Samvidhan | संविधान

By // 3 comments:
२६ जानेवारी १९५० पासून २६ जानेवारी २०१४ पर्यंत कॅलेंडरची ७६८ पानं उलटली आहेत. इतिहास जमा झालेली वर्षच शोधत गेलो तर ६४ वर्षापूर्वी भारतीयांच्या आशा आकांक्षांना मुखरित करणारा ‘पाचवा वेद’ संविधानाच्या रूपाने अंमलात आला. १०८२ दिवसाच्या अहर्निश श्रमातून साकारलेली संविधानगाथा २२ भागातून ३९५ कलमे आणि १२ परिशिष्टात लेखांकित झाली.

१९४६च्या जुलै महिन्यात घटना समितीसाठी निवडणुका होऊन घटना समिती अस्तित्वात आली. यात डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. जयकर, कन्हैयालाल मुन्शी, राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू यांसारखे नामवंत घटना समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीच्या एकूण अकरा उपसमित्या कार्यरत होत्या. त्यातील मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीचे निर्वहन करणाऱ्या, प्रचंड विद्वत्ता, प्रगाढ व्यासंग असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरगामी विचारातून अन् सिद्धहस्त लेखणीतून आविष्कृत झालेले संविधान भारतीयांच्या मनातील अस्मितांचा उत्कट आविष्कार होता.

कालजयी कलाकृती एका दिवसात घडत नसतात. त्यासाठी समर्पणाच्या समिधा अर्पण करणारी ध्येयनिष्ठांची मांदियाळी उभी करावी लागते. त्यांचा ध्यास हाच जगण्याचा श्वास होतो, तेव्हाच कालपटावर ही अक्षर, अभंग, अक्षय लेणी उभी राहतात. सर्वसामान्यांना दिसत नाही, ते पाहण्याची दृष्टी नियतीकडून सोबत घेऊन आलेली माणसं ध्यासाचे गौरीशंकर होतात. ध्येयपथावर वाटचाल करणाऱ्या अशा समर्पणशील पथिकासाठी इतिहास आपली काही पानं राखून ठेवतो.

प्रबळ सत्ताधीश बनून दीडशे वर्ष अहं मिरविणारे ब्रिटिश सत्ताधीश साम्राज्यवादी, वसाहती मानसिकतेतून भारतीयांच्या अस्मितेवर आघात करीत, दमननीतीचा वापर करीत सत्ता टिकवू पाहत होते. त्यांच्या निरंकुश सत्तेशी संघर्ष करीत ६७ वर्षपूर्वी १५ ऑगस्ट १९४७ला भारताने स्वातंत्र्य मिळवले. स्वराज्य मिळाले, त्याचे सुराज्यात रुपांतर करायचे होते. या सुराज्य निर्मितीसाठी दिलेल्या अभिवचनाच्या पूर्ततेची कालजयी गाथा म्हणजे संविधान. ‘माझं ते चांगलं’ या अभिनिवेशाने न वर्तता ‘चांगलं ते माझं’ म्हणत संविधानकारांनी विश्वातील अन्य संविधानांच्या आकलनातून चागले तेच आणि तेवढेच स्वीकारले. त्यातील उदात्त विचारांचा स्वीकार सम्यक वृत्तीने केला. विद्वानांच्या परिशीलनातून चर्चा, विचार, मंथन, खंडन, मंडन घडत राहिले. त्या मार्गाने हाती आलेल्या विधायक विचारांनी विश्वातील एक प्रदीर्घ संविधान लेखांकित झाले. त्याला भारतीय चेहरा दिला. तीच त्याची ओळख बनविली.

२६ नोव्हेंबर १९४९ला संविधान समितीने संविधान स्वीकृत केले. त्याच्या आदल्या दिवशी, २५ नोव्हेंबर १९४९ला घटना समितीत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “२६ जानेवारी १९५० रोजी आपण विसंगतींनी भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकीय जीवनात आपल्याकडे समानता असेल; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता असेल. राजकीय जीवनात आपण ‘एक व्यक्ती, एक मत’ आणि ‘एक मत, एक मूल्य’ तत्वांचा अंगिकार करू; पण आपल्या सामाजिक, आर्थिक ढाच्यामुळे आपल्या सामाजिक, आर्थिक जीवनात ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ हे तत्त्व नाकारणार आहोत.”

आज ६४ वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचे आपण किती परिशीलन केले? त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सामाजिक, आर्थिक समतेचे तत्त्व सर्वच स्तरावर अंमलात आले आहे का? या प्रश्नाचा शोध घेतला तर ‘थोडा है, थोडे कि जरुरत है’, हेच वास्तव प्रकर्षाने अधोरेखित होईल. असे असेल तर आम्ही स्वीकारलेल्या व्यवस्थेला निरामय बनविण्याच्या प्रयत्नांना आपणच तिलांजली देत आहोत का? लोकशाहीव्यवस्था कोणा एकाच्या प्रयत्नांनी यशस्वी होत नसते, मोठी होत नसते. याकरिता साऱ्यांच्या प्रयत्नांच्या समिधा समर्पणाच्या धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित करायला लागतात. तेव्हा कुठे व्यवस्थेच्या चौकटी भक्कम होत असतात. संविधान केवळ राज्यशकट चालविण्याची मार्गदर्शिका नाही. कायदे करावे लागतात हे मान्य; पण त्यांचे पालन मनापासून होत नसेल, तर त्या कायद्यांना महत्त्व उरतेच किती? कायदा मोठाच असतो; पण माणूस त्याहून मोठा असतो आणि कायद्याचे पालन करणाऱ्या माणसांचं राष्ट्र त्याहूनही खूपच मोठं असतं. मोठेपण लादून येत नाही. ते प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं. टिकवावं लागतं. वाढवावं लागतं.

विद्यमानकाळी मोठेपणाच्या व्याख्याही बदललेल्या आहेत. ज्यांच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा तो मोठा. ही मोठेपणाची व्याख्या होऊ पाहते आहे. त्याग, समर्पण, निष्ठा या अलौकिक गुणांनी मंडित माणसं इतिहासाच्या पानापानामध्ये आम्हाला भेटतात; पण वास्तवात अशी किती माणसं आपल्या आसपास दिसतात? असली तर अपवादानेच का दिसतात? ज्या भूमीने जगास ललामभूत ठरावीत, अशी तत्वे दिली त्याच भूमीत, संस्कृतीत अशी माणसं मोठ्या संखेने का दिसत नसावी? स्वार्थाच्या परिघात माणसं स्वतःचं आणि स्वतःपुरतं सुख शोधत आहेत. या आवर्तात मूल्यव्यवस्थेचा प्रवास प्रचंड वेगाने घसरणीला लागला आहे. कधी नव्हे इतका अविश्वास देशातील नेतृत्वावर दाखवला जातोय. हे सावरायला आज महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीची माणसे मिळणार नाहीत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. ही माणसं पुन्हा या धरतीवर जन्म घेणारही नाहीत; पण यांच्या विचाराच्या मुशीतून किमान मध्यम, छोट्या उंचीचे का असेनात, एखादे महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात जन्माला येण्याची आवशकता आहे.

सांप्रतकाळाचे दुभंगलेपण सांधणारे विचार इतरत्र शोधायला जाण्याची खरंतर आम्हाला आवश्यकता नाही. महामानवांच्या जीवनग्रंथाला लेखांकित करणाऱ्या चरित्रगाथेच्या पानापानातून या माणसांना शोधलं, तर स्मृतिरुपाने आजही ते आम्हाला सोबत करताना, उदात्त जगण्यासाठी ऊर्जा देताना भेटतील. त्यांच्या जीवनचरित्रातून ही ऊर्जा संपादित करून अंतर्यामी साठवून ठेवावी लागेल. यासाठी गरज आहे सर्वचस्तरावरून प्रामाणिक प्रयत्न करण्याची. ग्लोबलायझेशनच्या बदलांनी ‘ग्लोबल व्हिलेज’ झालेल्या जगात जगण्याचे संदर्भ बदलले असतील, म्हणून जगण्याची मूल्यसुद्धा बदलावीत का? नुसती भौतिक प्रगती म्हणजे सगळं मिळवणं नसतं. भौतिक प्रगतीच समजून घ्यायची असेल, तर अमेरिकन संस्कृतीकडे पाहून ती कळेल; पण मूल्याधारित जीवन जगण्यावर असीम श्रद्धा असणारी माणसं शोधावीच वाटली, तर त्यासाठी भारतीय संस्कृतीकडेच परत यावे लागेल. बदलते समाजवास्तव, मोठ्याप्रमाणावर झालेले सांस्कृतिक आणि नैतिक अधःपतन, राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेतील वर्तनाविषयी प्रजेच्या मनात वाढत जाणारी संदेहात्मक भावना, पसरत चाललेला भ्रष्टाचार याबाबी आमच्या समोरील मोठी आव्हानं आहेत. या समस्यांचा प्रतिकार करण्यातच देशाची शक्ती पतन पावत असेल, तर देशाच्या विकासासाठी ऊर्जा उरेलच किती? देश केवळ महासत्ता होऊन चालत नाही, महासत्तेपेक्षा मोठी असते जनसत्ता. ही सत्ताच आज सैरभैर झाली आहे.

आपण व्यवस्थेतील एक जबाबदार घटक आहोत, या जाणीवेतून कार्यरत असणारी माणसंच देशाचे मोठेपण टिकवू शकतात. अशी टिकवू माणसं काही विकाऊ माणसांच्या जगातून शोधून प्रयत्नपूर्वक घडवावी लागतात. शाळेच्या पुस्तकातून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये शिकवले जातात. परीक्षा घेतल्या जातात. माणसं शिकून उत्तीर्ण होतातही पण दुर्दैवाने हक्क, कर्तव्ये परीक्षेतील गुणांपुरतेच उरतात. अभ्यासक्रमातील बारा गुणांच्या नागरिकशास्त्र / राज्यशास्त्रातून जबाबदार नागरिक घडवताना, गुणवत्तेकडे डोळेझाक करून गुणसंख्येला महत्व देणारे परीक्षातंत्र आत्मसात करण्याची कौशल्यच विकसित केली जातात. जो विषय जीवनाची शंभरटक्के गुणवत्ता ठरविणार आहे, त्याला बारा गुणांमध्ये मोजून कर्तव्यपरायण नागरिक घडविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असेल, तर ‘भारत माझा देश आहे’ हे वाक्य पुस्तकातल्या प्रतिज्ञेपुरते सीमित राहिल्यास आश्चर्य वाटायलाच हवे का?

