Shraddha | श्रद्धा

By
माणूस एक श्रद्धाशील जीव आहे. आपला इहलोकीचा प्रवास सुखावह व्हावा, ही अपेक्षा त्याच्या मनात कायमच असते. या आस्थेतून अनेक श्रद्धा त्याच्या अंतर्यामी उदित होतात. श्रद्धेतून मिळवलेल्या पावलापुरत्या प्रकाशात तो जीवनाची वाट शोधीत असतो. जीवनाविषयी, जीवनाशी निगडित श्रद्धा जोपासत त्याची इहलोकीची यात्रा अनवरत सुरु आहे. आदिम अवस्थेतील सुविधांचा अभाव असणाऱ्या जगण्यापासून, तर आजच्या सुविधांनीमंडित जगण्यापर्यंत त्याला सोबत करणाऱ्या श्रद्धा आणि त्यातून निर्मित विचारधारा हेच प्रगतीचे गमक आहे, असे समजून तो आपले परगणे निर्माण करीत आहे. त्या प्रदेशांपर्यंत पोहचण्याचे पथ तयार करीत आहे. आपल्यापुरत्या अभ्युदयाच्या संकल्पना तयार करून जीवनाची वाट चालतो आहे.

जन्माला आलेल्या साऱ्या जिवांची जगण्याची धडपड ही नैसर्गिक, स्वाभाविक, सहज प्रवृत्ती आहे. माणसाव्यतिरिक्त असंख्य जीवजातीचं सहस्रावधी वर्षापासून पृथ्वीवर वास्तव्य आहे. आपापल्या परिघात निसर्गनिर्मित प्रेरणा सोबत घेऊन ते जगत आहेत. त्यांच्या जगण्याचे आविष्कार वैयक्तिक जीवनधारणेव्यतिरिक्त सहसा आविष्कृत होताना दिसत नाहीत. त्यांच्या गरजा शरीरधर्मापुरत्या सीमित असतात; पण माणसांचे जगणे इतके संकुचित कधीच नसते. नवनिर्माणाची सहज भावना त्याला नवनव्या परगण्यांकडे आकर्षित करीत असते. या आकर्षणातून नानाविध रंग धारण करून त्याचे जीवन आविष्कृत होत असते. त्याच्या जगण्याचे पदर नानाविध रंग धारण करतात. हे रंग कधी नजरेत भरण्याइतके गडद असतात, तर कधी परिस्थितीवश धूसर होत जातात. कधी प्रतिकूलतेचे मळभ दाटून आल्याने क्षणभर नाहीसे होतात, तर कधी परिस्थितीच्या आवर्तात सापडून नूर हरवून बसतात. माणसांची जिगीषा नवे आयाम निर्माण करीत ईप्सित साध्य करण्यासाठी अंतर्यामी असणाऱ्या श्रद्धेच्या बळावर मार्गक्रमण करीत पुढे जात आहे. सुखदायक जीवनाविषयी असलेल्या आस्थेमुळे परिस्थितीने मोडलेला डाव पुन्हापुन्हा मांडून नव्याने खेळाचे पट तो अंथरत जातो.

आस्था, श्रद्धा हे शब्दच असे आहेत की, ज्यांच्यात विपरीत स्थितीतही टिकून राहण्यासाठी आशेचा पुसटसा का असेना, एक किरण दिसतो. त्या वाटेने प्रवास करीत माणूस आपल्या श्रद्धास्थळांपर्यंत पोहचतो. पुढे उभ्या ठाकलेल्या अनेक आपत्ती, संकटांशी दोन हात करीत राहतो. संघर्ष माणसाचा निसर्गदत्त स्वभाव आहे. त्याच्या इहलोकीच्या लाखो वर्षाच्या प्रवासाचे संचित आहे. त्याच्याठायी असणाऱ्या संघर्षशीलतेमुळेच तो सर्वश्रेष्ठ सजीव ठरला आहे. जीवनाच्या आदिम अवस्थेत जगताना भाकरीचा धड एक तुकडा मिळवायची अक्कल नसणाऱ्या आदिमानवापासून सांप्रतकाळी प्रगतीचे नवनवे आयाम प्रस्थापित करणाऱ्या माणसापर्यंतच्या प्रवासाचे यश त्याच्या संघर्षशील वृत्तीत समावलेले आहे.

