Anastha | अनास्था

By
गेल्या आठवड्यात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणी नेली. मुलं तशी लहान-लहान होती. त्यांना स्थळांच्या दर्शनापेक्षा आपण सहलीस जातोय याचाच अधिक आनंद. अर्थात ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्यांच्याशीच देणंघेणं. आणखी बाकीचं काय? हा प्रश्न मनात येणंही शक्य नाही. वयानुरूप तसं आवश्यकही नाही किंवा तशी अपेक्षा करणेही संयुक्तिक नाही. पण तरीही ओघओघाने काही गोष्टी घडतात. त्या तशा लहानसहान असतात; पण कधीकधी कळत-नकळत खूप मोठा विचार मांडून जातात. तो ठरवून प्रकटत नसतो. सहजरीत्या समोर येतो. आपण जाणीवपूर्वक थोडं लक्ष केंद्रित की, त्या लहानशा घटनेत खूप मोठा आशय सामावलेला असल्याचे दिसते.

घडलं असं की, सहलीतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवास करून पोहचले वेरूळला. लेण्या पाहत राहिले. चेहऱ्यावर एक भारावलेपण सोबत घेऊन विहरत राहिले. शिल्पाकृती पाहून काहींच्या मुखातून आश्चर्यदग्ध उद्गार उमटले. त्यातील काही मुले लेण्यांच्या अवतीभोवती खेळत राहिले. पळत राहिले. काहींनी भिंतीना, स्तंभांना, मूर्तींना हात लाऊन पाहिले. हळुवार हात फिरवीत आपल्या मनात जागा करून देत साठवत राहिले. काहींनी इतिहासाच्या पुस्तकातील धड्यात दिलेले चित्र याच शिल्पाचे आहे का, म्हणून खातरजमा करून घेतली. काहींनी आपल्याकडील माहितीच्या आधारे आपलं मत मांडून पाहिलं. आणि ते सारं मनात कोंडून पुढच्या प्रवासाने देवगिरी किल्ल्यावर पोहचले. किल्ल्याचे विशाल रूप पाहताना मनाचे आसमंतही व्यापक होत गेलं. किल्ल्याच्या पायऱ्या चढून जाताना आजूबाजूच्या गोष्टी पाहत गेले. निरखीत गेले. सगळे एका वेगळ्या भारावलेल्या भावविश्वात येऊन उभे राहिले.

किल्ला पाहण्यात सारे रमले. मात्र, त्यातील एक मुलगा किल्ल्याचे भग्न अवशेष वेगळ्या विचारातून निरखून बघत होता. किल्ल्याच्या ढासळलेल्या चिऱ्यांकडे आपलंच काहीतरी उध्वस्त झाल्यासारखे पाहत होता. कदाचित किल्ल्याच्या गतकाळाच्या वैभवाला कल्पनेने पाहणं सुरु असावं. त्याशी तुलना करून पाहताना आजची अवस्था पाहून मनातून खंतावत होता. त्याच्याकडे सहजच लक्ष गेलं. बोलायचं म्हणून विचारलं, “कायरे बाळा, सगळी पोरं किल्ला पाहतायेत. तू काय या ढासळलेल्या चिऱ्यांशी संवाद करतोय का?” मुलाने क्षणभर अवकाश घेऊन मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मलाच प्रतिप्रश्न केला. म्हणाला, “सर, या किल्ल्याची अवस्था अशी का झाली असावी, कोणी केले असेल हे?” प्रश्न साधासाच होता; पण मीही विचारात पडलो. या पोराला उत्तर काय सांगावे? मी काय सांगितले म्हणजे याचे समाधान होईल. नीट समजेल. खरंतर माझीच वाचा बंद व्हायची वेळ आली होती. शिक्षकही कधीकधी निरुत्तर होतो. हा अनुभवाला ‘याचि देहा याचि डोळा’ घेत होतो.