माणसं अशी का वागतात? या प्रश्नाचं उत्तर संविधानाच्या चौकटीत कदाचित नाही मिळणार; पण त्यांनी कसं वागावं, याचं मार्गदर्शन तेथे जरूर मिळेल. असे असेल तर आपण लोकव्यवस्थेतील जबाबदार घटक आहोत, म्हणून मला माझ्या कर्तव्यांची जाण आणि भान असायला नको का? जगण्याच्या अनेक प्रश्नांच्या आवर्तात मूळ प्रश्नांना वळसा घातला जात असेल, तर परिवर्तन घडेल तरी कसे? आपल्या एका मताने व्यवस्थेत परिवर्तन घडवता येते, हे माहीत असूनही आपली मते जाती, धर्मापुरती सीमित राहणार असतील आणि आपण, आपली माणसं एवढंच संकुचित विश्व आपल्याभोवती उभे करणार असू तर हे आभासी वातावरण आम्हाला कुठे नेणार आहे?

समाजात दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा, बेरोजगारी, भ्रष्टाचार यांचं प्राबल्य वाढत राहिल्यास समानता प्रस्थापित होणे अवघडच. काहींनी सर्वत्र असावे, काहींनी कुठेच नसावे; याला लोकाधिष्ठित सामाजिक जीवन तरी कसे म्हणावे? आम्ही भारताचे लोक सार्वभौम गणराज्य घडवून न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या कालातीत तत्त्वांना लोकशाहीच्या शिखरावर अधिष्ठित करणार असू, तर त्यासाठी समानतेच्या पायावर ही तत्वे उभी करायला लागतील. ‘सर्व जण समान’ हे धोरण आम्ही अंगिकारले आहे, म्हणून आम्हाला आमची अस्मिता संवर्धित करण्यासाठी सामाजिक दूरितांचे उच्चाटन करावे लागेल. प्रगमनशील विचारांचे परगणे उभे करावे लागतील. कारण नुसतेच संविधान उत्तम असून भागणार नाही, तर त्या संविधानाचा अंमल करणारे हातही सक्षम असावे लागतील. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा द्रष्ट्या युगपुरुषाच्या चिंतनशील विचारांचा परिपाक आहे, असे म्हणणेच योग्य ठरते.

या देशाचं विधिलिखित संविधानातून बदलू शकतं. सहिष्णुता, समानता, सुरक्षा, संपन्नता, साहचर्य या गुणांनी मंडित समाज घडवायचा असेल, तर समाजव्यवस्थेतील अभावाचं दाटलेलं मळभ दूर सारावे लागेल. अविचारांची काजळी दूर करून विवेकाची दिवाळी साजरी करावी लागेल. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले हे राज्य या प्रदेशात जगणाऱ्या, वास्तव्य करणाऱ्यांच्या जीवनाचा सुंदर आविष्कार आहे. या सुंदरतेला सक्रियतेची जोड मिळणे म्हणूनच आवश्यक ठरते. विचार, भाषा, संस्कृती प्रयत्नपूर्वक टिकवावी लागते. वाढवावी लागते. कालोपघात आलेले बदल स्वीकारावे लागतात. स्वीकारताना त्यांना विधायक वळण द्यावे लागते. त्याला स्वतःचा चेहराही द्यावा लागतो. असा चेहरा देणारी विचारधारा निर्माण करावी लागते. यासाठी विधायक विचार करणारी मने जीवनातून घडवावी लागतात. अशी घडलेली मने परिस्थितीत परिवर्तन घडवतात. परिवर्तनातून जो देश घडतो तो शब्दशः आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकातील अभिवचनासारखाच असतो, नाही का?

Jagatikikaran | जागतिकीकरण

By // 1 comment:
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ म्हणतात. तसाच डिसेंबर महिना नेहमीप्रमाणे आम्हा शिक्षकांसाठी इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्षातला अभासक्रम पूर्ण करून सराव परीक्षांच्या पुढील नियोजनात संपतो. याही वर्षातील दहावीच्या वर्गांमधला जवळपास सर्वच विषयांचा अभ्यास अंतिम टप्प्यावर पोहचलेला. वर्गात इतिहास विषयाच्या पुस्तकातील ‘जागतिकीकरण’ या शेवटच्या पाठाचे गेल्या दोनतीन तासिकांपासून अध्यापन सुरु होते. तो अपूर्ण राहिलेला पाठ पुढे शिकवणं सुरु होतं. वर्गात मुलं एकाग्रचित्ताने एकतायेत, पाठातील आशय समजून घेत आहेत. माझे अध्यापनाचे सूर वरच्या पट्टीत लागलेले. मुलं समजून घेत आहेत म्हटल्यावर अधिकचं बोलणंही चाललं आहे. (जागतिकीकरणाचा हाही एक परिणाम) जागतिकीकरणाचे फायदे, तोटे वगैरे विशद करून मुलांना सांगतोय. तासिका संपल्याची घंटा वाजली. बाकीचा राहिलेला भाग पुढच्या तासिकेला बघू, म्हणून वर्गातून निघतोय, तेवढ्यात एक विद्यार्थिनी उभं राहून बोलली, “सर, थोडं थांबतात का? मला काही प्रश्न विचारायचेयेत.” थांबलो थोडा.

पुढच्या तासिकेचे शिक्षक त्या वर्गावर आले म्हणाले, “सर, शिकवत असाल, तर तुम्हीच घ्या हा तास. तास ऑफ आहे. मला दिला आहे. वाटल्यास मी तुमच्या पुढच्या वर्गावर जातो. चालू द्या तुमचं शिकवणं.” “ठीक आहे सर, मलाही अध्यापनासाठी एवीतेवी पुढची तासिका नाही, तुम्ही जा, मी शिकवतो या वर्गावर.” म्हणून त्यांना सांगीतले. ते शिक्षकदालनाकडे परत निघाले. आमचं बोलणं सुरु असताना वर्गातील मुलं एव्हाना दबक्या आवाजात आपापसात बोलू लागली होती. वर्गाकडे एकदा पहिले. वर्ग पुन्हा शांत. चुळबूळ, बडबड थांबली. ज्या मुलीने मला थांबवून प्रश्न विचारला होता; तिला म्हणालो, “हा मॅडम, बोला काय विचारायचं तुम्हाला?” “सर, जागतिकीकरण चांगलं की वाईट.” ती म्हणाली. आतामात्र मी विचारात पडलो. नेमकं काय म्हणायचंय तुला, म्हणून विचारलं. ती म्हणाली, “सर, जागतिकीकरणाच्या दोन्ही बाजू तुम्ही सांगतायेत. पुस्तकातही ते लिहिलंय; पण मला नक्की समजत नाही, या जागतिकीकरणाचा फायदा नेमका कोणाला? म्हणून विचारतेय.”

क्षणभर विचार केला, मग म्हणालो, "ते चांगलं की वाईट, ही बाब व्यक्तीसापेक्ष आहे. जर या जागतिकीकरणाला माणसाचा चेहरा असेल तर माझ्यामते, ते चांगलं; पण यामुळे माझा चेहरा हरवत असेल, माझी ओळख मीच विसरत असेल, तर ते चांगलं कसं असेल? आता तूच मला सांग, जर तुझ्या सभोवताली अशी चेहरा हरवलेली माणसं असतील, तू त्यांना पाहिलं असशील, जर त्यांच्या जगण्यापर्यंत जागतिकीकरणाच्या संपन्न वाटा पोहचत नसतील, तर ते जागतिकीकरण कसं काय नव्यायुगाची नवस्वप्ने सामान्यांच्या जीवनात रुजवणारं असेल?" असं बरंच काहीकाही मुलांशी बोलता बोलता तोही तास संपला. माझ्या तेवढ्या बोलण्याने मुलाचं बऱ्यापैकी समाधान झालं असावं; पण माझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर कुठं अजून पूर्ण झालं! मीच मला विचारत गेलो, शोधत गेलो.

वर्षामागून वर्षे सरतात. काळाची पालखी आपल्याच नादात, तालात पुढे चालत असते. पुढे जाताना, जगताना व्यवस्थेत आपल्या असण्याचे, नसण्याचे व्यवस्थेनेच निर्माण केलेले प्रश्नही अटळपणे बदलतातच ना! या बदलत जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरात जर सामान्य माणूस त्याच्या चेहऱ्यासह अस्तित्वात असला, तर ते बदल नक्कीच सुखद असतात. आज असं परिवर्तन सर्वच क्षेत्रात घडताना दिसत आहे का? काळ चागला की वाईट, हे त्या-त्या वेळची परिस्थिती ठरविते. सगळीकडे अनिश्चिततेचे मळभ पसरलंय. परिस्थितीच्या, परिवर्तनाच्या रेट्यात गावं बदलली, पण गावाचं गावपण हरवलं आहे. गावातली माणसंही बदलली, त्यांच्या जगण्याचे संदर्भही बदलले. माणसं स्वार्थाला परमार्थ समजू लागली. जो तो स्वतःभोवती स्वार्थाचं कुंपण तयार करून त्यात सुरक्षित ठेवू लागला आहे. स्वार्थपरायणतेत सामाजिक हित हरवलंय. स्वतःच्या सुखापलीकडे कुणाला काही दिसत नसल्याने, ती सुखं मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं गेलं. गावांचा चेहरा बदलून तो विरूप होऊ लागला. निर्व्याज, नितळ स्नेह बाजूला पडून भाऊबंदकीने नवे परगणे उभे केले. गावातलं ‘राज’ गेलं त्याला ‘कारण’ जुळलं अन् राजकारणाचे नवे फड रंगू लागले आहेत. या रंगात ग्रामविकास हा शब्द फक्त सामासिक शब्द म्हणून उरला. या रंगात रंगण्याची ज्याची मानसिकता नव्हती, वर्तुळात ज्यांना ठाव नव्हता; त्यांनी शहराच्या वाटा निवडून जवळ केल्या. तिकडे गावं ओस पडू लागली, इकडे शहरं बकालपण घेऊन वाढू लागली. माणसं हताशपण सोबत घेऊन जगण्यासाठी ठाव शोधू लागली आहेत.

