Anvay | अन्वय

By // 10 comments:
अन्वय आत्ममग्न असण्याचा

टीव्हीवर कार्यक्रम पाहत निवांत पहुडलेलो. शेजारीच मोबाईल पडलेला. रात्री दहा-अकराची वेळ असावी. फेसबुक, व्हॉटसअप, हाईकची घरं शोधत कुठून कुठून येणारे मॅसेज इनबॉक्स मध्ये येऊन धडकतायेत. वेगवेगळ्या रिंगटोन्सचा आवाज आपल्या आगमनाचा सांगावा घेऊन येतायेत. त्या आवाजांनी लक्ष विचलित होते. कोणते मॅसेज आलेयेत, हे पाहण्यासाठी उत्सुकतेने मोबाईल उचलतो. एव्हाना इनबॉक्समध्ये येणाऱ्या आगंतुक संदेशांची गर्दी बरीच वाढत चालली आहे. मॅसेज चाळताना मोबाईलमधील संपर्क नामावलीत आसनस्थ असणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याच्या नावाकडे लक्ष गेले. सहसा कोणाला मॅसेज न पाठवणारा हा गडी. ठरवून मॅसेज पाठवतो म्हणून कुतूहल जागे झाले. वाचून पाहूया, म्हणून पाहिला. ‘संपर्कमाध्यमे: किती उपयुक्त किती अनउपयुक्त’ याबाबत त्याला काही मुद्दे हवे होते. कुठल्यातरी निबंध, वक्तृत्त्व स्पर्धेत त्याचा चिरंजीव सहभागी झाला होता. म्हणून ते पाठवण्याची विनंती केलेली. तो मॅसेज वाचून क्षणभर मनाशीच हसलो. मीडियाचे माध्यम वापरून तू तरी काय करतो आहेस? असा प्रश्न त्याला विचारावासा वाटला, पण तो मोह टाळून त्याच्या समाधानासाठी दिले काही मुद्दे पाठवून.

निमित्त म्हणून हाती घेतलेल्या मोबाईलच्या मायाजालात एव्हाना नकळत गुंतत गेलो. आलेले मॅसेज वाचतांना त्यात हरवलो कधी ते कळलेच नाही. अर्थात हेही नेहमीचेच. एकदा का या मोहजालात गुंतले की, कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेल्या किटकासारखी स्थिती होते. कितीही सुटायचा प्रयत्न करा मुक्तता होणे अवघड. गुरफटणेच जास्त. समोर टीव्हीवर जाहिरातींचा अखंड रतीब सुरु. त्यांचा गलका वाढलेला. प्रत्येकजण आपलेच उत्पादन कसे उत्तम, हे पटवून सांगतोय. ते सांगण्यासाठी गरज असली काय, नसली काय, तरी आखीव, रेखीव देहाच्या लावण्यवती लचकत, मुरडत सुहास्य वदनाने पडद्यावर येतात. नाजूक किणकिणत्या आवाजाने काही सेकंदाचा संवाद साधतात. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही टीव्ही घेतला, त्यासाठी डिश आणला तर आम्ही ठरवू तेच पहा, हे त्यांनी परस्परच ठरवलेलं. कार्यक्रम पाहण्यासाठी महिन्याचे काही पैसे तुम्ही मोजत असलात तरी. दुसरा विकल्पच नसल्याने आलिया भोगाशी... म्हणत समायोजन साधणे एवढेच दर्शकाच्या हाती असते. या जाहिराती कितीजण मनापासून पाहतात, ते जाहिरातदारांनाच माहीत. ब्रेकमध्ये मोबाईल हाती घेऊन बसतो. मोबाईलच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित झाल्याने त्या आरडाओरडीचा परिणाम गोंगाटाशिवाय दुसरा शून्यच. मॅसेज एकेक करून वाचले जातायेत. काही आधी, काही नंतर एवढाच काय तो फरक.

मोबाईल आवश्यक की अनावश्यक, हा वादाचा विषय असू शकतो. त्याचं समर्थन करणारे तो दैनंदिन जीवनाची अनिवार्य आवश्यकता कसा ते आग्रहाने सांगतात. विरोधी मत असणारे हे उगीचच ओढवून घेतलेलं विकतचं दुखणं असल्याचं पटवून देतात. कुणी काही म्हणाले, नाही म्हणाले तरी यामुळे परिस्थितीत फारसा काही फरक पडत नाही. ज्याला जे करायचे, ते तो करतो, हेच वास्तव आहे. तसे नसते तर स्मार्ट झालेल्या मोबाईलने माणसांच्या मनांवर एवढी मोहिनी घातलीच नसती. घरात एकवेळ पुरेशा सुविधा नसल्या तरी चालेल; पण मोबाईल असलाच पाहिजे, हा सार्वत्रिक आग्रह. कधीकाळी संवादापुरता सीमित असणारा मोबाईल तंत्रक्रांतीच्या मार्गाने विकसित होत स्मार्ट झाला; पण माणसे तंत्रज्ञानाचा वापर करताना आपला अंगभूत स्मार्टनेस विसरली. महिन्यामहिन्याला बदलणाऱ्या त्याच्या रंगरुपाने विचलित झाली. कंपन्यांमधील तीव्र व्यावसायिक स्पर्धेतून तो नुसता स्मार्टच नाही, तर सुंदर आणि स्वस्तही झाला. संवादाव्यतिरिक्त संप्रेषणाच्या साऱ्या प्रवाहांना आपल्यात सामावून घेताना प्रतिष्ठेचे प्रतीक बनला. नवा मोबाईल, त्याचे नवे मॉडेल हाती असणे प्रगती, तर जुन्या मॉडेलसह वावरणे तंत्रक्षेत्रातील मागासपणा समजला जातोय.