किल्ल्याची अशी अवस्था का झाली असावी? त्या मुलाने विचारलेला प्रश्न एकच होता; पण उत्तरे कितीतरी होती. यातील कोणते उत्तर अचूक असेल? मीही विचार करतोय, नेमकी काय कारणं असतील या सगळ्यामागे? ती काहीही असोत; पण माझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात सांगता येईल ‘अनास्था’. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतातच, असे नाही. ती मिळवीत म्हणून शोधण्यासाठी थोडीशी वणवण करावी लागते. त्या प्रश्नाविषयी आस्था असावी लागते. आस्था असेल तर निदान त्या प्रश्नांचा विचार तरी करता येतो. मात्र आपणास काहीच देणंघेणं नाही, जे होईल ते होवो. इतक्या निर्विकारपणे वागलो, तर प्रश्नांचं गांभीर्य संपते. आपल्या वर्तनाचा सार्वजनिक अनास्था एक मोठा दोष आहे. आपल्या सामाजिक जीवनात वास्तव्य करून आहे. हेच काहीही न घडण्यामागचे मुख्य कारण आहे. मला काय त्याचं? या विचाराने आपण बहुदा वर्ततो. अशा वर्तनाचे परिणाम आपल्या सार्वजनिक जीवनातून याप्रकारे दृगोचर होत राहतात. क्षणभर विचार करूया, देवगिरीचा किल्ला माझ्या मालकीचा असता तर..., कैलास मंदिर माझ्या मालकीचे असल्याची सातबाराच्या उताऱ्यात नोंद असती तर..., या वास्तूंना अशी अवकळा आली असती का?

खरंतर ‘आपले’ हा शब्द जेव्हा आपण सर्वांसाठी वापरला जातो, तेव्हा त्याला व्यापकपणाचे अवकाश प्राप्त होते. व्यापकपणाला आपलेपणाच्या अंगणात अधिष्ठित का करीत नाहीत? कदाचित यासाठी अनेक कारणे असतील. सांगता येतीलही. त्यातील कोणत्यातरी एका कारणासाठी निदान काही अंशी आपण जबाबदार असू शकतो. पण हे लक्षात कोण घेतो? आपण काहीही करायचे नाही. कोणीतरी हे करतील, म्हणून वाट पाहत राहणे हेच आपले कर्तव्य असल्यासारखे वागतो. या वास्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी सरळसरळ सरकारवर ढकलायची अन् व्यवस्थेच्या नावाने बोटं मोडायची. याला काय म्हणावं? या वास्तूंना संरक्षित केले असल्याचे फलक पुरातत्व खात्याने वास्तूंच्यासमोर लावलेले असतात. ते वाचूनही आपण निरक्षर असल्यासारखे वागतो. अशावेळी मनातून एक प्रश्न उभा राहतो. आपण शिकलो, पदवी मिळवली. पदवीच्या कागदांना दाखवून नोकरी, उपजीविकेचे साधन किंवा तत्सम काहीतरी मिळविले. आपण शिकल्याचा पुरावा पदवीच्या कागदाने दिला. मात्र, आपण खऱ्याअर्थाने परिपूर्ण शिक्षित झाल्याची हमी आपणास त्यासोबत मिळालीच नाही.

वास्तूंवर काहीतरी लिहून त्यांचं विद्रुपीकरण करणारे बहुसंख्य साक्षरच आहेत. वास्तूंच्या भिंती, बुरुज, शिल्पे, चित्रे काहीही बघा; येथे येऊन कोणीतरी प्रेमवीर आपली नाममुद्रा कोणातरी तिच्या नावासह अंकित करतो. सोबतीने गळ्यात गळे घालून फोटो काढून जातो. यातील काहींना तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. मग हे डेअरिंग वास्तूंवर करून पाहतो. तिच्या पश्चात तिचं नाव येथे कोरून ठेवतो. आपण कोणी ऐतिहासिक व्यक्तित्व असल्याचे स्वतःला समजून घेतो. लोकांना आपल्या अशा वागण्याची जराही खंत वाटत नसावी का? अहोरात्र खपून या वास्तू ज्यांनी उभ्या केल्या, त्यांनी कधी आपली नावं तेथे कोरली नाहीत. त्यांना आपल्या नावापेक्षा वास्तूचं नाव मोठं व्हावं असं वाटत असेल. ते खरेही आहे, कारण या वास्तू निर्मिणाऱ्यानी आपली नावे काही तिथे लिहिलेली दिसत नाहीत. 

वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेमवीरांच्या नावांच्या जोड्या जणूकाही विश्वातील अजरामर व्यक्तित्वे आहेत, या विचारातून वास्तूंवर लेखांकित होतात. गणितातील सूत्रे आधुनिक रूपं धारण करून; कोणीतरी X + कोणीतरी Y = Love असे प्रकटत असतात. वास्तूंवर कोरलेली अशी अलौकिक कारागिरी अनेकदा आपण पाहतो. पण काहीच करू शकत नाहीत, कारण आपली सार्वजनिक अगतिकता. अशावेळी समोर प्रश्न उभा राहतो करावे काय? आपण एकटे काही करू शकत नाहीत. हे थांबवू शकत नाहीत, हेही सत्य आहे. निदान आपल्यापुरते आपण संवेदनशील राहिलो, तर हा प्रश्न सर्वांशाने नाही; आपल्यापुरता तरी सुटेल. अनेकातील एकेक स्वतःपुरते बदलले तरी खूप काही झाले. असं काही लिहिलेलं पाहून मी माझ्या सहकारी शिक्षकांना बऱ्याचदा उपहासाने म्हणतो, प्रश्नपत्रिकेतील जोड्या जुळवा प्रश्नच आपण काढून घ्यायला हवा; म्हणजे जुडलेल्या जोड्यांची उत्तरे वास्तूंच्या भिंतींवरून आपणास पाहायला लागणार नाहीत.

वास्तूंच्या भव्यतेचे गुणगान करायचे. त्यामागील इतिहासाचे पोवाडे गायचे आणि आपल्याच हाताने वास्तूंच्या सौंदर्याला बाधित करायचे. केवढी ही आपल्या वर्तनप्रवाहातील विसंगती. केवढे अंतर आहे आपल्या उक्ती आणि कृतीत. प्रवासात खाण्यासाठी नेलेल्या पदार्थातील उरलेले तेथेच टाकून आपण मोकळे होतो. कॅरीबॅग झेंडे बनून वाऱ्यासोबत आपल्या नावाचे निशाण फडकवत राहतात. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फुटबॉल बनून लाथाडत राहतात. पावलोपावली कचरा लोळण घेत आसपास घुटमळत असतो. पर्यटकांच्या झुंडी हसतखेळत येत-जात असतात. वास्तूचं शापित जगणं असह्य होत राहते. तिचे दुर्दैवाचे दशावतार काही केल्या कमी होत नाहीत. याविषयी काही उत्साही विश्लेषक आपली मते आग्रहाने मांडतात. म्हणतात, या वास्तू परदेशात असत्या तर अशा जतन केल्या गेल्या असत्या. तशा सांभाळल्या गेल्या असत्या. संरक्षित वारसा म्हणून गतकाळाचे वैभव सोबत घेऊन डौलाने उजळीत राहिल्या असत्या. आपल्याकडे अशा गोष्टींविषयी आस्थाच नाही. आपण असेच आहोत वगैरे तत्वज्ञानपर, चिंतनपर बरेच काही काही विवेचन करीत असतात. पण ही माणसं बोलताना एक विसरतात की, कायदे तेथेही आहेत आणि येथेही आहेत. प्रश्न आहे आपल्या सकारात्मक, संवेदनशील मानसिकतेचा. कायद्याने सगळेच प्रश्न सुटत नसतात. कायद्याने शिक्षा जरूर होते; पण माणसाची मानसिकता कायद्याच्या शिक्षेने नाहीतर प्रगमनशील, परिणत विचारांनीच बदलत असते. याकरिता बदलांना स्वीकारून स्वतः बदलणारे आणि बदल घडवणारी माणसं मोठ्या संख्यने समोर येणे आवश्यक आहे. विधायक बदल अंगीकारणारे व्यक्तित्वे जागोजागी उभे राहिल्याशिवाय परिस्थितीत परिवर्तन घडणे अवघड असते.