खरंतर संघर्ष जीवनाचा स्थायीभाव आहे. विश्वात जे संघर्ष करतात तेच टिकतात, हे सत्यही आहे. एकेकाळी इहतलावर अधिराज्य असणारे डायनोसॉरसारखे महाकायप्राणी संघर्षरत न राहिल्याने आपले अस्तित्व विसर्जित करून आज फक्त स्मृतिरूपाने शेष राहिलेत. माणूस मात्र टिकला आहे, कारण त्याची संघर्षयात्रा थांबलेली नाही. अजून तो थकलेलाही नाही. येणारा उद्याचा सूर्योदय माझ्या जीवनवाटांना प्रकाशित करणारा असेल, समस्यांची उकल करणारा असेल. या आशावादावर तो समस्यांशी धडका देतो आहे. मनी वसणाऱ्या सुखांचा शोध घेत आहे. जीवनकलहात संघर्षरत राहूनही जीवनातील समस्यांचा गुंता ज्यांना सोडवता आला नाही, त्या अभाग्यानी अंत हाच संघर्ष समजून आपलं अस्तित्वच विसर्जित केलं. हताशेतून इहलोकीची यात्रा संपवणारी ही माणसं अवकाळी मरण पत्करत होती. त्यांचं अवकाळी जाणं थांबावं म्हणून शासनाने मदतीची पॅकेजेस दिली; पण या मदतीने मरणाचे दोर काही सैल झाले नाहीत. ना पुढचे प्रश्न संपले. बिनचेहऱ्यांचं जगणं सोबतीला असणारे चेहरे कायमचेच काळाच्या पडद्याआड सरकले.

लाखालाखांचे मासिक वेतन घेणारे मंदीच्या एका फटक्याने उधळून लावले, तेथे सामान्यांकडे बघतोय तरी कोण? जगण्याचीही स्पर्धा झाली आहे अन् मरण्याचीही स्पर्धा लागलीय जणू. जीवनात शिकण्यापासून नोकरीपर्यंत फक्त स्पर्धा उरल्या. स्पर्धेत संघर्ष अटळ ठरला आहे. संघर्षात जो अडला तो संपला. असं भीषण वास्तव समोर दिसतंय. मीही गावातच शिकलो. वाढलो. घडलो. शेतीचा पिढीजात व्यवसायही पाहिला. समस्या तेव्हाही होत्या. आपत्ती तेव्हाही होत्या. माणसं तेव्हाही हताश व्हायची, निराश व्हायची. पण जीवनाला कंटाळून पूर्णविराम घेत नव्हती. परिस्थितीशी धडका देत उभी राहत होती. ते उभे राहावेत म्हणून माणसं त्यांना हात देत होती. साथ देत होती. मरणाशी सामना करून त्याला परतवून लावत होती. सांप्रतकाळी एवढ्या सुविधा, एवढी साधने हाती असतानाही; अनपेक्षित वेदनांचं, समस्येच्या भळभळणाऱ्या जखमांचं, अवकाळी मरणाचं, मरणयातनांचं जग का प्रबल होत जावं?

कधी नव्हे इतका पैसा आज माणसांकडे आला; मात्र मनं दरिद्री झाली आहेत. इमारतींची उंची आम्ही वाढवली; पण माणसं उंची हरवून बसली. अगदी दूर, दूर चंद्रावर पोहचली, मंगळावर वसतीसाठी राहण्याचं बुकिंग सुरु झालं. यानं शनिपर्यंत पोहोचल्याच्या वार्ता आपण करतो; पण आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो, हेही माहीत नसावं का? पूर्वी गावं लहान होती, पण माणसं मनानं मोठी होती. वर्तमानकाळी घडून येणाऱ्या बदलांनी मोठेपणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. जागतिकीकरणाने समृद्धी आली. खिश्यात पैसा खुळखुळतोय. त्याचा स्पर्श, त्याचा आवाज सुखद वाटतोय. नोटा जमा करण्याचा छंद आम्हाला लागलाय; परंतु त्या नोटांवरील प्रतिमेतून दिसणाऱ्या मोहनदास गांधी नावाच्या विरक्त महात्म्याचे विचार जमा करून थोडं तरी त्याप्रमाणे वागण्याचा छंद आम्ही साऱ्यांनी का नाही लावून घेतला?

कायद्याचं ज्ञान झालं; पण जगण्याचं भान आम्हाला किती आलं? कायदा मोडण्यासाठीच असतो, असं समजून आमचं वागणं घडत आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना साध्या साध्या नियमांचेही पालन करण्याचे सौजन्य आम्ही दाखवू नये का? लहानसहान गोष्टीत एवढी बेफिकीर मानसिकता असेल तर इतर बाबतीत न बोललेलंच बरं. समाजात जगताना श्रीमंतानी श्रीमंतीत जगावं, गरिबांनी दारिद्र्यात सुख मानावं का? जागतिकीकरणाने मूठभरांचे दारिद्र्य संपवलं असेल, कणभरांच्या वाट्याला समृद्धी आणली असेल, पण मणभर माणसं परिस्थितीच्या आवर्तात भोळवंडून निघतायेत, त्याचं काय? देशातल्या धनिकांची संख्या वाढल्याचं वर्तमानपत्रातून वाचतो. त्या नामावलीत अशी किती नावं नव्यानं जुळतात? आपला देश महासत्ता बनण्याच्या आपण वार्ता करतो; पण या महासत्तेच्या पथावर उपासमार, दारिद्र्य, बेरोजगारी, भ्रष्ट्राचारासारखी किती व्यवधानं उभी आहेत. त्यांना पार कसं करायचं, याचं समर्पक उत्तर जागतिकीकरणाच्या परिवर्तनांत आहे का? असेल तर, कधी यात बदल होईल? जागतिकीकरणाच्या झगमगाटात संधी दिसत असतीलही; पण समस्यांची बाजू नेहमी अंधाराकडेच का असावी?

एकीकडे प्रचंड सामर्थ्य, पण पलीकडील दुसरीबाजू सांगते, अजूनही बरंच काही करायचं शिल्लक राहिलं आहे. भारत खूप बदलला असं बरेच जण सांगतात, बोलतात, ते खरंही आहे; पण सगळाच भारत बदलला का? या प्रश्नाचं उत्तर अजूनतरी नकारार्थीच द्यावं लागतं. गावागावापर्यंत रस्ते पोहचले, वाहने पोहचली. चार पदरी, आठ पदरी काळेशार, गुळगुळीत द्रुतगती महामार्गही तयार झाले. त्यावरून महागड्या गाड्या वाऱ्याशी स्पर्धा करीत सुसाट धावू लागल्या आहेत. या गतीलाच आम्ही प्रगतीचा वेग समजायचा का? टीव्ही, संगणकाने संप्रेषणाचे संदर्भ बदलले. सर्वसामान्यांच्या हाती भ्रमणध्वनी आले. मॅसेज, इमेलने संवाद वाढला, पण त्यातून सुसंवाद, सुखसंवाद घडला का?

मंदिरातील आरत्या, महाआरत्या, अभिषेक टीव्हीच्या पडद्यावरून घरबसल्या दिसू लागले. कोणातरी महान विभूतींची आध्यात्मिकता वाहिन्यांवरून भक्तिरंग घेऊन वाहताना दिसू लागली. प्रवचनांच्या, सत्संगांच्या कार्यक्रमाना गर्दी ओसंडून वाहते आहे. पण विचारवंतांच्या व्याख्यानांचे मंडप ओस पडत आहेत. माणसं मन:शांतीचे मार्ग शोधू लागले. मंदिरे तेव्हाही होती, आजही आहेत; मग त्यात दर्शन घेणाऱ्यांच्या रांगा एवढ्या का वाढल्या आहेत? पैसा आला समृद्धीही आली. मनाचं स्वास्थ्यमात्र दिवसेंदिवस दूर चाललं आहे. जीवनाची गती वाढली; पण गुंताही वाढत चालला आहे. हा गुंता वाढतोय, तशी माणसं कोणतातरी आधार शोधातायेत. ज्यांना मिळाला ते सावरतायेत. जे निसटले ते व्यसनांच्या दलदलीत रुतातायेत. मार्ग, महामार्गास लागून  बियरबार नावाची एक नवी संस्कृती पावसाळ्यात जागोजागी उगवणाऱ्या भूछत्रांप्रमाणे उगवलेली दिसते आहे. कोजागिरीची रात्र चांदण्यावरचे संकट ठरते आहे. एकतीस डिसेंबरला संस्कृतीचे सीमोल्लंघन घडते आहे. व्यसनांना बेगडी प्रतिष्ठा मिळते आहे.

जीवघेणी स्पर्धा मूठभरांसाठी सुखाचा मार्ग दाखवतेय. धावण्याची इच्छा असो, नसो त्या मार्गावरून धावताना अनेकांची मने रक्तबंबाळ होत आहेत. सक्षम पर्याय हाती नसणारे, या स्पर्धेत मुळासकट उखडण्याच्या बिंदूवर उभे आहेत. माझ्या बालपणाच्या गावातील सुतार नेट, लोहाराचा भाता, कुंभाराचा आवा आता गावात दिसतोय कुठे? असले तरी फक्त धुगधुगी टिकवत नावापुरतं त्यांचं अस्तित्व शिल्लक आहे. गावातील सुतारनेटवरील गप्पांचे फड हरवलेत. गावात ट्रॅक्टर आले. बैलगाडीची लाकडी चाकं बदलून लोखंडी चाकं लागली, नव्हे सगळी बैलगाडीच लोखंडापासून तयार झाली आहे. ज्यांच्याकडे परंपरागत ज्ञान होते; पण व्यवसायात टिकण्यासाठी अद्ययावत साधने, संपत्ती नव्हती, ते या परिवर्तनाच्या आवर्तात सापडले अन् गरगरत पाचोळ्यासारखे दूर फेकले गेले. नशीब नेईल तिकडे जगण्याच्या ओढीने वाहत राहिले.

