मर्यादा

By
इहतली वसती करून असलेल्या जिवांच्या काही मर्यादा असतात. माणूसही त्याला अपवाद नसतो. त्या का असतात, याची कारणे अन् उत्तरे मर्यादांच्या वर्तुळात विहार करणाऱ्यांना ज्ञात नसतात, असे नाही. प्रत्येकाचे परीघ ठरलेले अन् त्याभोवतीच्या प्रदक्षिणाही. व्यवस्थानिर्मित वर्तुळात गरगरत राहतात माणसे. फार काळ एकाच बिंदूवर थांबूनही चालेल कसे? आयुष्य तर पुढेच पळतंय त्याच्या सोबत धावणं आहेच. याला कोणी प्राक्तन म्हणो अथवा परिस्थिती. त्याने फारकाही उलथापालथ होते असंही नाही. पण माणसे उगीचच त्रागा करीत रक्त आटवत राहतात. आटापिटा अखंड सुरू असतो. धावणं, धडपडणं, पडणं, पडून पुन्हा उभं राहणं अनवरत फिरणारं हे चक्र. काळाची चाकं पायाला बांधून धावतात सगळेच, आपलं असं काहीतरी शोधत.

कशासाठी हवंय हे सगळं? कोणी म्हणेल आयुष्याला काही आयाम असतात. त्याला अंगभूत अर्थ असतात. त्यांचा शोध घेण्यालाच तर जीवन म्हणतात. मान्य! पण जीवन काही योगायोग नसतं. ती साधना असते. साध्य अन् साधने यांच्यात काही अनुबंध असतात. त्यांचे अर्थ आकळले की, आयुष्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होतात. पण अर्थाशिवाय पाठांतराची सवय अंगवळणी पडल्याने निर्धारित मार्गाने विचारांना वळवणे अवघड होते. अवगत आहे तेवढं अन् तेच पर्याप्त वाटायला लागतं. तेव्हा मर्यादांच्या चौकटीत स्वप्ने ओतण्याचे केविलवाणे प्रयत्न मौलिक वाटू लागतात. पायाखालच्या परिचयाच्या वाटाच तेवढ्या आपल्या वाटू लागतात अन् चाकोरीतील जगणं प्रमाण.

आपल्या ओंजळभर अस्तित्वाची भुरळ पडते आपल्याला. मखरे प्रिय वाटायला लागतात. आरत्या ओवाळून घेत महानतेचे मळवट भरून घ्यावेसे वाटतात. पण कधी विचार करतो का, आपल्या असण्याने अशी कोणती भर घातली जाणार आहे, जगाच्या अफाट पसाऱ्यात अन् नसण्याने कोणती पोकळी निर्माण होणार आहे? खरंतर कुणावाचून कुणाचं काही अडत नाही. पण माणसाला सवय असते मोठेपणाची लेबले लावून घेण्याची. मोठं कोण, याची तरी निदान परिभाषा असावी. नसेल तर, ती आखता यावी. तिच्या वर्तुळात एखादा सहज सामावून जात असेल, तर ते मोठेपण मान्य करावं, मनाच्या मोठेपणाने. पण या मोठेपणाच्या व्याख्याही स्वार्थाच्या चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. फायद्याची गणिते घेऊन येणारी सूत्रे शोधून समीकरणे सोडवली जातात, तेव्हा मोठेपणावरील विश्वास संदेहाच्या वर्तुळात येऊन विसावतो.

खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? येथे जगताना अनेक मुखवटे घेऊन वावरावे लागते. मुखवटे धारण करून जगताना कोणता मुखवटा निवडावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित अनुभवातून येईलही निवडता. पण तो आपल्या चेहऱ्यावर फिट्ट बसेलच, असे नाही. समजा बसलाच तर बदलावा लागणार नाही, याची खात्री काय? आपणास भेटणारी माणसं नेमकी कोण असतात? याची खात्री कशी करून घ्यावी? हासुद्धा एक अवघड प्रश्न. जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो.
••

0 comments:

Post a Comment