Vaari | वारी

By
 
गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने न चुकता वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. तेथे जावून नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास?...
 
वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं. सृष्टीतील साऱ्या जिवांची काहिली सुरु असते. सगळ्यांना नकोसा असणारा उन्हाळा ऐन उमेदीत असतो. चैत्र, वैशाख, जेष्ठाच्या पावलांनी चालत आलेल्या उन्हाच्या काहिलीत सगळेच कावून गेलेले असतात. त्रस्त करणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे पाऊस घेऊन येणार असतो. मनात काही आडाखे बांधलेले असतात. डोळ्यात काही स्वप्ने असतात. ती पूर्ण करण्याचा सांगावा घेऊन आषाढाचे आगमन होते. पश्चिम क्षितिजावरून एक गंधगार संवेदना सोबत घेऊन वारा उनाड मुलासारखा उधळत अंगणी येतो. त्याच्यामागे धावत येणाऱ्या पावसाचं धरतीवर आगमन होतं. मनात साठलेला पाऊस आकाशातून बरसत राहतो. डोंगरकड्यावरून उड्या मारत मुक्तपणे हुंदडतो. शेतशिवारात येऊन साठतो. उताराच्या वाटेने पळत राहतो. वेडीवाकडी वळणे घेऊन वाहतो. झाडाफुलापानावरून निथळत राहतो.

शेतशिवारातून कामांची एकच धांदल उडते. उद्याच्या भविष्याची बिजे धरतीच्या कुशीत पावसाच्या साक्षीने पेरली जातात. सगळ्यांनाच घाई झालेली. पेरणीची वेळ साधण्यासाठी सगळीच जमवाजमव चाललेली. तुंबलेली कामं एकेक करून हातावेगळी होऊ लागतात. दिवसाचे प्रहर अपुरे पडायला लागतात. कामाच्या धबडग्यात आषाढ मध्यावर येतो तशी वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची आस जागू लागते. डोळे पंढरपुराकडे लागलेले; पण कामांचा रगाडा काही संपायचे नाव घेत नाही. दूर क्षितिजाकडून येणाऱ्या रस्त्यावरून माणसांच्या आकृत्यांचे काही ठिपके दिसू लागतात. कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळा आणि मुखी विठ्ठल नामाचा सोहळा घेऊन भक्तांचा मेळा पंढरपूरच्या वाटेने सरकत राहतो. मनातील भक्तीभाव उसळी घेतो आणि आणखी एक ठिपका त्या मेळ्यात सामावून जातो.

वारकरी आणि विठ्ठलाचे वर्षानुवर्षाचे एकरूप झालेलं नातं. वारी मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित आहे. भक्तीचा सहजोद्गार बनून अनेक वर्षांपासून भक्तांची मांदियाळी वारीच्या वाटेने चालते आहे. या वाटेने चालणाऱ्या सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. त्यांच्या आयुष्याचा उर्जास्त्रोत. तो त्याच्या विचारातच नाहीतर जगण्यात सामावून एकरूप झालेला.

वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणी वारीला निघालेला नसतो. काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने विठ्ठल भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. प्रवासात मिळेल तो घास-तुकडा खातो. सांज समयी आहे तेथे मुक्कामाला थांबतो. दिली कुणी ओसरी देह टेकवायला, तर तेथेच अंग टाकतो. नाहीच काही असले तर गावातल्या मंदिराचा ओटाही त्याला विश्रांतीसाठी पुरेसा असतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचलेला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

काळ बदलला तशी माणसांच्या जगण्याची प्रयोजनेही बदलली. भौतिक सुखांनी माणसांच्या जगात आपला अधिवास निर्माण केला. पण वारी अजूनही तशीच आहे, आपलं साधेपण मिरवणारी. विज्ञाननिर्मित साधने हाती आल्याने कदाचित तिच्यात काळानुरूप सुगमता आली असेलही; पण परंपरेने वाहत येणारे सहजपण आजही तिच्यात कायम आहे.