स्पर्धेत टिकू न शकल्याने गलितगात्र झालेले गावातले सुतार, लोहार, कुंभार पोटासाठी मिळतील त्या दिशाना चालते झाले. फ्रीज, फिल्टर, मिनरल पाण्याच्या जमान्यात मडक्यातलं शीतल पाणीही संपलं आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे लोखंडाचा देह धारण करून आधुनिक झाली. ट्रॅक्टर आल्याने त्यांची गरज फार उरली नाही. माणसांना दाहीदिशा विस्थापित करणारं जागतिकीकरण आपण चागलं तरी कसं म्हणावं? श्रमाचं मोल लाऊन शक्य तितकं प्रामाणिकपणे जगणाऱ्यांचं जग बदलून डोक्यातील मेंदू विकणाऱ्यांचं हे जग झालं आहे. जर असे असेल तर किती मेंदू जागतिकीकरणाने समृद्ध वगैरे झाले? झाले असतील, तर त्यातील व्यवस्थेत टिकले किती? हाही एक जागतिक प्रश्नच आहे. मूठभर बुद्धिमंत महिला, पुरुष आज बहुराष्ट्रीय कंपन्या, बँकांमुळे व्यवस्थेच्या शीर्षस्थानी पोहचले आहेत. सर्वसामान्यांमधील हे अपवाद आहेत. राहिलेल्या बाकीच्यांचं काय? हा प्रश्न जागतिकीकरणाच्या मंचावर तसा अनुत्तरितच.

खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, तसे रस्ते, वीज, वाहतूक, बँकिंग आदि क्षेत्रात खाजगीकरण आले. देशातील हजारो एकर जमिनी सेझच्या वाट्याला गेल्या. परकीय भांडवलाला गुंतवणुकीची संधीही मिळाली असेल; पण त्यांनी येथील गुंतवणूक काही, चला, आपण सगळे मिळून जीवनाच्या विविध क्षेत्रात मागे राहिलेल्या भारताचा विकास घडवून आणू या! अशा उदात्त हेतूने झाली नाही. त्यांच्या नजरेसमोर नफा हेच उद्दिष्ट असणार ना! कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून उभ्या राहणाऱ्या शीतपेयांच्या कंपन्या त्यांना लागणारं पाणी काही त्यांच्या देशातून नाही आणत. पाऊस असो, नसो त्याच्या विक्रीवर पाण्याच्या तुटवड्याचा परिणाम का होत नसावा? या प्रश्नाचं उत्तर मिळणं खरंच अवघड आहे. मोठ्या शहरातील मोठ्या लोकांसाठी दिवसातील चोवीस तास पाण्याची हमी, तर दुसरीकडे डोक्यावर दोनतीन हंडे घेऊन अनवाणी पायांनी उन्हातान्हात वणवण भटकंती. जागतिकीकरणाचा हा कोणता न्याय आहे? विकासाच्या नावाखाली गरीब देशातील नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडली जात आहे.

धनिकांकडील धन साठवलेल्या अन् गोठवलेल्या धनाला वाढवत चालले आहे. धनसंपादनाच्या गळेकापू स्पर्धेत लहानसहान उद्योग पालापाचोळ्याप्रमाणे दूर फेकले जात आहेत. व्यवस्थेच्या शिखरावर असणारे आणि पायथ्याशी असणारे, अशी विभागणी होत आहे. त्यांच्यातील सामाजिक दरी रुंदावत चालली आहे. या विषमतेत दूरदुर्गम भाग, तेथील समस्या, तेथला आदिम समूह, त्याचं सुविधांपासून वंचित, उपेक्षित जगणं जागतिकीकरणाने लक्षात किती घेतले आहे? भुकेने तडफडणारा आदिवासी, पदपथावर जीवन व्यतित करणारे अनिकेत, भुकेने विकल झालेली गरीब माणसं, कुपोषणाने तगमग करीत जगाचा निरोप घेणारी बालके, आत्महत्या करणारे शेतकरी, ही परिस्थितीशरण अगतिकता अजूनही संपायला तयार नाही. तर दुसरीकडे चैन विलासात, सणसमारोहात होणारा लाखांलाखांच्या आकड्यातला खर्च. आपल्या स्नेहीजनांना लाखात, कोटीत भेट देणारे कुबेरपुत्र. हे सारं पाहताना एकीकडे झगमग दिसते, तर दुसरीकडे मात्र तगमग. ही तगमग आम्ही खरंच पाहतो आहोत का? की आपण आत्मकेंद्री होत चाललो आहोत. काहींना असेही वाटत असेल, की देशात इतकंही काही सगळंच वाईट वगैरे नाहीये. विकास तर झाला आहे. त्याचे परिणाम व्यवस्थेतून वावरताना जाणवतायेत. जागतिकीकरणानंतर देश प्रचंड बदलला आहे. खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्वीकारानंतर स्वसामर्थ्याने त्याची विकासाभिमुख वाटचाल सुरु आहे. काल ज्या छोट्या मोठ्या वस्तूसाठी माणसं रांगा लावून उभी असायची, त्या वस्तू त्याला आज सहज मिळतायेत. हे खरंही आहे; पण त्याच बदललेल्या देशात अशीही माणसं आहेतच ना, ज्यांच्यापर्यंत हे सारं अजून पोहोचायचं राहिलं आहे. त्यांच्यापर्यंत ते कधी पोहचेल?

पु.ल.म्हणाले होते, ‘दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुमचे डोळे भरून येत असतील, तर ते भरून आलेले तुमचे डोळे म्हणजे संस्कृती.’ खरंतर आजही आमचे डोळे भरून येतात; पण त्यातून ओघळणाऱ्या पाण्याचे संदर्भ बदलले आहेत. त्यांनाही जागतिकीकरणाचं परिमाण लाभलं आहे. या बदललेल्या भावनांमध्ये सर्वसामान्य माणूस त्या मापाचा होऊन मावायचा आहे, की त्याला त्या मापाचा करवून जागतिकीकरणाच्या साच्यात घट्ट बसवायचा आहे, हे आज नक्की नाही सांगता येणार. बदल घडतील, ते टाळता येणार नाहीत. मग जर का बदल घडणारच असतील अन् जग बदलत असेल, तर त्या बदलांना, जागतिकीकरणाला माणुसकीचा, सर्वसामान्यांचा चेहरा देऊनही ते घडवता येतील. पण तरीही एक मुद्दा उरतोच; अशा बदलातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचाराने वर्तणारं आणि स्वतःचा चेहरा असणारं जागतिकीकरण आकारास आणता येईल का?

Zep | झेप

By // No comments:
नवअस्मितेच्या नव्यापर्वाचा उद्घोष करीत भारताच्या जीएसएलव्ही डी ५ अग्निबाणाने नववर्षाच्या प्रारंभीच अवकाशात यशस्वी झेप घेतली अन् त्यासोबत २०१४ हे वर्ष भारताच्या प्रगत उपग्रह प्रक्षेपणाच्या स्वप्नपूर्तीचे सुंदर क्षण सोबत घेऊन भारतभूमीवर अवतीर्ण झालं. स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून आकाशात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी मागील वीस वर्षापासून प्रयत्नरत असणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नातून साध्य झालेली, भारतीय अवकाशभरारीची अस्मिता विश्वाच्या नभांगणात स्वयंतेजाने दीप्तिमान झाली. कोणाही भारतीयांच्या चित्तवृत्ती अभिमानाने पुलकित करणारी, ही यशोगाथा भारताच्या अवकाशभरारीच्या इतिहासात सुवर्णांकित अक्षरांनी लेखांकित झाली. जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वप्रयत्नांनी स्वतःचा इतिहास निर्माण करणाऱ्या या देशाने स्वअस्मिता संपादनासाठी परकीय सत्ताधिशांशी केलेल्या संघर्षाचे फलित स्वातंत्र्य संपादन होते; पण नुसतं स्वातंत्र्य मिळवून देश घडत नाही अथवा उभाही राहत नाही. तो परिश्रमाने योजनापूर्वक घडवावा लागतो. त्यासाठी योजनांची मुळाक्षरे लिहावी लागतात, गिरवावी लागतात. देश घडणीची ही मुळाक्षरे देशवासियांचा मानबिंदू, अभिमानबिंदू बनतात; तेव्हा ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ हे स्वप्न केवळ साने गुरुजींचेच स्वप्न नाही राहत. ते साऱ्यांचेच स्वप्न बनते. अशी स्वप्ने भारताच्या संपन्न, सक्षम रूपाशी एकजीव होत इच्छा, आकांक्षा बनून जेव्हा मनात एकवटतात, तेव्हा ते साऱ्या भारतीयांच्या जगण्याचे श्वास होतात.

आम्हाला स्वातंत्र्य संपादन करून सदुसष्ट वर्षे झाली. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात सदुसष्ट वर्षाचा काळ खूप वाटत असला, तरी राष्ट्राच्या उभारणीत एवढा कालखंड फार मोठा असतो, असे नाही. हा कालावधी लक्षात घेता भारतीय शास्त्रज्ञांनी जीसॅट.१४ उपग्रह क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून आकाशात प्रक्षेपित करणं, ही फार मोठी उपलब्धी आहे. हा उपग्रह अवकाशात झेपावला, तेव्हा अवकाशात केवळ हा उपग्रहच नाही झेपावला; तर त्यासोबत भारतीयांच्या इच्छा, आकांक्षाही आकाशी झेपावल्या. देशाच्या इतिहासाचं थोडंसं अवलोकन केलं आणि त्याची मागील काही पाने उलटून पाहिली, तर स्वातंत्र्य संपादनानंतरच्या काही वर्षात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतः संपादित केलेलं असं कितीसं सामर्थ्य होतं आमच्याकडे?