निसर्गाच्या अफाट ताकदीचा प्रत्यय घेत, प्रसंगी त्याच्याशी धडका देत तो इहतली टिकून राहिला आहे. या मागचं कारण त्याची जीवनावर असणारी श्रद्धा हेच आहे. कधीकाळी महाकाय प्राण्यांचा अधिवास असणारी पृथ्वी आज माणसाच्या सामर्थ्याने निर्मित नव्या क्षितिजांना सोबत घेऊन उभी आहे. कधीकाळी आपल्या अस्तित्वाने सारं आसमंत दणाणून टाकणारे काही महाकाय प्राणी आज पृथ्वीवर अस्तित्वात नाहीत. कधीच नामशेष झाले आहेत. माणूस टिकून आहे, कारण त्याच्यातील संघर्षशील वृत्ती. निसर्गात संघर्ष करतात तेच टिकतात, हे सार्वकालिक सत्य आहे. याबाबत निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. श्रेष्ठ तेच आणि तेवढंच टिकतं. उत्क्रांतीच्या सिद्धांतातील क्रमविकासात श्रेष्ठत्वाकडचाच प्रवास अपेक्षित आहे. वानराचा नर आणि नराचा नारायण होणे निसर्गाला अभिप्रेत असतं.

माणसाच्या जगण्याचा श्रद्धाशील प्रवास सोपा कधीच नव्हता, आजही तसा नाहीच. त्याच्या जगण्याचे, असण्याचे त्यावेळचे प्रश्न वेगळे होते. आजचे प्रश्न निराळे आहेत एवढेच. कालोपघात त्यांची तीव्रता कधीही कमी झाली नाही. निसर्गाशी, परिस्थितीशी झगडणारा माणूस व्यक्ती, कुटुंब, समूह, समाज असा संघटीत होत गेला. संघटीत होताना समान इच्छाआकांक्षांचे एकत्रीकरण घडून आपापले परगणे तयार झाले. स्वामित्वाची, मालकीची भावना उदित झाली. आपले अधिराज्य अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष घडले. संघर्ष कोणताही असो, तो सुगम कधीच नसतो. अस्तित्व टिकून राहावे म्हणून वेगवेगळे अभिनिवेश माणसाने धारण केले. कलह घडले. अवघे जीवितच पणाला लागले. अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी प्रसंगी रक्तपात घडला. सततच्या संघर्षात टिकून राहण्याच्या मानसिकतेतून मनात काही श्रद्धा निर्माण झाल्या. श्रद्धांना मूर्तरूप देताना प्रतीके प्रकटली. प्रतीकांच्या मूर्ती घडल्या. मूर्तींना देवत्व प्रदान केलं गेलं. त्यातून आपला कोणीतरी तारणहार, रक्षणकर्ता आहे अशी भावना मनात निर्माण झाली. त्यालाच देव, देवता या संज्ञांनी मुखरित केले गेले. हे करताना श्रद्धांचं सार्वत्रिकीकरण होऊन देव, मंदिरे, तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. काही समान, काही वैयक्तिक इच्छाआकांक्षा असणारी माणसं श्रद्धाशील अंतकरणाने त्यांच्यासमोर नतमस्तक झाली.