मनाला ओढ लावणारं वारीत असं काय असावं? माणसं कशाचीही तमा न करता अनवाणी पायांनी वारीच्या वाटेने का धावत राहतात? त्यांच्यात हे सगळं कुठून येत असेल? वारीत एकवटलेली माणसं पाहून हे प्रश्न मनात उगीच भिरभिरायला लागतात. विज्ञानप्रणित निकषांना प्रमाण मानून यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून फार काही हाती लागण्याची शक्यता नसते. भक्तांच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावकल्लोळातून शोधून पाहिले की, ही कोडी उलगडत जातात. ही सगळी श्रद्धावंत माणसं वारीच्या वाटेने वावरताना मनातला अहं गावाची वेस ओलांडतानाच मागे टाकून येतात आणि माणूस म्हणून एक होतात. हे एकरूप होणं त्यांच्या श्रद्धेचं फलित असेल का?

वारी साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, तुमच्याकडील सत्तेची वस्त्रे विसरून वारीत विरून जात असाल, तर सगळ्यांनाच माउलीरूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते. मनात निर्माण झालेलं मीपणाचं बेट या वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण. चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दुःखं दिमतीला घेऊन आलेली असतात. कुणाचं शेतच पिकलं नाही. कुणाचा बैल ऐन पेरणीच्या हंगामात गेला. कुणाचं शेत कर्जापोटी गहाण टाकलेलं, तर कुणाच्या लेकीचं नांदणं पणाला लागलेलं. नाना तऱ्हेची दुःखं सोबत घेऊन भक्त पांडुरंगाला भेटायला आलेला असतो. वारीसोबत वावरतांना अनोळखी मने संवाद साधतात. संवादाचे साकव उभे करून आपलेपणाचा प्रवास घडत राहतो. आपली, त्यांची सुख-दुःखे एकमेकांना सांगितली जातात. ऐकली जातात. मनात लपवलेले दुःखाचे कढ वाटून हलके होत जातात. जगात केवळ मलाच दुःखे, वेदना, समस्या नाहीत. ही जाणीव होऊन जगण्याचं बळ वाढत जातं. माणसाला आपल्यातलं आणि माणसातलं माणूसपण कळत जातं आणि जगण्याची प्रयोजने अधिक गडद होत जातात.

विठ्ठल सर्वसामान्यांचा समन्वयवादी देव आहे. माणसांचं रोजचं अवघड जगणं सुघड करणारा. रोजच्या नव्या मरणाला सामोरे जाणाऱ्या माणसांच्या मनात जगण्याचं स्वप्न पेरणारा. खरंतर दुःखाला ना नाश, ना अंत. माणसं कधी ती स्वतःहून ओढवून घेतात, कधी दुःखंच आपल्या पावलांनी चालून येतात. या साऱ्या कलहात संसाराचा सागर सहिसलामत पार करून पैलतीर गाठणं अवघड असल्याची भक्तांची समजूत झालेली. भवसागर कमरेएवढ्या पाण्याइतकाच तर आहे, तो पार कर, पैलतीर नक्कीच गाठशील, असेच काहीतरी कमरेवर हात ठेऊन खचलेल्या जिवांना विठ्ठल सूचित करीत असावा. विठ्ठल महाराष्ट्राचा सामाजिक देव. ना त्याच्या हातात कोणती आयुधे, ना कोणती अस्त्रे-शस्त्रे. भक्ताला तो हेच सांगत असावा की, तुझं नितळ, निर्मळ मन हेच जग जिंकण्याचं आयुध आहे, ते सांभाळलं की पुरे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकलंस तरी खूप झालं.