तीनचार हजार वर्षाचा भूतकाळ झालेला संपन्न वारसा वगळला, तर जगाला आमच्या सामर्थ्याची प्रचीती यावी, असं काय होतं आमच्याकडे? सुरवातीचा तो खडतर वाटचालीचा काळखंड पाहिला, तर सतत परकीय मदतीसाठी आशाळभूतपणे पाहण्याचं प्राक्तन नियतीने या देशाच्या ललाटी लिहिले होते. काही पाश्च्यात्त्य विद्वान तर भाकिते व्यक्त करत होते, या देशाच्या जन्मताच शकलं होणं अटळ आहे. प्रचंड मतभिन्नता, मतप्रवाह असणारा हा देश विश्वगोलातील नकाशात त्याच्या स्वतःच्या एकसंघ नावाने आणि अस्तित्वाने भविष्यात ओळखलातरी जाईल का? पण या साऱ्या विद्वानांना तोडघशी पाडण्याचं सामर्थ्य या देशात आहे. देशाची ही सुप्तशक्ती ढोबळ निष्कर्ष काढून मते व्यक्त करणाऱ्या विद्वानांच्या विचारांना समजलीच नाही. अनेक तुकड्यांमध्ये त्यांना दिसणारा हा देश अशा तुकड्या-तुकड्यांनी सांधून एकजीव, एकरूप झालेल्या वस्त्राचं सुंदर विणकाम आहे अन् या वस्त्राचे आडवे-उभे धागे एकात्मतेने, प्रेमाने, परस्पर सहकार्याने विणलेले आहेत. हे त्यांच्या लक्षात आलेच नसेल, की त्यांनी हे लक्षात घेतलेच नसेल? ज्या देशाची विविधता हीच त्याची ओळख आहे, तो देश पूर्वग्रहांनी तयार झालेल्या मनांना समजेल कसा. या खंडतुल्य देशाच्या जीवनाचा, जगण्याचा लसावि काढण्याचा प्रयत्न करणे हेच एक अवघड काम आहे.

देश उभारणं, घडवणं त्या देशाला लाभलेल्या द्रष्ट्या नेतृत्त्वांच्या हाती असतं. आम्हां भारतीयांना हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारे असे उत्तुंग नेतृत्व मिळाले. त्या धुरंधर नेतृत्त्वांच्या ध्येयनिष्ठा, त्याग आणि समर्पणातून देश घडत गेला. लोकांच्या तंत्राने चालणारी व्यवस्था या साऱ्या धुरिणांनी नुसती उभीच केली नाही, तर सक्षमही केली. त्या व्यवस्थेच्या मार्गाने देश चालत गेला. चालता-चालता अस्मिता शोधत गेला. हाती लागलेल्या त्या स्वजाणिवांचा उत्कट आविष्कार म्हणजे, आज उभा असलेला आपला देश. जगास ललामभूत वाटावेत, असे आदर्श या देशाच्या सांस्कृतिक संचितातून प्रकटलेत. या पाथेयातून संपादित सामर्थ्याने देश नजीकच्या काळात विश्वातील सक्षम सत्ता बनून प्रकटेल, हा विचारवंतांचा आशावाद काही निरर्थक नाही. विश्वात सर्वाधिक संखेने युवक आज आपल्या देशात आहेत. या देशाला विकसित राष्ट्र म्हणून उदयाचली आणण्याचं काम यापुढे देशाची तरुणाईच करणार आहे.

चेडू जमिनीवर जितक्या जोराने आदळावा तितक्या वेगाने उसळी घेऊन तो वर येतो. नव्वदच्या दशकात भारताला स्वतःच्या अवकाश क्षमता वास्तवात आणण्यासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञानाची आवशकता होती. तेव्हा अमेरिकेच्या कृपेने रशियावर दमनतंत्राचा वापर करीत या तंत्रज्ञांनापासून भारताला वंचित ठेवण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले. या आधीही भारतीयांची प्रगती अवरुद्ध करू पाहणाऱ्या राष्ट्रांच्या कृपाप्रसादाने संगणकाचे तंत्रज्ञान नाकारले गेले. पण जेव्हा-जेव्हा नाकारण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा या देशाच्या मातीतून प्रकटलेलं सत्व आणि स्वत्व घेऊन जगणारी शास्त्रज्ञांची ध्येयवेडी मांदियाळी स्वअस्मितांचा जागर करीत; परिस्थितीशी दोन हात करीत उभी राहिली आहे. ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा या भूमंडळी कोण आहे’ म्हणत आम्ही आमच्याच प्रयत्नांनी सामर्थ्यसंपन्न झालो.

भारताच्या अण्वस्त्रसंपन्न, अवकाशयुगसंपन्न तंत्रज्ञानाला उभं करणाऱ्या शास्त्रज्ञांनी भारताला केवळ या तंत्रज्ञानात सक्षमच नाही, तर संपन्न केले. स्वातंत्र्य संपादनाच्या वेळी आमच्याकडे असे सामर्थ्य किती होते, काय होते? साधा फोन घ्यायचा म्हटला तर दोन दोन वर्षे प्रतीक्षा यादी, मोटारसायकल, स्कूटर घेणं ही तर चैनच वाटायची. जगात जेव्हा मोटारींची आधुनिक मॉडेल रस्त्यावरून सुसाट वेगाने धावत होती, तेव्हा आम्ही प्रगत देशांनी इतिहास जमा केलेल्या मॉडेलच्या मोटारींना भारताच्या रस्त्यावरून धावताना कुतूहलाने पाहत होतो. धावणाऱ्या या मोटारी केवळ धनिकांसाठीच आहेत, ही गोष्ट आपल्या कुवतीपलीकडची आहे, म्हणून त्याचं ते रुपडं डोळ्यात साठवून ठेवत होतो. आज भारतीय रस्त्यावरचं चित्र पाहिलं तर बीएमडब्लू, मर्सिडिज, ऑडी या केवळ स्वप्न वाटणाऱ्या महागड्या गाड्या भरधाव धावताना सहज दिसतील. देशातील सुमारे ऐंशी कोटी लोकांकडे मोबाईल आहेत. सिमकार्ड घेऊन त्यांना सुरु करण्यासाठी आता फक्त काही तासांचीच प्रतीक्षा करावी लागते. चकचकीत मॉल्स, सुपर मार्केट खरेदीसाठी लोकांना आकर्षित करीत आहेत. पूर्वी दुकानदाराने जो किराणा दिला असेल तो वेळेवर मिळाला, हेच आपलं नशीब समजून घरी यायचा. त्यातील वस्तूंमध्ये काही दोष असेल, तर दुकानदार ते परत घेईल का, या प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड गोष्ट होती. आजमात्र मॉल्स, सुपर मार्केटमधून केलेल्या खरेदी वस्तूबाबत मनात काही संभ्रम असल्यास, ती वस्तू कशी, केव्हा, कोणत्या अटींवर परत घेतली जाईल, हे बिलाच्या पाठीमागेच लिहिले दिसेल.

हे सारं आज मी पाहतो, तेव्हा मला माझं बालपण आठवतं. आमचे आजी-आजोबा सांगायचेत दुष्काळात पोटाची खळगी भरण्यासाठी माणसं दिवसभर राबराब राबून परदेशातून आयात केलेले धान्य आपणासही मिळावं, या अपेक्षेने उपाशीपोटी दुकानांवर रांगा लावायची. माझ्या गावात पहिल्यांदा लाईट आली, तेव्हा जणू काही आकाशातून तारे जमिनीवर उतरून आल्याचे वाटले होते. त्या लाईट्सच्या प्रकाशवर्षावात चिंब-चिंब भिजण्यात किती आनंद वाटायचा. गावात पहिल्यांदा आलेला टीव्ही, तोही ब्लॅक अॅण्ड व्हाईट- पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला. शेवटी टीव्ही घरातून उचलून अंगणात आणून काही दिवस सुरु केला जायचा. जेवढावेळ कार्यक्रम सुरु असायचे तेवढावेळ माणसं तो पाहत असत. आज दोन-तीनशे प्रसारण वाहिन्यानी जगाचे सारे रंग घरातल्या खोलीत भरले आहेत. एलइडी, एलसीडी, प्लाझ्मा, स्मार्ट टीव्ही घरातील भिंतीवर लागलेले दिसतात. कदाचित आजच्या पिढीसाठी या बाबी फारशा महत्त्वाच्या नसतीलही. पण हे वास्तव प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली, कितीतरी प्रयत्न करावे लागले. भारताने हे सामर्थ्य एका दिवसात प्राप्त नाही केले. ते मिळविण्यासाठी जी कठोर तपश्चर्या, जे परिश्रम केले, त्याचे हे फलित आहे.

अवजड उपग्रह अवकाशात पाठवण्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी भारताने सुरवातीस जे सहा-सात प्रयत्न केले त्यात यशापेक्षा अपयशच अधिक होते. पण समस्यांना शरण न जाणं, हा जेव्हा राष्ट्राचा, राष्ट्रातील लोकांचा स्वभाव बनतो; तेव्हा नाकारले जाण्याचे शल्य अमोघ धैर्य बनून प्रकटते. त्याच धैर्याचा परिपाक म्हणजे एकोणाविससे ब्याऐंशी किलो वजनाच्या जीसॅट१४ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण होय. आमच्या शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी, तंत्रज्ञांनी स्वबळावर हे यश संपादन केले. भविष्यात हे यश आणखी परिणत होत जाईल. कोणीही भारतीय नि:संदेहपणे हे सांगेल. मागच्याच वर्षी आमचे ‘मंगळयान’ मंगळाच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करीत झेपावले. त्याहीआधी ‘चंद्रयानाने’ चंद्राच्या अज्ञात पैलूंना स्पर्श केला. त्याअगोदर एकाचवेळी अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात यश मिळवलं आहे.