काळासोबत तंत्रज्ञानही कूस बदलते आहे. ते आवश्यकही आहे. तंत्रज्ञानाला परिणत संवेदनांचा स्पर्श असला, तर ते उपयुक्त असते, याबाबत कुणाच्या मनात संदेह असण्याचे कारण नाही. हल्ली सर्वच क्षेत्रात संवेदनांचा प्रवास उतरणीला लागल्याचे बोलले जाते. विश्वाच्या पसाऱ्यात माणसांचे वेगळेपण अधोरेखित करणारे काही असेल, तर त्याच्याजवळ असणारे संवेदनशील मन. मनाचे व्यापार प्रसंगोत्पात कसे असतील, असावेत; याचं विश्लेषण मानसशास्त्रज्ञ करतील. पण हल्ली संवेदनांचा अर्थच मानसशास्त्रज्ञांनाही कळणे अवघड होत चालले आहे की काय, असे वाटण्याइतपत माणसांचे विचार गोठत चालले आहेत. भावना बोथट होत आहेत. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातात मदत करा, म्हणून फलक समोर दिसत असतात. दुर्दैवाने रस्त्यावर एखादा अपघात घडतो, तेव्हा मदती ऐवजी कुणीतरी आपल्याकडील मोबाईलमध्ये रक्ताळलेले चेहरे चित्रांकित करण्यात गुंतलेला असतो. त्याला ते फॉरवर्ड करायची घाई झाली असते. अपघातग्रस्त मदतीची याचना करीत अखेरच्या आचाक्यांकडे सरकत असतो आणि याच्या मोबाईलचा कॅमेरा झूम होऊन वेदनांनी विव्हळणाऱ्या चेहऱ्याजवळ पोहचत असतो. कुठलं हे आपलं माणूसपण? अशावेळी विचारांना थोडातरी वाव नसावा का? की माणसांची मनेही बर्फासारखी गोठत चालली आहेत?

कुणीतरी तो-ती कुठल्याशा तरल क्षणी एकमेकांच्या समीप येतात. स्नेहाच्या रेशीमधाग्यांचे गोफ विणले जातात. सहवासातून सहजपणे जवळीक वाढवण्याचं काम निसर्ग करीत राहतो. माणसं त्याला प्रेम, मैत्री, स्नेह वगैरे अशा काही गोंडस नावांची लेबले लावतात. झोपाळ्यावाचून झुलणाऱ्या क्षणांना सोबत घेऊन मने स्वप्नांच्या आकाशात विहरत असतात. त्या हळुवार क्षणांना स्मृतीच्या कोंदणात कायमचे कोंडण्याचा मोह ठरवूनही टाळता येत नाही. कॅमेराच्या डोळ्यांनी दृश्ये नजरबंद होतात. टिपलेल्या छब्या स्वतःच्या मर्जीने फेसबुकच्या वॉलवर चिटकवल्या जातात. अर्थात हा स्वखुशीचा सौदा असला, तरी त्याला सर्वजनिकतेचा स्पर्श लाभतो, तेव्हा संस्कारांच्या सीमारेषांचे सीमोलंघन घडते आहे का, हे पाहण्याचा विचार मनात येतोच असे नाही. हवे नको ते कॉमेंट्स ललाटी मिरवत त्यांचा प्रवास घडत राहतो. आप्त, मित्र, स्नेही अशा मार्गावरून प्रवास करीत राहतो. त्याच त्या छापाचे अर्थहीन लेबले ललाटी लावून त्यास अप्रतिम म्हणण्याची अहमहमिका लागते. आशयघन शब्दांचा दुष्काळ असलेल्या फालतू कॉमेंट्सची रेखाटने करीत ती पोस्ट भटकत राहते. कधी कुण्या छुप्या नजरेचा पाठलाग घडत राहतो. नको तितक्या समीप आणणारे क्षण कॅमेराच्या करामतीने कंटकांच्या कराल हाती लागतात. आणि पुढचा वेदनादायी प्रवास सुरु होतो. ते सार्वजनिक होताना कुणा अश्राप जिवाचे आयुष्य पणाला लागते. विकृत मानसिकता धारण करून वावरणाऱ्या विचारांचे विकृत शब्द एखाद्या पोस्टवर शब्दांकित होऊन जटिल प्रश्न निर्माण करतात. छुप्या नजरेने कॅमेरा कुठे डोकावेल, हे सांगणं ब्रह्मदेवालाही अवघड आहे. सार्वजनिक ठिकाणी सावज हेरण्यासाठी विकारग्रस्त नजरा भिरभिरत असतात. कपड्यांच्या दुकानातील ट्रायलरूम्सपासून हॉटेल्समधील रूम्सपर्यंत. तेथील मिनिटाच्या चित्रीकरणाने अनेकांच्या आयुष्याची झालेली वाताहत आपण ऐकतो, तेव्हा मनात विचार येतो, ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’

डोंगराच्या सुळक्यावर बसून मुलांनी काढलेला सेल्फी काही दिवसापूर्वी सर्वत्र संचार करीत होता. पाय खाली सोडून ही मुले बसली होती तेथून शेकडो फूट खोल दरी खाली. पाहणारा अवघडून जावा असे दृश्य. सेल्फी काढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण कोणी जगज्जेते सिकंदर, नेपोलियन असल्याचे भाव. एका क्षणाची चूक आणि तिचे भीषण परिणाम काय असू शकतात, हे न समजण्याइतपत ही पोरं विचारांनी वंचित असतील का? सेल्फीच्या नादात जीव गमावणाऱ्यांची उदाहरणे काही कमी नाहीत. जगात रोज लाखोंच्या संख्येने सेल्फी माध्यमांतून फिरत असतात. उगीचच वेडेवाकडे चेहरे करून, विक्षिप्त हावभाव करीत  काढलेली छायाचित्रे फॉरवर्ड करून त्यांना लाईक्स, कॉमेंट्स किती येतील, याची वाट पाहणारे अनेक वेडे जगात आहेत. सतत सेल्फी काढून स्वतःला मिरवत राहावसं वाटणं मनाचा असमतोल प्रदर्शित करीत नाही का? सेल्फी आजार होऊ पाहतो आहे. वैयक्तिक जीवनातील कोणत्या गोष्टी सार्वत्रिक कराव्या, याचेही तारतम्य प्रसिद्धीसन्मुख राहणाऱ्यांना नसावे का? अशा माणसांना स्थलकालाचे काही भान नसावे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या वर्तनात दडलेले असते. माणसाला मुळात मिरवण्याची हौस असतेच. तो कितीही नाही म्हणत असला तरीसुद्धा. कोणीतरी आपल्याला पाहतो आहे, आपल्या वर्तनाला अधोरेखित करतो आहे. हे विचार सुखावणारे असतात. हल्ली मिरवण्यासाठी अनेक प्रगत, अधिक वेगवान साधने हाती आल्याने मिरवणूक सुलभ झाली आहे, हेही सत्यच.