श्रद्धाशील अंत:करणातून निर्मित आस्थेने भक्तीचे शिखर गाठणारे आहेत, तसे भक्तांच्या भोळेपणाचा वापर करून स्वार्थ साधणाऱ्यांचीही जगात कमी नाही. ते कालच होते असे नाही, तर आजही आहेत. अनेकांचे अनेक देव-दैवतं असतात. माणसं त्यांच्या कृपाकटाक्षासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत धावाधाव करीत राहतात. कुणी मंत्रतंत्र जागराने ईप्सित साध्य करू पाहतात. कुणी व्रतवैकल्य, जपतप, अनुष्ठानांच्या माध्यमातून सुखाचा सहवास शोधू पाहतात. या साऱ्या धडपडीने सुखं आपल्या अंगणी वास्तव्यास येतात का? हा साधासा प्रश्न भावनांच्या अवेगावर स्वार झालेल्या भक्ताकडून विचारायचा राहूनच जातो. प्राप्त परिस्थितीचे परिशीलन न करता तो सुखाच्या मृगजळामागे धावत राहतो.

वंचित, उपेक्षित, अव्हेरलेल्या जिवांचा जगण्याचा एकमेव आधार श्रद्धा असते. त्यांच्या श्रद्धाशील विचारांचा फायदा घेणारे स्वार्थपरायण माणसे जगात अनेक आहेत. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित युगात ही स्थिती असेल, तर पाच-सहाशे वर्षापूर्वी समाजाचं चित्र काय असेल? अडले-नडलेले जीव सारासार विवेक हरवून बसतात. विवेक हरवलेली माणसे विचार विसरतात. कृती त्यांच्यासाठी दूरचा परगणा ठरते. विवेकी मार्गाने वर्तणाऱ्या कोण्या द्रष्ट्याची नजर समाजातील दुरितांकडे पडणे अशावेळी आवश्यक असते. संतांनी विवेक जागराचे काम केले. नाडल्या जाणाऱ्या समाजाकडे आणि अज्ञाननिर्मित श्रद्धांकडे ही विवेकी माणसं डोळसपणे पाहत होती. लोकांना त्यांच्या दुःखाचे कारण विशद करून सांगत होती. संतांनी विवेक विसरलेल्यांच्या मनात विचाराची बिजे रुजवली. विवंचनेत जगणाऱ्या भक्ताला विवेकी भक्तीमार्गाने नेऊन स्वतःची ओळख मिळवून दिली. सामाजिकस्तरावर स्वतःची कोणतीही ओळख नसणाऱ्यांना विठ्ठलाच्या रूपाने आधार गवसला. भागवतभक्तीच्या भगव्या पताका मुक्तीचे निशाण बनून फडकल्या. येथील मातीचा गंध लेऊन वाहणारा विचार एकवटला. साऱ्यांच्या अंतर्यामी समतेचा एकच सूर उदित झाला. एकत्र आलेली पावले चालत राहिली पंढरपूरच्या वाटेने, मनात श्रद्धेचा अलोट कल्लोळ घेऊन.

संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भक्तीच्या पायावर भागवतधर्माची इमारत उभी राहिली. संत तुकारामांनी तिच्यावर कळस चढवला. भागवतसंप्रदायाची ही सगळी व्यवस्था उभी आहे श्रद्धेच्या पायावर. जगण्याची साधीसोपी रीत संतानी सामान्यांच्या हाती दिली. जातीयतेचे प्राबल्य असलेला तो काळ. विषमता पराकोटीला पोहोचलेली. माणसातील माणूसपण नाकारणाऱ्या मानसिकता प्रबळ झालेल्या. या विपरीत विचारांच्या वर्तुळांना ओलांडून अठरापगड जातीजमातीची माणसे भागवतधर्माचे निशाण हाती घेऊन एकत्र आली. सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी समाजात समताधारीत विचार रुजावा म्हणून सामाजिकक्रांतीचं रणशिंग फुंकलं. संत तुकारामांनी सामान्यांच्या आयुष्यात सन्मानाने जगण्याचा विचार दिला. समतावादी विचारांची गुढी उभारणाऱ्या संतांच्या मांदियाळीने माणसातल्या माणूसपणाला साद घातली. माणसं स्वतःच स्वतःचा शोध घेऊ लागली. जाग्या झालेल्या विचारांचे वारे मनामनातून वाहू लागले.