भारतीय ‘सुपर कॉम्प्यूटरने’ तंत्रज्ञानातही आम्ही मागे नाहीत, याची जाणीव विश्वाला करून दिली. अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल ही क्षेपणास्त्रे आपल्या अण्वस्त्र सज्जतेची प्रतीके बनून उभी राहिली आहेत. अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांच्या नामावलीत भारताचे नाव लेखांकित झाले. हे सारं मिळवताना अजूनही आमचे पाय जमिनीवर घट्ट रुजले आहेत. मातीशी इमान राखणारी आम्ही सारी भारतीय माणसं स्नेहपूर्ण नाती जोडण्यावर विश्वास ठेवतो. कुणा परक्या मातीतील मोती वेचण्यासाठी स्वतःहून कधीच ही पावलं वळली नाहीत, वळणारही नाहीत; कारण या देशाच्या संस्कारातून सदैव स्नेह, सन्मान, सहिष्णुता, सामंजस्य, अहिंसा या परिणत जीवनमूल्यांची शिकवण शिकवली गेली आहे. जीवन संपन्न करणाऱ्या मूल्यांचा शोध शेकडो वर्षापूर्वीच या देशाच्या मातीने घेतला आहे. संस्काराने संपन्न ही भूमी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारांना प्रमाण मानत आली आहे. अशा विचाराने वर्तणाऱ्या देशाचे सारे शोध मानव्याच्या प्रतिष्ठापनेसाठी, परित्राणासाठी, मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची, तत्त्वज्ञाची, विचारवंताची आवश्यकता नसते.

Samvad | संवाद

By // No comments:
जुनं वर्ष संपलं. नव्यातील काही दिवसांनी निरोप घेतला. नववर्षाचं स्वागत करीत माणसांनी आनंद साजरा केला. पण जाणारा कालचा दिवस अन् येणाऱ्या नव्या दिवसात असं काय विशेष होतं? मावळणाऱ्या वर्षात सूर्य तोच होता. चंद्राचा प्रकाशही तसाच होता. अन् नव्या वर्षाचं आगमन घेऊन येणारा सूर्यसुद्धा अगदी काल होता, तसाच होता. प्रश्न कालही होते. तसेच आजही आहेत. प्रश्नांची उत्तरे शोधण्याची धडपड तेव्हाही होती. आजही असणार आहे. त्यात नवीन असं काय घडलं किंवा घडणार होतं? कदाचित हे वाचून काही जण म्हणतील, काय अरसिक माणूस आहे हा! याला जीवनातला आनंद वगैरे, काही साजरा करता येतो की नाही? पण समजा, आपण आपलं सगळं जगणंच आनंदोत्सव करून जगलात, तर आणखी काही उत्सव साजरे करण्याची आवश्यकता उरतेच किती? नाहीतरी आनंद ही संज्ञाच व्यक्तिसापेक्ष आहे. तो कोणी, कुठून, कसा संपादन करावा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना! नाहीतरी आपण सगळे निखळ आनंदप्राप्तीसाठीच जगतो आहोत. यासाठीच तर माणसाने भौतिकसाधनं शोधली आणि त्या भौतिकसुविधांमध्ये तो स्वतःचं सुख शोधू लागला. जे मिळालं त्याचा आनंद होताच; पण जे मिळवता आले नाही, त्याचीही वेदना त्याला अस्वस्थ करीत राहिली. या अस्वस्थतेतून त्याची सुखसंपादनाची आकांक्षा प्रबल होत गेली. सुखांच्या शोधात माणूस धावत राहिला. ती मिळवता यावीत म्हणून तगमग वाढत गेली. काहीतरी मिळवण्यासाठी आपल्या आजूबाजूला झगमग उभी केली. झगमगाटासाठी त्याने काही निमित्तं उभी केली.

सण, उत्सव या साऱ्या गोष्टी माणसाच्या सामाजीकरणातून सांस्कृतिक संचित म्हणून प्रकटल्या. त्यांना परंपरांच्या कोंदणात बसवताना त्यांचं सार्वत्रिकीकरण झालं. जेव्हा एखाद्या गोष्टीचं सार्वत्रिकीकरण होतं, तेव्हा त्याची चिकित्सा होईल अथवा केली जाईलच, असं नाही. किंवा काहींना वाटेल, ती केली जावी, असंही काही नाही. आमचा आनंद आम्ही कसा मिळवावा, याचा शोध आमच्यापुरता लागला ना, मग पुरे! म्हणूनच वाट्यास आलेले क्षण चिरंजीव करून साजरे करण्याचे निमित्त अन् पर्यायही शोधले जाऊ लागले. माणसांच्या आनंदाला मुखरित करणारं एक माध्यम म्हणजे संवाद. माणसाला भाषा अवगत झाली, तेव्हापासून माणसं या माध्यमाचा वापर करीत आली आहेत. आता त्या संवादाने नवं रूप, नवं नाव धारण करून आधुनिक काळाने निर्माण केलेल्या संपर्क माध्यमांची सोबत केली आहे. मनात उदित होणाऱ्या भावभावना मुखरित करणारं एक माध्यम म्हणजे लिखित संदेश पाठवणं. हे संदेश पाठवताना नव्या पिढीने वापरलेली माध्यमे पाहताना खरंतर त्यांच्याविषयी कुतूहल वाटतं. क्षणात जगाशी कनेक्ट होणारी ही मुलं, मुली जणू काही प्रचंड उत्साह. पण या उत्साहात स्नेहाचा ओलावा किती आणि संदेश पाठविण्यातील यांत्रिकता किती? या प्रश्नाचा शोध घेतला तर उत्तर काय येईल, हाही एक प्रश्नच आहे.

विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित विद्यमानकाळ अनेक संपर्क साधने हाती देणारा आहे. प्रभावी संप्रेषण माध्यमांनी जगाला हाताच्या मुठीत मावण्याएवढं छोटं केलं. विश्वातल्या सुदूर टोकापर्यंत संवाद होऊ लागला आहे. पण हा संवाद ‘सुखसंवाद’ झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. मला आठवते, आम्ही लहान असताना घरी येणारे पत्र संवादाचे एक लिखित माध्यम होते. पत्रांचा गठ्ठा हाती घेऊन येणारा पोस्टमनही आमच्यासाठी औस्तुक्याचा विषय असायचा. तेव्हा रेडिओवरून (टीव्ही असण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तोपर्यंत आमच्या गावात लाईटही आलेली नव्हती.) ऐकायला येणारी ‘डाकिया डाक लाया’ सारखी गाणी पोस्टमनविषयी आंतरिक जिव्हाळा निर्माण करणारी वाटायची. ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं’ यासारखे खेळ आमच्या पिढ्या खेळायच्या. (आता कदाचित माझ्या मामाचा मोबाईल हरवला, तो कोणाला सापडला असं म्हणत असतील का?) काळ बदलला तशी संपर्कमाध्यमे बदलली त्यांचा वेगही प्रचंड वाढला. या वेगाच्या आवेगात आमच्या काळातील पत्र हरवण्याचा तो खेळही हरवला अन् पोस्टमनही औपचारिक पत्रे आणण्यापुरता उरला. येणाऱ्या पत्राच्या वाट पाहण्याची हुरहूर आता नाही राहिली. त्याकाळी चित्रपटांच्या गाण्यांमधून ‘हमने सनम को खत लिखा’ असं म्हणणारी लावण्यवती आज कदाचित ‘हमने सनम को मॅसेज लिखा’, असंही म्हणत असेल का?

मॅसेज पाठवणं, शुभेच्छा देणं; हेही सणवाराच्या निमित्तानं ठरलेले कामच वाटावं, इतकं यांत्रिकपणे आज होत असतं. कुणीतरी, कुणासाठीतरी, कोठूनतरी लिहिलेले, मिळवलेले मॅसेज फॉरवर्ड होत असतात. हे फॉरवर्ड करताना त्यात ‘फार वर्ड’ नसावेत, ही काळजी घेताना शब्दच असे काही तोडफोड करून, कात्री चालवून संक्षिप्त लिहिले जातात की, त्यांचा अर्थ समजून घेताना आमच्या पिढीला धाप लागायचं तेवढं बाकी असतं. यातील कितीजण स्वतः लिहून, स्वतःचे शब्द वापरून, तयार करून मॅसेज पाठवतात, हाही एक प्रश्नच आहे. ‘गुगलसर्चच्या’ पुण्याईने मिळवलेल्या रेडिमेड वाक्यांमध्ये यांना जीव ओतण्याचे कारणच नाही. घेतला मॅसेज दिला पाठवून, आला मॅसेज दिला फॉरवर्ड करून. तेवढेच पुण्यसंपादन आपल्या खाती जमा! आपल्या हाताने, आपल्या आप्तस्वकीयांना लिहिल्या जाणाऱ्या पत्रातून साधली जाणारी जवळीक या ‘फास्टफूडने’ निर्माण होईल तरी कशी?

नाही तरी आता ही पत्रे लिहितोच कोण? ती बिचारी मराठी विषयाच्या उत्तरपत्रिकेत लिहिल्या जाणाऱ्या पत्रलेखन या प्रश्नाच्या चार गुणांपुरतीच उरलीत. (आता तर दहावीच्या अभ्यासात कौटुंबिकपत्रही अभ्यासाला नाही.) ते गुण मिळवायचे कसे, तेव्हढं सांगा सर; ही मुलांची अपेक्षा. बाकी आता अनौपचारिक पत्र लिहितो तरी कोण म्हणा, सरळ बोलणंच होतं ना! मग कशाला ही उठाठेव करायची. हा त्यांच्या दृष्टीने साधासरळ हिशोब. पत्र कसं लिहावं हे वर्गात कितीही शिकवलं, तरी मुलाचं आपलं पहिले पाढे पंचावन्न ठरलेले, कारण रेडिमेड मार्गदर्शकाच्या जमान्यात स्वतः विचार करून आम्ही लिहितोच असं किती आणि कुठे? लिहिण्यासाठी आधी विचार करायला लागतो. रेडिमेड फास्टफूडच्या काळात तो करण्याची आवशकताच उरत नाही. बरं हे रेडिमेड घेताना काहीतरी थोडं तारतम्य असावं की नाही. पण त्याही नावाने शून्यच. एखाद्याने त्याच्याकडील ज्ञानाचा थोडा वापर करून मॅसेजच्या त्या आयत्या ओळीत खाली स्वतःचं नाव दिलं जोडून आणि पाठवला पुढे, तर तो ज्याला मिळाला, तोही काही न करता जसाच्या तसा आधीच्या नावासकट आणखी दुसऱ्याला पाठवतो. निदान त्यातील नाव बदलून आपले तरी लिहावे ना! काय म्हणावं आता याला? अनुकरण की, संप्रेषण माध्यमांचे सार्वत्रिकीकरण!

