उमलणे आधी, मग बहरणे

By
वेदनांचे अर्थ शोधताना स्वतःस खरवडून काढता यायला हवं. हे सगळ्यांना साध्य होतच असं नाही. सुखांचे परगणे स्वतःच तयार करायला लागतात. त्यातही काही न्यून राहतेच. सुखाच्या अनवरत वर्षावाचा संग घडणं अवघडच. प्राप्त परिस्थितीकडे समत्वदर्शी दृष्टीने बघण्यासाठी नजर गवसली की, सुखांचे अर्थ नव्याने उलगडतात. त्यांच्या व्याख्या शोधण्यासाठी अन्य क्षितिजांच्या आश्रयाला जावं नाही लागत. आयुष्यात अधिवासास आलेले सुख-दुःखाचे लहान मोठे कण वेचता आले की, अंगणी समाधानाच्या चांदण्या उमलत राहतात. फक्त मनातला प्रमुदित चंद्र प्रकाशत राहावा. हे एकदा जमलं की, आयुष्यातील सुखांचे अर्थ समजतात आणि समाधानाच्या परिभाषाही अधोरेखित होत राहतात.

वेदनांची मुळाक्षरे जगण्याला आकार देत राहतात. आपणच आपल्याला नव्याने समजून घेताना आयुष्याचे एकेक पदर उलगडत राहतात. काही सुटलेलं, काही निसटलेलं, काही सापडलेलं असं सगळंच जमा करीत राहतो माणूस कुठून कुठून. अंतरी वेडी आस बांधून पळत राहतो अखेरपर्यंत. सुखांनी भरलेले घट दारी रचता यावेत, म्हणून संचित वगैरे अशी काही नावे देऊन पांघरत राहतो परंपरेच्या भरजरी शाली. त्यांचं भरजरी असणं धाग्यातून उसवत असलं, तरी पुन्हा पुन्हा सांधण्याचा प्रयत्न करीत असतो. टाके घालून कोपरे जोडण्याचा प्रयत्न करीत राहतो. विस्कटलेल्या धाग्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत मनातल्या श्रद्धांना देव्हारे उपलब्ध करून देत असतो. संवेदनांचे तीर धरून वाहताना आयुष्याचे किनारे कोरत राहतो नव्याने. चालत राहतो अपेक्षांचं गाठोडं डोक्यावर घेऊन. सुख-दुःखाचं पाथेय घेऊन भटकत राहतो समाधानाच्या चार चांदण्या वेचण्याच्या मिषाने. मनात विचारांची वादळे सैरभैर वाहत राहतात. भावनांच्या लाटा आदळत राहतात आयुष्याच्या किनाऱ्यांवर. प्रत्येक पळ एक अनुभूती बनून सामावतो जगण्यात. हे विखरत जाणंच जगण्याला नवे आयाम देत असतं.

जिद्द, संघर्ष, अथक प्रयास, साहस वगैरे कौतुकाचे शब्द इच्छाशक्तीपुढे थिटे असतात. धडपड किती असावी, याला प्रसंगनिर्मित मर्यादांचे बांध असू शकतात; पण ध्येयप्रेरित माणसे या साऱ्या सायासप्रयासांची तमा न करता लक्ष्याच्या दिशेने मार्गस्थ होतात तोच क्षण खरा! बाकी क्षणाला लागून क्षण येतो अन् पुढच्या क्षणी भूतकाळात विसावतो. फक्त विसावण्याआधी तो वेचता यायला हवा. कधी कळत, कधी नकळत काही हाती लागतंही. असं काही फार सायासाशिवाय मिळालं की, कुणी त्यावर दैव, नशीब वगैरे लेबले चिटकवून कर्तृत्त्वाचे अनामिक धनी निर्माण करतो. असं कुणी काही नियतीच्या हाती सोडून देत असेल, तर तो स्वप्ने वेचून आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अधिक्षेप नाही का ठरत? क्षणभर मान्य करूया, नशीब वगैरे सारखा काही भाग असू शकतो, मग केलेल्या प्रयत्नांचं काय? उपसलेल्या कष्टाचं काय? परिश्रमांच्या ललाटी प्राक्तनाचं गोंदणच करायचं म्हटलं, तर प्रयासांना अर्थ उरतोच किती?

साध्य आणि साधने यात एक अनामिक अनुबंध असतो, तो समजला की, साधनशुचिता शब्दाचा अर्थ उलगडतो. अर्थात, अर्थाचे बोध घडण्यासाठी अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचे पदर उलगडता यायला हवेत. लक्ष समोर दिसत असेल आणि ते संपादित करायची आस असेल, तर तिथं पोहचण्यासाठी पावलं स्वतःलाच उचलावी लागतात. तो काही सहज घडून येणारा प्रवास नसतो. त्यासाठी आपणच आपल्या अंतरंगात डोकावून बघायला लागतं. तेथे नितळपण नांदते राखायला लागते. मनात कोरलेल्या क्षितिजापर्यंत पोहचण्याचा प्रवास मनाच्या आज्ञेने घडतो, पण पुढे पडणाऱ्या पावलांना विचारांचे अधिष्ठान असायला लागते. मनातलं चांदणं अंधाराच्या सोबतीपासून सुरक्षित राखायला लागतं. तेव्हा चालण्याचा अर्थ समजतो. सुरक्षेची वसने परिधान करून निघालेल्यांच्या मार्गात कसलं आलंय साहस! साहसाचे अर्थ शब्दांच्या कोशात पाहून कळत नसतात. पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली प्रत्ययास नाही येत. तीरावर उभं राहून नदीचं सौंदर्य डोळ्यांना दिसेल. मनाला मोहित करेल. पण त्याचं अथांग असणं कसे समजेल? प्रशस्त मार्गांवरून पळणाऱ्या पावलांना चालण्याचा आनंद मिळेलही, पण नव्या वाटा निर्मितीचं श्रेय त्यांच्या असण्याला कसे देता येईल? मळलेले मार्ग टाळून नव्या वाटा तयार करण्याचं वेड आतूनच उमलून यावं लागतं, हेच खरं.
**

2 comments:

  1. वि स खांडेकरांना अपेक्षित असलेली वेडी माणसच जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकतात हेच खरं

    ReplyDelete