समाजातील मूठभर मान्यवरांनी निर्माण केलेल्या प्रतिष्ठेच्या परिघाबाहेर आपलं ओंजळभर अस्तित्व सांभाळून जगणाऱ्या माणसांच्या मनात बदललेल्या विचारांचे पडसाद उमटू लागले. भक्तिमार्गाने आत्मसन्मान शोधू पाहणाऱ्या माणसांची पावले पंढरपूरच्या वाटेने वळती झाली. या वाटा समतेच्या दिशेने आणि समन्वयाचा मार्गाने चालत राहिल्या. तत्कालीन समाजाचा परिवेशच सीमांकित होता. त्यात परिवर्तन घडवून आणणे एक अवघड काम होते. दिवा पेटवून रात्रीचा अंधार थोडातरी कमी करता येतो. पण विचारसृष्टीला लागलेलं ग्रहण सुटण्यासाठी परिस्थितीत परिवलन घडून येणे आवश्यक असते. समाज संकुचित विचारांच्या वर्तुळातून पुढे सरकणे आवश्यक होते. सामान्यांच्या विचारकक्षेत असणारा अंधार दूर करण्यासाठी संतांनी सद्विचारांचे पलिते प्रदीप्त करून पावलापुरता प्रकाश निर्माण केला. संतांच्या लेखणी-वाणीतून अभंगसाहित्य प्रकटले. त्याचे पडसाद समाजजीवनावर प्रतिबिंबित होऊ लागले.

भागवत संप्रदाय वर्धिष्णू होण्यामागे महत्त्वाचे कारण त्यात असणारी सर्वसमावेशकता आहे, असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत विसोबा, संत नरहरी, संत सावता, संत सेना, संत चोखामेळा अशी कितीतरी नावे पूर्वसुकृताच्या पुण्याईची, सामाजिक मान्यतेची कोणतीही लेबले सोबत नसताना भक्तीचा प्रवाह बनून लोकगंगेच्या पात्रातून वाहत राहिली. समाजमनाला आकार देत राहिली. कोणत्याही समाजाला शासकापेक्षा शांतता आणि समावेशकता कोणत्याही काळी अधिक महत्त्वाची वाटते. परकीय सत्ताधिशांच्या आक्रमणांनी, त्यांच्या सत्ताकाळांनी देशाचे नुकसान केले असेल-नसेल, त्यापेक्षा अधिक नुकसान विषमतेने कधीकाळी केले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. संघर्ष राजकीय असेल तर शत्रू समोर असतो आणि माहीतही असतो. पण समतेच्या संघर्षात स्वतःशीच लढायचे असते. मनात घर करून वास्तव्यास असणाऱ्या वैगुण्यांशी दोन हात करायचे असतात. संतांचा सगळा संघर्ष समतेच्या जागरासाठी होता. संतांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. वंचनेच्या वर्तुळात बंदिस्त असणाऱ्या समाजाला मी कोण आहे? हे विचारण्याएवढं त्यांनी मोठं केलं. हाती शस्त्रे घेऊन लढणे हा काही अन्यायविरोधात एल्गार ठरत नाही. कधीकधी लेखणीसुद्धा खड्ग बनत असते. संतांच्या लेखणीने नेमके हेच काम केलं आहे. त्यांच्या प्रतिभेतून निर्मित अभंगसाहित्य संघर्षात टिकून राहण्याचं अभंगपण देत होते. किंकर्तव्यमूढ झालेल्या लोकांच्या विचारात प्राण फुंकत होते. सामान्यांसाठी तो स्वजाणिवेचा सहजोद्गार होता.

