Pani | पाणी

By
तापमापीतील वरवर सरकत जाणारा पारा आणि रखरखते ऊन म्हणजे उन्हाळ्याचे तापदायक अन् मोठेच्या मोठे दिवस हे निसर्गाचे ठरलेले चक्र. निसर्ग नियमानुसार हे घडणारच. ते काही आपणास बदलता येत नाही. फारतर घरात, कार्यालयात पंख्यांच्या, ए.सी.च्या शीतल गारव्यात सुसह्य करता येईल. अर्थात त्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध असली तर. मे महिन्यातील वाढते तापमान ४५.°से., ४६°से. चढण चढून उंचीशी स्पर्धा करतेय. कधी एकदाचा हा असह्य उकाडा संपून पावसाच्या धारांनी भिजतो याची माणसं वाट पाहत आहेत. जून महिना, पाऊस यांच्याशी माणसाचं नातं जुनंच आहे. देशाचं कृषीकारण पावसाशी बांधलं गेलं आहे. कृषीकारणाशी जुळलेले अर्थकारण बरसणाऱ्या जलधारांशी निगडित आहे आणि शेतकरी या सगळ्या कारणांशी जुळला आहे. नेहमीप्रमाणे तो आकाशाकडे डोळे लावून बसलाय. त्याच्या शुष्क डोळ्यात स्वप्नांचे काही ढग जमा झाले आहेत. आजचा नाही, पण निदान येणारा दिवस जीवनात गारवा आणेल. त्याचा सांगावा पाण्याने ओथंबलेले ढग घेऊन येतील, ही छोटीशी आशा मनात अंकुरतेय. तिला अपेक्षांनी कोवळी पालवी फुटू पाहतेय.

नेहमीप्रमाणे हवामानाचे, पावसाचे अंदाज वर्तवले जात आहेत. तो किती असेल, हे येणारा काळच ठरवेल. सरासरीइतका असेल की, त्यापेक्षा कमी. याचा अंदाज घेत शेतकरी पेरणीपूर्व कामे संपवण्याच्या घाईत आहे. केव्हा एकदा कामे हातावेगळी होतील याची चिंता लागली आहे. कामाच्या लगीनघाईतून ती जाणवतेय. जगण्याचा संघर्ष त्याच्यासाठी नवा नाही. दरवर्षी निसर्गासोबत तो हा खेळ खेळतो. कधी त्यात जिंकतो. कधी हरतो. जिंकला किंवा हरला, म्हणून नाही सोडता येत खेळ त्याला अर्ध्यावर. नाही सोडता येत परिस्थितीशी दोन हात करीत उभं राहण्याची उमेद. नाही तोडता येत मनातील आशेचे बंध. परिस्थितीचे धागे गुंफत तो जगण्याच्या आकांक्षांचे पट विणतोय. मनातून उमलणाऱ्या स्वप्नांचे त्यात रंग भरतोय. जीवनसंघर्षात एकेक पाऊल टाकीत स्वतःला घट्ट रुजवण्याचा प्रयत्न करतोय. इच्छाशक्तीची मुळे अस्तित्वाचा ओलावा शोधीत अपेक्षांच्या भूमीत शिरतायेत. काही अभागी परिस्थितीच्या आघाताने उन्मळून कोसळतायेत. त्याचं कोसळणं जणू विधिलिखित झालं आहे. भाग्योदयाच्या प्राक्तनरेषा बदलवून टाकणाऱ्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सारेच करतायेत.

जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक व्यवसायातील शेती हा एक परंपरागत मार्ग. अनेकांच्या आयुष्यांना आकार देणारा. तरीही या व्यवसायात राम राहिला नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. अत्यंत बेभरवशाचा व्यवसाय म्हणजे शेती करणं, शेती कसणाऱ्या बहुतेकांचं असेच मत असल्याचे जाणवते. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी येथील शेती, शेतकरी नियतीच्या चक्राशी बांधले गेले आहेत. पिढ्यानपिढ्या या चक्रासोबत चाललेली फरफट थांबण्याचं नाव काही घेत नाही. ओढग्रस्त जीवनाच्या वेदनादायी यातनातून बाहेर पडण्याचा अन्य पर्याय हाती दिसत नाही. आहे त्यात, आहे तसं जगणं हेच भागधेय समजून नशिबाला दोष देत जगण्याच्या वाटा तो शोधतोय. देशातील वजनदार, सधन शेतकरी वगळले, तर शेतीचा जेमतेम एकर-दोनएकर तुकडा नावावर असणाऱ्या जवळपास साऱ्याच शेतकऱ्यांच्या जीवनाचे हे चित्र आहे. यात खूप काही प्रचंड बदल झाल्याचं कुणा शेती कसणाऱ्या आणि हाती जेमतेम शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुखातून अद्यापतरी ऐकिवात नाही. जगण्याचं चित्र असं विसकटलेले पाहत तो सुखाचा शोध घेतोय, पण काही हाती लागत नाहीये.

देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगतीविषयी कुणाच्याही मनात कसलाही संदेह असण्याचं मुळीच कारण नाही. स्वातंत्र्य संपादनानंतरच्या सुरवातीच्या काळात साध्यासाध्या वस्तूंसाठी अन्य देशांकडे मदतीसाठी आशाळभूतपणे पाहणारा देश आज स्वतःची अवकाशयाने तयार करून मंगळापर्यंत पाठवतोय. देशाच्या प्रगतीच्या पाऊलखुणा पाहून इतर देशांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्या विस्मयचकित नजरेत कुतुहलासोबत एक आस्थाही दिसते आहे. देशात हरितक्रांती, धवलक्रांती घडवून आमचं अस्तित्व काय आहे, हे जगाला सिध्द करून दाखविले. कधीकाळी टंचाई, चणचण अनुभवणाऱ्या देशातील धान्याची गोदामं ओसंडून वाहत आहेत. देशाचं सामर्थ्य स्वयंभू आहे. वादातीत आहे. असे असूनही येथे टोकाची विषमता, विसंगतीही नांदते आहे.

