतात. काही काळाच्या पटलाआड जातात. अंतरी अनामिक प्रश्न पेरून जातात. सहजी न गवसणाऱ्या उत्तरांचे ओझे घेऊन मनाच्या प्रतलावरून प्रश्न सरकत राहतात अन् मागे उरतं ओझ्याचे अन्वयार्थ लावण्याचं ओझं.
••

Saturday 22 June 2019

प्रश्न

आजचं जग सुखी आहे का? हा एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. जगाचं तात्पुरतं बाजूला राहू द्या. आपलं स्वतःपुरतं जग तरी सुखाचं आहे का? अर्थात, सुख हा शब्दही सापेक्षतेची वसने परिधान करून विहार करीत असतो. कोणाच्या सुखाच्या संकल्पित परिभाषा काय असतील, हे कसं सांगता येईल? समाधान शब्दच मुळात पर्याप्त समाधानाचा निदर्शक नाही. त्याचे असणे आणि नसणेही अनेक प्रवादांना आवतन देणारे आहे. कोणाला कशातून समाधान गवसेल, हे सांगणेही असेच अध्याहृत. सुख-समाधानच्या व्याख्या प्रासंगिकतेचा परिपाक असतात. म्हणूनच की काय परिस्थितीने पदरी पेरलेल्या पळांनी त्या निर्धारित होत असाव्यात. निकषांच्या निर्धारित नियमात त्यांना अधिष्ठित नाही करता येत.

पारतंत्र्यात असताना प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय वाटते अन् स्वातंत्र्य हाती लागलं की, त्याचे सोयिस्कर संदर्भ शोधले जातात, हेही तेवढेच खरे. देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य केव्हा मिळेल, असा प्रश्न साऱ्यांच्या मनात होता. स्वातंत्र्य मिळालं; पण माणूस खरंच ‘स्व-तंत्र’ झाला का? म्हणून एक प्रश्न विचारला जातो. खरंतर स्वातंत्र्य शब्दाचा माग काढत तो मागोमाग आला. त्याची उत्तरे एव्हाना गवसायला हवी होती. पण... हा पणच बऱ्याच प्रश्नांचा प्रश्न असतो.

प्रश्न केवळ सीमित नसतात, त्यांचं असणं जेवढं वैयक्तिक, तेवढंच वैश्विकही असतं. ते कोरभर भाकरीचे असतात, तसे जातीय, धार्मिक, राजकीय अभिनिवेश समोर उभे करणारेही असतात. त्यांचं वाहतं असणं अनाहत आहे. अखंड मालिका सुरु असतेच त्यांची. निखळ माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित करावी कशी? करावी कोणी? गुंतागुंत निर्माण करणारे हे प्रश्न समोर आहेतच. खरंतर माणूस हेच एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? आणि सांगावे तरी कोणी? जगाची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? याबाबत फारतर अपेक्षा करता येतात. सक्ती नाही करता येत कोणाला. खरं तर हेही आहे की, अशा प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो.

विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय अन् फेसबुकचा व्हर्च्युअल मुखवटा जगण्यावर चढतो आहे. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो? हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. आसपास अन्याय होत असतो. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? बऱ्याचदा अनुत्तरित असणारा हा प्रश्न. दंगली होतात, महिलांची मानखंडना होत असते. गुंडगिरी घडत राहते. का होते असे? असा प्रश्न कधी मनात येतो? येतो, पण उत्तर शोधणाऱ्या पर्यायांची पर्याप्तता पाहिली जाते का?

स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. चौकटींना आयुष्याची परिसीमा मानून अन् बंधनांना जगणं समजून वर्तणारे आभाळाचं अफाट असणं काय समजतील? चौकटीच्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. स्वतःला शोधण्यासाठी आवश्यक असतं ते. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी विसंगतीला प्रमाण मानणारे हात पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? जाळपोळ, दंगली कोणत्या तत्वांच्या स्थापनेसाठी होत असतात? अविचार पेरणाऱ्या उन्मत्त हाताना तरी हे माहिती असतं का? त्यांच्याकडे याचे उत्तर असते का? अन्याय का होतो आहे, म्हणून प्रश्न विचारून आपण कधी पाहतो का? व्यवस्थेतील वैगुण्यांचा विचार करतो का? विद्वेषाचे वणवे का पसरत असतील? हे आणि असे अनेक प्रश्न माणसाच्या जगण्याची दुसरी बाजू घेऊन समोर उभे राहतात.

इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो. त्याची उत्तरे देण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का? इतिहासाचा वृथा अभिमान शाप असतो. त्याचे यथार्थ ज्ञान आयुष्याचं आभाळ अफाट करण्याची आवश्यकता असते.

समजा माणसासमोर प्रश्नच नसते तर... मी हे लिहू तरी शकलो असतो का? आयुष्यात अनेक व्यवधाने आहेत. त्यांचे निराकरण करावे लागते. ते व्हावे कसे? हाही प्रश्नच आहे. आयुष्याच्या वाटेने प्रवाहित होताना अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. कदाचित हे सगळं वाचताना तुम्हाला वाटत असेल, काय हा माणूस? लिहितो काय आहे? लिहितो का आहे? आणि यालाच प्रश्न का पडतायेत? याला काही काम दिसत नाहीये? उगीच आपल्याकडे लक्ष वगैरे वेधण्यासाठी नसते उद्योग करत बसला आहे. बघा, तुम्हीही नकळत प्रश्नांच्या संगतीत उभे राहिलातच ना! आता मला सांगा, माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
••

Tuesday 11 June 2019

शिक्षण

शाळा, शिक्षण या शब्दांचा जीवनातील अर्थ समजायला आयुष्याची काही वर्षे खर्ची करायला लागतात, तेव्हा त्याचं महत्त्व पुढे जाऊन कुठेतरी समजतं, हे खरंय. जोपर्यंत ते समजत नाही, तोपर्यंत शाळा जीवनातील नकोसा वाटणारा अध्याय असतो. शाळा आयुष्यातील अनिवार्य बाब असूनही किती जण तिचा आनंदाने स्वीकार करतात? माणसांना शिकवावे लागते. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते, तिचे काही नियम तयार करून सभोवती काही चौकटी कोरून घ्याव्या लागतात, हेही खरेच. पण नियमांच्या चौकटीत जिज्ञासेने, आपुलकीने प्रवेश करणे दूर राहून त्याची जागा आवश्यकता, अनिवार्यता घेत असेल तर शिक्षणातून आनंद निर्माण होईल कसा?

