Badal | बदल

By
काफ्का या जर्मन विचारवंताचं एक वाक्य वाचनात आलं. ‘जर तुम्हाला जगातून वाईट माणसं संपावीत असं वाटत असेल तर, आज स्वतःला बदलून बघा; तुम्हाला लक्षात येईल की, उद्याच एक वाईट व्यक्ती या जगातून कमी झाली असेल.’ खरंतर किती साधासाच विचार त्यांनी व्यक्त केला आहे. काय अवघड आहे, त्यांच्या या विधानातील अपेक्षेप्रमाणे आपल्यात बदल घडवून आणायला? पण कधीकधी साध्याशाच गोष्टी आचरणात आणायला अतिशय अवघड असतात. यातही आणखी अवघडातील अवघड बाब म्हणजे, स्वतःला बदलणे अथवा बदलवून घेणे.

बदल निसर्गाचा सहजभाव आहे. लाखो वर्षापासून निसर्ग बदलतो आहे. हे बदल कधी लक्षणीय असतील, कधी सावध पावलांनी घडणारे असतील; पण ते घडतच राहतील, ते टाळता येत नाहीत. इहतलावर जीवनयापन करणाऱ्यांना बदलांशी सुसंगत वर्तावेच लागते. बदलांशी जुळवून घेत आपल्याला जगण्याच्या चौकटीत फिट्ट बसवून घ्यावे लागते. बदल नाकारणाऱ्याचे जगणं अवघड होत जाते, हे सर्वश्रुत आहे. कालोपघात टिकून राहण्यासाठी स्वतःला बदलाच्या दिशेने वळवून घ्यावेच लागते. परिस्थितीजन्य बदलाशी जुळवून घेत नाहीत, ते प्रगतीच्या पथावरून चालताना मागे राहतात, हेही तितकेच सत्य आहे. तसं पाहिलं तर माणूसही स्वतःला बदलून घेत प्राप्त परिस्थतीत कालसुसंगत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करीतच असतो. पण तो बदलतो म्हणजे त्याच्यातले नेमके काय बदलते? तो की त्याचा स्वभाव, की त्याचे वर्तन?

बदल घडणे काळाची अनिवार्यता असेल, तर आपण किती बदललो आहोत, या प्रश्नाचे उत्तर स्वतःच स्वतःला विचारून पाहिल्यास आपण स्वतःपुरता एक समज करून घेत असतो की, आम्हीतर बदललो आहोत, त्यात आणखी काय बदलून घ्यायचे राहिले आहे? बदलून घ्यायचे म्हणजे नेमके कोणते बदल घडवून आणावेत आणि स्वीकारावेत? असाही प्रश्न नकळत आपल्यासमोर उभा राहतो. परिस्थितीसापेक्ष वर्तताना जीवनाचा कायापालट करणारे विधायक ते स्वीकारून; आपल्यातल्या वैगुण्याना विसरणे आणि त्यांच्या जागी वर्धिष्णू विकासाचे स्वप्न अंतर्यामी रुजवणाऱ्या विचारांची प्रतिष्ठापना करणे म्हणजे बदल, असे म्हणणे विसंगत ठरू नये. अर्थात, असे बदल घडून येण्यासाठी काळाला आणखी काही पावले पुढे जायला लागते. तेव्हा कुठे बदलांच्या पाऊलखुणा माणसांच्या जगण्यात दिसतात.

आपल्या वर्तनात, जगण्यात बदल घडला हे पाहायचे तर तो कोठे आणि कसा पाहावा? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात बऱ्याचदा डोकावून जातो. आपल्यात घडलेल्या बदलांना पाहायचेच असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहा. त्याच्या डोळ्यात पाहा. आपली प्रतिमा तेथे बदललेली दिसली आणि ती नितळ, निखळ, निर्मळ वगैरे अशी वाटायला लागली की, समजावे आपण सगळेच नाहीत, निदान काहीतरी थोडे बदललो आहोत; पण बहुदा हे पाहणेही अपवादच असते, कारण आपण आपल्या स्वतःपुरते एक वर्तुळ आपल्याभोवती आखून घेतलेले असते. तेथे घडणाऱ्या थोड्याशा हालचालींना परिवर्तन समजण्याचा प्रमाद आपणाकडून घडतो आणि त्यालाच बदल, परिवर्तन वगैरे गोंडस नावांनी संबोधित करून घेतो. आपल्या व्यक्तित्वात कितीतरी सकारात्मक परिवर्तन घडले आहे, असे वाटायला लागते. आपणच आपल्याला वेगळे वाटायला लागतो आणि या मृगजळी आनंदात विसावतो.