कदाचित आपणास वाटेल, काही लोकांना असतेच अशी काहीना काहीतरी न्यून शोधयची, बघायची सवय. समोरचा पांढरा स्वच्छ कापड दिसत नाही. त्यावरचा शाईचा डाग तेवढा दिसतो. तुमच्या नजरांना डागच बघायची सवय जडलीय. शंभरातल्या नव्याण्णव चांगल्या गोष्टी दुर्लक्षून एक छोटासा डागच का बघावा? बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण तो नेमका समोरच दिसतोय ना! सगळं कसं स्वच्छ, चांगलं असूनही छोट्याशा डागांकडे लक्ष वेधले जातेच ना! पण डाग दिसतो आहे, तोही न दिसावा म्हणून आपण काहीच करू शकत नाहीत का? सगळंच चांगलं आहे, हे म्हणणे वास्तव आहे का? सगळं चांगलंच असतं तर समस्या उरल्या असत्या का? परिस्थिती परिवर्तनासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची कमी नाही. व्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्यांसाठी विधायक कार्य करणाऱ्यांची आपल्याकडे वानवा कधीच नव्हती. विकासपथावरील वाटचालीसाठी केवळ चारदोन हात मदतीसाठी पुढे येऊन चालत नाही. कोण्या एकाचे एक पाऊल प्रगतीकडे उचलले जात असताना सोबत शेकडो पावले उचलली जाणे महत्त्वाचं आहे. यासाठी फार मोठा त्याग करण्याची आवश्यकता नाही. थोडे पण प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रयत्नांना सार्वत्रिककतेचे कोंदण लाभणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात नेहमीप्रमाणे साठे कमी झाल्याने गाव, वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर पोहोचल्याच्या वार्ता वर्तमानपत्रातून येत राहतात. डोक्यावर हंडे घेऊन लेकीबाळी उन्हातान्हात अनवाणी पायांनी मैलोनमैल वणवण भटकंती करतात. विज्ञानतंत्रज्ञानात प्रगती घडूनही नेहमीच दिसणाऱ्या दृश्यात अजूनही फारसे बदल झालेले का दिसत नाही? देशाचा बराचसा भाग पावसाच्या पाण्याबाबत नशीबवान असूनही पाण्याच्या संवर्धनाकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत असणारी उदासीनता सोडायला आपण तयार नाहीत. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी डोळ्यासमोर वाहून जाताना आनंदाने पाहतो. उन्हाळ्यात प्यायला, वापरायला पाणीच नाही, म्हणून पाण्याच्या नावाने खडे फोडतो. कोणीच कसं काही करत नाही, म्हणून बोंबा मारायला मोकळे होतो. हा आपल्या उक्ती आणि कृतीतला विपर्यास नाही का? कमी पाऊसमान असणाऱ्या देशांनी पाण्यासाठी कसे नियोजन केले आहे, त्यांचा पाण्याचा वापर कसा काळजीपूर्वक आहे. याच्या रसभरीत वार्ता करतो. या देशांमधील पाणीवापराचे, अल्पशा पाण्यातूनही शेतीत घेतल्या जाणाऱ्या उत्पन्न प्रयोगांचे भरभरून कौतुक करतो. पण त्यांनी यासाठी कोणते प्रयत्न केले, हे सोयीस्करपणे दुर्लक्षित करतो. असे काहीतरी करून आपल्यालाही बदल करता येवू शकतो. याचा विचार न करता आपण काहीच का करत नाहीत? असे प्रयत्न करण्याकरिता आपल्याला कोणी थांबवलंय? पाणी वापराचे, बचतीचे उपाय इतरांना सांगायचे. पाणीप्रश्न जगासमोरील गंभीर समस्या असल्याबाबत मत प्रदर्शित करायचे आणि स्वतः पाण्याच्या बचतीबाबतीत होईल तितके निष्काळजीपणे वागायचे. अगदी लहान गोष्टीही दुर्लक्षित करायचे. याला संवेदनशीलता कसे म्हणावे? आपल्या अशा वर्तनाला सार्वजनिक प्रश्नांविषयीची आस्था म्हणायचे का?

आपण काही करण्याआधी साऱ्या गोष्टींची जबाबदारी व्यवस्थेवर ढकलून द्यायची. जे काही करायचे ते सरकार करेल, ही मानसिकता घेऊन वागणारा समाज नवे काहीही करू शकत नाही. पाण्याच्या उपलब्धतेसाठी नियोजने केली जातात. प्रकल्प आखले जातात. आराखडे तयार होतात. ते तयार होऊन कॅलेंडरची पानामागून पाने उलटत जातात. वर्षे सरतात. सरणाऱ्या वर्षांनी माणसांच्या पिढ्याही बदलतात. प्रकल्पासाठी केलेली आर्थिक गणिते विस्कटतात; पण प्रकल्प जन्माला येऊनही बाळसे धरत नाहीत. त्यांचं सरपटणं चालूच असते. कारण आपल्याकडे असणारा तत्परता गुणाचा अभाव. बेफिकीरपणे वागणे आमच्या अंगवळणी भिनले आहे. शेतीसाठी सिंचनाची कमाल मर्यादा गाठायला कमी पडत असू, तर दोष नेमका द्यायचा कुणाला? आपणच आपल्याला की, आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेला? दोष कुणाचाही असो, त्याचे निराकरण करता येते. व्यवस्थाही बदलता येते. यासाठी आवश्यकता असते आपले विचार सकारात्मक आहेत का, हे तपासून पहायची. गरज भासल्यास मुळापासून बदलण्याची. बदललेल्या विचारातून विधायक कामे उभी करायची. भले ती कोणा एकाला शक्य होत नसतील, तर अनेकांनी मिळून एक विचाराने काहीतरी विधायक घडवायची. असे विधायक परिवर्तन घडविण्यासाठीही आपल्या अंगात पाणी असावे लागते, नाही का? 

0 comments:

Post a Comment