विठ्ठल सर्वसामान्यांचा हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक. तो साऱ्यांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायासप्रयास करायची आवश्यकताच नाही, हे सांगतांना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, त्याच्या गळा माळ असो नसो.’ भक्ताची भगवंत भेटीसाठी असणारी पात्रतासुद्धा हीच. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे गणवेश म्हणून परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठातून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्यासाठी शास्त्रीय संगीताचा क्लास लावायची गरज नसते. हातात टाळ असला तर उत्तमच, नसला तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता माळी कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदामुळाभाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठल नामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता.

भक्तांची कामे करण्यात कोणतेही कमीपण विठ्ठलास कधी वाटले नाही. तो संत जनाबाईंच्या सोबत दळण दळत होता. संत गोरोबांच्या घरी मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवण्यात त्याला आनंद मिळत होता. संत चोखोबांच्या सोबत मेलेली गुरे ओढत होता. संत रोहिदासांना चांमडं रंगवून देत होता. संत कबीरांचे शेले विणीत असे. म्हणूनच की काय समाजातील साऱ्यांना तो आपला आणि आपल्यातील एक वाटत असे. विठ्ठलाने भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे व्रत कधी टाकले नाही. या सगळ्या गोष्टी कदाचित विज्ञानयुगात कपोलकल्पित वाटतील. विज्ञानाच्या परिभाषेत असंभव वगैरे वाटतील, हे खरंय. पण विज्ञानाचा प्रदेश जेथे संपतो तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो, हे वास्तवही नजरेआड करून चालत नाही. भक्त कोणत्याही युगात वास्तव्य करणारे असोत, त्याच्या जगण्याचे सारे व्यवहार श्रद्धापूर्वक अंतःकरणातून उदित झालेल्या भक्तिभावाने सुरु होतात आणि इच्छित दैवताच्या दर्शनात विसर्जित होतात. महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या श्रद्धा विठ्ठल चरणी समर्पित आहेत. श्रद्धेत डोळसपणा असेल तर अशा भक्तीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. वास्तवाच्या वाटेवर प्रवास करताना श्रद्धाशील अंतःकरण कोणतातरी आधार शोधत असते. त्यांच्या जगण्याला आश्वस्त करणारा आधार विठ्ठल होत असल्यास संदेह निर्माण होण्याचे कारण नाही. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ हे संत नामदेवांचे म्हणणेही अशा भूमिकेत खरेच ठरते. विठ्ठलभक्तीचे साध्यही ज्ञानदीप प्रज्ज्वलित करणे हेच आहे. भक्तीतून भावनांचा जागर करीत माणसांच्या विचारांच्या कक्षा विस्तारत नेणे हेच संतांच्या साहित्याचे, प्रबोधनाचे उद्दिष्ट होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून वारीचा प्रघात असल्याचे म्हटले जाते. जे काय असेल ते असो; पण गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने न चुकता वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. तेथे जावून नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास? कदाचित आपल्या पाठीशी पांडुरंग उभा आहे आणि तो आपणास जगायला प्रयोजने देतो, असे त्यांना वाटत असेल का? कारणे काहीही असोत, आषाढ मासाचा प्रारंभ झाला की, आजही मराठी माणसाचे मन पंढरपुराकडे धाव घेते एवढं मात्र नक्की. विठ्ठलभक्तीचं हे बीज जणू काही त्याच्या रक्तातच पेरून आलेलं असतं. परिस्थितीच्या अवकाशात ते वाढत जातं. दिसामासाने वाढणाऱ्या भक्तीच्या या रोपट्याला आलेलं फळ म्हणजे विठ्ठल, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

19 comments:

  1. सर खूप छान.महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून विठ्ठलभक्त विठ्ठलभेटीची आस मनात घेऊन मैलोनमैल पायी चालत येतात.कुठलाही स्वार्थ नाही.आकस नाही.सारे वातावरण भक्तिमय,विठ्ठलमय.सर्वच सारखे कोणी लहान नाही,कोणी मोठा नाही.सर्व विठ्ठलभक्त.जात,धर्म,पंथ याचे बंधन नाही,कोणता भेद नाही.पद नाही,प्रतिष्ठा नाही.सारे एकसमान.याच तत्वाची आज समाजाला आवश्यकता आहे.एवढे एक तत्व जरी आजच्या so called प्रगत समाजाने अंगिकारले ,एवढा जरी बोध वारीतून घेतला तरी समाजात सुख, शांती,समृद्धी नांदेल व अल्पावधीतच समाजाचा उत्कर्ष होईल यात शंका नाही.

    ReplyDelete
  2. ज्ञानोबा तुकारामांनी समाजातील विषमतेचे चटके सहन केले असल्यानेच समाजात समता विश्वबंधुता निर्माण व्हावी याच उद्देशाने शेकडो वर्षांपूर्वी 'वारी'ची सुरुवात केली. समाजातील वंचित अडाणी घटकांना सोबत घेतले कारण विद्वतजनांमध्ये स्व ची बाधा लवकर होते. सामान्य माणूस श्रद्धाळू असतो परन्तु त्याच्या श्रद्धेचा अतिरेक होऊन तो अंधश्रद्ध होऊ नये म्हणून कमरेवर हात असलेला व दोनच हात असलेला शस्त्राविना असलेला कुठल्याही दानवांचा अथवा राक्षसांचा नाश न करणारा व आपल्यातलाच वाटावा असा देव निर्माण केला त्याला सोवळं ओवळ लागत नाही. त्यामुळे सामान्य समाज त्याकडे आकर्षित झाला. स्वत्वाचा त्याग,सामावून घेण्याची वृत्ती व मिळेल त्यात समाधान मानणे या तीन गोष्टींवर वारीची जडण घडण झाली आहे. व ती वारकऱ्यांच्या जगण्याची पद्धतीच झाली आहे. वर्षभरामध्ये कुटुंबाचा गाडा ओढत असतांना आलेल्या विविध अनुभवांमुळे वारीच्या विचारांची सैल झालेली वीण घट्ट करण्यासाठीच दर वर्षाची ही वारी असते.माझ्या वडिलांची मिराशीगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या वचनाप्रमाणे पंढरीची वारी आहे माझे घरी असे अभिमानाने सांगणारी नवी पिढी जन्माला येते व ही ध्वजा एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर संक्रमित होत असते. अध्यात्माला पराकोटीच्या भक्तीची जोड असल्याने येथे कर्मकांडाला स्थान नाही पायात नको म्हणून पिशवीत चपला ठेऊन वारकरी पाया पडतो. पांडुरंग हे वारकऱ्यांचे दैवत नसून जगण्याचे तत्व आहे म्हणून ते सदैव त्यांच्यासोबतच असते. त्यामुळेच सगुण साकार मूर्तीच्या दर्शनापेक्षा माणसातील निर्गुण निराकार परमेश्वराचाच शोध घेत असतो व व एकमेकांच्या पाया पडत असतो.
    आपण वारीचे अगदी यथार्थ वर्णन केले आहे आपला व्यासंग वाचन व इतरांशी चर्चा करतांना विचार टिपून घेण्याची मधुमक्षिका वृत्तीच यातून स्पष्ट होते. वारी कडे आपण अध्यात्माऐवजी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पहिले तरच वारीचे योग्य विश्लेषण व आकलन होते हे आपल्या लेखातून पावलो पावली जाणवते. आपली संवेदनशीलता, सृजनशीलता, व अभ्यासूवृत्ती याही लेखातून व्यक्त होते. विविध विषयांवर लीलया व्यक्त होणारी आपली लेखणी येथे कमालीची याहसवी झाली आहे यात शंका नाही...संजय पिले

    ReplyDelete
    Replies
    1. संजय पिले सर,

      महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विचारातून वारकरी आस्था संवेदना बनून वाहते आहे. लहानपणापासून हे सगळं पाहत आलोय. कदाचित त्या विचारांचे ठसे मनावर गोंदले गेले असावेत. आसपास अशी अनेक श्रध्दाशील मने मी पाहली, अनुभवली आहेत. कदाचित तेच शब्द बनून प्रकटले असावे.