नव्या पिढीच्या या नव्या संप्रेषण साधनांच्या नवलाईपासून आमची पिढीही काही अलिप्त नाही, अथवा राहूही शकत नाही. कोणत्यातरी सणवाराच्या निमित्ताने जर मोबाईल, फेसबुक, इमेल उघडून पाहिले तर त्यांचे इनबॉक्स परिचित, अपरिचित, अल्पपरिचिताकडून आलेल्या संदेशांनी ओसंडून वाहताना दिसतील. एकाच छापाचे संदेश (अपवाद वगळून) वाचताना खरंच कौतुक वाटते. जणूकाही आम्ही सगळे भारतीय सारखाच आणि एकच विचार करतोय. (यालाच राष्ट्रीय एकात्मता वगैरे म्हणावं का?) येणाऱ्या मॅसेजेसमधील बरेचसे मॅसेज अगदी तेच ते दिसतील. त्यातील अक्षरांमध्येही फरक नसावा, इतके. खरंतर मला वैयक्तिक पातळीवर अशा आलेल्या संदेशांना प्रतिसंदेश पाठवणं प्रकरण जरा अवघडच वाटतं. अगदी स्पष्टच सांगायचं झालं, तर असा प्रासंगिक स्नेह नाही आवडत मला. याचा अर्थ मी माणसांना टाळणारा वगैरे आहे, असं नाही. मला माणसांमध्ये राहायला आवडते; पण त्यांचा असा प्रासंगिक शुष्कस्नेह टाळणेच मी स्वीकारतो.

माझ्या या अशा वर्तनाची समीक्षा करून सौभाग्यवतींच प्रशस्तिपत्र हाती असतं. “तुम्हाला नं, माणसाचं महत्त्व कळतच नाही! कोणी आपलं आपुलकीने पाठवला मॅसेज तर त्यांना तुम्ही का नाही पाठवत परत मॅसेज, असे कितीसे कष्ट होतात हो तुम्हाला परत मॅसेज पाठवायला?” असं बरचं काही काही तत्वज्ञानपर प्रबोधनातून मिळालेलं प्रशस्तिपत्र स्वीकारून काहीही वादप्रतिवाद न करता मी माझ्या वर्तनाचं समर्थन करताना सांगतो, “प्रत्येकाला स्वतःची एक ‘स्पेस’ असते आणि ती असावीही. ती त्याला मिळायला नको का?” पण मग समाज, सामाजिकता वगैरे विषयावरील तिचे उद्बोधन ऐकून, मतांचं खंडन-मंडन करता करता आमचा संवाद सुरु असतो. हा संवाद एवढा वेळ प्रेक्षक म्हणून ऐकणाऱ्या आमच्या दोन्ही मुलांचं मात्र मस्त मनोरंजन होत असतं. त्यावेळी त्यांच्या हाती असणाऱ्या मोबाईलवरून त्यांची बोटं सराईतपणे फिरत असतात. त्यांना विचारावं काय करतायेत हे? ठेवा ना, तो मोबाईल जरा बाजूला. अर्थात तेवढ्याच सराईतपणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मोबाईलमधील काय काय अॅप्स असतील तेवढ्यांवरून त्यांच्या स्नेह्यांना असाच कोणतातरी, कोणीतरी लिखित संवाद फॉरवर्ड होत असतो किंवा केलेला तरी असतो. आता काय म्हणावं याला? कालमहिमा की तंत्रमहिमा?

Shikshan Lekinche | शिक्षण लेकींचे

By // No comments:
२०१३, डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस महाराष्ट्र टाईम्स वाचत होतो. वाचता-वाचता एक बातमीवर स्थिरावलो. ‘लेकींच्या पूर्ण शिक्षणासाठी मोहीम’ असे नामकरण असलेली ही बातमी- शिक्षणातून मुलींची गळती रोखण्यासाठी शिक्षण विभाग ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा’ अभियानास ३ जानेवारी २०१४ पासून राज्यभर प्रारंभ करत असल्याची - यावेळी विद्यार्थिनी ‘मी शिक्षण अर्धवट सोडणार नाही’ असा संकल्प करतील - या आशादायी वार्तेने सरणाऱ्या वर्षाने नवीन वर्षात तुम्हाला काहीतरी चांगले करता येईल याचं आश्वस्त चित्र डोळ्यासमोर उभं केलं. त्याच त्या भ्रष्ट्राचार, राजकारण, राजकारणातील शह काटशह, स्त्रियांचा आत्मसन्मान विखंडित करणाऱ्या वेदनादायी घटनांच्या बातम्या रोजच्याच झाल्या आहेत. हल्ली अशा बातम्यांचेही आम्हाला काही वाटेनासे झाले आहे. इतक्या त्या सरावाच्या झाल्या आहेत. मनावर एकही ओरखडा न येता निर्लेपपणे वाचून आम्ही पुढील कामाला लागतो. अविचारास प्रतिकार करणारे चारदोन संवेदनशील आवाज ऐकू येतात, ते वगळता जसं चाललं आहे, तसंच स्वीकारण्याची सहनशील मानसिकता घेऊन आम्ही जगत आहोत. अंधाराचं सावट सोबत घेऊन येणाऱ्या अशा वार्तांच्या गर्दीत एक थोडासा काहीतरी सकारात्मक विचार अन् भावनिक दिलासा ‘लेक शिकवा अभियानाची’ ही बातमी देऊन गेली.

प्रयत्न आणि प्रारंभ तर चांगला होतोय. पण मुलींचं आपल्या शिक्षणव्यवस्थेतील स्थान शिक्षणात टिकून राहण्याच्या मुद्याभोवतीच अजूनही फिरत आहे, हे वास्तवही यातून प्रकर्षाने अधोरेखित झाले. शिक्षण या समाजनिर्मित व्यवस्थेविषयी आज समाजाचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा खूपच सकारात्मक असूनही, ती केवळ मुलगी आहे म्हणून व्यवस्थेतून हद्दपार होणार असेल तर यामागील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कारणांचा शोध घेऊन, ते समजून घेणं आवश्यक आहे. परंपरेने ललाटी लिहिलेला दुय्यमत्वाचा अभिलेख सोबत घेऊनच स्त्रिया पुरुषांची सत्ता असणाऱ्या जगात संघर्ष करीत आपले अस्तित्व सिद्ध करीत आहेत. तिचे अस्तित्व तिने स्वबळावर अनेकदा सिद्ध करूनही वारंवार अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. ज्या व्यवस्थेचे कायदे, नीतिनियम पुरुषपणाला अनुकूल असतील, त्या व्यवस्थेत तिला सर्वस्व पणाला लावूनच संघर्ष करीत उभं राहावं लागतं, हे सत्य कसं नाकारावं.

स्त्रीच्या मातृत्वाला मान असावा; पण तिच्या स्त्रित्वाचा सन्मान नसावा. पुरुषांनी सर्वत्र असावं, पण स्त्रीने कुठेच नसावं, असं का? तिच्या वात्सल्याचा, ममतेचा गौरव करावा; पण त्यांना गौरवान्वित करताना तिच्या सामाजिक वर्तनाच्या वर्तुळात उत्कट, व्यापक मोकळेपणाचा अभाव का दिसतो? केवळ स्त्रीदेह धारण करून ती इहलोकी जन्मली म्हणून तिच्या जन्माचाच तिरस्कार करणारी मानसिकता ज्या समाजात दृढतम असेल, त्या समाजात समतेचा जागर करणाऱ्यांनी संघर्ष करत व्यवस्थेसमोर उभं का राहू नये? वंशाच्या दिव्यासाठी झुरणारी मंडळी हिला जन्मण्याआधीच मारणारी होत असतील; अन् अशाही परिस्थितीत तिला मिळालाच जन्म, तर तिच्या जीवनपथावरील पुढील वाटेत काटेच असतील, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता  नाही.

शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, असं कितीही सांगितलं, तरी तिला शिकवायची वेळ येते तेव्हा तिच्यासाठी शिक्षणपथ निर्मिताना शेकडो प्रश्नचिन्हं उभे राहतात. घरात मुलगा-मुलगी यांच्यातील कोणी एक, असा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिलाच तर त्याग मुलीनेच करायचा. हा जणू काही अलिखित नियम असतो. मुलीस खूप सारं शिकवून काय करायचंय, शेवटी परक्याचंच धन. ही मानसिकता मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम अजूनही प्रामाणिकपणे करीत असेल तर परिवर्तन किती घडेल हाही प्रश्न आहेच.

या समाजातील लेकीबाळींनी शिकावं यासाठी जीवाचं रान करणारे महात्मा फुले अन शिक्षणातून परिवर्तन घडवू पाहणाऱ्या त्यांच्या स्वप्नांना असिधाराव्रत मानून; आपल्या जीवनाचं हेच अंगीकृत कार्य आहे; म्हणून लोकांचे वाक्बाण, दगडधोंडे सावित्रीबाईंनी झेलले. त्याच सावित्रीच्या लेकी आजही व्यवस्थेचे नसतील; पण परिस्थितीचे दगडधोंडे झेलत आहेतच. आजही शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत परिसरात, समाजात मुलगी आईबापाच्या जीवाला घोर वाटतो. तिच्या आईला तिच्या शिक्षणापेक्षा तिला उजवून टाकण्याचीच अधिक चिंता वाटते. घराची आर्थिक परिस्थिती यथातथा असेल, आर्थिक गणितं जुळत नसतील तर पालकांच्या बजेटमध्ये कात्री लागते ती मुलीच्या शिक्षणावरच. आईबाबांचे हातावर पोट असेल, शेतात राबणारे असतील तर त्यांनी शेतात जावं; मुलीने घर अन् लहान भावंडांना सांभाळावं म्हणून तिची हक्काची नेमणूक. अशा स्थितीत मुलीने शिकावं कसं, हा यक्षप्रश्न बनून उभा राहतो. मुलींचे शाळेतून, शिक्षणातून गळतीची आर्थिक कारणं आहेत, तशी सामाजिक, सांस्कृतिकही कारणं आहेत. यात परिवर्तन घडत नाही तोपर्यंत तिच्या जीवनग्रंथात शाळा आणि शिक्षण नावाचा अध्याय अर्धवटच असेल.