उदाहरणच सांगायचे झाले तर आपल्या एसटी महामंडळाच्या बसेस आणि खाजगी मालकीच्या बसेसची तुलना करून पाहा. आपल्या रेल्वेचे लावण्य पाहा. सार्वजनिक कचरापेट्या करून टाकल्या आहेत आपण त्यांना. रेल्वेत बसून प्रवास करणारा हा माणूस विमानात बसून प्रवासाला निघतो, तेव्हा त्याच्या वर्तनात असा अनपेक्षित बदल कसा काय होतो? विमानतळावर तो कचरा का टाकत नाही? बसस्थानकात आला की पचापचा का थुंकतो, भिंती रंगवतो. हे घडतं, कारण आपली मानसिकता. खरंतर माणूस बदलण्याआधी त्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्यासाठी सार्वजनिक सुविधा केलेल्या असतात. त्यांची आपण किती काळजी घेतो? पाणपोईवर पाणी पिण्यासाठी ग्लास असतो, तोसुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. दवाखान्यात लिहावे लागते, शांतता राखा. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेलं असतं थुंकू नका. माणसं त्यावरच थुंकतात. रस्त्यावरून रोजच प्रवास करावा लागतो. रस्त्यावर आपण खरंच संपूर्ण सुरक्षित प्रवास करतो का? रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक पाहिली म्हणजे आपण वाहतुकीच्या नियमांचे किती काटेकोर निर्वहन करतो, हे कोणालाही सहज कळेल. त्याकरिता दाखले, उदाहरणे द्यायची आवश्यकता नाही. हा सार्वजनिक गोंधळ पाहिल्यावर आपण भारतीय असल्याचा अभिमान आपणास वाटल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांवर यातायातदर्शक दिवे असतात. लालरंगाचा दिवा समोर दिसत असतो तरीही तो ओलांडून जाणे हाच पुरुषार्थ आहे, असे काहींना वाटत असते. आपण सुपरहिरो असल्याचे फिलिंग होत असते. आपण नियम मोडतो आहोत, याचे कोणालाच सोयरसुतकही नसते. नुसता नियमच मोडत नाहीतर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्याचा जीव अनपेक्षितपणे धोक्यात टाकतो आहोत, हेही भान नसते. कसं बदलावं या परिस्थितीला? अवघड आहे... पण अशक्य नाही. उशिरा का होईना बदल होतील. याकरिता आपणच आपले मार्गदर्शक व्हावे लागेल. आपले सार्वजनिक वर्तनप्रवाह विधायक विचारांच्या दिशेने वळते करावे लागतील.

सहलीतील विद्यार्थ्यांना आम्ही जेवणासाठी बसवलं. साऱ्यांनी जेवणाचे डबे उघडले. जेवणापूर्वी त्यांना सक्त सूचना दिल्या. आपल्याकडील राहिलेले उष्टे पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद जे काही टाकण्यासारखे असेल, ते जेवणानंतर सगळं उचलून कचरापेटीत टाका. काही विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केले. बाकीच्यांनी आम्ही जणू त्या गावाचे नाहीतच, असं समजून राहिलेले पदार्थ, कागद दिले तसेच भिरकावून. ते पाहून मी त्या मुलांना रागावलो. आपापल्या टाकलेल्या वस्तू उचला म्हणून परत-परत सूचना दिल्या. कुणीही फारसे गांभीर्याने घेतलेच नाही. सोबतचे अन्य शिक्षकही रागावले. त्याच त्या सूचना सांगायला लागले; पण परिणाम शून्य. शेवटी स्वतः उठलो. त्यांनी टाकलेले पदार्थ, कागद इत्यादी वस्तू उचलू लागलो. पण पोरांना त्याच्याशी काही देणंघेणंच नव्हतं. छानपैकी माझ्याकडे पाहतायेत. कोणालाही साधी खंतही वाटत नव्हती की, हा कचरा आपणच टाकला आहे. म्हणून तो आपणासच उचलावा लागणार आहे.