काही दिवसापूर्वी माध्यमांच्या संदर्भात आम्हा मित्रांमध्ये बोलणे सुरु असताना माझ्या एका स्नेह्याने त्याच्या मित्राच्या वर्तनविषयी त्याला आलेले अनुभव सांगितले. म्हणाला, स्वतःभोवती प्रसिद्धीचे आभासी वर्तुळ तयार करून त्यातल्या मृगजळी सहवासात रमणारा हा माणूस. त्याच्या स्वभावाचे अनेक परिचितांनी अनेक मार्गांनी विश्लेषण केले. या माणसाबाबत सगळीकडून उत्तर एकच, स्वतःला मिरवून घेण्यापलीकडे याच्याकडे आणखी काहीही नाही. काहींना मिरवण्याची हौस असते, त्यातलाच हा एक. काहीही करेल, पण प्रसिद्धीच्या प्रकाशात आपण राहायलाच हवे, असे वाटणारा. तीच जगण्याची निदान आपल्यापुरती तरी सुयोग्य रीत मानणारा. कुणी निंदा अथवा वंदा... असे याचे वावरणे. फेसबुकवर शेकडो मित्र, त्यांचे हजारो लाईक्स, व्हॉट्सअपवर एवढे मित्र, त्यांचे असे गृप, हे सांगण्यात श्रीमंती मानणारा. आत्मस्तुतीत रमणारा. स्वतःसाठी अनेक बिरुदावल्या लावून घेणारा. समोरची माणसे आपलं निरीक्षण करतायेत, वर्तनाचे विश्लेषण करीत आहेत. ते काय म्हणतील, याची जराही तमा न बाळगणारा. बरे कुणी समजावून सांगितले, तरी वर्तनात काडीचाही फरक न पडणारा. अशी माणसे शेकड्याने आपल्या आसपास संचार करीत असतात. समाज यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतो. आत्ममग्न माणसांसाठी माध्यमे मदतीला धावून आली आहेत. व्हर्च्युअल जगात रमणाऱ्यांना अॅक्च्युअल जगाशी डिसकनेक्ट करणारी मनोवृत्ती अमरवेलप्रमाणे वाढतेच आहे. ज्या झाडाच्या पर्णसंभारावर चढली तेथूनच विस्तारणारी. अशा काही प्रसिद्धीपरायण पुण्यात्म्यांच्या सहवासाने पावन होणारी ही साधने अशावेळी वैताग वाटायला लागतो.

स्वतःच्या सर्जनशील विचारांचा अविष्कार असेल आणि तसे काही विचार संप्रेषण माध्यमातून पाठवले जात असतील, तर कुणास संदेह वाटण्याचे काही कारण नाही. कुठूनतरी कॉपी करायचं आणि पेस्ट करून मिरवायचं व्यसनच काहींना लागले आहे. ना त्याला अर्थ, ना कोणते मोल. सगळा कचराच उडत असतो इकडे तिकडे. बरे समोरच्यास काय आवडेल, हे त्यांनीच परस्पर ठरवून घेतलेलं. गृपवर एकच मॅसेज परतपरत फिरून येत असतो. तो पाठवतांना जरा विचार तर कराल की नाही. गृपवर आहात तर आधी बघाना काय आलंय; पण नाही, यांना घाई झालेली. कुठल्यातरी फालतू चित्रावर, संदेशावर पसंतीची मोहर अंकित. व्वा! मस्तच! एक नंबर! असे काय काय लेबले लावून मैत्रीच्या गंधाने उतावीळ गृप दरवळत असतात. हल्ली तसेही माणसांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हसू हरवलेच आहे. ते स्माईलीतून उसनवार घेऊन हसरे चेहरे शोधण्याचा तर्कहीन प्रयत्न घडत राहतो. वाढदिवस शुभेच्छांच्या शुष्क कर्मकांडात पार पाडण्याची चढाओढ लागलेली असते. चित्रांचे केक आणि कुणीतरी केलेल्या अर्थहीन विशेषणांनीमंडित काव्यपंक्ती पाठवण्याची स्पर्धा सुरु असते. वाढदिवस साजरा करताना चिखलात लोळून घेतल्यासारखा केक चेहऱ्यावर चिटकवून काढलेले फोटो नित्याचे झाले आहेत. औपचारिक अभिनंदनात पार पडणाऱ्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणाऱ्याच्या मनात खंत असते. मी शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून समोरच्यास वाईट तर वाटणार नाही ना! म्हणून पाठव काहीतरी. माणूस भावनांनी एवढा क्षूद्र झाला आहे का? कुणी शुभेच्छा नाही दिल्या, म्हणून वाढदिवस पुढे वाढायचा राहणार आहे का?