मुली जात्याच समजूतदार असतात. त्यांच्यात शिकण्याची आणि संघर्ष करीत व्यवस्थेत टिकून राहण्याची वृत्ती उपजतच असावी, असे वाटते. मुली शिक्षणाविषयी अधिक जागरूक अन् दक्ष असल्याचे वर्गात विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींना शिकवताना शिक्षक या नात्याने मला तरी अनेकदा प्रत्ययास आले आहे. त्यांचा शैक्षणिक गुणवत्ता आलेखही खूप चांगला असतो; पण गुणांचं एव्हढं संचित असतांनाही बऱ्याच मुली शिक्षणापासून का वंचित? या प्रश्नाचं उत्तर केवळ शाळेतील शिक्षणातून शोधून कसे चालेल.

‘मी शिक्षण अर्धवट सोडणार नाही’, असा संकल्प या मुली करतील, प्रतिज्ञा घेतील. पण ही प्रतिज्ञा, हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ त्यांची अन् त्यांचीच आहे का? तिचा वडील, तिचा भाऊ या नात्याने ती जबाबदारी माझी आहे, असं आम्हाला का नाही वाटत? असा संकल्प या मुलींनी करण्याआधी खरं तर पुरुषांच्या जगालाच आधी तो करायला हवा. जोपर्यंत तिच्या सोबत आई, वडील, भाऊ उभे राहत नाहीत, तोपर्यंत तिचा संघर्ष असाच सुरु राहील. समस्यांशी दोन हात करताना त्यात कदाचित ती यशस्वी होईलही; पण तिच्या संघर्षाला समाजाचं, घरच्यांचं  नैतिकबळ मिळालं तर उद्याचं सामर्थ्य तिच्याच पावलांनी आपल्या अंगणी चालत येईल. म्हणून, आपणही तिचे वडील, तिचा भाऊ या नात्याने एक प्रतिज्ञा, एक संकल्प करू या, ‘मी माझ्या लेकीला, माझ्या बहिणीला शिक्षण कधीही अर्धवट सोडू देणार नाही’.

Mazi Aksharyatra | माझी अक्षरयात्रा

By // No comments:
साधारणतः पाचसहा वर्षापूर्वी माझ्या शाळेत दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम - सर्व विद्यार्थी आपल्या भावविश्वात रममाण. मंचावरील कार्यक्रम संपला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांभोवती गर्दी केली. प्रत्येकाच्या मनातील भाव चेहऱ्यावर आनंद बनून जमा झालेले. त्यात एक भारावलेपण. गर्दीच्या कोंडाळ्यात मीही उभा. गर्दीला थोडे बाजूला करीत काही विद्यार्थिनी आम्हा शिक्षकांकडे आल्या. त्यातील चेतना, श्रुती यांनी रंगीत कागदात बांधलेलं पुस्तकासारखं काहीतरी गिफ्ट सोबत आणलेलं. आग्रहाने ते पुडकं माझ्या हाती कोंबत चेतना म्हणाली, “सर, हे फक्त तुमच्यासाठी.” मी कोणतंही गिफ्ट स्वीकारत नाही, हे त्यांनाही माहीत आहे. नाही म्हणालो. पण त्या जिद्दीलाच पडल्या. म्हणाल्या, “सर, हे गिफ्ट तुम्हाला घ्यावंच लागेल. आणि सर, यात काय आहे, हे नंतर बघा.” माझा नाईलाज झाला. यांना कसे समजावून सांगावे काही कळेना. शेवटी ते घेतले. नाहीतरी मुलांना मीच सांगत असतो, तुम्हाला कुणाला भेटवस्तू द्यायाचीच असेल, तर निदान पुस्तक द्या. म्हणजे तुम्ही दिलेली भेट निदान सत्कारणी तरी लागेल. (पुस्तक सर्वात चांगली भेट असं माझं स्वतःच स्वतः पुरतं तत्वज्ञान.) अर्थात, अशी पुस्तकं भेट म्हणून मिळालीच, तर शाळेच्या ग्रंथालयात देता येतात. अर्थात स्वार्थात परमार्थ साधण्यासाठी मी आचरणात आणलेला कर्मयोग. या भेटवस्तूच्या आकारावरून वाटले, असेल एखादे पुस्तक. आले आहेच तर देता येईल ग्रंथालयात. त्यांना वाईट वाटू नये म्हणून घेतली ती भेटवस्तू अन् दिली ठेऊन शाळेतील माझ्या कपाटात.

दुसऱ्या दिवशी थोडा निवांत वेळ हाती होता. या मुलींनी एवढ्या आग्रहाने काय भेटवस्तू दिली आहे, हे तरी पाहू या, म्हणून त्यावरचा रंगीत कागद वेगळा केला. पाहिले, त्यात एक छानशी वही. तिच्या पहिल्याच पानावर लिहिले होते “सर, तुम्ही खूप चांगलं शिकवतात. शिकवताना खूप काही छान असं बोलतात; पण या बोलण्याला अक्षरांचं कोंदण द्या. निदान आमच्या स्नेहाखातर आता तरी काही लिहा.” कदाचित त्यांच्या लक्षात असावे, मी कधीतरी बोललेलो असेल. शिकवताना बोलतो खूप, पण लिहिण्याचा जाम कंटाळा. (शाळा शिकत होतो तेव्हाही असाच होता.) लिहिणे नकोच, कारण एवढी उठाठेव करायला आहे कुठे मनापासून तयारी. मी काही लिहता हात मिळालेला कोणी सिद्धहस्त लेखक, साहित्यिक वा प्रतिभावान नाही. त्या वहीने कपाटात सुरक्षित निवारा शोधला. कदाचित वहीच्या नशिबी आहे तशीच राहणं असणार.

पाचसहा वर्षानंतर हा प्रसंग आठवतोय कारण, माझ्या या विद्यार्थिनींनी कितीतरी वेळा ‘सर, तुम्ही काहीही लिहा; पण एकदा लिहिण्यासाठी लेखणी हाती घ्याच’, असे अनेकदा म्हटलेले आठवतेय. त्यानंतरही बऱ्याच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असेच सांगून पाहिले, पण हे कधी मी मनावर घेतलेच नाही. आज मात्र आवर्जून हा प्रसंग आठवतोय, कारण त्या मुलींनी दिलेल्या वहीवर मी एक अक्षरही लिहिले नाही. ती होती तशीच कोरी करकरीत राहिली. नंतर काही दिवस वही कपाटात दिसली. पुढे कुठे गेली, माहीत नाही. त्या मुलींचं आत्मीय भावनेने बोलणंही एव्हाना सोयीस्करपणे विसरलो.

माझ्या विद्यार्थिनींनी आग्रहाने दिलेल्या वहीच्या पानांवर मी काहीच लिहिले नाही. तशी मानसिक तयारीही कधी दाखवली नाही. लिहिण्यासाठी कधी पेन हाती घेतला नाही. पण आज अक्षरयात्रा करायला निघालोय. ती वही नाही; पण की बोर्ड हाती आहे. अक्षरयात्रेस मी निघतोय. पण काय लिहावे, हा प्रश्न अनेक दिवसापासून समोर असल्याने अक्षरसाधनेपासून मी आतापर्यत लांब पळत राहिलो. यात्रेतील गर्दीला पाहून कशाला धक्के खायला जावं, म्हणून एखाद्यास दूर दूर राहणेच सुरक्षित वाटते. तसेच काहीसे माझ्याबाबतही. पण दूर राहून सुरक्षित वाटत असले, तरी यात्रेतील गर्दीतून मिळणाऱ्या निरतिशय आनंदापासून वंचित राहतो. अर्थात, याची जाणीव तशी फार उशिरा होते. मीही अक्षरांच्या लिहित्या दुनियेपासून दूर पळत राहिलो. काय लिहावे, हा संदेह मनात होताच अन् सोबत काहीतरी कमी असल्याची भावना.

पाण्यात पोहावे कसे? सायकल चालवायला शिकावे कसे? हे पुस्तक वाचून अथवा व्याख्यान ऐकून नाही शिकता येत. त्यासाठी पाण्यात सूर मारावाच लागतो. हातपाय खरचटल्याशिवाय सायकल कशी चालवता येईल? अक्षरांच्या प्रवाहात असाच सूर मारण्याचा प्रयत्न करतोय. जमला तर ठीक, नाही जमला तर नाही. थोडक्यात काय, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. पण निदान पाण्यात पडल्यावर हातपाय तरी चालवता येतील ना! काही असो, माझ्या या विद्यार्थिनींच्या आग्रहाची पूर्ती उशिरा का होई ना, एक मर्यादित अर्थाने ब्लॉगवरील या लिखाणाच्या माध्यमाने माझ्यापुरती तरी करतोय. माझे हे लेखन कदाचित त्या वाचतील तर म्हणतील, ‘देरसे आये, लेकीन दुरुस्त आये.’

एखाद्या सिद्धहस्त लेखकाच्या, साहित्यिकाच्या अथवा प्रज्ञावंताच्या प्रज्ञेने मी लिहावं, अशी शक्यता सुतराम नाही. निदान या जन्मी तरी! आणि मला तुम्ही लिहाच, असं आग्रहाने सांगणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांचीसुद्धा अशी अपेक्षा नाही. पण तरीही आपलं, आपल्या परिचयाचं कोणीतरी माणूस बोलतं, लिहितं याचं एक प्रकारचं अप्रूप असतं. तसंच माझ्याबाबतही असावं. माझ्या अध्यापनाचं, अध्यापनशैलीचं कौतुक करणारी माझी ती निरागस मुलं-मुली, त्यांचा निर्व्याज, नितळ, निखळ स्नेह या अक्षरयात्रेतील मला मिळालेला ‘अक्षरठेवा’ आहे. त्यांच्या प्रेमळ आग्रहालाच, या यात्रेच्या सफरचं श्रेय आहे. बघू या! अक्षरयात्रेतील प्रवासात मला काय करता येतं आणि काय मिळतंय. ते येणाऱ्या काळाच्याच अधीन असेल!