जीवनकलह

By
माणसांच्या प्रगतीच्या माणसांनी कितीही वार्ता केल्या तरी माणूस मुळातून बदलला आहे का? उत्तर अवघड आहे. कदाचित त्या-त्यावेळच्या परिस्थितीचा परिपाक म्हणून त्याच्या बऱ्या-वाईट वर्तनाचे समर्थन-विरोध करता येईलही. संदेहाच्या मुद्द्यांमध्ये शोधताना तसं वागणं संभवतः समर्थनीय ठरेलही. पण माणूस म्हणून माणसाची स्वतंत्र ओळख असणं कसं विसरता येईल? त्याचं विसंगत असणं आसपास सहज प्रत्ययास येत असल्यास अशा प्रमादांचे समर्थन नाहीच होऊ शकत.

संकुचित मानसिकतेपायी जगण्यातच साचलेपण येत आहे. तिमिराचा सहवास सहज घडतो आहे. भावनांचा ओलावाही आटत आहे. आसपास सगळंच शुष्क व्यवहाराच्या साच्यात सामावत आहे. आपले आणि आपण एवढ्यापुरता संकुचित होणारा माणसाचा प्रवास आस्थेचे तीर धरून वाहणे विसरला आहे. केवळ नद्यांचेच काठ कोरडे झाले नाहीत, तर मनेही कोरडी होत आहेत. हे सगळं माणसाला कोठून कोठे नेणार आहे, माहीत नाही; पण याचा विचार माणसाने करायला नको का?

कलहप्रिय परिस्थिती आणि माणसेही कोणास आवडत नाहीत. हा अनुभव सार्वत्रिक असला तरीही कलह घडवून आणणारा परिस्थितीशिवाय आणखी एक घटक माणूसच असतो, हे सत्यही नाकारता येत नाही. जीवनात कलह नसणारा माणूस शोधून सापडणे अवघड आहे. जन्मापासूनच माणसांची संघर्षयात्रा सुरु असते. इहलोकी जन्म घेऊन वातावरणात त्याने घेतलेला पहिला श्वास त्याच्या वाट्यास आलेल्या संघर्षाचे फलित असते. जीवशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे, तर धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून एखादाच मॅरेथॉन रेस जिंकतो. ओव्हमशी संपर्क घडून जीव नावाचा आकार निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. खरंतर तेव्हापासूनच या संघर्षाला प्रारंभ होतो. अपेक्षित लक्षाच्या दिशेने धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून काहीच जगतात. बाकीचे मरतात. जगलेल्यातील एखादाच शक्तिशाली असतो, तो अपेक्षित लक्ष गाठतो. जीव नावाचा देह धारण करून आकाराला येईपर्यंत निर्मितीचा संघर्ष सुरूच असतो. जिवांच्या विकासक्रमातील सगळ्याच अवस्थांमध्ये पुढेही अटळपणे सोबत करीत राहतो. या अंगाने विचार करताना संघर्षाचे गुण आपल्या गुणसूत्रांसोबत घेऊनच कोणताही जीव धरतीवर येतो, नाही का? नंतर सुरु होतो त्याच्या जगण्याचा आणखी एक नवा दीर्घकालीन कलह, हा असतो टिकून राहण्यासाठी.

संघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे. आणि टिकून राहणे उपजत प्रेरणा. सजीवांचा टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता आणि नसतो, म्हणून माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता अनवरत नांदत असते. हे अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणं. संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय असतो. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जीवनावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. मोहर दीर्घकाळाचा सोबती नसतो. पण गंधाळलेपण घेऊन नांदतो, तेव्हा त्याचा परिमल आश्वस्त करीत राहतो. आयुष्याचे तीर धरून वाहत आलेले श्वास आपल्या अवतारकार्याला आश्वस्त करीत राहतात. हे नांदणेच आपले संचित असते आणि ते अक्षय असणे आयुष्याचे अंतिम प्रयोजनसुद्धा. तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत ही प्रयोजने अनवरत प्रवाहित राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक सतत करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं. नाही का?
**

0 comments:

Post a Comment