बदल, परिवर्तन या शब्दांना त्यांच्यापुरता सुसंगत, कालसंगत, परिस्थितीसापेक्ष अर्थ असतो. त्या अर्थाच्या संबोधांना काही जाणीवचे, काही नेणिवेचे आणखीही इतर पदर असतात. त्यातून त्यांचे अर्थ प्रवाहित होत असतात. या प्रवाहांना सकारात्मक दिशेकडील वळणाकडे वळविता आले, तर जीवनाचे अंगण समृद्ध होते. जगताना संपन्न विचारांचे बहरलेले मळे आम्हांस फुलविता यायला हवेत. ही किमया ज्याला साधली, त्याच्या जीवनाचा वसंत सर्वांगाने बहरून येतो. नानाविध रंगांची उधळण करीत बहरलेला जीवनाचा ऋतू त्याचे जगणे गंधित करतो. हे गंधभारीत जगणं संपन्नतेचे नवे आयाम आपल्या आसपास उभे करते. परिवर्तन जीवनाच्या एकाच एक अंगाने कधीच घडत नसते, ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अशा अनेक बाजूंनी घडत असते. आपण त्या त्या वेळी  कोणत्या परगण्यात उभे आहोत, कोणत्या क्षेत्राचे पथ आक्रमित आहोत, कोणत्या ठिकाणी विसावतो आहोत, यावर आपले बदलणे घडत असते.

आपल्या जगण्याशी निगडित अगदी एकचएक बाजू बदलून व्यक्तित्व परिणत वगैरे झालं आहे, असं सहसा घडत नसतं. समग्र बदलणे अवघड असले, तरी बदलांना थोडातरी सार्वत्रिकतेचा स्पर्श घडणे आवश्यक असते. कालचक्र आपल्याच गतीने चालणार आहे, हे सत्य. पण त्याच्या गतीच्या, प्रगतीच्या काही खुणा आपल्या परिवर्तनात दिसतात का, हे पाहणे घडून येणे आवश्यक असते. परिवर्तनाचे पथ निर्माण करण्यासाठी व्यवधान बनणारे आपल्या समोरील प्रश्न आपणास समजायला हवेत. या प्रश्नांची उत्तरे ज्याला कळतात त्याच्या जीवनाच्या जगण्याच्या वाटा कितीही अवघड असल्यातरी त्यावरून चालण्यासाठी एक अनामिक बळ प्राप्त होते. आशावादी नेत्रात एक नवी चमक निर्माण होऊन, मनात काहीतरी नवे करण्याची उमेद जागी होते. म्हणूनच काल आपण काय होतो, आज काय करीत आहोत आणि उद्या काय करणार आहोत, हे कळणेही स्वतःला बदलून घेण्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरते.

माणसांची इहलोकीची यात्रा शेकडो वर्षापासून अनवरत सुरु आहे. खरंतर या वाटचालीतील काहीच वर्षे आपल्या वाट्याला येतात. विश्वाच्या विस्तीर्ण कालपटावरून आपल्या आयुष्याकडे पाहिल्यास या अफाट पसाऱ्यात फक्त बिंदूमात्र अस्तित्वच आपल्या वाट्याचे असल्याचे आपणास दिसते. एवढं नाममात्र अस्तित्व असूनही आपणच आपला अभिमान वगैरे करावा, असे किती क्षण नियतीने आपल्या ललाटी अंकित केलेले असतात? आणि असलेच तर अगदी फार थोडेच; पण एवढं कळत असूनही आपण हे सहज मान्य करतो का? बहुदा नाहीच. कारण कणभर काम करून मणभर श्रेय घ्यायची आपल्या मनाची आसक्ती काही केल्या कमी होत नाही. स्वतःभोवती नवनवी मखरे मांडून आपण त्यांची आरास करतो. त्याला नानारंगांनी रंगवून आरती करवून घेण्यात धन्यता मानतो. स्वमान्य आणि स्वधन्य होण्यात असे कोणते शहाणपण सामावले आहे?