श्रद्धाशील मनांनी जगण्याला सुखकर करण्याच्या आसक्तीतून दैवाला, देवाला सुख निर्मितीचं श्रेय दिलं. देव नावाचं अस्तित्व मानून आपल्या श्रद्धांनी पूजले. पूजणारे आस्तिक ठरले. निसर्गाच्या नियमांनी विश्वाचे व्यवहार नियंत्रित होतात. निसर्ग कुणाच्या आज्ञेने वर्तत नाही. त्याचे नियम ठरलेले आहेत. तेथे कुणाचा हस्तक्षेप, नियंत्रण वगैरे असं काहीही नसतं म्हणणारे नास्तिक म्हणून ओळखले गेले. जगात आस्तिक, नास्तिक विचारधारांमधील वैचारिक भेद कायमच वास्तव्य करून आहे. हे सारं आहे की, नाही या निर्णयाप्रत पोहचता आले नाही, ते अज्ञेयवादी राहिले. प्रत्येकाचे प्रकटीकरणाचे मार्ग भिन्न आहेत. पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट समान होती आणि आहे, ती म्हणजे प्रत्येकाची जीवनावरची, विचारांवरची श्रद्धा. आपापल्या विचारांवर असणारी यांची श्रद्धा खोटी आहे, असे म्हणता येईल का? नाहीच, कारण जीवनयापनाचे पथ वेगवेगळे असले, तरी प्रत्येकाचं जगण्याचं प्रयोजन उन्नत, सुखासीन आयुष्य वाट्याला यावं हेच आहे. अशा जगण्याचे श्रेय कोणी देवाला देतात, कोणी निसर्गाला देतात एवढेच. त्यालाच कोणी श्रद्धा असे नाव देतात, कोणी निसर्ग नियमांनी हे सारं घडतं आहे, असं म्हणतात इतकेच.

देव आहे की नाही, हा वादाचा विषय आहे किंवा असू शकतो. तो असला म्हणून काही फरक पडतो असे नाही आणि नसला म्हणून काही वेगळे घडते, घडेल असेही नाही. विश्वाचा व्यवहार आपल्या नियत मार्गाने सुरु आहे. कालचक्र आपल्या गतीने चालले आहे. ते काही उलट दिशेने फिरवता येत नाही. माणसांना जीवनयापनासाठी प्रयत्नपूर्वक काहीतरी करावं लागतं. जगण्याची सर्वसंमत प्रयोजने शोधावी लागतात. नीतिसंमत मार्गाने वर्तावे लागते. उभं राहण्यासाठी कशाचातरी आधार हवा असतो. तो आधार त्याच्याकडून काढून घेतल्यास कोसळतो. श्रद्धेचंही तसंच आहे. श्रद्धा जीवनातून काढून घेतली तर माणूस कोसळेल. म्हणूनच श्रद्धेच्या बळावर एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतो. नाहीतरी जगण्यासाठी आपण जे काही करतो ते जीवनावर श्रद्धा असते म्हणूनच ना! निसर्ग त्याच्या नियमांनी बद्ध असला, तरी त्या नियमांवर आपली श्रद्धा असतेच. श्रद्धा टाळून काही करता येईल, असे वाटत नाही. बाळ आईच्या कुशीत शांतपणे निद्रिस्त झालेले असते, कारण त्याची आईवर असणारी श्रद्धा. हीच गोष्ट त्याला निश्चिंत करीत असते.

जगण्याचे प्रश्न सतत बदलत असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. माणसांचं कालचं सीमित जग आज व्यापक झालं आहे. नव्या समस्या निर्माण होत आहेत. अनेक नवे प्रश्न समोर उभे आहेत. प्रश्नांचे संदर्भ बदललेले आहेत. ते सामाजिक, आर्थिक, राजकीय आहेत तसेच वैयक्तिकही आहेत. पद आणि पैसा यातून येणारा मुजोरपणा दिसतो, तशी परिस्थितीवश विकलताही नजरेस पडते. विकलता माणसाला अधिक श्रद्धाशील बनवते. कुठलातरी आधार शोधते. शोध घेणारी मने कोणत्यातरी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विसावतात. कोण्यातरी बुवा, बाबांच्या आश्रयाला जाऊन थांबतात. अशावेळी डोळसभक्तीचा विचार मागे पडतो. गतानुगतिक मार्गाने वागणे घडत राहते. पीडित मने थाऱ्यावर नसल्याने सैरभैर होऊन पाचोळ्याप्रमाणे भरकटत राहतात. पैशाच्या बळावर सारी सुखं विकत घेता येतात, अशा मानसिकतेत जगणाऱ्यांना याची दाहकता जाणवत नसेल कदाचित. त्यांच्या मनातील अस्वस्थता, अशांतातही श्रद्धा धारण करून प्रकटत असते. तीर्थक्षेत्री जाऊन लाखालाखांच्या दागिन्यांनी त्यांच्याकडून देवाला मढविले जाते. त्यांच्या दानाला प्रसिद्धी मिळते. श्रद्धेतून निर्मित समाधान त्यांच्या अंगणी प्रकटते. कृतकृत्य झाल्याचा आनंद अंतर्यामी फुलतो. दूरवर कुठेतरी भुकेने विव्हळणारी, तळमळणारी अनेक माणसं परिस्थितीशी धडका देऊनही उपेक्षित राहतात. वाट्याला येणाऱ्या विपरीत परिस्थितीशी सामना करीत थकतात. हताशेतून जीवनात आलेल्या किंकर्तव्यमूढतेतून मुक्तीचे मार्ग देवाच्या दारी शोधतात. पदर पसरून ओंजळभर सुख मागतात.