      वारकऱ्यांची समत्वदर्शी वर्तनाची रीत माझ्या आस्थेचा विषय आहे. माणसातील माणूसपण शोधणारी संतांची व्यापक विचारसरणी खरंच चिंतनीय आहे. विषमतेच्या त्या काळात सर्व जातीजमातीच्या लोकांना आपल्यात समावणारा वारकरी पंथ समाजात वैचारिक परिवर्तन घडवू पाहत होता आणि हीच त्याकाळी गरज होती.

      काही स्नेह्यांनी या विषयावर लिहा म्हणून आग्रह धरला होता. हे सुद्धा एक कारण. खरंतर हा लेख मी आध्यात्मिक अंगाने लिहला नसून समाजशास्त्रीय विचारांना केंद्रित ठेवून लिहला आहे. आध्यात्मिक अंगाने लिहणे शक्य असले, तरी त्यात उणिवा राहिल्या असत्या. म्हणून मला माहीत असणाऱ्या विचारांनाच लेखांकित केले. अर्थात, प्रत्येक गोष्टीत विवादित स्थळे असू शकतात. त्यांना टाळून भक्तांच्या विचारवर्तुळातील भावना, भक्ती, दैवत आणि त्यांचं व्यक्त होणं, या मुद्यांना माझ्या आकलनाचा परीघ करून लिहता झालो.

      सविस्तर प्रतिक्रेयेबद्दल आभार!

      Delete
  3. आपली लेखणी कमालीची यशस्वी झाली यात शंका नाही...संजय पिले

    ReplyDelete
  4. सर लेखनात आपल्याला खरंच तोड नाही

    ReplyDelete
    Replies
    1. मंदार, मनःपूर्वक आभार!

      Delete
  5. छान लेख आहे.

    ReplyDelete
  6. छान लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. बावस्कर मॅडम, मनःपूर्वक आभार!

      Delete
  7. वा रे! वारी.खुपच छान.मला वाटतं, वारी म्हणजेच वारकऱ्यांची रीघ.
    वारी आणि विठ्ठलाच्या नात्याची सुंदर गुंफण. वारकऱ्यांच्या साधेपणाने यथार्थ वर्णन.वारीबद्दल तुमच्या वाणी ऐवजी लेखणीतुन आम्हाला तुमच्या विचारांनी वारी घडवली यात शंका नाही.पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या वैचारिक प्रगल्भतेला अभिवादन.

    ReplyDelete
  8. वा रे! वारी.खुपच छान.मला वाटतं, वारी म्हणजेच वारकऱ्यांची रीघ.
    वारी आणि विठ्ठलाच्या नात्याची सुंदर गुंफण. वारकऱ्यांच्या साधेपणाने यथार्थ वर्णन.वारीबद्दल तुमच्या वाणी ऐवजी लेखणीतुन आम्हाला तुमच्या विचारांनी वारी घडवली यात शंका नाही.पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या वैचारिक प्रगल्भतेला अभिवादन.

    ReplyDelete
    Replies
    1. योगेश, मनःपूर्वक आभार!

      Delete
  9. पंढरपूरहे नाव कानी पड़ताच ,मराठी मानसाला एक वेगळा आनंद येतो. कारण विठ्ठलाच्या भेटीसाठी वारीत पयवीट करून मगच विठ्ठलाचे दर्शन घेतले की,मग आपले जीवन धन्य झाले .असे मराठी मानसाला वाटते. अप्रतिम सर.

    ReplyDelete