अस्ताव्यस्त टाकून दिलेला कचरा मी वेचतो आहे, हे पाहून दोन विद्यार्थी आले माझ्याकडे. माझ्यासोबत तेही लागले कचरा वेचायला. त्यातील एकाने मी गोळा केलेला कचरा एका पिशवीत नीट कोंबला आणि कचरापेटीत नेऊन टाकला. मी अवाक होऊन समोरच्या परिस्थितीकडे पाहत होतो. मनात विचारांचा कालवा सुरु. आम्ही शाळेत मुलांना नेमकं शिकवतो काय? आम्ही कोणती गुणवत्ता घडवतो आहोत? प्रगतिपत्रकातील कागदी गुणवत्ता की, समाजपरायण विचारांविषयी आस्था असणारी गुणवत्ता? कागदी गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे सारेच आहेत. जीवनाची गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे नसावेत का? कोठारी आयोग सांगतो, शाळेच्या भिंतीच्या आत उद्याचं उज्ज्वल भविष्य घडत आहे. हेच ते उज्ज्वल भविष्य का? जे संवेदनशीलता हरवून बसले आहे. संवेदनशीलता फक्त शाळेतच शिकवावी लागते का? घरच्यांची यासंदर्भात काहीच जबाबदारी नाही का? कुटुंबाने, समाजाने दिलेले संस्कार शाळेतील धड्यांमधून मिळणाऱ्या संस्कारांपेक्षा मोठे असतात. हे आपण विसरत आहोत का? दोनशे विद्यार्थ्यांमधून केवळ दोघांनीच पुढे यावं. बाकीच्यांनी आजूबाजूला कचरा टाकून पाहत राहावे. यांचे हे संस्कार वर्तनाच्या कोणत्या प्रगतिपत्रकात बसवावेत?

माझ्या सोबतच्या काही शिक्षकांनी हे सगळं पाहिलं. त्यांना मी म्हणलो, “सर, हीच आपली यशस्वी शिक्षणप्रणाली बरं का! जी माणसाला श्रम करायला लाजवते.” त्यांच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर एवढं काही वाईट वाटून घेऊ नका हो! शेवटी आपण भारतीय आहोत.” त्यांच्या बोलण्यातील उपहास थोडावेळ बाजूला ठेवला, तरी एक सत्य शिल्लक राहतेच. आपण आपल्या घरी कसे वागतो. घराचा परिसर नीटनेटका राहावा म्हणून सगळंकाही करतो. पण सार्वजनिक ठिकाणी गेलो की, आपण असे का वागतो? याला संस्कारांचा भाग म्हटला तरी हा प्रश्न एवढं म्हणून सुटत नाही, कारण संस्कार सर्वत्र असतात. महत्वाचे आहे, ते कुठे आणि कसे होतात. संस्कारांची अक्षरे मनावर कशी गिरवली जातात. आपण उज्ज्वल वारशाच्या वार्ता करीत असतो. तो तसा आहेही; पण विद्यमान वर्तनाला, परिस्थितीला नाव कोणतं द्यावं? असे पढतपंडित शाळांमधून घडणार असतील, तर इतिहासकालीन वास्तूचं एकवेळ राहू द्या; पण देश नावाच्या वास्तूचं काय? अशा वर्तनाने वर्तणारे ती भक्कम कशी करू शकतील? या वास्तूला संरक्षित करण्यासाठी त्याग, समर्पण भावनेतून निर्मित संस्कार मनावर कोरावे लागतात. असे कोरीव संस्कार आचरणातून आणावे लागतात. सार्वत्रिक पातळीवर घडवावे लागतात. याकरिता प्रगल्भ विचार करणारी माणूस नावाची शिल्पे घडवावी लागतील. ती घडविणारे शेकडो हात परत एकदा वर्षानुवर्षे काम करीत ठेवावे लागतील.  

0 comments:

Post a Comment