माणूस समाजशील वगैरे असल्याचे म्हटले जाते. पण समाजपरायण असणे आणि तसेच वर्तने यात बरंच अंतर वाढत चाललंय. समाजाच्या प्रगतीसाठी माध्यमांतून काहीच घडत नाही, असे नाही. काही चांगलेही घडते आहे. पण सामाजिकतेच्या नावाखाली संपर्कमाध्यमातून चमकण्याची संधी शोधली जाते, तेव्हा शहाण्या माणसाने न बोलणंच संयुक्तिक ठरते. कोण्यातरी नेता, अभिनेता, खेळाडूच्या यशाचा उत्सव करणारे अनुयायी कोणती भक्ती प्रकट करतात कोणास ठावूक. इतिहासाच्या पानात विसावलेल्या आणि आपल्या असीम कर्तृत्त्वाची नाममुद्रा कालपटावर अंकित करीत, समाजासाठी आदर्शांची परिमाणे उभी करणाऱ्या थोरांच्या जीवनाचे चित्रण करून त्याखाली आपली छबी चित्रांकित करणाऱ्यांना महापुरुषांचे इहलोकी घडलेले अनुपम कार्य अभ्यासाने तरी अवगत झाले आहे का? असा प्रश्न कोण्याही विचारी माणसाच्या मनात आल्यास नवल वाटायला नको. बरे येथेही थोरांच्या कार्याला विविध जाती, धर्म, पंथ, वंश आदी चौकटींमध्ये बंदिस्त केलेले. ज्यांनी जात, धर्म, वंश भेदांच्या भिंती उभ्या करण्याचा कधी चुकुनही विचार केला नाही. अवघं विश्वच आपलं घर समजून जीवनयापन करणारी ही निर्मोही माणसे. चमकणाऱ्या माध्यमांच्या जगात आंधळ्या अनुयायांच्या विचारांच्या वर्तुळात कोंडले जातात. खरंतर ज्यांच्या जीवनकार्याच्या ज्योतीच्या प्रकाशात सद्विचारांचा पथ सहज सापडावा, त्यांच्या विचारांना वैयक्तिक अभिनिवेशात बंदिस्त करून कोणते समाधान प्रसिद्धीपरायण भक्तांच्या अंतर्यामी उदित होते, सांगणे अवघड आहे.

हल्ली कुठल्या कारणांनी माध्यमांचा वापर करायचा, याचं भान समाजाने सोयिस्कररित्या विस्मृतीच्या कोशात टाकून दिले आहे की काय, असे वाटायला लागले आहे. फेसबुकवर माझे हजार मित्र आणि गल्लीत विचारात नाही कुत्रं, अशी स्थिती आसपास दिसते. माणसातला व्हर्च्युअल संवाद वाढतोय; पण अॅक्च्युअल संवाद संपतोय, त्याचं काय? एक काळ होता, जेव्हा माणसं गावाच्या पारावर, घरी, ओसरीवर, अंगणात चार घटका एकत्र येत. आपापसांत बोलणं घडत रहायचं. भावनांच्या वाटावरून आस्थेचा संवाद घडायचा. संवादाला आपलेपणाचा स्नेहिल स्पर्श लाभायचा. सारंकाही फेस टू फेस असायचं. राग, लोभ, मैत्रीचे बंध जुळवत माणसं जवळ यायची. आजचं चेहरा हरवलेलं जगणं नसायचं. हल्ली प्रत्येकच आत्ममग्न होत चालला आहे. मोबाईलच्या चारपाच इंची खिडकीत बंदिस्त होत आहे. मराठीत एक म्हण आहे, नऊ घरं आणि वाकडी दारं. आज घराची दारं बंद आहेत आणि घरात माणसं बंदिस्त. फ्लॅट संस्कृतीत स्पेस नावाचा विचार की विकार मूळ धरू लागला आहे. स्पेस नावाखाली स्वातंत्र्याचा सोयीस्कर अर्थ शोधला जातोय.

हल्ली कुठेही गेले तरी माणसांची डोकी मोबाईलमध्ये आणि डोळे स्क्रीनवर विसावलेले. संवाद मित्रांसोबत, पण अवधान दुसरीकडेच. कार्यालये, सिनेमागृहे, प्रवास काहीही असो साऱ्यांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खिळलेले दिसतील. कुठल्यातरी वक्त्याच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आधीच सूचित केलेले असते मोबाईल बंद ठेवा. पण कुणीही फारसं मनावर घेत नाही. मध्येच रिंग वाजते. माणसं सरावाने दुर्लक्ष करीत राहतात. काही क्षणभर चिडतात, पण काहीच करू शकत नाहीत. कारण आमचे सार्वजनिक वर्तन असेच असते. एवढेच काय; पण शाळा, महाविद्यालये- जेथे ज्ञानसाधना घडते, तेथे तरी आपापसात संवाद आहे कुठे. पूर्वी शिक्षकदालनात शाळा, शिक्षण, पुस्तके, विद्यार्थी असं काहीकाही शिक्षक आपापसांत बोलत असायचे. चर्चा घडायच्या. वादसंवाद रोजच असायचा. ऑफ तासिका विचारांचा जागर असायच्या. आता प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतला आहे. गुंतलेली माणसे अस्वस्थ होत आहेत. बेचैन झालेली मने उगीच द्वेषाचा, मत्सराच्या मुलाम्याचे मनावर लेपन करीत आहेत. आत्मलीन, आत्ममग्न होणाऱ्या माणसाकडून घडणारी प्रत्येक कृती संवादाला संपवते आहे. अर्थात याची जाणीव कुणास नसेल, असे म्हणणे विपर्यस्त ठरेल. तुटत जाणारी नाती संवादातून कधीकाळी सांधली, बांधली जायची. परिस्थितीच्या आघाताने विखुरलेली माणसे सावरली जात होती. हल्ली नाती विसरलेला संवाद तंत्रज्ञानातून निर्माण झालेली विसंगती ठरू पाहत आहे. दुर्दैव हेच की, हे सगळं माणसांना कळतंय; पण वळत मात्र नाही.

लहानापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या मनावर मोहिनी टाकणारं हे तंत्रज्ञान सररास वाईट आहे, असे म्हणण्याचे कारण काहीच नाही. तंत्रज्ञान कधीच वाईट नसते. चांगली किंवा वाईट असते, त्यास वापरण्याची पद्धत. तंत्रज्ञान कोणत्या हातात आहे आणि त्या हाताना नियंत्रित करणारे विचार कसे आहेत, त्यावर त्याचे मोल ठरत असते. तंत्रज्ञानाचा मोठा दोष कोणता असेल, तर ते मुक्त असणे हाच आहे. विचारवंतापासून समाजकंटकांपर्यंत कोणालाही त्याचा वापर करता येतो. वापरकर्ता कोण, कसा असेल त्यावर त्याचे परिणाम ठरतात. कधीतरी अनेक वर्षापासून हरवलेलं कुणी या तंत्रज्ञानाच्या संवादाने सापडते. कुण्या पीडितांच्या मुक्तीचे मार्ग माध्यमांचा वापर करून सापडतात. कुण्या गरजवंतास वेळीच मदत पोहचते. कधी विशिष्ट विचारांचे विखार पेटवून वातावरण कलुषितही होऊ शकते. कुणाच्या आयुष्यभराची पुंजी एका क्लिकने लंपास होते. कुणाच्या नावाने फेसबुकची खोटी पेजेस तयार करून अश्लाघ्य वर्तन घडते. कधी विचारांच्या शांत जलाशयात अविचारांचे विष पेरले जाते. माणसे भडकतात आणि दिसेल त्यावर जाऊन धडकतात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. कधी व्यवस्थेच्या विरोधातले आवाज क्रांतीचा उद्घोष करीत माध्यमांच्या भिंतींवर प्रकटतात. तर कधी अन्यायाच्या विरोधात विचारांना धार लावली जाऊन राजकीय, आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवता येणे शक्य असल्याचे संदेश येथूनच भटकत राहतात. अज्ञात असणारे परगणे, दुर्लक्षित असणारे काम आणि ते करणारी माणसे, सहज घडणारी सेवा माध्यमांच्या संवादातून समाजासमोर येते. सद्विचारांचे मळे फुलत जातात. असं बरंच कायकाय हे तंत्रज्ञान करू शकतं. अर्थात हे वापरणारे हात कोणाचे आणि त्या हातांना वळण देणारे विचार कोणते आहेत, तेच हे ठरवू शकतात.

डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहताना प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा व्हावा, हे ठरवणं अवघड नाही. तंत्रज्ञानाला स्वतःचा चेहरा असावा तो नुसताच देखणा नसावा, तर विचारांनी युक्त असावा. पण हल्ली विचारांची शक्तीच क्षीण होत चालली आहे की काय, असा संदेह विचारांमध्ये निर्माण होऊ पाहतो आहे. कसलाही विचार न करता पोस्ट फॉरवर्ड करणं. खाजगी जगण्यातले क्षण सार्वत्रिक करणं, एखादं क्षुल्लक यश जगजाहीर करणं, एखाद्याचा वाढदिवस म्हणजे कोण्या महात्म्याचा वाढदिवस असावा, या अभिनिवेशात साजरा होतांना फडकत राहणं. हे जरा अतीच होतंय. मीडियावर सकस, सुंदर, संवेदनशील असंकाही नसतं, असं अजिबात नाही; पण ते बोटावर मोजण्याइतकेच. बाकी सारा उकिरडा, असे कोणास वाटत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? तरीही आम्ही या कचऱ्यात का भटकतो आहोत? याचं उत्तर माहीत असूनही कोणी काहीच कसे करीत नसावं? मनात उदित होणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे कोणत्या संपर्कमाध्यमातून शोधावीत?

Kalaha | कलह

By // 10 comments:
कलह, भांडण, संघर्ष, तंटा, वाद असे शब्द बऱ्याचदा त्यांच्या अर्थाचा आशय भिन्न असला तरी बहुदा भांडण या अर्थाने वापरले जातात. अर्थात ढोबळमानाने या शब्दांचा वापर करायचा असेल तर. संघर्ष या अर्थाने बोलताना कलह हा शब्द विपुल प्रमाणात वापरला जातो. मला नाही वाटत या शब्दाविषयी आपल्यापैकी कोणी अनभिज्ञ असेल. जीवनात प्रत्येकाने कधीतरी लहानमोठ्या कलहांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतोच असतो. तसं पाहता कलह शब्दाचा वावर जितका वैयक्तिक असतो तितकाच वैश्विकदेखील. त्याच्या अस्तित्वाच्या सीमा स्वपासून सर्वस्वापर्यंत नेऊन शोधता येतात.

कलहप्रिय परिस्थिती आणि माणसेही कोणास आवडत नाहीत. हा अनुभव सार्वत्रिक असला तरीही कलह घडवून आणणारा परिस्थितीशिवाय आणखी एक घटक माणूसच असतो, हे सत्यही नाकारता येत नाही. जीवनात कलह नसणारा माणूस शोधून सापडणे मुश्कील आहे. जन्मापासूनच माणसांची संघर्षयात्रा सुरु असते. इहलोकी जन्म घेऊन वातावरणात त्याने घेतलेला पहिला श्वास त्याच्या वाट्यास आलेल्या संघर्षाचे फलित असते. जीवशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून एखादाच मॅरेथॉन रेस जिंकतो. ओव्हमशी संपर्क घडून जीव नावाचा आकार निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. खरंतर तेव्हापासूनच या संघर्षाला प्रारंभ होतो. अपेक्षित लक्षाच्या दिशेने धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून काहीच जगतात. बाकीचे मरतात. जगलेल्यातील एखादाच शक्तिशाली असतो, तो अपेक्षित लक्ष गाठतो. जीव नावाचा देह धारण करून आकाराला येईपर्यंत निर्मितीचा संघर्ष सुरूच असतो. जिवांच्या विकासक्रमातील सगळ्याच अवस्थांमध्ये पुढेही अटळपणे सोबत करीत राहतो. या अंगाने विचार करताना संघर्षाचे गुण आपल्या गुणसूत्रांसोबत घेऊनच कोणताही जीव धरतीवर येतो. नंतर सुरु होतो पुन्हा त्याच्या जगण्याचा आणखी एक नवा दीर्घकालीन कलह, हा असतो टिकून राहण्यासाठी.