माणूस म्हणून कोण कसा असतो, हे सांगणे तसे अवघड असते. आणि माणूस जसा दिसतो तसाच असतो अथवा असावा, असेही काही नाही. माणूस आणि परिसर समजून घेताना, प्रारंभी आपल्या पूर्वग्रहदूषित विचारांत आणि नजरेत बदल घडणे आवश्यक असते. आपल्या नजरेचा थोडासा कोन बदलून पाहिले म्हणजे कळते, आपल्या आसपास अशी कितीतरी विचारी माणसे असतील, जे आपल्याभोवती कोणतीही आरास न करता, कोणत्याही मखरात न बसता आणि प्रसिद्धीचा कोणताही मळवट ललाटी न भरता आपापलं काम प्रामाणिकपणे करीत असतील. परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलून; समाजाला विधायक दिशेने नेण्यासाठी प्रयत्नरत असतील. अशी माणसंच समाजाचं खरं संचित असतात. समाजाला विधायकतेच्या शिखरांवर नेणारे पथ निर्मिणारे माणसं समाजाच्या सार्वत्रिक जगण्याचे, असण्याचे सुंदर स्वप्न असतात. आम्ही बदललो आहोत म्हणून प्रचाराचे कोणतेही ढोल न बडविता, समोरील परिस्थितीजन्य बदलांना अंगिकारून परिवर्तनाच्या गंगेचा प्रवाह सर्वसामान्यांच्या दारी पोहचवण्याचे कार्य अहर्निश करीत असतात. इतरांचं जगणं सुंदर व्हावं म्हणून आपल्याकडील सारंकाही पणाला लावण्याची तयारी असणारेच, बदलांचे खरे हिरो असतात. तेच समाजाचे खरे आयडॉल असतात.

कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसायची मानसिकता सोबत घेऊन माणसं उभी राहतात. जगण्याचे संघर्ष समजून घेत परिस्थितीशी दोन हात करतात. प्रसंगी थोडी परिस्थितीसापेक्ष लवचिकता दाखवितात. पण आपण बदलत्या काळाकडून किती आणि कसे बदल स्वीकारले? हा प्रश्न स्वतःला विचारायला सोयिस्कर विसरतात. बदलायचं म्हणजे नेमकं काय करायला हवं? काय केल्याने बदल घडून येतील? असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात उदित होतात. तशी आपण बहुतेक सारी साधीसुधी, सरळमार्गी माणसं, माणूसपणाच्या साऱ्या मर्यादा आणि त्रुटी असणारी, तरीही मनात एक चांगुलपणाचा स्पर्श असणारी. प्रत्येकात स्नेह शोधणारे. जिकडे स्नेह असेल तिकडे नवे नाते निर्माण करणारे. तरल नात्यांचा गंध सोबतीला घेऊन जीवनाचे सायासप्रयास आनंदाने स्वीकारणारे. एवढं सारं संचित नियतीने  आपणाकडे दिलेले असताना; मुळात बदलून घेण्यासाठी या व्यतिरिक्त आणखी काही असण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. फक्त आमच्या विचारांवर आमची ठाम श्रद्धा असली तरी पुरेसे असते.

आपल्या अंतःकरणात भक्ती धारण करून जगण्याची वाट चालत जीवनाची सुंदरता शोधताना इतरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे प्रसन्न हास्य कसे निर्माण करता येईल, हा विचार करून वर्तणारी माणसं मनाची मंदिरे होतात. त्यांची मने आभाळाचे विस्तीर्ण पट होतात. त्यांच्या मनात आकांक्षांची असंख्य नक्षत्रे उदित होतात. आपल्या तेजाने तळपताना ते दिसतात. आपल्या आसपासच्या आसमंतातल्या अंधाराला दूर सारणारे दिवे होतात, त्या दिव्यांचा पसरलेला प्रसन्न प्रकाश म्हणजे बदल. जगातला सारा अंधार आपणास दूर करता येणार नाही; पण ओंजळभर उजेड एक अंधारा कोपरा उजळवू शकतो. तो कोपरा उजळण्याआधी मनाचा गाभारा भारावलेपण सोबत घेऊन भरून यायला नको का? अशा भारावलेपणाने ओथंबून झरणारे मन म्हणजे बदल. बदल घडवून आणण्याची पहिली अट असते, आपल्यातील अहंकाराचा त्याग घडणे. ज्यांच्या मनातील अहंकार गळून पडला आहे, ती माणसे सत्य, सुंदर आणि मांगल्याचे पथ निर्माण करू शकतात. जीवन विरक्तीत नसते, ते आसक्तीत असते. आसक्तीला सकारात्मक परिवर्तनाच्या पैलूंनी मंडित केले, तर बदलांसाठी अन्य दुसऱ्या कोणत्या क्षितिजाकडे पाहण्याची आवश्यकता उरत नाही.