माणसांच्या मनातील श्रद्धा कशी असेल, याचे गणित सूत्रबद्ध रीतीने मांडता येणे अशक्य आहे. श्रद्धाशील मनांचे वेगवेगळे आविष्कार अवतीभोवती प्रकटताना अनेकदा दिसतात. नवससायास करून देव, दैवतांना प्रसन्न करणारी, अनवाणी पायांनी कुठल्यातरी तीर्थक्षेत्री धावणारी, आत्मक्लेशांनी संतुष्ट होणारी माणसं पाहिली म्हणजे अज्ञान आणि विज्ञान शब्दाचा अर्थ उलगडायला लागतो. तीर्थस्थळी असणाऱ्या नद्यांना गतकाळाचे वैभव आता राहिले नाही. तरीही त्यांनाच गंगा समजून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्यात डुबक्या मारणाऱ्यासमोर विज्ञान हतबुद्ध होते. कधीकाळी पाण्याने तुडुंब भरून नद्या बारमाही वाहत होत्या, तेव्हा कदाचित त्या पाण्यात स्नान करणे संयुक्तिक असेल, पुण्यसंपादनाचा त्यांच्यापुरता तो एक मार्ग असेल; पण या वाहत्या गंगांच्या आज गटारगंगा झाल्या आहेत. असे असूनही माणसं त्याच आस्थेने अजूनही पाण्यात डुबक्या मारीत असतील, तर याला काय म्हणावे?

नद्यांच्या शुद्धीकरणाकरिता आपण काही उपाय करायचे सोडून केवळ स्नानाने पुण्य संपादन करण्यासाठी डोळ्यांनी दिसणाऱ्या, पण श्रद्धेला न दिसणाऱ्या प्रदूषित पाण्यात भारावलेल्या अंतकरणाने स्नान करत असतील, तर ही कोणती डोळस श्रद्धा म्हणावी? हे सगळं म्हणजे ज्याची-त्याची श्रद्धा, असे म्हणून दुर्लाक्षित करण्यासारखे आहे का? जशी त्यांची श्रद्धा तसे वागणे घडेल, असे म्हणून प्रश्न सुटतील का? देवालयाच्या गाभाऱ्यात मानसिक शांतीच्या शोधासाठी जावे, तर तेथेही वाट्याला वणवणच यावी. देवाचा शोध राहतो बाजूलाच. असुविधांचाच त्रास अधिक अशी वेळ येते. हे पाहून क्षणभर आपणच आपला विचार करतो, काय म्हणून गर्दीत आलो असेल? येणारे शेकडो भाविक देवाच्या चरणी चार क्षणांसाठी लीन होतात; पण जेवढा वेळ धावत्या दर्शनात मिळतो तेवढ्या वेळात मनातील भक्तीभाव खरंच तृप्त होत असेल का?