कलह सजीवांच्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांना व्यापणारा आणि सामावून घेणारा आहे. माणसांच्या आदिम अवस्थेत जिवंत राहण्यासाठी आणि उदरभरणाच्या प्रश्नांपोटी कलह घडत राहिले आहेत. आपला परगणा, परिवार सुरक्षित राखण्यासाठी आणि परिस्थितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माणूस इतरांशी भांडत राहिला आहे. या कलहात स्वरक्षण हेतू असला तरी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न त्यास आंतरिक समाधान देणारा, सुखावणारा असतो. मनोवांछित सुख संपादन करताना माणूस केवळ माणसांशीच लढत राहिला असे नाही. निसर्गातील इतर जिवांशीसुद्धा त्याला दोन हात करीत राहावे लागले आहे. याहीपेक्षा टिकून राहण्यासाठी अधिक तीव्र संघर्ष निसर्गासोबत त्याला करावा लागला आहे. नैसर्गिक संकटांमधून सहिसलामत सुटकेसाठी संघर्षरत असणाऱ्या माणसांना कलहांनीमंडित आयुष्याची सोबत घडणं अनिवार्य होतं. या टाळता न येणाऱ्या संघर्षाचे स्वरूप गरजांनुसार वेळोवेळी बदलत गेले आहे. म्हणूनच जगण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी घडणारा संघर्ष सजीवांची प्राक्तनरेखा ठरला आहे. कोणत्या प्रसंगी कोणास काय हवे, त्यानुसार कलहाचे स्वरूप ठरत आले आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत त्याच्या परिणामात प्रासंगिक परिवर्तन घडत आले आहे. जगात घडलेल्या, वाढलेल्या संस्कृती माणसांच्या हजारो वर्षाच्या संघर्षयात्रेचे फलित आहेत.

रामायण, महाभारत यांना महाकाव्ये म्हणून माणसांच्या मनात मान्यता आणि मान असला, तरी या काव्यांचा केंद्रबिंदू संघर्ष आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. राम-रावण संघर्षात मर्यादांचे घडलेलं उल्लंघन कलहाचे कारण ठरले. तर महाभारतात मानिनीचा झालेला अधिक्षेप युद्धाचे निमित्त ठरला आहे. दोन्ही ठिकाणी ‘स्त्री’ संघर्षाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते; पण या संघार्षांमागे तेवढेच एक कारण आहे असे वाटत नाही, कारण त्या कलहकेंद्राभोवती असणारे अनेकांचे दुखावणारे अहं आणि सन्मानाचे, आत्मसन्मानाचे निकष माणसांना संघर्षापर्यंत ओढत नेणारे ठरले आहेत. मर्यादांचे बांध फोडले जातात, समाजाने निर्माण केलेल्या नियमांच्या आणि नैतिकतेच्या चौकटी तोडल्या जातात, तेव्हा कलह अटळ ठरत असतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती अन्यायातून मुक्तीसाठी घडणाऱ्या विधायक कलहाची प्रतीके आहेत. हा कलह विस्तारवादी सत्ता, सर्वंकष सत्ताधीशांच्या विरोधातला सर्वसामान्यांचा एल्गार होता. कोणतीतरी सर्वंकष सत्ता निर्धारित वर्तुळात राहून सत्तेचा वापर करायचे नियम नाकारते. ताल, तोल, तंत्र सोडून स्वार्थासाठी सत्तेचा वापर करायला लागते. सर्वसामान्यांचे जगणे अशा व्यवस्थेत दुष्कर होते, तेव्हा माणुसकीच्या परित्राणासाठी कोणासतरी हाती शस्त्रे धारण करायला लागतात. व्यवस्थापरिवर्तनासाठी घडणाऱ्या कलहात अनेक अनामिक जिवांच्या आहुती पडतात. तरीही माणूस अशा कलहाचे मोल चुकवूनही आनंदी असतो. असं का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्याच्या स्वातंत्र्यप्रिय मानसिकतेत दडलंय असं वाटतं.

कलहप्रियता सोबत घेऊन जगण्यातही कदाचित मानसिक समाधानाचे काही धागे अनुस्यूत असावेत असे वाटते. माणसाचं मन सुखावण्याइतकी माणसांच्या जगात कोणतीच भावना सुखाची नाही. एखादी व्यक्ती पद, पैसा, प्रतिष्ठेचा वापर इतरांवर जरब बसवण्यासाठी करते, तेव्हा त्याच्या अंतर्यामी असणारा अहं सुखावतो. याकरिता हाती असणाऱ्या पदाचा, अधिकारांचा वापर करून निम्नस्तरावर असणाऱ्या लोकांना प्रताडित करून तो आनंदतो. इतरांना आपण आपल्या अंकित ठेवतो, आपल्या कलाने वर्तण्यास बाध्य करतो, असे वाटणे सत्ताधीशांना सुखावणारे असते. भलेही अशा वर्तनाला नैतिकतेचे कोंदण नसले तरी. कोणी भाईगिरीच्या मार्गाने भीती निर्माण करून सुखावतो. पण हे घडताना स्वअस्मितेच्या तंत्राने चालणाऱ्या माणसांना आपल्या प्रतिष्ठेवर आघात होतोय, असे वाटते आणि ते या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी उभे राहतात. दोन भिन्न वृत्तींमध्ये घडणारा हा कलह सुष्ट आणि दुष्ट असे रूप धारण करतो.