यशस्वी माणसांच्या आयुष्याचं थोडं अवलोकन केलं तर कळतं, त्यांच्या आयुष्यात शिक्षण जरूर होतं; पण शाळा नावाच्या चौकटीत ही माणसं अशी रमलीच किती? पुस्तकांनी घडविलेले आयुष्य सोबत घेऊन वंचितांच्या आयुष्यातील गुलामगिरीच्या शृंखला विखंडित करणारे अब्राहम लिंकन, शाळेतील अभ्यासात फारशी प्रगती नसणारा; पण जीवनाची गती आणि प्रगती विज्ञानातून शोधणारा आईनस्टाईन, हलाखीच्या परिस्थितीने शाळा सुटली; पण हातातील पुस्तक न सोडणारा न्यूटन ही नावे आभाळाच्या छताखाली, जग नावाच्या मुक्त शिक्षणव्यवस्थेतून जेवढे शिकले, तेवढे शाळेतून शिकले असते का, हाही एक प्रश्नच आहे. आपण शाळेत असताना पुस्तकांमध्ये काय शिकलो, हे विसरून गेल्यानंतर मागे शिल्लक राहते, ते शिक्षण असते. शाळांना जीवनशिक्षण मंदिर नाव दिले, म्हणून तेथून जीवनाचे धडे मिळतीलच, असे नाही. शिक्षणाचा संबंध जीवनाशी जोडता येतो. त्यातून माणसं जोडणं आणि जोडलेली माणसं घडणं अभिप्रेत असतं. पण शिक्षणाचे वर्तुळ भाकरीच्या वर्तुळाशी जोडून आपण त्याला चाकरी पुरते सीमित केले आहे. भाकरी महत्त्वाचीच; पण ती मिळवताना कशी आणि कोणत्या मार्गाने मिळवावी, हे ज्ञानही असणे महत्वाचे नाही काय?

शिक्षण न थांबणारा प्रवाह आहे. काही या प्रवाहात आपली तहान भागवण्यासाठी येतात. काही चारदोन घोट घेण्यासाठी, तर काही एखादी चूळ भरण्यासाठी. कोण काय घेतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिक्षणातून ज्ञानाची तहान निर्माण व्हायला हवी. अँड्रयू कार्नोगी या विचारवंताने म्हटले आहे, सामान्य माणूस आपल्या क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश एवढे काम करतो. जी माणसं क्षमतेच्या पन्नास टक्के काम करतात, त्यांना जग सलाम करतं. जी माणसं क्षमतेचा पूर्ण वापर करून शंभर टक्के काम करतात, त्यांना जग डोक्यावर घेतं. जगाने डोक्यावर घ्यावे अशी संपन्न व्यक्तित्वे घडविण्यासाठी प्रयत्नरत असणारी शिक्षणव्यवस्था अप्रिय कशी ठरेल? प्रश्न आयुष्याच्या गुणवत्तेचे असतात. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेचेही. केवळ गुणपत्रिकेतील गुणांमध्ये गुणवत्ता शोधणारे आय.क्यू. (इंटेलिजन्ट कोशंट) मोजून समाधानी असतील आणि जगणं समृद्ध करणारा इ.क्यू. (इमोशनल कोशंट) दुर्लक्षित राहत असेल, तर जगणं श्रीमंत कसे होईल?

शिक्षणाच्या स्वतःच तयार केलेल्या ठोकळेबाज कप्प्यांमध्ये आम्ही आम्हालाच बंदिस्त करीत आहोत का? शिकणाऱ्याच्या हाती रोज एक आयता मासा दिला जातो. मासा पकडण्यासाठी लागणारं जाळं आणि ते कसं टाकावं यासाठी लागणारी कौशल्ये किती दिली जातात? मुलांना स्वावलंबी बनवणारं, आत्मविश्वास जागृत करून मनात ज्ञानलालसा निर्माण करणारं शिक्षण पुस्तकातील पाठांमध्ये लपलं आहे. पण ते शोधण्यासाठी उत्खनन होणे आवश्यक आहे. दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यातील बऱ्याच जणांना डॉक्टर नाहीतर इंजिनियरच व्हायचंय. जणू काही आता या देशात अन्य व्यवसायांची आवश्यकताच उरली नाही. आपण आपल्यापुरत्या तयार केलेल्या संकल्पित ठोकळ्यात उभं राहून धडपडत राहणं, हा विचार शिक्षणाला कोणत्या संपन्न पथावर नेणार आहे? ठरावीक व्यवसायातील आर्थिक गणिते अभ्यासणे आणि त्यातून जीवनात प्रवेशणारी स्थिरता, संपन्नता, स्टेटस या गोष्टीना अनाठायी महत्त्व मिळत जाणे, हा शिक्षणयोग नाही. मेळघाट व्हॅली विसरून सिलिकॉन व्हॅलीची स्वप्ने मनात रुजत असतील, तर दोष कुणाचा, शिक्षणाचा की शिकणाऱ्यांचा?
••