माणसांची मने विकारांची घरे असतात, हे नाकारून पुढेही जाता येत नाही. विकारांवर विवेकाने विजय संपादित करणे, म्हणजे बदल. जगाच्या विस्तीर्ण पटावर स्वतःच स्वतःला तपासून पाहिलेतर अद्यापही आपणास कितीतरी बदलायचे बाकी असल्याचे राहिलेले दिसेल. जगात अज्ञान आहे, अन्याय आहे, अविचार आहे, तसा अविवेकही आहेच. हे सारंसारं दिसत असूनही आपणास हे बदलण्यासाठी काही करता यायला नको का? आपण म्हणतो माझ्या एकट्याने असा कोणता बदल सामाजिक परिस्थितीत घडून येणार आहे? पण सगळेच असा विचार करून वर्तायला लागले, तर परिस्थतीत बदल घडतीलच कसे?

कोणताही देश सोने, चांदी, डॉलरनी मोठा होत नसतो. मोठेपण आपल्या अंतर्यामी घेऊन समर्पण भावनेने वर्तणाऱ्या माणसांमुळे देश मोठा होत असतो. देशाचं, देशातील माणसाचं मोठेपण आणखी मोठे करू पाहणारा सत्प्रेरित विचार अंगिकारून संवेदनशील मनाने वर्तणारी माणसंच देशाची अनमोल संपत्ती असतात, अशी माणसंच देशाचं भविष्य आकारास आणत असतात. माणसे देशाला घडवतात; पण माणसांना घडवण्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते. सत्प्रेरित विचारांचे परगणे निर्माण करावे लागतात. जाणीवपूर्वक त्यांचे संवर्धन करावे लागते. येथे पोहोचणारे रस्ते तयार करावे लागतात. या प्रदेशांमध्ये प्रवास करणारे पथिक परिवर्तनाचे प्रेषित ठरतात.

खरंतर आपण बदललो काय किंवा नाही बदललो काय; त्याच्याने असे काय घडणार आहे, असे म्हणून बदलांना नाकारून माणसांचे जगणे प्रगल्भ, परिणत वगैरे होत नसते. नियतीने जगण्याची कोणतीही सुखं ओंजळीत ओतलेली नसताना, आपल्या दैन्याला आपली श्रीमंती मानून जगणारी आणि सश्रद्ध अंतःकरणाने आपले प्राक्तन बदलवू पाहणारी अतिशय साधी माणसं आपल्या छोट्याशा फाटक्या संसाराला सांभाळीत; सृष्टीचा संभार सुंदर करण्यासाठी समोर सरसावतात, उभी राहतात; तेव्हा त्यांचं जगणं सुंदराचा सोहळा होतो. सहजपणाच्या गंधाने माखलेला त्यांचा वर्तमान उज्ज्वल भविष्याची नांदी ठरतो.

जगात नानाविध वृत्तीप्रवृत्ती धारण करून वावरणारी, वागणारी असंख्य माणसं आहेत. त्यातील सारेच सद्गुणांचे सोहळे साजरे करणारे आणि विश्वाला सुंदर करू पाहणाऱ्या विचारांचा अंगिकार करणारे असतील, असेही नसते. समाजात चार माणसे वाईट असले, म्हणून सगळा समाजच काही तसा नसतो. वाईट माणसांना बदलवणे कदाचित अवघड असेलही; पण अशक्यही नाही. या माणसांमध्ये बदल घडतील तेव्हा घडतील; पण आपण आपल्यापुरते आज बदलून घेतले तर... जगातील एक वाईट माणूस कमी झालेला असेल, हे काफ्काचे म्हणणे खरे नाही का? याकरिता बदलांच्या पथावर पुढे पडणारे पहिले पाऊल माझे असेल, असे आपणास का वाटू नये? परिवर्तनाचा प्रारंभ प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या पथावरून चालण्यासाठी उचललेल्या पहिल्या पावलापासून होतो. हेही खरे नाही का?   

0 comments:

Post a Comment