एकाच वर्गात शिकणाऱ्या बालवाडीतील लहान मुलांमध्येही निर्व्याज कलह असल्याचे आपण पाहतो, अगदी पेन्सिलचा एक लहानसा तुकडा घेण्यावरून. थोडे मोठे झाले की समवयस्क मुलांच्या समूहातही दबंगगिरी करण्यासाठी तो सांभाळला जातो. यौवनातील कलह कोण्यातरी तिच्यावर जीव जडला म्हणून सर्वस्व उधळून लावण्यासाठीही घडू शकतो. आप्त, स्वकीय, परिवार, समाजासोबत आपल्या प्रिय पात्राच्या प्रेमासाठी विरोध पत्करताना होत राहतो. विवाहाच्या सप्तपदीवरून फेरे घालून संसारात पावलं रमल्यावर दोघांमध्ये घडणारा कलह ‘भांड्याला भांडं लागणं’ या नावाने ओळखला जातो. अर्थात समाजात घडणाऱ्या कोणत्याही भांडणांना अहंचे टोकदार काटे असतातच. या काट्यांनी कोणी घायाळ होत नाही तोपर्यंत सारे ठीक असते; पण त्याची टोकं टोचायला लागली की, शेवट माणसं दुरावण्यात होतो. कधीकधी संसारातले ताणून धरलेले वैयक्तिक अहं नवराबायको नात्याचा अध्याय कोर्टाच्या साक्षीने संपवतात. भलेही कोणी याला मने न जुळल्यामुळे नात्यांचे विभक्तीकरण म्हटले तरी.

रस्त्याने प्रवास करताना वाहनाचा कोणासतरी कळत नकळत धक्का लागतो. भारतीय रस्त्यांवर नित्य दिसणारे हे दृश्य आहे. असे काही घडले की, प्रत्येकाला आपणच कसे योग्य दिशेने आणि नियमांनी चाललो होतो असे वाटायला लागते. कोणीच हार मानायला तयार नसतो. रस्त्यावर घडणारे असे क्षणिक कलहसुद्धा इतरांचं येणं-जाणं बंद करू शकतात. बसमध्ये, रेल्वेत जागेवरून तू तू मै मै घडणे दैनंदिन कलहाचे सौम्य रूप आहे. कधी आपल्या कोणा परिचिताला, आप्तांना अपघात घडतो. माणसांचा संयम सुटतो. संताप बनून तो रस्त्यावर उतरतो. कधी रस्त्यांवरील बेजाबदार वाहतुकीने समस्या येऊन रागाचे रुपांतर कलहात घडते. रस्ते अडतात. संतापाचा अतिरेक हाती येणारा दगड भिरकावयाला उद्युक्त करतो. रस्ता अडतो. माणसं भडकतात आणि समोर दिसेल त्यावर धडकतात. संतापाला प्रकटण्यास मार्ग मिळण्याऐवजी प्रश्न निर्माण करणारा रस्ता सापडतो. लहानसा वाटणारा प्रासंगिक कलह एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह बनून माणसांसमोर उभा राहतो.

राजकारणाच्या प्रांगणात कलह नेहमीच प्रिय असावा असे वाटण्याइतपत रुजलेला दिसतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन भिन्न विचारधारांना सोबत घेऊन तो नांदतो. कधी पक्षीय अभिनिवेश कलहप्रियतेचे कारण ठरतात. तर कधी पक्षांच्या आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या विचारधारा. कधी वैयक्तिक विचारधारेतून विरोधाचं अस्त्र घेऊन तो रस्त्यावर प्रकटतो. माणसांनी चालते आणि वाहनांनी धावते रस्ते अडतात. परिसरात बंदचा नाद निनादायला लागतो. परिस्थिती नियंत्रणाच्या मर्यादा ओलांडते, तेव्हा सुरक्षायंत्रणेचे कवच रस्त्यांवर, वस्त्यांवर उभे राहते. संचाराला बंदी करून कलहनियंत्रणाचा प्रयत्न घडतो. कधी कलह अशांततेचे विध्वंसक रूप धारण करतात. सार्वजनिक मालमत्तेच्या जिवावर उठतात. कोणाच्यातरी कसल्यातरी कारणाने दुखावणाऱ्या भावना कलह पेटवण्यात इंधनाचे काम करतात. अशा अविवेकी संघर्षाने परिस्थितीबाबत अनभिज्ञ  असणाऱ्या काही जिवांची जीवनयात्रा संपते.

जगात कुठल्या गोष्टी सार्वत्रिक असतील, नसतील माहीत नाही; पण कलह अरत्र, परत्र, सर्वत्र नांदतो आहे. कधी तो जातीय तणावात, कधी पंथीय संघर्षात, कधी धार्मिक अभिनिवेशात प्रकटतो. अहंमन्य मानसिकता कलहाला निमंत्रित करते. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष आघात चाकोरीत चालणाऱ्या जीवनव्यवस्थेवर होतात. कायदासुव्यवस्थेच्या ठिकऱ्या उडून प्रासंगिक परिस्थिती माणसांना विस्थापित करते. माणसं आपलं मत प्रस्थापित करण्यासाठी उभे राहतात. आपली विचारधारा पेरण्यासाठी केल्या जाणाऱ्या कवायतीत कलहाचे आयुध हाती घेतले जाते. अतिरेकी विचारांना प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न अनेक निरपराध्यांच्या जगण्याची सांगता करतो. सार्वभौम अस्मितेवर आघात करणारा अविवेकी विचार अतिरेकी होतो. आतंकवादी मानसिकता दिमतीला घेऊन कोणाच्यातरी अविचारी वागण्यातून प्रकटतो. कलहांपासून कोसो दूर राहू इच्छिणाऱ्या शांतताप्रिय माणसांना विस्थापित करतो. मायभूमी सोडून माणसे वणवण भटकत फिरतात. अनियंत्रित सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या सत्ताधीशांच्या कलहवृत्तीपासून सुटून सुरक्षित परगणा शोधण्याच्या दुसऱ्या नव्या कलहात अडकतात. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धांचा विध्वंस वसाहतवादी, साम्राज्यवादी मानसिकता अंगीकारणाऱ्या स्वार्थपरायण विचारांच्या वर्तनाचा परिपाक होता. सर्वंकष सत्ताधीश होण्याच्या मानसिकतेतून घडलेल्या कलहाचा माणसांनी अनुभवलेला विनाश म्हणजे ही युद्धे. पूर्वीही राजसत्तांचे प्रदेशविस्तारासाठी संघर्षाच्या मार्गाने जाणे घडले आहे. आपले सैनिकी बल, आपली राजकीय ताकद सीमेलगतच्या सत्ताधीशाला दाखवणे, या हेतूने ते घडत असे. आकांक्षापूर्तीसाठी प्रादेशिक सीमा विस्तारताना घडणाऱ्या कलहाने अन्य परगण्यात वास्तव्य करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या सीमांना मर्यादांचे बांध घातले जात.