जगण्याच्या संघर्षात पाचोळ्याप्रमाणे गरागरा फिरणारी, रोजच्या व्यापात भोळवंडून निघालेली माणसं शांततेच्या शोधार्थ बाहेर पडतात. पण जावं तेथे गर्दी. आजूबाजूला असणारा माणसांच्या स्वार्थपरायण जगण्याचा बाजार. या बाजारातील बेगडी व्यवहार, श्रद्धेच्या, भक्तीच्या नावाखाली वाढलेली बजबजपुरी. माणसांच्या भोळ्या श्रद्धांचा घेतला जाणारा पद्धतशीर फायदा, हे सारं भक्तांची देव, दैवतांवर असीम श्रद्धा असूनही का बदलत नाहीत? शेकडो वर्षापासून आमच्या संत, महंतांनी कर्मयोग हाच जीवनयोग असल्याचे सांगून ठेवले आहे. असे असूनही आमच्या मानसिकतेत थोडेतरी परिवर्तन व्हायला नको का? आपल्या नियत कर्मालाच लोक परमेश्वर का समजत नसतील? ‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’, हा उपदेश फक्त गाडगेबाबांपुरताच का सीमित राहत असेल? ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणणाऱ्या सावता महाराजांना जे उमगले ते आपण किती अंगिकारले? संतांची जगण्याची ही सोपी रीत आपण आणखी अवघड करून ठेवली आहे. या अवघड जगण्यालाच श्रद्धा म्हणून वर्तणे, हा आमच्या वर्तनप्रवाहाचा विपर्यास नव्हे का?

आधुनिक संत, महंत, बुवांचे प्रवचन कीर्तनाचे ओसंडून वाहणारे मंडप पाहिले की आश्चर्य वाटते. श्रद्धाशील भक्तांची गंगा दुथडी भरून अनवरत वाहत असते. दुसरीकडे विचारवंतांच्या व्याख्यानांचे विचारमंच रिते रिते दिसतात. विचारजागरातून माणसांना काहीच गवसत नसेल का? माणसाकडे विज्ञाननिर्मित सुखं खूप आलीत. समृद्धीच्या गंगेचे पात्रही भरून वाहते आहे; पण मनातील प्रसन्नतेचे प्रवाह आटत चालले आहेत. व्यापकपणाचे आकाश संकुचित होत चालले आहे. आपलेपणाच्या सीमा आक्रसत चालल्या आहेत. अतृप्त, अशांत, सैरभैर मने शांततेच्या शोधार्थ वणवण भटकत आहेत. कोणातरी बुवा, बाबांच्या आश्रयार्थ जाऊन त्याच्या चरणी लीन होत आहेत. मंदिरांमध्ये जाणाऱ्या भक्तांच्या रांगा वाढत आहेत. तेथे तासंतास प्रतीक्षा करूनही फारसे काही हाती लागत असेल असे वाटत नाही, कारण तसे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. दैन्य, दास्य, दारिद्र्य राहिलेच नसते.

आसपास अन्याय, अत्याचार घडतोच आहे. नैतिकतेचे अधःपतन होतच आहे. मूल्यप्रणित आणि मूल्यप्रेरित विचारांनी जीवनातून काढता पाय घेतला आहे. आसक्तीच्या परिघात माणसाचा स्वार्थपरायण आत्मशोध सुरु आहे. असे चित्र आसपासच्या आसमंतात असेल, तर मूल्यांच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्या क्षितिजावरील दैवताला श्रद्धाशील अंतकरणाने शरण जाऊन साकडे घालावे? कोणत्या क्षेत्री पदर पसरून उभे राहावे? कोणत्या देवाला ओंजळभर चांगूलपण मागावे? ईश्वर अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याची श्रद्धा मनीमानसी असते. असे असेल तर आपल्या मनालाच देव्हारा करून त्यात मांगल्याची कामना करणाऱ्या विचारांची प्रतिष्ठापना करायला काय हरकत आहे? ‘नसे राउळी वा मंदिरी, जेथे राबतात हात तेथे असतो हरी’ असे म्हणतात. कर्मयोगात देव असेल, तर कर्मालाच आपले दैवत करून श्रद्धाशील अंतकरणाने त्याचीच पूजा आपण का बांधू नये?

0 comments:

Post a Comment