कलह कुठे नाही, तो घरापासून देशापर्यंत सगळीकडे आहे. घरात सोबतीने वाढणाऱ्या भावंडानाही तो नवीन नाही. वाटण्या होताना तांबा-पितळेच्या एका फुटक्या भांड्यासाठी भांडणारी भावंडे कलहात रक्ताची नाती विसरतात. शेताच्या बांधावरून शेजारच्याच्या टाळक्यात दांडके घातले जाते. शेजारी-शेजारी राहणारे क्षुल्लक कलहातून परस्परांचे कट्टर शत्रू होतात. सासू नावाचं नातं घरगुती कलहाचे सार्वत्रिक रूप असल्याचे अनुभव रंगवून सांगितले जातात. सासू-सून हा द्वंद्व समास कलहातूनच विग्रहित झालेला दिसतो. प्रेमाचं नितळपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांना कौटुंबिक कलह बाधित करतात. काही गावं कलहामुळे बदनाम होतात. सार्वजनिक अशांतता हीच त्या गावांची ओळख होते. गावातील एखादी वस्ती, त्या ठिकाणी असणारी माणसे कलहासोबत जगणारी म्हणून ओळखली जातात. काहींवर कलहप्रिय म्हणून शिक्का बसवून त्याच्या जगण्याला कायद्याच्या कलमांनी बंदिस्त कले जाते. काही माणसांच्या मनात विशिष्ट परिवाराची, परिसराची ओळख कलहप्रिय म्हणूनच गृहीत धरली जाते.

कलह फक्त माणूस नावाच्या प्राण्यातच असतो असे नाही. मानवेतर जिवातही तो मोठ्याप्रमाणात असतो. प्राणीसुद्धा जिवाच्या कराराने सजातीयांशी, अन्यांशी भांडताना दिसतात. पण त्यांच्या कलहामागील प्रेरणा फक्त नैसर्गिक असते. परिसर, मादी यांच्यावर वर्चस्व संपादनाची भावना या कलहाचे केंद्र असतात. अन्य जिवांच्या जगात नैतिक-अनैतिक प्रकार असण्याचे कारण नसते. स्वाभाविकपणे वागायला त्यांचे शरीरधर्म त्यांना उद्युक्त करत असतात. माणसाच्या जगात नैसर्गिक गरजांसोबत भावनिक गरजासुद्धा कलहांचे कारण असल्याचं आपण पाहतो. आपले अहं कुरवाळण्याच्या नादात माणसं वर्तनाच्या चौकटी विसरतात. कलहाला अस्मितेचे वसने चढवून आपले अहं जोपासत राहतात. नियमांना नैतिकतेच्या, मूल्यांच्या खुंटीशी घट्ट बांधून समाजाकडून सत्त्वशील आणि तत्त्वशील वर्तनाची अपेक्षा करतात. मात्र, इप्सित साध्य करण्यासाठी आपले नियम तयार करून जगतात. 

कलहांचे असे सार्वत्रिक आविष्कार पाहताना एक गोष्ट मनात येते, माणसांना आपल्या जगण्यातून कलह संपवता येणारच नाहीत का? मला वाटते संयम, सत्य, अहिंसा या मूल्यांचा अंगीकार कलहप्रिय जगाला शांततेच्या मार्गाने मार्गस्थ करू शकतो. माणसाच्या मनात पेटलेल्या अविवेकी विचारांच्या वणव्यालाही शांत करू शकतो. संतमहात्म्यांनी कलह टाळून प्रेमाची भजने गायली. सुधारकांनी सहअस्तित्वाने सहजपणे जगणाऱ्या जगाचे स्वप्न पाहिले. जगण्याला नैतिकतेच्या चौकटींनी मंडित करून स्वतःचा शोध घेऊ पाहणाऱ्या विचारधारा कोणत्याही संघर्षाला विराम देऊ शकतात. सत्व आणि स्वत्वाची ओळख दाखवणारा मार्गच विद्यमान जगातील माणसांची खरी गरज आहे. असा मार्ग पूर्वसुरींच्या कार्यातून स्मृतीरुपाने सोबत करीत असूनही आम्हां माणसांना अद्याप कळला का नसेल? कळला पण कदाचित वळायचे राहून गेले आहे असे वाटते. हे कळेल त्यावेळी माणूस कलहमार्गाने का वर्ततो? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. कलह टाळून संयमाने सात्विक जगण्याचा मार्ग दाखवणारे संत, महात्म्यांचे विचार वाचून, ऐकून माणसांचे मन आणि मतपरिवर्तन झाले नाही असे नाही; पण वास्तव असेही आहे की, माणूस अजूनही जीवनातील कलहप्रिय विचारांना कोणत्यातरी असुरक्षतेपोटी टाकायला तयार नाही. इतिहास हासुद्धा आहे, की माणसांच्या जगावर आणि जगण्यावर अनेक आघात घडूनही माणूस शहाणा होण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय संघर्षच असल्याचे मानतो. कलहाच्या मार्गाने कुठली शांतता प्रस्थापित करू इच्छितो कोणास ठाऊक? तसेही माणसांच्या जगण्यातून कलह हद्दपार होणे अवघड आहे. कारण काही गोष्टी सजीवांना उपजतच मिळालेल्या असतात, त्यातील एक कलह आहे.